अ‍ॅक्टींग तोडली !

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 January, 2015 - 14:15

..
अ‍ॅक्टींग तोडली !
हा माझ्या वडीलांचा अत्यंत आवडता डायलॉग ..

त्यांची आवड म्हणजे अमिताभ !
जेव्हा तो त्याच्या स्टाईलमध्ये काही दमदार संवादफेक करायचा तेव्हा माझ्या वडिलांच्या तोंडून निघालेच पाहिजे.. अ‍ॅक्टींग तोडली !

पुढे मग मी आणि माझी आई, बरेचदा यावरून वडिलांची मस्करी करायचो ..
कोणी ओवरअ‍ॅक्टींग करत का होईना, पण जोशमध्ये काही संवाद फेकले की आम्ही मस्करीत सिरीअस होत म्हणायचो .. अ‍ॅक्टींग तोडली !

पुढे अक्कल आली तसे अभिनय कश्याशी खातात हे समजू लागले आणि खरोखरच अ‍ॅक्टींग तोडली सीन समजू लागले ..
ते कोणते ते माझे मी लिहेनच, तुमचेही तुम्ही लिहा.. याच धाग्यावर Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वीणा....

दिलीपकुमार यांच्या कारकिर्दीचा आणि क्षमतेचा तुम्ही छान आढावा घेतला आहे. हे एकमेव नाव असे आहे की त्यांच्याशी (म्हणजेच त्यांच्या अभिनय कौशल्याशी) पिढ्यानपिढ्या तुलना करत आल्याचे दाखले आहेत आपल्यासमोर. त्यांच्या तरुणपणातील चित्रपट कारकिर्दीकडे नजर टाकल्यास सहज लक्षात येते की त्यांचा अभिनयाच्याबाबतीत कुणाशीच सामना नसायचा. राज, दिलीप, देव अशी त्रिमुर्ती प्रसिद्ध होती. पण नंतरच्या पिढीतील जे कुणी अभिनेते म्हणून "सेकंड चॉईस" या नात्याने पडद्यावर येऊ लागले त्यावेळी त्याकाळातील प्रेक्षक त्यांची तुलना केवळ दिलीपकुमारच्या तोडीचा अशीच करत असत. "हा पुढचा राज कपूर....तो पुढचा देव आनंद" अशी चर्चा कुठे नसायची. पण दिलीपकुमार एक प्रकारे अभिनयाचे आयकॉन बनले गेले. अन्य दोघांची स्वतःची चित्रनिर्मिती असल्याने त्यानी आपली चौकट पक्की केली आणि एक आयुष्यभर भोळा युवक रंगविणे तर दुसरा आयुष्यभरचा कॉलेजकुमार बनण्यात धन्यता मानत गेले. दिलीपकुमार यानी मात्र आपल्या भूमिकेत वैविध्य राखले आणि अभिनयाची क्षितिजे ते स्थापित गेले.

सिनेसमीक्षक असोत वा रसिक... दोन्ही घटक नेहमीच दिलीपकुमारसमोर अमुक एकाने वा तमुक एकाने तोडीस तोड अभिनय केला आणि दिलीपला खाल्ला...अशा चर्चा करत राहिले...याचाच अर्थ त्या त्या नटांसमोर ते एक आव्हान होते हे मान्य करत असत. मग अंदाजमध्ये राज कपूर असो, पैगाममध्ये राजकुमार असो, इन्सानियतमध्ये देव आनंद असो, संघर्षमध्ये बलराज साहनी असो वा नया दौरमध्ये अजित असो वा शेवटी अगदी शक्तीमध्ये अमिताभ असो...ही सारी नटमंडळी आपण दिलीपकुमारपेक्षा उजवा अभिनय करू शकतो असे जर समजत होते तर एकप्रमारे ते दिलीपकुमारचा त्या क्षेत्रातील अधिकार मान्यच करत होते हे विसरता येणार नाही.

१९४४ ते २००० अशी जवळपास ५५ वर्षे सतत सुरू असलेली चित्रपटक्षेत्रातील दिलीपकुमार यांची कारकिर्द कधीही झाकोळली नाही. त्यांचे स्थान अबाधित असेच राहिले आहे.

