क्रॅपी न्यू इअर - (Movie review - Happy New Year)

Submitted by रसप on 26 October, 2014 - 01:56

घराजवळ एक हॉटेल आहे. साधंसंच. तिथले कटलेट मला जाम आवडतात. परवा मी माझे आवडते 'कटलेट' खात असताना एक मित्र आला. मी त्याला म्हटलं की 'तूही घे, मस्त असतात.' पण त्याने नाही म्हटलं.
नंतर माझं खाऊन झाल्यावर म्हणाला की, 'तुला माहित आहे का हॉटेलात कटलेट कसे बनवतात ?'
मी म्हटलं, 'नाही !'
'इतर भाज्या वगैरे बनवताना गॅस शेगडीजवळ जे सांडलेलं असतं ना ? ते गोळा करतात अन् देतात 'कटलेट' म्हणून शिजवून. आणि तुझ्यासारखे मूर्ख मस्त मिटक्या मारत खातात !'
हे खरं की खोटं, माहित नाही. पण आता मी आयुष्यात कधी 'कटलेट' हा प्रकार खाऊ शकणार नाही. काय सांगावं ! भटारखान्याच्या बंद दरवाज्याआड काय काय चालत असेल ! आपण शुद्धतेची खात्री मानून जे खातो, त्याच्याकडून किमान स्वच्छतेची अपेक्षा करावी, इतपत तरी त्याची योग्यता असेल का ?
अपेक्षा ! खरं तर अपेक्षा करणंच कधी कधी चूक असतं. इतकेच चोचले असतील तर जावंच कशाला थेटरात ? सॉरी.. हॉटेलात !
Actually थेटरात पण. हो ना ! 'मैं हूँ ना' आवडला म्हणून 'ओम शांती ओम' पाहिला. ठीक वाटला. तरी 'तीस मार खान' पाहिला. भंकस वाटला. त्या नंतरही मी अपेक्षा ठेवली की फराह खान भावापेक्षा बरी असेल आणि 'हॅपी न्यू इअर' पाहिला.
तर काही इंग्रजी सिनेमांच्या भटारखान्यात जमिनीवर सांडलेलं, पाय पडलेलं खरकटं कथानक आणि 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'मैं हूँ ना', 'चक दे इंडिया' वगैरे बनवताना शेगडीबाहेर जे सांडलं होतं ते गोळा करून संवादाचे कटलेट्स माझ्यासमोर आले. गेल्या कित्येक सिनेमांत निव्वळ धांगडधिंगा शिजवताना विशाल-शेखरकडून जे ओघळ उतरून खरपुड्या झाल्या होत्या, त्यांची गाणी बनवलीत.
खरं तर गेल्या काही काळापासून, खास करून धूम -३ नंतर आमीर खान जाम डोक्यात जायला लागला आहे. सलमान खान तर इतका दाक्षिणात्य झाला आहे की आता त्याच्या तोंडी हिंदी डायलॉग (जे त्याला असंही येतच नाही) अजिबातच शोभेनासे झालेत. त्यामुळे आत्ता कुठे मला खानांतला शाहरुखच त्यातल्या त्यात बरा आहे असं वाटायला लागलं होतं. म्हणून हा 'क्रॅपी न्यू इअर' बघायला गेलो, तर 'जतहैंजा'चा ओंगळवाणा गेट-अप शिजवून झाल्यावर जी बरबट भांड्यांना राहिली होती, ती थापलेला अगदी रोगट दिसणारा शाहरुख समोर आला.
बरं हे सगळं तब्बल तीन तास सहन करावं लागलं. कटलेटवर कटलेट, कटलेटवर कटलेट डोक्यावर थापत जाऊन डोक्याचं भलं मोठं भजं झालं आणि पायाच्या करंगळीच्या नखापर्यंत तेलकट ओघळ घेऊन मी जेव्हा घरी परतलो, तेव्हा मी परत आल्यासारखा परतलेला नव्हे तर कढईत परतल्यासारखा परतलेला दिसत होतो.

मित्राने कटलेटची रेसिपी माझं खाऊन झाल्यावर सांगितली, पण मी ती चूक करणार नाही. म्हणून मी फराह खानच्या कटलेटची रेसिपी आधीच सांगून ठेवतो.

