निसर्गाच्या गप्पा (भाग -२४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 27 December, 2014 - 06:09

निसर्गाच्या गप्पांचा धागा २४ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.

डिसेंबर .. म्हणजे वर्षाचा शेवट! निरोप!! गुड-बाय!!! असं म्हणताना खूप वाईट वाटतं पण नाही त्याचबरोबर डिसेंबर म्हणजे लखलखता-झगमगता नाताळ, नवीन वर्षाचे धुमधडाक्याने होणारे आगमन, नाच गाणी आणि पार्ट्या, थोडे जुने.. थोडे नवीन संकल्प, नवीन स्वप्न रंगवायला.. पाहिलेल्या स्वप्नांना खरे रुप द्यायला
मिळालेले आणखी एक करकरीत वर्ष!

मायबोलिवरील समस्त सभासदांना आणि ह्या चराचर सृष्टीतील प्रत्येक जिवाला २०१५ च्या अनेक अनेक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला गोड जावो!

कसा असतो डिसेंबरचा निसर्ग?! निरभ्र आकाशाचे.. निरभ्र हसू, कुडकुडणारे अंग..हुडहुडणारे दात, अंगावर येणारी
शिरशिरी..ओठावर चरचरणार्‍या फुल्या, कुठे थंडीची लाट... तर कुठे भुरभुर कोसळत राहणारा बर्फ, कुणाला प्रिय असतो बुवा हिवाळ्यातील पहाटेचा वाफाळता चहा... तर कुणाला प्रिय असते बाई दुलईतील ती झोप!!!! बाहेर फक्त दिवसाचे पाच वाजलेले असतात आणि काळोख घरात शिरलेला असतो. पहाटे जागे येते तर पहावं दुरदुरवर काहीच दिसत नाही.. दुपारपर्यंत धुकं ओसरतच नाही! असं हे धुकं फक्त पाहून मन भरत
नाही.. ते आपल्या कॅमेरात उतरवल्या शिवाय चैन पडतं नाही!

धुक्याची गोधडी पांघरुन निसर्ग अजून झोपलेलाच असतो. झाडांच्या कळ्या अजून मिटलेल्याच असतात. दिवसा ढवळ्या वाहनांचे आणि रस्त्यावरचे दिवे लागलेले असतात. अंघोळ नकोशी वाटते. शेकोटीभोवती कोंडाळा करुन गावकरी बसलेले असतात. देशसेवा करणारे सैनिक मात्र येवढ्या थंडीतही परेड करायला सज्ज
असतात. एखादे गाव, एखादे शेत अजून शांत झोप घेत असते. डोक्यावर गवताचे भारे घेऊन बायका शेतावर निघालेल्या असतात. नखशिखांत कपडे चढवून कुणी बाहेर पडायच्या तयारीत असतं:

ग्लोबलायझेशनच्या ह्या युगात आपले भारतीय कुठे कुठे जाऊन पोचलेत! युरप-अमेरिका ह्या सारख्या देशात टोकाचा हिवाळा असतो. कुठे आपल्याकडील हवीहवीशी गुलाबी थंडी आणि कुठे तिथला चार-पाच
महिन्यांचा गोठलेला हिवाळा. बाकी इतर झाडे जरी आपला विरक्त काळ कंठत असली तरी ख्रिसमस-ट्री मात्र आपल्या तारुण्यात असते. संपूर्ण बर्फानी झाकलेले ख्रिसमस-ट्री असो की लाल-गुलाबी दिव्यांनी मढवलेले ख्रिसमस-ट्री असो दोन्ही शोभूनच दिसतात. एखादा दिवस बर्फ पडून निरभ्र निघाला तर बाहेर जरी कडाक्याची थंडी असली तरी कोवळ्या स्वच्छ हसर्‍या उन्हात सोनसळलेली ती सृष्टी बघायची मौज असते.

परदेशात राहून खूप काही 'मिस' होते! अहो आजकाल काय नाही मिळत असे जरी म्हंटले तरी प्रत्येकाची मागणी वेगळी असते. ती दरवेळी आयात-निर्यात करता येत नाही. आपल्याकडील वाटाण्याच्या शेंगाचे ढीग, एकावर एक रचलेली गाजरे, हातगाडीवरील हरभर्‍याचे गाठे, जांभळ्या उसाचे करवे, गव्हाच्या ओंब्या, रसरशीत पेरू, निबर बोरं! हे सगळं असून बनवलेल्या अनेक पाककृती. हे सारं काही मिस होतं! इतकंच नाही तर वेगवेगळ्या रंगातली शेवंतीची फुले, मधुमालतीचे गुलाबी रुपडे, बुचाच्या फुलांचा सडा, गावठी गुलाबाचा गंध!!!