जर अभिनयात स्टाईल देखील येते असे तुम्हाला वाटत असेल तर हा सीन नक्की बघा.. अ‍ॅक्टींग तोडलीच्या धाग्यावर स्टाईल तोडली म्हणाल..

best ever entry made by any actor in the history of the bollywood

कभी खुशी कभी गम
लिंक - https://www.youtube.com/watch?v=FI4S3X5ptsM >>>>>> आइ ग, आवरा ऋन्मेऽऽष बाळाला कुणितरी!!

!! कखुकग हाच एक भंपक सिनेमा अन त्यातली जयाबाईंची अ‍ॅक्टिंग, तो रोल अन ते हाव भाव अजूनच बोजड. त्यात हा विशिष्ट सीन म्हणजे बघवत नाही अक्षरशः , इतका चीजी.

जया तरूणपणी जितकी प्रचंड स्पॉण्टेनियस वाटायची तितकी आता कृत्रिम वाटते. पळताना वार्‍याने हलणारे शाहरूख चे केस हेलिकॉप्टरच्या खाली जरा हलत नाहीत. ये चोप्रा-जोहर के गाव वाले अपने लडकोंके सर को कौन चक्की का पीसा तेल या Gel लगाते है कोणास ठाउक. आणि हेलिकॉप्टर चा आवाज घरात ऐकू जात नाही का?

नाहीतर हम को मन की शक्ती देना चा व्हिडीओ पाहा. साध्या सोप्या प्रसंगात सर्वांनी अ‍ॅक्टिंग तोडली आहे. दिग्दर्शकाची कमाल असावी. बाहेर टांग्यातून उतरताना "आतून" येणारा गाण्याचा आवाज कॅमेरा आत आल्यावर वाढतो. 'बाईं'च्या जागी जयाचा आवाज आल्यावर सगळ्या मुली चमकून पाहतात. एकूण ७० च्या दशकातील शाळेचे वातावरण एकदम चपखल आहे. गाणे व संगीत वेगळेच!

जया तरूणपणी जितकी प्रचंड स्पॉण्टेनियस वाटायची तितकी आता कृत्रिम वाटते. >>>>> अंशता असहमत. एनर्जी लेव्हल डाऊन किंवा तेव्हाचा सळसळता उत्साह नक्कीच मिसिंग आहे हे मी देखील बरेचदा नोटीस केले आहे. वयोमानानुसार शरीर साथ देत नसेल त्यामुळे आपसूक मर्यादा आल्या असतील, आपण इथे बसून कारणमीमांसा नाही करू शकत (पिक्चरे - केथ्रीजी, कहोनाहो, फिजा) ..
पण हावभाव आणि एक्स्प्रेशन कृत्रिम नाही म्हणता येणार..

असू शकेल. पण एक प्रेक्षक म्हणून तसे वाटणे साहजिक आहे, विशेषतः ज्यांनी तरूण जया पाहिली आहे.

बाकी के३जी हा अमिताभचा पहिला पिक्चर जो पाहताना मी डुलक्या दिल्या होत्या. महाबोअर.

सहसा सिनेमातली भावोत्कट दृश्ये बघताना मला कधीकधी हेलावून जायला होतं पण डोळ्यात पाणी येत नाही. पण खालील दृश्ये त्याला अपवाद. कितीदाही परतपरत बघितली तरी डोळ्यांच्या कडा नकळत ओलावतातच.

Sixth Sense - गाडीतला छोटा कोल आणि त्याच्या आईचा संवाद. त्यात कोल आपल्याला मेलेली माणसे दिसतात हे रहस्य आईला सांगतो. ती अविश्वास दाखवते. तो वानगीदाखल आपल्याला आजी भेटते आणि आईची चौकशी करते ते सांगतो. आईचा विश्वास बसून ती आपल्या मुलाच्या या वेगळ्या शक्तीचा स्वीकार करते. तो संपूर्ण प्रसंगच अभिनयाचा अत्युच्च दाखला आहे. हेली जोएल ऑस्मंट आणि टोनी कॉलेटने तो सीन कमालीच्या उंचीवर नेला आहे.

