भूमी अधिग्रहण वटहुकूम २०१४

Submitted by भरत. on 24 February, 2015 - 23:02

''लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालविले लोकांचे राज्य!'' भारतावर दीडशे वर्षे राज्य करणारे इंग्रज फक्त शासक होते. त्यांनी लोकांचे राज्य लोकांसाठी नाही चालविले. भारत ही वसाहत स्वतःच्या (इंग्लंड) देशाच्या प्रगतीसाठी वापरली.
१८९४ चा जमीन अधिग्रहण कायदा हा असाच त्यांच्या सोयीचा कायदा.
या कायद्यान्वये “Whenever it appears to the Government the land in any locality is needed or is likely to be needed for any public purpose or for a company, a notification to that effect shall be published in the Official Gazette…”
म्हणजे आले सरकाराचिये मना , तिथे कुणाचे चालेना.
सरकारला वाटलं की एखाद्या सार्वजनिक किंवा खाजगीकार्याकरता जमीन पाहिजेय, सरकारी गॅझेटात तसे छापून आणा की लगेच जमीनमालकांनी जमीन दिली पाहिजे.

वेगवेगळ्या औद्योगिक प्रकल्पांना होणारा स्थानिक विरोध, धरणे- सैनिकी प्रकल्प यांनी विस्थापित होणार्‍या जनतेचे प्रश्न, धाकदपटशा आणि लाचखोरीने होणारे काही अधिग्रहित प्रकल्प आणि विकासकामांसाठी लागणारा वेळ या सगळ्यांमुळे भारतभर या १८९४ च्या कायद्यात बदल होण्याची गरज निर्माण झाली.
या संदर्भाने कायद्यात थोडीबहुत दुरुस्ती करणारे एक विधेयक २००७ साली मांडण्यात आले पण २००९ च्या निवडणूकांच्या धामधुमीत हे बिल वाहून गेले. नव्या सरकारने परत २०११ साली हे विधेयक नव्याने आणले. सरकारने विधेयक मांडायचे, विरोधकांनी त्यात काही उणीवा दाखवायच्या, समाजकारण्यांनी राजकारण्यांनी धरणे धरायचे, मोर्चे काढायचे, मग प्रस्तावित विधेयकात सरकारने काही बदल करायचे, पुन्हा पुढच्या अधिवेशनात विधेयक मांडायचे . हा खेळ २ वर्षे रंगला.
अखेर २०१३ च्या शेवटच्या अधिवेशनात ह्या विधेयकाला कायद्याचे स्वरूप मिळाले.
मूळ विधेयकात तोपर्यंत तब्बल १५७ सुधारणा झाल्या होत्या.
भारतात प्रथमच हा 'रास्त मोबदला आणि पारदर्शी प्रक्रिया कायदा' THE RIGHT TO FAIR
COMPENSATION AND TRANSPARENCY IN LAND ACQUISITION, REHABILITATION
AND RESETTLEMENT 2013

अर्थात : भूमी अधिग्रहण, पुनर्वसन व पुनर्व्यवस्थापनात योग्य भरपाई व पारदर्शकतेच्या हक्काचा कायदा.

या कायद्यात काही बदल घडवून आणण्यासाठी मोदीसरकारने ३१ डिसेंबर २०१४ रोजी एक वटहुकूम जारी केला.

बदललेल्या तरतुदींचे मूळ रूप आणि त्यात केलेले बदल पुढीलप्रमाणे :

१) मूळ कायद्यात पायाभूत सुविधा (infrastructure) या संकल्पनेतून खासगी इस्पितळे , खासगी शिक्षणसंस्था आणि खासगी हॉटेल्स जाणीवपूर्वक वगळली होती. म्हणजेच हा कायदा अशा प्रकल्पांना लागू नव्हता. वटहुकुमाद्वारे खासगी शिक्षणसंस्था व खासगी इस्पितळांचा कायद्याच्या तरतुदीत समावेश करण्यात आलेला आहे.

२) मूळ कायद्यात जिथे जिथे private company असा उल्लेख होता तिथेतिथे private entity असा बदल केला गेला आहे. म्हणजे हा कायदा व त्याचा लाभ खासगी क्षेत्रातल्या कंपन्यांनाच नाही तर व्यक्ती व अन्य आस्थापनांनाही लागू होईल.

