हेल्मेटसक्ती

Submitted by प्रकाश घाटपांडे on 12 November, 2014 - 22:55

अव्यवहार्य तसेच कालबाह्य कायदे ही भ्रष्टाचाराची कुरणे निर्माण करतात. पुण्यात चालू झालेली हेल्मेट सक्ती चा नियम हे त्याचे एक उदाहरण आहे काही सेलिब्रिटी हेल्मेट जागृती साठी प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे होणार्‍या सुरक्षिततेबाबत प्रबोधन करणे अयोग्य नाही. पण विरोध आहे तो सक्तीला आहे हेल्मेटला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. हेल्मेट घातले नाही तर त्या व्यक्तिची सुरक्षितता धोक्यात येउ शकते पण वाहतुकीचे बाकी नियम पाळले नाही तर अन्य लोकांची सुरक्षितता धोक्यात येते. वाहतुक सुरक्षाव्यवस्था सांभाळताना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचे प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत. ही हेल्मेट सक्ती खरोखरच वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या कळवळ्यापोटी आहे काय? कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत? रस्त्यावर होणारे अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. एखाद्या शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ असताना त्याकडे लक्ष न देता जर पोलिसांनी उचल्यांविरुद्ध मोहीम राबवली तर त्यांच्या हेतु विषयी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. कुठलाही कायदा करताना त्याला काही वैधता असली पाहिजे. गरजे नुसार त्याचे नूतनीकरण झाले पाहिजे वा रद्द झाला पाहिजे. हेल्मेटची शिफारस करा पण सक्ती नको.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनुमोदन! हे केव्हापासूनच म्हणतो आम्ही! दिल्ली, हैदराबाद, बेंगलोर आणि पुणे ह्यात खूप फरक आहे.

हेल्मेटने सुरक्षित राहता येते हे मान्य, पण पाण्यात उडी घेणार्‍याला पोहता येते का हे तपासण्याऐवजी त्याने स्विमिंग कॉश्च्युम घातली आहे का हे तपासण्यात अर्थ नाही.

,>> पण पाण्यात उडी घेणार्‍याला पोहता येते का हे तपासण्याऐवजी त्याने स्विमिंग कॉश्च्युम घातली आहे का हे तपासण्यात अर्थ नाही.<< Biggrin

चारचाकी वाहनात असलेल्या आसन सुरक्षा पट्टा (सीट बेल्ट) च्या सक्तीविषयी आपले काय मत आहे?

माझे वैयक्तिक मतः- दुचाकी करिता हेल्मेट सक्ती ला जेवढा विरोध होत आहे त्यापेक्षा जास्त सुरक्षा पट्टा (सीट बेल्ट) च्या सक्तीविषयी व्हायला हवा. वाहनात सहजपणे पट्टा उपलब्ध असूनही ओम्नी सारख्या वाहनात हा पट्टा लावणे वाहनचालकाला किती त्रासदायक ठरते याचा अनुभव घेतल्यावरच यातली सत्यता पटेल. रस्त्याची पातळी थोडीसुद्धा सरळ रेषेत नसेल तर लगेचच हा पट्टा अतिशय घट्ट होतो, खरं तर एका जागी स्थिर होतो - तसूभरही हलत नाही आणि शरीर बांधल्याप्रमाणे अवघडते. या स्थितीत वाहन चालविणे त्रासदायक होते व अपघात घडण्याची शक्यता अनेक पटीत वाढते. तरीही या पट्ट्याच्या सक्तीविषयी फारसा विरोध होत नाही कारण असा त्रास इतर वाहनांत होत नाही. ओम्नी चालविणार्‍या चालकांची संख्या पुणे मुंबई सारख्या महानगरांमध्ये अल्प आहे. इतर ठिकाणी फारशी तपासणी होत नाही. झाली तरी तिथले ओम्नी वाले हे बहुदा काळी-पिवळी वाले व्यावसायिक असल्याने त्यांचे पोलिसांना हप्ते चालु असल्याने ते कधीच आसन पट्टा लावत नाहीत.

