रायवळ/गोटी आंब्याचे सासव(सासम).....फोटोसहित

Submitted by मानुषी on 6 July, 2015 - 03:08
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य: ८ रायवळ/गोटी आंबे, अर्धी वाटी गूळ.
वाटणासाठी: ओलं खोबरं अर्धी वाटी, सुक्या लाल मिरच्या २/३, १ चमचा मोहोरी.
फ़ोडणीसाठी : १ चमचा तेल, १ चिमूट मेथ्याची पावडर, पाव चमचा हिंग, १ चिमूट हळद, कढिलिंब, चवीप्रमाणे मीठ.

क्रमवार पाककृती: 

चला मंडळी......आता रायवळ आंबेच काय पण दशहराही आता बाजारातून अदृश्य होईल. निसर्ग नियमच आहे. आता दशहराला हापूसची मजा नाही पण चालसे!
अजूनही बाजारात एखादी मावशी असेलच रस्त्याकडेला रायवळ/गोटी आंब्यांची टोपली घेऊन. बघा आणि सीझन संपायच्या आत हे आंब्याचं सासव करूनच पहा.

कृती: बाजारात रस्त्याकडेला बसणाऱ्या मावशीच्या टोपलीतून छान चांगले रायवळ आंबे निवडून घ्या. रेग्युलर फ़ळवाल्याकडून किंवा दुकानातून घेतल्यास ती गावरान रायवळ चव मिळेलच याची खात्री नाही. असो...घरी आल्यावर भरपूर पाण्यात स्वच्छ धुवून घ्या. नंतर अगदी थोड्या पाण्यात अर्धी वाटी गूळ चांगला विरघळून घ्या. मग आंबे सोलून घ्या. अगदी हलक्या हाताने. ही सालं उलटी करा...म्हणजे गराचा भाग वर येईल. पाण्यात घालून ही सालं आपल्याला स्वच्छ करून त्याच्याही सगळा रस काढायचा आहे. या गावठी आंब्यांच्या सालींचाही भरपूर रस निघतो .
कोयी वेगळ्या ठेवा व सालं एका मोठ्या भांड्यात घ्या. या सालांवर चांगलं अर्धी पाऊण वाटी पाणी घालून सालं स्वच्छ करून घ्या. सालांचाही भरपूर रस निघतो.
आता कोयी जरा जरा दाबून जेवढा रस निघेल तो सालांच्या रसात मिसळा. आणि कोयीही. या कोयी जेवताना चोखून खायला मजा येते. आता कळलं ना फ़ार मोठे किंवा हापूस का नाही घ्यायचा ते? असो.....
आता १ चमचा मोहोरी छोट्या कढईत कोरडीच भाजून घ्या. हे अगदी मंद गॅसवर करा. मोहोरी जळू देऊ नका. याच कढईत थेंबभर तेल टाकून त्यात २/३ सुक्या ब्याडगी मिरच्या भाजून घ्या. हे भाजलेले जिन्नस बाजूला ठेवा.
यानंतर अर्धी वाटी ओलं खोबरं, १ चमचा ही भाजलेली मोहोरी, भाजलेल्या सुक्या मिरच्या सगळं मिक्सरमधे बारीक वाटून घ्या.
हे नीट वाटलं जावं यासाठी टीप: आधी मोहोरी, मिरच्या आणि थोडं मीठ एवढंच जर कोरडच वाटलं तर छान बारीक होतं. मग यात खोबरं घाला आणि लागेल तेवढं अगदी थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्या.

आता हे वाटण कोयी आणि रसाच्या मिश्रणात घाला. डावाने सारखं करा. गुळाचे तयार केलेले पाणी यातच मिसळा. अंदाजाने मीठ घाला. आता फ़ोडणी करा.
तेलात मोहोरी, मेथ्या पूड, हिंग, हळद, कढिलिंब हे सगळं घालून ही फ़ोडणी या मिश्रणावर ओता.

.............. आंबे नुसते खायचे सोडून हे.....आंब्यावर फ़ोडणी वगैरे कशाला? असले अरसिक प्रश्न विचारून कृपया रसभंग करू नये. Proud करून पहा मगच प्रश्न विचारा.

हे गार सर्व्ह करायचं की गरम??? हे न उकळता नुसतं मिश्रण करून फ़ोडणी घालून तसंच तोंडीलावणं म्हणून घेऊ शकता.
उन्हाळ्यात हे थंडच छान वाटते. अगदी पोळी/भाताबरोबर.
हे कशाबरोबर खायचं??? या अनादि अनंत आणि अनाकलनीय प्रश्नाचं उत्तर वर दिलेलं आहे.

