'फिर जिंदगी' - एक झलक

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

'हृदय प्रत्यारोपणातून वाचले तरुणाचे प्राण', 'चेन्नईकरांनी हृदयासाठी ट्रॅफिक थांबवून दिलं माणुसकीचं दर्शन', 'ब्रेन-डेड माणसाने दिले पाच जणांना जीवन', 'जिवंत हृदय अवघ्या अर्ध्या तासात पुण्याहून मुंबईला पोहोचवले' अशा बातम्या हल्ली वरचेवर आपण वर्तमानपत्रांतून वाचतो. या सार्‍या बातम्या अवयवदानाशी संबंधित आहेत.

आपल्या देशात दरवर्षी लाखो रुग्ण अवयव निकामी झाल्यानं आजारी पडतात किंवा मृत्यूला सामोरे जातात. मृत्यूवर अजून आपण विजय मिळवला नसला, तरी वैद्यकीय क्षेत्रातल्या नवनव्या संशोधनांमुळे संबंधित व्यक्तीच्या अवयवांना पर्याय म्हणून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरातले अवयव काढून त्यांचं प्रत्यारोपण करता येणं आज शक्य झाले आहे. एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे सात लोकांचे प्राण वाचू शकतात. मात्र भारतात दुर्दैवानं अवयवदात्यांचं प्रमाण अत्यंत अल्प आहे. भारतातल्या लाखो रुग्णांना अवयव प्रत्यारोपणाची गरज भासत असली, तरी अवयवदानाबाबत फारशी जनजागृती नसल्यानं गरजू रुग्णांना वेळेवर मदत मिळू शकत नाही. अवयवदान-चळवळीबद्दल भारतात सामाजिक, आर्थिक, धार्मिक कारणांमुळे सामाजिक जागृती करणं अतिशय कठीण असल्यानं अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांचं प्रमाण अत्यंत नगण्य आहे.

एखादा ‘ब्रेन-डेड‘ झालेला रुग्ण किडनी, डोळे, यकृत, हृदय, फुफ्फुसं, त्वचा दान करू शकतो, अवयवदान नक्की कोणाला करता येतं, 'ब्रेन-डेड' असणं म्हणजे काय, अवयवदानाची नक्की प्रक्रिया कशी, अवयवदानामुळे नक्की योग्य त्या व्यक्तीला मदत मिळते का, असे अनेक प्रश्न रुग्णांच्या नातेवाइकांच्या मनांत असतात. जोडीला असतात अंधश्रद्धा, गैरसमज आणि मर्गदर्शनाचा अभाव.

अवयवदानाच्या प्रक्रियेत सर्व संबंधित व्यक्ती, रुग्णालय व संस्था यांच्यांत समन्वय साधण्याचं, रुग्णांच्या नातेवाइकांना मार्गदर्शन करण्याचं, गरजू रुग्णांच्या याद्या अद्ययावत करण्याचं, जो अवयव देणार त्याच्या आणि ज्याला अवयव मिळणार आहेत त्याच्या नातेवाइकांना सर्व प्रकारची मदत करण्याचं, अवयवदानाविषयी जनजागृती करण्याचं काम करते झेडटीसीसी, म्हणजे झोनल ट्रान्स्प्लांट को-ऑर्डिनेशन कमिटी. ही एक सरकारमान्य, पण बिगर-सरकारी अशी कमिटी आहे.

अवयवदानाविषयी समाजात व्यापक जाणीव निर्माण व्हावी, या हेतूनं झेडटीसीसीच्या पुणे विभागानं प्राज फाऊंडेशनच्या सहकार्यानं 'फिर जिंदगी...' या लघुचित्रपटाची निर्मिती केली आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

5_poster copy.jpg

अवयवदानाचं महत्त्व पटवून या प्रक्रियेची सामान्यजनांना ओळख करून देण्यासाठी या लघुचित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. रत्ना पाठक शाह, नासीरुद्दीन शाह, नीरज काबी, विक्रम गोखले, उत्तरा बावकर, अमृता सुभाष, ज्योती सुभाष, रेणुका दफ्तरदार, पर्ण पेठे, अलोक राजवाडे, डॉ. शेखर कुलकर्णी, ग्यानप्रकाश, सिद्धार्थ मेनन अशा नावाजलेल्या कलाकारांनी या लघुचित्रपटात अभिनय केला आहे.