Crash - यात एक मेक्सिकन कामगार आपल्या बायको आणि मुलीसोबत राहातो. ज्या वस्तीत ते राहातात तिथे सारखे गोळीबाराचे आवाज येतात त्यामुळे भेदरलेल्या आपल्या मुलीला समजवण्यासाठी तो एक invisible magic cape तिच्यावर घालतो, त्यामुळे तिला गोळी लागणार नसते. तिची समजूत पटते. नंतर काही गैरसमजाने, तो जिथे काम करायला जातो त्या दुकानाचा मालक त्याला पिस्तूल घेऊन धमकावयाला येतो. हे त्याची मुलगी खिडकीतून पहाते. तो मालक आपल्या वडलांवर गोळी चालवणार आहे आणि वडिलांकडे आपल्या अंगावर आहे तशी magic cape नाही हे तिच्या लक्षात येते. वडलांचा आपल्या magic cape द्वारे बचाव करण्यासाठी 'I will save you papa' म्हणत ती धावत त्या दोघांच्या मधे येते. मालक त्याचवेळी गोळी झाडतो आणि ती तिला लागते. त्यावेळी तिच्या वडिलांचा आक्रोश, मालकाच्या चेहर्यावरचे विमनस्क भाव अंगावर सरसरून काटा आणतात.

अजून आठवेल तसे लिहीत जाईन.

चित्रपट सरकार राज - अभिषेकला (शंकरला) गोळी लागल्यामुळे तो मृत्युशय्येवर पडला आहे. अमिताभ त्याच्या शेजारी बसून त्याच्याशी बोलतोय. बोलतोय तो "सुभाष नागरे" नाहिच. तो आहे एक हताश बाप ज्याला मुलाची ती स्थिती पहावतही नाहिये आणि हाताशी आलेला कर्तबगार मुलगा असा मृत्युशी झुंजताना बघुन त्याच्या जीवाचं पाणि पाणि होतय. तरिही तो म्हणतो "चिंता की तो कोई बात ही नही है"...आणि तो बोलत असतानाच अभिषेक शेवटचा श्वास घेतो. अमिताभ बोलायचा थांबतो आणि मान खाली घालतो. पण जेव्हा तो वर बघतो तेव्हा त्याच्या डोळ्यात अंगार असतो. एक अत्यंत थंडगार खुनशी नजर, ज्यात मुलाच्या खुनाचा बदला घ्यायचा निर्णय स्पष्ट दिसत असतो. रिटायर झालेला "सुभाष नागरे" परत येतो.
फक्त डोळ्यातुन केलेला अभिनय, अगतिक बापाच्या रडारडीचा मेलोड्रामा वगैरे काही नाही पण चेहर्‍यावर अतिशय अगतिकता. आणि ती अगतिकता एका क्षणात बदलते.
हे जमणारा फक्त आणि फक्त अमिताभ आहे. बाकि सगळे खान आणि हीरो तेव्हा त्याच्यासमोर पपलु वाटले.

अशोकजी धन्यवाद

एकेकाळी वेळच वेळ होता तेव्हां जुने गाजलेले सिनेमे एकामागोमाग पाहीले होते. त्यात दिलीपकुमार यांचे जरी सगळे नाही तरी बरेच होते. ते सिनेमे आता बोअर होतात पण त्यांच्या अभिनयामुळे आपण शेवटपर्यंत पाहतो. मला आवडलेला सिनेमा म्हणजे सगिना माहतो. वेगळाच सिनेमा. मशाल मधला तो युएसपी वाला सीन खूप लाऊड झालाय पण तो जसा लिहीला आहे तसाच्या तसा करणं हे मोठंच आव्हान आहे. दिलीपकुमार यांचा त्यातला अभिनय अंगावर येतो. हा सीन कमल हसन सुद्धा करू शकला असता.

दिवाकरजी - अन्याय झाला तो गिरफ्तार या सिनेमात. नाहीतरी तो सिनेमा पाहण्यासारखा नाहीच तेव्हां जौद्या.

