क्रॅपी न्यू इअर - (Movie review - Happy New Year)

Submitted by रसप on 26 October, 2014 - 01:56

घराजवळ एक हॉटेल आहे. साधंसंच. तिथले कटलेट मला जाम आवडतात. परवा मी माझे आवडते 'कटलेट' खात असताना एक मित्र आला. मी त्याला म्हटलं की 'तूही घे, मस्त असतात.' पण त्याने नाही म्हटलं.
नंतर माझं खाऊन झाल्यावर म्हणाला की, 'तुला माहित आहे का हॉटेलात कटलेट कसे बनवतात ?'
मी म्हटलं, 'नाही !'
'इतर भाज्या वगैरे बनवताना गॅस शेगडीजवळ जे सांडलेलं असतं ना ? ते गोळा करतात अन् देतात 'कटलेट' म्हणून शिजवून. आणि तुझ्यासारखे मूर्ख मस्त मिटक्या मारत खातात !'
हे खरं की खोटं, माहित नाही. पण आता मी आयुष्यात कधी 'कटलेट' हा प्रकार खाऊ शकणार नाही. काय सांगावं ! भटारखान्याच्या बंद दरवाज्याआड काय काय चालत असेल ! आपण शुद्धतेची खात्री मानून जे खातो, त्याच्याकडून किमान स्वच्छतेची अपेक्षा करावी, इतपत तरी त्याची योग्यता असेल का ?
अपेक्षा ! खरं तर अपेक्षा करणंच कधी कधी चूक असतं. इतकेच चोचले असतील तर जावंच कशाला थेटरात ? सॉरी.. हॉटेलात !
Actually थेटरात पण. हो ना ! 'मैं हूँ ना' आवडला म्हणून 'ओम शांती ओम' पाहिला. ठीक वाटला. तरी 'तीस मार खान' पाहिला. भंकस वाटला. त्या नंतरही मी अपेक्षा ठेवली की फराह खान भावापेक्षा बरी असेल आणि 'हॅपी न्यू इअर' पाहिला.
तर काही इंग्रजी सिनेमांच्या भटारखान्यात जमिनीवर सांडलेलं, पाय पडलेलं खरकटं कथानक आणि 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'मैं हूँ ना', 'चक दे इंडिया' वगैरे बनवताना शेगडीबाहेर जे सांडलं होतं ते गोळा करून संवादाचे कटलेट्स माझ्यासमोर आले. गेल्या कित्येक सिनेमांत निव्वळ धांगडधिंगा शिजवताना विशाल-शेखरकडून जे ओघळ उतरून खरपुड्या झाल्या होत्या, त्यांची गाणी बनवलीत.
खरं तर गेल्या काही काळापासून, खास करून धूम -३ नंतर आमीर खान जाम डोक्यात जायला लागला आहे. सलमान खान तर इतका दाक्षिणात्य झाला आहे की आता त्याच्या तोंडी हिंदी डायलॉग (जे त्याला असंही येतच नाही) अजिबातच शोभेनासे झालेत. त्यामुळे आत्ता कुठे मला खानांतला शाहरुखच त्यातल्या त्यात बरा आहे असं वाटायला लागलं होतं. म्हणून हा 'क्रॅपी न्यू इअर' बघायला गेलो, तर 'जतहैंजा'चा ओंगळवाणा गेट-अप शिजवून झाल्यावर जी बरबट भांड्यांना राहिली होती, ती थापलेला अगदी रोगट दिसणारा शाहरुख समोर आला.
बरं हे सगळं तब्बल तीन तास सहन करावं लागलं. कटलेटवर कटलेट, कटलेटवर कटलेट डोक्यावर थापत जाऊन डोक्याचं भलं मोठं भजं झालं आणि पायाच्या करंगळीच्या नखापर्यंत तेलकट ओघळ घेऊन मी जेव्हा घरी परतलो, तेव्हा मी परत आल्यासारखा परतलेला नव्हे तर कढईत परतल्यासारखा परतलेला दिसत होतो.