गडचिरोली जिल्ह्यात खोल जंगलात आदिवासींसाठी काम करताना डॉ. प्रकाश आमटे व विलास मनोहर यांनी विरंगुळा म्हणून वन्य प्राणी बाळगले-वाढवले. सृष्टीतील रूप, रस, रंगगंधांच्या लावण्य विभ्रमांचे प्रत्ययकारी
चित्ररूप दुर्गाबाईंनी 'ऋतुचक्र'मध्ये रेखाटले आहे. मारुती चितमपल्ली ह्यांचा उभा जन्म गेलाय तो खर्‍याखुर्‍या जंगलात. त्यांना माणसांपेक्षा पशुपक्ष्यांचा सहवास अधिक मिळालाय. माणसांच्या भाषेपेक्षाही अरण्यातली हिरवी अक्षरं त्यांना अधिक चांगली कळत असणार. या जिवंत, रसरशीत हिरव्या अक्षरांची काळ्या शाईतली प्रतिबिंबं म्हणजे चितमपल्लींचं लेखन. रुढार्थाने लेखिका नसून निसर्गावर प्रेम करणार्‍या शरदिनी डहाणूकर ह्यांचे लेखन काही और! चित्रपटांमधे काम करणारे मिलिंद गुणाजी ह्यांची भटकंती.. वाचाल तेवढे
कमी आहे!!!

..पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या
शुभेच्छा!

(वरील लेखन व फोटो मायबोलीकर बी यांच्यातर्फे.)

नि.ग. च्या धाग्याची सुरुवात झाली आहे ५ डिसेंबर २०१० रोजी पासून.

निसर्गाच्या गप्पांचे मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानुषीताई मला जमणे कठीण आहे ग. तुम्ही करून टाका.

बी धन्स. पाहीला खंजन.

त्यात अजून एक माहीती मिळाली. हत्ती उंटाला घाबरतात.

मी आधीच्या पोस्ट मध्ये टाकले आहे की मी मारुती चित्तमपल्लींचे रानवाटा हे पुस्तक वाचतेय. त्यात माहीती मिळाली.

जागू , त्याच पुस्तकात (बहुधा), पहिल्या प्रकरणाचा शेवट मला नीट कळलाच नाही गं. ती एक आदिवासी मुलगी हत्तीबरोबर नाहीशी होते. म्हणजे काय होतं तिचं ते कळलं नाही. मला जरा समजावून सांग प्लीज.

साधना, तुझ्या या पोस्ट साठी ->
<<मुंबईत जे रेन्ट्री मेलेत ते मेल्यावर वेगळेच दिसतात, त्यांची साल अधुनमधुन झडुन गेलेली, जी शिल्लक आहे ती खुप काळी अशी असते. (रेंन ट्री तसाही काळाच असतो). माझी आई सांगत होती की तिच्या रोजच्या वाटेवर जो रेनट्री होता त्याला मरताना खुप दिवस खुप तिव्र असा केमिकलचा वास येत होता, त्याच्या बुंध्यातुन वाफा निघताना दिसत होत्या.>>
Rain trees in Mumbai being killed by poison, say activists ही न्युज वाचा. बहुतेक चार पाच महिन्यापूर्वी केव्हातरी मी इथे शेअरही केली होती. Sad

आणि BMC investigates mysterious killings of rain trees in Mumbai - ही पण.

फक्त लाकडासाठी मारले असतील ? ते लाकुड काही पारंपरीक उपयोगातले नाही. ब्रिटिशांनी सागाची पद्धतशीर लागवड केली होती आणि सतत लाकडाचा पुरवठा होत राहील अशी व्यवस्था केली होती..

सध्या लाकडाला अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण तरी लाकडाला भाव आहेच. पण त्यासाठी या झाडांचा जीव घ्यावा Sad

हे रेन ट्री पण अधून मधून जून्या फांद्या खाली टाकतच असते. कावळा बसायला आणि फांदी मोडायला.. हे प्रकरण पोद्दार कॉलेजच्या सज्ज्यातून अनेकदा बघितलेय.

