डीडीएलजेचं गारूड

Submitted by टोच्या on 11 December, 2014 - 08:16

‘कम, फॉल इन लव्ह…’ अशी टॅगलाइन घेऊन आदित्य चोप्रानं निखळ करमणूक करणारी प्रेमकथा आणली आणि तिने अक्षरशः हिंदी चित्रपटांचे भविष्य बदलून टाकले. तो काळ अमिताभ नावाचे वादळ शांत होण्याचा होता. अमिताभने घालून दिलेल्या मार्गावरच चालण्याच्या उद्देशाने तेव्हा अक्षय कुमार, अजय देवगण, सुनील शेट्टी यांसारख्या अॅक्शन हिरोंची नव्या दमाची फळी उभी राहिली. नव्वदच्या दशकानंतर हिंदी चित्रपट एकाच वळणाने जात होता. दणकट हिरो, त्याच्यावर झालेला अन्याय, त्यासाठी त्याचे पेटून उठणे, ड्र्ग्जचा व्यवसाय करणारा व्हिलन आणि झाडांभोवती फेर धरून नाचण्यापुरती हिरोईन. दहापैकी नऊ सिनेमांचे कथानक याच प्रकारचे असायचे. त्यामुळेच सुनील शेट्टीसारखा ठोकळाही भाव खाऊन गेला. त्याच दरम्यान शाहरूख, सलमान, आमीर या खान मंडळींचाही स्ट्रगल सुरू होता. चिकने-चोपडे चेहरे आणि सुमार शरीरयष्टी यामुळे तिन्ही खान अॅक्शन हिरो वाटत नव्हते. त्यामुळे सुरुवातीला ते या भाऊगर्दीतलेच एक होते. त्यावेळचे दिग्दर्शकही तसेच. अगदी यश चोप्रांपासून, यश जोहर, राकेश रोशन यांसारखे मोठे दिग्दर्शकही टिपीकल मारधाडीच्याच मार्गाने जात होते. अभिनयात जशी नव्या दमाची पिढी उतरली, तशी दिग्दर्शकांचीही एक नवी फळी तयार होऊ लागली होती. पण तरीही टिपीकल मारधाडीच्या चित्रपटांचा मार्ग सोडून वेगळी वाट चोखाळायची हिंमत कुणी करत नव्हते. ती हिंमत केली आदित्य चोप्राने. यश चोप्रांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्याने दिग्दर्शनाच्या पहिल्याच प्रयत्नात प्रेमकथा हाताळली. तोपर्यंत अनेक प्रेमकथा येऊन गेल्या होत्या. मात्र, त्यात तोच तोपणा होता. आदित्यने ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ अशा भल्या मोठ्या नावाने ही प्रेमकथा आणली. त्याच्या एक वर्ष आधी आलेला सूरज बडजात्याचा ‘लग्नाची कॅसेट’ म्हणून हिणवला गेलेला ‘हम आपके है कौन’ तुफान चालला होता. बाजीगर, करण-अर्जुन, दिवाना असे तीन-चार हिट सिनेमे नावावर जमा असलेला शाहरूख आणि तोपर्यंत फारसा प्रभाव न दाखवू शकलेली काजोल अशा जोडीला घेऊन आदित्यने आपला ड्रीम प्रोजेक्ट हातात घेतला. तोपर्यंत हिंदी चित्रपटांमधून फारशी न दिसलेली यूरोपातील सुंदर लोकेशन्स, पंजाबमधील सरसों की खेती यामुळे सिनेमाची फ्रेम अगदी फ्रेश झाली होती. जोडीला परदेशात राहणारा गुलछबू नायक आणि भारतीय संस्कारी घरात वाढलेली नायिका यांची तितकीच ताजीतवानी प्रेमकथा. त्यात त्यावेळी फेमस असलेल्या जतीन-ललीत या जोडगोळीचं संगीत आणि उदीत नारायण, कुमार सानू, लतादिदी आणि आशा भोसले यांच्या जादूई आवाजात अजरामर झालेली गाणी. हिंदी सिनेमांतील काही गाणी पहायला चांगली वाटतात, तर काही गाणी फक्त ऐकायलाच चांगली वाटतात. मात्र, डीडीएलजेची गाणी जितकी श्रवणीय होती, तितकीच ती प्रेक्षणीयही होती.
