दुसर्या दिवशी संपूर्ण चढ उतारांचा वरंधा घाट आणि भोर ते पुणे हे फारसा चढ नसलेले तुलनेने अगदीच सवयीचे असणारे अंतर पार करावयाचे असल्याने दोघेही निवांत होतो. सावकाश उठून आवरायचे ठरवले.
बाहेर पडायला ८ वाजले.
आजच्या प्रवासाला सज्ज!

हॉटेल गावाबाहेर असल्याने आम्ही लगेचच महाडमधून बाहेर पडलो. NH17 चा छोटासा टप्पा पार करून वरंधा घाटाचा रस्त्याकडे वळालो.
महाड ते वरंधा गांव १२ किमी अंतर आहे आणि रस्ता अगदी सपाट आहे. कोठेही चढ नाही. फारशी वळणे नाहीत आणि काही अंतर हा रस्ता एका नदीशेजारून जात होता.. सकाळी अशा रस्त्यावरून सायकल चालवायला मजा येत होती.

अमित..

सकाळच्या कोवळ्या उन्हाने त्या परिसराला एक वेगळीच झळाळी मिळाली होती.

आजीबात हिरवळ नसल्याने कांही ठिकाणी रखरखाटही जाणवत होता.

वरंधा गावात थांबून एका ठीकठाक टपरीवर वडापाव आणि आम्लेटची ऑर्डर दिली व ते पोटात ढकलले.
वरंधा गावानंतर लगेचच घाट सुरू झाला..

वरंधा घाट हा पसरणी किंवा खंबाटकीच्या तुलनेत पसरलेला घाट आहे, उंची हळूहळू वाढत जाते आणि खूप अंतर पार करावे लागते.
मला या दरम्यान "सॅडल सोअर" चा त्रास सुरू झाला होता. सीटवर सलग जास्तीकाळ बसणे शक्य होत नव्हते. बहुदा सायकलच्या सीटची उंची बदलल्याचा परिणाम असावा. काल थोडा त्रास जाणवला होता परंतु इतका वाढेल याची कल्पना नव्हती आणि आज दिवसभर सायकल चालवायची असल्याने हा त्रास वाढत जाणार याची जाणीव झाली.
हळूहळू माझ्या ब्रेकचे प्रमाण वाढू लागले आणि वेळही जास्त जावू लागला. अमित सोबत होताच. एके ठिकाणी चढावर अचानक ४ / ५ कुत्री मागे लागल्याने मी त्याही अवस्थेत भरभर पुढे गेलो.
चढाचा रस्ता.. सायकल चढवताना आलेला थकवा.. नुकतेच वाढू लागलेले ऊन.. आणि अव्याहतपणे भुंकत पाठीमागे पळणारा श्वानचमु... %^$%#%
घाट चढतच होतो... अचानक एके ठिकाणी रस्ता एकाच भागामध्ये वळणे घेत वर जात होता व तेथे एक घर होते. त्या घरातली चिल्लीपिली मुले "ए सायकऽऽल" "सायकलवालंऽऽ" असा आवाज देवू लागली. त्यांचा आवाज आणि हाक मारण्याची मजा घेत आम्ही सायकल दामटत होतो. एक वळणानंतर रस्ता त्यांच्या घरासमोर आला. इतका वेळ परसातून आणि घराच्या आजुबाजूने आवाज देणारी दोन मुले आता अंगणात येवून धीटपणे टाटा करत होती. 
अमितने त्यांना चॉकलेट दिले आम्ही पुन्हा सायकलवर स्वार होवून घाट चढवायला सुरूवात केली.
टळटळीत उन्हात घाट चढत होतो. वाटेत अनेक लोक हात दाखवून जात होते. एक जण "अरे झोपा घरी जावून" असा उपदेशही करून गेला. मला होणार्या त्रासाची तीव्रता वाढू लागली होती. माझा वेग अत्यंत कमी झाल्यने अमित पुढे गेला. बराच वेळ अशीच रडतखडत सायकल चालवल्यानंतर अचानक शिवथरघळीचा वरंध्यातला फाटा दिसला. "आता घाट संपत आला..!!!" याची जाणीव झाली आणि शेवटच्या टप्प्यातला खडा चढ + हेअरपीन प्रकाराची चार वळणे एकत्र आहेत या कल्पनेने मी दम लागण्याआधीच विश्रांती घ्यायला सुरूवात केली. त्या टप्प्यामध्ये अगदी जवळजवळच्या झाडांच्या सावलीमध्ये मी दोन तीनदा थांबलो. या दरम्यान मी आमच्या ग्रूपवर "वरंधा चढल्यावर बहुदा मी राईड संपवेन व एखादा टेम्पो बघेन" असाही मेसेज टाकून ठेवला. त्याला सगळ्यांचे "अरे काही होत नाही.. Give up करू नको" असे रिप्लाय येवू लागले..
शेवटी हिय्या करून सायकलवर बसलो, न थांबता हा संपूर्ण रस्ता पार करायचे ठरवले. सुरूवातीची वळणे, चढ आणि कावळ्यागडाजवळचा रस्ता हे सगळे न थांबता पार करून जेथे अमित थांबला होता तेथे पोहोचलो.
उजव्या कोपर्यात एक गांव आणि रस्त्याचे तीन टप्पे दिसणारा अप्रतीम फोटो. (सौजन्य - अमित M)

दोघांनी प्रत्येकी तीन ग्लास ताक संपवून घाट संपल्याचा आनंद साजरा केला. 
तेथे थोडावेळ बसलो. विश्रांती घेतली.
"आता उतार आहे ना भोर पर्यंत?" या आमच्या प्रश्नाला ताकवाल्या मामांनी "त्यो टॉवर दिसतोय तेथपत्तुर चढ आहे. मग सपाटीचा रस्ता आहे" असे सांगीतले.
अतीव करूणेने आम्ही एकमेकांकडे पाहिले. कारण तो टॉवर आमच्यापासून बरोब्बर तिसर्या डोंगरावर दिसत होता. अजून चढ संपला नव्हताच. दोन डोंगर पार करायचे होते आणि आम्ही उगाचच घाट सर झाल्याचा आनंद वगैरे साजरा केला होता. आता चढ सुरू होणार होता त्यात भर पडली खराब रस्त्याची! रस्ता इतका खराब होता की आम्ही शांतपणे चालत जायला सुरूवात केली. या ठिकाणी पंक्चर वगैरे प्रकार खूप वेळखाऊ ठरले असते.

थोड्या वेळात चांगला रस्ता लागला. आम्ही पुन्हा सायकलवर बसलो. अमित पुढे गेला. मी रमत गमत घाट चढवू लागलो मध्ये मध्ये खूप कंटाळा येवू लागला म्हणून येणार्या दुचाकींना "अजुन किती चढ आहे?" असे विचारायला सुरूवात केली. "हे काय हे वळण झाले की चढ संपला", "लै आहे.. ५ / ६ किलोमीटर तरी", "१०-१५ मिनीटात पोचाल" अशी एकमेकांशी काहीही संबंध नसणारी उत्तरे मिळत होती. आणखी थोडा वेळ सायकल चालवल्यानंतर एका सावलीत थांबलो तर अगदी पाचेक मिनीटांच्या अंतरावर एक केशरी ठिपका पुढे सरकताना दिसला. अमित इतक्या जवळ आहे या उत्साहात मी लगेचच पुन्हा त्याचा पाठलाग सुरू केला. आता बहुदा घाट संपत आला असेल याची जाणीव होत होती. वाटेत एक काका आणि त्यांचा छोटा मुलगा गाडीवर येत होते. मला बघून थांबले "तुमचा पार्टनर पुढे थांबला आहे, घाट संपलाच आहे आता" असा अमितने दिलेला निरोप मला दिला व निघून गेले.
घाट संपला एकदाचा.. या फोटोमध्ये रस्त्याचा शेवट दिसत आहे तेथे घाट संपल्याचा आनंद साजरा केला होता

फायनली वरंध्याच्या घाटमाथ्यावर पोहोचलो होतो. तेथे असलेल्या एका झोपडीवजा टपरीमध्ये बसकण मारली व गार पाणी, भजी, सरबत असा कार्यक्रम सुरू झाला.
टपरीवजा झोपडीशेजारी विश्रांती घेणार्या सायकली...

तेथे ताजेतवाने होवून वरंधा उतरायला सुरूवात केली. पण हा आनंद लगेचच मावळला. किमान १० / १२ किमी सलग उतार असेल असे वाटले होते परंतु हा उताराचा रस्ता लगेचच संपला व छोटे छोटे चढ सुरू झाले.
आता मात्र मला सायकलींग करणे अशक्य वाटू लागले. उन्हाचा प्रचंड तडाखा जाणवत होता आणि एकदम बेभरवशाचा रस्ता. चढ, उतार, वळणे कशीही येत होती. एखादा उतार उत्साहाने उतरल्यानंतर समोर मोठाले चढ उभे ठाकलेले असायचे. मी जमेल तशी सायकल चालवत होतो, थोडे अंतर चालत.. थोडे सायकलने असे पार करत होतो.
वरंधा घाटात अशा अनेक फ्रेम मिळत होत्या... निव्वळ अप्रतिम..!!!!