आमच्या शेजार्‍यांच्या नारळाच्या झाडावर घारीने घरटं केलं होतं...
आज सकाळी घारीचा थोडा वेगळा आवाज आला म्हणून बघितलं, तर दोन पिल्लं ऊन खायला बसल्यासारखी झावळीवर बसली होती. त्यांना अजून नीट तोल सांभाळता येत नसल्यासारखी करत होती. ४-५ मिनिटातच त्यांचे आई की बाबा कोणीतरी काही खाऊ घेऊन आल्यावर, अगदी आयुष्यात कध्धी काही खायला न मिळाल्यासारखं करून, आधी माला आधी माला असा धोशा लावून एकानी खाऊ मटकावला. त्याचवेळी दुसर्‍या भावंडाला पंखाच्या फटकार्‍याने दूर सारण्याचा चॅप्टरपणा पण केला!! खरंतर ती पिल्लं आहेत असं वाटतच नाही!.... चांगली टोणगी झालीयेत! पण 'मी कित्ती छोट्टूस्सं आहे, मला अजून माझं माझं खाता सुद्धा येत नाही, तूच भरव!!' हे दाखवताना, अगदी बुलबुलाची पिल्लं जशी पंख थरथरवतात, अंग फुलवतात-घुसळतात, चोच वासतात - सेम तस्संच करतात ही पण पिल्लं. काय पण नौटंकी आहेत!! आणि आकार बघितला तर कावळ्यापेक्षा मोठाच आहे!!
आज सक्काळी सक्काळी मस्त करमणूक झाली माझी...

रेन ट्री बद्दल वाचून हळहळला जीव..:अरेरे:
इथे हुरडापार्टीबद्दल लिहिणार्‍यांचा तीव्र शब्दांत निषेध!! :राग:.....

रावी, 'अरणी' ही कथा थोडी मिथ वाटेल अशीच लिहिली आहे. अरणी ही निसर्गाचं ज्ञान उपजत घेऊन आलेली दाखवलीये. हत्तींबद्दल अनेक गोष्टी तिला माहीत असतात. त्यांचा मृत्यू कसा घडतो हे माहीत असणं हे सुद्धा त्यांपैकीच एक. हत्ती उंटांना घाबरतात त्यामुळे सागवन अशा प्रकारे वाचवता येईल ही तिचीच प्रेरणा! त्यामुळे एखाद्या हत्तीचा आत्मा आणि ह्या जीवनातलं तिचं असणं ह्यात काहीतरी एकरूपत्व श्री. चितमपल्लींनी दाखवलं असावं असं मला ही कथा वाचून वाटलं. (अर्थात हे माझं वै. मत आहे)
अजून एका जपानी कथेमधेही (ज्या देशोदेशींच्या कथांचा त्यांनी भावानुवाद केलाय त्यात) त्या कथेची नायिका ही विलोचा आत्मा आहे असं दाखवलंय. ही जपानी कथा खूप प्रसिद्ध आहे.मागे काही वर्षांपूर्वी 'किशोर' मासिकात पण अशाच प्रकारची एक गोष्ट आली होती.
त्यांच्या (चितमपल्लींच्या) काही कथा खूप गूढ आहेत. पण मला असं वाटतं की जगात आणि विशेषतः निसर्गात आपल्याला माहीत नसलेल्या अनेक गोष्टी आहेत; आणि आपला ह्यांच्याशी कधीच संबंध येत नसल्यामुळे त्या आपल्याला अनाकलनीय किंवा गूढ वाटू शकतात.

शांकली , हो गूढच वाटली मला ती गोष्टं. हत्ती जलसमाधी घेतात तसं आपला अंतिम काळ आला असं जाणून ती त्याच मार्गाने निघाली असं मला वटलं. पण ती अगदी तरूण असते आणि असं का वटावं याचा उल्लेख आला नाही म्हणून कळलं नाही.
की जगात आणि विशेषतः निसर्गात आपल्याला माहीत नसलेल्या अनेक गोष्टी आहेत; आणि आपला ह्यांच्याशी कधीच संबंध येत नसल्यामुळे त्या आपल्याला अनाकलनीय किंवा गूढ वाटू शकतात. > +१ अगदी खरं आहे.

ह्या कथेबद्दल मी असा विचार केला होता... की अरणीच्या स्वयंप्राज्ञ अवस्थेचा शेवट किंवा टोक गाठलं गेलं असावं आणि एके क्षणी तिला ह्या भौतिक जगामधे काहीच बांधून ठेवू शकणारं किंवा तिच्या अवस्थेची पातळी असलेलं आता काही उरलं नाहीये असं वाटलं असावं, म्हणून शेवटी ती तिच्या मूळ स्त्रोताकडे निघून गेली असावी....

आज सक्काळी सक्काळी..................कित्ती गोड लिहिलंस शांकली! अचूक निरीक्षण!
आणि णिशेदा बद्दल तीव्र णिशेद.............तुला काय लांब आहे का गं पुण्याहून नगरची हुरडा पार्टी?

शांकली मस्त वर्णन.. कुणी दुसर्‍याने भरवायचा काळ अगदी थोडा ना पक्ष्यांच्या आयूष्यात.. मग आहेच आपलं आपण जगणं.. मग पुढे चांगला जोडीदार मिळाला तरच अशी चैन पुन्हा !