मित्राने कटलेटची रेसिपी माझं खाऊन झाल्यावर सांगितली, पण मी ती चूक करणार नाही. म्हणून मी फराह खानच्या कटलेटची रेसिपी आधीच सांगून ठेवतो.

उदरनिर्वाहासाठी 'स्ट्रीट फाईट्स' करणारा 'चार्ली' (शाहरुख) वडिलांना - मनोहरला - (अनुपम खेर) त्यांच्या हाय एंड तिजोऱ्या बनवण्याच्या धंद्यात फसवणाऱ्या चरण ग्रोव्हर (जॅकी श्रॉफ) चा वचपा काढण्यासाठी आसुसलेला असतो. वडिलांचे मित्र टॅमी (बोमन इराणी) आणि जॅग (सोनू सूद) सुद्धा त्याच बदल्याच्या आगीत होरपळत असतात. ती संधी त्यांना मिळते. ग्रोव्हरने ३०० कोटीचे हीरे, मनोहरकडून घेतलेल्या 'शालीमार' तिजोरीत ठेवले असतात. ही तिजोरी लुटायचा प्लान बनवला जातो. पण तिजोरी लुटण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात.
१. तिथपर्यंत जाणे फक्त ग्रोव्हर व त्याचा मुलगा विकी( अभिषेक बच्चन)लाच शक्य असते. म्हणून विकीचा डुप्लिकेट नंदूला उचललं जातं.
२. तिजोरीभोवती असलेलं लेजर किरणांचे संरक्षक कडं भेदायला एक हॅकरही हवा असतो म्हणून अजून एक मेंबर 'रोहन' (विवान शाह) हा (बहुतेक) जॅगचा पुतण्या (की भाचा) टीममध्ये घेतला जातो.
जिथे हीरे ठेवलेले असतात तिथे 'वर्ल्ड डान्स चॅम्पियनशिप' होणार असते. मग डान्स शिकवण्यासाठी मोहिनी (दीपिका) हेरली जाते.
अशी ही सहा जणांची टीम बनते. ती आचरट चाळे करून वात आणते.

फक्त हा आचरटपणाच जर त्यांनी ग्रोव्हरसोबत केला असता, तरी त्याने त्यांना स्वत: होऊन ३०० कोटीचे हीरे दिले असते आणि माफीही मागितली असती. पण त्यांना त्याला वात आणायचा नसतो, तर त्याची वाट लावायची असते म्हणून ते तसं न करता चोरीच करायचं ठरवतात. त्या चोरीचं पुढे काय होणार, 'वर्ल्ड डान्स चॅम्पियनशिप'चं काय होणार, हे सगळं आपल्याकडे बॉलीवूडी कटलेट्सचा तगडा अनुभव असल्याने कुठलाही आश्चर्याचा धक्का वगैरे देत नाही.

Happy-New-Year-movie-image.jpg

विनोद म्हणून नंदूला हुकमी उलटी करणारा दाखवणं, हा विनोदाचा ओकारी आणणारा किळसवाणा प्रकार आणि 'वर्ल्ड डान्स चॅम्पियनशिप' बोलताना तोंडावर हात फिरवणं, तोंडात ब्रश केल्यासारखं बोट फिरवणं वगैरे तर पांचटपणाचा कळसच होता ! एकंदरीतच विनोदाचे सगळेच प्रयत्न एक तर केविलवाणे किंवा हिणकस आहेत.
झगमगाट आणि भडक रंगांची उधळण काही जणांचे डोळे सुखावते, दीपवते. मला तर ते पैश्याचं विकृत प्रदर्शन वाटलं. सौंदर्याला मेक अप आणि दागदागिन्यांनी मढवल्यासारखं मला वाटलं नाही, तर त्याच्या बोज्याखाली दबल्यासारखं वाटलं.