उदरनिर्वाहासाठी 'स्ट्रीट फाईट्स' करणारा 'चार्ली' (शाहरुख) वडिलांना - मनोहरला - (अनुपम खेर) त्यांच्या हाय एंड तिजोऱ्या बनवण्याच्या धंद्यात फसवणाऱ्या चरण ग्रोव्हर (जॅकी श्रॉफ) चा वचपा काढण्यासाठी आसुसलेला असतो. वडिलांचे मित्र टॅमी (बोमन इराणी) आणि जॅग (सोनू सूद) सुद्धा त्याच बदल्याच्या आगीत होरपळत असतात. ती संधी त्यांना मिळते. ग्रोव्हरने ३०० कोटीचे हीरे, मनोहरकडून घेतलेल्या 'शालीमार' तिजोरीत ठेवले असतात. ही तिजोरी लुटायचा प्लान बनवला जातो. पण तिजोरी लुटण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात.
१. तिथपर्यंत जाणे फक्त ग्रोव्हर व त्याचा मुलगा विकी( अभिषेक बच्चन)लाच शक्य असते. म्हणून विकीचा डुप्लिकेट नंदूला उचललं जातं.
२. तिजोरीभोवती असलेलं लेजर किरणांचे संरक्षक कडं भेदायला एक हॅकरही हवा असतो म्हणून अजून एक मेंबर 'रोहन' (विवान शाह) हा (बहुतेक) जॅगचा पुतण्या (की भाचा) टीममध्ये घेतला जातो.
जिथे हीरे ठेवलेले असतात तिथे 'वर्ल्ड डान्स चॅम्पियनशिप' होणार असते. मग डान्स शिकवण्यासाठी मोहिनी (दीपिका) हेरली जाते.
अशी ही सहा जणांची टीम बनते. ती आचरट चाळे करून वात आणते.

फक्त हा आचरटपणाच जर त्यांनी ग्रोव्हरसोबत केला असता, तरी त्याने त्यांना स्वत: होऊन ३०० कोटीचे हीरे दिले असते आणि माफीही मागितली असती. पण त्यांना त्याला वात आणायचा नसतो, तर त्याची वाट लावायची असते म्हणून ते तसं न करता चोरीच करायचं ठरवतात. त्या चोरीचं पुढे काय होणार, 'वर्ल्ड डान्स चॅम्पियनशिप'चं काय होणार, हे सगळं आपल्याकडे बॉलीवूडी कटलेट्सचा तगडा अनुभव असल्याने कुठलाही आश्चर्याचा धक्का वगैरे देत नाही.

Happy-New-Year-movie-image.jpg

विनोद म्हणून नंदूला हुकमी उलटी करणारा दाखवणं, हा विनोदाचा ओकारी आणणारा किळसवाणा प्रकार आणि 'वर्ल्ड डान्स चॅम्पियनशिप' बोलताना तोंडावर हात फिरवणं, तोंडात ब्रश केल्यासारखं बोट फिरवणं वगैरे तर पांचटपणाचा कळसच होता ! एकंदरीतच विनोदाचे सगळेच प्रयत्न एक तर केविलवाणे किंवा हिणकस आहेत.
झगमगाट आणि भडक रंगांची उधळण काही जणांचे डोळे सुखावते, दीपवते. मला तर ते पैश्याचं विकृत प्रदर्शन वाटलं. सौंदर्याला मेक अप आणि दागदागिन्यांनी मढवल्यासारखं मला वाटलं नाही, तर त्याच्या बोज्याखाली दबल्यासारखं वाटलं.

ओरिजिनल असलं, नसलं तरी एक बरं कथानक होतं. पण केवळ ढिसाळ हाताळणी आणि प्रदर्शनाच्या आहारी गेलेली कल्पकता ह्यामुळे तीन तासाचं वाटोळं होतं.
'मनवा लागे..' आणि 'इंडियावाले' ही दोन गाणी फक्त मुखड्यात छान आहेत. त्यानंतर विशाल-शेखर 'ये रे माझ्या मागल्या' करत नेहमीचीच ओढाताण किंवा धिंगाणा करतात.

