लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग २

Submitted by केदार on 11 September, 2014 - 04:56

२०१३ च्या निसर्ग तांडवामुळे कैलास मानसरोवर यात्रा बंद केली होती, तेंव्हा माझी बॅच ७ नं होती. एवीतेवी सुटी घेतल्यामुळे मग मी सहपरीवार लेहला जाऊन आलो. या वर्षी परत फॉर्म भरले आणि माझा नं परत लागला. अचानक एके दिवशी परागचा फोन आला. तेंव्हा मी सायकल चालवत होतो. बॅच नं ५ मध्ये परागचे सिलेक्शन झाल्याचे परागने मला सांगीतले. मग त्यालाच माझे पर्सनल डिटेल्स सांगितले आणि त्याने मला आनंदाची बातमी दिली की, त्याचे अन माझे योगायोगाने एकाच बॅच मध्ये सिलेक्शन झाले आहे !! तेंव्हा मी कुठेतरी जुन्या मुंबई पुणे हायवेवर होतो. तिथून लगेच परत निघालो नी घरी येऊन बातमी ऐकवली.

कैलास यात्रेला जाणे म्हणजे निदान १ महिना लागतो . १ महिना हा कालावधी खूप मोठा आहे. आणि माझ्या ट्रीप नेहमीच अश्या ऑड असतात. हे घरी माहिती आहे, पण तरी जायच्या आधी सगळे जण मला एकदा तरी "नाही, जायचे नाही" म्हणून पाहतात हे ही खरेच. म्हणून घरच्यांनी एकदा परत खरच गरज आहे का? आपण त्याऐवजी सर्व दुसरीकडे जाऊ असे सुचवून पाहिले. पण पुढच्या ट्रीप फार तर १५ दिवसांच्या वर एकट्याने करणार नाही असे वचन देऊन मी ही महिन्याभराची ट्रीप पदरात की खिशात पाडून घेतली !

पहिली तयारी म्हणजे पुणे - दिल्ली जाण्यायेण्याची तिकिटं बुक करायची. परागला जाताना दुरांतोने जायची इच्छा होती आणि मला वेळच मिळत नसल्यामुळे मी त्याला दोन्ही वेळेस विमानानेच जाऊ असा आग्रह केला आणि आम्ही तिकिटे बुक केली.

काय तयारी झाली, कसे करायचे, हे सामान आणलंस का? अरे टॉर्च विसरू नकोस, अरे त्या ड्राय बॅग पाहून येशील का? रेनपँट चे काय? बरं तू हे घेतोस का? मी ते घेईन. असे अनेक प्रश्न आम्ही एकमेकांना विचारायचो आणि नोंद करून घ्यायचो. त्याप्रमाणे आम्ही तयारी केली.

होता होता प्रोटिन बार ( लॉंग राईडला सायकल चालवतानाचे हे माझे फेवरेट खाद्य आहे ) ते टॉर्च ते अ‍ॅडल्ट वाईप्स पर्यंत सर्व घेऊन झाले.

एवढ्या मोठ्या ट्रेक साठी तुमच्याकडे एकवेळ खूप शक्ती नसेल तरी चालेल, पण चांगले वॉटरप्रुफ बुट असणे फार जरूरी आहे. माझा Vasque हायकिंग बूट

Day -5

निघायच्या चार दिवस आधी माझ्या वडिलांना ICU मध्ये भरती केले आहे, असा माझ्या आईचा फोन आला. परत सर्व प्रायोरिटीज बदलल्या आणि पॅकिंग करण्याऐवजी आम्ही सर्व नांदेडला गेलो. तिथे ३ दिवस घालवले. सुदैवाने वडिलांना डिस्चार्ज मिळाला आणि ते म्हणत होते की तू जा, माझी काळजी नको करू, म्हणून मी परत पुण्याला परतलो.

२४ जूनला आम्ही दिल्ली गाठली !

