मला कोकण बघायचेचं!!!!

Submitted by हर्ट on 29 June, 2015 - 03:55

मी कोकणात कधीही गेलो नाही. इथे असे अनेक जण असतील ज्यांना कोकणाबद्दल काहीही माहिती नसेल. विदर्भातील लोकांना तर कोकण हे फक्त नावापुरतेच माहिती असते.

तर जनहो, ह्या धाग्याचा उद्देश इतका आहे की ज्यांनी कोकण पाहिले आहे, अनुभवले आहे त्यांनी कोकण फिरावसं वाटणार्‍या माबोकरांना मदत करायची.

मी पुण्याहून कोकणात जाणार आहे. होम-स्टे घ्यायचा आहे. सोबत आई आणि पुतणी आहे. आठ दिवस वेळ आहे.

कोकणात कुठली गावे आहेत? किती जिल्हे आहेत? किती सागरतीर आहेत? कुठकुठले समुद्र आहेत? कुठल्या क्रमाने जायचे, कुठल्या क्रमाने परत यायचे? ही सगळी सगळी माहिती हवी आहे.

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका ट्रिपेला एक जिल्हा करावा.
रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात शाकाहारी जेवणाच्या जितक्या सोयी आहेत तेवढ्या सिंधुदुर्गात नाहीत म्हणजे मिळतं पण जेवूनी तृप्त व्हावे वगैरे घडण्याची शक्यता ऑलमोस्ट नाहीच.
आंबोलीतून सावंतवाडी नावाच्या शहरात उतरतात. सिंधुदुर्ग नावाच्या शहरात नाही. याच वाडीमधे मोती तलाव आहे. मोती तलाव आणि राजवाडा हे बघावेच.
वाडीत साधले मेसमधे उत्तम शाकाहारी जेवण मिळते. गेल्या सहा सात वर्षांच्यात अनेकदा जेवलेय तिथे. सुरूवातीला अप्रतिम असलेली चव आता उगाच मसाले-वाटणाचे प्रमाण वाढवून बिघडण्याच्या मागे आहे.

वेंगुर्ला बीच मस्त आहे. एकेकाळचे बंदर असल्याने गावाची रचना, बाजारपेठ हे इंटरेस्टिंग आहे.
वेंगुर्ले तालुक्यातच निवतीचा किल्ला आणि भोगवे बीच आहेत. विविध सिनेमांचे शूटींग तिथे झाले होते म्हणून ती प्रेक्षणीय जागा आहे असे तिथले अनेक जण सांगतात. Wink पण ती आपली आपणच प्रेक्षणीय जागा आहे. भोगवे बीचवर सामंतांचे बेड न ब्रेक्फास्ट आहे. त्यांच्याइथले जेवण उत्तम असते आणि बीचवर राहणे सुंदर आहे. खोल्या बेसिक साध्या आणि स्वच्छ आहेत.

देवगड आणि कणकवली तालुक्यांबद्दल मी फार सांगू शकणार नाही.

कुडाळ, सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात अनेक अनवट जागा आहेत. जिथे एक दिवसाची पिकनिक होऊ शकते. वाटेत जेवायची सोय वगैरे होईलच याची सगळीकडे खात्री नाही पण वाडीमधे पहाटे चंदू भुवन मधे उसळ-पाव, पुरीभाजी असे पॅक करून मिळू शकते. आदल्या दिवशी बोलून ठेवायचे. या जागांना जायचे तर मात्र गाडी करणे मस्ट. वाडीतला इरफान शेख नावाचा ड्रायव्हर गाडीसकट मिळाला आणि तुमची मैत्री झाली त्याच्याशी तर तो तुम्हाला अश्या अनेक अनवट जागा दाखवू शकेल (ज्या त्याला आम्हीच दाखवल्या असतील.. Wink )

पुळे सारख्याच ठिकाणी घरी वगैरे राहायची सोय आहे का.. इतर ठिकाणी नाही का ? << हरीहरेश्वर, श्रीवर्धन, दिवेआगार, दापोली आणि गुहागर इथे अशी सोय नक्की आहे.

गुहागरमधे एक भारी जागा आहे रहायची. डोंगरावर आहे. १० मिनिटे चढून जायला लागते पण वरती गेलं की गुहागरच्या बीचचं जे काय दृश्य दिसतं ते अहाहा आहे.

आबलोलीचे गारवा अ‍ॅग्रोटूरिझम आणि मुंढरचे माझ्या मामाचा गाव हे अ‍ॅग्रोटूरिझम सेंटर दोन्ही मस्त आहे.
मामागा वाल्यांचा बोर्‍या बंदराजवळ बंगला आहे. एकदम २० जणांचा ग्रुप असेल तर तिथे सोय होते. तिथून बोर्‍याचा व्ह्यू अप्रतिम..

