अंगणात माझिया ( आमचं खळं )

Submitted by मनीमोहोर on 6 June, 2015 - 13:20

मंजिरी, अगं निखिल किरकिरतोय का ग, जरा खळ्यात घेऊन बस त्याला म्हणजे शांत होईल ......
आता माजघरात आम्ही जेवायची पानं मांडतोय तेंव्हा सगळ्या मुलांनी खळ्यात जाऊन बसा ....
पोळ्या करताना गॅस जवळ उभं राहुन चिवचिवलयं अगदी, मी आता दहा मिनीटं खळ्यात जाऊन स्वस्थ बसतेय. ....
खळ्यात महादेश्वराच्या जीर्णोद्धारासाठी पंचायतीचे सभासद आलेत त्यांच्या साठी अमृत कोकम पाठवा.....

असं आमचं खळं ( कोकणात अंगणाला खळं हा शब्द प्रचलित आहे. ) घराचाच एक भाग असलेलं, घरापेक्षा ही अधिक वापरात असलेलं , सगळ्यांचचं लाडकं .... आमचं खळं

कोकणातली घरं देशावरच्या घरांसारखी बंदिस्त नसतात. परकीय आक्रमणाचा धोका नसल्याने तशी आवश्यकता नसेल वाटत. कोकणी माणसांची घरं ही त्याच्या सारखीच मो़कळी ढाकळी. दिंडी दरवाजा, चौसोपी वाडे वैगेरे कोकणात फारसे आढळत नाहीत. घराला फाटक ही नसतं बहुतेक ठिकाणी. गुरं वगैरे आत शिरु नयेत म्हणून एक घालता काढता येणारी काठी ( आखाडा ) अडकवून ठेवलेली असते साधारण दोन फुटावर फाटक म्हणून.

आमचं कोकणातलं घर डोंगर उतारावर आहे. ही जमीन माझ्या आजे सासर्‍यांना १८८२ साली इनाम म्हणुन मिळाली आहे. ( आमच्या कुलवृत्तांतात तसा उल्लेख आहे ) उतारावरची जमीन असल्याने घर बाधंण्यासाठी लेवलिंग करण गरजेच होतं. माझ्या आजे सासर्‍यांनी स्वतःच्या हाताने डोंगर फोडून घर बांधण्यापुरती सपाटी केली. आम्ही आत्ता रहातोय ते घर ही त्यांनीच बांधलेले आहे आणि अजूनही मूळ ढाचा तोच आहे. पूर्वी भिंती मातीच्या होत्या आता सिमेंटच्या.... असे किरकोळ बदलच फक्त केले गेले आहेत. वाढत्या कुटूंबासाठी म्हणून त्यानी खूप मोठं खळं राखलं आहे.

हा त्याचा फोटो.

From mayboli

पावसाळ्याचे चार महिने खळ्याचा म्हणावा तसा उपयोग होत नाही कारण कोकणात पाउसच खूप असतो. पूर्वी जेंव्हा मातीची जमीन होती खळ्यात, तेंव्हा तर पावसाळ्यात जराही जाता येत नसे ख्ळ्यात. पाऊस संपला की की दरवर्र्षी चोपण्याने चोपून, शेणाने सारवून खळं करावं लागे. पण घरातल्या बायकांना पाऊस थांबला की जरा मोकळ्यावर येऊन बसता यावे म्हणून आता फरशी बसवून घेतली आहे खळ्याला. त्यामुळे पाऊस थांबला की पाच मिनीटात खळं कोरड होतं. श्रावणात नुकतीच पावसाची सर येऊन गेल्यावर संध्याकाळच्या पिवळ्या उन्हांत खळ्यात बसणे म्हणजे स्वर्गसुखचं !!!