परागने लिहिल्या सारखे सर्व सोपस्कार पार पाडले. गुजराती समाजात आम्ही राहिलो. तिथे दररोज सकाळ संध्याकाळ त्या मेकशिफ्ट ऑफिस मध्ये पूजा पाठ होत असत. माझे आणि पूजेचे काही जमत नाही. ( प्लिज नोट, मला खूप सार श्लोक , स्तोत्र, आरत्या वगैरे वगैरे पाठ आहेत !) पण जिथे-तिथे भक्ती दाखविण्याची एक चढाओढ असते, तिथून मी थोडा लांबच राहतो. त्या ऑफिस कम देवळात रोज सकाळ-संध्याकाळ हनुमानचालिसा / पूजा वगैरे असायची. यात्रेसाठी तो एक चांगला माहोल त्याने निर्माण व्हायचा हे खरे पण मला प्रामाणिकपणे बोअर ते वातावरण बोअर व्हायचं. मी तिथे मोस्टली नसायचो, कधी असलो तर असून नसल्यासारखेच असायचो. पराग मात्र बरेचदा जायचा. त्याने मला, कृपया इथे तरी भक्ती वरून वाद घालायचा नाही, अशी धमकीवजा सूचना केली होती. जी मी पाळली, शेवटी आम्ही "यात्रेत" सहभागी होतो, ट्रेक हा त्या यात्रेचे उप-उद्दिष्ट होते.

दुसर्‍या दिवशी संध्याकाळी मिटिंग घेतली गेली. त्यात मग परत हनुमानचालिसातील ओळी तेथील चेअरमन बुवांनी विषद करून सांगितल्या. शेवटी सगळ्यांना विचारण्यात आलं की तुम्ही ही यात्रा का करत आहात? मी उत्तर दिले, " मुझे मै आस्तिक हूं या नास्तिक हूं ये पता नाही. शायद नास्तिक जादा. मै भगवान की खोज मे ये यात्रा नही कर रहा हूं, तो खुद की खोज मे प्रकृत्तीका आनंद लेने के लिये कर रहां हूं.!"

यात्रेला एकुण खर्च असा

  1. कुमाऊँ मंडल विकास निगम - ३२००० ह्यात राहणे, खानपिणं इत्यादी सर्व येतं.
  2. चायना विजा फी - २४००
  3. मेडिकल फी - ३१००
  4. चीन मधील फी - $८०१
  5. भारतातील पोर्टर - ९०००
  6. भारतातील पोनी - ११०००
  7. चीन मधील पोर्टर - ४५० RMB
  8. चीन मधील पोनी - १०५० RMB

ह्या शिवाय तुम्हाला येणारा खर्च, जसे थंडीचे कपडे, ट्रेकचे कपडे शुज, तिथे करावे लागणारे कॉन्ट्रिब्युशन, सामान इत्यादी इत्यादी. साधारण १.५ लाख ते २ लाख + असा खर्च सहज येतो.

अनेक लोकांची ओळख झाली, काहींची ओळख आता आयुष्यभर राहणार. आणि द बर्ड्स ऑफ सेम फेदर प्लॉक टूगेदर प्रमाणे आमचा असा एक कंपूही तयार झाला. थोडक्यात ओळख करून द्यायची तर

आदारणिय शाम गर्गजी - हा २८ वर्षाचा व्यक्ती बिनधास्त, बेफिकीर असा आहे. तो कमी वयाचा असल्यामुळे उत्तरप्रदेश मध्ये जे काही सत्कार झाले, त्यात त्याला आदरनिय असे म्हणले गेले. तेंव्हापासून आम्ही त्याला आदरनिय असेच म्हणायचो

सौम्या सरकार - हा माणूस इंटरेस्टिंग आहे. एका मोठ्या इंग्रजी दैनिकाचा संपादक आहे. अनेक ट्रेक त्याने केले आहेत. त्याचे आमचे जुळायला वेळ असा लागलाच नाही. मुख्य म्हणजे त्याची अन माझी क्लासिकल आवड पण जुळली. त्याने आणि मी अनेक गाणी बळजबरी (माझ्या फोन मधून) इतर कंपूकरांना ऐकवली. आणि आम्ही दोघांनी John McLaughlin ते रविशंकर ते अनुष्का ते झाकिर ते जसराज अश्या गप्पा मारल्या.

