रोजच्या आयुष्यात टीव्ही, वर्तमानपत्रांतल्या धक्कादायक बातम्या पाहिल्या की आपण अस्वस्थ होतो. जग सुरक्षित नसल्याची पुन्हा एकवार जाणीव होत राहाते. दंगली, खून, मारामार्या, दरोडे, हल्ले, चकमकी, बलात्कार, आपत्ती, दुष्काळ वगैरे बातम्या वाचल्या की ते वर्तमानपत्र पुन्हा उघडावेसेही वाटत नाही. निकटवर्तीयांमध्ये कोणाकडे आकस्मिक निधन, वाईट अपघात, दीर्घ आजार, दु:खद घटना घडल्या की कितीही म्हटले तरी मनावर एक मळभ येतेच!
वृद्ध व्यक्तींच्या बाबतीत शरीर जसजसे थकत जाते तसतसे मनही खूप कातर होत जाताना दिसते हे पाहिले आहे, अनुभवले आहे. लहानसहान घटना मनाला लावून घेणे, शारीरिक असमर्थतेमुळे मन खट्टू होणे, शरीराची दुर्बलता ही आयुष्याच्या आनंदात बाधा आणणारी मानणे, आप्तस्वकीयांचा वियोग - विरह सहन न होणे, बदलत्या काळासोबत स्वतःला बदलण्याची तयारी नसणे व त्यातून आलेले वैफल्य, रिकाम्या वेळाचा वापर कसा करायचा हे न कळल्यामुळे व शारीरिक असमर्थतेमुळे आलेल्या मर्यादा, मनाचा हट्टीपणा.... या आणि अशा अनेक गोष्टी ज्येष्ठांच्या बाबतीत त्यांच्या मनातली नैराश्याची भावना घट्ट करत जाऊ शकतात. त्यात कोणा जवळच्या व्यक्तीचे निधन झाले, कोणाचा अपमृत्यू झाला, टीव्हीवर कोणतीतरी भयानक बातमी पाहिली किंवा काहीतरी अस्वस्थ करणारे वाचनात आले की झाले!
काही वेळा एखादे आजारपण झाले की आजारपणानंतर आलेल्या शारीरिक दुर्बलतेतून मानसिक स्वास्थ्यही बिघडते. स्वतःच्या शक्तीवरचा, क्षमतेवरचा विश्वास उडतो. भीती वाटते. वेदनांची, मृत्यूची भीती आणि आपल्यानंतर काय याची चिंता झोप उडविते.
मनातल्या मनात कुढणे, जगाशी संपर्क नकोसा वाटणे, कोणाशी संवाद साधणे नकोसे होणे, औषधोपचारांस व वैद्यकीय तपासणीस खळखळ व टाळाटाळ, कुपथ्य, व्यायामाबाबत व योग्य आहाराबाबत उदासीनता, स्वतःच्या परावलंबी असण्याबद्दलची खंत, त्रास, चिंता आणि या परिस्थितीतून बाहेर पडण्याबद्दल अनुत्साह... हे सारे कसे हाताळायचे?
या सार्याचा परिणाम त्यांच्या शरीरस्वास्थ्यावर तर होतच असतो, शिवाय इतर कुटुंबावरही त्याचा परिणाम होत असतो. त्यांचे खिन्न असणे हे जवळच्यांना सहन न होणारे असते. ज्येष्ठ व्यक्ती जर वेगळी राहात असेल व स्वतःचे स्वातंत्र्य अबाधित राखण्याबद्दल आग्रही असेल तर अनेकदा हे नैराश्य लवकर कळूनही येत नाही.
ज्येष्ठांमधील नैराश्याला दूर करण्यासाठी वैद्यकीय उपचारांव्यतिरिक्त कोणते उपाय करता येतात व येऊ शकतात?
ज्या ज्येष्ठांना पाळीव प्राणी, लहान मुले, माणसांची फारशी आवड नाही, अध्यात्मात रुची नाही, घराबाहेर पडायला व लोकांमध्ये मिसळायला फारसे आवडत नाही अशांच्या बाबतीत त्यांचे औदासिन्य, निराशा कोणत्या प्रकारे दूर करणे शक्य आहे?
यासंदर्भातील काही उपयुक्त माहिती, सल्ले, अनुभव, टिप्स जरूर शेअर कराव्यात.
माझ्या घरातल्या ४
माझ्या घरातल्या ४ उदाहरणांवरुन (डिप्रेशन नाही... फक्त कधीतरी खिन्न आढळून येतात) असं दिसलं की त्यांच्याशी त्यांना रस असलेल्या विषयांवर अधुनमधुन गप्पा मारल्या (अगदी आपल्याला त्यात रस नसला तरी.....केवळ त्यांच्यासाठी) किंवा त्यांच्या गप्पा अधुन मधुन ऐकून घेतल्या तरी त्यांना बरं वाटतं. लगेच चेहरे खुलतात आपली दैनंदिनी पॅक असते आणि त्यांना आपला केवळ थोडा वेळ हवा असतो. त्यांना आपल्या बिझी दिनचर्येची जाणीव असल्यामुळे ते बोलत नाहीत पण आतून आपल्याशी बोलायला/हसायला आसुसलेले असतात. ह्यांच्यासाठी खरंच दिवसातून थोडा वेळ आवर्जून काढला तर चांगलं. वेळ निघून जायच्या आत हे केलं पाहिजे.
