वृद्धापकालीन नैराश्यावर उपाय काय?

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 11 November, 2014 - 05:44

रोजच्या आयुष्यात टीव्ही, वर्तमानपत्रांतल्या धक्कादायक बातम्या पाहिल्या की आपण अस्वस्थ होतो. जग सुरक्षित नसल्याची पुन्हा एकवार जाणीव होत राहाते. दंगली, खून, मारामार्‍या, दरोडे, हल्ले, चकमकी, बलात्कार, आपत्ती, दुष्काळ वगैरे बातम्या वाचल्या की ते वर्तमानपत्र पुन्हा उघडावेसेही वाटत नाही. निकटवर्तीयांमध्ये कोणाकडे आकस्मिक निधन, वाईट अपघात, दीर्घ आजार, दु:खद घटना घडल्या की कितीही म्हटले तरी मनावर एक मळभ येतेच!

वृद्ध व्यक्तींच्या बाबतीत शरीर जसजसे थकत जाते तसतसे मनही खूप कातर होत जाताना दिसते हे पाहिले आहे, अनुभवले आहे. लहानसहान घटना मनाला लावून घेणे, शारीरिक असमर्थतेमुळे मन खट्टू होणे, शरीराची दुर्बलता ही आयुष्याच्या आनंदात बाधा आणणारी मानणे, आप्तस्वकीयांचा वियोग - विरह सहन न होणे, बदलत्या काळासोबत स्वतःला बदलण्याची तयारी नसणे व त्यातून आलेले वैफल्य, रिकाम्या वेळाचा वापर कसा करायचा हे न कळल्यामुळे व शारीरिक असमर्थतेमुळे आलेल्या मर्यादा, मनाचा हट्टीपणा.... या आणि अशा अनेक गोष्टी ज्येष्ठांच्या बाबतीत त्यांच्या मनातली नैराश्याची भावना घट्ट करत जाऊ शकतात. त्यात कोणा जवळच्या व्यक्तीचे निधन झाले, कोणाचा अपमृत्यू झाला, टीव्हीवर कोणतीतरी भयानक बातमी पाहिली किंवा काहीतरी अस्वस्थ करणारे वाचनात आले की झाले!

काही वेळा एखादे आजारपण झाले की आजारपणानंतर आलेल्या शारीरिक दुर्बलतेतून मानसिक स्वास्थ्यही बिघडते. स्वतःच्या शक्तीवरचा, क्षमतेवरचा विश्वास उडतो. भीती वाटते. वेदनांची, मृत्यूची भीती आणि आपल्यानंतर काय याची चिंता झोप उडविते.

मनातल्या मनात कुढणे, जगाशी संपर्क नकोसा वाटणे, कोणाशी संवाद साधणे नकोसे होणे, औषधोपचारांस व वैद्यकीय तपासणीस खळखळ व टाळाटाळ, कुपथ्य, व्यायामाबाबत व योग्य आहाराबाबत उदासीनता, स्वतःच्या परावलंबी असण्याबद्दलची खंत, त्रास, चिंता आणि या परिस्थितीतून बाहेर पडण्याबद्दल अनुत्साह... हे सारे कसे हाताळायचे?

या सार्‍याचा परिणाम त्यांच्या शरीरस्वास्थ्यावर तर होतच असतो, शिवाय इतर कुटुंबावरही त्याचा परिणाम होत असतो. त्यांचे खिन्न असणे हे जवळच्यांना सहन न होणारे असते. ज्येष्ठ व्यक्ती जर वेगळी राहात असेल व स्वतःचे स्वातंत्र्य अबाधित राखण्याबद्दल आग्रही असेल तर अनेकदा हे नैराश्य लवकर कळूनही येत नाही.

ज्येष्ठांमधील नैराश्याला दूर करण्यासाठी वैद्यकीय उपचारांव्यतिरिक्त कोणते उपाय करता येतात व येऊ शकतात?