वाहतुक, सरासरी वेग, रस्त्यांची अवस्था, रस्त्यांची रुंदी, क्रॉसरोड्सचे प्रमाण, नियमबाह्य वाहन चालवणे शक्यच होणार नाही अश्या प्रकारच्या व्यवस्था असे अनेक फरक आहेत.

चेतन सुभाष गुगळे,

एखाद्या विशिष्ट वाहनातील सीट बेल्टची पोझिअशन गैरसोयीची असल्यास तो डिझाईन प्रॉब्लेम आहे. अश्या वाहनांबाबत परदेशात नागरीक अ‍ॅक्शन घेऊ शकतात. आपल्याकडे ते शक्य होणार नाही किंवा होईलच असे नाही.

पण सीट बेल्ट मात्र आवश्यक आहे व सक्तीचाही केला जावा.

एक तर तो कॅरी करावा लागत नाही, कुलुपात ठेवावा लागत नाही. तो गाडीबरोबर फुकटही मिळतो. पण ह्या(च) कारणांसाठी तो सक्तीचा करावा असे म्हणायचे नसून सेफ्टीसाठी महत्वाचा करावा.

हेच हेल्मेटबाबत का नाही - असा प्रश्न असल्यास वर त्याची उत्तरे द्यायचा प्रयत्न केलेला आहे.

हेल्मेटची शिफारस करा पण सक्ती नको. >>> आँ?
असलेले कायदे, नियम लोकांनी स्वतःहुन पाळले नाहीत की मग वाहतुक नियंत्रण खात्याला सक्ती करावीच लागेल की. नागरीकांनी स्वतःहुन स्वेच्छेने नियम पाळले तर पोलिस तरी का सक्ती करतील?

जिथे वेगमर्यादा ताशी ३० च्या पुढे जाऊ शकत नाही (अपरात्रीच्या वेळा सोडल्यास!) अशा भागांमधे हेल्मेटसक्तीचा काय उपयोग?
लेनच्या शिस्तीचा फंडा, वाकडेतिकडे न जाणे, वळताना अचानक 'आली लहर, केला कहर' न करणे याबद्दल सक्ती असायला हवी ना.
इतक्या कमी वेगाला गाडी स्किड वगैरे झाली तर गुडघे, हातपाय, खांदे यांना जास्त इजा होऊ शकते मग आता त्यासाठीही गार्ड सक्तीचे करायचे का? युद्धावर जायची आपल्या जन्मात शक्यता नाही तर फिरा चिलखत घालून असला प्रकार...
हेल्मेट घातल्यावर अनेकदा आपल्या वेगाचा अंदाज येत नाही. हे जास्त घातक आहे.

बर मिळणारी हेल्मेटस इतकी जड असतात आणि डोक्याला पक्की न बसणारी (लहान साइझ घेतल्यास जात नाही, मोठा साइज घेतल्यास आपण मान वळवली तरी हेल्मेट तिथेच परिणामी डोळ्यासमोर हेल्मेटची भिंत. ) की त्याचा त्रासच होतो. स्पॉण्डीवाल्यांच्या त्रासात भरच अजून.

उद्दाम पण सिग्नल तोडणे, रॅश ड्रायव्हिंग करणे. लेन कटिंग, धोकादायक पद्धतीने सामानाची वाहतुक करणे, रस्त्यावर खड्डे असणे अशा कितीतरी गोष्टी सुरक्षितततेच्या प्राधान्य क्रमावर आहेत. त्याबाबत आग्रही रहायचे सोडून तुलनेने कमी नियमबाह्य असलेल्या गोष्टींवर फोकस करणे अयोग्य वाटते. नियमानुसार हेल्मेट घातले पाहिजे हे मान्यच आहे.

/\ +१

चारचाकी वाहनात सीटबेल्ट कंपल्सरी केलाच पाहिजे ह्याबद्दल वरील सर्वांशी सहमत!