पण पावसाळ्यात मात्र व्यवस्थित उकळून गरम गरमच भात किंवा पोळीबरोबर छान लागेल. हे रायवळ आंबे अजूनही कुठे कुठे दिसतात. त्यामुळे पावसाळी हवेत हे आंब्यांचं सगळं मिश्रण मस्तपैकी चरचरीत फ़ोडणी घालून छानपैकी उकळा. व गरम गरमच सर्व करा.
यालाच कोयांडे असंही म्हणतात.
फोटो:
रायवळ/गोटी आंबे

वाटणाचे जिन्नसः मोहोरी, ओलं खोबरं आणि ब्याडगी सुक्या मिरच्या

कोयी आणि सालं ...शेजारी वाटण. ब्याडगी मिरच्या घेतल्यास वाटण छान गुलाबीसर होते.

पांढर्‍या भांड्यात थोड्याश्या दाबून थोडा रस काढलेया कोयी...रसासह. शेजारच्या भांड्यात सालांचा रस.

फोडणीचं सामान : मोहोरी, मेथी पावडर, हिंग जिरं आणि कढिलिंब.
चिरलेला गूळ

सर्व मिश्रणावर ओतलेली फोडणी


व्यवस्थित ढवळून तयार सासव.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी २ कोयी असं प्रमाण धरावं.
माहितीचा स्रोत: 
माझी वहिनी.......आणि एकदा मंगला खाडीलकरांनी हे टीव्हीवर दाखवलं होतं पण त्यांनी हापूस आंबा वापरला होता. पण मी रायवळचाच आग्रह धरते.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वांना धान्यवाद
बरय अश्या फोडण्या-बिडण्या घालून हापूस आंबे वाया नाही घालवले ते.. फिदीफिदी

>>.....पराग ...........असले अरसिक प्रश्न विचारून कृपया रसभंग करू नये. फिदीफिदी करून पहा मगच प्रश्न विचारा.>>>>>>>>>..हे वाचलंच असशील>>>>>>:फिदी: Light 1
सर्वांना धन्यवाद

मी केलेलं ह्या वर्षीच, आंबे नारळ दोन्ही घरचं ह्या वर्षी. अप्रतिम लागत. खर तर मसाला काही नाहीये ह्यात पण तरी ही भन्नाट चव येते. मी नेहमी उकळूनच करते पण.

20210523_102457.jpg

फोटो तर भन्नाट टाकलाय मनिमोहर..!! पण हे उकळल्यावर काही फुटत वगैरे तर नाही ना..?? गरम आंबा कसा खायचा.. Uhoh

हा कुठल्या प्रांतातला प्रकार आहे..? मी या आधी कधीही असं काही ऐकलं नव्हतं की बघितलंही नव्हतं....

पण एकदा करून बघेन... अर्थात असे छोटे छोटे रायवळ आंबे मिळाले तर.

हे उकळल्यावर काही फुटत वगैरे तर नाही ना..>>>>> खळखळून उकळी आणायची नाही.

कोकणातला प्रकार आहे.मलाही हे अजिबात आवडायचे नाही.मी कधीही खात नव्हते.पण ५-६ वर्षांपूर्वी एकीने विचारले की तुमच्यात सासव करतात ना? मला करून देशील का? तेव्हापासून खायला सुरुवात केली.आता आवडायला लागले.
तसा अजून एक प्रकार आहे अनसाफणसाची भाजी! ही मात्र अननस आणि फणस याची शुद्ध वाट आहे.

नको. २ छान फळांची वाट!
कालच काप्या फणसाचे गरे खाल्ले आहेत.त्याला जागले पाहिजे.

Dj, थॅंक्यु ... अजिबात फुटत नाही. त्या रश्श्यात मुरलेले आंबे जबरदस्त लागतात.
मेथी, मोहरी आणि लाल मिरची नारळाचा स्वाद अप्रतिम लागतो. नुसत्या आठवणीने ही तोंडाला पाणी सुटलं बघा.

मनीमोहर, आता तुम्ही एवढं तोंंडाला पाणी सुटून सांगताय तर मी खरेच करून बघेन. माझी खरेतर आंब्याला अशी फोडणी देण्याची अन उकळत ठेवण्याची मानसिक तयारी होत नव्हती.. पण तुमच्या प्रतिसादाने धाडस आलंय. Bw

मनीमोहर मस्त फोटो. मी पण यावर्षी 3 दा केले होते पण फोटो नाही काढला.
मी पण उकळी काढून च केले होते. शिजवल्या मुळे सगळे लवकर एकजीव होते आणी नंतर मस्त लागते.

पण आंबे थोडे आंबट असतील तर मज्जा येत असेल ना..? कारण रायवळ गोटी आंबे आधीच भयंकर गोड असतात त्यात अजुन गूळ टाकला म्हणजे पाकाला फोडणी दिल्या सारखं नाही का होणार..?? मला असं वाटतं की थोडे कमी पिकलेले आंबे बरे पडत असतील.. की पिकलेले आंबेच घेऊ..??