ज्या ज्येष्ठांना पाळीव प्राणी, लहान मुले, माणसांची फारशी आवड नाही, अध्यात्मात रुची नाही, घराबाहेर पडायला व लोकांमध्ये मिसळायला फारसे आवडत नाही अशांच्या बाबतीत त्यांचे औदासिन्य, निराशा कोणत्या प्रकारे दूर करणे शक्य आहे?

यासंदर्भातील काही उपयुक्त माहिती, सल्ले, अनुभव, टिप्स जरूर शेअर कराव्यात.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्या ज्येष्ठांना पाळीव प्राणी, लहान मुले, माणसांची फारशी आवड नाही, अध्यात्मात रुची नाही, घराबाहेर पडायला व लोकांमध्ये मिसळायला फारसे आवडत नाही अशांना कदाचित या धाग्यावरील प्रतिसादकांच्या घरातील सकारात्मक विचाराच्या वृद्धांच्या काही कृती / जोपासलेले छंद मनाला भावू शकतात व तेही तो मार्ग अवलंबू शकतात, ही शक्यताही नाकारता येणार नाही. त्यामुळे धागा भरकटला आहे असे नाही.

मागे लोकसत्ता - चतुरंगमध्ये वाचल्याचे आठवते. एक बाई व त्यांचे पती आपले निवृत्तीनंतरचे आयुष्य आनंदात घालवत असतांना अचानक पतीचे निधन झाले व त्या बाई नैराश्यग्रस्त झाल्या. (हेडरमध्ये अकुने हा मुद्दाही लिहिला आहे - जोडीदाराच्या मृत्यूनंतर आलेल्या नैराश्यावरील उपाय). त्यावेळी त्या बाईंनी कुणाच्या सांगण्यावरून ६५व्या वर्षी गाणे शिकायला सुरुवात केली व या सरस्वतीच्या उपासनेने त्या नैराश्यातून बाहेर आल्या. आता त्या स्वतः गाण्याचे क्लासेस घेतात. असेही होवू शकते काही ज्येष्ठांच्या बाबतीत.

आपली कोणालातरी खूप गरज आहे ही भावना आणि संबंधित कृतीही ज्येनांना निराश मनस्थितीतून बाहेर येण्याचे बळ देऊ शकते याचे प्रत्यंतर नुकतेच एका ओळखीच्या बाईंबद्दल पाहावयास मिळाले.

गेली अनेक वर्षे या बाई स्वत:च्या मर्जीने एकट्या राहातात. खूप छंद वगैरे लावून घेतलेत. मैत्रिणींबरोबर सहलींना जातात. मुलीने आपल्याकडे खूपदा राहायला नेले, पण तिथे त्यांना करमत नाही. तर झाले काय, बघता बघता अचानक एक दिवस या बाईंची तब्येत खूप बिघडली व आयसीयूत दाखल करावे लागले. मोठी सर्जरी झाली. त्यानंतरचा अशक्तपणा. इतरांवर अवलंबून राहावे लागते याचे दु:ख. बाई उदास राहू लागल्या. कशात मन रमेना. सारखी निरवानिरवीचीच भाषा. जवळचे नातलगही वैतागले. या काळात बाईंना त्यांची थोरली बहीण व मेव्हण्यांनी खूप समजून घेतले. मायेचा आधार दिला. प्रेमळ दटावणी करून आपल्याकडे काही दिवस घेऊन गेले. त्यांना घेऊन एखाद्या कार्यक्रमाला जाणे, नाटक सिनेमा पाहाणे, गप्पा मारणे वगैरे तर होतेच! पथ्याबाबतही काटेकोर होते दोघे. हळूहळू या बाई सावरल्या. पण तरी खिन्न असायच्या. पूर्वीसारख्या लोकांमध्ये मिसळायच्या नाहीत. एकटीलाच बरे वाटते म्हणायच्या.