३) मूळ कायद्यानुसार जिथे खासगी कंपन्या त्यांच्या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहित करणार होत्या तिथे किमान ८०% प्रकल्पबाधितांची पूर्वसंमती आवश्यक होती. पीपीपी अर्थात खासगी व सार्वजनिक क्षेत्रांच्या सहयोगाने राबवल्या जाणार्‍या प्रकल्पांसाठी हा आकडा ७०% होता.
वटहुकुमाद्वारे अनेक प्रकारच्या प्रकल्पांसाठी अशा पूर्वपरवानगीची , सहमतीची गरज राहणार नाही. यात गरिबांसाठी व माफक किंमतीतील गृहप्रकल्प, औद्योगिक पट्टे अर्थात industrial corridors , पायाभूत सुविधा देणारे प्रकल्प तसेच पीपीपी प्रकल्पांचा समावेश आहे, ज्यासाठी ८०/७० % प्रकल्पग्रस्तांच्या पूर्वसहमतीची गरज नाही.

४) वटहुकूमानुसार पुढील प्रकारांत मोडणार्‍या प्रकल्पांसाठी भूमी अधिग्रहण करताना शासन सोशल इम्पॅक्ट अ‍ॅनालिसिसमधून तसेच अन्नसुरक्षा सदर्भाने असलेल्या जमीन अधिग्रहित करण्यासंबंधीच्या नियमांतून सूट घेऊ शकेल.
अ) देशाच्या संरक्षणासाठी, संरक्षणसिद्धतेसाठी , संरक्षण-उत्पादनांसाठीचे प्रकल्प
आ) ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा , यात विद्युतीकरणही आले.
इ) परवडणार्‍या दरातील घरे व गरिबांसाठी घरे
ई) औद्योगिक पट्टे Industrial corridors
उ) पायाभूत सुविधा व सामाजिक पायाभूत सुविधांकरिता खासगी व सार्वजनिक क्षेत्रांच्या सहयोगाने राबवले जाणारे(PPP) असे प्रकल्प ज्यांत जमिनीची मालकी शासनाकडेच राहील. (यात मुख्यत्वे वैद्यकसुविधा व शैक्षणिक संस्था)

इथे सोशल इम्पॅक्ट अ‍ॅनालिसिस तसेच अन्न सुरक्षेसाठी केलेल्या नियमांची थोडक्यात माहिती पाहू.

मूळ कायद्याच्या चॅप्टर २ मध्ये ’सोशल इम्पॅक्ट अ‍ॅसेसमेंट स्टडी” संबंधाने तरतुदी आहेत. त्या अशा :
शासनासमोर सार्वजनिक हितासाठी भूमीअधिग्रहणाचा प्रस्ताव येईल तेव्हा शासन त्या त्या भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे(पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका) मत विचारात घेईल आणि त्यांना बरोबर घेऊन त्या त्या भागातील सोशल इम्पॅक्ट अ‍ॅसेसमेंट स्टडी हाती घेईल. सहा महिन्यांत हा अभ्यास पूर्ण करून त्याचे रिपोर्ट्स प्रसिद्धीस दिले जातील. या अभ्यासाअंतर्गत येणार्‍या गोष्टी
१) भूमी अधिग्रहण सार्वजनिक हितार्थ आहे वा नाही?
२) किती कुटुंबांवर त्याचा परिणाम होईल, त्यातली किती विस्थापित होतील?
३) परिसरातील स्थावर मालमत्ता , वसाहती व सार्वजनिक वापराच्या जागांवर होणारा परिणाम
४) जितकी भूमी अधिग्रहित करायचा प्रस्ताव आहे तितक्या जमिनीची खरेच गरज आहे का?
५) अन्यत्र प्रकल्प स्थापित करणे शक्य आहे का?
६) प्रकल्पाचे सामाजिक परिणाम , त्यांच्या निवारणात येणारा खर्च व प्रकल्पापासून होणार्‍या लाभाची तुलना
७) प्रकल्पबाधित भागातील जनतेची सार्वजनिक सुनावणी

सामाजिक परिणामांच्या अभ्यासावर आधारित या परिणामांच्या व्यवस्थापनाचा आराखडा बनवला जाईल. सामाजिक परिणामांचा अभ्यास करतानाच पर्यावरणावर होणार्‍या परिणामाचाही अभ्यास केला जाईल.

या रिपोर्टवर एका तज्ञ समितीकडून दोन महिन्यांत प्रकल्पासंबंधाने मत (कारणांसकट) मागवले जाईल. हे मत नकारात्मक असतानाही शासनाने प्रकल्प राबवायचे ठरवले त्यामागची कारणे लेखी नोंदवली जातील.

थोडक्यात भूमी अधिग्रहण करताना तपासावयाच्या बाबी :
१) प्रकल्प सार्वजनिक हितार्थ आहे.
२) प्रकल्पापासून होणारे लाभ हे दुष्परिणामांच्या व खर्चाच्या तुलनेत अधिक आहेत.
३) प्रकल्पासाठी शक्य तितकी कमीत कमी भूमी अहिग्रहित केली जावी.
४) आधीच अधिग्रहित केलेली पण वापराविना पडून असलेली दुसरी जमीन त्या परिसरात नाही, असेल तर ती या प्रकल्पासाठी वापरावी.