अश्विनी +१. अश्विनीने
अश्विनी +१.
अश्विनीने म्हटल्याप्रमाणे त्यांना वेळ देणे हे तर आहेच. माझ्या घरात माझ्या मावस सासूबाई होत्या. त्यांच्या बाबतीत जे अनुभवले आहे त्यावरुन असे वाटते की घरातल्या बर्याच बाबतींत त्यांचे मत/सल्ला विचारला असतां त्यांना आवडत असे. आपण अजुनही या सार्यांना हवे आहोत आणि या घराचा महत्वाचा घटक आहोत ही भावना त्यांना सकारात्मक भावना जोपासायला मदत करत असे.
त्याचप्रमाणे त्यांचे छंद /आवडी-निवडी याची जाण ठेवणे. पुन्हा माझ्या मावस सासूबाईंचेच उदाहरण देते.त्यांना चित्रकलेची आवड होती. पण स्वतःच्या उमेदीच्या काळात इतर अनेक व्यवधाने सांभाळताना हा छंद मागे पडला. त्या आमच्याकडे रहायला आल्यापासून आम्ही सर्व त्यांना चित्रे काढण्यासाठी कागद, क्रेयॉन्स, स्केचपेन्स वगैरे आणून देत असू आणि त्यांनी पुन्हा चित्रे काढायला सुरुवात केली होती. वयाच्या ८२ व्या वर्षीसुद्धा न टेकता तासंतास एका जागी बसून त्या चित्रे काढीत, रंगवीत. अगदी तल्लीन होऊन जात. नंतर त्यांनी भेटकार्डे बनवण्यास सुरुवात केली. प्रत्येकाच्या वाढदिवसाला स्वतःचे चित्र, स्वरचित कविता असे भेटकार्ड त्या आम्हास देत असत.
असे जर त्यांची आवडती पण सुटून गेलेली आवड/छंद पुन्हा नव्याने जोपासता आली तर ते त्यांच्या मनाला उभारी देणारे ठरते.
दोन्ही प्रतिसादांमध्ये एक
दोन्ही प्रतिसादांमध्ये एक समान मुद्दा पुढे येत आहे व तो मलाही अनुभवास आलेला आहे. आईचा असाध्य रोग, सध्या वडिलांचे फ्रॅक्चर व नव्यानेच उद्भवलेला डायबेटिस, सासर्यांचा जुना डायबेटिस व सासूबाईंचा न्युरो प्रॉब्लेम, हे सगळे जवळून पाहिल्यानंतर हा मुद्दा प्रकर्षाने जाणवला.
'मी अजूनही महत्वाचा आहे' हे फीलिंग त्यांना देणे खूप उपयुक्त ठरते त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी!
ह्याशिवाय काही इतर मुद्दे आहेत, चर्चेनुसार मांडत जायला आवडतील.
उत्तम धागा!
आश्विनी आणी आशिका एकदम सहमत.
आश्विनी आणी आशिका एकदम सहमत.
अरुन्धती एक कटु उपाय आहे पण तो अम्मलकारक आहे, निदान माझ्या अनूभवावरुन तरी माझे मत सान्गते.
या ज्येष्ठ नागरीकानी मानसीक ताण-तणाव करणार्या सिरीयल ( हिन्दी-मराठी कुठल्याही) अजीबात बघुच नये या ठाम मताची मी आहे. मला मान्य आहे की तब्येती मुळे, वाढत्या वयामुळे बर्याच ज्येष्ठाना टिव्ही हाच आधार असतो पण या सिरीयल मध्ये आजकाल सासु-सुनान्मधील तणाव, सासर्या-सुनेमधील वाद, मुलाचा भिडस्त पणा ( का रे दुरावा ही झी ची सिरीयल माझ्या सारख्या चाळिशीकडे जाणार्या बाईला खूप ताण आणते, तर वयस्कर लोकान्चे काय? ज्याना कदाचीत आपल्या मुला-सुनेकडुन असले अनूभव आलेय) हेच दाखवतात. आणी मग जूनी दुखे: आठवुन हे लोक स्वतःला त्रास करुन घेतात.
त्या ऐवजी, आपल्या वयाच्या चार लोकाना गोळा करुन मन रमवणे, ज्याना यान्च्याकडुन शिकायला आवडेल त्या तरुण मुलाना-मुलीना शिकवणे ( गणित, भाषा, सायन्स वगैरे), लहान मुलान्मध्ये रमणे. बागेत फिरायला जाणे. अगदी कार्टुन बघणे पण उत्तम, निदान त्या कार्टुन सिरीयल्स हसवतात तरी. फक्त कॉमेडी शो पहाणे, बातम्या टाळणे. वर आशिकाने लिहीले आहे तसे त्यान्च्या कला जोपासायला मदत करणे.