नीधप , मस्त माहिती..
आत्मधुन आमच्यापैकी आई पप्पा आणि मीच फक्त पुळे बघीतलय.. त्यातही रत्नागिरीमधले ठिकाण केवळ मीच.. आई पप्पा वेगळे गेले होते आणि मी मित्रांसोबत माझ्या.. उरलेल्या साडे चार लोकांनी नाहीच म्हणुन ९५% तरी तिथ जाण्याची शक्यता आहेच आहे.. Happy

गणपतीपुळे च्या जवळ आरे वारे समुद्र किनारा आहे, फार सुंदर जागा आहे. भेळ मस्त होतं.

परत गणपतीपुळे च्या जवळच बाल कवि ठोंबरे (not to sure about the name) ह्यांचे स्मारक आहे ते ही पहा

ह्या स्मारक जवळच अजुन एक जागा आहे ज्यात ग्रामिण जीवन चे देखावे तयार केले आहे, ते ही पहा

एम टी डी सी चा रिसॉर्ट मस्तच . गणपतीपुळे ला उतरल्यावर तिथे जिप वाले फिरतच असतात, ते घेऊन जातात, रेट फिक्स करुन घ्यायचे

लोकमान्य टिळकांचे घर दाखवतात, आत मध्ये लोकमान्यांनी वापरलेले वस्तु ठेवल्या आहेत. मला तर एकदम भारावल्या सारखेच झाले त्या वास्तु मध्ये प्रवेश केल्यावर.

पावस मध्ये एक आश्रम आहे, फार निवांत जागा आहे.

प्र. के घाणेकरांचे 'कोकणातील पर्यटन' हे पुस्तक छान आहे. त्यात रहाण्याची ठिकाणे (होम स्टे आणि हॉटेल, दोन्ही), त्यांचे फोन नंबर दिलेले आहेत. माझ्याकडची आवृत्ती जुनी असल्याने त्यातले बरेचसे फोन लागत नाहीत, पण नवी सुधारित आवृत्ती असेल तर नक्की पहा. त्यात प्रत्येक तालुक्यातली वैशिष्ट्यपूर्ण स्थळे, त्यांचा इतिहास, नकाशे असं सगळं छान दिलेलं आहे.

परत गणपतीपुळे च्या जवळच बाल कवि ठोंबरे (not to sure about the name) ह्यांचे स्मारक आहे ते ही पहा>> गणपती पुळ्याजवळ मालगुंडला कवी केशवसूतांचे स्मारक आहे.

थिबा राजाची आणि राणीची कबर मालवणला मेढ्यातून राजकोटात जायच्या रस्त्यावर होती. माझ्या लहानपणीदेखील ती दुर्लक्षितच होती. आता आहे का ते पण माहीत नाही.

कोकणात जाताना ताम्हिणीच्या घाटातून गेलात तर येताना गगनबावडा / फोंडा असेही पर्याय आहेत. कोकण आणि देश यांच्या सीमेवरची राधानगरी, गगनबावडा ही गावे पण खास आहेत.
कोल्हापूर रत्नागिरी रोडवर थोडे बाजूला गेलात तर पावनखिंड पण बघता येईल.

अणुस्कुरा घाट पण आता रहदारीसाठी खुला झाला आहे ना ? माझ्या लहानपणी तो नव्हता. त्यामूळे कधी बघितलाच नाही.

छोट्या छोट्या गावातही आता पर्यटकांचे स्वागत होते. काही जागांचे माहितीफलक आता रस्त्यावरही आहेत. वैभववाडी स्टेशनजवळ नापणे गावात एक छान धबधबा आहे. ( तो मी बघितलाय ) कणकवली गावाजवळही एक फलक बघितल्यासारखा वाटतोय. आमच्या राजापूरात वर्षभर कडकडीत गरम पाणी देणारे " उन्हाळे" आहेत. तिथे अंघोळीची सोय आहे. अर्जूना नदीला पूर आला असेल तर मात्र ते पाण्याखाली जाते.

बापरे! किती छान माहिती. तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.

बादवे, ह्या जिल्याचे नाव सिंधदुर्ग असे आहे की सिधुदुर्ग असे आहे. मी आजवर सिंधदुर्गे असेच म्हणत आणि वाचत आलेलो आहे.

जर माहिती लिहिता लिहिता कुणाला एके ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पोचायला किती तास लागतील हे सांगता आले तर उत्तम.

होम-स्टे चा ऑप्शन खूप जणांनी वर सांगितलाय. अश्या ठिकाणी राहायचे असल्यास त्यांची माहिती इंटरनेटवर आहे का? का ओळख/माहिती/रेफरंसनेच अशी ठिकाणं मिळू शकतात? ऐन वेळेला जाऊन शोधणे अवघड जात असेल/उपलब्ध नसेल त्यापेक्षा आधी बूक केलेले कधीही चांगले म्हणून विचारले.

थिबा राजाची आणि राणीची कबर मालवणला मेढ्यातून राजकोटात जायच्या रस्त्यावर होती. माझ्या लहानपणीदेखील ती दुर्लक्षितच होती. आता आहे का ते पण माहीत नाही.<<< नाही. ती कबर रत्नागिरीमध्ये आहे. आम्ही परवाच पाहून आलो.