कोरड्या दुपारच्या रखरखाटात अचानक कुठूनशी एखादी थंड हवेची झुळूक यावी, तशी अधूनमधून दीपिका दिसते आणि क्षणभराचा दिलासा मिळतो.
बोमन इराणी शेवटी 'बोमन इराणी' आहे, त्यामुळे सगळ्या हाराकीरीतही तो तग धरतोच.
अभिषेक बच्चन कबड्डी आणि फुटबॉलच्या मैदानावरच चांगला अभिनय करत असतो का ?
शाहरुखने सलमान किंवा आमीर बनायचा प्रयत्न न करता शाहरुखच राहावं, असं माझं प्रांजळ मत आहे. पोटावर अठ्ठावीस पॅक्स आणले तरी आधी 'हेल्दी' दिसणं महत्वाचं असतं. सोनू सूद आणि शाहरुख दोघेही ह्या सिनेमात भरपूर अंगप्रदर्शन करतात. पण ते फक्त एकालाच 'शोभतं'.

असो.
थेटरमध्ये उसळलेली गर्दी, हॉलमध्ये शिट्ट्या आणि हाळ्यांचा पाऊस ह्यावरून हे तर निश्चित की कितीही भिकार असलं तरी हे कटलेट 'कोटीचं उड्डाण' करेलच, पण म्हणून त्याला चविष्ट म्हटलंच पाहिजे असं थोडीच आहे ?

रेटिंग - धूम -३ पेक्षा जरासा बरा
http://www.ranjeetparadkar.com/2014/10/movie-review-happy-new-year.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रसप !!!!!

तुमच्या ह्या परिक्षणाची एक प्रत त्या भैताड फराह खान ला पाठवायला हवी !!!
अत्यंत हिडीस चित्रपटा चे उत्तम परिक्षण !!
पब्लीक कुठला ही चित्रपट १००-२००-३०० करोड च्या दारात आणुन सोडते राव.

तीनही खान लोकांचे सिनेमे बघत नाही. त्यामुळे रसप यांनी (याही वेळी) पैसे वाचवले असे (या वेळी तरी) म्हणणार नाही पण तरीही त्यांना धन्यवाद.

च्यामारी, या तीन माकडांचे सिनेमे बघण्याऐवजी इम्रान हाश्मीचा एखादा कॉपी केलेला सिनेमा बघणं केव्हाही बरं. अर्थात, आयुष्यात त्या तीन तासात इतर काही करण्याजोगे नसेल तर.

-----------------------------------------------------------------------------------------------------------

फराह खान आणि साजिद खान यांच्यात कोण वाईट चित्रपट बनवते याची स्पर्धा लागलेली दिसते.
या संदर्भातला एक लेख इथे वाचता येईल. लेखाचा लेखक रसप यांच्यापेक्षा जास्त वैतागलेला दिसतो. Lol

एका वेगळ्या शिनुमाला थेट्रात गेले असताना याचा ट्रेलर पाह्यला तेव्हा सारखी ओशन्स एलेव्हन/ ट्व्हेल्व्ह/ थर्टीन ची आठवण होत होती. त्यामुळे प्रचंड मानसिक यातना वगैरे झाल्या होत्या... Proud
शिनुमा पाहतानाही ओशन्सची भंगारातली भंगार नक्कल वाटते का?

या बनवतात मसाला चित्रपट आणि आव आणतात लेडी करण जोहार असल्याचा. <<<
करण जोहर मसाला नाही बनवत तर काय बनवतो?

बॉम्बे टॉकिजमधली करण जोहरने डिरेक्ट केलेली कथा म्हणजे बॉलिवूडवाले हटके हटके करत तीच माती खातात याचं ढळढळीत उदाहरण होतं.

इतका काही वाईट नाहीये सिनेमा. फुल्ल टीपी आहे. पैसा वसूल. आम्ही आणि आमच्याबरोबर भरलेलं थेटर धोधो हसत होतं. तीन तासांचा असूनही कंटाळा येत नाही. आमच्या दृष्टीने आता नवीन मापदंड हा बँग-बँग आहे. त्याच्यापेक्षा हा सिनेमा चांगला आहे की नाही रसप? Proud

गंमत म्हणजे मला शाहरूख या सिनेमात आवडला. त्याने एरवी करतो तशी ओव्हरअ‍ॅक्टिंग केलेली नाही. चार्ली म्हणूनच वावरला आहे. हीरॉइनला आपल्या जाळ्यात वगैरे ओढायचे प्रयत्न नाही केलेले.