अशी ही प्रेमकथा पडद्यावर आली आणि लोकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतली. ‘मेहंदी लगा के रखना’ या गाण्यासाठी चार-चार वेळा हा सिनेमा पाहिलेले लोक मी पाहिलेत. संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पहावी अशी निखळ प्रेमकथा असल्यामुळे सिनेमागृहातल्या खुर्च्यांच्या रांगाच्या रांगा कुटुंबे, मित्रमंडळींसाठी बुक असायच्या. ‘डीडीएलजे’ मिळाला आणि शाहरूख खान ‘राज’ झाला. या राजनेच त्याला आज ‘किंग खान’ बनवलंय. अन्यथा, शाहरूखही अजय देवगण, अक्षय कुमारच्या पंक्तीत मारधाडीचे सिनेमे करत बसला असता. डीडीएलजेने रोमॅण्टिक लव्ह स्टोरीचे एक युग सुरू केले, जे पुढे ‘दिल तो पागल है’, ‘कुछ कुछ होता है’, ‘हम दिल दे चुके सनम’ यांसारख्या सिनेमांनी पुढे नेले. नव्वदच्या दशकातल्या एका संपूर्ण पिढीवरच ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ने गारूड केलंय. आज सीडी, डीव्हीडी, इंटरनेट, केबल, डझनावारी हिंदी चित्रपट वाहिन्या यामुळे घरोघरी सिनेमे पहायची सोय झाली. हा सिनेमा इतक्या वेळा टीव्हीवर येऊनही प्रत्येक वेळी तो नवा वाटतो.
आज पस्तीशी-चाळीशीत असलेल्या पिढीला आजही या सिनेमामुळे आपले मोरपंखी दिवस आठवतात. सिनेमा येऊन वीस वर्ष उलटून गेलीत. मात्र, या सिनेमातला ताजेपणा कायम आहे. त्यानंतर सिनेमांतही अनेक ट्रेण्ड आले, स्थिरावले आणि पुन्हा बदलले. मात्र, डीडीएलजेच्या लोकप्रियतेत घट झाली नाही. ‘शोले’ न पाहिलेला माणूस भारतात दाखवा, असं म्हटलं जायचं. तसंच ‘डीडीएलजे’ न पाहिलेला माणूस दाखवा, असं म्हणावं लागेल. सुभाष घईंनाही डीडीएलजेची प्रेरणा घेऊन ‘परदेस’ बनवावासा वाटला. रोहित शेट्टीच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’मध्ये राज-सिम्रनचा रेल्वे सीन, आणि करण जोहरने ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’तून ‘डीडीएलजे’ला दिलेली मानवंदना, ही या सिनेमाने चित्रपटसृष्टीवरही केलेल्या गारूडाची पावतीच. मुंबईतल्या मराठा मंदिर सिनेमागृहातून हा सिनेमा वीस वर्षांनंतर उतरणार आहे, अशा बातम्या माध्यमांमधून येत होत्या. मात्र, सिनेरसिकांच्या मागणीखातर तो न उतरविण्याचा निर्णय यशराज बॅनर्स आणि मराठा मंदिर थिएटरच्या प्रशासनाने घेतला. त्यामुळे रसिकांना याच थिएटरला डीडीएलजेचं आणखी काही वर्ष पहायला मिळणार आहे. तब्बल वीस वर्ष एकाच थिएटरला दररोज सुरू असणारा आणि दर रविवारी हाऊस फुल्लचा बोर्ड झळकणारा हा जगातील ‘न भूतो, न भविष्यति(?)’ असा सिनेमा ठरला आहे, असे मला तरी वाटते. आज १२ डिसेंबर रोजी हा सिनेमा रिलीज होऊन वीस वर्ष होत आहेत. हॅट्स ऑफ टू आदित्य चोप्रा अॅण्ड डीडीएलजे टीम.
--

