मटण चॉप्स

Submitted by अमेय२८०८०७ on 2 November, 2015 - 03:25

मटण चॉप्स - 8 ते 10
(जाड असतील तर एखाद्या जड वस्तूने थोडे फ्लॅट करून घ्यावेत)

मॅरीनेशन - घट्ट दही 2 टे स्पू , आले लसूण पेस्ट 2 टी स्पू , तिखट 1 टी स्पू (किंवा आवडीनुसार), धणे जिरे पावडर - 1 टे स्पू, हळद अर्धा टी स्पू , गरम मसाला 1 टे स्पू अर्धा कांदा बारीक चिरून, कोथिंबीर बारीक चिरून, अर्धा टे स्पू लिंबाचा रस, व्हिनेगर 1 टी स्पू, चिमूटभर साखर, चवीनुसार मीठ, पाऊण टे स्पू मैदा, अर्धा टी स्पू तेल
सर्व एकजीव करून घ्यावे.

चॉप्स परतण्यासाठी दोन-तीन टे स्पून तेल

चॉप्सना मॅरीनेशन लावून किमान अर्धा तास ठेवावे

नॉन स्टिक फ्राईंग पॅनमध्ये तेल गरम झाल्यावर चॉप्स पसरून घालावेत
पाच मिनिटे मोठ्या आंचेवर एका बाजूने परतून घ्यावेत
नंतर दोन्ही बाजू दहा दहा मिनिटे झाकण लावून, मध्यम आंचेवर परतून घ्याव्यात. आंच कमी असेल तर शक्यतो खाली लागणार नाहीत पण तसे दिसले तर अगदी चमचा चमचाभर पाणी मधून मधून घालत रहावे. आवडत असेल तर शेवटच्या दहा मिनिटांत हळद- मीठ लावलेल्या कांद्याच्या चकत्याही फ्राय करून घेता येतील.

चॉप्स चांगले शिजल्यावर काढून घ्यावेत.

वाह शेफने या सोबत "Curry Leaves-Coconut Rice रेकमेंड केला होता तोही लगेहाथ केला. सोपी कृती आहे

कढीलिंबाची 15-20 पाने, पाऊण वाटी खोवलेले ओले खोबरे, दोन लसूण पाकळ्या, एक छोटी हिरवी मिरची, छोटा चमचा चिंच पेस्ट आणि आवडत असेल तर अगदी थोडी कोथिंबीर थोड्या पाण्यासोबत (नारळाचे पाणीही चालेल) बारीक मसाला वाटून घ्यावा.

पाऊण वाटी तांदळाचा मोकळा भात करून घ्यावा.
कढईत तेल किंवा लोणी गरम करून त्यात कढीलिंबाचा वाटलेला मसाला परतून घेऊन, चमचाभर पाणी व मीठ टाकून भातही नीट परतून घ्यावा.

Lamb Chops2.JPG
(फोटोत फ्रीजमध्ये उरलेल्या कोल्हापुरी ओल्या मसाल्याची झटपट केलेली ग्रेव्हीही आहे,

दुसरे म्हणजे चॉप्सचा हातात धरायचा भाग मॅरीनेट करायच्या आधी सुरीने व्यवस्थित खरवडून घेतात, शेफ भाषेत त्याला Frenching म्हणतात. मी कंटाळा केला त्यामुळे टोकाशी जरा जळलेत पण बाकी चॉप्स मस्त शिजले)

ग्रेव्हिसाठी:

दोन मीडियम कांदे उभे चिरून
आले साधारण अर्धा इंच चिरून
लसूण पाकळ्या 8-10
सुके खोबरे अर्धी वाटी (कापून/किसून)
ओले खोबरे खोवून पाव वाटी
टोमॅटो दीड बारीक चिरून
तीळ तीन टी स्पून
जिरे अर्धा टी स्पून

हे सर्व थोड्या तेलात खरपूस भाजून घेणे. ओले खोबरे आणि टोमॅटो सर्वात शेवटी टाकणे.

भाजलेले जिन्नस थोड्या कोथिंबीरीसोबत आणि पाणी घालून मिक्सरमधून बारीक वाटून ओला मसाला करून घ्या.