जिथे भूमी अधिग्रहित करण्याचा निर्णय होईल तिथे ज्याने विस्थापितांची संख्या; पर्यावरण आणि लोकांवरचे दुष्परिणाम लघुतम राहील अशी आणि इतकीच जमीन ताब्यात घ्यावी.

तातडीची गरज असेल तिथे (देशाचे संरक्षण, नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवलेली आणीबाणीची परिस्थिती) सोशल इम्पॅक्ट अ‍ॅनालिसिस न करता तीस दिवसांची नोटिस देऊन भूमी अधिग्रहित करायची तरतूदही आहे.

चॅप्टर ३ मध्ये अन्न सुरक्षा कायद्याच्या अनुषंगाने तरतुदी आहेत.
जलसिंचनाची सोय असलेली व एकापे़क्षा अधिक पिकांखालची शेतजमीन अपवादात्मक परिस्थिती वगळता अधिग्रहित करू नये. अशी शेतजमीन अधिग्रहित केली तर त्याच प्रमाणात जमीन शेतीसाठी तयार करणे किंवा त्यासाठीच्या खर्चाची तरतूद करणे. शेतीखालची कशाप्रकारची ,एकंदरित किती जमीन अधिग्रहित करता येईल याच्या राज्यवार वा जिल्हावार मर्यादा ठरवणे.
या तरतुदी रेल्वे, महामार्ग, मोठे रस्ते, सिंचनासाठीचे कालवे, विद्युतवाहिन्या इ.साठी लागू असणार नाहीत.

५) २०१३ च्या कायद्यानुसार त्याही आधीच्या म्हणजे १८९४ च्या कायद्यानुसार अधिग्रहित केल्या जात असलेल्या जमिनींची प्रकरणे जिथे पूर्णत्वास गेलेली नाहीत तिथे नव्या कायद्यानुसार भरपाई देणे बंधनकारक केले आहे. अंतिम निर्णय होऊनही पाच वर्षांहून अधिक काळात जमिनीचे हस्तांतरण झाले नसेल किंवा भरपाई अदा झाली नसेल तिथे ती नव्या कायद्यानुसार दिली जाईल. हाच नियम जिथे बहुतांश भूधारकांना (जुन्या कायद्याने) भरपाई दिली गेली नसेल तिथे ती सगळ्याच भूधारकांना नव्या कायद्याने दिली जाईल.

वटहुकुमानुसार पाच वर्षे मोजताना कोर्ट -लवादांकडे प्रकरण प्रलंबित असतानाचा किंवा भरपाई कोर्टात/वेगळ्या खात्यात जमा केलेली असल्यास तो कालावधी धरला जाणार नाही.

६) मूळ कायद्यानुसार : शासनाच्या एखाद्या विभागाने या कायद्याच्या अंमलबजावणीत अपराध केला तर विभागप्रमुखाला जबाबदार धरून तो कारवाईस आणि शिक्षेस पात्र असेल.

वटहुकुमानुसार : क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या कलम १९७ प्रमाणे योग्य त्या वरिष्ठ अधिकार्‍याची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय न्यायालयाला अशा अपराधाची दखल घेता येणार नाही.

(अर्थात योग्य त्या वरिष्ठ अधिकार्‍याची परवानगी असल्याशिवाय अशा चूक करणार्‍या खात्याविरुद्ध न्यायालयाकडे तक्रार करता येणार नाही.)

७) मूळ कायदा : अधिग्रहित केलेली व ताब्यात घेतलेली जमीन पाच वर्षे वापराविना पडून राहिली तर ती जमिनीच्या मूळ मालकाला परत करावी वा सरकारी लॅंड बॅंकेत वळती करावी.
वटहुकूम : पाच वर्षांऐवजी प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी निर्धारित केलेला कालावधी किंवा पाच वर्षे, यापैकी जे नंतर होईल ते. अर्थात प्रकल्प राबवण्यासाठी किमान पाच वर्षे व त्यापेक्षा जास्त, जितका ठरवला जाईल तितका काळ मिळेल.

८) भारतात जमीन अधिग्रहण निरनिराळ्या कायद्यांअतर्गत होतं , जसे रेल्वेसाठी, अणु उर्जेसाठी, मेट्रोसाठी. या सगळ्या कायद्यांखाली होणार्‍या भूमी अधिग्रहणालाही या कायद्याचे नियम सरकारने ठरवलेल्या तारखेपासून लागू होतील.कायदा अंमलात आल्यापासून एका वर्षात सरकारने जाहीर करणे अपेक्षित आहे (होते) वटहुकूमानुसार १ जानेवारी २०१५ पासून या कायद्याचे नियम लागू होतील.
या कलमाचा उद्देश भूमीअधिग्रहण कायद्यात सांगितल्यापेक्षा कमी भरपाई अन्य कायद्यांखाली दिली जाऊ नये असा दिसतो.

९) मूळ कायदा : कायद्याच्या अंमलबजावणीत येणार्‍या अडचणींच्या निवारणार्थ केंद्रशासन योग्य त्या तरतुदी करेल किंवा आदेश देईल. पण असे कायदा लागू झाल्यापासून दोन वर्षांपर्यंतच करता येईल.
वटहुकूम : दोन वर्षांऐवजी पाच वर्षांपर्यंत करता येईल.

चर्चेचा परिघ : कायद्यातील बदललेल्या कलमांचा नक्की परिणाम, त्यांची अपरिहार्यता समजून घेणे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मयेकर, अल्पना व इतर जाणकारांनी अभ्यास करुन लिहिलेल्या माहितीची वाट बघत आहे.
इब्लीस, ते कबीर फक्त भांडतानाच दिसतात की हो आणि खदाखदा हसत असतात. Sad ... पण त्यांनीही चांगली माहिती लिहिल्यास चांगलेच होईल.

>>काही हजारो लोकांनी कुठल्यातरी कुणाच्यातरी फायद्यासाठी देशोधडीला लागावे ही अपेक्षा किती भयंकर आहे. <<
माझ्या माहितीनुसार नर्मदा प्रकल्प भारत सरकारचा, भारतीयांच्या भविष्यातील फायद्यांकरता आहे. आता भारतातील लोकसंख्येची घनता पहाता कोणी-ना-कोणी, कुठे-ना-कुठे अशा प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्समुळे विस्थापित झाले/होणार आहेत. न्हणुन असे प्रोजेक्टस राबवायचेच नाहित अशी भुमिका सरकारने घ्यावी का?

विस्थापितांना योग्य असा मोबदला मिळायलाच हवा पण प्रोजेक्ट मुळे विस्थापित होतात म्हणुन प्रोजेक्ट करुच नये हे भविष्याच्या दृष्टीने महाभयंकर आहे...

नीधप,

>> काही हजारो लोकांनी कुठल्यातरी कुणाच्यातरी फायद्यासाठी देशोधडीला लागावे ही अपेक्षा किती भयंकर आहे.

काही लोकांच्या मते ही अत्यंत आधुनिक व सुंदर संकल्पना आहे. हिलाच प्रगती (किंवा क्रांती) म्हणतात. हिचा अतिरेक झाला की त्यास विशुद्ध भांडवलशाही म्हणतात. अशा भांडवलशाहीतून सत्तेची एकाधिकारशाही सुरू झाली की त्यास साम्यवाद म्हणतात.

आ.न.,
-गा.पै.

इथेच सोशल इम्पॅक्ट अ‍ॅनालिसिस महत्त्वाचा आहे. प्रकल्पापासून होणारा एकंदरित लाभ व त्यामुळे विस्थापितांची होणारी हानी, त्यांच्या पुनर्वसनाचा खर्च यांची तुलना यात होणार होती.
तीच तरतूद अनेक प्रकल्पांसाठी शिथिल केली आहे.

राज नर्मदा प्रोजेक्ट सुरू होऊन किती वर्षे झालीत? आज आपण नर्मदा अन सरदार सरोवराच्या भूतकाळात नाही आहोत.
१९९७ साली प्रकल्प सुरू झाला म्हणे. किती वर्षे झालीत? कुणाचे अन किती फायदे झालेत या प्रकल्पाने?

"भविष्य" म्हणजे नक्की कधीच्या भविष्यातल्या कोणत्या फायद्यांबद्दल बोलतो आहोत आपण? प्रोजेक्ट करू नये हे कुणी म्हटलंय? पण त्यासाठी इम्पॅक्ट स्टडीही करायचा नाही?

महोदय, भारतात या. तिथे अमेरिकेत हे सगळे स्टडीज, तुम्ही करायचे नाही म्हटलात तरी केले जातात, म्हणून तुम्ही सुखी आहात. तुमच्या घरातून तुम्हाला सरकारी कृपेने विस्थापित व्हायची वेळ आली, की मग बोलू Happy

हे असे इस पार या उस पार नसते.
१. विस्थापितांचे पुनर्वसन आधी मग प्रोजेक्ट हे आजवर कधी घडलेले नाही आणि आताही घडण्याची शक्यता नाही.
२. मोठे प्रोजेक्ट हाच विकास, त्यानेच फायदा यात खरंच किती तथ्य आहे? आहेच का? पर्याय नाहीतच का? याची उत्तरे शोधल्याशिवाय कसे पुढे जाता येईल?

पैलवान, मी तुमच्याइतकी हुशार नसल्याने तुम्ही काय म्हणता ते मला समजत नाही. तसेच मी डाव्या किंवा उजव्या कुठल्याच बाजूला नसल्याने ही विशेषणे मला नीटशी समजत नाहीत.
मी जेवढं लिहिलंय तेवढंच मला समजतं. धन्यवाद.

इब्लीस, ते कबीर फक्त भांडतानाच दिसतात की हो
<<
अँग्री यंग मॅन आहेत ते. थोडी आरडाओरड करत असतात, पण मुद्देही मांडतात कधीकधी. त्यांच्या छान पोस्टीही आहेत की काही. जवानी का जोश म्हणून थोडा काणाडोळा करा की Wink

नीधप,

>> मी डाव्या किंवा उजव्या कुठल्याच बाजूला नसल्याने ही विशेषणे मला नीटशी समजत नाहीत.

सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर भांडवलशाही आणि साम्यवाद एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

आ.न.,
-गा.पै.

>>पण त्यासाठी इम्पॅक्ट स्टडीही करायचा नाही? <<
नविन कायद्यातली हि तरतुद नक्किच खटकणारी आहे आणि ती बदलली गेली पाहिजे. परंतु नर्मदा प्रकल्पाच्या बाबतीत इंपॅक्ट स्टडी झाला असेलच ना?

बायदवे, अमेरिकेत माझ्यासमोर घडलेली उदाहरणं आहेत - रस्ता रुंदिकरणात लोकांची घरं काउंटीने विकत घेतलेली आहेत; अर्थात वाजवी दाम देऊन.

राज,
रस्ता रुंदीकरण करताना अक्खी घरं चाकं लावून रिहॅबिलिटेट केलेला एक व्हिडिओ पाहिल्याचं आठवतंय. आदिवासींच्या पुनर्वसनाचं काय? कमाल आहे यार!

मोठे project करायचे तर शेतकरी विस्थापित होणारच.

गिरगाव, दादर पण शेतकर्याना विस्थापित करुनच उभे केले आहे. हल्लीचे उदाहरण द्यायचे तर पुर्ण नवीमुम्बई शेतकीरी / मछ्छीमाराना विस्थापित करुन वसवली आहे. जमिन मिळवताना मला नाही वाटत के शेतक्र्याना त्याना हवी असलेलीए किंमत मिळाली असेल. आदिचे माहित नाही पण सानपाडा मध्ये शेतकरी ४००००/ एकर मागत होते आणि सिडाकोने २७००० एकर दिले होते. तिच जागा विकसित करुन ८०० रु / चौ फुट नी विकली होती. ( १ एकर = ४४,००० चो फुट. आम्ही तिकडे जागा घेतली होती. नेरुळ वरुन जाताना एका माजी शेतक्र्याला पत्ता विचारला होता तेव्हा त्याने ही माहिती दिली होती).

पण त्याच जागेत आज करोडो लोकाचा (मुंबई, नवी मुंबई घरुन) राहाण्याचा आणि पोटापाण्याचा प्रश्न सुटला आहे. शेती जर चालु ठेवली असती तर फक्त काही हजार् लोकाचा प्रश्न सुटला असता.

जर शेतक्र्याची जमिन सरकार्नी नाही घेतली तर बिल्डर , माफिया शेतकर्याची जमीन घेउन बकाल शहरे बांधतात उदा दिवा, डोंबिवली, मिरा रोड, विरार वगैरे. ह्या शहरापेक्षा नवी मुम्बई सारखी शहरे विज, पाणि, रस्ते ह्यासारख्या सुविधा नक्कीच चांगल्या देउ शकतात. दिवा, विरार सारख्या ठिकाणि पण शेतक्र्याला काही नाही मिळाले. बिल्डर , माफिया नी साम, थोडे दाम , दंड आणि भेद वापरुन हकलुन लावले होते.

त्यामुळे शेतकर्याची जमिन घेउन योग्य मोबदला देउन सरकार्नी घेउन शहरे विकासित करणे योग्य आहे असे वाटते. पण शेतक्र्याचे जमीन घेउन देशाच्या जावयाला आंदण देणे चुकीचे आहे. ती जागा फक्त घरे, शाळा, रस्ते, औद्योगिक ईमारती (ज्यात भरपुर लोकाना रोजगार मिळेल, infrastructure (power plant, water plant etc). कारणासाठी वापरली गेली पाहिजे.

आजुनही बरेच मुद्दे आहेत. जसा वेळ मिळेल तसे लिहिन.

पण त्याच जागेत आज करोडो लोकाचा (मुंबई, नवी मुंबई घरुन) राहाण्याचा आणि पोटापाण्याचा प्रश्न सुटला आहे. शेती जर चालु ठेवली असती तर फक्त काही हजार् लोकाचा प्रश्न सुटला असता.>>>>>

नवी मुंबई ठाणे जिल्ह्या मध्ये येते जिथे रस्ते, विज, पाणि मुबलक आहे.आणि त्याच ठाणे जिल्ह्यात कुपोषणा मुळे
हजारो बालके मृत्यूमुखी पडतात.किती हा विरोधाभास.

नर्मदा आंदोलन - शेतकर्याचे विस्थापन - त्यांच्या मुलांची शिक्षणाची परवड !!! ह्म्म्म सार काही अस्वस्थ करणार आहे. श्रामोबरोबर कामाच्या निमित्ताने संबंध आलेला आहे. आश्रमशाळेत शिकणारी ती मूल पाहिली की महासत्ता व्हायची खरच पात्रता आहे का असा प्रश्न पडतो . इथे बसून विस्थापन शब्द लिहिन सोप आहे. त्याचे चटके बसलेली माणस पाहिली की अस्वस्थ व्ह्यायला होत Sad

एक्झॅक्टली जाई!
तुम्ही विस्थापितांच्या जागेवर राहून सुखसोयी उपभोगणारे असाल तर विस्थापन कसे उपकारक आहे असाच प्रतिसाद देणार.
याऊलट स्वतः विस्थापित असाल /विस्थापितांसाठी काही काम केले असेल तर विस्थापनाचे तोटे कळतील.

साहिल, विकास नको, विस्थापन नको असे कुणी म्हणत नाही आहे.
मुद्दा विस्थापितांचे पुनर्वसन योग्य पद्धतीने झाले पाहिजे, एखादा प्रकल्प केवळ फायद्याच्या दृष्टीने न बघता त्याच्या तोट्यांचा, सामाजिक परिणामांचा योग्य विचार केला गेला जावा हा आहे.

साती,

असे असेल तर कायद्याला विरोध न करता विस्थापितांचे पुनर्वसन योग्य पद्धतीने कसे करता येईल त्यावर संसदेत चर्चा का होत नाही आहे.

साहिल, चर्चा का होत नाही आहे तेही या धाग्याच्या हेडरमध्ये किंवा एकदा हेडर लिहून झालं की आमच्या प्रतिसादात येईलच.
पण एक लक्षात घ्या की २००७ला मांडलेले विधेयक २०१३ ला संमत झाले तेव्हा सहावर्षे प्रत्येक अधिवेशनात त्यावर बर्याचदा प्रचंड चर्चा, सुधारणा, बदल झालेत.

मला सर्व प्रतिक्रिया/प्रतिसाद वाचता आले नाहीत.
भरत व सहकारी जेव्हा प्रत्येक क्लॉजचा तुलनात्मक किचकट अभ्यास करून नेमके तथ्य मांडतील तोवर मी थांबेन.
तरी... ही पोस्ट, यावर थोडी अवांतर प्रतिक्रिया देतो..
>>>> मला पडलेला प्रश्न - संसदेत बहुमत असताना विधेयक मांडून, चर्चा होवून कायदा/ कायद्यात बदल असे न करता वटहुकूमाचा वापर का करण्यात आला. राष्ट्रीय सुरक्षेसारखी आणिबाणीची परीस्थिती असेल तर ठीक आहे पण हे म्हणजे वटहुकूमाच्या अधिकाराचा गैरवापर वाटतो. ही वेळ तुम्ही कुणाचे समर्थक आहात याचा विचार करण्याची नाही तर जे काही सुरु आहे ते सामान्य नागरीकांसाठी उद्या योग्य असणार आहे का याचा विचार करावा. <<<<
वटहुकूम म्हणजे कोणा परकीय इंग्रजबिन्ग्रज वा औरंगजेबादी राजांनी पाठवलेला हुकुमनामा नसून, या देशाच्या सर्वोच्च स्थानी स्थित राष्ट्रपतींनी त्यांना गरज व मसुदा "पटल्यानंतरच" काढलेला हुकुम आहे, ज्यास माझ्या अल्प माहितीप्रमाणे ज्यावर नंतर संसदेत चर्चा/निर्णय होतो/होऊ शकतो. (चू.भू.द्या.घ्या.).
पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते असलेले श्री प्रणब मुखर्जी, स्पष्टोक्तिबद्दल प्रसिद्ध, स्वतःची अभ्यासपूर्ण मतांबाबत आग्रही असलेले सध्याचे "आपले" हे सर्वोच्च राष्ट्रपती नक्कीच "रबरस्टॅम्प" सारखे काम करीत नसणार याबाबत दूमत नसावे. तेव्हा वटहूकूम काढला म्हणजे अधिकाराचा गैरवापर केला असेल असे म्हणणे मला फारच धाडसाचे वाटते. निदान सध्याच्या राष्ट्रपतींबाबत तर नक्किच. कारण वटहुकूम राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनेच निघतो, पंतप्रधानांच्या नाही. पंतप्रधाने व मंत्रीमंडळ निव्वळ वटहुकुमाची विनंतीवजा मागणि करू शकते, व राष्ट्रपतींना तो वटहुकूम परत पाठविण्याचा "हक्क/अधिकार" असतो. याबाबत तपशीलात तरतुदी आहेत, आत्ता आठवत नाहीत.

असे काही सकाळच्या चहाबिस्किटाच्या बैठकीतल्यासारखे मत व्यक्त करण्या ऐवजी, आजवर एकूण किती वटहुकूम काय कारणाकरता काढले गेले, किती घटना दुरुस्त्या वटहुकुमाद्वारे केल्या गेल्या, याचा इतिहास अभ्यासणे रंजक ठरेल.

मुद्दा विस्थापितांचे पुनर्वसन योग्य पद्धतीने झाले पाहिजे, एखादा प्रकल्प केवळ फायद्याच्या दृष्टीने न बघता त्याच्या तोट्यांचा, सामाजिक परिणामांचा योग्य विचार केला गेला जावा हा आहे.>>>>> +१

ते विकासाच्या नावाखाली झालेल्या विस्थापितांचे पुनर्वसनाबाबतचे आपले शहरी नक्राश्रू गाळणे थांबवून, जरा या वास्तवाकडेही बघुयात.
पुण्यासारख्या शहरात, रस्तेसुधारणे अंतर्गत ज्या काही रस्तारुंदी वगैरे झाल्यात, तेथील पुढे दिलेले अडथळे इतकी वर्षे कोणत्या कायद्यांच्या तरतुदीनुसार जसेच्या तसे आहेत ते बघा...
१) युनिव्हर्सिटीकडून ब्रेमेन चौक मार्गे औंध हॉस्पिटलकडे जाताना ब्रेमेन चौकापुढे डाव्या हाताला रस्त्यात पोलिस चौकी आहे. तीच्या मुळे तेवढ्याच भागात रस्ता रुंदी झालेली नाही.
२) दापोडीकडून खडकीकडे जाताना खडकीबझार व खडकी स्टेशन या दोन फाट्यांच्या तिठ्ठ्यावरील सिग्नललगत डावीकडे काही वस्ती आहे, जीच्या मुळे रस्ता रुंदी रखडली आहे.

अशी असंख्य उदाहरणे आहेत, जिथे चालू कायद्यांचा आधार घेत घेत कालहरण होत आहे व सुधारणा होतच नाही.

विस्थापितांकरता योग्य भाव/वेळेत मिळावा म्हणून झगडावे, विरोध करावा की हा कायदा बीजेपि शासन काळात आलाय म्हणून विरोधाला विरोध करावा हे ज्याचे त्याने ठरवावे.

साती, तुमचे प्रश्न बरेचसे वैयक्तिक रोखाने आहेत, व त्याचे त्वरीत उत्तर देण्याची तितकी आवश्यकता भासली नाही म्हणुन उत्तर दिले नाही. योग्य वेळ येताच व वेळ मिळाला तर नक्कीच त्याची दखल घेऊन उत्तर देईन.

मुद्दा विस्थापितांचे पुनर्वसन योग्य पद्धतीने झाले पाहिजे, एखादा प्रकल्प केवळ फायद्याच्या दृष्टीने न बघता त्याच्या तोट्यांचा, सामाजिक परिणामांचा योग्य विचार केला गेला जावा हा आहे.>>+१.

पक्षीय राजकारण नेऊन चुलीत घातलं तरी गेली कित्येक दशकं भारतात हे चालूच आहे हे सर्वात आधी लक्षात घ्या. आता विरोध करणार्‍यांना या वटहुकूमामुळे का होइना जाग आलेली आहे ही सुदैवाची बाब.

आताच्या सरकारच्य वटहुकूमामुळे यांव होइल नी त्यांव होइल वगैरे चर्चा रोज ऐकत आहे. सुपामधले ओरडत आहेत, आम्ही ऑलरेडी जात्यामधून बाहेर पडलोय. आमची शेती धरनाच्या पाण्याखाली जाऊन वीस वर्षे झाली. सरकार अजून पैसा देत आहे. (आजवर केवळ एक हप्ता निघालाय. पुढचे निघताहेत) आमचं अख्खं गाव पाण्याखाली गेल्यानं आम्ही विस्थापित झालेलोच आहोत. पण आम्हाला "धरणग्रस्त" हा दाखला मिळू शकत नाही कारण, शेतजमीन पाण्या खाली गेली,म्हणजे नावावर शेती नाही, परिणामी आम्ही शेतकरी नाही. असला उरफाटा न्याय आमच्याबाबतीत गेली कित्येक वर्षे चालू आहे. कोर्टात तारीख पे तारीख. आता तर केसमध्येच कुणाला इंटरेस्ट राहिला नाही. यादरम्यान सरकारनं जमीन ताब्यात घेऊन धरण बांधून पूर्ण केलेले आहे. धरणामुळे आमच्याच आजूबाजूच्या गावांतल्या लोकांच्या शेतीचं काहीही भलं झालेलं नाही. उलट तीन चार साखर कारखाने उभे राहिले. त्यासाठी ऊस पिकवून जमीनीची वाट लावणे मात्र पद्धतशीर्रीत्या चालू आहे. इतर भाग आजही दुष्काळीच. म्हणजे त्या धरणामुळे नक्की कुणाचा फायदा झाला?

