रायवळ/गोटी आंब्याचे सासव(सासम).....फोटोसहित

Submitted by मानुषी on 6 July, 2015 - 03:08
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य: ८ रायवळ/गोटी आंबे, अर्धी वाटी गूळ.
वाटणासाठी: ओलं खोबरं अर्धी वाटी, सुक्या लाल मिरच्या २/३, १ चमचा मोहोरी.
फ़ोडणीसाठी : १ चमचा तेल, १ चिमूट मेथ्याची पावडर, पाव चमचा हिंग, १ चिमूट हळद, कढिलिंब, चवीप्रमाणे मीठ.

क्रमवार पाककृती: 

चला मंडळी......आता रायवळ आंबेच काय पण दशहराही आता बाजारातून अदृश्य होईल. निसर्ग नियमच आहे. आता दशहराला हापूसची मजा नाही पण चालसे!
अजूनही बाजारात एखादी मावशी असेलच रस्त्याकडेला रायवळ/गोटी आंब्यांची टोपली घेऊन. बघा आणि सीझन संपायच्या आत हे आंब्याचं सासव करूनच पहा.

कृती: बाजारात रस्त्याकडेला बसणाऱ्या मावशीच्या टोपलीतून छान चांगले रायवळ आंबे निवडून घ्या. रेग्युलर फ़ळवाल्याकडून किंवा दुकानातून घेतल्यास ती गावरान रायवळ चव मिळेलच याची खात्री नाही. असो...घरी आल्यावर भरपूर पाण्यात स्वच्छ धुवून घ्या. नंतर अगदी थोड्या पाण्यात अर्धी वाटी गूळ चांगला विरघळून घ्या. मग आंबे सोलून घ्या. अगदी हलक्या हाताने. ही सालं उलटी करा...म्हणजे गराचा भाग वर येईल. पाण्यात घालून ही सालं आपल्याला स्वच्छ करून त्याच्याही सगळा रस काढायचा आहे. या गावठी आंब्यांच्या सालींचाही भरपूर रस निघतो .
कोयी वेगळ्या ठेवा व सालं एका मोठ्या भांड्यात घ्या. या सालांवर चांगलं अर्धी पाऊण वाटी पाणी घालून सालं स्वच्छ करून घ्या. सालांचाही भरपूर रस निघतो.
आता कोयी जरा जरा दाबून जेवढा रस निघेल तो सालांच्या रसात मिसळा. आणि कोयीही. या कोयी जेवताना चोखून खायला मजा येते. आता कळलं ना फ़ार मोठे किंवा हापूस का नाही घ्यायचा ते? असो.....
आता १ चमचा मोहोरी छोट्या कढईत कोरडीच भाजून घ्या. हे अगदी मंद गॅसवर करा. मोहोरी जळू देऊ नका. याच कढईत थेंबभर तेल टाकून त्यात २/३ सुक्या ब्याडगी मिरच्या भाजून घ्या. हे भाजलेले जिन्नस बाजूला ठेवा.
यानंतर अर्धी वाटी ओलं खोबरं, १ चमचा ही भाजलेली मोहोरी, भाजलेल्या सुक्या मिरच्या सगळं मिक्सरमधे बारीक वाटून घ्या.
हे नीट वाटलं जावं यासाठी टीप: आधी मोहोरी, मिरच्या आणि थोडं मीठ एवढंच जर कोरडच वाटलं तर छान बारीक होतं. मग यात खोबरं घाला आणि लागेल तेवढं अगदी थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्या.

आता हे वाटण कोयी आणि रसाच्या मिश्रणात घाला. डावाने सारखं करा. गुळाचे तयार केलेले पाणी यातच मिसळा. अंदाजाने मीठ घाला. आता फ़ोडणी करा.
तेलात मोहोरी, मेथ्या पूड, हिंग, हळद, कढिलिंब हे सगळं घालून ही फ़ोडणी या मिश्रणावर ओता.

.............. आंबे नुसते खायचे सोडून हे.....आंब्यावर फ़ोडणी वगैरे कशाला? असले अरसिक प्रश्न विचारून कृपया रसभंग करू नये. Proud करून पहा मगच प्रश्न विचारा.

हे गार सर्व्ह करायचं की गरम??? हे न उकळता नुसतं मिश्रण करून फ़ोडणी घालून तसंच तोंडीलावणं म्हणून घेऊ शकता.
उन्हाळ्यात हे थंडच छान वाटते. अगदी पोळी/भाताबरोबर.
हे कशाबरोबर खायचं??? या अनादि अनंत आणि अनाकलनीय प्रश्नाचं उत्तर वर दिलेलं आहे.

पण पावसाळ्यात मात्र व्यवस्थित उकळून गरम गरमच भात किंवा पोळीबरोबर छान लागेल. हे रायवळ आंबे अजूनही कुठे कुठे दिसतात. त्यामुळे पावसाळी हवेत हे आंब्यांचं सगळं मिश्रण मस्तपैकी चरचरीत फ़ोडणी घालून छानपैकी उकळा. व गरम गरमच सर्व करा.
यालाच कोयांडे असंही म्हणतात.
फोटो:
रायवळ/गोटी आंबे

वाटणाचे जिन्नसः मोहोरी, ओलं खोबरं आणि ब्याडगी सुक्या मिरच्या

कोयी आणि सालं ...शेजारी वाटण. ब्याडगी मिरच्या घेतल्यास वाटण छान गुलाबीसर होते.

पांढर्‍या भांड्यात थोड्याश्या दाबून थोडा रस काढलेया कोयी...रसासह. शेजारच्या भांड्यात सालांचा रस.

फोडणीचं सामान : मोहोरी, मेथी पावडर, हिंग जिरं आणि कढिलिंब.
चिरलेला गूळ

सर्व मिश्रणावर ओतलेली फोडणी


व्यवस्थित ढवळून तयार सासव.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी २ कोयी असं प्रमाण धरावं.
माहितीचा स्रोत: 
माझी वहिनी.......आणि एकदा मंगला खाडीलकरांनी हे टीव्हीवर दाखवलं होतं पण त्यांनी हापूस आंबा वापरला होता. पण मी रायवळचाच आग्रह धरते.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages