मटण चॉप्स

Submitted by अमेय२८०८०७ on 2 November, 2015 - 03:25

मटण चॉप्स - 8 ते 10
(जाड असतील तर एखाद्या जड वस्तूने थोडे फ्लॅट करून घ्यावेत)

मॅरीनेशन - घट्ट दही 2 टे स्पू , आले लसूण पेस्ट 2 टी स्पू , तिखट 1 टी स्पू (किंवा आवडीनुसार), धणे जिरे पावडर - 1 टे स्पू, हळद अर्धा टी स्पू , गरम मसाला 1 टे स्पू अर्धा कांदा बारीक चिरून, कोथिंबीर बारीक चिरून, अर्धा टे स्पू लिंबाचा रस, व्हिनेगर 1 टी स्पू, चिमूटभर साखर, चवीनुसार मीठ, पाऊण टे स्पू मैदा, अर्धा टी स्पू तेल
सर्व एकजीव करून घ्यावे.

चॉप्स परतण्यासाठी दोन-तीन टे स्पून तेल

चॉप्सना मॅरीनेशन लावून किमान अर्धा तास ठेवावे

नॉन स्टिक फ्राईंग पॅनमध्ये तेल गरम झाल्यावर चॉप्स पसरून घालावेत
पाच मिनिटे मोठ्या आंचेवर एका बाजूने परतून घ्यावेत
नंतर दोन्ही बाजू दहा दहा मिनिटे झाकण लावून, मध्यम आंचेवर परतून घ्याव्यात. आंच कमी असेल तर शक्यतो खाली लागणार नाहीत पण तसे दिसले तर अगदी चमचा चमचाभर पाणी मधून मधून घालत रहावे. आवडत असेल तर शेवटच्या दहा मिनिटांत हळद- मीठ लावलेल्या कांद्याच्या चकत्याही फ्राय करून घेता येतील.

चॉप्स चांगले शिजल्यावर काढून घ्यावेत.

वाह शेफने या सोबत "Curry Leaves-Coconut Rice रेकमेंड केला होता तोही लगेहाथ केला. सोपी कृती आहे

कढीलिंबाची 15-20 पाने, पाऊण वाटी खोवलेले ओले खोबरे, दोन लसूण पाकळ्या, एक छोटी हिरवी मिरची, छोटा चमचा चिंच पेस्ट आणि आवडत असेल तर अगदी थोडी कोथिंबीर थोड्या पाण्यासोबत (नारळाचे पाणीही चालेल) बारीक मसाला वाटून घ्यावा.

पाऊण वाटी तांदळाचा मोकळा भात करून घ्यावा.
कढईत तेल किंवा लोणी गरम करून त्यात कढीलिंबाचा वाटलेला मसाला परतून घेऊन, चमचाभर पाणी व मीठ टाकून भातही नीट परतून घ्यावा.

Lamb Chops2.JPG
(फोटोत फ्रीजमध्ये उरलेल्या कोल्हापुरी ओल्या मसाल्याची झटपट केलेली ग्रेव्हीही आहे,

दुसरे म्हणजे चॉप्सचा हातात धरायचा भाग मॅरीनेट करायच्या आधी सुरीने व्यवस्थित खरवडून घेतात, शेफ भाषेत त्याला Frenching म्हणतात. मी कंटाळा केला त्यामुळे टोकाशी जरा जळलेत पण बाकी चॉप्स मस्त शिजले)

ग्रेव्हिसाठी:

दोन मीडियम कांदे उभे चिरून
आले साधारण अर्धा इंच चिरून
लसूण पाकळ्या 8-10
सुके खोबरे अर्धी वाटी (कापून/किसून)
ओले खोबरे खोवून पाव वाटी
टोमॅटो दीड बारीक चिरून
तीळ तीन टी स्पून
जिरे अर्धा टी स्पून

हे सर्व थोड्या तेलात खरपूस भाजून घेणे. ओले खोबरे आणि टोमॅटो सर्वात शेवटी टाकणे.

भाजलेले जिन्नस थोड्या कोथिंबीरीसोबत आणि पाणी घालून मिक्सरमधून बारीक वाटून ओला मसाला करून घ्या.

कढाईत थोडे तेल गरम करून मसाला चांगला परतून घ्या. तेल सुटले की कांदा लसूण मसाला (किंवा काश्मीरी तिखट) एक टे दीड टे स्पून धणे जिरे पावडरसोबत परता. नंतर हवा तितका पातळ/दाट रस्सा होईल इतपत गरम पाणी घालून चांगली उकळी काढा. चवीपुरते मीठ आणि गरम मसाला घालून दोन मिनिटे शिजवा.

