पुणेरी दाल तडका ..................................अर्थात फोडणीची आमटी

Submitted by स_सा on 26 August, 2015 - 04:43

लागणारे जिन्नस:
एक वाटी तुरडाळीचे वरण
पाणी - तांब्या भर (साधारण पाउण लिटर थोडे कमी जास्त चालेले)
कोथिंबिर - ४ काड्या
टोमेटो - १ बारिक चिरून
गुळ - छोटासा तुकडा

फोडणीसाठी :
तेल- २ चमचे (साधारण १० मिली)
गोडा मसाला - २ चमचे
मोहरी - पाव चमचा
कांदा - १ मध्यम चिरलेला (गरज वाटल्यस तशी आवश्यकता नाही)
लसुण - २ पाकळ्या सोललेले
मिरची - ( हो एकच)
मिठ - चवीनुसार
हळद- चिमुट्भर
कढिपत्ता - ४ - ५ पाने (कोथिंबीर घेताना कढीपत्ता फुकट मिळते म्हणुन जास्त घालू नये.)

क्रमवार पाककृती:

वरण डावाच्या सहाय्याने हलकेच एकजीव करावे पुर्णा गोळा करु नये डाळ दिसली पाहिजे. गॅस पेटवून त्यावर कढई ठेवा. आता कढईत तेल गरम करायला ठेवा. निट तापल्यावर प्रथम मोहोरी टाका ती तडतडल्यावर लगेच तेलात फोडणीच साहित्य टाका. फोडणी थोडी खमंग झाली पाहिजे. आता त्यात वरण घालण्यापुर्वी मिरची काढुन टाका. फोडणी जळण्यापुर्वी त्यात वरण, मिठ आणि पाणी घाला आणि चांगली उकळी फुटे पर्यंत गरम करा, गुळाचा तुकडा आणि टोमॅटो टाका.
वरून कोथिंबिर टाका.

वाढणी -
पोळी बरोबर किंवा भातावर घेता येईल.

अधिक टिपा:

आमटी शक्यतो रात्रीच्या जेवणाच्या वेळेस केली जाते. सकाळची थोडी भाजी, पोळी आणि गरम आमटी भात असा झकास बेत होतो.
तिखटाचे प्रमाण अत्यंत नगण्य असल्यामुळे लहान मुलांना विशेष करून आवडते. रात्री झोपताना जळजळ, वगैरे प्रकार होत नाहीत
ज्यांना जळजळ होत नाही त्यांनी ती फोडणितून बाजुला काढलेली मिर्ची तेल मिठा बरोबर तोंडी लाउन खावी.
हिच पाककृती मुगाच्या डाळीचे वरण वापरूनही करता येईल

पुणेरी डाळ तडका असे नाव देण्याचे कारण मी ही पाककृती पुण्यातच पाहिली अन्यत्र कुठे उपलब्ध असल्यास निव्वळ योगा-योग समाजावा.

फोटो - उपलब्ध झाल्यावर चिटकवेन

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक वाटी तुरडाळीचे वरण
>> हे कसं करतात ते कुठं शोधायचं ते नाही दिलंत. हे म्हणजे वडापाव करायच्या पाककृतीत ४-५ बटाटवडे, तेवढेच पाव, लसूण चटणी, हिरवी चटणी, चिंचेची चटणी, हवा असल्यास कांदा, वगैरे टाकून वडे पावात चटण्या टाकून कसे भरावे याची पाककृती देण्यासारखे झाले. Light 1

आम्ही पण असच करतो हे सांगताना ती अस्मिता जास्त महत्वाची>>>> हो हो रीया .. माझ्यात मुबैंकर अस्मिता नसल्याने मी हार्टलेस तर नाहीये ना Lol

छे छे , अस सगळ एकत्र का केलंय
हिरवी मिरची घातली की फोडणीचे वरण
लाल तिखट घातल की आमटी .
आमच्या आमटीला दाल तडका म्हणाल्या बद्दल निषेध निषेध

आमच्या कोकणात यात भरपूर ओलं खोबरं घालतात. ताजा कढीपत्ता आणि हिरव्यामिरच्या हव्यातच. (मिरच्या म्हणजे दीडच. उगाच खंडीभर घालायला आपल्या अस्मिता पेटलेल्या नाहीत)

स_सा.. यू टू !!!!<< येस्स दिनेशदा
मी कधी घरी एकटा असलो की असले प्रयोग करतो, बरेचदा उप्द्व्यापच होतात त्यामुळे लिहित नाही

मस्त रेसिपी.. आम्ही पण अशीच करतो आमटी!
एक से एक प्रतिसाद Biggrin

कोथिंबीर म्हणजे काय? >> सांभार म्हणा .. कोतमीर म्हणा.. ४ काड्या महत्वाच्या Proud

कोथिंबीर घेताना कढीपत्ता फुकट मिळते म्हणुन जास्त घालू नये. >>> Lol या एका वाक्यात ही पाकृ कोणत्या शहरातील आहे हे लगेच लक्षात येइल. हे वाक्य वाचताना अस्सल पुणेकर मनातल्या मनात "ह्म्म्म. पॉइंट आहे" असे म्हणूनच पुढे जाईल.