सिंधुदुर्गातले पतित पावन मंदीरही चुकवु नये.<<< आं??सावरकरांनी बांधलेले?? रत्नागिरीमध्ये एक पतित पावन मंदिर आहे.

राजापूरः आडिवरे- महाकालि मंदिर आणि कशेळीचा कनकादित्य- सूर्यमंदिर.

बी, सिंधुदुर्ग. सिंधु= समुद्र. दुर्ग = किल्ल्ला. समुद्रांत बांधलेला किल्ला म्हणजे सिंधुदुर्ग.

बी, तुम्हाला एक वेगळच ठिकाण बघायचं असेल तर, मी यादी देवू शकते. गर्दी पासून लांब आहेत.

१)अंजनवेल(गुहागर तालुका) हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. आमचं गाव आहे. Happy

बीचेस शांत आहेत. संध्याकाळी शांत समुद्रावर बसणे हा आमचा उद्योग असायचा\आहे.

२)बांदा सुद्धा (सांवतवाडी जवळ) सुंदर आहे.
३) केळशी(दापोली) सुद्धा असेच सुंदर ठिकाण आहे.

मग रोजची ठिकाणं आहेतच. रत्नागिरी,पुळं, पावस, गुळं , थिबा पॅलेस वगैरे वगैरे

किती सागरतीर आहेत? कुठकुठले समुद्र आहेत?>> अहो प्रत्येक गावी वेगळा समुद्र अन वेगळा सागरतीर. आता तुम्ही ८ दिवसात जितके जमतील तितके बघुन या अन आम्हालाही सांगा किती समुद्र आहेत ते.

कुठकुठले समुद्र आहेत?>> आमच्या रत्नागिरीत दोन फेमस समुद्र आहेत, काळा समुद्र आणि पांढरा समुद्र. भगवतीच्या किल्ल्यावर उभं राहून दुशीकडं दोन्ही एकदम दिसतात. भारी वाटतं !

>>किती सागरतीर आहेत? कुठकुठले समुद्र आहेत?<<

हे मिसले होते वाक्य मी. आता बोध लागला त्या ह्या बीबीचा.

'कुठकुठले समुद्र आहेत' चा मी आधी लावलेला अर्थ, कोणकोणते समुद्रकिनारे? असा असेल.
पण त्या आधीची ओळ आहे,किती सागरतीर? म्हणजे परत सागरतीर = समुद्रकिनारे.
बहुत हि गोंधळ उडनेका रे बाबा..... बी, ऐसा काय्को लिखेला है? दिमाग का दही बननेका ऐसे करनेका नै रे.

ह. घ्या.

बी,
कोकण जरूर बघा. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे तिन्ही जिल्हे अपार निसर्गसंपदा लाभलेले आहेत. पर्यटकांची गर्दी, क्वचित ठिकाणी शाकाहाराच्या गैरसोयी इत्यादी सोसूनही केवळ निसर्गासाठी सहल करावी इतकी चांगली ठिकाणे आहेत.

फक्त तुमच्या सोबत आता घरचे असणार आहेत म्हणता म्हणून पावसाळ्यात त्रास होईल असे वाटते. सतत पाऊस असेल तर फारसे कुठे फिरू शकणार नाही आणि प्रवासही अवघड होईल. गणपतिपुळे तीर्थस्थान असल्याने तिथे बारा महिने वर्दळ असते पण सिंधुदुर्गातील (मालवण परिसरातील) हॉटेल्स इ. पाऊस आणि समुद्री उधाणामुळे शक्यतो बंद असतात. रायगड जिल्हा अथवा दापोली गुहागर भागातही बहुधा असेच असावे.

बी तु जेव्हा प्रश्न विचारतोस त्या नंतर त्या ठिकाणी जातोस का रे? उदा. मधे तु अष्टविनायकाची चौकशी केली होतीस. त्याची माहीती मिळाल्यावर पुढे काय झाले हे पण लिहीत जा. म्हणजे नक्की काय करावे काय करु नये हे पण कळते. नुसतीच चौकशी करु नये असे वाटते. धन्यवाद. Happy

बी पावसाळ्यात जंजिरा किल्ल्यात जाणार्‍या बोटी सुरु असतील का याबद्दल मी साशंक आहे.
दिवेआगर, श्रीवर्धन हरीहरेश्वर हा परिसर सुद्दा निसर्गरम्य आहे आणि तुमच्या आईंनाही देवदर्शन केल्याचा आनंद मिळेल.

कोकणी पद्धतीचे पदार्थ विशेषतः खोबरे घातलेल्या भाज्या वगैरे वैदर्भिय लोकांना फारसे आवडत नाहीत, असा अनुभव आला आहे.

बी तु जेव्हा प्रश्न विचारतोस त्या नंतर त्या ठिकाणी जातोस का रे? >>>

केपी, हो माझी आई, माझी बहिणी, तिची मुलगी, भावाची मुलगी जाऊन आलेत अष्टविनायकाला आणि इथल्या माहितीचाच उपयोग केला आम्ही.

Pages