अमित बराच पुढे गेला होता. मी दीड दोन तास हळूहळू सायकल चालवल्यानंतर भोर च्या अलिकडे १०/१५ किमी अंतरावर एका टेम्पोमध्ये सायकल टाकली व भोरला पोहोचलो. वाटेत अमित भेटला. तोही थोड्या वेळात भोरला येवून पोहोचला.
तेथे भरपूर उसाचा रस प्यायलो. शिरवळ रस्त्याने हायवे गाठला (मी टेम्पोने; अमित सायकलने) आणि तेथे राईड संपवली. आम्ही शिरवळ ते पुणे अंतर अशाच एका टेम्पोने पार केले.

या राईडमध्ये अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या.
याआधीच्या महाबळेश्वर राईडपेक्षा ही राईड सोपी गेली.
सलग तीन दिवस १५० किमी सायकलींगची तयारी करताना नक्की काय करायला हवे याचे व्यवस्थीत धडे मिळाले. (हे आमचे एक "टारगेट" आहे..)
जवळचे पाणी संपण्यासारख्या साध्या साध्या चुका पसरणी व वरंधा घाटामध्ये झाल्या.
ही राईड भोर पर्यंतच केली असल्याने आता पुन्हा हाच रूट पुणे ते पुणे करण्याचे आव्हान समोर आहेच.
ताम्हिणी, वरंधा आणि पसरणी-आंबेनळी घाटानंतर आता कुंभार्ली आणि अंबा घाट ही खुणावत आहेत.
भेटू पुन्हा.. अशाच एका राईडनंतर.. 

(समाप्त)
मस्त रे ! पुराशु.
मस्त रे !
पुराशु.
छान सायकल रपेट. वॄत्तांत आणि
छान सायकल रपेट. वॄत्तांत आणि प्र.चि. झकास.
मस्तच
मस्तच
मस्त लिहिलंय्स पुराशु
मस्त लिहिलंय्स
पुराशु
न कंटाळता, इथे दिसतील अशा
न कंटाळता, इथे दिसतील अशा प्रकारे फोटो दिल्याबद्दल धन्यवाद.
मस्त वर्णन लिहीलय. वरंध घाटातुन अनेकवेळा बाईक/सुमोने गेलो आहे..... वळण अन वळण परिचयाचे आहे. डोळ्यासमोर उभे राहिलेच, शिवाय फोटो आहेतच.
जिथे तुम्ही घाट संपला म्हणून सेलिब्रेट केलेत, त्यापेक्षा कितीतरी चढ पुढे शिल्लक होता.
बाकी हा रस्ता "सायकलिंग" करता तर अतिशय गचाळ आहेच, शिवाय बाईक/फोरव्हिलर करताही भिक्कार आहे. खास करुन भोर ते वरंध माथा हे अंतर. व वरंध माथा ते मधिल देऊळ.
तुमच्या वर्णनामुळे स्फुर्ती मिळत्ये.... असे करता येऊ शकते, किमान इतके तरी नक्कीच समजते आहे. करीन की नाही माहित नाही.
झकास वर्णन ...... एकूण चार
झकास वर्णन ...... एकूण चार घाटांचे सौंदर्य आणि प्रवास समोर मांडला आहे.
सुंदर वर्णन आणि फोटो.
सुंदर वर्णन आणि फोटो.
सहिच ...अभिनन्दन !!
सहिच ...अभिनन्दन !!
छान वर्णन आणि फोटो.
छान वर्णन आणि फोटो.
छान ,,,,
छान ,,,,
मस्तच ! पुढच्या राईडसाठी
मस्तच ! पुढच्या राईडसाठी शुभेच्छा ! आता मनाली लेह मनावर घ्या.
झकास रे...तुम्हाला हे घाट
झकास रे...तुम्हाला हे घाट चढावेसे वाटले याबद्दलच कौतुक. कसला खतरनाक फोटो आहे तो वळणांचा.....
हॅट्स ऑफ
हॅट्स ऑफ >>>> +१००
हॅट्स ऑफ >>>> +१००
मनोज.. झकास वर्णन.. फोटो पण
मनोज.. झकास वर्णन.. फोटो पण मस्त आलेत..