स्रोत : वाह शेफ

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्याकडची दिवाळी मासाहारी असते हे अगदी नव्यानी कळल!!! आणि अजून दिवाळी सुरु व्हायची आहे हे सुद्धा!!

आता मासाहारी चिवडा, ओले मास भरून करंजी, मासाहारी शंकरपाळे असे सगळे दिवाळीचे पदार्थ मादाहारी करून बाटवून टाका संस्कृतीला. कारण तुम्ही शिकलेले लोक. जुने लोक तद्दन मुर्ख ज्यांनी सात्विक प्रथा सुरु केल्यात.

Sad

बी..प्लीज.. होल्ड युअर इमोशन्स,please refrain from making personal comments !!! आपल्या संस्कृती चा पाया भक्कम आहे रे, नुसत्या रेस्पी लिहिल्याने किंवा वाचल्याने डळमळीत नाही होणार अजिबात!!!

पाककृती मस्तच. फोटो कातिल!

दिवाळीच्या दिवशी अभ्यंगस्नानानंतर असे गरमागरम मटण चॉप्स खायला मज्जा येईल.

बी, भारतात दिवाळी ऑफिशीयली ७ तारखेपासुन सुरू होतेय, वसुबारस पासुन.

सिंगापुरात सुरू झाली असेल तर कल्पना नाही. जर सुरू झाली असेल तर दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

जर मांसाहाराचा तिटकारा आहे तर "मटण चॉप" असे ढळढळीत मांसाहार सुचवणारे नाव ज्या रेसिपीच्या शिर्षकात लिहिलेय त्या धाग्यावर आपण जावेच कशाला?

बाकी, संस्कृतीबद्दल वर्षूशी सहमत.

दिवाळीच्या दिवशी अभ्यंगस्नानानंतर असे गरमागरम मटण चॉप्स खायला मज्जा येईल.
<<

Lol

मस्त रेसीपी.

सक्रिय | 3 November, 2015 - 18:16
बी उगाच डोक्यात जाउ नकोस. बिनडोक कुठला. याला अक्कल शिकवा रे कोणीतरी.

<<
<<

बी चे जाऊदे, पण एकाद्या "सक्रिय" सार्वजनिक संस्थळावर दुसर्‍या सदस्याबद्दल 'भाषा' कशी वापरावी ह्यांची अक्कल तुला शिकायची जास्त गरज आहे.

कढीलिंब-ओला नारळ भातदेखिल आवडला. >>> हा भात नक्कीच करेन.
मॅरिनेशनमधे फक्त आलेलसूण,हि.मि.मसाला एवढच टाकायची.कांदा,मैदा कधी घातला नव्हता.माहितच नव्हते,आता कां,मै.घालून करेन.
ती ग्रेव्ही कशी बनवली तेही लिहा प्लीज.फार टेम्टींग वाटतेय.

मस्तच दिसतायंत. मटण कधी घरी केले नाहीये त्यामुळे करुन बघेन का माहीत नाही. भात नक्कीच ट्राय करेन.
मटण शिजायला कठीण असते असे ऐकलेय. मग ह्याच मसाल्यात चिकनचे लेग पीसेस अशाच पद्धतीने शिजतील का ?

****
आपल्या मराठी संस्कृतीत गौरीला सुद्धा मटणाचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे काही लोकांत ( जात मुद्दाम लिहित नाही !). अगदी पूर्वापार चालत आलेली ! खरंतर शौर्यरस आणि मांसाहार ( शिकारीशी संबंधित ) हे हातात हात घालून जातात. आत्ताच बंगाली दुर्गापूजा झाली. तिथे देवीच्या समोर फिश, चिकन, मटण सगळ्याचे स्टॉल्स होते.
दिवाळी आणि शाकाहारी आहाराची सांगड तर कधीच पाहिली नाहीये. गणपती, महाशिवरात्र, एकादशी ह्या सणांशी किंवा श्रावण महिन्यात घातलेली पाहिली आहे.

बी ,

तुमची कुठली संस्कृती ते माहित नाही , पण आमच्याकडे कोल्हापूरला तरी भाऊबीजेला मटणाची अगदी पूर्वापार परंपरा आहे .

अर्थात तुमच्या लेखी आम्ही असंस्कृतच असणार म्हणा Happy

आमच्याकडे असतो नवरात्रात अष्टमीला तिखटा नैवेद्य आणि भाऊबीजेला खायचा वार असेल तर मटण-वडे. जोडीला सुगरणींचे खीम्याचे कानोले ही तर खासीयत.

