घाटवाटांवरची सायकल राईड - (भाग १)

Submitted by मनोज. on 11 March, 2015 - 05:12

मार्चचा पहिला वीकांत अनेक कारणांनी सर्वांच्या निशाण्यावर होता. सलग ३ दिवस सुट्टी. त्यामुळे गाडीवरून एखादी ट्रीप करायची की एखादी मोठी सायकल राईड हा प्रश्न अनेक दिवस चर्चेमध्ये होता.

कोणता रूट..?
पुन्हा कोकणातच जायचे का..?
पुन्हा ताम्हिणी घाटातूनच जायचे काय..?
परत येताना तरी ताम्हिणी घाट नको.
मांढरदेवीला जावूया.. BRM रूट करूया.
मांढरदेवी BRM अनेक कारणांमुळे पूर्ण करता आली नसल्याने तो BRM चा रूट सुधाकर, केदार व राहुलला करायचा होता. (पुणे - भाटघर धरण - भोर - मांढरदेवी - वाई - मांढरदेवी - भोर - पुणे)

अशा अनेक चर्चांनंतर आणि अनेक ठिकाणे ठरवून व बाद करून ही ट्रीप "घाट स्पेशल" करण्याचे नक्की झाले.

कोण कोण येणार हा नंतरचा कळीचा मुद्दा होता. शेवटी प्रत्येकाच्या सोयीनुसार..

किरण कुमार - कापूरहोळपर्यंत..
केदार दिक्षीत, सुधाकर, राहुल लोखंडे - मांढरदेवी.
अमित M आणि मी दोघे संपूर्ण ट्रीप करणार असे ठरले.

आमचा रूट होता

पहिला दिवस -
पुणे - वाई - महाबळेश्वर - पोलादपूर - महाड (व शक्य झाल्यास पाचाड / रायगड पायथा)

दुसरा दिवस -
(पाचाड किंवा) महाड - भोर - पुणे

या दरम्यान आम्ही ५ घाट पार करणार होतो.
१) कात्रज
२) खंबाटकी
३) पसरणी
४) आंबेनळी
५) वरंधा

बरेच महिने प्रतिक्षेत असलेल्या सायकलींग जर्सी अगदी शेवटच्या क्षणी मिळाल्या. त्या मिळवण्याची धावपळ करण्याच्या प्रकारात वेळेचे गणित चुकले व रात्री घरी पोहोचायला अमितला व मला बराच उशीर झाला.

सकाळी लवकर उठायचे व ५ ला बाहेर पडायचे गणित अवघड दिसत होते. तरीही झोपताना सायकल संपूर्ण तयार करून व बॅगा, दिवे अडकवूनच झोपलो.

भल्यापहाटे साडेचारला उठलो. बाकी सर्वांचे ग्रूपवरती मेसेजेस येत होते. अमितला फोनाफोनी केली व सव्वापाचच्या सुमारास बाहेर पडलो. साडेपांचला वडगांव पुलाजवळ पोहोचलो..

थोड्या वेळाने किरण कुमार, सुधाकर, केदार दिक्षीत, राहुल आले.. आम्ही त्यांच्या आधी निघणार होतो परंतु ते शक्य दिसत नव्हते. आमची एकंदर तयारी, वक्तशीरपणा यावर अनेक डोस पाजून ते निघून गेले...

सहा वाजता अमित आला व आम्ही वेगाने कात्रज बोगद्याकडे कूच केले.

सकाळच्या थंड हवेत घाट चढताना फारसा थकवा जाणवत नव्हता. आम्ही अगदी सहजच दरीपुलावर आलो. तेथून कात्रजचा खरा चढ सुरू होतो. तो चढही सहज पूर्ण करून बोगदा पार केला तर केदार व किरण तेथे थांबले होते. थोड्या गप्पा टप्पा करत थांबलो.. आता पुढचा थांबा कापूरहोळमध्ये घ्यायचा असे ठरवून निघालो.

सकाळची वेळ, वेगाने जाणारी वाहने, टोलनाक्यावरच्या रांगा, कंटेनर आणि ट्रकच्या आजुबाजूने सुसाट जाणार्‍या गाड्या.. आणि एका लयीत जाणार्‍या आमच्या सायकली...