दशेरीचे करून बघेन,..... दशहरीचे नका करू.त्या आंब्याला त्याचा एक वेगळा वास असतो.त्यापेक्षा लालबागचे करून पहा.ते साधारण झाडी /रायवळ आंब्यासरखे असतात.

>>मेथी, मोहरी आणि लाल मिरची नारळाचा स्वाद अप्रतिम लागतो

प्रचंड अनुमोदन. मी ह्या विकांताला पुन्हा आंबे आणून करणार आहे Happy

आंबे गोड असतिल तर अजुन गुळ घालुन पाकाला फोडणी दिल्यासारखे अजिबात वाटत नाही. आंबे गोड असेल तर कमी गुळ घालायचा. भाजलेलया मोहरी मुळे वेगळी छान चव येते.

आंबे पिक्के तरी ही कडक घ्यायचे. म्हणजे ते रश्श्यात उकळले की छान मऊ होतात. अगदी मऊ नाही घ्यायचे.
तसेच हे गरम गरम पेक्षा एक दोन तास करून ठेवून मग परत गरम करून खाल्ले की जास्त छान लागत मुरलेलं खायला.

रायवळ, बिटकीचे आंबे, आंब्याची गोटे हे प्रकार फार गोडमिट्ट नसतात. उलट जरा (जास्त) आंबटसरच असतात. आणि हेच चांगले लागतात सासवामध्ये. कलमी आंबे ह्यात घालून वाया घालवू नयेत.
मोहरीला संस्कृतमध्ये ' सार्षप ' म्हणतात. त्यावरून मोहरीदार पदार्थ म्हणजे सासव म्हणतात. सरसों हा शब्दादेखील ह्या सार्षपा वरूनच आला आहे.

रेसिपी मस्तच. फोटोही छान.

हेमाताई मस्त फोटो.

कोकणातला प्रकार आहे >>> हो का. मी समजतेय गोवा, कारवारकडचा प्रकार. कोकणात माहेर, सासर असून कोणी केलं नाही हे, हाहाहा. त्यात माहेरी तर रायवळ आंब्याचे विविध प्रकार होते, तरीही नाही माहिती.

हिरा नेहेमीप्रमाणे छान माहिती.

वेगळी पाकृ. करून बघावेशी वाटतेय. पण खरेतर डीजेंनी म्हटल्याप्रमाणे आंब्याला अशी फोडणी देण्याची अन् उकळत ठेवण्याची मानसिक तयारी नव्हती. Happy

काल मीही केले होते.यावेळी उरलेल्या हापूस(कोवळे असल्याने आंबट होते) आंब्याचे सासव केले.प्रचंड भन्नाट झाले होते.खोबरे आणि भाजलेली मोहरी फक्त घातली.यावेळी फक्त तिखट घालण्याऐवजी लाल सुक्या मिरच्या वाटून घातल्या.त्यामुळे रंग छान आला होता.
फोटो काढायचा राहून गेला.

भाजीपेक्षा चटणीसारखे लागते
पाव , चपाटीला स्प्रेड म्हणून वापरता येईल

संध्याकाळी भडंगमध्ये चमचाभर घातले, मस्त लागते

ब्लॅककॅट तुम्ही तर फ्युजन च घडवलंत... एकदम तोंपासू दिसतंय हे प्रकरण.

आमच्या घरापुढच्या हापुस आंब्याला या वर्षी इतका लेट की थेट फेब्रुवारी मधे मोहोर आला अन मार्च मधे बाळ कैर्‍या लागल्या.. त्यामुळॅ आता जून महिना सुरु झाला तरी आंब्याला पाड लागला नाही. वातावरण देखिल गेले आठवडाभर पावसाळीच आहे. अशा थंडगार वातावरणात या वर्षी आंब्यांना पाड लागेल की नाही शंकाच आहे. Uhoh

आंब्याला पाड लागला की सासव करून बघणार... घरच्या आंब्यांचा हा नवीन प्रकार करण्यासाठी आईकडून परवानगी मिळाली आहे. Bw

पाडाला पिकलाय आंबा हे गाणे दिवसभर त्या झाडाखाली वाजवा, मग त्या झाडांना चेव येऊन ते पिकतील एकदाचे. Proud

भन्नाट प्रकार आहे. गोड आंबा तिखट करुन कसा खायचा या विचाराने मागे पडले होते हे प्रकरण. आता करुन बघता येईल.

मानुषी ताई धन्यवाद. ममो, मानुषी आणी ब्लॅक कॅट यांनी टाकलेले फोटो मस्त आलेत.

पाडाला पिकलाय आंबा हे गाणे दिवसभर त्या झाडाखाली वाजवा, मग त्या झाडांना चेव येऊन ते पिकतील एकदाचे.>> वैनी Biggrin

Pages