लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ६

Submitted by केदार on 24 September, 2014 - 07:30

आम्ही जेवायला म्हणून बाहेर पडलो खरे, पण ज्या ज्या खानावळीत गेलो, तिथे व्हेज काहीही नव्हते. जे काही होते ते ते सगळे नॉनव्हेज. आणि असे नॉनव्हेज की भारतीय नॉनव्हेजीटेरियन पण न खाऊ शकणारा. अर्थात सौम्या त्याला अपवाद होता. त्याने कुठेतरी भरपेट जेवून घेतले. पण आम्ही मात्र परत त्या आमच्या राहण्याच्या ठिकाणी येऊनच जेवलो. पण नेपाळी चहा मात्र एका हॉटेल मध्ये घेतला.

जवळच असणार्‍या नेपाळी मार्केट मध्ये थोडे भटकलो. हे मार्केट म्हणजे आपल्या तुळशीबागेची आवृत्ती. मग लोकांनी तेथे भरपूर खरेदी केली हे सांगने न लगे.

जेवण झाल्यावर मला उद्या लागणारे प्रत्येकी $८०१ गोळा करायचे होते म्हणून मी चैनारामला घेऊन तिथेच थांबलो. मग प्रत्येकाचे ते ८०० डॉलर मोजून घेणे आणि प्रत्येक नोट २००६ नंतरची आहे ते पाहणे हे किचकट काम केले. ( चीन मध्ये २००६ नंतरचेच अमेरिकन डॉलर चालतात, त्या आधीच्या नोटा चालत नाहीत. का ते माहीत नाही.) मी कैलासला जाण्याआधी १५ दिवस शिकागो मध्ये गेलो होतो, तेथून करकरीत नोटा आणल्या होत्या. परागकडे दोन तीन नोटा २००६ च्या आधीच्या होत्या, म्हणून मग त्याला दिल्या. पण सगळ्यांसाठी हे सिरीज पाहण्याचे किचकट काम करण्यात माझा खूप वेळ गेला.

जेवताना पार्वते आणि समाजसेवकांनी LO ला असे सांगीतलं की, "सगळ्यांना लागणारे चीनी RMB पण फायनान्स कमिटीने आणावेत, सगळ्यांनी मोजून फायनान्स कमिटीला पैसे द्यावेत आणि मग फायनान्स कमिटी जाऊन ते कन्व्हर्ट करून आणेन" LO ने टीम मिटिंग मध्ये मला सांगीतलं, ते मी धुडकावून लावले. कोणी किती पैसे घ्यायचे ते घ्या नाहीतर न घ्या, पैसे घेणे न घेणे हा वैयक्तिक प्रश्न आहे ज्यात फायनान्स कमिटी काम करणार नाही असे मी स्पष्ट सांगीतले. ज्याला दोन तीन जणांनी (पार्वते टाईप नारायण लोक, ज्यांना सर्व क्रेडीट हवे असते त्यांनी) व LO ने विरोध केल्यावरही मी बधलो नाही आणि ते काम टाळले. म्हणजे ही लोकं मस्त मार्केट मध्ये फिरणार, आराम करणार, आणि आम्ही मात्र त्यांचे वैयक्तिक RMB चेंज करून आणणार हे काही मला पटले नाही. अर्थात LO ने माझे ऐकले.

LO हा IAS ऑफिसर असल्यामुळे आणि रेल्वे मिनिस्टरचा पर्सनल सेक्रेटरी असल्यामुळे त्याला हुकूम देणे आवडायचे, आणि ही नारायण टाईप माणसं त्याला झेलायची. आमचा ग्रूप मात्र अपवाद होता. पूर्ण ट्रीप मध्ये तो आमच्याशी आदराने वागला. GIve & Take respect तत्त्व कधीही आणि कुठेही कामी येतंच. पण बाकीच्यांवर मात्र तो अरेरावी करायचा हे खरे.

दुसरे दिवशी सकाळी आम्ही आम्हाला लागणारे RMB आणायला गेलो व येतायेता परत एकदा नेपाळी मार्केट मध्ये चक्कर मारून आलो. रानडे म्हणाले की आपण सर्वांनी इथून काही तरी पोस्ट करू या, मग पोस्टात जाऊन थोडा टिपी केला, रानड्यांनी तिकडनं दोन पत्र घरी पाठवली. (जी त्यांना मागच्या आठवड्यात मिळाली.)