ओरिजिनल असलं, नसलं तरी एक बरं कथानक होतं. पण केवळ ढिसाळ हाताळणी आणि प्रदर्शनाच्या आहारी गेलेली कल्पकता ह्यामुळे तीन तासाचं वाटोळं होतं.
'मनवा लागे..' आणि 'इंडियावाले' ही दोन गाणी फक्त मुखड्यात छान आहेत. त्यानंतर विशाल-शेखर 'ये रे माझ्या मागल्या' करत नेहमीचीच ओढाताण किंवा धिंगाणा करतात.

कोरड्या दुपारच्या रखरखाटात अचानक कुठूनशी एखादी थंड हवेची झुळूक यावी, तशी अधूनमधून दीपिका दिसते आणि क्षणभराचा दिलासा मिळतो.
बोमन इराणी शेवटी 'बोमन इराणी' आहे, त्यामुळे सगळ्या हाराकीरीतही तो तग धरतोच.
अभिषेक बच्चन कबड्डी आणि फुटबॉलच्या मैदानावरच चांगला अभिनय करत असतो का ?
शाहरुखने सलमान किंवा आमीर बनायचा प्रयत्न न करता शाहरुखच राहावं, असं माझं प्रांजळ मत आहे. पोटावर अठ्ठावीस पॅक्स आणले तरी आधी 'हेल्दी' दिसणं महत्वाचं असतं. सोनू सूद आणि शाहरुख दोघेही ह्या सिनेमात भरपूर अंगप्रदर्शन करतात. पण ते फक्त एकालाच 'शोभतं'.

असो.
थेटरमध्ये उसळलेली गर्दी, हॉलमध्ये शिट्ट्या आणि हाळ्यांचा पाऊस ह्यावरून हे तर निश्चित की कितीही भिकार असलं तरी हे कटलेट 'कोटीचं उड्डाण' करेलच, पण म्हणून त्याला चविष्ट म्हटलंच पाहिजे असं थोडीच आहे ?

रेटिंग - धूम -३ पेक्षा जरासा बरा
http://www.ranjeetparadkar.com/2014/10/movie-review-happy-new-year.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नंदिनी, शब्दा शब्दाला अनुमोदन (अनफॉर्चुनेटली)

***********************************स्पॉयलर**************************************
चार्ली त्याला माहित नसतो? >> ज्याला आपण बरबाद केलं त्याच्या आगे पिछे असणारे काय करतायेत हे ही त्या जॅकीला माहीत नसतं बरं ते असो पण आपल्याल खुले आम आल्या दिवसापासून टशन देणार्‍याचं नाव आणि आपल्या तोजोरीचा पासवर्ड सेम आहे हे ही एवढ्या डोकेबाज माणसाच्या (एवढी मोठी सिक्युरिटी सिस्टम आणि हिरे ढापणारा डोकेबाजच हवा ना) लक्षात येत नाही?

नंदू भिडेच्या बद्दल लक्षात ठेवायच्या २ गोष्टींचा वापर पुढे कथानकात रूम मिळवण्यासाठी केलाय
विवान बद्दल लक्षात ठेवायच्या गोष्टींचा वापर पुर्ण कथानक भर केलाय
बोमन इराणी बाबत लक्षात ठेवण्याचा २ गोष्टी??????????? त्यांचं काय? त्याच्या बॅगेत दुकान असतं. बरं मग? त्याचा कुठे उपयोग होतो?
सोनू सुद बाबत लक्षात ठेवण्याचा २ गोष्टी??????????? त्यांचं काय? आईला काही बोललं तर तो पिटायी करतो. बरं मग? त्याचा कुठे उपयोग होतो?

दिपीका बाबत लक्षात ठेवण्याचा २ गोष्टी??????????? त्यांचं काय? इंग्रजी बोलण्यावर भाळते.. बरं मग? त्याचा कुठे उपयोग होतो?