ट्रक व कंटेनरसोबत - अमित.

कापूरहोळ येथे बाकी सायकलस्वारांचा निरोप घेवून आम्ही पुढे निघालो.

कात्रज ते शिरवळ बर्‍यापैकी उतार असल्याने फारसे कष्ट न घेता अगदी तीन तासात आम्ही खंबाटकी पायथ्यापर्यंत येवून पोहोचलो.

रात्री जेवण न झाल्याने अमितला थकवा जाणवत होता. खंबाटकी सुरू होण्याआधीच पोटभर नाष्टा करण्यासाठी एक हॉटेल बघितले व पोहे, वडापाव, मिसळ... या ऑर्डरी सुटू लागल्या.
अचानक माझा फोन वाजला व ट्रेकिंग ग्रूपमधला एक मित्र दिलीप वाटवे त्याच रूटवर गाडीने येतो आहे हे ही कळाले. तो १०-१५ मिनीटातच येवून पोहोचला. दिलीप आणि त्याच्यासोबतच्या मित्रांनी आणलेली पुरणपोळीही आम्ही चेपली. Wink

बरीच खादाडी करून व गरमागरम कॉफी घेवून खंबाटकी चढायला सुरूवात केली.

खंबाटकी घाटासमोर - मी.

खंबाटकी घाटामध्ये नेहमीच्या अडचणी येत होत्या. सायकलसाठी रस्ता न मिळणे.. चढ चढवताना जवळून एखादी कार खूप जोरात जाणे.. प्रचंड माल भरलेला एखादा ट्रक सायकलपेक्षाही हळू वेगात जाणे त्याला पार करायचे कसे हा नेहमीचा प्रश्न. कारण डावीकडून जागा नाही आणि उजवीकडे सायकल काढावी तर मागून येणार्‍या गाड्यांचे हॉर्न एका लयीत वाजू लागतात..

खंबाटकी घाट - यात अमित सापडतोय का? Wink

यावेळी खंबाटकी घाटामध्ये फारसा त्रास झाला नाही. अमित व मी पुढे मागे न होता; न थांबता खंबाटकी घाट पूर्ण केला. कुठेही फारसा वेळ वाया न घालवता आम्ही घाटामधून घरंगळायला सुरूवात केली. घाट संपला. आता सुरूर फाटा फक्त ३ किमी लांब होता. तेथून NH 4 ला टाटा करून सिंगल रोड चा प्रवास सुरू होणार होता.

सुरूर फाटा ते वाई हा आमचा अत्यंत आवडता रस्ता आहे. नितांतसुंदर, प्रेक्षणीय आणि अल्हाददायक..
हायवेसारखा रखरखाट नाही, गाड्यांची गर्दी नाही. दोन्हीबाजूंना दाट झाडी असणारा निवांत रस्ता. एकूणच हिरवाई आणि आजूबाजूची शेतजमीन यांच्यामुळे भरदुपारीही सुखद गारवा असतो.

वाईनंतर लगेचच पसरणी घाट सुरू होतो.. पुण्यातून गडबडीने निघून आणि वाटेत फक्त एकदाच थांबूनही पसरणी घाटाच्या पायथ्याला ११ वाजून गेले होते. भर उन्हात घाट चढवण्याशिवाय पर्याय नव्हता.

घाट सुरू करण्याआधी नातू फार्म्स मध्ये थांबून एक कोकम सरबत प्यायले व पाणी भरून घेतले. येथे आम्हाला एका भारद्वाज पक्षानेही दर्शन दिले.