हेल्मेटसक्ती करायची की नाही हा विषय बाजूला ठेवला तरी 'हेल्मेट हेल्प्स टू प्रोटेक्ट फ्रॉम सिरीयस इंज्यूरीज' हे स्वतः अनुभवले असल्यामुळे चालकाने सारासार विचार करून ते वापरायला लागावे असे मत.

कशात कोणाचे किती हितसंबंध गुंतलेले आहेत ह्यात पडण्यापेक्षा 'अ‍ॅज अ‍ॅन इंडिव्हीज्युअल व्हाट इज बेनेफिशियल फॉर मी' हा विचार जास्त तार्कीक आहे असे मला वाटते.

कुठलाही कायदा करताना त्याला काही वैधता असली पाहिजे. गरजे नुसार त्याचे नूतनीकरण झाले पाहिजे वा रद्द झाला पाहिजे. हेल्मेटची शिफारस करा पण सक्ती नको. जोरकस अनुमोदन

नी, प्रघा मुद्दे पटलेत. गेल्या २ महिन्यांपासून पुण्यात बाईक चालवतोय अन पावलापावलाला पुलंच्या एका वाक्याची आठवण येते- पुण्यात वाहन चालवणे म्हणजे शस्त्र/तलवार चालवण्यासारखं आहे... वार करत जाल तरच पुढे जाता येतं. वर पुन्हा राँग साईड येणारे तर अगम्य आहेत Uhoh
शिवाजीनगरपासून पुढे तो एक बिआरटीनामक ताप आहेच... असो

जिथे वाहतुकीला वेग असेल, जिथे दुचाकीपेक्षा तीन व चारचाकी वाहने जास्त असतील अश्या ठिकाणी सक्ती समजते मलाही.
पण वेग नसलेली वाहतुक आणि ९०% दुचाक्या (सायकली, स्कूटर्स, मोपेडस, बाइक्स) अश्या वेळेला हेल्मेटसक्ती हा एक निर्बुद्ध नियम होतो.

नी, जोरदार टाळ्या पहिल्या पोस्टसाठी.
माझ्या डोक्याला किती फिट बसणारं हेल्मेट घेतलं तरी मला ते 'हवा आत जाऊन डुगडुगतंय' अशी फिलिंग येते आणि अर्धा वेळ लक्ष हेल्मेटवरच असतं रस्त्यापेक्षा Angry

हेल्मेट सक्ती हवी की नको ह्याबाबत मी साशंक आहे.
मला आलेला एक अनुभव सांगते. तुला अ‍ॅक्टीवा न्यायची असेल तर हेल्मेट घालूनच जावे लागेल ऑफिसला नाहीतर जाऊ नको असा नियम म्हणा की सक्त्ती ती माझ्या नवर्‍यानेच माझ्यासाठी चालू केली. ती अटच होती. ज्याम वैतागलेले तेंव्हा मी. वेळ वाचवायसाठी मला अ‍ॅक्टीवा तर न्यायचीच होती. बघू थोडे दिवस घालू मग बंद करू असे मनात होते. हेल्मेट घ्यायला गेलो तर लेडीज हेल्मेट नको ही अजुन एक प्रेमळ सुचना कारण लेडीज हेल्मेट खुप नाजूक असतो शिवाय तो समोरुन सेफ्टी नसतो. फक्त डोके झाकले जाते. झाल. आता मोठा हेल्मेट घालून जायच. मी सुरुवात केली. एक दोन दिवस लोक पाहू लागली ही कोण हेल्मेट घालून जाते? मी समोरची काचच बंद करायचे. १५ दिवस गेले. एक दिवस हेल्मेट विसरले. पण त्या दिवशी कानात हवा, डोक्याला उन जाऊन त्रास झाला. शिवाय समोरून पटकन पाखरे वगैरे त्रास द्यायची. तेंव्हा मला हेल्मेट शिवाय आता आपल्याला करमत नाही ह्याची जाणीव झाली.