मला कुठे तरी आशा होती की यांच्या फूल प्रूफ प्लॅन मधे दिपीकाच्या इंग्रजीवर भाळण्याच्या सवयी मुळे (ती त्या विकीवर भाळते आणि लोच्या होतो), सोनू सूदच्या सवयीमुळे (तो कोणाची तरी धुलाई करतो आणिजेलमधे जातो) (नशिब बोमन इराणीला शेवटच्या क्षणी फिट येते.कुठे तरी वापरलंय) अडथळे येतात आणि प्लॅन बोंबलतो मग दुसरा काही तरी प्लॅन करावा लागतो असं काहीतरी असेल.
पण निराशा झाली.

शाहरूखच्या एनर्जीची दादच द्यायला हवी. शाहरुख विथ हिज एट पॅक्स ... माझे पैसे वसूल झाले Wink
ओम शांती ओम, मै हु ना (मी तेंव्हा लहान असल्याने आवडला असेल मला मे बी) सारखा असेल असं वाटलेलं. आसपासही जात नाही Sad

शाहरुखचा मुलगा सेम त्याच्या सारखा दिसतो Wink

फराह ची टीम इंट्रोडक्शनची ही कल्पना मै हु ना आणि ओम शांती ओम मधे आवडली होती.
आता बोअर होतेय

प्रश्न क्रेडीट देण्याचा आहे जो उत्तम आहे. एरव्ही अश्यांची नावेच आपण बघतो अथवा ते देखील बघत नाही फराह खान त्यांना पडद्यावर दाखवत आहे चांगलेच आहे हे

प्रश्न क्रेडीट देण्याचा आहे जो उत्तम आहे. एरव्ही अश्यांची नावेच आपण बघतो अथवा ते देखील बघत नाही फराह खान त्यांना पडद्यावर दाखवत आहे चांगलेच आहे हे >>> सहमत.

प्रश्न क्रेडीट देण्याचा आहे जो उत्तम आहे. एरव्ही अश्यांची नावेच आपण बघतो अथवा ते देखील बघत नाही फराह खान त्यांना पडद्यावर दाखवत आहे चांगलेच आहे हे<<< हम भी सहमत.

खरंतर नंदू मोहिनी ट्रॅक दाखवून चार्लीला मोहब्बतेटाईप जीएफ दाखवून अतिभयाण कॉमेडी साधता आली असती असे मला मध्येच एकदा वाटले (ओळखा कधी???? ) होते. (तो रोल अ‍ॅशने केला असता तर अजून मज्जा आली असती! )

प्रश्न क्रेडीट देण्याचा आहे जो उत्तम आहे. एरव्ही अश्यांची नावेच आपण बघतो अथवा ते देखील बघत नाही फराह खान त्यांना पडद्यावर दाखवत आहे चांगलेच आहे हे
>>>>>>>>
मी देखील सहमतच. किंबहुना एकदोन चित्रपटापुरते हे स्टंटबाजी म्हणून न करता प्रत्येक वेळी ते करणे यामुळे खरे तर जास्त कौतुक.
तसेच पुन्हा एकदा शाहरूखच्या आधी हिरोईनचे नाव या छोट्याश्या गोष्टीतून जाणार्‍या मोठ्या संदेशाचेही कौतुक.

