कॅलिफोर्निया २०१५ : (२) पूर्वतयारीचे तपशील

Submitted by मामी on 27 July, 2015 - 01:02

आधीचा भाग - कॅलिफोर्निया २०१५ : (१) ट्रिप - एक आखणे

आम्ही इतक्या दिवसांकरता अमेरीकेला जाणार म्हटल्यावरच बहिणींनी बोटावर बोटं ठेवायला सुरूवात केली. त्याचं कारण आमचं ट्रॅक रेकॉर्ड खरंच खराब होतं. कोणत्याही ठिकाणी १० दिवसांकरता जरी गेलो तरी ५-६ दिवसांत आम्हाला घरची आठवण येऊ लागते. कधीकधी तर ट्रिप प्रीपोन करून घरी आलोय. त्यामुळे त्यांचंही काही चुकलं नव्हतंच.

नवर्‍यालाही मनातून थोडी धाकधुक होती की या दोन बायका 'आत्त्ताच्या आत्ता घरी जायचंय' म्हणून टाळा तर पसरणार नाहीत ना? (अर्थात होमसिक होण्यात तो ही काही कमी नाहीये.) पण तसं काही न होता आम्ही ट्रिप पूर्ण केली. यात कदाचित तिथे घरं आणि अपार्टमेंटस घेऊन राहिलो या घटकाचा मुख्य हात असेल. शिवाय बहिण आल्यावर तिच्याबरोबर दोन फुलटाईम कॉमेडी एंटरटेनमेंट चॅनेल्सही होती हे ही एक महत्त्वाचं कारण असेल. तर या दोन कारणांमुळे आम्ही तग धरून राहिलो बुवा!

मी आधीही मोठ्या कालावधीकरता अमेरीकेत जाऊन आले आहे. पण त्या प्रत्येकवेळी बहिणीकडे ठिय्या देऊन राहिले होते. त्यामुळे त्यावेळी होमसिक होण्याचा प्रश्न नव्हता. नवरा इथे भारतातच राहिला होता त्यामुळे घराचीही काळजी नव्हती. पण यावेळी पूर्ण कुटुंब ५० दिवसांकरता देशाबाहेर जाणार होतं. त्यामुळे घराच्या फ्रंटवरही तयारी गरजेची होती.

कारची बॅटरी बंद करून ठेवण्याची गरज होती. मग एकदा मेकॅनिकला बोलावून त्याच्या समोर कारच्या बॅटरीची वायर काढण्याचा सोहळा झाला. रात्रभर तशीच ठेऊन सकाळी पुन्हा लावून पाहिली. कार व्यवस्थित सुरू झाली. चला, म्हणजे आता ही काळजी नाही.

घरात भरपूर झाडं. एरव्ही कुठेही गेलो तरी झाडूपोछा करणारी माझी बाई माझ्या मैत्रिणीकडे ठेवलेली चावी घेऊन एक दिवसाआड झाडांना पाणी घालून जाते. यावेळी नेमकी तिच्या मुलीची डिलिव्हरी होती आणि त्याकरता तिला तिच्या गावाला - कर्नाटकात - जावं लागणार होतं. माझी दिवसाभराची बाई तिच्या गावी चिपळूणला जाणार होती. त्यातल्या त्यात सुखाची गोष्ट म्हणजे कर्नाटकवाली साधारण १२ जुलैच्या सुमारास जाणार होती, त्यामुळे तोवर ती होतीच. आणि मग १८-१९ जुलैपर्यंत चिपळूणवाली परत येणार होती आणि तिनं मग झाडांची काळजी घेतली असतीच. मधल्या काही दिवसांचा प्रश्न होता. मग त्यावर उपाय म्हणून सगळी झाडं बाल्कनीच्या बाहेरच्या कडेला आणून ठेवली. पाऊस सुरू होणार होताच त्याचा फायदा घेण्याचं ठरवलं. प्रत्यक्षात काही घोटाळे झालेच. कर्नाटकवाली मी गेल्यागेल्या लगेच एका अ‍ॅडिशनल एक आठवड्याच्या सुट्टीवर गेली. नंतर परत आली तर तिच्या लेकीची डिलिव्हरीही लवकर झाली त्यामुळे ती गावी निघून गेली. मग मैत्रिणीनं तिच्या बाईला माझ्या झाडांना पाणी घालण्याच्या कामावर लावलं. तर ती दोन बाल्कन्यांमधल्या झाडांना पाणी घालायलाच विसरून गेली. पण अधून मधून का होईना पडणार्‍या पावसामुळे बहुतेक सगळी झाडं जगली. जरा नुकसान झालंय पण ठीक आहे.