संध्याकाळी मग परत ज्यांना ज्यांना घोडे आणि पोर्टर लागणार होते त्याची यादी पार्वतेने तयार केली. पण त्या एजन्सीला एकत्र पैसे द्यायचे असतात म्हणून मग ते पैसे सर्वांकडून मी आणि चैनारामने स्विकारले. ते पैसे मोजणे, व्यवस्थित लावणे, हिशोब करणे ह्या कामी श्याम आणि परागने देखील मदत केली.

मी चीन मध्ये पोनी केला नाही. फक्त पोर्टरच केला. कारण तसेही भारतात पोनीवर मी कधी बसलो नाही आणि ५२०० मिटर्स क्रॉस केल्यावर ५५०० मिटर्सचे तसे फारसे काही वाटले नाही.

ग्रूप मिटिंग मध्ये आज रघूने ( जो न्यु जर्सीकर आहे आणि ज्याने चार वेळा कैलास परिक्रमा केली आहे तो) परिक्रमा मार्ग , त्यातील अडचणी, कुठे काय असेल ह्यावर एक माहितीपूर्ण सेशन घेतले. पण ते आमच्या राजू गाईडला काही आवडले नाही.

राजू बद्दल सांगायचे राहिले. चीन मधील दिवसांमध्ये एक गाईड मिळतो. जो चीन सरकारने दिलेला असतो. हा राजू गाईड भारतात राहिलेला आहे. प्रत्येक क्षणी भारताचा पान उतारा केल्याशिवाय तो श्वास घेत नसे. त्याला हे सेशन आवडले नाही, कारण त्यामुळे त्याच्या पोझिशनला धक्का बसेल की काय असे वाटले. पूर्ण ट्रीप मध्ये हा माणूस गाईड कमी आणि त्रास जास्त होता. येताना त्याचा सोबत प्रचंड भांडणं झाली, ती मी नंतर सविस्तर लिहिलंच,

तकलाकोटहून यात्रींना पुढच्या प्रवासासाठी कुक हायर करावे लागतात, कारण इथे KMVN नसते. आणि व्हेज जेवण मिळत नाही. मग हे कुक लोकं जे देतील ते खायचे. ही लोकं आपल्यासोबत प्रवास करतात. मग पार्वते आणि त्याच्या जोडीदाराने व LO ने ह्या कुकलाच पोर्टर म्हणून हायर केले. जे चुकीचे आहे. तिबेट मध्ये पोर्टर आणि पोनी अ‍ॅलॉट हे लॉटरीने होतात, त्याची एक सिस्टिम असते, ती ह्यांनी बायपास केली.

त्यानंतरच्या दिवशी सकाळी ( ८ जुलै २०१४ ) आम्ही दार्चन कडे निघालो. तकलाकोट ते दार्चन हे अंतर साधारण १०२ किमी आहे. हे पूर्ण अंतर बसनेच जायचे असल्यामुळे आज ट्रेक नव्हता. चीन मधील रस्ते हे अफलातून आहेत. त्या रस्त्यांवरून आमची बस निघाली. आज आम्हाला राक्षस ताल आणि लगेच मान सरोवराचे दर्शन होणार होते.

राक्षसताल आणि मानसरोवर - गुगल अर्थ व्हियू

RakshasTal and Mansarovar.JPG

ह्यात जो राउट S207 दिसतोय त्यानेच आम्ही तकलाकोटहून दार्चन पर्यंत गेलो.

राक्षस ताल आणि सोबतचे मानसरोवर हे सुंदर सरोवर साधारण १५३०० फुट इतक्या उंचीवर आहेत. इथे राक्षस विहार करत व मान सरोवरात देवगण अशी विभागणी आहे. रावणाने शंकराला प्रसन्न करण्यासाठी हे ताल निर्माण करून इथेच आराधणा केली असे म्हणले जाते.

मला स्वतःला राक्षसतालाची निळाई जास्त आवडली कारण त्या दिवशी नेमके चांगले उन होते.

राक्षसतालाचे काही फोटो.

राक्षसतालचे खूप फोटो झाले असे वाटतं असेल. पण, तिथे " किती घेऊ, तीन लेन्सने" असे झाले होते.

राक्षसतालवरंन निघून आम्ही पुढे निघालो. अवघ्या ५-६ किमी मध्ये मग परत मानसरोवर आले, तिथे थांबलो.

ढग असल्यामुळे मानसरोवर अगदीच फ्लॅट दिसत होते.

मानसरोवराच्या पहिल्या दर्शनाने खरं सांगायचे तर फार काही मन वगैरे भरले नाही. पण मानसरोवरच्या काठावर भक्तगण उतरल्याबरोबर त्यांच्यात डुबकी घेण्याची चढाओढ लागली. तेमग तिथे आम्ही काही लोकं वगळता सर्वांनीच डुबकी लावली. ज्यांच्या कडे कपडे नव्हते मग त्यांनी काय करावे? तर ज्याने डुबकी लावली त्याचा कच्छा ( अंडरवेअर) ह्यांनी घातली व डुबकी लावली. एका अंडरवेअरने ८ जणांना तर एकाने तिघांना पवित्र केले. भीम तर म्हणालाही, की ही अंडरवेअर इतकी पवित्र झाली आहे की बास. त्याला मी पुढे देव्हार्‍यात ठेवता येईल अशी पुस्ती जोडणार होतो, पण जोडली नाही.

हा सर्व प्रकार पराग, सौम्या, भीम अन मी पाहून हहपुवा होत होतो. आमच्या ग्रूप पैकी रानडे, बन्सल आणि श्यामने डुबकी लावून पापाचे काउंटर रिसेट करून घेतले. यथावकाश सर्वांच्या डुबक्या झाल्यावर आम्ही पुढे दार्चन गावाकडे (आजच्या मुक्कामी) निघालो.

हे गावं कैलासाच्या पायथ्याशी नाही पण दार्चन पासनं कैलास दिसतो. हे एक एक छोटंस पण टुमदार गाव आहे. इथनं कैलास जसा दिसतो, तसाच गुर्लामांधाता पर्वत (म्हणजे गंधमादन पर्वत) देखील दिसतो. गुर्लामांधाता हा कैलास पेक्षाही उंच आहे. उंची २४५०० + फुट (कैलास २२५०० +/-) मायथॉलॉजी प्रमाणे गंधमादन पर्वतावरूनच स्वर्गारोहणाची वाट होती. आणि इथेच पांडव आणि द्रौपदी एकेक करून पडले.

हाच तो गुर्लामांधाता

आणि हे ते गावं. तिथे दिसणारे सोलार पॅनेल्स पाहा. नॅचरल रिसोर्सचा भरपूर वापर तिबेट मध्ये आढळतो.

आम्ही दुपारी पोचलो होतो. खरेतर रूम मिळाल्याबरोबर तिबेटी ललना, न विचारताच (नॉक न करताच) रूम मध्ये येऊन विक्री करत होत्या. त्यांनी बराच वेळ प्रत्येक गोष्टीला "हाऊ मच" म्हणून बोअर केले. त्यांच्याकडून मग मी काही वस्तू विकत घेतल्या.

गुंजीला येईपर्यंत माझा एक नंबर्ड गॉगल होता. तो अचानक तडकला. माझ्यासोबत दुसरा चष्मा होता पण तो ही तडकेल की काय ही भिती, शिवाय तो क्लिअर ग्लास असल्यामुळे उन्हात तसाही त्याच फायदा नव्हता. मग मी इथे एक कामचलाऊ पोलराईज्ड गॉगल घेतला. अर्थात तो ही चार दिवसांनंतर तुटलाच. पण तो पर्यंत परिक्रमा झाली होती. तो गॉगल घ्यायचा होता म्हणून मग जेवण वगैरे उरकून आम्ही खरेदीसाठी बाहेर पडलो. तिथे मग परत काही खरेदी केली. तसेच गुर्लामांधाताला नीट शूट करता येईल का ते बघितले.

गेले दोन तीन दिवस पायांना आराम मिळाला होता. आता वेध होते उद्याचे. उद्या कैलास परिक्रमा सुरू होणार होती. त्याबद्दलच्या गप्पा मारतच आम्ही निद्राधीन झालो.

लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग १
लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग २
लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ३
लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ४
लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ५
लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ६

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते आमच्या राजू गाईडला काही आवडले नाही >>>> गुरू रे.. >>> गाईड म्हटला की राजूच!! बरोबरे. Proud

नशिब ते पावन वस्त्रं देवघरात ठेऊन पूजा करा असं मोठ्याने डिक्लेअर केलं नाहीस. Biggrin

राक्षसताल अतिशय सुंदर दिसतोय.

आणि ट्रेक सह्ही सुरू आहे.

Pages