कॅलिफोर्निया २०१५ : (७) लॉस आल्टोसचा मुक्काम

Submitted by मामी on 15 August, 2015 - 09:18

आधीचे भाग -
कॅलिफोर्निया २०१५ : (१) ट्रिप - एक आखणे
कॅलिफोर्निया २०१५ : (२) पूर्वतयारीचे तपशील
कॅलिफोर्निया २०१५ : (३) लॉस एंजेलिस
कॅलिफोर्निया २०१५ : (४) डिस्नीलँड, लास वेगास, ग्रँड कॅनियन
कॅलिफोर्निया २०१५ : (५) पुन्हा एकवार एले
कॅलिफोर्निया २०१५ : (६) पॅसिफिक कोस्टल हायवे

लॉस आल्टोसमध्ये आम्ही ६ जुलै ते ११ जुलै होतो. आमचं हे घरही फारच छान होतं. सुरेख नेबरहुड. घरापुढे मोकळी जागा, मागे मोठं बॅकयार्ड वगैरे. खरंतर अमेरिकेत अशीच असतात घरं. पण आम्हाला 'हे आमचं घर' म्हणून भारी अप्रुप वाटलं.

७ तारखेला बहिणीच्या नवर्‍याची सकाळी ७ ची परतीची फ्लाईट होती. पहाटे साडेपाचला मी अन ती जाऊन त्याला एअरपोर्टवर सोडून आलो आणि पुन्हा झोपलो.

सकाळी उठून बॅकयार्डात पाहिलं तर २-३ भले दांडगे पाईनकोन्स पडलेले होते. मी आणि लारानं जाऊन ते हावरटासारखे गोळा केले. बॅकयार्डात झाडच होतं. लारानी आधीपासून दोन तीन पाईन कोन्स जमवलेच होते. पण हे जरा जास्त मोठे होते. असे बरेच पाईन कोन्स इथून गोळा करून घरी नेऊया का? या प्रश्नाला मी ताबडतोब मान्यता दिली. मलाही ते खूप आवडतात. एक वेगळी बॅगच करूयात या करता असाही आम्ही विचार करत होतो. पण हे बेत नवर्‍याला झेपले नाहीत. त्यानं लाराला पटवून फक्त ३ पाईनकोन्सवर मांडवली केली.

लॉस आल्टोसमध्ये खूप काही अजेंड्यावर नव्हतं. बे-एरीयाचा फील घेणे आणि भारतीय जेवण जेवणे हे मुख्य हेतू होते. Happy

आम्हाला इथल्या आची कप्पाकडाई नावाच्या रेस्टॉरंटमध्ये अप्रतिम केरळी थाळी मिळाली. त्यांची चेट्टीनाड चिकनही अमेझिंग. वर फिल्टर कॉफी. त्या जेवणावर आम्ही अगदी बेहद्द खुश होऊन गेलो. बहिण सिअ‍ॅटल सोडून आची अप्पाकडाईच्या शेजारी घर घेऊन राहण्याचा सिरीयसली विचार करू लागली.

शिवाय एकदा एक गुजराथी थाळी - थाळी नावाच्या रेस्टॉरंटामध्ये खाल्ली. ठीकठीक होती. विशेषतः त्याकरता जे १ तास वेटिंगला उभे राहिलो त्यामानानी ती ओकेच वाटली. मद्रास कॅफेचा डोसा, इडली देखिल ठीक ठाक. आची कप्पाकडाई रॉक्स! बे-एरिया रॉक्स!

एक दिवस उठून लॉस आल्टोस पासून साधारण पाऊणएक तासाच्या अंतरावर सांताक्रूज नावाच्या जागी Mystery Spot आहे तिथे गेलो. बघण्यासारखी जागा आहे. एक गंमत म्हणून आणि डोकं खाजवायची सोय होते म्हणून. त्यांच्या टूर्स असतात त्यापैकी आपल्याला हवी ती आदल्या दिवशी बुक करायची. या ठिकाणी एकदम झक्काससा दृष्टीभ्रम केलेला आहे. माणसं तिरकीच उभी रहिलेली काय दिसतात, पाणी खाली न वाहता वरच काय वाह्ते, चेंडू चढ चढत जातो असे मजेशीर प्रकार दाखवले जातात. वर त्यामागे काहीतरी मिस्टरी आहे असंही ठासून सांगतात. आपल्याला हे दृष्टीभ्रम करून गंडवत आहेत हे कळतं पण तरीही मजा येते.

मिस्टरी स्पॉट नंतर आम्ही Santa Cruz Beach Boardwalk ला गेलो. इथे पाण्यात धमाल करून, मग सगळ्या राईडस वगैरे करून, खाऊनपिऊन संध्याकाळ कारणी लावली. विशेषतः बच्चेकंपनी बेहद्द खुश होती. गेले काही दिवस नुसतंच साईटसिइंग करून आम्ही त्यांना खूप पकवलं होतं त्यावर ऐकूणच तो पूर्ण दिवस हा जालिम उतारा ठरला.

एक दिवस बे एरियातील हिरे बघायला बाहेर पडलो.

स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी

गुगल

अ‍ॅपल

लॉस आल्टोसमधले बाकीचे दिवस मग मॉल्सना भेट देणे, सुरेख वस्ती असलेला लॉस आल्टोस हिल्स एरिया बघणे यात घालवले. बहिणी तिच्या दोन मैत्रिणींना भेटून आली. आणि एक दिवस संध्याकाळी आतेबहिणीची फॅमिली आमच्याकडे डिनरला आली तेव्हा मस्त धम्माल पार्टी केली आम्ही. बाहेरून जेवण आणल्यामुळे घरी ऐसपैस बसून खाऊपिऊ, डान्स, मस्ती करता आली. या घरात अजून एक खजिना मला मिळाला ते म्हणजे टीव्हीवर उपलब्ध असलेले गेम ऑफ थ्रोन्सचे भाग. अर्थात सगळे नाही बघून झाले.

सॅनफ्रान्सिस्कोला जाताना फेसबुक बघू असं ठरवलं होतं पण ते राहिलंच. Sad पण आम्हाला जाता नाही आलं म्हणून सॅन फ्रान्सिस्कोला चक्क मार्क झुकेरबर्गच आम्हाला भेटायला आला. पण ते पुढच्या भागात...

(क्रमशः)

पुढचा भाग - कॅलिफोर्निया २०१५ : (८) सॅन फ्रान्सिस्को

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! मस्तच हा पण भाग!

मिस्टरी स्पॉट मस्त करमणूक आहे. गंडवत आहेत आपल्याला हे कळतं पण तरी मजा येते.. कप्पकडाई बघितले पाहीजे. मी नाही गेले, ऐकले पण नव्हते नाव..