क्रेडिट कार्ड

इंटरनॅशनल क्रेडिट कार्ड असल्याने फार काही कॅश बाळगण्याची गरज नव्हती. फॅमिली फ्रेंडकडून थोडे डॉलर्स विकत घेतले. बाकी मुख्यतः कार्डच वापरलं. मधून मधून थोडीफार कॅश ATM मधून काढावी लागली.

फोन कार्ड

आम्ही मॅट्रिक्स चे पोस्टपेड फोनकार्ड घेतले. त्यांचा एजंट अगदी घरी येऊन फॉर्मवर सही घेऊन कार्ड देऊन जातो. आम्ही ३० दिवसांचा अनलिमिटेड डेटा प्लान घेतला. पुढच्या एक्स्ट्रा दिवसांकरता प्रपोर्शनेट चार्ज लावून एकूण ५० दिवसांसाठी एजंट बरोबर वाटाघाटी करून केवळ रु. १३,०००/- त मॅट्रिक्स कार्ड मिळालं. पण पुढे या कार्डनं आम्हाला चांगलाच धक्का दिला.

त्याचं झालं असं की एजंटनं ही वाटाघाटीची बातमी कंपनीला कळवलीच नाही (म्हणे). त्यामुळे कंपनीनं ३० दिवसांकरता हा प्लॅन होता असं गृहित धरून पुढे डेटा युसेजप्रमाणे पैसे लावायला सुरूवात केली. बरं त्याबद्दल लगेच आम्हाला काही कळवलंही नाही. अचानक १० जुलैला बँकेचा मेसेज आला की मॅट्रिक्स कंपनीनं रु. १, ३०,००० क्लेम केले आहेत. बापरे! शिवाय अशी गलेलठ्ठ रक्कम क्रेडिट कार्डावर क्लेम झाल्यानं कार्डाची लिमिट ओलांडली गेली आणि रेस्टॉरंट आणि दुकानात कार्ड डिक्लाईन होऊ लागलं. आणि मग फोनही बंद झाला. बहिणीच्या फोनवरून फोन केला तर आधी पैसे भरा आणि मग फोन सुरू होईल अशी भाषा! आम्ही असे तिहेरी खोड्यात अडकलोच.

नशिबानं आमच्यात आणि एजंटात जो व्यवहार झाला तो सगळा माझ्या नवर्‍यानं इमेल करून त्या एजंटला पाठवून त्यावर त्याचा होकार घेतला होता. पण एजंटला फोन केला तर तो फोन उचलेना. इमेल पाठवली, मेसेज पाठवले पण एजंट काही उत्तर देईना. कंपनीत फोन केला तर शुक्रवार म्हणून की काय कंपनीतही कोणी फोन उचलेना. या सगळ्यात पदरचे आणखी पैसे खर्च झाले ते वेगळेच. दोन दिवस वाईट्ट काढले. मग एजंट साहेब जागे झाले, त्यांना चांगलं खडसावलं. कंपनीतून फोन आला तो नविन फोन नंबर देण्यासाठी. आम्ही सगळे जास्तीचे पैसे भरायला तयार आहोत आणि त्यामुळे ते आता आम्हाला नवा नंबर देत आहेत असं त्यांनी सांगितल्यावर आम्ही चाटच पडलो. मग त्या कंपनीला एजंट आणि आमच्यातल्या व्यवहाराची इमेल पाठवली आणि हे असले उद्योग करता हे सगळीकडे पसरवू असं स्पष्ट सांगितलं. चुपचाप फोन पुन्हा सुरू झाला. क्लेम केलेली रक्कम अजूनतरी आमच्या खात्यातच राहिली आहे. पण प्रकरण पूर्णपणे निस्तरलं नाहीये. तो एजंट भेटायला येईल तेव्हा काय ते कळेल किंवा अजून एखाद महिना जर क्लेम आला नाही तर प्रकरण संपलं असं म्हणता येईल. या सगळ्यात एक भयानक अनुभव गाठिशी जमा झाला.