के३जी बद्दल फारेण्डशी सहमत. बोअर. कृत्रिम रडण्याची स्पर्धा, बेगडी संघर्ष (मोहब्बते सारखा) आणि कुठेही कथा ओघवती नसेल याची घेतलेली काळजी. त्यात जयाबाईंनी आणखी बोअर केलंय. नौकर, बावर्ची, गुड्डी, मिली मधली जया हीच का असा प्रश्न पडावा. मोठ्ठ्या गॅपमुळे झालं असावं.

जो जीता वही सिकंदर या सिनेमात आमीरच्या मोठ्या भावाला अपघात झालेला असताना तो बाहेर बसलेला असतो. त्या वेळी रूठ के हमसे कभी या गाण्यात आमीरच्या डोळ्यात पाणी असतं. पण दोन भावांचा लहानपणीचा दंगा, खोड्या हे आठवतांना तो डोळ्यात पाणी घेऊन तो नकळत हसतो. या अभिनयासाठी त्याचं कौतुक करायला हवं.

चित्रपट - खाकी
पोलिसांची एक टीम दहशतवाद्यांच्या सापळ्यात अडकली आहे, सुटकेचा काही मार्ग नाही अशावेळी एक ज्युनिअर ऑफिसर(अक्षय) त्याच्या सिनिअरचा (अमिताभ) प्रचंड अपमान करतो, त्याचे पूर्ण पोलिसी करिअरच कसे निरर्थक आहे म्हणून डाफरतो. त्यानंतरच्या काही सेकंदात अमिताभने त्याला बसलेला धक्का, अपमान, राग आणि शेवटी त्याचा निश्चय असा एक स्पेक्ट्रम दाखवला आहे, अफाट!
https://www.youtube.com/watch?v=cHB2oVCNu1A

हे जमणारा फक्त आणि फक्त अमिताभ आहे. बाकि सगळे खान आणि हीरो तेव्हा त्याच्यासमोर पपलु वाटले.>>>>.+१२३४५६७८९१०

त्रिशूल मधला- हेमा, शशी आणि अमिताभ बसलेले असतात. अमिताभ किल्लीविषयी काहीतरी गंभीर थाप मारतो आणि तितक्यात किल्ल्यांचा जुडगा त्याच्याच खिशातून बाहेर पडतो. तेव्हा आपलं पितळ उघडं पडल्याचे जे काय भाव त्याच्या चेहर्यावर आहेत त्याला तोड नाही.
मुकद्दर का सिकंदर- संपूर्ण सलाम ए इश्क गाणे फक्त अमिताभ व रेखाच्या चेहर्यांसाठी बघावे.
जंजीर - जया रात्री अमिताभ कडे राहते आणि सकाळी 'बस चार चम्मच चीनी डाली है, क्यूँ ? कम है?" विचारत चहा देतानाचे व नंतर "दीवाने है दीवानों को ना घर चाहिये" मधले दोघांचे हावभाव. किती गोड सीन आहे!
सिलसिला- ये कहां आ गए हम, रंग बरसे, मैं और मेरी तनहाई, देखा एक ख्वाब आणि बराचसा सिनेमाही त्या चारही दिग्गजांच्या एक्स्प्रेशन्स करताच केवळ.
हम आपके - दीदी तेरा गाण्यानंतर पूल जवळ सलमान माधुरी प्रेमाची कबूली देण्याचा प्रयत्न करतात तो सीन. टायटल सॉंगमधलेही दोघांचे भावपूर्ण चेहरे.
दिल तो पागल है - शेवटचा स्टेजवरचा माधुरी शाहरूख चा सीन. कब तक चुप बैठे गाण्यातला माधुरीचा गोड चेहरा.
जुदाई- नवरा आणि मुलांना पार्कमधे मस्त एंजॉय करताना पाहून स्वतःची घोडचूक लक्षात आलेली आणि नंतर सगळं रिवाईंड करा म्हणून गयावया करणारी श्रीदेवी.इंग्लिश विंग्लिश मधले श्री चे अनेक सीन्स
चांदनी - पांगळा झाल्यावर खोलीभर लावलेल्या श्रीच्या फोटोंकडे हतबल नजरेने पाहणारा ऋषी, तो ठणठणीत होऊन परत आल्यावर धर्मसंकटात सापडलेली, लग्नात तो जिन्यावरून पडल्यावर आकांताने धावणारी श्री.
अजून खूप आहेत लिहीण्यासारखे.

