अंगणात माझिया ( आमचं खळं )

Submitted by मनीमोहोर on 6 June, 2015 - 13:20

मंजिरी, अगं निखिल किरकिरतोय का ग, जरा खळ्यात घेऊन बस त्याला म्हणजे शांत होईल ......
आता माजघरात आम्ही जेवायची पानं मांडतोय तेंव्हा सगळ्या मुलांनी खळ्यात जाऊन बसा ....
पोळ्या करताना गॅस जवळ उभं राहुन चिवचिवलयं अगदी, मी आता दहा मिनीटं खळ्यात जाऊन स्वस्थ बसतेय. ....
खळ्यात महादेश्वराच्या जीर्णोद्धारासाठी पंचायतीचे सभासद आलेत त्यांच्या साठी अमृत कोकम पाठवा.....

असं आमचं खळं ( कोकणात अंगणाला खळं हा शब्द प्रचलित आहे. ) घराचाच एक भाग असलेलं, घरापेक्षा ही अधिक वापरात असलेलं , सगळ्यांचचं लाडकं .... आमचं खळं

कोकणातली घरं देशावरच्या घरांसारखी बंदिस्त नसतात. परकीय आक्रमणाचा धोका नसल्याने तशी आवश्यकता नसेल वाटत. कोकणी माणसांची घरं ही त्याच्या सारखीच मो़कळी ढाकळी. दिंडी दरवाजा, चौसोपी वाडे वैगेरे कोकणात फारसे आढळत नाहीत. घराला फाटक ही नसतं बहुतेक ठिकाणी. गुरं वगैरे आत शिरु नयेत म्हणून एक घालता काढता येणारी काठी ( आखाडा ) अडकवून ठेवलेली असते साधारण दोन फुटावर फाटक म्हणून.

आमचं कोकणातलं घर डोंगर उतारावर आहे. ही जमीन माझ्या आजे सासर्‍यांना १८८२ साली इनाम म्हणुन मिळाली आहे. ( आमच्या कुलवृत्तांतात तसा उल्लेख आहे ) उतारावरची जमीन असल्याने घर बाधंण्यासाठी लेवलिंग करण गरजेच होतं. माझ्या आजे सासर्‍यांनी स्वतःच्या हाताने डोंगर फोडून घर बांधण्यापुरती सपाटी केली. आम्ही आत्ता रहातोय ते घर ही त्यांनीच बांधलेले आहे आणि अजूनही मूळ ढाचा तोच आहे. पूर्वी भिंती मातीच्या होत्या आता सिमेंटच्या.... असे किरकोळ बदलच फक्त केले गेले आहेत. वाढत्या कुटूंबासाठी म्हणून त्यानी खूप मोठं खळं राखलं आहे.

हा त्याचा फोटो.

From mayboli

पावसाळ्याचे चार महिने खळ्याचा म्हणावा तसा उपयोग होत नाही कारण कोकणात पाउसच खूप असतो. पूर्वी जेंव्हा मातीची जमीन होती खळ्यात, तेंव्हा तर पावसाळ्यात जराही जाता येत नसे ख्ळ्यात. पाऊस संपला की की दरवर्र्षी चोपण्याने चोपून, शेणाने सारवून खळं करावं लागे. पण घरातल्या बायकांना पाऊस थांबला की जरा मोकळ्यावर येऊन बसता यावे म्हणून आता फरशी बसवून घेतली आहे खळ्याला. त्यामुळे पाऊस थांबला की पाच मिनीटात खळं कोरड होतं. श्रावणात नुकतीच पावसाची सर येऊन गेल्यावर संध्याकाळच्या पिवळ्या उन्हांत खळ्यात बसणे म्हणजे स्वर्गसुखचं !!!

पावसाळा संपला की खळ्याची डागडुजी केली जाते. दोन फरशांच्या भेगांमध्ये सिमेंट भरलं जातं. कारण कापलेलं भात खळ्यातचं आणुन रचायचं असतं. नवरात्रात वठारातल्या मुलींचा भोंडला ह्याच खळ्यात रंगतो आणि नंतरची दिवाळी ही. दिवाळीत रांगोळ्या आणि आकाश कंदिल तर असतोच पण फोटोत वर जो काट्टा दिसत आहे त्यावर सगळीकडे ठराविक अंतरावर पणत्या ठेवतो आम्ही. आजुवाजुच्या असलेल्या अंधारामुळे, एका ओळीत लावल्यामुळे दीपावली हे नाव सार्थ करणार्‍या आणि शांतपणे तेवणार्‍या त्या पणत्या मनाला ही तेवढीच शांतता देतात. तो हा फोटो