नेटवर शोधल्यावरही अनेक जणांच्या मॅट्रिक्सबद्दल अशा आणि इतरही बर्‍याच तक्रारी वाचनात आल्या. त्यामुळे मॅट्रिक्स कार्ड वापरताना कृपया काळजी घ्या. एजंटला इमेल करून त्याची सगळ्या व्यवहाराकरता कबुली घ्या आणि मगच पुढे जा. विमानतळांवरही मॅट्रिक्स कार्डस मिळतात पण त्यावेळी वेळ थोडा असल्याने वाटाघाटी आणि इमेलाइमेली करण्यास वेळ नसेल तेव्हा हे सगळं आधीच घरून व्यवस्थित करून घ्या. मॅट्रिक्सला काही पर्याय असेल तर तोही असाच काळजीपूर्वक वापरा. बाकी मॅट्रिक्स कार्डाबद्दल काहीही तक्रार नाही. उत्तम चाललं आणि खूप उपयोगी पडलं.

व्हेकेशनल रेंटिंग करताना

आम्ही मुखत्वे https://www.airbnb.com/ आणि https://www.flipkey.com/ या साईट्स वापरल्या. यात अकाउंट उघडून आपल्याला आवडलेल्या जागा फेवरिट लिस्टमध्ये टाकून ठेवता येतात. मग त्यातून जी हवी ती निवडावी. फ्लिपकी ही ट्रिपअ‍ॅडवायझरचीच साईट आहे. दोन्ही साईटस वापरायला अतिशय सोप्या आणि उपयोगी फीचर्स असलेल्या आहेत.

घर घेताना कोणत्या एरीयात आहे हे काळजीपूर्वक पहावे लागते. कार असेल तर पार्किंग आहे ना? कार नसेल तर पब्लिक ट्रान्सपोर्टची अव्हेलेबिलिटी वगैरे बघावे. घरी जेवण किंवा निदान ब्रेकफास्ट करणार असू तर जवळ ग्रोसरी शॉप आहे ना? रेंट केलेल्या घरात किचन मध्ये पुरेशी उपकरणं आहेत ना? (उदा. गॅस, फ्रीज, आवन, टोस्टर, मिक्सर, कटलरी, कप्स, पॉट्स आणि पॅन्स वगैरे) याची खात्री करून घेतली. ७-८ दिवस रहात असल्याने भांड्यांकरता डिश वॉशर आणि कपड्यांकरता वॉशर ड्रायरही गरजेचा ठरतो. घराचे तपशील व्यवस्थित वाचून, वाटल्यास घर मालक /मालकिणीशी त्या साईटवरील मेसेजतर्फे बोलून आपल्या शंका दूर कराव्यात.

आम्ही घर घेतल्यानं नवर्‍याची शाकाहाराचीही चांगली सोय झाली. सकाळी ब्रेफा घरीच केले. लंच, डिनर मी आणि लेक बाहेरच घेत होतो. पण नवरा आवर्जून डिनर घरीच घेत होता. इंडियन ग्रोसरी मधून बर्‍याच भाज्या आणि लाटलेल्या चपात्या आणून ठेवल्या होत्या. दीपचे सुप्रसिद्ध सामोसे भरपूर खाल्ले. आधी बस्केच्या घरी आणि मग घरी आणून, बेक करून. ते खरंच छान आहेत. सायोनं सांगितल्याप्रमाणे भारतातून अमेरिकेत जाणार्‍या प्रत्येकानं दीपचे सामोसे खावेत असा लाडिक आग्रह मी करत आहे.

आमचं खूप बुकिंग बाकी असल्याने आणि एकूणच बरेच दिवस बाहेर असणार होतो म्हणून लॅपटॉप अत्यंत गरजेचा होता. त्याकरता आणि लेकीच्या आयपॅडकरता वायफायही लागणारच होतं. त्यामुळे अपार्टमेंट / घर / हॉटेल बुक करताना ही एक महत्त्वाची बाब लक्षात घेतली. अर्थात अमेरिकेत बहुतेक सगळीकडे वायफाय असतंच. फक्त ग्रँड कॅनियनमध्ये रुममध्ये मिळालं नाही. आमच्या इंच इंच पुढे बुक करू या धोरणानुसार रोज थोडा वेळ पुढच्या बुकिंगकरता देणे आवश्यक होतं. कारण पुढचे घर / हॉटेल / प्रेक्षणीय स्थळे याचं बुकिंग सतत सुरूच राहिलं. पुढे जेव्हा केव्हा शेवटचं बुकिंग केलं तेव्हा हुश्श्य झालं! Happy

नेटवरची पूर्वतयारी

प्रवासाची पूर्वतयारी म्हणून प्रत्येक ठिकाणची जास्तीत जास्त माहिती वाचली. या माहितीत एलेवर एका स्त्रीनं लिहिलेलं लिखाण खूप आवडलं. अतिशय डिटेल्समध्ये आणि शहराला भेट देणार्‍या टुरिस्टना काय काय नेमकं लागेल ते ओळखून केलेलं लिखाण आहे.