बर्याच ज्येष्ठ महिला अनेक कलेत पारन्गत असतात/ आहेत, त्याना एकत्र आणुन या वयस्कर लोकाना त्यान्चे मार्गदर्शन करायाला सान्ग. या लोकाना आपल्याला महत्व दिल्याचे कौतुक आणी समाधान वाटेल.
अरुन्धती मी बर्याच वर्षानी माबोवर आले. तू आणी आश्विनी सारख्या सहृदयी आणी प्लेजन्ट व्यक्तीमत्वाच्या मुली पाहुन खूप आनन्द झाला. माबोवर बाकी सहकारी आहेतच, पण तुम्ही दोघी स्वतःचा सन्सार, नोकरी साम्भाळुन दुसर्याचा विचार करता, त्याना मदत करता हे अतीशय आश्वासक आहे. तुमचा वैचारीक पुढाकार पण अनेक प्रॉब्लेम सॉल्व्ह करु शकतो.:स्मित:
काय अकु अगदी डिस्क्लेमर टाकले
काय अकु अगदी डिस्क्लेमर टाकले आहे डोंट वरी. तरीदेखील खूप आहे करण्यासारखे.
आय पॉड वर संगीत ऐकणे,
योग, व्यायाम
पॉड कासट ऐकणे/ टेड टॉक्स सारखे मराठीत काही असले तर बरे होईल.
गॅलरीतून बाहेर बघत बसणे
स्पिरिच्युअल कृत्ये
नाती गोती असतील तर ठरवून प्रत्येकाने आठवड्यातून एक तास अश्या वयस्कांबरोबर काढणे
ऑनलाइन शॉपिन्ग व सर्फिंग
मेक युअर पीस विथ डेथ. पण् हे सर्वांना जमण्यासारखे नाही.
स्वतःची चांगली काळजी घेणे : जसे सप्लीमेंट घेणे, औषधे नीट लावणे, ह्यात खूप वेळ जातो.
चांगले विनोदी शोज बघणे. एएफ व्ही, फू बाई फू, कपील इत्यादि. ( आवडीवर आहे. )
स्वतःचे चरित्र लिहीणे/ डिक्टेट करणे. जुने फोटो नीट लावणे. होम मेमरी डॉक बनव्णे. नातवंडासाठी छान
गिफ्ट. पुढे ते नसताना हे फार महत्वाचे ठरते.
'मी अजूनही महत्वाचा आहे' हे
'मी अजूनही महत्वाचा आहे' हे फीलिंग त्यांना देणे खूप उपयुक्त ठरते त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी! >> महत्वाचं वाक्य!!
पायाचे ऑपरेशन्स झाले असतील वा सतत झोपून राहवं लागत असेल आणि स्वतःची नित्याची कामे करण्यासाठीही दुसर्यांवर अवलंबून राहावे लागत असेल तर त्रागा, फ्रस्ट्रेशन आणि "आपण नको असल्याची" जाणीव जास्त बळावते. यात त्या व्यक्तींचं करणार्यावर जास्त जबाबदारी येते. त्याला शारीरीक / मानसिक थकून त्रागून चालत नाही. वृद्ध आजारी व्यक्तींना अधून मधून सतत "आम्ही फक्त नाईलाज्/कर्तव्य म्हणून तुमचं करत नाही तर तुम्ही खरंच हवे आहात म्हणून करत आहोत!" असा विश्वास देणे गरजेचे असते.
तणाव कमी करणारे प्रसन्न व्यक्तीमत्व आजूबाजूला असावे, पथ्य असेल तरी एखाद्या वेळेस घरी केलेलं आवडीचं चमचमीत खायला द्यावं आणि गप्पा!! पुर्वीच्या चांगल्या आठवणींमध्ये रमणं आवडतं यांना!!
१. काहीही करू नये, फक्त
१. काहीही करू नये, फक्त त्यांच्याबरोबर वेळ घालवावा, त्यांना आवडेल त्या प्रकारे.
२. पुरेसे Vit. D शरीराला मिळेलसे बघावे.
वृद्ध व्यक्तिचे कुणी जुने
वृद्ध व्यक्तिचे कुणी जुने नातेवाईक/तरुणपणातील परीचित असतील तर त्यांना मुद्दाम कधीतरी बोलवावे. जुन्या वेळच्या गप्पा काही तास रंगतात आणि नंतरचे कितीतरी दिवस त्या जुन्या आठवणीत फार छान जातात. माझ्या आजीच्या बाबतीत आम्ही हे अनुभवले आहे.
आमच्या शेजारी एक ज्येष्ठ
आमच्या शेजारी एक ज्येष्ठ महिला भजनी मंडळ जमते. एकसाथ बेसूर गातात पण घरातून गाऊन बाहेर पडतात तेव्हा चेहरे अगदी प्रसन्न असतात, ओरडण्याची खुमखुमी पण इथेच भागवत असाव्यात... पण माझी आई काही तिथे जात नाही...हमममम...एकेकाचे नशीब
विनीता भारी पोस्ट.