मानुषी आणि दा, तुम्हीसुद्धा ती घारीच्या पिल्लांची कार्टून फिल्म बघितली असती, तर हेच लिहिलं असतं!! आत्तासुद्धा अधूनमधून कावळे त्यांना धमकावल्या सारखं करताहेत, तर हे दोघं चोची उघडून, चावतोच बघा कसे किंवा तसंच काहीसं बडबडत त्यांच्या अंगावर धावून जाताहेत. मलातर त्यांचा आव बघून यांनीच कावळोबांची काहीतरी कुरापत काढली असावी असा दाट संशय येतोय!

शशांक, छान आहेत फोटो... !
नॅट्जिओ वर शहरातले प्राणी पक्षी अशी मालिका येतेय... मुंबईतले बिबळे पण दाखवतील बहुतेक.

मानुषीताई धन्यवाद हुरडा पार्टीसाठी पण नाही जमणार Sad

पण खाताना माझी आठवण काढा म्हणजे मला पोचला हुरडा Happy

नमस्कार निगकर्स, कसे आहात?
सध्या आमच्या गार्डन लिझार्डने पपईच्या झाडावर मुक्काम ठोकला आहे.

पपईच्या शेंड्यावर उन खात मस्त बसलेला असतो. आसपास उडणारे किटक आले की गपकन खातो त्यांना.

वर्षा ............एकाच वेळी वॉव,सुंदर आणि ई ई ई ...असं काहीसं एकदमच वाटतंय!
पण खरंच काय पर्सनॅलिटी आहे...२ र्‍या फोटोत.
जागू मेल नाही गं पोचली परत करशील?

नाही दिनेश, लाकडासाठी हा कारभार नाहीय. लाकडासाठी खुन करायची झाडे वेग़ळी आहेत. त्यांचे खुन करायच्या पद्धती वेगळ्या आहेत.

भर शहरात, मोक्याच्या जागी उभी असलेली ही झाडे जाहीरातींच्या फलकांना झाकतात. मागच्या इमारतींचे सौदर्य रस्त्यावरुन दिसणे अशक्य करतात. रेनट्री खुप पसरतात. इमारत बांधताना फांद्या अधेमध्ये येतात.

या सगळ्या कारणांमध्ये अग्रभागी आहे ते जाहिरातीचे फलक. शहरात जाहिरातींचे किती अजस्त्र फलक उभे केले गेलेत ते तुम्ही आता आलात की पाहा. करोडो रुपय खर्चुन उभे केलेले हे फलक जर झाडांमुळे अडत असतील तर त्या फलकावर जाहिराती लावायला कोण पैसे देईल? मग ही झाडे नष्ट करणेच योग्य नाही का होणार? आजचे पैसे आज कमाऊन घ्या. उद्या तुमच्या नातवंडांसाठी ऑक्सिजन शिल्लक राहिला नाही तर हेच पैसे वापरुन तो ओक्सिजन ती विकत नाही का घेऊ शकणार? जे विकत घेऊ शकणार नाहीत ते मेले तरी चालतील. असले दरिद्री लोक हवेत तरी कोणाला?

वर्षा सरडा इतका सुंदर दिसू शकतो फोटोत हे फक्त तुझ्यामुळे कळले, मागे आणि आत्ता टाकलेल्या फोटो वरून.

बाकी त्याला पालीला बघून ई ई ई.

पण खरंच काय पर्सनॅलिटी आहे...२ र्‍या फोटोत. >>>>> हे हे हे काय हे !!! बिचार्‍याची इतकी अवनीती (डिग्रेडेशन) करु नको गं .... काय नैसर्गिकता आहे म्हण त्याऐवजी .... Happy

ते कोण कथ्थकचे मोठे गुरु (नाव आठवत नाहीये नेमके) - ते त्यांच्या शिष्यांना सांगायचे - अरे तुम्हाला साधे उभे रहाता येत नाही, बसता येत नाही - तो बेडुक पहा कसा डौलदार बसतो, ते प्राणी, पक्षी कसे सगळे डौलात असतात - ते पहा आणि मग तसे साधे उभे रहायला, चालायला शिका आधी, नृत्याचे आपण नंतर पाहू ... Happy

वर्षा -फोटो - एकदम भारीए ... Happy

बिचार्‍याची इतकी अवनीती (डिग्रेडेशन) करु नको गं .... काय नैसर्गिकता आहे म्हण त्याऐवजी .... स्मित>>>>>>>>>>>>> पटलं हो शशांक अगदीच!:स्मित:

Pages