प्रत्येक ठिकाणच्या नेहमीच्या टुरीस्ट स्पॉट्स व्यतिरीक्त काही हटके ठिकाणं आहेत काय? काही वेगळा अनुभव देणार्‍या गोष्टी करता येतील काय. एलेमध्ये एखादा ऑपरा बघायला मिळेल काय? असंही काही वाचून काढलं.

युनिव्हर्सल स्टुडियो, डिस्नीलँड अशा हमखास यशस्वी जागांकरता कोणते दिवस योग्य, त्यांच्या दरात काही डिस्काउंटस आहेत का? फास्ट पासची सोय, कोणती आयटनरी योग्य असे अनेक छोटे छोटे डिटेल्स वाचून काढले. काही नोंदी केल्या. प्रत्येक शहराकरता ठिकाणांची लिस्ट केली.

याव्यतिरिक्त लेकीची एक लिस्ट होती. क्राफ्टची दुकानं म्हणजे मायकेल्स, जोअ‍ॅन, हॉबीलॉबी वगैरेना जास्तीत जास्त भेट देणे आणि खरेदी करणे. सध्या ती पॉलिमर क्लेच्या प्रचंड प्रेमात आहे. त्यामुळे त्याकरता लागणार्‍या अनेकानेक गोष्टींची ही भली मोठी यादी तयार होती. ती दुकानं कुठे कुठे आहेत हे साधारण शोधून ठेवलं. अमेरिकेत घेतलेल्या पॉलिमर क्लेमधून अनेक सुरेख सुरेख वस्तूही तिने बनवल्या. दर ठिकाणचा मुक्काम उठवताना तिच्या त्या मुक्कामात बनवलेल्या वस्तू बेक करणे हे एक रुटीन कामच बनून गेलं. शिवाय पुस्तकांची दुकानं, ट्रिंकेट्स वगैरेंची दुकानं होतीच तिच्या यादीत.

लॉस एंजेलिस आणि सॅन फ्रान्सिस्को येथिल पब्लिक ट्रान्सपोर्ट्बद्दल चिक्कार म्हणजे चिक्कार वाचलं. अगदी मेट्रोचा पास कसा काढायचा याचे व्हिडिओज पण पाहिले. पण प्रत्यक्षात तिथे गेल्यावरच ग्राउंड लेवलची परिस्थिती लक्षात आली. महाकिचकट पब्लिक ट्रान्स्पोर्ट व्यवस्था. अनेक वेगवेगळ्या नावानं चालणार्‍या बसेस. काढलेला पास बर्‍याच रुटवर चालतो पण तरीही डाऊनटाऊन एलेमध्ये आणखी काही वेगळ्याच बसेस आहेत त्यावर चालत नाही. असं बरच काही काही. सॅन फ्रान्सिस्कोच्या पब्लिक ट्रान्सपोर्टबद्दल तर काय बोलावे! ते एक वेगळंच आणि जिवंत व्यक्तिमत्त्व आहे. आणि त्या व्यक्तिमत्त्वानं आम्हाला भंडावून सोडलं हे ही खरं. त्याबद्दल नंतर बोलूयात. या सगळ्यात मात्र माझ्या मुंबईतल्या बेस्ट बसेसबद्दल कौतुक मनात दाटून येत होतं प्रत्येकवेळी. (आला, आला मुद्दा आला!)

(क्रमशः)

पुढचे भाग -
कॅलिफोर्निया २०१५ : (३) लॉस एंजेलिस
कॅलिफोर्निया २०१५ : (४) डिस्नीलँड, लास वेगास, ग्रँड कॅनियन
कॅलिफोर्निया २०१५ : (५) पुन्हा एकवार एले
कॅलिफोर्निया २०१५ : (६) पॅसिफिक कोस्टल हायवे
कॅलिफोर्निया २०१५ : (७) लॉस आल्टोसचा मुक्काम
कॅलिफोर्निया २०१५ : (८) सॅन फ्रान्सिस्को

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहितेयंस मामी. वाचतेय.

आधीपासून सगळे बुकिंग न करता असे टप्प्याटप्प्याने बुकिंग केलंत त्याचे प्रचंड कौतुक वाटतंय कारण कुठेही गेलो की दिवसभर फिरुन रुमवर आल्यावर इतकं दमायला होतं की लॅपटॉप उघडून पुढचा स्टडी करण्याचा विचारही करवत नाही. हे सगळं आरामात पाय पसरुन करता येत असलं तरी वेगवेगळी डील्स बघा, त्यातलं उत्तम निवडा, पर्यटनस्थळांपासून अंतरं बघा ह्यात डो़क्याला भरपूरच झिगझिग होते.
पन्नास दिवस म्हणजे तसे बरेच राहिलात त्यामुळे बहुतेक भोज्जे न लावता बर्‍यापैकी स्पेस्ड आऊट करुन बघता आली असतील ठिकाणं असं वाटतंय.
पुढचे भाग वाचायला उत्सुक आहे Happy

मस्त वर्णन . पुढचे भाग पण पटापटा लिहा .

मॅट्रिक्स चे पोस्टपेड कार्ड - लाखात बिल येण्याचे अनुभव खूप जणांना आले आहेत.

पण प्रकरण पूर्णपणे निस्तरलं नाहीये. तो एजंट भेटायला येईल तेव्हा काय ते कळेल किंवा अजून एखाद महिना जर क्लेम आला नाही तर प्रकरण संपलं असं म्हणता येईल. - अस नका करू. त्यांच्या कडून ते clear करून घ्या.
माझ्या एका ओपन कार्ड वर ४३ पैसे राहिले होते त्यांनी १ वर्षानंतर मागितले होते . एजंट हे त्यांचे employee नसतात . ते जातात सोडून आपल्या डोक्याला त्रास होतो.

आशिका ला पुर्ण अनुमोदन.
फोनच्या कार्डमुळे झालेला मनःस्ताप वाचून बाप रे! असं झालं.
पण एकूण सगळं वाचायला मजा आली.
पुढचे भाग लवकर येऊ देत Happy

मामी,

पुढच्यावेळी अमेरिकेत जाताना मेट्रिक्स नको घेऊ. तर तिथे पोचल्यावर टी मोबाईलचे प्रिपेड कार्ड किंवा एटी अ‍ॅण्ड टी चे गो कार्ड सरळ घेऊ शकता.
प्रतिमहिना ५० डॉलर्स अनलिमिटेड टेक्स / कॉल /डेटा +१५ डॉलर अनलिमिटेड इंडिया कॉल्स + २० डॉलर्स अ‍ॅक्टिवेशन एकदा. दॅटस इट.

मेट्रिक्सने मलाही कैलास यात्रेत गडंवले आहे.

टप्प्या टप्याने बुकिंग करायला सवयीचे नसल्यामुळे अवघड आहे असे वाटते. पण मी लेहला तसेच गेलो त्यामुळे ह्यातही एक वेगळी मजा आहे. वाटलं तर वाट्टेल तेवढे दिवस राहा, नाही तर कल्टी मारा, दिलके राजे टाईप.

चांगले वर्णन लिहले आहे. अपार्ट्मेंट मध्ये राहिले तर होमसिकनेस नाही जाणवत.

आणि फोन बद्दल म्हणाल कर प्रीपेड कार्ड कधीही चांगले. पण फोन न घेउन जाणे हा सगळ्यात उत्तम मार्ग आहे. फोन नसेल तर ट्रीप वर लक्ष केंद्रीत करु शकतो. मी ३० दिवसाची युरोप बॅकपॅक ट्रिप मध्ये फोन मध्ये कार्ड न घालताच घेउन घेलो होतो. फक्त अपार्ट्मेंट मध्ये wi-fi असेल तरच बुक करत होतो जे emergency साठी होते.

पुढचे भाग लवकर येऊ देत

अरे व्वा..मस्त डीटेल्ड माहिती..

मॅट्रिक्स वॉर्निंग के लिये शुक्रिया Happy

लाराचं आर्टवर्क पण टाक पाहू इकडे.. Happy

धन्यवाद मंडळी. Happy

आधीपासून सगळे बुकिंग न करता असे टप्प्याटप्प्याने बुकिंग केलंत त्याचे प्रचंड कौतुक वाटतंय कारण कुठेही गेलो की दिवसभर फिरुन रुमवर आल्यावर इतकं दमायला होतं की लॅपटॉप उघडून पुढचा स्टडी करण्याचा विचारही करवत नाही. हे सगळं आरामात पाय पसरुन करता येत असलं तरी वेगवेगळी डील्स बघा, त्यातलं उत्तम निवडा, पर्यटनस्थळांपासून अंतरं बघा ह्यात डो़क्याला भरपूरच झिगझिग होते.

