अंगणात माझिया ( आमचं खळं )

Submitted by मनीमोहोर on 6 June, 2015 - 13:20

मंजिरी, अगं निखिल किरकिरतोय का ग, जरा खळ्यात घेऊन बस त्याला म्हणजे शांत होईल ......
आता माजघरात आम्ही जेवायची पानं मांडतोय तेंव्हा सगळ्या मुलांनी खळ्यात जाऊन बसा ....
पोळ्या करताना गॅस जवळ उभं राहुन चिवचिवलयं अगदी, मी आता दहा मिनीटं खळ्यात जाऊन स्वस्थ बसतेय. ....
खळ्यात महादेश्वराच्या जीर्णोद्धारासाठी पंचायतीचे सभासद आलेत त्यांच्या साठी अमृत कोकम पाठवा.....

असं आमचं खळं ( कोकणात अंगणाला खळं हा शब्द प्रचलित आहे. ) घराचाच एक भाग असलेलं, घरापेक्षा ही अधिक वापरात असलेलं , सगळ्यांचचं लाडकं .... आमचं खळं

कोकणातली घरं देशावरच्या घरांसारखी बंदिस्त नसतात. परकीय आक्रमणाचा धोका नसल्याने तशी आवश्यकता नसेल वाटत. कोकणी माणसांची घरं ही त्याच्या सारखीच मो़कळी ढाकळी. दिंडी दरवाजा, चौसोपी वाडे वैगेरे कोकणात फारसे आढळत नाहीत. घराला फाटक ही नसतं बहुतेक ठिकाणी. गुरं वगैरे आत शिरु नयेत म्हणून एक घालता काढता येणारी काठी ( आखाडा ) अडकवून ठेवलेली असते साधारण दोन फुटावर फाटक म्हणून.

आमचं कोकणातलं घर डोंगर उतारावर आहे. ही जमीन माझ्या आजे सासर्‍यांना १८८२ साली इनाम म्हणुन मिळाली आहे. ( आमच्या कुलवृत्तांतात तसा उल्लेख आहे ) उतारावरची जमीन असल्याने घर बाधंण्यासाठी लेवलिंग करण गरजेच होतं. माझ्या आजे सासर्‍यांनी स्वतःच्या हाताने डोंगर फोडून घर बांधण्यापुरती सपाटी केली. आम्ही आत्ता रहातोय ते घर ही त्यांनीच बांधलेले आहे आणि अजूनही मूळ ढाचा तोच आहे. पूर्वी भिंती मातीच्या होत्या आता सिमेंटच्या.... असे किरकोळ बदलच फक्त केले गेले आहेत. वाढत्या कुटूंबासाठी म्हणून त्यानी खूप मोठं खळं राखलं आहे.

हा त्याचा फोटो.

From mayboli

पावसाळ्याचे चार महिने खळ्याचा म्हणावा तसा उपयोग होत नाही कारण कोकणात पाउसच खूप असतो. पूर्वी जेंव्हा मातीची जमीन होती खळ्यात, तेंव्हा तर पावसाळ्यात जराही जाता येत नसे ख्ळ्यात. पाऊस संपला की की दरवर्र्षी चोपण्याने चोपून, शेणाने सारवून खळं करावं लागे. पण घरातल्या बायकांना पाऊस थांबला की जरा मोकळ्यावर येऊन बसता यावे म्हणून आता फरशी बसवून घेतली आहे खळ्याला. त्यामुळे पाऊस थांबला की पाच मिनीटात खळं कोरड होतं. श्रावणात नुकतीच पावसाची सर येऊन गेल्यावर संध्याकाळच्या पिवळ्या उन्हांत खळ्यात बसणे म्हणजे स्वर्गसुखचं !!!

पावसाळा संपला की खळ्याची डागडुजी केली जाते. दोन फरशांच्या भेगांमध्ये सिमेंट भरलं जातं. कारण कापलेलं भात खळ्यातचं आणुन रचायचं असतं. नवरात्रात वठारातल्या मुलींचा भोंडला ह्याच खळ्यात रंगतो आणि नंतरची दिवाळी ही. दिवाळीत रांगोळ्या आणि आकाश कंदिल तर असतोच पण फोटोत वर जो काट्टा दिसत आहे त्यावर सगळीकडे ठराविक अंतरावर पणत्या ठेवतो आम्ही. आजुवाजुच्या असलेल्या अंधारामुळे, एका ओळीत लावल्यामुळे दीपावली हे नाव सार्थ करणार्‍या आणि शांतपणे तेवणार्‍या त्या पणत्या मनाला ही तेवढीच शांतता देतात. तो हा फोटो

From Diwali 2015

आणि ही खळ्यात काढलेली रांगोळी

From Diwali 2015

दिवाळी झाली की अर्ध्या खळ्याला मांडव घातला जातो. वार्‍यानी पडलेल्या पोफळ्यांचे ( सुपारीची झाडं ) होतात खांब आणि नारळ्याच्या झावळ्यांचं छत. एकदा का मांडव घालुन झाला की मग खळं बैठकीच्या खोलीची भूमिका बजावतं. येणारा जाणारा पै पाव्हणा मग खळ्यातच टेकतो.