विनीता भारी पोस्ट.:हहगलो:
वृद्धापकाळातीळ नैराश्याचा (
वृद्धापकाळातीळ नैराश्याचा ( खर तर कुठलेही नैराश्य) काही भाग हा जैविक कारणामुळे असतो तर काही परिस्थितीजन्य उदभवलेला असतो. जैविक गोष्टीसाठी सरळ मानसोपचार तज्ञाकडून गोळ्या घ्याव्यात. तर अन्य प्रकारासाठी सकृतदर्शनी अनेक निरर्थक वाटणार्या गोष्टी कराव्यात. उदा. डाव्या हाताने ब्रश करणे, डाव्या हाताने काही लिहिणे ( उजवेखोरांसाठी) वाती वळणे, स्वेटर विणणे, नामजप करणे, स्त्रोत्र म्हणणे, रेडिओवर जुनी गाणी ऐकणे, चित्र काढण्याचा प्रयत्न करणे. स्मृती रंजन करणे, उमेदीच्या काळात काही चुका केल्याची जाणीव त्रास देत असेल तर त्याचे अन्य काही सत्कृत्य करुन परिमार्जन करणे. आत्मसंवाद करणे, मोठ्याने वाचन वा गाणी म्हणणे.
अर्थात घरातल्या अन्य लोकांनी त्यांना तुम्ही निरुपयोगी झाले आहात ही कधीही जाणवू देउ नये.कौटुंबिक गप्पा परस्पर पुरक असतात. हे सगळे बोलायला सोपे आहे पण तसा प्रयत्न करावा. शेवटी ठेविले अनंते तैसेची रहावे हे देखील कधी कधी त्रास कमी करते.
संध्या छाया भिवविती हृदया! ची जाणीव झाली.
धन्यवाद प्रतिसादांबद्दल.
धन्यवाद प्रतिसादांबद्दल.
प्रतिसादांमधून गोळा केलेल्या उपायांची ही एक संक्षिप्त यादी :
ज्येनांसाठी वेगळा वेळ देणे
आपण अजूनही या सार्यांना हवे आहोत आणि या घराचा महत्वाचा घटक आहोत ही भावना त्यांच्या मनात निर्माण होणे व ती टिकवण्यास कुटुंबियांनी मदत करणे
ज्येनांबरोबर गप्पा, त्यांच्या जुन्या ओळखीच्या माणसांबरोबर गप्पा
ज्येनांनी आवडीनिवडी, छंद जोपासणे
स्मरणरंजन, जुन्या आठवणींना उजाळा
त्यांना भरपूर डी व्हिटॅमिन मिळेल असे बघणे
ऑनलाईन सर्फिंग, शॉपिंग
अधूनमधून पथ्याचे परंतु चमचमीत असे खाद्यपदार्थ ज्येनांना खिलवणे
योग्य व्यायाम, आहार, उपचार व औषधे
आत्मचरित्र / डायरीचा उपाय
आत्मचरित्र / डायरीचा उपाय आवडला.
डीविनिताची पोस्टही झकास आहे!!
परिचयातील काही आज्या किंवा घरातील ज्येष्ठवयीन स्त्रियांना त्यांच्या काळी प्रचलित असलेली गाणी, गोष्टी, उखाणे, कविता लिहायला सांगितल्या तर ते आठवून लिहिण्यातही चांगला वेळ जातो त्यांचा. तसेच वेगवेगळ्या घरगुती पदार्थांच्या पाककृती, गृहोपयोगी सल्ले वगैरे लिहून काढणे. त्यांच्या काळी त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी कशा मॅनेज केल्या ते लिहून काढणे.
गॅलरीतून बाहेर बघत बसणे हाही वेळ घालवण्याचा, जगाशी थेट नाही तरी अप्रत्यक्ष संबंध राखण्याचा चांगला उपाय आहे.
लहान मुलांना / इतर मुलांना
लहान मुलांना / इतर मुलांना शिकवण्याजोगे काही त्यांच्याकडे असेल तर त्यांच्याकडे ट्युशन लावणे.
स्वतःच्या आयुष्यात घडून गेलेल्या चांगल्याच गोष्टीं ची / माणसांची यादी करणे. व चांगले अनुभव लिहून काढणे.
बायकांनी/पुरुष्यांनी त्यांच्या खास रेसिप्या लिहून काढणे.
आमच्या ओळखीचे एक आजोबा
आमच्या ओळखीचे एक आजोबा क्रिकेटचा भावी संघ निवडत बसायचे वही घेऊन. तसेच सगळे स्कोअर्स लिहून काढायचे.
ज्या ज्येष्ठांना पाळीव
ज्या ज्येष्ठांना पाळीव प्राणी, लहान मुले, माणसांची फारशी आवड नाही, अध्यात्मात रुची नाही, घराबाहेर पडायला व लोकांमध्ये मिसळायला फारसे आवडत नाही अशांच्या बाबतीत त्यांचे औदासिन्य, निराशा कोणत्या प्रकारे दूर करणे शक्य आहे?