तिखटाचे प्रमाण अत्यंत नगण्य असल्यामुळे लहान मुलांना विशेष करून आवडते. >> हे मी "लहान मुलांना व पुणेकरांना विशेष करून आवडते" असे वाचले चुकून.

पाव चमचा >>> चहाचा चमचा (टीस्पून) असतो माहीत होते. पावाचाही असतो हे नवीनच ऐकतो.

या एका वाक्यात ही पाकृ कोणत्या शहरातील आहे हे लगेच लक्षात येइल. हे वाक्य वाचताना अस्सल पुणेकर मनातल्या मनात "ह्म्म्म. पॉइंट आहे" असे म्हणूनच पुढे जाईल. >>> Biggrin फारेंड.

पाव चमचा हे मला वाटतं पुण्यातलं स्पेशल प्रमाण आहे. नेहमीच्या चहाच्या चमच्याच्या पावपट असा तो चमचा असेल.

पाणी >> हे शक्यतो भाज्या / कडधान्ये वगैरे शिजवलेले पाणी असावे. किंवा लोणकढे तूप केलेल्या पातेल्यात खाली थोडा साका उरलेला असतो. त्यात पाणी घालून ते उकळावे व असे उकळलेले पाणी वापरावे. डाळ शिजवण्याअगोदर अर्धा तास किमान कोमट पाण्यात भिजवून ठेवली तर ती चांगली शिजते. ती शिजवताना त्यात थोडा हिंग, किंचित मीठ, हळद व तेलाचा एखादा थेंब घालावा.
कढीपत्ता नसेल तर कढीपत्त्याच्या काड्याही आमटीला कढीपत्त्याचा स्वाद देऊ शकतात.
कोथिंबीर नसल्यास कोथिंबिरीच्या काड्या.
आमटीला छान तवंग हवा असेल तर फोडणीत किंचित साखर टाकावी किंवा फोडणीत तिखट घालताना तेलात वरून ते नेम धरून बचक्कन् घालावे! ( Lol )

अस्सल पेठी पुणेकर तवंग किंवा तर्री वाली आमटी खातात होय? काहीही हं अकु Proud

आणि तिखट क धी ही फोडणीत घालायचं नसतं हा बेसिक नियम Wink

Proud हो, घरी क्वचित होणार्‍या तवंगाच्या आमटीचं प्रकरण हे मराठवाड्याच्या प्रभावाचं प्रतीक असावं! Wink

हिरवी मिरची ही टांगण्यासाठी असते. Lol

यू टू? Lol
ते असो, आमटी झकास होत असणार! तुमच्यात रात्री पाटपाणी कधी घेतात, म्हणजे वेळेत पोचायला बरं आपलं. सकाळची थोडी भाजी, पोळी चालवून घेऊ गरम आमटी भातासोबत Happy
आमटी मात्र मातोश्रींना करायला सांगा, तुमच्या हातची पुढच्या वेळी चाखू.

अमा, वरदा, मामी, टू गुड Lol

हे पा.. चिंगूनाना(भरपूर नारळ) या रेसिपीत नसल्याने आमची पेठी अस्मिता दुखावलेली आहे. तेव्हा त्याचं काय ते बघा आधी.. Wink

वरणाला फोडणी घातली की ती माझ्याकरता आमटीच असते.:फिदी:( तुम्ही फोडणीचे वरण म्हणा हवे तर) मग त्याच्यात व्हेरीएशन्स असतात. चिन्च-गुळ/ आमसुल-गुळ/ कैरी-गुळ/ लसुण/ कढीपत्ता/ आले ( तोय )/ मुळ्याचे/ वान्ग्याचे/ गवारीचे/ शेवग्याचे, अजून यादी लाम्बवता येईल.

तर स-सा तुम्ही ससा असुनही यात वेगळा कट करुन गाजर न घातल्याबद्दल तुमचा जाहीर निषेध.

चिंगूनाना(भरपूर नारळ) या रेसिपीत नसल्याने आमची पेठी अस्मिता दुखावलेली आहे. <<< नी तै मला अशी कुजबुज ऐकू आली आहे की आमटीत शेंगादाण्याचा कुट न घातल्याने सोलापुर कडच्या स्मिता ने सुद्धा खेद व्यक्त केला आहे. त्यामुळे प्रांतिक वाद कमी करण्याच्या उद्देशानेच या पाककृतीची निर्मिती झाली असावी का ??

ससा असुनही यात वेगळा कट करुन गाजर न घातल्याबद्दल तुमचा जाहीर निषेध.<<< वो तो मै आमटी बनाते वक्त खाडाला

Pages