पसरणी घाट हा C च्या आकाराचा आहे आणि घाट सुरू होतानाच शेवटचा "हॅरीसन फॉली" चा पॉईंट दिसतो आणि तो सतत दिसत राहतो. त्यामुळे त्याच्याकडे बघूनच खच्चीकरण होत होते.
पसरणी घाट चढवायला सुरूवात केली. खंबाटकी घाट न थांबता पूर्ण केल्याने आत्मविश्वास वाढला होताच. पहिले काही चढ आणि वळणे विनासायास पार पडली. थोडे अंतर पार केल्यानंतर मी एक पाणी पिण्यासाठी ब्रेक घेतला. अमित येथे पुढे निघून गेला. पाणी प्यायलो. थोडे पाणी डोक्यावर ओतून हेल्मेटच्या आतला रूमाल भिजवला व पुन्हा एका लयीत पेडल मारू लागलो. येणारे जाणारे लोक हात दाखवून 'चिअरअप' करून जात होते. अनेकजण "इतक्या उन्हात?? सायकल??" अशा अर्थानेही हसत हसत पुढे जात होते.
वाटेत अचानक समोरून येणारी एक पजेरो / फॉर्चुनर छाप गाडी थांबली व आतून आवाज आला
"क्रिश्ना रिवर जाना है!"
आता ऐन पसरणी घाटात या मी या प्रश्नाचे काय उत्तर देणार??
मी: "वो रिवर उपर महाबलेश्वरमें है और नीचे वाई मेंभी! आपको कहाँ जाना है?"
तो: "ओके थँक्यू" - आणि निघून गेला.

मी पुन्हा सायकल चालवायला सुरूवात केली. घाटातले मंदिर पार केले. नियमीतपणे पाणी पिवूनही थोडे डिहायड्रेशन जाणवू लागले होते. अचानक पायामध्ये क्रॅंप आला. थोड्या अंतरावर सावली होती तेथेही सायकल चालवत जाणे जमेल असे वाटले नाही. चुपचाप सायकवरून उतरलो व सायकल ढकलतच सावलीच्या आश्रयाला गेलो. पाणी प्यायलो. थोडा वेळ विश्रांती घेतली, स्ट्रेचींग केले व पाय ठीकठाक आहेत याची खात्री करून सायकल हाणायला सुरूवात केली. थोड्या वेळापूर्वीची पजेरो / फॉर्चुनर पुन्हा अवतरली व "क्रिश्ना रिवर उपर है!" ही सुवार्ता देवून निघून गेली. मी कोणत्याही विनोदाला हसण्याच्या अवस्थेत नसल्याने त्यांना फक्त हात दाखवला व टाटा केला.

दमणूक चांगलीच जाणवत होती. त्यात वरून उन्हाचा तडाखा होताच. दोघेही तसेच सायकल चालवत होतो.

हॅरीसन फॉलीजवळ अमित भेटला. त्यालाही क्रँपचा त्रास झाला होता. त्यामुळे तो चालत चालला होता. आता मी पुढे निघालो पांचगणी गावाच्या थोडे आधी आम्ही एकत्र आलो व एकत्र सायकलींग सुरू केले. पाणी जवळ जवळ संपलेले होते. पांचगणी मध्ये इलेक्ट्रॉल, गोळ्या अशी खरेदी झाली पण पाणी भरून घ्यायला विसरलो. पुढे बघू, मिळेल.. असा विचार करत दोघेही पांचगणी बाहेर पडलो. मात्र पुढे पाण्याची काहीही सोय नव्हती. मॅप्रो गार्डन फक्त ५ किमी लांब होते त्यामुळे आम्हीही निर्धास्त होवून सायकल चालवत होतो. अचानक "माला'ज" चे काऊंटर दिसले व तेथे पाणी भरून घ्यायचे ठरवले. सोबत काहीतरी खादाडी.. स्ट्रॉबेरी मिल्कशेक किंवा स्ट्रॉबेरी क्रीम खाण्याचा बेत ठरण्याआधीच घड्याळाकडे बघून नकार दिला व महाबळेश्वरकडे कूच केले.

स्ट्रॉबेरी क्रीमचा एक फोटो. Wink

वाटेत एका ठिकाणी दोघांनी मिळून अर्धा किलो स्ट्रॉबेरी चा फडशा पाडला.

पांचगणी ते महाबळेश्वर दरम्यान..

अमित M.

यथावकाश वेण्णा लेक व शेवटचा मोठा चढ चढून आम्ही "महाबळेश्वर 0" जवळ पोहोचलो.