माझे वडिल ह्या प्रकारात मोडतात. २ वर्षापुर्वी आई गेली तेव्हा वय ७० होते. वडिल मुम्बईत आणि मी परदेशात आणि बहिण पुण्यात. कामासाठी थोडेफार comuter आणि internet शिकले होते. आम्ही त्याना फेसबुक चे account उघडुन दिले, गुगल वर लेख शोधुन कसे वाचावेत ते शिकवले. त्यामुळे आता computer वर बर्यापैकी वेळ जातो. ( वडिल कानडित शिकल्यामुळे मायबोली वर येउ शकन नाहीत पन बर्याच कानडी , हिन्दी आणी english site वर जाउन जे आवडते ते वाचत असतात.) घराच्या बाहेर न पडता त्याचा बर्यापैकी वेळ जातो आणी जेव्हा पाहिजे तेव्हा log on होऊ शकतात. कित्येकदा रात्री अपरात्री झोप येत नसेल तर फेसबुक वर comment टाकतात.
ज्येष्ठांना Computer अवघड नाही. माझ्या आईने ६२ व्या तर वडलानी ६५ व्या वर्षी प्रथम Computer वापरायला सुरवात केली. आईचे शिक्षण पण फार झाले न्हवते.
अहो साहिल शहा. मायबोली कानडीत
अहो साहिल शहा. मायबोली कानडीत पण सुरु झालीय की.:स्मित: अॅडमीनना विचारुन बघा.
माझी आई, ८० पुर्ण.. अनेक
माझी आई, ८० पुर्ण.. अनेक शारिरीक, मानसिक आघात पचवून आजही हसतमुख असते. अजून स्वतः जेवण रांधते ( माझीच आई ती ) भजनाचा ग्रुप कार्यरत आहे. घर संभाळत असते.. फक्त एकच त्रास म्हणजे टिव्हीवरच्या मालिका बघणे सुटत नाही.
तिच्या बर्याचश्या मैत्रिणी आता काळाच्या पडद्याआड गेल्यात पण तरी नवीन पिढीत जीव रमवते. परदेशात असलेले माझे मामेभाऊ ( पंचतारांकीत शेफ ) भारतीय पदार्थांबाबत अजून तिचा सल्ला घेतात.
फिरायची आवड आहे. तशी स्वतःला फिट ठेवते. स्वतः तपासण्या करून घेते... पण एवढे सगळे संभाळूनही मालिकांच्या वेळा संभाळतेच.
एकदम झकास दिनेशजी. तुमच्या
एकदम झकास दिनेशजी.:स्मित: तुमच्या आईना आमचा नमस्कार सान्गा.
माझ्या आईचे वय पण ७०. बाहेरची सर्व कामे करते. गाणी म्हणण्याचा छन्द आहे. शेजारच्या तिच्याहुन मोठ्या काकुन्ची, त्यान्च्या आजारपणात तिने काळजी घेतली होती, कारण त्यान्ची मुले पण लाम्ब होती.
माझ्या मैत्रिणीच्या सासुबाई अजूनही ( वय ७० च्या पुढेच) घरी स्वतःचे ब्लाऊज शिवतात, भजनाला जातात, पेटी शिकत आहेत. गाण्याचा क्लास लावलाय, कारण मुले लहान होती तेव्हा ईच्छा असुनही त्याना शिकता आले नव्हते, कुटुम्बाची बाकी जबाबदारी होती. कला- छन्द जोपासताना वयाचे भान नसावेच, उलट त्यातुन आनन्द मिळतो.
एकदा मुलीचे चित्र रन्गवुन देताना, मी स्वतःच ते रन्गवत बसले.:फिदी: मुलगी वैतागली. माझ्या पण म्हातारपणाची सोय झालीय आता.:फिदी:
माझे वडिल वय ८०. जुन्या काळचे
माझे वडिल वय ८०. जुन्या काळचे सिओईपीचे स्थापत्य अभियंता. २० वर्श्यांपूर्वी आपले आपण पुस्तके वाचून सी लॅन्ग्वेज शिकले. अजूनही सकाळी गजर वगैरे लावून पहाटे उठून नवनवीन भाषा शिकतात. जेष्ठ नागरिकांना कॉम्प्युटर शिकवतात. संस्कृतचा अभ्यास करतात व इच्छुकांना शिकवतातही.
डीविनिता तुम्हाला वाण नाही पण
डीविनिता तुम्हाला वाण नाही पण गुण लागलाय माझा . पण मस्त लिहीलय.
एकटं राहुन काही उपयोग होत नाही वृद्धापकालीन नैराश्यावर ,त्यासाठी कमीत कमी जवळची एक व्यक्ती दिवसातला काही काळ तरी सोबत हवी .लोकांशी हाय हेलो पुरता तरी संबंध हवा. मित्र मैत्रीणी असतील तर बर्याच प्रमाणात मन हलकं करता येतं.गप्पा मारणे हे वर सगळ्यांनी सांगितलच आहे.