के३जीमधला आवडता सीन घ्यायचाच झाला तर जया आणि शाहरूख मॉलमधे भेटतात तो सीन. खासकरून शाहरूख आपल्या मुलाकडे बोट दाखवतो आणि जया हसते तो शॉट सही जमलाय. अजून एक म्हणजे काजोलला ह्रितिकची असलीयत समजते तेव्हा फरीदा आणि काजोल ओव्हरअ‍ॅक्टिंगचा भडीमार करत असतना ह्रितिक ओठांवर बोट ठेवून त्यांना गप्प रहायला सांगतो तो सीन Proud

के३जी हा अत्यंत वाईट सिनेमा होताच यावर दुमत नाही.

हो हो, तो मॉलमधला शॉट व्हेरी स्वीट. त्यातला रानी आणि शाहरूखचा पण एक सीन आहे ज्यात ती माझं तुृझ्यावर प्रेम असलं तरी तुझं माझ्यावर असायलाच हवं असं काही नाही अशा अर्थाचं बोलते- तोही मला आवडतो.
डीडीएलजे मधला छुटकी झोपताना "दीदी, राज बहोत अच्छा है. तुम उसीसे शादी करलो" म्हणते तो सीन कसला गोड आहे! बहिणींचं सुंदर नातं. त्यातले गच्चीवरचे रोमँटिक सीन. शाहरूखला तेव्हाच फ्रीझ करायला हवा होता.

अ‍ॅक्टींगच्या फंदात न पडता सुपरस्टार झालेले स्टॅलोन, अर्नोल्ड सारखे अभिनेते (?) पाहीले की आपल्याकडच्या पब्लीकला नावं ठेवण्यात अर्थ नाही हे पटतं. रजनीकांतच्या गाजलेल्या सिनेमातला त्याचा अभिनय हा हास्यास्पद होता. बाबा की कुठल्या सिनेमात त्याला खांबाला बांधून काठी, सळयांनी मारत असतात आणि प्रत्येक फटक्यानंतर तो हसत असतो हे अक्षरशः (प्रेक्षकाची) चीड अनावर झाल्यानंतर उद्वेगाने हसू फुटतं तशातला प्रकार. हे असे सिनेमे आवडणारं पब्लीक आहे, त्यांच्या पण अभिनयाच्या व्याख्या आहेतच. त्यामुळंच ज्याला जे हवं ते असेच सिनेमे मेन स्ट्रीम मधे बहुसंख्येने बनले. भारतात जिंकायचं असेल तर पाटा पीच बनवतात तसं. पण एका तमीळ सिनेमात रजनीचा अप्रतिम अभिनय सुद्धा पाहीला आहे. त्यात कमल हसन सुद्धा आहे. विशेष म्हणजे रजनी त्यात प्रभावी वाटला. त्याचं नाव आठवत नाही.

अमर अकबर अँथनी पाहताना हसावं की रडावं ते कळत नव्हतं. पण ज्या पद्धतीने हा सिनेमा बनवलाय तो कितीही अतर्क्य असला तरी पुढे काय या उत्सुकतेने का होईना खिळवून ठेवतो हे नक्की. हे म्हणजे टीव्ही सिरीयलींना नावं ठेवत ठेवत त्यात गुंतून पडण्याचा प्रकार. या अशा सिनेमांमुळे गुणी अभिनेते मागे पडले. मर्यादीत क्षमता असून राजेश खन्ना सुपरस्टार झाला. एकेकाचं नशीब. त्याच्या facial nerve disorder टाईप एक्स्प्रेशन्सला अ‍ॅक्टींग तोडली म्हणनारं पब्लीक त्या काळी नक्की असणार..