From Diwali 2015

आणि ही खळ्यात काढलेली रांगोळी

From Diwali 2015

दिवाळी झाली की अर्ध्या खळ्याला मांडव घातला जातो. वार्‍यानी पडलेल्या पोफळ्यांचे ( सुपारीची झाडं ) होतात खांब आणि नारळ्याच्या झावळ्यांचं छत. एकदा का मांडव घालुन झाला की मग खळं बैठकीच्या खोलीची भूमिका बजावतं. येणारा जाणारा पै पाव्हणा मग खळ्यातच टेकतो.

हे मांडव घातलेलं

From mayboli

मुख्य खळ्याचाच भाग असलेलं पण दोन पायर्‍या उंचावर असलेलं हे आहे तुळशीचं खळं. तुळशी वॄंदावन आहे इथे म्हणुन याला तुळशीचं खळं असं नाव आहे. दरवर्षी ह्या तुळशीचं लग्न श्रीकृष्णा बरोबर अगदी थाटामाटात हौसेने, वाजंत्र्यांच्या गजरात ह्याच खळ्यात संपन्न होतं.

From mayboli

भात झोडणी करणे, सुपार्‍या, कोकम, आंबोशी वाळत घालणे , आंब्या फणसाची साटं वाळत घालणे, यासाठी खळं सदैव तयार असतं. वाल, नागकेशर, मिरच्या, कुळीथ, आणि इतर अनेक उन्हाळी वाळवणं दरवर्षी नेमानं अंगावर मिरवतं खळं . पण एकदा का वाळवणं पडली की मुलांना सायकल, क्रिकेट. बॅडमिंटन असे खेळ संध्याकाळ पर्यंत खळ्यात खेळता येत नाहीत म्हणून ती नाराज असतात आमच्या वाळवणांवर !!!

मे नहिन्यात कितीही पाहुणे आले तरी खळ्यामुळे जागा कधीही कमी पडत नाही झोपायला. खूप जास्त पाहुणे असतील तर मजाच असते कारण काही गाद्या मग मांडवा बाहेर ही घालाव्या लागतात. नीरव शांततेत, उघड्या आकाशाखाली, चांदण्या मोजत , चंद्रप्रकाश अंगावर घेत, आपल्याशीच आपला संवाद साधत झोप केव्हा लागते ते कळत ही नाही. पण अलीकडे काही वर्ष आम्ही या सुखाला पारखे झालो आहोत . त्याचं असं झालं की काही वर्षांपूर्वी अंगणात झोपलेल्या आमच्या जॉनीला अगदी जराही ओरडण्याची संधी ही न देता एका बिबट्याने उचलुन नेलं तेव्हा पासुन खळ्यात झोपायचं डेरिंग नाही होतं कुणाचं !!!

घरातल्या सगळ्या मुलांच्या मुंजी आणि गोंधळ वगैरे सारखी शुभकार्ये गेल्या पाच सहा पिढयांपासुन ह्याच खळ्यात संपन्न होत आहेत. कार्य असेल तेव्हा पूर्ण खळ्याला मांडव घातला जातो. छताला सगळी़कडे आंब्याचे टाळे लावून सुशोभित केलं जातं. चारी बाजुनी रांगोळ्या घातल्या जातात, आजुबाजुच्या झाडांवर शोभेचे विजेचे लुकलुकणारे दिवे सोडले जातात. शहरातल्या एखाद्या परिपूर्ण हॉल पेक्षा ही आमचा हा मुंजीचा हॉल अनेक पटीनी अधिक सुंदर दिसतो. हे अंगण ही मग त्या कार्याच्या दिवसात खूप आनंदी असत आणि बटुला मनापासुन आशीर्वाद देतं

माझ्या एक चुलत सासुबाई नेहमी अभिमानाने सांगत की आमच्या घरातल्या बायकांना कधीही खळं झाडावं लागलं नाही. आमच्याकडे कायम खळं झाडायला गडी असतो. पण मी घरी गेले की संध्याकाळी खळं झाड्ण्याचं काम मी घेते अंगावर. एवढ मोठं खळं झाडताना कमरेचा काटा होतो ढिला पण अंगण स्वतः झाडणं आणि नंतर त्या स्वच्छ झाडलेल्या खळ्याकडे कौतुकाने पहाणं हा माझ्या आनंदाचा भाग आहे.