ठरवलेल्या वेळापत्रकानुसार आम्ही ४० मिनीटे मागे पडलो होतो त्यामुळे फोटोसेशन आवरून आम्ही महाड रस्त्याकडे मोर्चा वळवला. आजच्या दिवसातला चौथा घाट "आंबेनळी घाट" समोर होता. मात्र हा घाट फक्त उतरायचा होता. सलग २० किमी उतार, एक किरकोळ चढ, पुन्हा १६ किमी उतार आणि शेवटचे कांही किलोमीटरचा सपाट रस्ता संपला की आम्ही पोलादपूरमध्ये पोहोचणार होतो.

आता या डोंगररांगा उतरायच्या होत्या...

आम्ही एकत्रच आंबेनळी घाट उतरायला सुरूवात केली. एक दोन खराब पॅचेस सोडले तर रस्ता खूपच चांगला होता. दुपारचे चार वाजत होते परंतु झाडांची सावली आणि वारा यांच्यामुळे उकाडा व थकवा जाणवत नव्हता.

बघता बघता निम्मा घाट उतरूनही झाला होता.

पांच वाजण्याच्या दरम्यान वाटेतल्या एका छोट्या चढावर एक गांव लागले. दोघांनाही भूक लागली होती. अमितने मिसळ घेतली तर मी फरसाण व कांदा लिंबू घेतले. तेथे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. वड्यांची अवस्था बघून ते घ्यावेसे वाटले नाहीत.

नाष्टा आवरून व शिल्लक राहिलेला घाट उतरून आंम्ही पोलादपूरला पोहोचलो. आजचा पाचाड मुक्काम अवघड दिसत होता. पोलादपूर महाड १८ किमी आणि पुढे पाचाड २६ किमी. अजून ४४ किमी अंतर पार करायचे का? महाड-पाचाड दरम्यान एक घाटही आहे. त्यामध्ये जाणारा वेळ गृहीत धरला असता आम्ही खूप उशीरा पाचाडला पोहोचलो असतो. त्यामुळे "Plan B" म्हणजेच महाडलाच मुक्काम करावयाचे ठरवले.

NH17 वरून दिसणारा सूर्यास्त.

महाडमध्ये शिरता शिरताच एका चांगल्या हॉटेलमध्ये रूम मिळाली. सायकलींची सुरक्षीत व्यवस्था केली व आवराआवरी करण्यासाठी रूममध्ये दाखल झालो..

फ्रेश होवून तंदूरी चिकन, पापलेट तवा फ्राय आणि भारत विंडीज सामन्याच्या हायलाईट्स सोबत आजच्या एकंदर प्रवासाचा आढावा घेत व उद्याचे नियोजन करत जेवण आवरले.

सकाळपासून १८० किमी सायकल चालवली होती... कात्रज, खंबाटकी, पसरणी व आंबेनळी हे चार घाट पार केले होते.
(यातला कात्रज व आंबेनळी हे एकदम सोपे.. त्यातही कात्रज घाट आम्ही बायपास रस्त्याने आल्यामुळे घाट म्हणावा असा नव्हताच. फक्त चढ होता. आंबेनळी म्हणजे फक्त उतार होता.)

एक झकास दिवस चविष्ट भोजनासमवेत संपत होता...

(क्रमशः)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी राईड !!

एकदाची जर्सी आली हे ही नसे थोडके. नाहीतर मला वाटत होते की तो धन्या पण माबोवरच्या डु आयडी सारखा अमितचा डु आयडी आहे.

सूंदर वर्णन आणि फोटूज पण,
पण तूम्ही खरेच महाडला चालले होते यावर माझा विश्वास नव्हता Happy

सुरूर फाटा ते वाई हा आमचा अत्यंत आवडता रस्ता आहे. +१

एकदाची जर्सी आली हे ही नसे थोडके Happy

झकासराव - सगळे फोटो मोबाईल कॅमेराने काढले आहेत.

>>>>एकदाची जर्सी आली हे ही नसे थोडके. नाहीतर मला वाटत होते की तो धन्या पण माबोवरच्या डु आयडी सारखा अमितचा डु आयडी आहे. - Lol

>>>>पण तूम्ही खरेच महाडला चालले होते यावर माझा विश्वास नव्हता - त्या सकाळविषयी लिहिताना बरेच कंट्रोल केले आहे. अमितमुळे काय काय ऐकून घ्यावे लागले मला.. Uhoh Lol

हिम्या लोल. अरे माझ्याहीपेक्षा जास्त किकु लिहतोय बघ.