घरात भांडायला कोणी असेल तर तेही बेस्ट ,कारण कोणीतरी भांडण्याच्या बहाण्याने तरी आपल्याशी बोलत आहे याचे समाधान असते. त्यामुळे अवश्य भांडा घरातल्या घरात.
व्यायाम ,औषधे,पथ्य पाणी याचा सतत विषय त्यांच्या समोर काढू नये. त्याने ते जास्त चिडतात व चोरुन चिटिंग करतात ,आणि आपला आरोग्याचा रिपोर्ट खराब करतात.पण तरीही आहाराकडे व औषधे देण्याकडे नकळत काटेकोर लक्ष ठेवा.शक्यतो त्यांची कामं जर त्यांना जमत असतील तर त्यांनाच करु द्या.
वृद्धांना शक्यतो सतत न्युज आणि इतर दुखद घट्ना फार काळ पाहण्यास देवु नका .सिरियल चालतील(ते त्या सोडणारच नाहीत त्यामुळे).पण त्या चालु असताना मधे व्यत्यय आणु नका. किंवा त्यांच्या आवडत्या व्यक्तीरेखेला त्यांच्या समोर काही बाही बोलु नका मागुन चालेल. (माझ्या माहीतीतल्या एक अतीशय यंग अशा ८० वय असलेल्या आजी अप्सरा आली व डान्स इंडिया डान्स बघायच्या ,त्यामुळे ज्याची त्याची आवड .काहींना मगरी ,प्राणी डिस्कवरी किंवा कुकरी शो ही आवडतात ).
नवीन काही शिकायची इच्छा नसल्यामुळे व इतर शारीरीक दुर्बलतेतून जर का नैराश्य आले तर त्यांना धीर देण्याचे काम पेशंन्सनी करावे व इतर उपदव्यापी व्यक्ती आणि त्रास देणार्या नातेवाईकांना आधीच तब्बेती विषयी समज द्यावी .(हे आजारी व्यक्ती ज्या बेडरेस्ट वर आहेत त्यांच्या साठी)
"हास्य क्लब" कीतीही विचित्र वाटले तरी त्याचा उपयोग होतो. आवड नसेल तरी तीथे काही समवयस्क नमुनेदार व्यक्ती पाहण्यात टाईम पास होतो त्यामुळे १/२ तास जाण्यात हरकत नसावी .
वृद्धापकालीन नैराश्यावर उपाय
वृद्धापकालीन नैराश्यावर उपाय काय?
<<
व्यस्त (बिझी) राहणे.
वेळ मिळाल्यास अधिक लिहीन.
मला इथे माझ्या आई-वडलांबद्दल
मला इथे माझ्या आई-वडलांबद्दल सांगावसं वाटतंय. दोघेही ८०च्या घरात आहेत. आपआपले जीव रमवतात. एकमेकांना चांगला क्वालिटीटाइम देतात.
आयुष्यभर खूप मित्र आणि नातेवाईक जोडलेत. ते येत जात असतात. शेजारपाजार सतत आंगणात पडीक असतो. 'आमच्यावेळी असली थेरं नव्हती' हे चुकूनही तोंडून निघत नाही.
वडील प्रचंड वाचतात आणि HBO बघतात. आई तिच्या सटरफटर मालिका बघते.
आईबद्दल आणखी सांगावसं वाटतंय. तिच्या वडलांच्या अॅक्सिडेंटमधल्या हात निकामी होण्यामुळे वयाच्या १८व्या वर्षी तिला घरातली आर्थिक जबाबदारी पेलावी लागली. एकाच शाळेत तिनं ४२ वर्षं शिक्षिकेची नोकरी केलीय. नोकरी करताना बीएड आणि मास्टर्स्पर्यंत डिग्री घेतलीय. माहेर, स्वतःचा संसार, आमचं अनेक वर्षं एकत्र कुटुंब हे सगळं सांभाळून ती नागपुरात तरूण भारतात बालविभाग चालवायची, रेडिओसाठी श्रुतिका लिहायची. नंतर लहान मुलांसाठी पुस्तकं लिहिली. लेखन अजूनही नियमीतपणे करते. छापायला पाठवते. त्यात उत्तम वेळ जातो. ती उत्तम शिक्षिका तर आहेच पण याही वयात उत्तम विद्यार्थी आहे. कुठलीही नवी गोष्ट मनापासून शिकते. दासबोध आणि कसलेकसले पोस्टल कोर्सेस करते.
एकसष्ट्याव्या वर्षी रिटायर झाल्यावर तिला एक लक्षात आलं, तिच्यासारखे अनेक शिक्षक अचानक रिकामपण आल्यानं बावचळून गेलेत. आयुष्य निरर्थक वाटू लागलंय. तिनं शाळेतल्या निवृत्त शिक्षकांचा एक ग्रूप तयार केला. त्यांच्या रेग्युलर मिटिंगा, भेटीगाठी, सहली, विद्यार्थ्यांसाठी मदत अश्या अनेक योजना सुरू झाल्या. नोकरीत असताना होती तितकीच बीझी राहिली.