'फिर जिंदगी...'ची ही एक झलक -

https://youtu.be/5NeBas7M5SE

फिर जिंदगी

निर्मिती - प्राज फाऊंडेशन व झेडटीसीसी
दिग्दर्शन व संकलन - सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर
कथा, पटकथा, संवाद - सुमित्रा भावे
छायालेखन - धनंजय कुलकर्णी
संगीत - साकेत कानेटकर
कविता - सुनील सुकथनकर
ध्वनिलेखन - गणेश फुके
कलादिग्दर्शन - संतोष सांखद
वेशभूषा - योगिनी कुलकर्णी

कलाकार - रत्ना पाठक शाह, नीरज काबी, नासीरुद्दीन शाह, विक्रम गोखले, उत्तरा बावकर, अमृता सुभाष, ज्योती सुभाष, ग्यानप्रकाश, डॉ. शेखर कुलकर्णी, रेणुका दफ्तरदार, पर्ण पेठे, अलोक राजवाडे, कृतिका देव आणि सिद्धार्थ मेनन

***

येत्या ४ डिसेंबरला संध्याकाळी ५.३० वाजता पुण्यातल्या बालशिक्षण मंदिराच्या सभागृहात या लघुचित्रपटाचा प्रथम खेळ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी चित्रपटाशी संबंधित तंत्रज्ञ व कलाकार उपस्थित राहणार आहेत. चित्रपटाच्या खेळानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक, कलाकार यांच्याशी संवाद साधला जाईल.

या खेळास उपस्थित राहण्याची इच्छा असल्या कृपया chinmay@maayboli.com या पत्त्यावर संपर्क साधावा.


महत्त्वाची गोष्ट म्हणजे ५ डिसेंबरपासून 'फिर जिंदगी' हा लघुचित्रपट मायबोलीच्या यूट्यूब वाहिनीवर बघण्यासाठी उपलब्ध असेल.

***

अवयवदानासंबंधी अधिक माहितीसाठी श्रीमती आरती गोखले यांच्याशी ९८९०२ १००११ या क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता.

***
प्रकार: 

पाच तारखेला सकाळपासून हा चित्रपट वर दिलेल्या दुव्यावर बघता येईल. तुम्ही बघा, इतरांनाही बघायला सांगा.

ट्रेलर आणि कविता जबरदस्त! नक्की बघणार. हे सगळं चालू असतानाचा ताण पेलवत नाही. रत्ना पाठक शहा आणि नसिरुद्दीन शहा ह्यांच्या अभिनयाची झलक पाहूनच समजतंय की ते भूमिका जगले असावेत.

छान ओळख . मुंबईत कुठे पाहायला मिळणार अस विचार मनात आल्याबरोबरच खालच्या ओळीत यूट्यूबबद्दल कळालं . ☺

कलाकारांमध्ये नीरज काबी नाव वाचून उत्सुकता निर्माण झालीये

छान विषय .. शॉर्ट फिल्म नक्की बघेन ..

इथे अमेरिकेत लायसन्स अप्प्लाय /रिन्युव्ह करतानाच ऑर्गन डोनर असल्याचं नोंदवता येतं .. तशी काही सहज सुविधा उपलब्ध व्हायला हवी भारतात ..

अरे वा, वेगळाच विषय! लेख लिहिल्याबद्दल आभार. >> +१
युट्युबचं मायबोली चॅनल आवडलं. इथे अजुन क्लिप्स (जुन्या, बर्‍याचश्या तुझ्याच लेखातल्या) टाकणार आहेत का? सगळ्या एकाच ठिकाणी असल्यास सापडायला सोपं जाईल.

चिन्मय,

खरेच एका चांगल्या विषयावर काढ्लेला लघुपट आहे. U Tube वर नक्की बघणार.

माहिती शेअर केल्याबद्द्ल खुप धन्यवाद.

देशातल्या काही नातेवाईकांना माहिती पाठवली आहे. ५ तारखेच्या खेळाबद्द्ल. कदाचित उपस्थित राह्ण्याबाबत तुम्हाला संपर्क करतील.

देशाबाहेर राहणारे आम्ही या सर्वास मुकतो. पण U Tube वर उपलब्ध आहे हे खुप चांगले झाले.

प्रिया

छान ओळख .
ह्या लघुचित्रपटाचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचावा आणि समाजात अवयव दानाविषयी जागृती निर्माण व्हावी ही सदिच्छा !

छान ओळख .
ह्या लघुचित्रपटाचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचावा आणि समाजात अवयव दानाविषयी जागृती निर्माण व्हावी ही सदिच्छा ! >>>>+११११११

अरे वा..खूप वेगळा विषय आणि छान ओळख.
इथे माहिती शेअर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चिनूक्स .!
मायबोली यू ट्यूब बद्दल माहित नव्हतं.नक्की बघणार आणि इतरांनाही सागणार.