अचानकपणे त्यांचे थोरले मेव्हणे काही ध्यानीमनी नसताना वारले. त्यांची मुले परदेशात. बहिणीची अवस्था बिकट. ते पाहून यांना आपण आता आपल्या बहिणीसाठी स्ट्राँग झालेच पाहिजे याची जाणीव झाली. निराश मनस्थितीतून बाहेर पडून त्या कधी बहिणीसाठी चार गोष्टी करू लागल्या हेच त्यांना कळले नाही. बहिणीबरोबर वेगवेगळ्या बँक्सना भेट देणे, व्यवहारासंबंधी कामे, बहिणीची सोबत करणे, तिचे मेडिकल चेकअप वगैरे. बिझी आहेत. आपल्याला ज्या बहिणीने खूप मदत केली तिच्या काही अंशी तरी उपयोगी पडू शकतोय ही भावना आहे. आता दोघी मिळून सहली प्लॅन करत आहेत. निरवानिरवीची भाषा संपलेली आहे. त्याची जागा 'आहेत ते दिवस मजेत घालवायचे' या विचाराने घेतली आहे.

कसे असते ना माणसाचे मन. आपल्या प्रेमाच्या व्यक्तीला सावरण्यासाठी स्वतः ला सावरणारे!

अकु, छान पोस्ट! जगायला उद्देश्य हवा नाही का? तो नसेल तर नैराश्य येत असेल. वासंतिका पुणतांबेकर ( भाषांतकार) मावशी स्वेच्छेने वृध्दाश्रमात राहायला गेल्या आहेत. समवयस्काबरोबर मजेत आहेत. तिथेही खूप सामाजिक कार्य करत असतात. तसेच त्या मीरा बडवेंच 'निवांत' हिंदीत भाषांतरीत करताहेत. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात छान पुस्तक भाषांतरीत करण्याचा आनंद त्यांच्या देहबोलीतून, शब्दातून ओसंडून वहात होता. आर्थिक नियोजन करतो त्याप्रमाणे नैराश्य टाळण्यासाठीचेही नियोजन करायला हवे त्याची सुरुवात ५०-६० मध्येच करायला हवी.

आर्थिक नियोजन करतो त्याप्रमाणे नैराश्य टाळण्यासाठीचेही नियोजन करायला हवे त्याची सुरुवात ५०-६० मध्येच करायला हवी. >> पते की बात!
पुणतांबेकर मावशींबद्दल वाचून छान वाटले. उतारवयातही खूप चांगल्या प्रकारे आयुष्य जगणारे व इतरांना प्रेरणा देणारे लोक पाहिले की त्यांच्या समवयस्कांनाही धीर येत असेल.

स्वाती२, हो, मन खरेच गमतीशीर आहे! आणि त्याला सावरायला प्रेमाची ताकद खूप उपयोगी पडणारी आहे.

आधीपासून न जमले तरी किमान वयाच्या पन्नाशीत असल्यापासूनच आवडिचे छंद जोपासावेत हे अगदीच बरोबर.

चालण्याने स्वसंवाद वाढतो व कटू भावनांचा निचरा होण्यास वेळही मिळतो. चालणे हा चांगला व्यायाम आहे.

माहीतीतल्या एका बाईंनी स्वतःच वृद्द्धाश्रम चालू केला होता.

>>>माहीतीतल्या एका बाईंनी स्वतःच वृद्द्धाश्रम चालू केला होता.<<<

हे तर मस्तच!

समजा अगदी वृद्धाश्रम नाही शक्य झाला तरी ज्येष्ठांसाठी काहीतरी उपक्रम सुरू करणेही मस्त!

तुम बेसहारा हो तो किसीका सहारा बनो - ची आठवण झाली. Happy

कसे असते ना माणसाचे मन. आपल्या प्रेमाच्या व्यक्तीला सावरण्यासाठी स्वतः ला सावरणारे! >>>> अगदी! Happy

Pages