best ever entry made by any actor in the history of the bollywood >>>

नाही हां! माझ्यासाठी हे बिरुद जातं '१९४२-अ लव्ह स्टोरी'मधल्या जॅकी श्रॉफच्या एंट्रीला. इण्टरव्हलच्या १-२ सेकंद आधी,
सीनमधला तणाव एकदम टोकाला पोहोचलेला असताना प्रथम त्या पात्राचा (शुभंकर) फक्त हात दिसतो, जळत्या घराच्या दिशेला पळू पाहणार्‍या मनिषा कोईरालाला मागे खेचणारा, आपल्याला कुणी मागे ओढलं या विचारात ती वर त्याच्या चेहर्‍याकडे पाहते आणि आगीच्या ज्वाळांचा केशरट उजेड चेहर्‍यावर पडलेला जॅकी श्रॉफ क्लोज-अपमधे... शुभंकर या पात्राचा उल्लेख सुरूवातीपासून संवादांमधे होत असतो, कोण हा शुभंकर असा थोडा वेळ विचार करून प्रेक्षक जरा-जरा त्याला विसरायला लागलेले असतात...आणि "अरे, हाच तो शुभंकर" असं वाटेपर्यंत "इण्टरव्हल"ची अक्षरं झळकतात!

त्या संपूर्ण सीनमधे अनुपम खेर, अनिल कपूर, मनिषा कोईराला आणि जॅकी श्रॉफ यांनी खरंच अ‍ॅक्टिंग तोडली आहे.

श्या! मला '१९४२...' आणि 'परिंदा' हे सिनेमे परत पहावेसे वाटतायत आता...!

एंट्रीबद्द्लच बोलायचं तर जुन्या 'काजल'मधली राजकुमारची एंट्रीही के३जीच्या शाखाच्या एंट्रीपेक्षा जबरी आहे.

. मर्यादीत क्षमता असून राजेश खन्ना सुपरस्टार झाला. >>>>. वीणा असे नाही म्हणता येणार. अवतार, बावर्ची, हे राजेश खन्नाचे अप्रातीम चित्रपट होते. मला अवतार फार आवडला, जाम रडले तो पहाताना. आनन्दच्या नन्तर तो ( राजेश) थोडा आखडत गेला. नमक हराम मध्ये अमिताभची भूमिका आधी त्यालाच मिळणार होती, पण त्याला वाटले की प्रेक्षकान्ची सहानूभूती त्याला मिळेल. म्हणून त्याने दुसरा, मित्राचा रोल घेतला. पण तिथेच तो फसला. अमिताभने बाजी मारली. आणी त्यातुन राजेश खन्नाची कारकिर्द उताराला लागली.

अवतार, अमृत ने यश दिले, पण सुपरस्टार पद केव्हाच हिरावले गेले होते.

रश्मीतै
राजेश खन्ना हा दिग्दर्शकाचा अभिनेता वाटतो. अवतार हा पुन्हा लाऊड सिनेमा. अशा प्रकारच्या सिनेमातल्या अभिनयाला लोक दाद देतातच. बावर्ची मधे हृषिकेश मुखर्जींनी राजेश खन्नाच्या क्षमतांचा विचार करून प्रसंग लिहीलेले असावेत. आनंद, नमकहराम मधे पुन्हा ऋषिदाच असावेत हा योगायोग नाही. छलिया मधे ऋषिदांनी राज कपूर कडून नेहमीपेक्षा वेगळा अभिनय करवून घेतलाय. राज कपूर हे उत्तम अभिनेते होते यात शंका नाही. अनाडी मधे अनेकदा डोळे पाणावतात असा अभिनय केलाय. पण या लोकांनी प्रेक्षकांना मेलोड्रामाची सवय लावली.

१९४२ बद्दल +१ ( हॅट्स ऑफ टू विधू विनोद चोप्रा - हिंदी सिनेमाला विधायक वळण लावण्यात यांचा हातभार आहे का ? )

(मायबोलीवर मतं मांडताना इथे प्रत्येकविषयातले तज्ञ, जाणकार, अभ्यासक आहेत याचं दडपण असतं. त्यामुळे चुका झाल्यास क्षमा मागते. पण दाखवून दिल्या तर अधिक बरे राहील )