फरहा खान साजिदपेक्षा खूपच चांगली आहे. किमान तिला आपण काहीतरी भारी करतो आहे असा माज तरी नाहीये त्याच्यासारखा.

शिनुमा पाहतानाही ओशन्सची भंगारातली भंगार नक्कल वाटते का?

>> हो.

>>> छे! मुळीच नाही. अहो ओशन्स सिरिज कुठे, हा कुठे? हे असे चित्रपट बघताना तुम्हाला ते सिनेमे आठवतात तरी कसे? Happy

एका माणसाने एक कॉन/ हाईस्ट करायचा ठरवून, त्यासाठी गरजेच्या अश्या तज्ञ मंडळींची फौज जमवून ब्रिलियंटली एखाद्याला लुटायचे हा ओशन्सचा फॉर्म्युला.
तोच आहे की इथे.
ट्रेलरचे टेकिंग असे होते की आम्ही 'बॉलिवूड्ज आन्सर टू ओशन्स' देतोय असे वाटावे.
अर्थात तिथून इथे आणताना ओशनमधला बूंद बूंद पानी कम करून टाकला असणार आणि वर कचरा भरून प्रदूषितही केला असणार

ब्रिलियंटली >> हा शब्द इथे महत्त्वाचा आहे Happy

त्या सिनेमात जी फौज जमवली ते सर्व लोक आवश्यक होते. दिपिका इथे का आवश्यक आहे? तर नाचाच्या स्पर्धेसाठी!!! Happy हीरॉइन नसतीच तर काय झालं असतं? (दिपिकाच्या मानधनाचे, मेकप-कपड्यांचे काही कोटी वाचले असते उलट) पण आपल्याला जमतच नाही असलं काही करायला. त्यामुळेच म्हटलं, तुलनेची गुंजाईशच नाही.

पाम आयलंडवर खास तिरंगी रंगाची रोषणाई करण्यासाठी काही कोटी रुपये मोजावे लागले हे खर आहे का?
तसेच त्या हॉटेल वर देखील तीन रंगाची रोषणाई करण्याकरीता ३-५ कोटी खर्च झाले असे म्हणत आहे.

ब्रिलियंटली >> हा शब्द इथे महत्त्वाचा आहे <<<
अगं हो.. बॉलिवूड आणि ब्रिलियन्स या दोन्ही गोष्टी एका वाक्यात सोडाच एकाच पॅरेग्राफमधेही एकाने दुसर्‍याला कॅन्सल केल्याशिवाय येऊ शकत नाहीत....
मी फक्त मूळ संकल्पनेमधल्या साम्याबद्दल किंवा फिल्मच्या संकल्पनेचा मूळ सोर्स ओशन्स सिरीज असण्याची शक्यता याबद्दल म्हणतेय गं! Happy

करण जोहर मसाला नाही बनवत तर काय बनवतो?
>>>>>

नीधप,
मसाला चित्रपट आणि व्यावसायिक चित्रपट यात जी लाईन आहे तीच फराह खान आणि करण जोहार मध्ये आहे.
जर तुम्हाला ती लाईन दिसत नसेल तर तुम्हाला दोघे (केजो आणि फखा) सारखे वाटतील.
जर तुम्हाला ती लाईन बारीकशी वाटत असेल तर तुम्हाला दोघांमध्ये फारसा फरक नाही आढळणार.
माझे म्हणाल तर मला ती लाईन ठसठशीत नजरेस पडतेय. Happy

इथल्या काही जणांनी खरच "चित्रपट" दिग्दर्शित करावा. चित्रपट कसा असावा या पेक्षा कसा असु नये याचे सर्वोत्तम ज्ञान मायबोलिकरांना आहे हे कळुन येत आहे. अतिशय उत्तम सुंदर अप्रतिम ऑस्कर विजेताच चित्रपट निर्माण होईल ही आशा वाटु लागली आहे. भारताला पहिला ऑस्कर फक्त आणि फक्त मायबोलीकरांनी तयार केलेल्याच चित्रपटाला मिळेल.