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोकणस्थ,
रामायण पण माझ्या जन्माच्या आधीचे आहे पण मला रामाची बायको सीता हे माहीत आहे,
तर माणूस जन्माने नाही त्याच्या कर्माने ओळखला जातो

>>तर माणूस जन्माने नाही त्याच्या कर्माने ओळखला जातो>>

करेक्टे. तुम्ही ती सिरिअल बघण्याचं कर्म केलेलं दिसत नाही. पण अर्चना बाँब दिसायची (अजूनही दिसते) हे मात्र खरेच.

हातगोळा Rofl

त्या सिरिअलमधे एक सीन होता अर्चनाचा त्याची लिंक इथे देणे योग्य नव्हे नाहीतर तो व्हिडीओ पाहून चिरंजीव ऋन्मेषजींच्या वैट्टमनावर्बालपरिणाम्झालाअस्ता. Proud

आदरणीय अर्चनादेवी पूरणसिंग ह्यांचे बाजीनामक चित्रपटातील 'रेशमजैसा रंग देखो, चिकना चिकना अंग देखो' हे गीत कोणी पाहिले आहे काय?

मंदिरच स्थापन कराल

एक विनंती करतो सर्वांनाच,
डीडीएलजे सारख्या साफ सुधर्‍या चित्रपटाच्या धाग्यावरील चर्चेला आंबट वळण जास्त देऊ नका, प्लीज.

>>रच्याकने त्या परमितसिंग ला पाहिल्यावर मला पहिला प्रश्न हा पडला होता की ह्या गबरु पंजाब्याला त्या अर्चना पुरनसिंग मध्ये असे काय आवडले असावे राव.>>

हे वाक्य वाचले आणि तळपायाची आग मस्तकात गेली. तर ते असो.

बेफी, अर्चना काय दिसली आहे त्या गाण्यात (अजूनही दिसते).

साफ सुधर्‍या चित्रपटाच्या धाग्यावरील चर्चेला>>

साफ सुथरा चित्रपट? Rofl

ज्या चित्रपटात मुलगा कॉलेज नापास झाल्यावर बाहेर पडून एका मुलीचं ठरलेलं लग्न मोडतो तो चित्रपट साफ सुथरा?

किर्तनात कथा कमी आणि हारी विठलचा गजर जास्त" अशी कथा झाली आहे धाग्याची --- हे सगळ्यात बेष्ट
पण शाहरुख आवडतोच आवडतो so कूच बी चलेगा

दिलवाले दुनियादारी दिखा जाएंगे चं काय झालं हो दिग्दर्शक?
शाहरूख आणि सई आहेत ना त्यात?
तुमचा शाहरूख, सई आणि मी हा प्रयोग कधीपासून सुरु होणार आहे?

तो दुनियादारीचा दिग्दर्शक म्हणे नवी सिरीयल काढतोय त्यात दुनियादारी नाव गोवलय आणी नविन कलाकारांना वाव देणार आहे म्हणे.

मी नेहमी विचार करते की ऐन वेळी त्या बाऊजींचं मत बदललं नसतं तर? तेव्हा बघितला होता ९४ मधे तेव्हा फारच उदात्त सुन्दर वगैरे वाटलेला ddlj. पण आता पाहिला की तद्दन भंपक वाटतो. and very misogynistic too!

बघितला होता ९४ मधे तेव्हा फारच उदात्त सुन्दर वगैरे वाटलेला ddlj. पण आता पाहिला की तद्दन भंपक वाटतो. and very misogynistic too!>>>>>> + १

परवाच एका ट्रेन राईड ला गेलो असताना तिथे एक देसी (हे सांगणे न लगे) कपल ती टीपीकल डीडीएलजे पोज करत फोटू काढत होते. तो दारात उभा ती पळत येत हात देतेय. डीडीएलजेचं गारूड दुसरं काय! Proud

Pages