"पण तूम्ही खरेच महाडला चालले होते यावर माझा विश्वास नव्हता"

मनोज अन पंतांनी त्यांचे रेप्युटेशन कसले खतरनाक करून ठेवले आहे.. Happy

>>>मनोज अन पंतांनी त्यांचे रेप्युटेशन कसले खतरनाक करून ठेवले आहे..

अरे रेप्युटेशनचा विषय नाही. जेंव्हा जेंव्हा महाबळेश्वर मार्गे रायगडचा विषय निघायचा तेंव्हा जो तो आम्हाला वेड्यात काढायचा. वरंध्यातून महाडला जा. महाबळेश्वर चढून मग महाड असा उलटा प्रवास कशाला... असे.. Sad

पण आम्ही ठाम होतो. पहिल्यापासून. Biggrin

मस्तच लिहीलय.... फोटोही छान. फोटो बद्दल धन्यवाद.

>>>> जेंव्हा जेंव्हा महाबळेश्वर मार्गे रायगडचा विषय निघायचा तेंव्हा जो तो आम्हाला वेड्यात काढायचा. वरंध्यातून महाडला जा. महाबळेश्वर चढून मग महाड असा उलटा प्रवास कशाला... असे.. पण आम्ही ठाम होतो. पहिल्यापासून<<<

अरे या रूटने मी गेलोय २००२ मधे, पण १९८२ सालचे मॉडेल असलेल्या फियाट कारने Proud फक्त आम्हि महाडला डावीकडे वळून पुढे केळशीपर्यंत जाऊन सरळ समुद्र किनारा गाठला होता तेव्हा.
माझ्या शाळकरी पोरांना घाटरस्ते माहित व्हावेत म्हणून केळशीला जायचे तर वरंध सोडून मुद्दामहून या वाटेने निघालो अन फसलो. तेव्हा कात्रजचे नविन बोगदे नव्हते. कारला पॉवर स्टिअरिंग वगैरे काही नव्हतेच, अन चालवायला मी एकटा, सोबत लिम्बी अन चिल्लीपिल्ली. अरे तो आंबेनळी घाट उतरताना माझी शब्दशः रडायची पाळी आली होती. स्टिअरिंग खेचुन खेचून अन श्वास रोखून वेग आवरीत जाताना इतका कंटाळलो होतो की घाटामध्येच रिकामी जागा बघुन तिथे गाडि घुसवली अन विश्रांती घेतली होती. ज्यांच्याकरता हा लांबचा वळसा घेतला, ती पोरे मस्त पैकी झोपली होती. फियाटच्या त्या प्रवासांच्या कथाच आहेत. इथे नको विषयांतर.
पण बघ म्हणजे, स्वयंचलित चारचाकी गाडीने जाऊनही मी इतका वैतागलो होतो, दमलो होतो, अन ते तसेच अंतर तुम्ही सायकलने पार केलेत..... कस्ले ग्रेट आहात तुम्ही. कौतुक वाटते तुमचे.

मनोज , छान लिहीले आहे
पण नेहमी पहिला भाग लिहून तू काय समर कँपला वगैरे जातो का काय , पुढचा भाग लवकर टाकत नाही ते Happy

लिंब्या. आंबेनळी घाटातून प्रवास हा आजही वैताग आणतोच.. पण कोकणातून परत येताना महाबळेश्वरला जायची हौस असल्याने किंवा जाताना महाबळेश्वरला जाऊन मग पुढे कोकणात जाऊया असा हट्ट असल्यामुळे कैक वेळा त्या रस्त्यावरुन प्रवास केला आहे..

हिम्या, मी वरंध रात्रीचा धोक्याचा म्हणुन बरेच वेळा परततानाही आंबेनळी वापरलाय..
पण काही म्हण, वैताग ड्रायव्हरला असू शकतो, गाडीत बाकीच्यांना (त्यांनी मानली अन समजली तर) निसर्गदृष्यांची पर्वणी असते.... परत जायला पाहिजे....