>> भारताला पहिला ऑस्कर फक्त आणि फक्त मायबोलीकरांनी तयार केलेल्याच चित्रपटाला मिळेल. <<

त्याहून सोपं सांगतो.
घाऊक दराने दाक्षिणव्रात्य चित्रपटांचे रिमेक्स किंवा समुद्रापलिकडच्यांची भ्रष्ट नक्कल करण्यापेक्षा जवळच्या जवळ, मुंबईतल्या मुंबईत एखाद्या हिंदी निर्मात्याने धडाधड फक्त मराठी चित्रपटांची नक्कल किंवा रिमेक्स करायला सुरु करावे. माझी गॅरंटी आहे की ४-५ वर्षांत एखादा तुक्का ऑस्कर मिळवेल.

इतका काही वाईट नाहीये सिनेमा. फुल्ल टीपी आहे. पैसा वसूल. आम्ही आणि आमच्याबरोबर भरलेलं थेटर धोधो हसत होतं. तीन तासांचा असूनही कंटाळा येत नाही. >> सहमत. आपण भेळपुरीत लास्टिंग समाधान किंवा पौष्टिकता बघत नाही तसेच मला वाटले. सर्व लोक मजा करत होते. दीपिका सुरेखच दिसते. अभिषेक मजा करतो. ते उलटी प्रकरण सोडले तर.

कपीलच्या शोमध्ये सर्व टीमने फार मजा केली होती. त्यामुळेच आम्ही चित्रपट बघायला गेलो. तांत्रिक बाबी उत्तम आहेत. दिग्दर्शन काहीच नाही आहे. रस्त्या वरचा भेळवाला आणि मिशेलिन ग्रेड शेफ ह्यात फरक असतो तसे फरहा आणि ओशन्स सीरीजच्या दिग्दर्शनाबद्दल वाटते.

मला एक खूप हृद्य अनुभव आला. आमच्या शेजारी व समोरच्या रांगेत दोन जोडपी मूक बधिर जोडपी बसली होती व त्यांचे ऐकू बोलू शकणारी मुले. मुले आपापसात बोलत होती व आईबाबांशी साइन लँग्वेज मध्ये. आईने टिफिन मध्ये मुलांसाठी खाउ आणला होता पण त्यांना पॉपकॉर्न हवे होते वगैरे. शेव्टाच्या डान्स ला छोटी - ६-७ वर्षाची मुलगी नाचतच बल्ले बल्ले करत मागच्या लाइनीतून आईकडे आली.
मला जुन्या कोशीश सिनेमाचीच आठवण झाली.

सध्या चित्रपट अनेक भाषेत डब होतात पण थेटरात काही अशी सोय केली पाहिजे जसे कोपर्‍यात टीव्ही स्क्रीन इत्यादि ज्यावर सर्व संवाद मूक बधिरांना समजेल अश्या साइन लँग्वेज मध्ये दिसतील.
खर्चाचे काम आहे पण बिग किंवा पीव्हीआर नक्की करू शकतील. I was more happy for them and their enjoyment.

किमान धुम३ सारखे लोकांना उल्लु बनवले नाही चोरी कशी केली हे दाखवले आहे Biggrin हेच काय ते चांगली गोष्ट म्हणावी लागेल.

तरी देखील पहिल्याच दिवशी ४४.९७ करोडची कमाई करुन सगळ्याच चित्रपटांना मागे टाकले आहे Uhoh धुम३ चा रेकॉर्ड ३६ करोडचा होता. त्यात तब्बल ९ करोडची भर घातली. बहुदा हा रेकॉर्ड सहजासहजी तुटणार नाही

भेळ पुरी / कटलेट जमलय यात फारसा वाद नसावा . असे चित्रपट निघूच नयेत असे नाही . पण हल्लीचे ४ सलग हिट्स फास्ट फूड बघता ( धूम ३ , किक , बँग , हॅपी ) बडजात्याच्या गोडमिट्ट मिठायाही चेंज म्हणून चालतील अस वाटू लागलय Happy

बडजात्याच्या गोडमिट्ट मिठायाही चेंज म्हणून चालतील अस वाटू लागलय >> येतोय ना सर्व फॅमिली एकत्र फुट बॉल खेळते असे गाणे असलेला सल्लुचा चित्रपट येतो आहे. !!!!!! क्या रह्ता है क्याकी.

