हसत-खेळत स्पोकन इंग्लिश वर्गासाठी (२०१५-१६) स्वयंसेवक शिक्षक हवेत!

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 15 June, 2015 - 02:40

नमस्कार मंडळी,

जून महिन्याच्या आगमनाबरोबरच नव्या शालेय वर्षाचे वेध समस्त विद्यार्थ्यांना, पालकांना व शिक्षकांना लागलेले असतात.
गेली दोन-तीन वर्षे आपल्यातील काही मायबोलीकर समाजाचे काही देणे फेडायचा अल्पसा प्रयत्न करत आहेत. मायबोलीच्या माध्यमातून एकत्र येऊन एका देवदासीं व गरीबवर्गातील मुलांच्या गरजू शाळेत मुलांना 'हसत-खेळत' स्पोकन इंग्लिश शिकवत आहेत.

सालाबादप्रमाणे यावर्षीही शाळेने मुलांसाठीचे हे तास चालू ठेवण्याची विनंती केली आहे. आपण जुलैपासून वर्ग सुरू करणार आहोत. शोध आहे तो उत्साही स्वयंसेवक शिक्षकांचा! यासाठी तुम्हाला वर्गात शिकवायचा पूर्वानुभव असायलाच पाहिजे असे नाही, किंवा इंग्रजी विषयावर तगडे प्रभुत्व असण्याची गरज नाही. तुमची तळमळ, उत्साह, मुलांमध्ये इंग्रजी भाषेबद्दल गोडी निर्माण करायची इच्छा आणि सातत्य हेच पुरेसे आहे.

बुधवार पेठेतल्या एका जुनाट इमारतीत ही शाळा भरत असली तरी तिच्या रूपावर जाऊ नका! इथे दुर्दम्य आशेने या मुलांवर काम करणारी, त्यांना जिव्हाळा लावणारी मंडळी जशी आहेत तशीच सोनेरी स्वप्नांच्या भराऱ्या घेत उत्तुंग मनीषा बाळगणारी मुलेही आहेत. या मुलांच्या जगात येऊन बघा. त्यांच्याशी संवाद साधून बघा. एका वेगळ्या जगाचे दर्शन घडेल.

तुम्हांला जर या उपक्रमात सामील होऊन या मुलांना शिकवायचे असेल तर खालील माहिती तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.

शाळेचे नाव - नूतन समर्थ विद्यालय, बुधवार पेठ, चेतना लॉजजवळ, सोन्या मारूती चौकाजवळ, पुणे २.
मुलांचा वयोगट - इयत्ता पहिली ते सातवी (मराठी माध्यम)
स्पोकन इंग्लिश तासांची वेळ - दर शनिवारी दुपारी ११:३० ते १:०० चे दरम्यान.

ज्यांना शिकवायची इच्छा व वेळ आहे त्यांनी कृपया मला किंवा मायबोलीकर साजिरा ह्यास विपूत किंवा संपर्कात आपले खरे नाव, माबो आयडी, मोबाईल क्रमांक, ईमेल, व्यवसाय वगैरे तपशील कळवावेत. लवकरच सर्व इच्छुक स्वयंसेवक शिक्षकांची मीटिंग घेऊन शाळेची व विद्यार्थ्यांची माहिती देणे, शाळेला भेट, शिकवण्याच्या मटेरियलसंबंधी माहिती व देवघेव इत्यादी चर्चा-गोष्टी करायच्या आहेत. सध्या व्हॉट्सपवरही एक ग्रूप केला असून तिथे सर्व शिक्षक नित्य संपर्कात असतात.

काही शंका, प्रश्न वगैरे असल्यास इथेच विचारा. यथाशक्ती त्यांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू.

शाळेविषयी व या उपक्रमाविषयी अधिक माहिती -

http://www.maayboli.com/node/48317

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शनिवारी सुट्टी नसल्याने याही वर्षी नाही जमणार म्हणून प्रतिसाद दिला नव्हता...
पण म्हटले धागा तरी वर काढू Happy

अकु, वर नुसत्या २०१५ ऐवजी २०१५-१६ असे का करेनास

उपक्रमाला शुभेच्छा.

शनिवारी ऑफीस असल्याने जमणार नाही पण ह्या उपक्रमासाठी पुस्तके दिली तर चालतील का? क्रमिक पुस्तके नाहीत इतर अवांतर. वयोगट साधारण काय असेल?

अकु, आधी सांगितल्या प्रमाणे पुस्तकं तयार आहेत. कधी देऊ सांग Happy

वेळ नाही देता आला तरी शैक्षणिक साहीत्याची मदत, आयडीयाज ह्यात सहभागी होयला आवडेल.

पीजी, संपर्क केला आहे. प्लीज समस व ईमेल चेक करा.

हर्पेन, हो करते बदल. थँक्स. Happy

प्राजक्ता व चेरी, काँटॅक्ट करते.

मी नताशा, हो चालतील की! मुलं मराठी माध्यमातून शिकतात. इयत्ता पहिली ते सातवी, म्हणजे सहा ते तेरा - चौदा हा वयोगट समजायला हरकत नाही.