काही वर्षांनी एक प्रसंग घडला. तेंव्हा मला हेल्मेटची माझ्या नवर्‍याने माझ्यावर केलेली सक्ती ही किती योग्य होती हे कळले.

आमच्या रस्त्यात एक रेल्वे ट्रॅक आहे. रेल्वे आल्याने फाटक बंद होते. पुढे गर्दी होती म्हणून मी मोठ्या अरुंद रस्त्याच्या कडेला झाडाच्या सावलीत स्कूटीवर थांबले होते ट्रेन जाण्याची वाट पाहत. रस्ता पुर्ण मोकळ होता. पण तेवढ्यात एक छोटी क्रेन आली आणि कडेला उभ्या असलेल्या माझ्या गाडीला धडक देऊन गेली. माझे लक्षही नव्हते. त्याच्या गाडीत क्लिनर नव्हता त्यामुळे त्यालाही पुढे गेल्यावर धडक दिल्याचे कळले. माझ्या अ‍ॅक्टीव्हाच्या पुढच्या भागाला त्याची ती माल उचलण्याची ट्रॉली धडकली. अ‍ॅक्टीवा सकट मी ही डोक्यावरच खाली आपटले तेंव्हा मला कळले. हेल्मेट असल्याने मला त्यावेळी काही लागले नाही. पायाला थोडे खरचटले. गाडीच्या पुढच्या भागाला चिरच पडली. नंबर प्लेट तुटली. पाठून येणार्‍या दुसर्‍या गाड्यांतील माणसांनी गाडी उचलायला, त्या गाडीच्या मालकाला बोलवायला मदत केली. मी नवर्‍याला फोन करून बोलावले. पोलिसांना कोणीतरी आधीच कळवले होते. कारण तिथून पोलिस स्टेशन ५ मिनिटांवर होते.
इन्स्पेक्टर साहेब माझीच वाट पाह्त बाहेर थांबले होते Lol नवराही आला. आणि मग त्या गाडीच्या मालकाकडून झालेले नुकसान देण्याचे आश्वासन घेतले आणि त्याने गॅरेज मध्ये बिल पे ही केले. पण त्या दिवशी माझ्या डोक्यात हेल्मेट नसते तर मात्र पाठीमागे डोक्यावरच पडल्याने मोठी दुखापत झाली असती ह्यात शंकाच नाही.

बाकीचे रहदारीचे नियमही हेल्मेट बरोबर पाळले पाहीजेत हेही तितकेच महत्वाचे आहे.

मला आता हेल्मेटची इतकी सवय झाली आहे की ते नाही घातले तर मला काहीतरी विसरले ह्याची जवळच्या जवळ जातानाही जाणिव होते.

ट्रॅक्टर, क्रेन, रेल्वेचे फाटक इत्यादी गोष्टी पुण्यातल्या गच्च लोकवस्ती, बोळकांड्यामधे नसतात.
हेल्मेट घातले तर ही कोण वेडी असे कोणीही बघत नाही. बहुतेक १९५०-६० पासून पुण्यात बायका स्कूटर्स चालवतायत. बाइक्सही चालवतायत.
लेडीज हेल्मेट वगैरे असे काही नसते. हेल्मेट हे सुरक्षेसाठी असेल तर नाजूक असणारे हेल्मेट हाच मुळात परस्परविरोधी प्रकार आहे. तेव्हा नाजूक हेल्मेट असे काही नसते.
डोक्यावर मडकं घालून पुढे पहाण्यापुरते भोक पाडले तर जो प्रकार होईल तसले हेल्मेट म्हणजे उपाय कमी आणि अपाय जास्त. व्हिजन ब्लॉक होते त्याने.
मुद्दा नियमांची प्रायोरिटीनुसार सक्ती करावी हा आहे.