जास्त अपेक्षा ठेऊ नको फक्त >> ओह!
एनिवेज मला शाहरूख असला की पुरेसं आहे Wink त्यात शाहरुख विथ एट पॅक्स! अपेक्षापुर्तीची परमोच्च पातळी Proud
चेन्नई एक्सप्रेस च्या जवळ पास जातो का? की ओम शांती ओम सारखा आहे ? की जतहैजा?

तोय ना सर्व फॅमिली एकत्र फुट बॉल खेळते असे गाणे असलेला सल्लुचा चित्रपट येतो आहे.>>> प्रेम रतन धन पायो. पण तो पुढच्या दिवाळीमध्ये येईल.

बडजात्याचे पिक्चर गोड्ड्मिट्ट असतात पण त्यामध्ये सलमान बराच सुसह्य असतो. तीनही खानांमध्ये सध्या तोच एक "बरा आणि हेल्दी" दिसतोय.

अमा,
सध्या चित्रपट अनेक भाषेत डब होतात पण थेटरात काही अशी सोय केली पाहिजे जसे कोपर्‍यात टीव्ही स्क्रीन इत्यादि ज्यावर सर्व संवाद मूक बधिरांना समजेल अश्या साइन लँग्वेज मध्ये दिसतील.
>>>
खाली सबटायटल्स असले की काम झाले ना .. शक्य असल्यास चित्रपटाच्या स्क्रीनवर न घेता खाली एक्स्ट्रा पट्टीत ..

असो, आपल्याला आलेला अनुभव छान.

मला बर्फी सिनेमा पाहताना असा अनुभव आलेला. चित्रपट मला बरेपैकी आवडलेला, त्याच विचारात थिएटरबाहेर पडलो तेव्हा चार मूकबधिर १८-२० वर्षांची मुलेमुली एकमेकांशी साईन लँगवेजमध्ये बोलत होते. अर्थातच चित्रपटाबद्दल बोलत होते हे त्यांच्या चेहर्‍यावरच्या आनंदावरून समजत होते. त्यांना चित्रपट खूप आवडला असावा, तसेच रणबीर कपूर या हिरोने आपली भुमिका साकारली याचाही एक आनंद असावा, त्यांचे त्यांनाच ठाऊक, पण ते बघून मला स्वताला बर्फी सारखा चित्रपट बनल्याचे आणि तो मी बघितल्याचे समाधान वाटले.

त्यात शाहरुख विथ एट पॅक्स! अपेक्षापुर्तीची परमोच्च पातळी >> ह्या.. अग मुली, सोनू सूद बघ. Happy पूर्ण प्याकबंद काम आहे. सिनेमात एका कानाने बहिरा( मध्यंतरापरेन्तच!!!!)

"बरा आणि हेल्दी" दिसतोय > स्पेशल इफेक्ट्स ने बॉडी दाखवली की हेल्दीच दिसणार Lol किमान इतर खान तरी असे उल्लु बनवत नाहीत. जे आहे जसे आहे तसेच दिसतात आणि दाखवतात

खाली सबटायटल्स असले की काम झाले ना .. शक्य असल्यास चित्रपटाच्या स्क्रीनवर न घेता खाली एक्स्ट्रा पट्टीत >> तसे ही काही चालेलच पण इतके पटकन वाच्ता येत नाही. शिवाय माझ्या डोक्यात त्या दूरदर्शन वरच्या मूक बधिर लोकांसाठीच्या बातम्याच आल्या. Happy दिमाग में कीडे...

शिवाय माझ्या डोक्यात त्या दूरदर्शन वरच्या मूक बधिर लोकांसाठीच्या बातम्याच आल्या.
>>
हो पण तेव्हा नुसत्या बातम्या असतात, इथे चित्रपट बघताबघताच एक नजर या साईनवर.. बापरे, आय-आय कोऑर्डीनेशनची वाट नाही लागणार Wink

आणि हो, सबटायटल्स वाचता येतात हा पटकन, अगदी लहानपणीसुद्धा छोट्या पडद्यावर कित्येक ईंग्लिश चित्रपट हिंदी सबटायटल्सच्या जोडीने पाहिलेत.

Pages