नंदिनी, तुमची कथा फारच दुर्दैवी आहे.
माझ्यामते याला, पाच पाच वर्षाकरता सत्तेवर येणारे मुठभर आमदार/खासदार निव्वळ जबाबदार नसून क्लासवन पासून क्लासफोर पर्यंतचे सडके प्रशासन जबाबदार आहे, व एकूण देशातील प्रशासकीय व्यवस्था जवळपास १५ कोटी संख्येची आहे, जी लोकं तुमच्या आमच्या आजुबाजुलाच "आम" आदमी म्हणुनच वावरताहेत. कुणाला कुठेतरी अडकवण्याकरता, कुठेही वरकमाई मिळविण्याकरता, प्रकरणे भिजत घोन्गड्याप्रमाणे चिघळत ठेवण्यात व त्याकरता नाना प्रकारच्या कायदेशीर पळवाटा शोधून "काड्या" करण्यात या लोकांचा कोणी हात धरू शकणार नाही.

माझ्यापुढचा प्रश्न असा आहे की मोदी सरकारने वटहूकूम तर आणवला, पण तो योग्य रितीने अंमलात आणण्याकरता पाटबंधारे/बांधकाम व अन्य अत्यंत बदनाम खात्यातील "आम आदमी" असलेल्या या "प्रशासनाला" वठणीवर कसे आणणार? त्यावरच याही सरकारचे यशापयश अवलंबून असेल.
अन हे वठणीवर आणायचा प्रयत्न केल्यास येत्या काही काळात वेगवेगळ्या निमित्ताने सरकारी आस्थापनांत डाव्यांकडून संप घडवले गेले तर मला नवल वाटणार नाही.

लिंबूटिंबू, आधीच्या कायद्यात असलेली चुकीचे कृत्य करणार्‍या सरकारी अधिकार्‍यावर कारवाई करण्याची तरतूद या वटहुकूमात पातळ केली गेल्याचे तुम्हीच लिहिले आहेत.

आधीच्या कायद्यातील सोशल इम्पॅक्ट अ‍ॅनालिसिस स्टडी अंतर्गत परिणामांचा विचार, त्यावर निर्णय व अंमलबजावणी या सगळ्यांसाठी कालमर्यादा घालून दिल्या होत्या.

डाव्यांकडून संप घडवले गेले तर मला नवल वाटणार नाही.>>> धागा आपल्याला हवा तसा वळवायचा याची हातोटी लिंबुभाऊंच्या ईतकी कुणालाच जमलेली नाही. Wink

कृपया इथे शहरी विरुद्ध विस्थापित वाद आणू नका. वेदना समजून घ्यायला कोणतेही लेबल लावण्याची किंवा लावून घेण्याची गरज नसते . फक्त माणूस असण पुरेसे आहे. विकास व्ह्यायला हरकत नाही. तो काळाच्या ओघात झालाच पाहिजे. विस्थापन ही एक अपरिहार्य बाब आहे. मात्र हे करताना विस्थापनाच पुनर्वसनही तितक्याच् काळजीपूर्वक झाल पाहिजे. सोशल इम्पेक्ट अससेस्मेंट इथे काम करते . दुर्दैवाने आपल्या देशात सरकारी पुनर्वसनाचा अनुभव वाईट आहे .

जो कायद्याला इतकी वर्ष पाठ्पुरवठा करुन बनला. पहिल्यांदाच शेतकर्‍याच्या हिताला जोपासणारा, त्याला प्राधान्य देणारे मुद्दे, नियम बनवले गेले. अर्थात हे सगळे कोणत्याही सरकारने राजीखुशीने बनवला नाही तर जनतेच्या दबावामुळे त्यांनी चांगला सक्षम कायदा बनवावा लागला.
या कायद्याचे सक्षम असणारे मुद्दे क्लॉज "बहुमताच्या जोरावर अध्यादेश" आणुन हटवले गेले शिथिल केले गेले. या गोष्टीला विरोध होत आहे. हे लक्षात घ्यावे. उगाच फुकाच्या बाता मारण्यापेक्षा विरोध का होत आहे याकडे बघा.

Pages