वयोपरत्त्वे तब्बेतीच्या कुरबुरी असतात. पण 'म्हातारपणी हे चालायचंच' असं स्विकारून आनंदात रहायचा प्रयत्न करतात.
कुटुंबातल्या त्यांच्याहून लहान व्यक्तींचे अकाली मृत्यू त्यांना भयंकर अस्वस्थ करतात तेव्हा आपण काही करू शकत नाही या भावनेनं हताश व्हायला होतं. पण त्या दु:खातून, नैराश्यातून बाहेर काढायला कुणीही पुरं पडणार नाही. आपणच आपल्याला गुंतवायला हवं हे समजून घेऊन रुटीनला लागतात.
एरवी लेक म्हणून जे काय खटके उडायचे ते उडतात्च पण त्यांचं वागणं मला बरंच काही शिकवून जातं. असे आईबाप मिळाल्यानं ब्लेस्ड वाटतं.
पूर्वी वार्धक्य जीवन जितके
पूर्वी वार्धक्य जीवन जितके युनिफोर्म होते तसे आता राहिलेलं नाही. त्यामुळे वन साईझ फीट्स ऑल असे सोल्युशनही नाही. आपल्या परिस्थितीचा परखड आढावा घेवून स्वतः सोल्युशन शोधणारी वृद्ध मंडळी खर्या अर्थाने 'वृद्ध = वाढलेली'!
व्यस्त / बिझी राहण्याचा उपाय
व्यस्त / बिझी राहण्याचा उपाय हा तर आहेच! आणि हे बिझी राहाणे स्वतःच्या आवडीचे व मर्जीचे असेल तर फारच उत्तम!
परंतु....
मी हेही पाहाते आहे की कधी कधी या गोष्टींचाही कंटाळा येतो ज्येनांना. खास करून जवळचे किंवा अगदी घनिष्ट परिचयातील कोणी कालवश झाले की! मग 'आता मीही जाणार लवकरच, मग हे सर्व करून काय फायदा!' यासारखे निराश विचार करणे, गेलेल्याच्या आठवणीने उदास व्हायचे, डोळ्यांतून पाणी काढायचे, पथ्य-तब्येत-व्यायाम इत्यादींकडे दुर्लक्ष करायचे असे करताना तब्येत जर अचानक बिघडली तर मग आणखीच भर.
गेलेल्या व्यक्तीबद्दल, जीवनाच्या अनिश्चिततेबद्दल विचार करत राहायचे आणि स्वतःच्या भवितव्याबद्दल नकारात्मक विचार करून आणखी डिप्रेस व्हायचे... शरीर साथ देत असेल तर ठीक, परंतु हालचालींवर मर्यादा असतील तर इतरांवर आपला भार पडतोय वगैरे विचार करून स्वतःला दु:खी करून घ्यायचे...
अशा परिस्थितीत स्वतःला अडकवून घेतलेली काही 'सुलझी हुई' अशी ज्येना मंडळीही पाहिली आहेत. एरवी भरपूर व्यस्त असणारी, स्वतःला फिट ठेवलेली... पण एखाद्या वाईट घटनेनंतर खचून जाणारी...
या परिस्थितीत समवयस्कांचा जरा चेष्टेखोर किंवा नुस्ता टाईमपास करणारा जरी एखादा ग्रूप संपर्कात असेल तरी त्याने बराच फरक पडू शकतो. अगदी हास्यक्लब, ज्येनासंघ, रोज मॉर्निंग वॉक करणार्यांचा ग्रूप किंवा शाळा-कॉलेजचे दोस्त/ मित्रमैत्रिणी. अगदी एखादी ऑनलाईन कम्युनिटीही चीयर अप करण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते.
माहितीतल्या एका आजोबांचा आवडता छंद म्हणजे ते फेसबुकावरच्या अनेक कम्युनिटीजचे मेंबर आहेत व तेथील इतर मेंबरांना यथेच्छ पकवत असतात. आणि रोज कोणाला कसे पकवले याबद्दल आपल्या कुटुंबियांना सांगत असतात. त्यात त्यांना मजा वाटते.
प्रश्न येतो तो फारसे एक्स्प्रेसिव्ह नसणार्या, स्वभावाने भिडस्त किंवा हळव्या झालेल्या ज्येना लोकांचा.
एखाद्या दु:खी किंवा धक्कादायक प्रसंगानंतर त्यांनी त्यातून स्वतःला सावरले नाही तर घरच्यांसाठी खरेच अवघड परिस्थिती निर्माण होते. अशा वेळी त्यांनी त्यातून बाहेर यावे यासाठी काही करता येणे शक्य असते का?
उत्तम धागा. अकु, अनेक
उत्तम धागा. अकु, अनेक धन्यवाद. खूप काही समजेल/शिकायला मिळेल.