गुढी पाडव्याच्या दिवशी अंगणात उंच उभारलेली, आजुबाजुच्या हिरवाईत उठुन दिसणारी गुढी पाहताना ही जणु काय ह्या वैभवशाली अंगणाचीच गुढी आहे ह्या विचाराने उर अभिमानाने आणि मायेने भरुन येतो

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त वर्णन मनीमोहोर ..
प्रचि सुद्धा प्रसन्न आहेत एकदम Happy त्यातही पहिला जरा जास्तच भावला .

नवरात्रात वाठारातल्या मुलीचा भॉडला ह्याच खळ्यात रंगतो >> इथं भोंडला अस हवय का ?

गावी आहे माझ्याही पण आमच्याकडं खळं हा शब्द प्रचलित नै .. अंगण असच म्हणतात . आणि मांडव घालताना वाळलेल्या आणि झाडलेल्या शेतातल्या तुरी टाकतात .. विषेशतः हिवाळ्यात बाहेर त्याच तुरीच्या काड्या थोडुश्या घेऊन आणि मोठी लाकडं घेऊन तासनतास शेकोटी भोवती गप्पा मारायला मज्जा येते . सोबतीला त्याच शेकोटिच्या निखार्‍यात ओल्या भुईमुंगाच्या भाजलेल्या शेंगा , कधी हुरडा तर कधी गव्हाच्या ओंब्या असतात ..
बोलता बोलता तसच खाटेवर चांदण्या मोजत झोपुन जायचं .. आह ! काय ते स्वर्गसुख .. रोज सकाळी शेणाचा सडा टाकताना जाग यायची आणि चहाचे घुटके घेत परत ती मांडवाखालची शेकोटी ..
सुदैवाने अजुनहि सगळ जैसे थे आहे ..
बस, मांडवाखालची आडाला लावलेली बंगई तेवढी निघाली Sad

प्रचि मिळाले तर देईल .. तसं इतक सधन नै ते तुमच्या खळ्यासारखं ..साधसं गरिबाघरचं आहे .. Happy

टीना धन्यवाद. तुझा पहिला प्रतिसाद !! हो भोंडला करते तिथे.
सं इतक सधन नै ते तुमच्या खळ्यासारखं ..साधसं गरिबाघरचं आहे >> अगं आमचं अंगण ही साधसच आहे.

आहाहा हेमाताई, लवली. फारच सुरेख वर्णन.

माहेरी, चिपळूणजवळ माझं माहेर आहे तिथे अंगण असंच म्हणतात पण सासरी देवगडजवळ 'खळं' असंच म्हणतात.

वा, रात्री खळ्यात झोपायला पण मला आवडतं. अगदी तुम्ही वर वर्णन केलंय तसे चांदण्या मोजत. छान गप्पा पण रंगतात आमच्या खळ्यात. बाकी आहेच वाळवणं, निवांतपणे फणस वगैरे चिरणं. मागच्या खळ्यात पावसाळ्यात भाज्यांचे मांडव असतात.

हेमाताई तुमच्याकडे खूप जास्त मजा येत असणार. कारण खूप माणसे तुमच्याकडे. अगदी रेलचेल असेल.

मोबाईलवर आहे आणि रात्रीचे सॉरी पहाटेचे साडेचार वाजलेत. अजून झोपायचे शिल्लक आहे, म्हणून लेखाचे वाचन प्रतिसाद उद्याच.. पण फोटो पाहिले आणि ते झक्कास.. एखाद्या मंदिराच्या आवारासारखे पावित्र्य दडलेय त्या अंगणात Happy

खुपच सुंदर वर्णन आहे. सगळ्या प्रसंगांचे अगदी डो़ळ्यासमोर चित्र उभे राहिले. आणि फोटोमुळे तर कोकणातच जाऊन रहावसे वाटत आहे.

ममो, वर्णन वाचताना मन खरोखरंच मोहरून आलं, प्रत्यक्षात तुझी काय अवस्था झाली असेल हे लिहिताना, ती अगदी जाणवली इथपर्यन्त. Happy
सुंदर सुंदर वाटत राहिलं , वाचून संपल्यावरही..
जॉनी बद्दल वाचताना सर्रकन काटाच आला.. बिचारा जॉनी!!!

