अमेरिकेत/इतरत्र अधिक पर्यावरणस्नेही जीवनशैलीने जगताना

Submitted by जिज्ञासा on 8 April, 2015 - 19:09

नुकतीच अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात गेली ४ वर्षे सलग पडलेल्या दुष्काळामुळे जी पाणीकपात लागू झाली त्याबद्दलच्या निकित ह्यांच्या धाग्यावरील (http://www.maayboli.com/node/53421) चर्चेचे फलीत म्हणजे हा धागा. शीर्षकात जरी अमेरिकेचे नाव असले तरी भारतात वा भारताबाहेर इतर देशांत राहणाऱ्या मायबोलीकरांनी देखिल इथे आपले अनुभव/सूचना जरूर लिहाव्यात! ह्या धाग्यावर साधारणतः खालील प्रश्नांच्या अनुषंगाने विचार, चर्चा, उपाय इ. अपेक्षित आहे.
> एका भरपूर सुबत्ता असलेल्या देशात राहताना तुम्ही नैसर्गिक व इतर संसाधनांची (म्हणजे पाणी, अन्न, कागद, वीज, इंधन इ.) उधळपट्टी होऊ नये म्हणून कोणते उपाय करता? कशी बचत करता?
> तुमच्या गावात/राज्यात पर्यावरणस्नेही असे कोणते उपक्रम राबवले जातात (उदा. recycling, farmers markets etc). ह्या जागा/उपक्रमाची नावे दिली तर त्या गावात राहणाऱ्या इतर मायबोलीकरांना आणि इतर मायबोली वाचकांना देखिल त्याचा उपयोग होईल. जर तुम्ही त्यात सहभागी होत असाल तर तुमचे अनुभव.
> असे उपाय जे तुम्ही स्वतः करत नाही (ऐकीव माहिती किंवा ओळखीचे लोकं करतात) पण जे करता येऊ शकतील.
> अमेरिकेतील/सर्व देशांतील नागरिकांमध्ये पर्यावरणविषयक जाणीव वाढावी ह्यासाठी काय उपाय करता येतील ह्याबद्दलच्या कल्पना

ह्याच विषयावर असलेला हर्पेन यांचा धागा : http://www.maayboli.com/node/51270

गरज , हौस आणि हव्यास ह्या मधल्या सीमारेषा फार धूसर असतात आणि सुबत्तेच्या भांडवलावर अनेक उच्चशिक्षित लोकंही त्या फार नकळत ओलांडताना दिसतात (वाक्यश्रेय- रार)! त्या आपल्याकडून नकळत ओलांडल्या जाऊ नयेत ह्यासाठी हा धागा! आपल्या सर्वांकडे पृथ्वी नावाचा एकच वसतीयोग्य आणि सुंदर ग्रह आहे! तो तसाच राहावा ह्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करुया!
There is always enough for everybody's need but not for everybody's greed - Mahatma Gandhi

ह्या धाग्यावरील प्रतिसादांत आलेल्या सूचना इथे (http://www.maayboli.com/node/53442?page=10#comment-3528458)एकत्र डकवल्या आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

केळीचे पान बनवायला फॅक्टरी टाकावी लागत नाही त्यामुळे ते पेपर पेक्षा अधिक पर्यावरण स्नेही निश्चित ठरेल. मात्र त्यासाठी पद्धतशीर लागवड लागेल. सध्या असलेली झाडेच नष्ट करीत असतील तर उपयोग नाही.

रार, तुझं निकित ह्यांच्या धाग्यावरचं वाक्य मी ह्या धाग्याच्या हेडर मध्ये वापरू शकते का? ते वाक्य फार फार महत्वाचं वाटतंय मला ह्या धाग्याचा उद्देश स्पष्ट करण्यासाठी!

बस्के, झंपी, केळ्याचे पान हे प्लास्टिकच्या कागदाच्या ऐवजी कधीही अधिक पर्यावरणस्नेही कारण केळ्याचे पान नैसर्गिकरित्या कुजून संपूर्णपणे recycle होते मात्र प्लास्टिक कधीही कुजू शकत नाही ना पूर्णपणे त्याचे विघटन होते, शिवाय ते जाळल्याने होणारे प्रदूषण निराळेच! अर्थात केळीच्या पानांचा वापर तारतम्याने केला पाहिजे! अनावश्यक तोडणी केली तर ते ही घातकच ठरेल पर्यावरणाला!