कढाईत थोडे तेल गरम करून मसाला चांगला परतून घ्या. तेल सुटले की कांदा लसूण मसाला (किंवा काश्मीरी तिखट) एक टे दीड टे स्पून धणे जिरे पावडरसोबत परता. नंतर हवा तितका पातळ/दाट रस्सा होईल इतपत गरम पाणी घालून चांगली उकळी काढा. चवीपुरते मीठ आणि गरम मसाला घालून दोन मिनिटे शिजवा.

स्रोत : वाह शेफ

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चॉप्सची पाककृती मस्तच आहे. कढीलिंब-ओला नारळ भातदेखिल आवडला. फोटो छान आला आहे. दोन्ही सुक्या पदार्थांबरोबर केलेली ग्रेव्ही अगदी परफेक्ट वाटली. कृपया ग्रेव्हीची आणि लगेहाथ कोल्हापुरी ओल्या मसाल्याची पाककृती द्यावी. Happy

तुम्ही पाककृती लिहिताना 'नवीन पाककृती' ही लिंक वापरलेली नाही. हा चुकून गप्पांचा धागा तर झालेला नाही ?

व्वा! चॉप्स, भात आणि जोडीला ग्रेव्ही, एकदम तोंपासू बेत! चॉप्स ची पाकृ आवडली. भाताचा वेगळाच प्रकार छान वाटतोय. प्लीज ग्रेव्हीची पाकृ देखील द्या म्हणजे विंटर ब्रेकमधे करता येइल.

मस्त पाकृ.

मी प्रेशर कूकर मधे एका भांड्यात चॉप्स/ मॅरिनेड असं घालून २-३ शिट्या वाफवून घेते अन मग शॅलो फ्राय करते. आता असे मंद आचेवरच तव्यावर करुन पाहीन

मस्त रेसिपी आहे! राइस पण वेगळा वाटतोय एकदम. तो तर नक्कीच करून बघता येईन लगेच.
बायदवे व्हेजिटेरियन्स च्या सोयीसाठी बाफचे नाव चांगले कळेल असे आहे की Happy तरी पण उघडून इथे येऊन नावं ठेवण्यात काय पॉइन्ट आहे कळेना! असो .

मस्त दिसतेय प्लेट. मी आतापर्यंत एकदाच केलेत चॉप्स बहुतेक अंड्यात घोळवून वगैरे. आता पुन्हा केले पाहिजेत. ती भाताची पण आयडीया/कृती दिलीत ते बरं आहे. चॉप्सबरोबर काय हा प्रश्न होताच.
आणखी >> फोटोत फ्रीजमध्ये उरलेल्या कोल्हापुरी ओल्या मसाल्याची झटपट केलेली ग्रेव्हीही आहे,
यावर जरा लाइट मारा. ताट यमी आहे Happy

अवांतर, अमेय, तुम्ही पुर्वीच्या स्टाइलने रेसिपी नाही टाकली?

करून बघायची शक्यता नाहीच पण प्रेझेंटेशन आवडलं. ती प्लेटही मस्त आहे.>> +१
राइस ची कल्पना मस्त! तो नक्कीच करणार Happy

मस्तच. करुन बघणार.
सगळ्या भेंद्या, कोब्या नी भाताच्या रेस्प्या वाचल्यवर ही रेस्पी वाचुन जीवाला आनंद झाला.

राईसची रेसिपी नक्की जमणेबल आहे, त्यामुळे करून पाहणार.

चॉप्स आजवर घरी कधी केले नाहीत. (मटणच फार क्वचित केलंय) त्यामुळे धाकधूकीचं काम वाट्तंय. रेडीमेड चॉप्स मिळाले तर नक्की करून पाहणार.

चॉप्स शिजतील का ही धाकधुक आहे जराशी, पण तरीही करून पाहीन.

बी, दिवाळीला वेळ आहे अजुन आणि त्यातही भाऊबिजेला भावासाठि ख़ास नॉन वेज मेन्यू असतो खुप जणांकडे, कधिमधि माझ्याकडेही.

Pages