ममो...........खूप छान लिहिलंस नेहेमीप्रमाणेच!
सगळा अगदी पुनःप्रत्ययाचा आनंद!
कोकणात सगळ्यांचे "जॉनी"च असतात काय कुणास ठाउक! आमच्याही जॉनीच होता....आहे.( आमचं कोकणातलं घर म्हणजे नवरोबांचं आजोळ...........तिथे दर वर्षी आम्ही जातोच!)
फोटो सेल्फोनातला असल्याने नीट नाहीये. पण घर, खळं आणि जॉनी ओळखू येतील. फोटो तसा जुना आहे. याही घरात आणि खळ्यात आता बराच बदल झालाय.

सगळ्याना धन्यवाद.

अंजू ,खरं आहे आमच्याकडे माणसं खूप असल्याने जास्त येते मजा.

ॠन्मेष, खरं आहे आम्हालाही तसचं वाटतं म्हणुन घरातल्या प्रत्येकाचा वर्षातुन एकदा तरी घरी जाण्याचा अट्टाहास असतोच.

वर्षु, अग, जॉनीच्या आठवणीने अजुनही गलबलतं. त्या नंतर कित्येक दिवस आमच्याकडे कुत्रा नव्हता. आता आहे पण ह्या नवीन कुत्र्याचं नाव ही जॉनीच ठेवलं आहे.

मानुषी, घर आणि फोटो सुंदर. आंब्याचा पार छान दिसतोय.

नीधप, चनस , धन्स

नीधप, किती लक्षपूर्वक वाचलसं ग . सुधारते टायपो.

हे आमचं गाव आहे देवगड तालुक्यात.

लेख आता वाचला. मस्तच.

जॉनी म्हणजे नेमके कोण? श्वानाचे नाव आहे का?

या अंगणात झोपणे स्वर्गसुख आहे खरे.
बालपणी भावंडांबरोबर गावी गेलो असताना एक रात्र मुक्काम दूरच्या एका मामाकडे होता. तुलनेत गरीब होते ते. कारण बिनदुधाचा काळा चहा प्यायल्याचे आठवतेय. घरही छोटे आणि लागूनच शेत होते. जणू शेतातच घर. त्यामुळे झोपलेलो बाहेर अंगणातच. मोकळे आकाश, लखलख चांदण्या, थंड हवा, वार्याबरोबर सळसळणार्या शेताचा आणि कडेनेच जाणार्या पाटाच्या पाण्याचा आवाज, भावंडाशी मस्तीकुस्ती, मोठ्या माणसांच्या गप्पाटप्पा, एवढ्या वर्षांनीही बारीक सारीक तपशील आठवत नसले तरी त्या अनुभवाने दिलेला फील ताजा वाटतो.

ममो, मस्त वर्णन! तुझ्या श्रीमंतीचा हेवा वाटला ग हेमा ! अंगण/खळं .... प्रेमळ कुटुंब ..
....ममो, वर्णन वाचताना मन खरोखरंच मोहरून आलं, प्रत्यक्षात तुझी काय अवस्था झाली असेल हे लिहिताना, ती अगदी जाणवली इथपर्यन्त. स्मित
सुंदर सुंदर वाटत राहिलं , वाचून संपल्यावरही.. + १

माहेरी माडीचं घर आहे.

सासरी दिशांच्या प्रॉब्लेममुळे जुन्या घराला एन्ट्री मागून होती त्यामुळे तुळशीवृंदावन तिथे आहे. मग नवीन घर बांधलं तेव्हा आम्ही रस्त्याच्या दिशेलाच मेन एन्ट्री करायची असं ठरवलं. खूप मोकळं आहे आमचे अंगण.

हेमाताई sorry, तुमची परमिशन न घेता मी फोटो टाकला इथे.

किती गोड लिहिलेस गं.. वाचताना सगळे डोळ्यासमोर यायला लागले.

आमच्या गावी अजुनही बहुतेक जणांची मातीचीच खळी आहेत. पावसाळ्यात पुर्ण उखडून जातात सततच्या मा-याने. आणि मग दिवाळीच्या आधी माती आणुन चोपुन चापुन खळी नीट करण्याचा उद्योग केला जातो. दिवाळीपर्यंत तुळशीवृंदावनात तुळशी डोलायला लागते. त्याला छानपैकी रंगवुन तयार केले जाते. दिवाळीत मस्त रांगोळ्या नी काय काय.. इतके छान वाटते बघायला.

मस्त लेख!! आवडला. आमच्या घरासमोरच्या अंगणाला फरशी बसवून घेतली. आम्ही अंगण म्हणतो पण बागकाम करायला येणारा गडी मात्र "खळं" असंच म्हणतो. Happy

माझ्या भावाची मुंजपण अशीच दारांत मांडव घालून केली होती. हॉलपेक्षाही भारी वाटलं होतं.

ऋन्मेष, प्रतिसाद आवडला तुझा.
होय जॉनी म्हणजे आमचा कुत्रा.
आमच्याकडे ही कित्येक वर्ष पाटाच्या पाण्याचा झुळुझूळु आवाज येत असे ख्ळ्यात. पण आत शेतात विहीर खोदली आहे त्यामुळे त्या पाटाचा मेंटेनन्स नसल्यामुळे अलीकडे पाट आटला आहे. हल्ली आम्ही ख्ळ्यात एक कृत्रिम धबधबा तयार केला आहे त्याचा खळखळाट असतो खळ्यात.

मंजू, आपण एकदा जाऊ या आमच्या घरी कोकणात. खूप आवडेल तुला.

अंजू , घर किती छान आहे ग तुमचं ही. फोटो बघुन ही किती शांत वाटलं . आणि सॉरी काय.... नो सॉरी !!

साधना, मातीच्या खळ्याचं सौंदर्य काही वेगळच असत. मला खूप आवडतं. पण सोईच्या दृष्टीने फरशा बर्‍या पडतात. आम्ही अगदी अलीकडच्या काळापर्यंत घरात एका खोलीत जाणीवपूर्वक मातीची जमीन ठेवली होती पण आता तिथे ही फरशी बसवली आहे.

होय नंदिनी, बरोबर आहे तुझं. दारातल्या मांडवात कार्य फार भारी वाटत हॉलपेक्षा.

धन्यवाद हेमाताई. हे मोठं घर आम्ही आणि नवऱ्याचे दोन चुलत काका या तिघांचं आहे. एक ठाण्याला राहतात आणि एकानी सेपरेट शेजारी बांधलय.

घराच्या डाव्या बाजूला आमचा ( नवरा आणि माझे दीर), यांचा स्वतंत्र मोठा प्लॉट आहे पण आमची तिथे शिवण, काजू, बांबू, सागवान यांची थोडी झाडे आहेत. आम्ही तिथे घर न बांधता जुन्या ठिकाणीच बांधलंय.

माहेरचं मला जास्त आवडतं. छोटं आहे पण माडीचं आहे.

मानुषीताईनी फोटो टाकलेल्या घरासारखाच सेम डाव्या साईडने चौथरा आहे अजून.

हेमाताई तुम्ही गावाला गेलात की आमच्या घरी नक्की जा. मोठे दीर जाऊ आणि सासूबाई आहेत.

हेमाताई तुमचे लेख मला फिरवून आणतात कोकणात कारण मला फार कमी जाता येतं Happy . धन्यवाद.

खुपच सुंदर वर्णन आहे. सगळ्या प्रसंगांचे अगदी डो़ळ्यासमोर चित्र उभे राहिले. आणि फोटोमुळे तर कोकणातच जाऊन रहावसे वाटत आहे. >>>>> +१०० Happy

Khup chhaan lihiley. Maajhyaa aatyaa, mavashyanchee ghare asheech aahet. Ajun he sagaLe anubhavataa yete.

ममो नक्की जाऊ! कोकणाचा परीचय साहित्यातून वाचलेला. प्रत्यक्ष चाळीशी उलटल्यावर बघितला. आमचं गाव केळशी तिथे गेलो की अश्या कौलारु घर असलेल्या गुरुजींच्या घरी राहतो.
अंजू - तुमचं ही घर कित्ती छान आहे. मला अशी जुनी घरं खूप आवडतात.

मस्तच वर्णन ..आमच्याकडे पण खळच बोलतात...
फोटोत आहे तसच आहे सासरी आणि माहेरी ..
खळया शब्दातच बर्याच आठवणी आहेत ... न थांबता बोलण्या सारख्या...

ममो,खूप दिवसानी भेटलीस,पण भेटलिस ती कोकणातल्या अंगणात नव्हे खळ्यात.मन अगदी हरखून गेलं .जणु आपणच मस्त गप्पा मारतोय असं वाटलं.अंगण म्हणजे घर आणि बाहेरचं जग याना जोडणारा दुवाच.खूप निवांत वाटलंतुझं लिखाण वाचून.तुझे शब्द आणि प्रचित्र एकदम मस्त.तुलसी कट्टा खूपच छान आहे.

Pages