रार, तुझ्या नवीन पिढीवर संस्कार करण्याच्या मुद्द्याला हजारवेळा अनुमोदन! आमच्या कुटुंबात घडलेली गोष्ट आहे. माझी एक बहिण मुंबईत राहते. तिच्या मुलाला लहानपणी सारखा खोकला व्हायचा म्हणून त्याला फारसे बाहेर कुठे घेऊन जात नसे. त्याने एकदा बालवाडीत असताना शाळेत केळीच्या झाडाचे चित्र काढले आणि घरी आणले. त्या चित्रात त्याने आपण आंब्याचे झाड जसे काढतो तसे झाड काढून त्याला केळी काढली होती! ते चित्र पाहिल्यानंतरच्या रविवारी माझी ताई त्याला घेऊन आमच्या शेतावर गेली! जर मुलांना निसर्ग बघयला मिळाला नाही तर त्यांच्यात ही जाणीव कशी रुजेल? प्रत्यक्ष केळीचे झाड पाहून जे ज्ञान मिळेल ते नुसते चित्र पाहून मिळत नाही. निसर्गाचा, ऋतुचक्राचा आपल्या दैनंदिन आयुष्याशी काय संबंध आहे हे वेळोवेळी सांगत राहिलं पाहिजे! निसर्गाचे उत्पती-स्थिती-लय हे चक्र जर अनुभवले नाही तर त्याची किंमत कशी कळणार?
माझ्या मुलांना सगळं मिळालं पाहिजे हा हट्ट का? ज्या गोष्टी आपल्याला मिळत नाहीत त्याने आपण जास्ती शिकतो असे मला वाटते! त्याने बचतीची, पर्यायांचा विचार करण्याची सवय लागते आणि कधी कधी सोडून देण्याची देखील. ही सगळी खूप आवश्यक कौशल्ये आहेत! हा धागा मुलांचे संगोपन ह्या विषयाकडे न्यायचा नाहीये पण आपल्या पुढच्या पिढीला हे धडे देणे आपले काम आहे. त्यांना आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांना ह्या समस्यांची भेट तर आपण देणारच आहोत निदान त्यांना त्या समस्यांना तोंड देण्यासाठी सक्षम तरी बनवूया!

झंपी, thermostat म्हणजे हिटरचा on-ऑफ स्वीच नव्हे. त्यावर तापमान सेट करायचे सेटिंग असते, घरात असताना २२ डि.से. ठेवत असू, तर नसताना १० ठेवतो. पंखा (डकटिंग मधला) मात्र कायम चालू ठेवतो.
हार्डवुड फ्लोर असेल तर ह्युमिडीटी हा मोठा शत्रू. एअर कंडीशनिंग पूर्ण बंद ठेवून चालत नाही, किंवा मग डीह्युमीडीफायर. केलेल्या चोइस मध्ये काही चांगलं करता आलं तर बघतो. नवीन शोध/ लाईफ स्टाईल ही आवडली तर स्वीकारतोच. पूर्वज असे जगले म्हणून मी तसचं जगलं पाहिजे हे अजिबात पटत नाही. माझ्या जगण्याने पृथ्वीवर थोडी हानी होणारच आहे हे गृहीतक मान्य करून माझा कन्व्हीनियंस होणार असेल तर बघतोच. पण तारतम्य बाळगतो. सगळ्या गोष्टी निव्वळ 'गरज' म्हणून करत नाही. हौसही मारत नाही. हव्यास मात्र करत नाही. सगळ्याचा डेफिनिशन मात्र मी ठरवणार. Happy