>>>>> अगो, आडो, सुरवातीला जरा ओव्हरव्हेल्मिंग झालं होतं. पण जसजशी बुकिंग्ज होत गेली तसंतसं मोकळं वाटत राहिलं. आणि एकापरीनं हे आम्ही एंजॉय केलं. काहीशी ठरवून केलेली आणि काहीशी अपरिहार्य फ्लेक्सिबिलिटी तर हवीच होती आम्हाला. मग याला पर्याय नव्हताच. It was like an adventure! Happy

अस नका करू. त्यांच्या कडून ते clear करून घ्या.
माझ्या एका ओपन कार्ड वर ४३ पैसे राहिले होते त्यांनी १ वर्षानंतर मागितले होते . एजंट हे त्यांचे employee नसतात . ते जातात सोडून आपल्या डोक्याला त्रास होतो.

>>>> मृणाल१, योग्य मुद्दा लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.

पुढच्यावेळी अमेरिकेत जाताना मेट्रिक्स नको घेऊ. तर तिथे पोचल्यावर टी मोबाईलचे प्रिपेड कार्ड किंवा एटी अ‍ॅण्ड टी चे गो कार्ड सरळ घेऊ शकता.

>>>> केदार, आता पुन्हा मॅट्रिक्स अजिबात वापरणार नाही. कानाला खडा! माहितीबद्दल धन्यवाद.

आणि फोन बद्दल म्हणाल कर प्रीपेड कार्ड कधीही चांगले. पण फोन न घेउन जाणे हा सगळ्यात उत्तम मार्ग आहे. फोन नसेल तर ट्रीप वर लक्ष केंद्रीत करु शकतो. मी ३० दिवसाची युरोप बॅकपॅक ट्रिप मध्ये फोन मध्ये कार्ड न घालताच घेउन घेलो होतो. फक्त अपार्ट्मेंट मध्ये wi-fi असेल तरच बुक करत होतो जे emergency साठी होते.

>>>> साहिल शहा, फोन न घेता इतक्या दिवसांच्या आणि अशा गुंतागुंतीच्या ट्रीपवर जाणं माझ्याकडून तरी होणार नाही. घरी असताना लॅपटॉपवर नकाशात सर्व प्रकारच्या खुणा करून ठेवलेल्या होत्या, त्या तशाच्या तशा बाहेर फिरताना फोनवर मिळायच्या. फिरताना, फोनवरचं जीपीएस खूप उपयोगी पडलं. शिवाय असंख्य बुकिंग्ज करणं, पब्लिक ट्रान्स्पोर्टनं फिरणं, बहिणीशी सतत संपर्क ठेवणं, रेस्टॉरंटस चे मेन्यु ऑनलाईन वाचून कुठे जायचं हे ठरवणं, दुकानं उघडी आहेत का? त्यात अमुक एक गोष्ट मिळेल का? हे शोधणं, फिरायला गेल्यावर वेगवेगळ्या ठिकाणी हरवलेल्या मंडळींना हाकारे घालणं... हे न ते ..... या सगळ्या कडबोळ्याकरता फोन हवाच होता. इन फॅक्ट दोन दिवस फोन नव्हता तर खूप अडचण झाल्यासारखं झालं होतं. पण अर्थात प्रत्येकाचा वेगळा व्ह्यू पॉइंट. Happy

चैत्रगंधा, चनस, वर्षुताई .... फोटो टाकेन नंतर. Happy

पूर्वतयारी म्हणून जे जे वाचन केलं त्यात एक महत्त्वाचा उल्लेख राहिला. केसरी, वीणा टूर्स वगैरेंच्या या भागातल्या ट्रिपा असतात, त्यातली आयटीनरी वाचून काढली. ठिकाणं तर समजतातच पण लॉजिस्टिकली कोणकोणती ठिकाणं एकत्रित करणं शक्य आहे, त्या त्या ठिकाणी किती वेळ द्यावा, मुक्काम कुठे कुठे करावा वगैरे काही गोष्टी समजू शकतात. याशिवायही वीणा पाटील जे सदर मटा की लोकसत्तेत लिहितात ते फार छान माहितीपूर्ण असतं.

याच असं नाही पण कोणतीही ट्रिप ठरवताना यातनं काही गोष्टी समजतात.