पावसाळा संपला की खळ्याची डागडुजी केली जाते. दोन फरशांच्या भेगांमध्ये सिमेंट भरलं जातं. कारण कापलेलं भात खळ्यातचं आणुन रचायचं असतं. नवरात्रात वठारातल्या मुलींचा भोंडला ह्याच खळ्यात रंगतो आणि नंतरची दिवाळी ही. दिवाळीत रांगोळ्या आणि आकाश कंदिल तर असतोच पण फोटोत वर जो काट्टा दिसत आहे त्यावर सगळीकडे ठराविक अंतरावर पणत्या ठेवतो आम्ही. आजुवाजुच्या असलेल्या अंधारामुळे, एका ओळीत लावल्यामुळे दीपावली हे नाव सार्थ करणार्‍या आणि शांतपणे तेवणार्‍या त्या पणत्या मनाला ही तेवढीच शांतता देतात. तो हा फोटो

From Diwali 2015

आणि ही खळ्यात काढलेली रांगोळी

From Diwali 2015

दिवाळी झाली की अर्ध्या खळ्याला मांडव घातला जातो. वार्‍यानी पडलेल्या पोफळ्यांचे ( सुपारीची झाडं ) होतात खांब आणि नारळ्याच्या झावळ्यांचं छत. एकदा का मांडव घालुन झाला की मग खळं बैठकीच्या खोलीची भूमिका बजावतं. येणारा जाणारा पै पाव्हणा मग खळ्यातच टेकतो.

हे मांडव घातलेलं

From mayboli

मुख्य खळ्याचाच भाग असलेलं पण दोन पायर्‍या उंचावर असलेलं हे आहे तुळशीचं खळं. तुळशी वॄंदावन आहे इथे म्हणुन याला तुळशीचं खळं असं नाव आहे. दरवर्षी ह्या तुळशीचं लग्न श्रीकृष्णा बरोबर अगदी थाटामाटात हौसेने, वाजंत्र्यांच्या गजरात ह्याच खळ्यात संपन्न होतं.

From mayboli

भात झोडणी करणे, सुपार्‍या, कोकम, आंबोशी वाळत घालणे , आंब्या फणसाची साटं वाळत घालणे, यासाठी खळं सदैव तयार असतं. वाल, नागकेशर, मिरच्या, कुळीथ, आणि इतर अनेक उन्हाळी वाळवणं दरवर्षी नेमानं अंगावर मिरवतं खळं . पण एकदा का वाळवणं पडली की मुलांना सायकल, क्रिकेट. बॅडमिंटन असे खेळ संध्याकाळ पर्यंत खळ्यात खेळता येत नाहीत म्हणून ती नाराज असतात आमच्या वाळवणांवर !!!

मे नहिन्यात कितीही पाहुणे आले तरी खळ्यामुळे जागा कधीही कमी पडत नाही झोपायला. खूप जास्त पाहुणे असतील तर मजाच असते कारण काही गाद्या मग मांडवा बाहेर ही घालाव्या लागतात. नीरव शांततेत, उघड्या आकाशाखाली, चांदण्या मोजत , चंद्रप्रकाश अंगावर घेत, आपल्याशीच आपला संवाद साधत झोप केव्हा लागते ते कळत ही नाही. पण अलीकडे काही वर्ष आम्ही या सुखाला पारखे झालो आहोत . त्याचं असं झालं की काही वर्षांपूर्वी अंगणात झोपलेल्या आमच्या जॉनीला अगदी जराही ओरडण्याची संधी ही न देता एका बिबट्याने उचलुन नेलं तेव्हा पासुन खळ्यात झोपायचं डेरिंग नाही होतं कुणाचं !!!

घरातल्या सगळ्या मुलांच्या मुंजी आणि गोंधळ वगैरे सारखी शुभकार्ये गेल्या पाच सहा पिढयांपासुन ह्याच खळ्यात संपन्न होत आहेत. कार्य असेल तेव्हा पूर्ण खळ्याला मांडव घातला जातो. छताला सगळी़कडे आंब्याचे टाळे लावून सुशोभित केलं जातं. चारी बाजुनी रांगोळ्या घातल्या जातात, आजुबाजुच्या झाडांवर शोभेचे विजेचे लुकलुकणारे दिवे सोडले जातात. शहरातल्या एखाद्या परिपूर्ण हॉल पेक्षा ही आमचा हा मुंजीचा हॉल अनेक पटीनी अधिक सुंदर दिसतो. हे अंगण ही मग त्या कार्याच्या दिवसात खूप आनंदी असत आणि बटुला मनापासुन आशीर्वाद देतं

माझ्या एक चुलत सासुबाई नेहमी अभिमानाने सांगत की आमच्या घरातल्या बायकांना कधीही खळं झाडावं लागलं नाही. आमच्याकडे कायम खळं झाडायला गडी असतो. पण मी घरी गेले की संध्याकाळी खळं झाड्ण्याचं काम मी घेते अंगावर. एवढ मोठं खळं झाडताना कमरेचा काटा होतो ढिला पण अंगण स्वतः झाडणं आणि नंतर त्या स्वच्छ झाडलेल्या खळ्याकडे कौतुकाने पहाणं हा माझ्या आनंदाचा भाग आहे.

गुढी पाडव्याच्या दिवशी अंगणात उंच उभारलेली, आजुबाजुच्या हिरवाईत उठुन दिसणारी गुढी पाहताना ही जणु काय ह्या वैभवशाली अंगणाचीच गुढी आहे ह्या विचाराने उर अभिमानाने आणि मायेने भरुन येतो

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा! हेमा ताई काय सुरेख लेख! अप्रतिम वर्णन... शब्दच नाही.. खुप आवडलं खळं...:)
तुमचा लेख म्हणजे माझ्या साठी पाऊणचार असतो Happy

खुप भाग्यवान आहात तुम्ही कोकणात इतक टुमदार घर आहे तुमचे.. मुख्य म्हणजे घरात फारशे बदल न करता , जुन्या स्वरुपात तठस्थ सगळ्यांच्या स्वागताला उभे आहे... तुमच्या कुटुंब वत्सल स्वभावाचे दर्शन आपचुकच तुमच्या प्रत्येक लेखात होत असते.. ते मला फार भावतं...

खळ्याचे मनोगत खुप आवडले.. Happy खुप शांत शांत वाटतं आहे लेख वाचुन...
आज ऑफीस मधे खुप काम आहे, पण मी मात्र खुप खुष आहे.. कारण मी आज दिवसभर खळ्यात असणार आहे...:)

तुळशी वृंदावन खुपच गोड आहे,,, मागे आडोशाला फणस तोडुन ठेवलेला दिसतोय...

खुप आवडला लेख. .मनीमोहोर अगदी हेवा वाटला तुमच्या घराचा ..
मी मात्र खुप खुष आहे.. कारण मी आज दिवसभर खळ्यात असणार आहे...>>>सायलीस अनुमोदन.

मीरा, प्रतिसाद खूप आवडला. अंगण म्हणजे घर आणि बाहेरचं जग याना जोडणारा दुवाच >>>> +१

सायली, वर जे फोटो त वृंदावन दिसते आहे ना तिथे मी तु काढलेली रांगोळी इमॅजिन करते. मग ते अधिकच सुंदर दिसु लागतं आम्ही काढतो रोज रांगोळी पण तुझ्या एवढी सुंदर नाही ना जमत आम्हाला म्हणून ही आयडिया.

भुईकमळ, जागु धन्यवाद प्रतिसादाबद्दल.

आज ऑफीस मधे खुप काम आहे, पण मी मात्र खुप खुष आहे.. कारण मी आज दिवसभर खळ्यात असणार आहे.. >>>> +१०० अतिशय सुर्रेख टिप्पणी ..... Happy

अभिनंदन हेमा!!! आज लोकसत्तेच्या वास्तुरंग पुरवणीत आपला हा लेख पुन्हा वाचण्यात आला .

धन्यवाद सर्वांना प्रतिसादासाठी.

होय भुईकमळ, कालच्या लोकसत्ता वास्तुरंग पुरवणीत आला आहे हा लेख छापून. ही त्याची लिंक.
http://www.loksatta.com/vasturang-news/our-courtyard-1117694/

जयू हौदात आहेत कमळं. कुमुदिनी आहेत म्हणजे रात्री उमलतात आणि सकाळी सूर्य वर आला की मावळतात. रात्री त्यांचा मंद सुगंध खळ्यात पसरलेला असतो. हा फोटो

From mayboli

हेमा किती भाग्यवान आहात तुमच्या घरापाशी साक्षात स्वर्ग अवतरला आहे त्या चंद्र विकासिनी कमळानच्या निकट सानिध्यात...
ते कमळां फुलान्च उमलणे ,परिमळने पुन्हा मिटून जाणें समोर पहायला मिळन किती सुंदर !....
तजेलदार देखण्या कमळाचा फोटोसुद्धा रंगभूल टाकणारा .

वा हेमाताई सुरेख फोटो. आता तुमच्या गावच्या घरी जायलाच हवे. मागेच जाणार होते पण तेव्हा आपली ओळख नव्हती.

अभिनंदन, लोकसत्ता लेखाबद्दल.

तुमचा हा लेख आणि फोटो....तारीफ करायला शब्दच नाही माझ्याकडे.
खळ्याचे फोटो नुसते बघुनच एकदम शांत, प्रसन्न वाटलं. तुमच्या शब्दा-शब्दातून हा खळा आणि घराविषयीची आपुलकी, प्रेम आणि सार्थ अभिमान या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या.

Hematai Congrats.

अप्रतिम वर्णन. छान आणि नेमकी छायाचित्रे. मी अनुभवलेली गावं, अंगणं आणि खळी केवळ पुस्तकातलीच कारण आम्हाला गावच नाही.
सुट्ट्यांमधे माझे सर्व मित्र गावाला जायचे. आम्ही इथेच. ठाणे-मुंबईत..
नाही म्हणायला ट्रेकींगला गेल्यावर रात्रीचा मुक्काम एखाद्या शेतकऱ्याच्या खळ्यात असायचा पण ते एकदम रानावनातलं.
त्यामुळे माझ्या मनातलं खळं पुस्तकातलच इमॅजिनरी.
पण ते प्रत्यक्ष साकार झालं तुमच्या लेखामुळे..
सुरेख, प्रत्ययदर्शी लेखाबद्दल मन:पुर्वक अभिनंदन, खळं डोळ्यासमोर उभं केल्याबद्दल आभार आणि थोडासा हेवाही..(बालपणातला)

ममो, खुप छान लिहिलस ग , लहानपणीच्या आठवणीत मी हरवून गेले, नकळत डोळ्यात पाणी कधी आले कळलच नाही.
हे कोणत गाव आहे ग ?

मस्त लेख. घर , खळं सारंच आवडलं.
पाहील्यासारखं झालंय घर. गावाचा उल्लेख नाही केलेला ?

धन्यवाद आमचं खळं आवडलं म्हणून .

प्रज्ञा, हे गाव आहे नाडण ( देवगड तालुक्यात )

दिवाळीत गेले होते कोकणात. तो पणत्यांचा आणि रांगोळीचा फोटो हेडर मध्ये अ‍ॅड केलाय.

ममो सुंदर वर्णन. कोकणात जाऊन खळ्यात खेळून आले बघ. आमच्याकडे मातीचच होतं खळं. आणि मला तेच फार आवडतं. चापून चोपून बाळसं धरलेलं, हिरव्या रंगाच सारवण केलेलं खळं आणि त्यात पांढरी शुभ्र रांगोळी.
त्याचबरोबर, भाताची मळणी, झोडणी, सगळ डोळ्यासमोर उभं राहिलं.

नीरव शांततेत, उघड्या आकाशाखाली, चांदण्या मोजत , चंद्रप्रकाश अंगावर घेत, आपल्याशीच आपला संवाद साधत झोप केव्हा लागते ते कळत ही नाही. >>>>>>>>>हा तर आवडता छंद. आकाशातून जाणारी, विमानं, यानं, तसचं धूमकेतू, उल्कापात हे सगळं शोधायचं आणि दिसलं की लगेच बरोबरच्याला दाखवायचं. किती आनंद व्हायचा, हे सगळं बघताना. मात्र अंधारात, आजूबाजूला कसला आवाज आला, तर मात्र देवाचा धावा.! Happy

मला कोकणं म्हटलं की थांबताच येत नाही. पण आता थांबते. Proud

हे माझ्या काकांच घर!
1545234_10200606979010695_326872998_n.jpg10371426_10201307358759751_4502431521415392970_n.jpg

आणि हा आखाडा !
DSCN2316.jpg

शोभा, अप्रतिम प्रतिसाद. प्रत्येक वाक्याला मनात अगदी अगदी असं उमटत होतं.
फोटो ही सुंदर. दुसर्या फोटोतल घर तर नुकत्याचं न्हायला घातलेल्या बाळासारखं दिसतय.
आखाडा ही बेस्टच.

Pages