एका केळीचा पानापासून जर (समजा) १०० कागद तयार करता येत असतील तर काय चांगले? बरं केळ लावायला नैसर्गिक जंगल तोडलंय. स्टीलच्या ताटात केळीचे पान घेणे ही शुद्ध हानी वाटते मला. उद्या गावच्या गावं केळीच्या पानावर जेवली तर किती (बायोडिग्रडेबल) कचरा होईल. स्टील/ काचेच्या प्लेट्स धुवायला जेवढं पाणी लागेल त्याच्या कितीपट पाणी केळीच्या झाडाला लागेल? परत युज एन थ्रो केळीचं पान म्हणजे. रोज जाऊन नवीन तोडायचं. Happy

रच्याकने: गणपतीत, केळीच्या पानावर जेवायला आवडतेच. गरम गरम भात केळीच्या पानावर मस्त लागतो. पानगीही आवडते, आणि आवर्जून खातो.
परत, दारात केळी आहे तर वापरलं वेगळं आणि अट्टाहास म्हणून त्यावर जेवण वेगळं.

हे चूकीचेही असू शकेल. मला नीटसे आठवत नाही (कदाचित दिनेश सांगू शकतील) पण उत्पन्न देण्यासाठी लागवड केलेल्या केळीचा lifespan कमी असतो, बहुधा काहि महिन्यांचाच. कमीत कमी मी गावाला मे महिन्याच्या सुट्ट्या काढल्या आहेत त्यात आठवते कि केळीच्या बागांमधे दोनेक महिन्यांमधे एकदा तरी ती तोडून जाळली जात नवी लागवड करण्यासाठी. त्यामूळे केळीची पाने वापरली जात असतील एवी तेवी तोडायचीच आहेत त्यामूळे.

केळीच्या झाडाला एकदा फळ लागलं की परत लागत नाही .. म्हणजे मेन यिल्ड एकदाच .. त्यामुळे लाइफस्पॅन कमी असेल लागवडीत .. परत नो प्रॉसेसिंग रिक्वायर्ड .. Happy

>>झंपी, thermostat म्हणजे हिटरचा on-ऑफ स्वीच नव्हे.<<

अमितव, ते माहिती आहे हो, thermostat म्हणजे ऑन ऑफ स्वीच नाही ते. तुम्ही पण कमाल करता हो. Happy
माझी कमेंट एकदंरीत ">>आपण ज्यावेळी घरी असू तेंव्हाच ते चालू होतील<<< " ह्यावर केलेली कमेंट आहे.
घरीच असताना चालू होइल चे सेटींग कसे काय फायद्याचे ठरेल? मिनिमम टेंप चालू ठेवावेच लागते.

केळी सुद्धा फेकायाला लागताना पानं वापरली तर ठिक ते सुद्धा ती इतके दिवस कुजणार नसतील ते झाड उखडल्यापासून. (केळीचा घड येवून गेला की पर्त दुसरा लागत नाही माहितीय.. तेव्हा युक्तीवाद नकोय तो).

पण मी पाहिलेल्या प्रकारात, मागच्या अंगणातल्या केळीची पानं तोडून आणतात ज्याला घड असतात लागलेले. (काही जणं). अगदी कोकणापासून ते मद्रास ते केरळात पाहिलेय की लोकं इतका विचार करून तोडत नाहीत हि पानं की अजून उजवायचं झाड आहे.(उजवायचं म्हणजे घड धरायचेत किंवा धरायच्या मार्गावर आहे. एक बोली भाषा आहे ती).
असो.

>> केळ्याचे पान हे प्लास्टिकच्या कागदाच्या ऐवजी कधीही अधिक पर्यावरणस्नेही कारण केळ्याचे पान नैसर्गिकरित्या कुजून संपूर्णपणे recycle होते मात्र प्लास्टिक कधीही कुजू शकत नाही ना पूर्णपणे त्याचे विघटन होते, शिवाय ते जाळल्याने होणारे प्रदूषण निराळे>><<
हे पटतेय पण केळी येवून गेलेल्या झाडाबाबत ठिकाय.