हे मांडव घातलेलं

From mayboli

मुख्य खळ्याचाच भाग असलेलं पण दोन पायर्‍या उंचावर असलेलं हे आहे तुळशीचं खळं. तुळशी वॄंदावन आहे इथे म्हणुन याला तुळशीचं खळं असं नाव आहे. दरवर्षी ह्या तुळशीचं लग्न श्रीकृष्णा बरोबर अगदी थाटामाटात हौसेने, वाजंत्र्यांच्या गजरात ह्याच खळ्यात संपन्न होतं.

From mayboli

भात झोडणी करणे, सुपार्‍या, कोकम, आंबोशी वाळत घालणे , आंब्या फणसाची साटं वाळत घालणे, यासाठी खळं सदैव तयार असतं. वाल, नागकेशर, मिरच्या, कुळीथ, आणि इतर अनेक उन्हाळी वाळवणं दरवर्षी नेमानं अंगावर मिरवतं खळं . पण एकदा का वाळवणं पडली की मुलांना सायकल, क्रिकेट. बॅडमिंटन असे खेळ संध्याकाळ पर्यंत खळ्यात खेळता येत नाहीत म्हणून ती नाराज असतात आमच्या वाळवणांवर !!!

मे नहिन्यात कितीही पाहुणे आले तरी खळ्यामुळे जागा कधीही कमी पडत नाही झोपायला. खूप जास्त पाहुणे असतील तर मजाच असते कारण काही गाद्या मग मांडवा बाहेर ही घालाव्या लागतात. नीरव शांततेत, उघड्या आकाशाखाली, चांदण्या मोजत , चंद्रप्रकाश अंगावर घेत, आपल्याशीच आपला संवाद साधत झोप केव्हा लागते ते कळत ही नाही. पण अलीकडे काही वर्ष आम्ही या सुखाला पारखे झालो आहोत . त्याचं असं झालं की काही वर्षांपूर्वी अंगणात झोपलेल्या आमच्या जॉनीला अगदी जराही ओरडण्याची संधी ही न देता एका बिबट्याने उचलुन नेलं तेव्हा पासुन खळ्यात झोपायचं डेरिंग नाही होतं कुणाचं !!!

घरातल्या सगळ्या मुलांच्या मुंजी आणि गोंधळ वगैरे सारखी शुभकार्ये गेल्या पाच सहा पिढयांपासुन ह्याच खळ्यात संपन्न होत आहेत. कार्य असेल तेव्हा पूर्ण खळ्याला मांडव घातला जातो. छताला सगळी़कडे आंब्याचे टाळे लावून सुशोभित केलं जातं. चारी बाजुनी रांगोळ्या घातल्या जातात, आजुबाजुच्या झाडांवर शोभेचे विजेचे लुकलुकणारे दिवे सोडले जातात. शहरातल्या एखाद्या परिपूर्ण हॉल पेक्षा ही आमचा हा मुंजीचा हॉल अनेक पटीनी अधिक सुंदर दिसतो. हे अंगण ही मग त्या कार्याच्या दिवसात खूप आनंदी असत आणि बटुला मनापासुन आशीर्वाद देतं

माझ्या एक चुलत सासुबाई नेहमी अभिमानाने सांगत की आमच्या घरातल्या बायकांना कधीही खळं झाडावं लागलं नाही. आमच्याकडे कायम खळं झाडायला गडी असतो. पण मी घरी गेले की संध्याकाळी खळं झाड्ण्याचं काम मी घेते अंगावर. एवढ मोठं खळं झाडताना कमरेचा काटा होतो ढिला पण अंगण स्वतः झाडणं आणि नंतर त्या स्वच्छ झाडलेल्या खळ्याकडे कौतुकाने पहाणं हा माझ्या आनंदाचा भाग आहे.

गुढी पाडव्याच्या दिवशी अंगणात उंच उभारलेली, आजुबाजुच्या हिरवाईत उठुन दिसणारी गुढी पाहताना ही जणु काय ह्या वैभवशाली अंगणाचीच गुढी आहे ह्या विचाराने उर अभिमानाने आणि मायेने भरुन येतो

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages