क्रॅपी न्यू इअर - (Movie review - Happy New Year)

Submitted by रसप on 26 October, 2014 - 01:56

घराजवळ एक हॉटेल आहे. साधंसंच. तिथले कटलेट मला जाम आवडतात. परवा मी माझे आवडते 'कटलेट' खात असताना एक मित्र आला. मी त्याला म्हटलं की 'तूही घे, मस्त असतात.' पण त्याने नाही म्हटलं.
नंतर माझं खाऊन झाल्यावर म्हणाला की, 'तुला माहित आहे का हॉटेलात कटलेट कसे बनवतात ?'
मी म्हटलं, 'नाही !'
'इतर भाज्या वगैरे बनवताना गॅस शेगडीजवळ जे सांडलेलं असतं ना ? ते गोळा करतात अन् देतात 'कटलेट' म्हणून शिजवून. आणि तुझ्यासारखे मूर्ख मस्त मिटक्या मारत खातात !'
हे खरं की खोटं, माहित नाही. पण आता मी आयुष्यात कधी 'कटलेट' हा प्रकार खाऊ शकणार नाही. काय सांगावं ! भटारखान्याच्या बंद दरवाज्याआड काय काय चालत असेल ! आपण शुद्धतेची खात्री मानून जे खातो, त्याच्याकडून किमान स्वच्छतेची अपेक्षा करावी, इतपत तरी त्याची योग्यता असेल का ?
अपेक्षा ! खरं तर अपेक्षा करणंच कधी कधी चूक असतं. इतकेच चोचले असतील तर जावंच कशाला थेटरात ? सॉरी.. हॉटेलात !
Actually थेटरात पण. हो ना ! 'मैं हूँ ना' आवडला म्हणून 'ओम शांती ओम' पाहिला. ठीक वाटला. तरी 'तीस मार खान' पाहिला. भंकस वाटला. त्या नंतरही मी अपेक्षा ठेवली की फराह खान भावापेक्षा बरी असेल आणि 'हॅपी न्यू इअर' पाहिला.
तर काही इंग्रजी सिनेमांच्या भटारखान्यात जमिनीवर सांडलेलं, पाय पडलेलं खरकटं कथानक आणि 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'मैं हूँ ना', 'चक दे इंडिया' वगैरे बनवताना शेगडीबाहेर जे सांडलं होतं ते गोळा करून संवादाचे कटलेट्स माझ्यासमोर आले. गेल्या कित्येक सिनेमांत निव्वळ धांगडधिंगा शिजवताना विशाल-शेखरकडून जे ओघळ उतरून खरपुड्या झाल्या होत्या, त्यांची गाणी बनवलीत.
खरं तर गेल्या काही काळापासून, खास करून धूम -३ नंतर आमीर खान जाम डोक्यात जायला लागला आहे. सलमान खान तर इतका दाक्षिणात्य झाला आहे की आता त्याच्या तोंडी हिंदी डायलॉग (जे त्याला असंही येतच नाही) अजिबातच शोभेनासे झालेत. त्यामुळे आत्ता कुठे मला खानांतला शाहरुखच त्यातल्या त्यात बरा आहे असं वाटायला लागलं होतं. म्हणून हा 'क्रॅपी न्यू इअर' बघायला गेलो, तर 'जतहैंजा'चा ओंगळवाणा गेट-अप शिजवून झाल्यावर जी बरबट भांड्यांना राहिली होती, ती थापलेला अगदी रोगट दिसणारा शाहरुख समोर आला.
बरं हे सगळं तब्बल तीन तास सहन करावं लागलं. कटलेटवर कटलेट, कटलेटवर कटलेट डोक्यावर थापत जाऊन डोक्याचं भलं मोठं भजं झालं आणि पायाच्या करंगळीच्या नखापर्यंत तेलकट ओघळ घेऊन मी जेव्हा घरी परतलो, तेव्हा मी परत आल्यासारखा परतलेला नव्हे तर कढईत परतल्यासारखा परतलेला दिसत होतो.

मित्राने कटलेटची रेसिपी माझं खाऊन झाल्यावर सांगितली, पण मी ती चूक करणार नाही. म्हणून मी फराह खानच्या कटलेटची रेसिपी आधीच सांगून ठेवतो.

उदरनिर्वाहासाठी 'स्ट्रीट फाईट्स' करणारा 'चार्ली' (शाहरुख) वडिलांना - मनोहरला - (अनुपम खेर) त्यांच्या हाय एंड तिजोऱ्या बनवण्याच्या धंद्यात फसवणाऱ्या चरण ग्रोव्हर (जॅकी श्रॉफ) चा वचपा काढण्यासाठी आसुसलेला असतो. वडिलांचे मित्र टॅमी (बोमन इराणी) आणि जॅग (सोनू सूद) सुद्धा त्याच बदल्याच्या आगीत होरपळत असतात. ती संधी त्यांना मिळते. ग्रोव्हरने ३०० कोटीचे हीरे, मनोहरकडून घेतलेल्या 'शालीमार' तिजोरीत ठेवले असतात. ही तिजोरी लुटायचा प्लान बनवला जातो. पण तिजोरी लुटण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात.
१. तिथपर्यंत जाणे फक्त ग्रोव्हर व त्याचा मुलगा विकी( अभिषेक बच्चन)लाच शक्य असते. म्हणून विकीचा डुप्लिकेट नंदूला उचललं जातं.
२. तिजोरीभोवती असलेलं लेजर किरणांचे संरक्षक कडं भेदायला एक हॅकरही हवा असतो म्हणून अजून एक मेंबर 'रोहन' (विवान शाह) हा (बहुतेक) जॅगचा पुतण्या (की भाचा) टीममध्ये घेतला जातो.
जिथे हीरे ठेवलेले असतात तिथे 'वर्ल्ड डान्स चॅम्पियनशिप' होणार असते. मग डान्स शिकवण्यासाठी मोहिनी (दीपिका) हेरली जाते.
अशी ही सहा जणांची टीम बनते. ती आचरट चाळे करून वात आणते.

फक्त हा आचरटपणाच जर त्यांनी ग्रोव्हरसोबत केला असता, तरी त्याने त्यांना स्वत: होऊन ३०० कोटीचे हीरे दिले असते आणि माफीही मागितली असती. पण त्यांना त्याला वात आणायचा नसतो, तर त्याची वाट लावायची असते म्हणून ते तसं न करता चोरीच करायचं ठरवतात. त्या चोरीचं पुढे काय होणार, 'वर्ल्ड डान्स चॅम्पियनशिप'चं काय होणार, हे सगळं आपल्याकडे बॉलीवूडी कटलेट्सचा तगडा अनुभव असल्याने कुठलाही आश्चर्याचा धक्का वगैरे देत नाही.

Happy-New-Year-movie-image.jpg

विनोद म्हणून नंदूला हुकमी उलटी करणारा दाखवणं, हा विनोदाचा ओकारी आणणारा किळसवाणा प्रकार आणि 'वर्ल्ड डान्स चॅम्पियनशिप' बोलताना तोंडावर हात फिरवणं, तोंडात ब्रश केल्यासारखं बोट फिरवणं वगैरे तर पांचटपणाचा कळसच होता ! एकंदरीतच विनोदाचे सगळेच प्रयत्न एक तर केविलवाणे किंवा हिणकस आहेत.
झगमगाट आणि भडक रंगांची उधळण काही जणांचे डोळे सुखावते, दीपवते. मला तर ते पैश्याचं विकृत प्रदर्शन वाटलं. सौंदर्याला मेक अप आणि दागदागिन्यांनी मढवल्यासारखं मला वाटलं नाही, तर त्याच्या बोज्याखाली दबल्यासारखं वाटलं.

ओरिजिनल असलं, नसलं तरी एक बरं कथानक होतं. पण केवळ ढिसाळ हाताळणी आणि प्रदर्शनाच्या आहारी गेलेली कल्पकता ह्यामुळे तीन तासाचं वाटोळं होतं.
'मनवा लागे..' आणि 'इंडियावाले' ही दोन गाणी फक्त मुखड्यात छान आहेत. त्यानंतर विशाल-शेखर 'ये रे माझ्या मागल्या' करत नेहमीचीच ओढाताण किंवा धिंगाणा करतात.

कोरड्या दुपारच्या रखरखाटात अचानक कुठूनशी एखादी थंड हवेची झुळूक यावी, तशी अधूनमधून दीपिका दिसते आणि क्षणभराचा दिलासा मिळतो.
बोमन इराणी शेवटी 'बोमन इराणी' आहे, त्यामुळे सगळ्या हाराकीरीतही तो तग धरतोच.
अभिषेक बच्चन कबड्डी आणि फुटबॉलच्या मैदानावरच चांगला अभिनय करत असतो का ?
शाहरुखने सलमान किंवा आमीर बनायचा प्रयत्न न करता शाहरुखच राहावं, असं माझं प्रांजळ मत आहे. पोटावर अठ्ठावीस पॅक्स आणले तरी आधी 'हेल्दी' दिसणं महत्वाचं असतं. सोनू सूद आणि शाहरुख दोघेही ह्या सिनेमात भरपूर अंगप्रदर्शन करतात. पण ते फक्त एकालाच 'शोभतं'.

असो.
थेटरमध्ये उसळलेली गर्दी, हॉलमध्ये शिट्ट्या आणि हाळ्यांचा पाऊस ह्यावरून हे तर निश्चित की कितीही भिकार असलं तरी हे कटलेट 'कोटीचं उड्डाण' करेलच, पण म्हणून त्याला चविष्ट म्हटलंच पाहिजे असं थोडीच आहे ?

रेटिंग - धूम -३ पेक्षा जरासा बरा
http://www.ranjeetparadkar.com/2014/10/movie-review-happy-new-year.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोटावर अठ्ठावीस पॅक्स आणले तरी आधी 'हेल्दी' दिसणं महत्वाचं असतं.>>>अगदीच पटलं दोघंही नवरा बायको दुष्काळी भागातून आलेले दिसतात

अगदीच पटलं दोघंही नवरा बायको दुष्काळी भागातून आलेले दिसतात>>>>>. हॉई! त्येच्या बायडीने पण काम केलय का या शिणुमात? का दिपीकाला बायडी म्हणतेस ग विनीता?

नाही गं गौरी, तिने काम नाही केलेले पण रसपने दिलेला जनरल प्रतिसाद आहे शाहरूखबद्दल असे समजून मी दिला

माझा प्रतिसाद जनरल नसून सिनेमातल्या शाहरुखाबद्दल आहे. पक्का रोगट दिसतो.<<<

एरवीही रोगट दिसतो.

अमिताभ बच्चन मोठ्या पडद्यावरून स्थलांतरीत झाल्यामुळे ज्या लिंबूटिंबूंना आश्रय देण्याची अगतिकता रसिकांवर ओढवली त्यात हे सगळे खान्स, कपूर्स, दत्त्स, कुमार्स वगैरे मोडतात.

अन्यथा सलमान खान / शाहरूख खान ह्यांच्यापैकी कोणीही आजचा टॉपचा हिरो होणे म्हणजे चित्रपट रसिकांच्या अकलेचे दिवाळे निघाल्याचे चिन्ह आहे.

बेफी, अक्षय बरा हो त्यातल्या त्यात. अमीर पण बरा अभिनय करतो. आता पूर्वी दिलीप कुमार, बलराज सहानी, राज कपूर वगैरे रिटायर झाल्यावर ( काही आधीच वर रन्गमन्चावर गेले) आता कोण? हा प्रश्न उद्भवला होताच. मग राजेश खन्ना, धर्मेन्द्र, जितेन्द्र वगैरे आले. अमिताभ लिजेन्ड होताच आणी आहे. आता काय करणार? हिरे भरपूर असतात, पण कोहीनूर एकच असतो ना?
.

खरे आहे रश्मी!

पण ह्या खान्सबिन्स लोकांनी अभिनयाचा ग्राफ चढता ठेवण्याऐवजी आधीपेक्षा सुमारगिरीच वाढवत नेली. काय चित्रपटांचे सिलेक्शन, काय कथानक, काय सीन्स, काय बिनडोकपणा!

ठळक फरक हा आहे की तुम्ही वर नोंदवलेली जी नांवे आहेत त्यातील राज, दिलीप ह्यांनी, तसेच गुरूदत्त, संजीवकुमार, नसिर उद्दिन ह्या लोकांनी नेहमी आधीपेक्षा काहीतरी सरस करण्याचा प्रयत्न केलेला सहज जाणवते. अमिताभने नेहमीच उत्तम चित्रपट निवडले नसतीलही (जसे पूकार, मर्द, नास्तिक वगैरे सुमार चित्रपटही केले) पण त्याचा स्वतःचा अभिनय कधी पडेल झाला नाही.

हे खान्स, कपूर्स, कुमार्स एकाहून एक भिकारपणाच्या पायर्‍या चढत आहेत. त्या दबंगमध्ये नाचणारा, गाणारा जो इन्स्पेक्टर दाखवला आहे तसा अख्ख्या जगात एक तरी इन्स्पेक्टर असू शकतो का? Uhoh

इंग्लिश चित्रपटातील वास्तवता, अभिनय, कल्पकता हे नेहमीच त्यामुळे भाव खाऊन जातात. आपण योजनेच्या योजने मागेच जात राहतो.

विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट.........

>> अमिताभने नेहमीच उत्तम चित्रपट निवडले नसतीलही (जसे पूकार, मर्द, नास्तिक वगैरे सुमार चित्रपटही केले) पण त्याचा स्वतःचा अभिनय कधी पडेल झाला नाही. <<

डिसाग्रीड ! अमिताभने अनेक चित्रपटांत ओव्हर अ‍ॅक्टिंग केली आहे, असं मला वाटतं. खास करून त्याने जेव्हा कॉमेडी करायचा प्रयत्न केला तेव्हा. पण तरी, समस्त खानावळ व कपूर्स (अपवाद - ऋषी व रणबीर. तसेच अनिल) आणि कुमार्सहून तो नेहमीच उजवा.

>> इंग्लिश चित्रपटातील वास्तवता, अभिनय, कल्पकता हे नेहमीच त्यामुळे भाव खाऊन जातात. आपण योजनेच्या योजने मागेच जात राहतो. <<

व्यावसायिक हिंदी सिनेमातील ज्या शाहरुख, सलमान, अक्षय कुमारेत्यादी शाखा आहेत, त्यांच्या बाबत हे पटते. पण, विशाल भारद्वाज, तिगमांशु धुलिया, आशुतोष गोवारीकर, आणि असे अजून काही जण बॉलीवूडचे एक आश्वासक रुप दाखवतात.

गेल्या काही वर्षांत एकंदरच हिंदी चित्रपट वास्तवदर्शनाच्या बर्‍यापैकी जवळ गेला आहे, असं मला वाटतं.

>>>गेल्या काही वर्षांत एकंदरच हिंदी चित्रपट वास्तवदर्शनाच्या बर्‍यापैकी जवळ गेला आहे, असं मला वाटतं.<<<

हे पटले. गेल्या काही वर्षात तसा प्रयत्न गंभीरपणे होत आहे हे अगदी खरे आहे.

त्यातच पुन्हा दबंग आणि सिंघमसारखे चित्रपट येतात आणि शिंतोडे उडवतात ह्याचे वाईट वाटते.

>>>विशाल भारद्वाज, तिगमांशु धुलिया, आशुतोष गोवारीकर, आणि असे अजून काही जण बॉलीवूडचे एक आश्वासक रुप दाखवतात. <<< नक्कीच!

पण रसिकांनीही जरा खान्स, कपूर्स, कुमार्स ह्यांना कमी आश्रय द्यायला हवा आहे.

अमिताभच्या ओव्हर अ‍ॅक्टिंगचा मुद्दा विशेष पटला नाही, पण त्याची कारणे वेगळी व विस्तृत आहेत.

रसप यांची नेहमीचीच पद्धत, छिद्रान्वेषी रिव्ह्यु ......
यांना चित्रपट समिक्षक म्हणायचे कि चित्रपट छिद्रान्वेषक. Proud

फराह खान - या मॅडमवरून मागे माझा काही सभासदांशी वादही झालेला. या बनवतात मसाला चित्रपट आणि आव आणतात लेडी करण जोहार असल्याचा.

शाहरुख खान - ज्याच्याबद्दल प्रत्येकाला एखाददोन शब्द बोलल्याशिवाय आणि इतर काय बोलत आहेत हे वाचल्याशिवाय चैन पडत नाही असा एकमेवाद्वितीय सुपर्रस्टार!
आणि याच कारणासाठी आपला धागासुद्धा शतक गाठणार रसप, अभिनंदन Happy

हॅपी न्यू ईयर - शाहरुखचा चाहता असलो तरी बघणार नाही. किंबहुना त्यामुळेच बघवणार नाही अशी भिती. Sad

ऋन्मेऽऽष

<< फराह खान - या मॅडमवरून मागे माझा काही सभासदांशी वादही झालेला. या बनवतात मसाला चित्रपट आणि आव आणतात लेडी करण जोहार असल्याचा.

शाहरुख खान - ज्याच्याबद्दल प्रत्येकाला एखाददोन शब्द बोलल्याशिवाय आणि इतर काय बोलत आहेत हे वाचल्याशिवाय चैन पडत नाही असा एकमेवाद्वितीय सुपर्रस्टार! >>

फराह खान वर टीका झाली आहे तो हा (हॅपी न्यू ईयर) चित्रपट वाईट बनविल्याविषयी. जी रास्तच आहे. त्यामुळे आपण मागच्या एका धाग्याचा संदर्भ पुन्हा इथे आणून तिच्याविषयीचा नकारात्मक निष्कर्ष मांडला आहे.

तो मान्य करतो. कारण आता तिने तीन वाईट चित्रपट दिले आहेत. (अर्थात तिने नृत्यदिग्दर्शिका म्हणून काही चांगली कामगिरी ती देखील काही काळाकरिता बाजूला ठेवतो.)

आता शाहरूखवर देखील इथे टीका झालीये पण त्याच्याविषयी एकदोन शब्द शब्द बोलल्याशिवाय आणि इतर काय बोलत आहेत हे वाचल्याशिवाय चैन पडत नाही म्हणून तो एकमेवाद्वितीय सुपरस्टार असल्याचा सकारात्मक निष्कर्ष..

वा! याला म्हणतात दुहेरी मापदंड. जी व्यक्ती आपल्याला आवडत नाही तिच्यावरील टीका तिची चूक दाखविण्याकरिता वापरा आणि जी व्यक्ति आपल्याला आवडते तिच्यावरील टीका तिची महानता सिद्ध करण्याकरता वापरा. हे म्हणजे पुन्हा सुईधाग्यासारखे, सॉरी सईधाग्यासारखेच झाले की.

असो. तुम्हाला सई आवडते, तुम्हाला फराह खान आवडत नाही, तुम्हाला शाहरुख खान आवडतो या तुमच्या वैयक्तिक आवडीनिवडीचा आदर आहेच. तसेच ती आवडनिवड जोपासण्याचा जाहीर करण्याचा तुमचा हक्कदेखील मान्य आहे.

फक्त <<सई छान दिसते>> किंवा << शाहरूख असा एकमेवाद्वितीय सुपर्रस्टार! >> ही तुमची वैयक्तिक मते वस्तुस्थिती निदर्शक नाहीत, एवढेच नमूद करावेसे वाटते.

<< आणि याच कारणासाठी आपला धागासुद्धा शतक गाठणार रसप, अभिनंदन >>

हे विधान अजिबात पटत नाही. रसप यांनी इतर अनेक चित्रपटांची या व इतर संकेतस्थळावर लिहीलेली चित्रपट परीक्षणे वाचावीत. ती नेहमीच उत्तम असतात. लोक त्यांची आवर्जून वाट पाहतात. चित्रपट बघायचा की नाही हे त्यावर ठरवतात. लोकांच्या उदंड प्रतिसादाकरिता रसप यांना शाहरूख सारख्या कुबड्याची / कुबड्यांची अजिबात गरज नाही.

<< हॅपी न्यू ईयर - शाहरुखचा चाहता असलो तरी बघणार नाही. किंबहुना त्यामुळेच बघवणार नाही अशी भिती >>

गंमत म्हणजे मी शाहरूखचा चाहता वगैरे अजिबात नाही, पण सहज म्हणून त्याचा चेन्नई एक्सप्रेस चित्रपट बघायला लॅपटॉपवर घेतला होता. मिनिटा मिनिटाला त्याचा कचरा होताना दिसत होता म्हणून मजेत पूर्ण चित्रपट बघितला. काही दृश्यं तर पुन्हा पुन्हा रिवाईंड करून पाहिलीत. विशेषतः नायिका त्याला लाथा मारते, पन्नाशीचा म्हातारा म्हणते ही दृश्यं.

तेव्हा शाहरूखचे चित्रपट बघणारे सारेच शाहरुखचे चाहते असतीलच असे नाही, काही जण त्याची बेईज्जती बघायला आवडेल म्हणूनदेखील बघतात. त्यानुसार आता शाहरूखही स्वतःची अप्रतिष्ठा झाल्याचे दिसेल अशी दृश्ये चित्रपटात आग्रहाने टाकून घेत असावा असा दाट संशय आहे.

रसप यांनी इतर अनेक चित्रपटांची या व इतर संकेतस्थळावर लिहीलेली चित्रपट परीक्षणे वाचावीत. ती नेहमीच उत्तम असतात.<<< +१

चेतनजी,
फराह खान संदर्भात माझा वाद आपल्याच धाग्यावर झाला होता. इथे फराह खानने वाईट चित्रपट दिल्याने मी जिंकलो या अर्थाने ते विधान नसून मला तर ती (दिग्दर्शक म्हणून) आधीपासून फारशी प्रॉमिसिंग वाटत नव्हती एवढेच नमूद करायचे होते.

शाहरुख खानला लावलेल्या दुहेरी मापदंडाचे म्हणाल तर शाहरूख खानने जे कमावलेय आजवर त्याची तुलना फराह खानशी करण्याचे पातक मी स्वत:च करू शकत नाही. त्यामुळे त्यांचे मापदंडच वेगळे असल्याने तिथे दुहेरी तिहेरी हे प्रकारच बाद.
याउपर शाहरूखबाबत एक वाक्य नेहमीच म्हणता येईल, यू कॅन हेट हिम, यू कॅन लव्ह हिम, बट यू कॅन नॉट इग्नोर हिम!
अ‍ॅण्ड येस्स, मला तो बंदा आवडतो हे मी कबूल केले आहेच, त्यामुळे थोडे फेव्हर करण्याची शक्यता आहेच. शेवटी मानवी स्वभाव, मी कसा अपवाद असणार

बाकी "याच कारणासाठी" मधील "च" माझ्या वाक्याचा अर्थ बदलत असेल हे कबूल पण रसप यांचे चित्रपट परीक्षण वा लेख मी सुद्धा आवर्जून आणि आवडीने वाचतोच, एक दोन ठिकाणी त्यांची मते पटली नाही तिथे विरोधही केलाय, पण लिखाण नेहमीच आवडत आल्याने त्याचे मनापासून कौतुकही केलेय, किंबहुना त्यांचे अमुकतमुक चित्रपटाबाबत परीक्षण वाचण्यास उत्सुक असा आग्रहही करून झालाय, त्यामुळे कृपया तसा काही गैरसमज नसावा. Happy

या बनवतात मसाला चित्रपट आणि आव आणतात लेडी करण जोहार असल्या???>>> बाबा करण जोहरदेखील मसाला चित्रपटच बनवतो Proud

हॅपी न्यु इयर पहायची इच्छाच होत नाहिये. प्रोमोजमध्ये शाहरूख खरंच फार रोगट आणि थकलेला दिसतोय. कॉमेडी नाईट्समध्येही तो बराच गप्प होता. हा त्याच्यासाठी खरंच वेकप कॉल आहे, लवकरच त्यानं वयाला शोभतील असे रोल्स आणि अधिकाधिक आव्हानात्मक चित्रपट करायला हवेत, अन्यथा एका चांगल्या अभिनेत्याची झालेली दुर्दशा बघायला मिळेल. (त्या दृष्टीनं वाटचाल चालू झालेलीच आहे)

इज्ज़त अफज़ाई का शुक्रिया, यारों ! __/\__

>> शाहरूखही स्वतःची अप्रतिष्ठा झाल्याचे दिसेल अशी दृश्ये चित्रपटात आग्रहाने टाकून घेत असावा असा दाट संशय आहे. <<

@चेतन,
मला असं वाटतं, आजकाल विनोद म्हणजे 'स्वत:च्या किंवा दुसऱ्या कुणाच्या इज्जतीची लक्तरं वेशीवर टांगणे' अशी सरळसोट व्याख्या आहे. 'अरे माली, जिसका नाम भवानीशंकर हो, वो तो पैदा होतेही बुढ्ढा हो गया' वाला टिंगल करणारा, तरी संयत विनोद लोकांना पिचकवणी वाटतो आजकाल. त्यांना उलट्या केलेल्या आवडतात, कपडे फाडलेले आवडतात. एकूणच विनोदाचंही विकृत हनीसिंगीकरण झालेलं आहे !

नंदिनी,
करण जोहारने सुरुवात "कुछ कुछ होता है" चित्रपटाने करून सेफ गेम खेळला. पण त्यानंतर "कभी खुशी कभी गम" आणि "कभी अलविदा ना केहना" मध्ये अनुक्रमे चढत्या क्रमाने मसाला नावाला ठेवत कौटुंबिक नातेसंबंधावरच भर दिला. हे नक्कीच फराह खान छाप मसाला मूवी नसावेत. आणि मग "माय नेम इझ खान" बद्दल काय म्हणाल? जस्ट इमॅजिन फराह खानने "माय नेम इझ खान" बनवायचा ठरवले असते तर तो कसा असता? बॉम्बे टॉकिज मध्ये देखील तो होता एका कथेचा दिग्दर्शक, मी पाहिले नसल्याने भाष्य करत नाही पण मसाला नक्कीच नसावा.
याउपर वरील सारे त्याने दिग्दर्शित केलेले चित्रपटांची पटकथा वा "कल हो ना हो" चित्रपटाची पटकथा त्यानेच लिहिली होती. का उगाच त्या भल्या माणसावर ज्याला चित्रपटांची उत्तम जाण आहे त्यावर मसाला शिक्का मारत आहात.

>> बॉम्बे टॉकिज मध्ये देखील तो होता एका कथेचा दिग्दर्शक, मी पाहिले नसल्याने भाष्य करत नाही पण मसाला नक्कीच नसावा <<

समलिंगी आकर्षणावर आधारलेली कहाणी होती. रणदीप हुडा, राणी मुखर्जी आणि एक नवीन अभिनेता (नाव आठवत नाही) अशी कास्ट होती. फार छान हाताळला होता विषय.

धन्यवाद रसप,
आता हेच गूगाळत होतो. नवीन अभिनेता साकीब सलीम, मेरे डॅड की मारुती मध्येही होता. ईति विकी.

रसप यांनी इतर अनेक चित्रपटांची या व इतर संकेतस्थळावर लिहीलेली चित्रपट परीक्षणे वाचावीत. ती नेहमीच उत्तम असतात>>नेहमीच वाचते आणि खरेच छान असतात..

शाहरूख खानचा डाय हार्ड फॅन असूनही (किंवा असल्यामुळेच ) रसप यांच्या परिक्षणाशी बर्याच अंशी सहमत .
अगदी शाहरूखच्या बॉडी पासून (त्याने कितीही मेहनत केली असली तरी तो त्याचा प्रांत नव्हे )

खर तर डोक बाजूला ठेऊन पाहिला तर चित्रपट वन टाईम वॉच आहे , पण नवीन काहीच नाही , मैहूना अन ओशाओ चाच फॉर्म्युला परत वापरलाय .
त्यातल्या त्यात चांगल्या गोष्टी म्हणजे चित्रपट सब कुछ शाहरूख नाहीये , काही पंचेस सही आहेत अन कथानकही बर आहे .
फक्त चित्रपट सिरियस करायचा की स्पूफ हे शेवटपर्यंत ठरवता आलेल नाहीये बहुतेक Happy

<< फक्त चित्रपट सिरियस करायचा की स्पूफ हे शेवटपर्यंत ठरवता आलेल नाहीये बहुतेक >> बरोबर!
हे असं अधलंमधलं दाखवणं हेच त्या बहीण भावांचं चलाख गणित आहे; म्हणजे कहाणीत दम नाही, प्लॉट भिकार आहे म्हणायला इतरांना वाव राहत नाही.
बाकी फराह - शाहरुखला चित्रपट सेलेबल होण्यासाठी नंदू भिडे दिमाग में किडे..या "गुंडा"ची हृद्य आठवण करून देणाऱ्या संवादाचा, ओकारीचा आणि कॉमेडी विथ कपिल मधल्या ठुल्लूछाप विनोदाचा आसरा घ्यावा लागतो हे त्यांच्या अकलेचे दिवाळे किती जोरात वाजले आहे याचेच द्योतक आहे.
त्यातल्या त्यात बच्चनपुत्र बरा म्हणायचा पण मधून मधून , तीन तीन 'धूम' नंतर त्याला उदय चोप्राचा वाण नाही पण गुण लागलाय, याचीही आठवण करून देण्याजोगा अभिनय दाखवून 'हसे' करवून घेतोच!

हा चित्रपट न पाहण्याची सुचना जी मेंन्दु देत होता तो हे परी़क्षण वाचुन योग्य आहे असच वाटतयं.पण टीव्हीवर (अतर्क्य चित्रपटांच्या वेळेत )पाह्ण्यात येईल दिपुसाठी तरी.तीस मार खान असाच पाहीला होता मजा घेत,विनोदी कॉमेंन्ट्री करत.

दिपिकाच्या 'मनवा लागे' ला पाहुन विचार बद्लला होता पण आज( घरी आलेल्या )पाहुण्यांनी आणि झी म अवॉर्डच्या क्रुपेने तिकीटाचे पैसे वाचवले. बाकी टाईमपास मुवी असणार हे गृहीत धरलच होतं.तसंपण जितके जास्त हीरो तितकी टुकार कथा हे आतापर्यंतचा अनुभव. शाहरुख चे फॅन नसले तरी त्याच्या केवळ अदाकारी वर सर्व चित्रपट पाहीले आहेत .त्यामुळे त्याला दुषणे देववत नाहीत.याच कारणासाठी कदाचित दिपीकानेही चित्रपटासाठी होकार दिला असेल. पण 'पॅक्स आणले तरी आधी 'हेल्दी' दिसणं महत्वाचं ' याला अनुमोदन .पॅक शिवायही त्याच्या अभिनयावर जीव टाकणारी लोक आहेत.हे त्याला कोण समजवणार?आणि फराह खान ने गाणीच बसवावीत त्यात ती बेस्ट आहे ,असं मनापासुन वाटतयं .
जय हो टीवीवर अर्धवट पाह्ण्याआधी कपील च्या शो त जय हो चा एपिसोड पाहीला होता तो चित्रपटापेक्षा तो खुपच उजवा वाटला. Happy .
बॉम्बे टॉकिज>>>> मधे लतादिदिच्या 'अजीब दासतां है ये 'गाण्याचा मस्त वापर केलाय.करनचा आवडता विषय असल्यामुळे व कुणीतरी लक्ष ठेवुन बनवुन घेतल्यासारखा वाटतो(हा खरा संशय आहे)त्यामुळे जरा सेंन्सिबल बनलाय.नायतर त्याचा पण दोस्ताना झाला असता.

बूक माय शो वर गेलात तर सगळीकडे त्याचाच सिनेमाचा शो
नाइलाजास्तव त्याचा सिनेमा पहावा लागतो, Angry

सिनेमे पहाणेच सोडुन द्या ( नवीन). लय पैसे वाचतील आणी त्यातुन एखादी महागडी जीवनावश्यक वस्तु विकत घेता येईल.:फिदी: ( आम्ही तेच करतो)

Pages