>>माझी कमेंट एकदंरीत ">>आपण ज्यावेळी घरी असू तेंव्हाच ते चालू होतील<<< " ह्यावर केलेली कमेंट आहे.<<
त्याची पण सोय झालेली आहे. नेस्ट सारखे सेल्फ लर्निंग थर्मोस्टॅट मोशन सेंसरचा वापर करुन आॅन/आॅफ होतात... Happy

अमितव, केळीचे पान हे आपल्याकडे इतके सर्रास वापरत नाहीत दक्षिणेत जास्ती (नंदिनी ने लिहिले आहेच!). शिवाय केळीचे पान नंतर गायीला खायला घालण्याची देखिल पद्धत आहे. कुजण्याची वाट बघायला नको!
आपल्याकडे पत्रावळी वापरतात. त्याही संपूर्णपणे biodegradable असतात. अर्थात जिथे ज्या गोष्टी मुबलकपणे उपलब्ध असतात त्या त्या ठिकाणी वापरल्या जातात. आता उद्या अरब देशांत राहून रोज रोज केळीच्या पानावर जेवणे पर्यावरणस्नेही ठरणार नाही.

झंपी, मला वाटते केळीचे कोणते पान तोडावे ह्याबद्दलही काही शास्त्र आहे. मी बाबांना विचारून बघते. आमच्याकडे सध्या ७-८ विविध जातीच्या केळी लावल्या आहेत बाबांनी हौस म्हणून!

रार, करते अपडेट हेडर Happy

रार, सुबत्तेत वाढलेल्या नवीन पिढीबद्दल १००० मोदकं!
'तुम्ही दात घासताना नळ असा सुरु ठेवलात किंवा खुप वेळ आंघोळ करत राहिल्या तर पाणी जिथुन येत तिथल सगळ पाणी संपेल!' असं मधून मधून सांगितलं तर फरक पडतो असा अनुभव आहे पण फॉर monitoring कराव लागतं...
मुलींसाठी अजुन तरी xbox किंवा wii सारखे कंसोल गेम घेतले नाहीयेत.... त्याऐवजी trampoline, swing set आणि cubby house मागच्या अंगणात लावले आहेत. पैकी swing set नवीन घेतलाय. बाकीचे दोन second hand..(न लाजता)
कित्येकदा भारतातून आपल्या पिढीतल्या इथे migrate झालेल्या लोकांचा resources वापरतानाचा उद्दामपणा बघुन थक्क व्हायला होत. देवा, यांना सुबुद्धि दे...
(चर्चेला वेगळे वळण लागण्याची शक्यता वाटल्याने आधीची पोस्ट बदलली आहे.)

>>पण अन्न वाया घालवण्यापेक्षा किंवा उगीच अतिखाण्यापेक्षा शेअर करणं बरं<<
कबुल. आणि शेअर करुनही अन्न उरलच, तर बाॅक्सचा आॅप्शन आहेच... Wink

( हे उदाहरण अमेरिका किंवा भारताबाहेरच्या देशातलं नाही. . )
लडाख मधे डिझेल वर वीज पिकवली जात होती. त्या पैकी एका गावात आम्ही तीन विंड टर्बाईन्स उभारून दिले आहेत. एका इमारतीच्या भिंतींमधून पाणी खेळवलं आहे. ते एका टाकीत जमा होतं ज्यामधून विशिष्ट प्रकारच्या ऑइलच्या ट्यूब्ज फिरवल्यात. ऑईलचं तापमान सोलर पॅराबोलिक मिरर्सच्या सहाय्याने ३५० डिग्रीज प्ल्स ठेवलेलं असतं. पॅराबोलिक मिरर हे तंत्रज्ञान आता जुनं झालंय. माझे एक मित्र श्री दीपक गधिया यांनी भारतात माउंट अबू, शिर्डी आणि आता तिरुपती देवस्थानात त्याचा वापर केला आहे. गुजरातेत त्यांच्या पुढाकाराने गुजरात सोलर एनर्जी सिस्टीम्स ही संस्था गुजरातच्या पर्यावरण मंत्रालयाला सहाय्य करते. गाधियांचे काम मोठे आहे. खरं तर आता त्यांना केंद्रीय पातळीवर एक्स्पोजर मिळायला हवे.

शिर्डी संस्थानांत दहा हजार लोकांचा स्वयंपाक या तंत्रज्ञाने निर्माण केलेल्या वाफेवर दहा मिनिटात होतो. त्याच स्टीमवर पुढे जेवणाची भांडी काही मिनिटात स्वच्छ धुतली जातात. गरम पाण्यासाठी वीज वापरली जात नाही.