अरे मी देखील सहमतच!!!!!!!!
किंबहुना म्हणुनच मला आधीच्या दोन्ही सिनेमात ते आवडलंय. या वेळेला मला बोअर झालं (नाविन्य काही वाटलं नाही). आता असचं काही तरी नवं ट्राय केलं तर सोने पे सुहागा.
पण बाकी काही असो ते बघायला धमाल येते त्यामुळे पुर्ण श्रेयनामावली पाहिली जाते. मला तो प्रकार आवडलाय.
त्यातचं काही तरीनवं पहायला आवडेल (नसेल काही नवं तरी हरकत नाही Happy )

कदाचित यावेळेला गाणं/ म्युझिक खास नसल्याने बोअर झालं असेल. मै हु ना चं गाणं खुप मस्त होतं Happy

तसेच पुन्हा एकदा शाहरूखच्या आधी हिरोईनचे नाव या छोट्याश्या गोष्टीतून जाणार्‍या मोठ्या संदेशाचेही कौतुक.
>>>
Proud

हे आधी माबोवर कोणी कुठल्या सिनेमाच्य अवेळेला कुठल्या धाग्यावर पकडलेलं सांगा बरं? Wink

काल पाहिला चित्रपट.
फाइट सीन्स मस्त आहेत. Happy

दिपिका काही वेळेलाच सुंदर वाटली आहे.
फराह खानचा चित्रपट असुन देखील डान्स वै तितके अत्युत्तम नाही वाटले.
म्युजिक तर लक्षात पण नाही.

लॉजिक बिजिक फराह खान आणि रोहित शेट्टीच्या चित्रपटात देखील शोधु नये.

टिपी होता. तिकिट कमी पैशाच असल्याने फार काही वाइट वाटलच नाही.
स्पुफ काही प्रसंग जमलेत. काहीत बोचकारे काढलेत अस वाटतय.

सगळ्यात धमाकेदार एन्ट्री मलाइका खान अरोराची वाटली मला. Wink

शाहरुखच वय काही फ्रेम्स मध्ये दिसतय. बाकी ठिक ठाक वावर.
अति इमोशनल किंवा रडारड असले प्रसंग फारसे त्याच्याही वाट्याला नसल्याने वावर सुसह्य.

बॉडी मस्त दिसली आहे सुरवातीच्या शॉट मध्ये.
नंतर्च्या शॉट्स मध्ये हाताचे मसल्स तेवढे दिसत नाहीत पण फिजिकली बराच फिट तरी वाटतो.
अगदीच ओ शा ओ सारखं नाहिये.

ही एक भेळ आहे. कमी अधिक प्रमाणात इकडे तिकडे होणारच.
पाहिलात तरी हे सर्व वाचुन अपेक्षा तशाच ठेवा.
नाही पाहिलात तरी टिव्हीवर वै लागेल तेव्हा बघु शकताय. खुप काही मिस केल असही नाही.

अवांतर : चैनै एक्सप्रेस मला ह्यापेक्षा जास्त चांगला टिपी वाटलेला. त्यात त्याची आणि दिपीकाची चांगली जुगलबंदी होती.

अतिअवांतर : एन्ग्लिश न कळणारा भिडे अथवा डान्स बार मध्ये नाचणारी मोहिनी जोशी. Uhoh

एन्ग्लिश न कळणारा भिडे अथवा डान्स बार मध्ये नाचणारी मोहिनी जोशी
>>
so???????????????

चैनै एक्सप्रेस मला ह्यापेक्षा जास्त चांगला टिपी वाटलेला.
>>>>>>>>>
+11111111111111111111111111111111

रीया, मी पण लिहिलंय ते. "भिडे किंवा जोशी" सोबत येणारं कल्चरल बॅगेज कुठंच दिसत नाही. अर्थात हा सगळ्याच हिंदी सिनेमावाल्यांचा प्रॉब्लेम आहे. बाबुराव तरी "आपटे" कुठल्या अँगलनं वाटतो? इन्स्पेक्टर अर्जुन जोगळेकर तर स्वतःच "जोगलेकर (ज चा उच्चार चुकलेला) म्हणतो.

अच्छा ! मला त्यांची पोस्ट कळाली नव्हती.
सगळ्या भिडेंना इंग्लिश कळतंच असं नाही आणि जोशी बारमधे नाचत नाहीत असं नाही असं मला म्हणायचं होतं.

आता झेपलंय

Pages