<<माहितीतल्या एका आजोबांचा
<<माहितीतल्या एका आजोबांचा आवडता छंद म्हणजे ते फेसबुकावरच्या अनेक कम्युनिटीजचे मेंबर आहेत व तेथील इतर मेंबरांना यथेच्छ पकवत असतात. आणि रोज कोणाला कसे पकवले याबद्दल आपल्या कुटुंबियांना सांगत असतात. त्यात त्यांना मजा वाटते.>>
>>प्रश्न येतो तो फारसे
>>प्रश्न येतो तो फारसे एक्स्प्रेसिव्ह नसणार्या, स्वभावाने भिडस्त किंवा हळव्या झालेल्या ज्येना लोकांचा.
एखाद्या दु:खी किंवा धक्कादायक प्रसंगानंतर त्यांनी त्यातून स्वतःला सावरले नाही तर घरच्यांसाठी खरेच अवघड परिस्थिती निर्माण होते. अशा वेळी त्यांनी त्यातून बाहेर यावे यासाठी काही करता येणे शक्य असते का?>>
गेलेल्या व्यक्तीच्या चांगल्या आठवणी त्यांच्या बरोबर शेअर करणे जेणे करुन साचलेल्या दु:खाला वाट मिळेल. हलक्या हाताने मसाज केल्यास ताण कमी होऊन मन शांत व्हायला मदत होते. बडबड करणारे केअरगिवर असेल तर त्याने ही फरक पडतो. सुरवातील काही रिस्पॉन्स मिळाला नाही तरी आपल्या बाजूने गप्पा/ बडबड सुरु ठेवायची. हळू हळू थोडा प्रतिसाद मिळायला लागतो.
व्हेरी गुड सजेशन स्वाती२!
व्हेरी गुड सजेशन स्वाती२!
हे एक असंच अवांतर आठवलं म्हणून...
माझ्या एका मित्राच्या आजी वयाच्या अठ्ठ्याण्णवाव्या वर्षी कालवश झाल्या. नव्वद-ब्याण्णव वर्षाच्या होईपर्यंत त्यांची स्मृती व बुद्धी चांगली शाबूत होती. त्यांच्या कम्युनिटीचे दर पंधरवड्याला एक वार्तापत्र निघते. त्यात त्यांच्या कम्युनिटीबद्दलच्या, त्यातील लोकांबद्दलच्या बातम्या छापलेल्या असत. आज्जीबाई ते वार्तापत्र हाती आले रे आले की सर्वात अगोदर श्रद्धांजलीचे पान उघडायच्या. मग जे जे कोणी गेले ते किती वर्षांचे होते, आपल्यापेक्षा लहान होते की मोठे, आपण त्यांना ओळखत होतो का, वगैरे वाचनात त्यांचा खूप चांगला वेळ जायचा!!! पुढचे काही दिवस त्यांना कोणी भेटायला आले, त्यांच्याशी गप्पा मारायला आले की त्यांना तोच विषय पुरायचा. मग ती गेलेली व्यक्ती ओळखीची असेल तर तिच्याबद्दलच्या चांगल्या-वाईट आठवणी त्या सांगायच्या. वाईट आठवणी असतील तर मुद्दामच सांगायच्या. आणि शेवटी म्हणायच्या, बघा, ती व्यक्ती गेली, पण मी अजून जिवंत आहे!! मारली की नाही मी बाजी??!! ऐकणार्याला ते विचित्र वाटायचे. पण आजीबाईंचा तो स्वभाव होता. आपण इतरांपेक्षा जास्त जगलो आहोत याचा त्यांना अभिमान होता. नंतर नंतर त्यांची बुद्धी, स्मृती क्षीण झाली, शरीर खूप दुबळे झाले आणि त्याच आयुष्याचे त्यांना खूप ओझे झाले. कोणाशी बोलायच्या नाहीत. भिंतीकडे तोंड करून डोळे मिटून पडून राहायच्या किंवा स्वतःशी पुटपुटत बसायच्या. त्यांची शेवटची काही वर्षे त्यांच्या कुटुंबियांसाठी खूप अवघड गेली.
दिनेश.... टंकायच्या
दिनेश.... टंकायच्या कंटाळ्यामुळे तुमचा प्रतिसाद ढापला आणि त्यात फेरफार केलेत.
माझी आई, ८१ पूर्ण.. अनेक शारिरीक, मानसिक आघात पचवून आजही हसतमुख असते. अजून स्वतः जेवण रांधते ( माझीच आई असूनही ) सुडोकू सोडवणे, (अल्झायमर टाळ्ण्यासाठी) वाचन , जी काही थोडी झाडे आहेत त्यांना, माळ्याकडून पाणी घालणे, वेळ जाण्यासाठी/ जीव रमवण्यासाठी वेगळे पदार्थ करून देणे इ.संध्याकाळी टिव्हीवरच्या मालिका नुसत्या गळत असतात.समोर टिव्ही आणि ती काहीतरी वाचत रहाते.तिच्यामताने सोबतीला काही आवाज असला की बरं वाटते.
नवीन पिढीत सहज मिक्स होते.
जास्त फिरू शकत नाही, तरी स्वतः तपासण्या करून घेते.इतर कामे करून येते.
Pages