इतरांचे प्रयत्न :
काही कंपन्यांकडून कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी बायोगॅस संयंत्र लावलं जातं. त्याचा गॅस आजूबाजूच्या परीसरातील लोकांना उपलब्ध करून दिला जातो.

एका ठिकाणी कच-यापासून जो गॅस निर्माण होतो त्यावर चालणारे इंजिन बसवून त्याला अल्टरनेटर जोडून वीज पिकवली जाते. हे सगळे उपाय खूप सोपे आहेत. हे तंत्रज्ञान देशी आहे आणि उपलब्ध आहे. डेन्मार्क मधे तर ७०% वीज अपारंपारीक स्त्रोतांपासून वापरण्याचे उद्दीष्ट आहे. समुद्राच्या पाण्यात उभारलेल्या हायब्रीड विंड टर्बाईन प्लाण्ट मुळे मोठ्या प्रमाणात वीज पिकवली जातेय.

प्लास्टीक पासून पेट्रोल बनवण्याच्या पद्धतीने प्लास्टीकचेही विघटन होतेय आणि इंधनाची निर्मितीही. सध्या इतकंच ....

पाण्याचे सोर्सेस शुद्ध ठेवणे, भारतातल्या पर्यावरणाला हानीकारक रूढी आणि सवयी बदलवणे यासाठी प्रयत्न करणे हे मोठे काम आहे. माझ्या मित्राने स्वखर्चाने असे काही प्रयत्न सुरू केले आहेत. नगर जिल्ह्यात आणि शिरूर तालुक्यात लोकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पुढच्या काळात जमीनीतून पाणीउपसा करणा-या बॉटलिंग प्रकल्पांविरुद्ध जनजागृती करणे, नद्यांमधे सांडपाणी सोडण्याविरुद्ध जागृती करणे ही उद्दीष्टं आहेत. इटीएफ, बायोडायजेस्टर यांच्या वापराबाबत जनजागृती करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांशी संपर्क साधून केलेल्या हालचालींना यश येत आहे. जलदूत या योजनेला सरकारी पातळीवर सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

हे सर्व इथे अवांतर असल्यास क्षमस्व !

थंडीत नळातून सुरुवातीला येणारे अतिथंड पाणी हिवाळ्यात वाया जाते  एका हिवाळ्यात मी ते पाणी साचवून झाडांना/स्वयंपाकात वापरन्याचा प्रयोग केला होता पण फार कटकटीचे होते..तुमच्यापैकी कोणी यावर काही उपाय शोधला आहे का>>>>>
मी या मधे रुमाल, पायमोजे, अंर्तवस्त्रे वगैरे धुवुन घेतो. अगदी ५-८ सेल्सिय्स पर्यंत हा उपाय वापरता येतो. त्याखाली तापमान असेल तर ते बादलीमधेच ठेउन कमोडचा वापर झाल्यावर ओतावे. अथवा बाहेरुन आल्यावर हात पाय आणि चेहरा धुण्यास वापरावे

मी नोकरी निमित्त बर्‍याच वेळेस फर्नि श्ड अपार्टमेंट मधे किंवा हॉटेल मधे राहतो. अशा वेळेस हातातला कचरा समोर दिसेल त्या ड्स्ट बिन मधे न टाकता प्रत्येक वेळेस नेउन टॉयलेट मधल्या डस्ट बिन मधे टाकतो ट्रॅश बॅग चा वापर कमी होतो.

विमानप्रवासात ३०० मिली ची रिकामी बाटली सोबत बाळगतो. चेक ईन झाल्यावर भरुन घेतो. प्लॅस्तिक बाटल्या, पैसे, कागद सगळेच वाचते

>>माझी कमेंट एकदंरीत ">>आपण ज्यावेळी घरी असू तेंव्हाच ते चालू होतील<<< " ह्यावर केलेली कमेंट आहे.<<
>>

झंपी, I0T means Internet of Things मुळे आता स्मार्ट-होम्स, स्मार्ट -ऑफीस ही कल्पना साकारल्या जात आहे. मी आय-ओ-टी वरच काम करतो. घरी यायच्या एक तास अगोदर तू जिथे असशील तेथून तुला तुझा गार्/गरम एअरकॉन आता सुरु करता येतो.

>>घरी यायच्या एक तास अगोदर तू जिथे असशील तेथून तुला तुझा गार्/गरम एअरकॉन आता सुरु करता येतो.<<

किंवा लोकेशन सर्विस (जिओफेंसिंग) वापरुन तुम्ही घराबाहेर पडलात/घरी परतलात त्यानुसार एअर ॲटोमॅटिकली ऑफ/ऑन सेट करता येते... Happy

दुधाचे, डिटर्जन्ट चे, तेलाचे इत्यादी प्लास्टिक कॅन्स् रिसायकल बिन्स् मध्ये टाकताना ते धुवून ( रिन्स् करून) टाकायचे असतात का?

किंवा इन जनरल काहिही रिसायकल मध्ये टाकताना ते रिन्स् करून टाकायाचे असतात का?

जे सहज रिन्स् करून म्हणजे एकदोनदा पाण्याने खळबळून टाकणं शक्य आहे ते तसं टाकते पण तेलाचे, डिटर्जन्ट चे, टेक आऊट केलेल्या तेलकट, चीजी, बटरी थोडक्यात रिन्स् करायला कठिण असे कन्टेनर्स नुसतेच टाकले तर चालतात का? ह्या रिन्स् करण्यात पाण्याचा अति वापर होतो आणि त्याने काम फार वाढतं असं मला वाटतं .. ह्याबाबत नक्की अपेक्षा काय असते?

रिन्स् करणे ही अपेक्षा असेल तर मग सध्या कॅलिफोर्नियात रिसायकल न केलेलंच बरं का?

( हा प्रश्न तिकडे टाकावा की इकडे कळेना .. :))

पर्सनल लेव्हलचा चेंज म्हणून नाही, पण माझ्या मते ठिकठिकाणचे ऑटो फ्लश भरपूर पाणी वाया घालवतात. मॅन्युअल फ्लश असेल तर पाणी बरंच वाचेल असं वाटतं.

१. केस / नखं शक्यतो कापू नयेत.
२. वर्षा सहा महिन्यातून एखादे वेळी दाढी करावी.
३. पाणी वाया जाऊ नये म्हणून रोज अंघोळीची गरज नाही.
४. कपडे न धुता किती वेळा घालता येतील याचा अभ्यास करावा.
५. गाड्या, घरातील लाद्या पाण्याने पुसू नयेत.
६. रोज तोंड धुवायला पाणी वाया घालवू नये. अशक्य होईल तेव्हां टूथपेस्ट शिवाय धुवावे.
७. साबणाचा वापर टाळावा.
८. दिवसाआड उपवास करावा. (ओला कचरा कमी निर्माण होतो, फ्लशचं पाणी वाचतं )
९. एसी चा वापर टाळावा.
१०.संध्याकाळी दिवस मावळताच झोपी जावे. म्हणजे वीजेची बचत होते.
११. चावीचे रेडीओ वापरावेत. अशाच पद्धतीचे टीव्ही बाजारात येईपर्यंत कुठलाही कार्यक्रम पाहू नये. यामुळे चावीचे टीव्ही सेट बाजारात उतरवले जातील.
१२. घराजवळ कार्यालय असावे किंवा उलटं. ज्या कार्यालयात घरी काम दिलं जातं, प्लेक्सी अवर्स असतील, तिथेच काम करावे. याने इंधनाची बचत होते. कार्बन उत्सर्जन कमी होते.
१३. मोठ्या अपार्टमेंट मधे बायोगॅस प्रकल्प राबवावा. त्या तून जो गॅस मिळेल त्यावर अपार्टमेंट मधील सर्व बि-हाडांचा स्वयंपाक बनवावा. भाजीपाला व, अन्नधान्य एकत्रच आणावे , साठवावे. आवडी निवडीचा फारसा बाऊ करू नये.
१४. बेरोजगार मुलं भारतातून आणून त्यांना जंगले, आजू बाजूचा परीसर या ठिकाणी फिरून पालापाचोळा गोळा करण्याचे काम द्यावे. तर दुस-या टीमला त्यापासून पत्रावळ्या बनवण्याचे काम द्यावे. सार्वजनिक प्रीतीभोजनासाठी या पत्रावळ्यांचाच वापर करावा.
१५. उसाच्या चोथ्यापासून बनवलेल्या कोळशावर चालणा-या चुली ब्।आरतातून आयात करून त्यावर सुद्धा अन्न शिजवता येईल.
१६. अपार्टमेंट च्या मालकीच्या जागेत एका कोप-यात शेड बांधून त्यामधे वर्ग दोन व तीन च्या कच-याचे टाईप तीन भस्मीकरण संयंत्रांमधे भस्मीकरण करावे. या संयंत्रामधे जी उष्णता निर्माण होते ती कन्व्हेक्टरमधून पाणी
किंवा तेल गरम करण्याकरत वापरावे आणि अशा प्रकारे उष्णता ग्रहन केलेला द्राव इमारतीच्या गच्चीवरच्या उषणतारोधक प्रस्तरावगुंठित टाकीमधे साठवावा. या उष्ण द्रावाचा वापर थंडीत इमारतीचे तापमान उष्ण राखण्यासाठी होऊ शकतो, आठवड्याकाठी अंघोळ किंवा भांडी, कपडे धुण्यासाठी होऊ शकतो.

अपडेट करीनच.

अरे हो

टाकीत पाणी चढवण्यासाठी सायकल चालवून किंवा झोका घेऊन पाणी चढवणारे पंप पुण्यातल्या एका उद्योजकाने तयार् केलेले आहेत. ते आयात करावेत. टाक्यांना संवेदक असतील ते काढून टाकून चेंडूझडपा बसवाव्यात. संवेदकाला बॅटरी लागते.

सध्या भारतात गो सॅफरॉन मोहीम चालू असल्याने ग्रीन या शब्दावर अघोषित बंदी आहे. त्यामुळे ग्रीन हाऊस इफेक्ट, गो ग्रीन वगैरेंवर चर्चा होऊ शकत नाही. जेव्हां पुन्हा ग्रीन सरकार सत्तेत येईल तेव्हां इथल्या चर्चेचा उपयोग होईल.

बऱ्याच चांगल्या सूचना/युक्त्या दिसत आहेत! पण महत्वाच्या कामांमुळे पुढचे काही दिवस इथे प्रतिसाद देणे आणि धागा अपडेट करणे जमणार नाही! वेळ मिळताच हेडर अपडेट करेन.

बाळू परांजपे, तुमच्या पहिल्या दोन पोस्ट्स (लडाख मधल्या wind turbines project आणि bottling plants बद्दल) अवांतर नक्कीच नाहीत मी नंतर त्या हेडर मधे अपडेट करेन मात्र त्यानंतरच्या पोस्ट्स संपूर्णपणे अवांतर आहेत. हा धागा खिल्ली उडवण्यासाठी नाही. ह्या धाग्यावर असे काहीही कृपया लिहू नका ज्याने विषयाचे गांभीर्य कमी होईल ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. This is something very close to my heart and it pains me when people don't take it seriously. I really really hope you will respect my feelings!

जंगल मे मोर नाचा किसीने ना देखा
हम जो थोडी सी पीके जरा झुमे, हाय रे सब ने देखा..

या सूचनाही गंभीर नाही तरी रैना असुच शकतात. असो. कळकळीने सुचवलेल्या उपायांकडे खिल्ली उडवणे या दृष्टीने पाहील्याने मानसिक धक्का बसला आहे. ( खरं म्हणजे अनुल्लेख होईल असंच वाटलं होतं).

रमड, जगभरातले लोकं ज्या प्रकारे अक्षरशः रेकलेस वापर करतात सार्वजनिक स्वच्छतागृहांचा ते बघता ऑटो फ्लश असायलाच हवेत. पाणी वाचवण्याच्या नादात स्वच्छतेशी तडजोड करून रोगांना आमंत्रण कशाला. बर्‍याच ठिकाणी त्या ऑटोफ्लशचे काम थोडे आणखी इफिशियन्ट करता येइल. उदा: दार अनलॉक झाल्यावर फ्लश होणे.

Pages