रिया, तू कुठल्या भागात चालवतेस स्कूटर माहीत नाही पण हिंजवडी वगैरेला जात असशील स्कूटरीवरून तर हेल्मेट घाल.

>>>लेडीज हेल्मेट वगैरे असे काही नसते. हेल्मेट हे सुरक्षेसाठी असेल तर नाजूक असणारे हेल्मेट हाच मुळात परस्परविरोधी प्रकार आहे. तेव्हा नाजूक हेल्मेट असे काही नसते.<<< Lol

नी अग आमच्याइथेही मी लहान असल्यापासून पहाते लेडीज हेल्मेट लेडीज वापरतात. ते पुढून ओपन असत पण जेन्ड्स हेल्मेट पुढूनही पॅक असत. त्यामुळे जर पुढच्या भागावर आपण आदळलो तर हनुवटी फुचण्याची, तोंडाला लागण्याची शक्यता असते. मी पोर्ट एरिया मध्ये काम करते. त्यामुळे तिथे कंटेनर, ट्रेलर अशा मोठ्या मोठ्या गाड्या असतातच.
आणि मी फक्त माझा एक अनुभव शेअर केलाय.

नीधप कारणमिमांसा चपखल आहे.

मी २३ वर्षे दुचाकी चालवतेय पण हेल्मेट सक्ती आली की तेवढा काळ गाडी न चालवताच काढते. हेल्मेट ने भयंकर उकडते. एसीवाले, पंखेवाले हेल्मेट निघायला हवेत Happy

ओपन फेस हेल्मेट्सना लेडीज हेल्मेट असे ज्याने नाव शोधून काढले त्याच्या महान बुद्धीला कोपरापासून दंडवत.

ओपन फेस हेल्मेट ही लेडीज हेल्मेट नसतात वा नाजूकही नसतात.

तथाकथित लेडीज हेल्मेटस हे प्रकरण केवळ त्यावर असलेल्या डिझाइनशी संबंधित आहे. तेही बायकर गँग्ज, सायकल अ‍ॅडव्हेन्चर स्पोर्टस, बुलेट स्पोर्टस अश्या संदर्भातल्या हॉलिवूड चित्रपटांमुळे रूढ झालेले. बाकी त्याला नाजूक वा बायकांसाठी बनवलेले असा काहीही अर्थ नाहीये.

बायका नाजूक समजल्या जात असतील तर त्यांच्यासाठीचे हेल्मेट हे अजून दणकट पाहिजे ना... Proud

नी मी तुझ्याशीसमहत आहे. Happy
ही खालची नेट वर मिळालेली लेडीज हेल्मेट म्हणुनच ओळखल्या जाणार्या डिझाइन्स.
https://www.google.co.in/images?hl=en-IN&q=ladies+helmets&gbv=2&sa=X&oi=...

मग मी काय वेगळं सांगितलं वरती?
त्या हेल्मेटसवर जी रंगीत चित्रे छापली आहेत ते वगळता नॉर्मल हेल्मेटपेक्षा ते काहीही वेगळे नाहीये.
याच डिझाइनची (स्ट्रक्चरची) हेल्मेटस फक्त डल किंवा काळ्या कलरमधली अशी पुरूष वापरतात की.

pan vyavasthit size madhala helmet milala ki tyacha tras hot nahi ha swanubhav ahe. me 2000 pasun niyamit vaparte. pudhe chin-guard ani cover asalela. Mala chronic backpain cha tras ahe pan helmet ne kadhi aggrevate zala nahi. Side-vision la kahich problem yet nahi. Helmet ne ukadata hw manya ahe pan mazya drushtine safety mahatwachi.

साइड मिरर वाले. आत फ्यान / एसी. असणारे. काचेला पुसण्यासाठी व्हायपर असणारे, गाडी पडताच आपोआप सायरन वाजायला सुरूवात होणारे. रात्री पोलिसांना दिसावे म्हणून छोटा लाल दिवा असणारे हेल्मेट वापरण्यास माझी काहिही हरकत नाही.

Pages