शाहरूखला तेव्हाच फ्रीझ करायला हवा होता.>>+१०००
1942 मधली जॅकी श्रॉफची एंट्री भारी आहे आणि त्यानंतर येणारं ये सफर बहोत है कठीन मगर हे गाणं!
मुघल ए आझम मधले अनेक सीन्स! अ‍ॅक्टिंग तोडली आहे सगळ्यांनीच! मला खूप आवडतो तो सीन म्हणजे मधुबाला पुतळा बनून उभी असते आणि सलीम बाण मारून पुतळा बेनकाब करतो. त्यानंतर मधुबालाचा डायलॉग, "ये कनीज देखना चाहती थी की अफसाने हकीकत में कैसे बदलते है!"
आणि जेव्हा सलीम अनारकली एकत्र असताना बादशाह अकबर तिथे येतो आणि त्याला बघून अनारकली मागे पळत सुटते आणि सलीमच्यापाशी चक्कर येऊन पडते! Your heart just sinks! अशक्य सुंदर अभिनय केलाय मधुबालाने!
मी हा सिनेमा अगणित वेळा पाहिला आहे आणि पुन्हा पुन्हा पाहू शकते!
अवांतर: मला ह्या सिनेमाची black and white print कुठे मिळेल?

Really! मला इतके दिवस जगजितसिंगच वाटत होतं! का कोण जाणे! बदलते वर!

मुघले आझममध्येच मधुबाला नाचताना खंजीर नेऊन पृथ्वीराज कपूरच्या पायाशी ठेवते तो शॉट. पृथ्वीराज कपूर नंतर त्यांच्या खानदानात तसलं दमदार व्यक्तीमत्व कुणाचंच नाही. बाकी सगळेच क्युट स्वीट मस्तीखोर गोडुले या कॅटेगरीमध्ये.

मधुबालाच्या कौतुकासाठी जिज्ञासाचेही कौतुक केले पाहिजे, ते अशासाठी की अगदी अचूक दृश्याचे वर्णन वरील प्रतिसादात आले आहे. मूळात नादिरा एक कनीज आहेच....त्याबद्दल तिची तक्रार नाही....राजकुमार सलीम तिच्या प्रेमात पडला आहे, म्हणून ती कुठेच शेफारलेली दाखविले गेलेले नाही. अनारकलीची पदवी मिळाली असली तरी आपल्या मर्यादाचे तिला भान आहे आणि अशाच प्रसंगी जेव्हा हिंदुस्थानचा बादशहा....जणू काही एक पर्वतच....तिच्यासमोर येतो आहे, डोळे त्याचे संतापाने फुलले आहेत...एका दासीने राजघराण्याला प्रेमाच्या नावाखाली वेठीला धरले आहे....ह्या भावनांच्या कल्लोळापुढे ती कात्रीत सापडलेली परी अक्षरशः कोलमडून जाणे स्वाभाविक....आणि नेमके तेच रुपडे मधुबालाने त्या दृश्यात असे काही खुलविले आहे की बस्स...बघत राहावे. पडद्यावर तीन पात्रे.....संवाद नाही...आहे तो फक्त असह्य असा ताण....तो सहन करणे नशिबी येते प्रेक्षकांच्या....प्रेक्षकांना तरी दुसरे काय हवे असते ?

सिंपल रोजच्या जीवनातील संयत अभिनय , संवाद यासाठी "दिल चाहता है" अतिशय उत्कृष्ट सिनेमा आहे.
नैसर्गिक अभिनय, कुठे ही लाउड न होता सगळ्याच अभिनेत्यांनी केला आहे. स्पेशली. अमिर, सैफ, अक्षय चा रुम मधला ." बी अ मॅन " सीन.

पडद्यावर तीन पात्रे.....संवाद नाही...आहे तो फक्त असह्य असा ताण....तो सहन करणे नशिबी येते प्रेक्षकांच्या....प्रेक्षकांना तरी दुसरे काय हवे असते ?>> मामा अगदी अगदी!
आणि मुळात बादशाह अकबर तिथे येतो ते त्या बहारमुळे! ती बादशाहला अनारची फुले पेश करते जेणेकरून त्याला अनारकलीची आठवण होईल! अस्सा राग येतो तिचा!

परिंदा मधला जॅकीचा 'नहीं चाहिए था ये सबकुछ तो वापस कर मेरी जवानी' हा सीन त्याचा अत्युच्च अभिनय आहे, फार कमी वेळा अनिल कपूर समोरच्या कलाकारापुढे फिका पडलाय त्यातला हा एक.

Pages