बी, मांसाहाराने वगैरे संस्कृती बाटत नसते. तू शाकाहारी आहेस, ठीक आहे. मात्र मायबोलीवर कुणी कधी मांसाहारी पाकृ टाकाव्यात/ टाकू नयेत वगैरे नियमावली नाहीये. तेव्हा त्याबाबत टिप्पणी नको.

झालं का इथेपण चालू? मटण चॉप्स असे नाव दिलेल्या रेसिपीमध्ये शाकाहारी पदार्थ तर नक्कीच नसणार!

दिवाळीला (लक्ष्मीपूजनाच्या दिवशी) तमिळ लोकांमध्ये चिकनचा नैवेद्य असतो. सिंगापुरातल्या तमिळींना विचारून बघ.

आपली खाद्यसंस्कृती नक्की काय आहे ते समजून घेण्यासाठी मायबोलीवरच अजरामर लेखमालिका लिहिलेली आहे. त्यावर एकदा नजर फिरवून बघा.

माझी इथली घरमालकीण तमिळ आहे. चार पिढ्यांपासून इथेच राहतात. त्यांच्याकडे दिवाळीला मासाहार करत नाही. विदर्भात मुळीच दिवाळीला मासाहार करत नाही.

वाचून वाईट वाटल तुमच्याकडे मासाहार इतक्या प्रमाणात रुजला आहे.

मला पण जातपात काढायला आवडणार नाही पण आम्ही ब्राह्मण नसूनही आमच्या समस्त काकड कुटुंबात कुणीही मासाहार करत नाही.

ज्याने त्याने काय आणि केव्हा खाव हा त्याचा आणि त्याच्या घरातल्या लोकांचा प्रश्न आहे अस मला वाटते . एखाद्याने काय आणि केव्हा खाल्ल् याबाबित नाव ठेवायचा अधिकार दुसऱ्या व्यक्तीला नसतो .

आवरा!!!!!!!
आपल्याला खायचं नाही तर खाऊ नये. पण दुसर्‍यांनी काय खावं, खाऊ नये हे शिकवायलाही जाऊ नये.
प्रत्येकाच्या घरचं, कम्युनिटीचं वेगळं कल्चर असतं. ते पचनी पडलं नाही तरी चालेल पण नावं ठेवू नयेत.

मांसाहार करणं एवढं मोठं पातक असल्यासारखं काय बोलताय बी?
त्यापेक्षा मोठं पातक आणि संस्कृती बुडणं वगैरे असं जातपात काढणं/ एखाद्याला असंकृत वगैरे म्हणणं/ एखाध्याच्या अन्नाबद्दल कमेंट करणं हे असतं ओ..

अन्नाला अनेक पर्याय आहेत. कुणाचा जीव घेऊन स्वताची भूक शमवणे हा रानातीपणा झाला जो प्राण्यांना शोभतो माणसाला नाही.

माझा उद्देश फक्त दिवालीपुरातच होता. इतर वेळी मी ह्या धाग्यांना विरोध केला नाही. पण स्वताचे समर्थन करण्यासाठी शेवटी लोक हेच सिद्ध करत आहेत कि दिवाळीला मासाहाराचेच जास्त महत्त्व आहे!!!!

>>दिवाळीला मासाहाराचेच जास्त महत्त्व आहे>>
मला नाही वाटत असे इथे कुणी म्हणत आहे. सांगायचा मुद्दा इतकाच की काही संस्कृतीत दिवाळीत मांसाहार निषिद्ध नाही आणि इथे मूळ मुद्दा हा मायबोलीवर मांसाहारी पाकृ टाकण्याबद्दल जी नापसंती दर्शवली त्याबाबत आहे.

पुन्हा एकदा, प्रत्येकाकडचं कल्चर वेगळं असतं, खाण्यापिण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. त्या दिवाळी, गणपतीपुरत्या असतील किंवा नसतील. मायबोलीवर इतकी वर्ष असून हे लक्षातही आलेलं नसेल तर कठीण आहे.

पुन्हा एकदा, प्रत्येकाकडचा पाचपोच वेगळा असतो - तो असेल किंवा नसेलही. मायबोलीवर इतकी वर्षं असून हे लक्षात आलेलं नसेल तर कठीण आहे.

रेसिपी आणि प्रेझेन्टेशन मस्त आहे. धागा भलतीकडे हायजॅक झाल्याचं खरोखर वाईट वाटलं.

Pages