विशाल शिरसाट उर्फ भीम ; भीम नाव ह्याला श्याम ने दिले ते त्याचा उंची आणि भूकेमुळे. हा पण जातीवंत ट्रेकर, मॅरॉथॉन रनर आणि पुणेकर! ह्याचे प्रश्न म्हणजे केवळ असायचे ! श्याम आणि भीम अनसेपरेबल होते.

प्रसाद रानडे : . एकदम भारी माणूस अर्धा गढवाली, अर्धा मराठी. ( बायको गढवाल्ची आणि हे साहेब मुंबईकर मराठी) श्याम वर रानडेंचे भारी प्रेम !

दिनेश बन्सल : पंजाबी पुत्तर गोवामे ! गेल्या हजार वर्षांपासून गोव्यात राहतो. सरकारी ऑफिसर आहे. ( पण एकदम नॉन सरकारी माणूस). अश्यातच ट्रेकिंग आणि मॅराथॉन रनिंगचा छंद लागला आहे.

पराग : ह्या माणसाबद्दल काय लिहावे? मायबोली वाचलेल्यांना तो माहिती असतोच. Happy

आणि आमचे अर्धकंपू मित्र श्री चौबळ - SBI मध्ये खूप मोठ्या पदावर आहेत. आमचा LO, IAS आहे पण त्याचे स्वागत करायला कुणी येत नव्हतं पण चौबळ साहेब? प्रत्येक गावातील त्या त्या शाखेतील माणसं त्यांना भेटायला यायचीच. मग पार गुंजी ते पिथोरागड आणि दिल्ली ते धारचुला त्यांचा दबदबा आहे. पण तो दबदबा त्यांच्या पदामुळे नाही तर त्यांचा "माणूस" असल्यामुळे. अतिशय सरळ, जमिनीवर असणारा माणूस. आमच्या यात्रेतील प्रत्येक कंपू मध्ये हा माणूस हवासा असायचा, मग तो कंपू गुजराथी असो की हटलेल्या डोक्याच्या माणसांचा!

दिल्लीत गेल्यावर तिसरे दिवशी टेस्टचे निकाल आले आणि आमच्यापैकी ९ जण गळाले. सर्वांच्या चेहर्‍यावर दुसरे दिवशी सकाळ पासून ते निकाल येईपर्यंत अनिश्चितता होती. प्रत्येक जण टेन्स मध्ये होता. आम्ही "पास" होऊ असे हे आम्हाला माहिती होते.

ITBP च्या रिझल्ट अनाउंसमेंट नंतर अनेक कमिट्या तयार होतात. उदा लगेज कमिटी, फुड कमिटी, फायनान्स कमिटी इत्यादी. हट्टेकट्टे माणसं पाहून त्यांना लगेज मध्ये घालतात हे मला आधीपासून माहिती होते. त्यामुळे मी दोन दिवस आधी जेंव्हा आमची एक मिटिंग झाली होती तेंव्हा मी फायनान्स कमिटी पाहिल असे आधीच सांगून ठेवले, तर मग मी आणखी दोघांना घेऊन फायनान्स कमिटी स्थापन केली. त्यात श्री चौबळ आणि चैनाराम होते.

कमिटीला पैसे गोळा करून सर्व खर्च ( जसे टिप्स, सामान ने आण करण्याचे पैसे, तिबेट मध्ये लागणार्‍या सामानासाठी पैसे, तेथी स्वंयपाक्याचा पगार) असे अनेक कामं करावे लागतात. मागच्या कमिटीने प्रत्येकी ५००० रू जमा केले होते असे कानावर आले. काही उत्साही लोकं आपणही करू असे म्हणाले. मी जेंव्हा बोलायला उभा राहिलो, तेंव्हा सांगीतलं की आपण ३००० रू घेऊ आणि लागलेच तर परत गोळा करू, कारण ३००० X ५० = १५०००० जमा होतील आणि ते मलाच सांभाळावे लागतील. लोकांनी मग ते ऐकले.

पण .. काही लोकांना ते ही आवडले नाही. कारण गाईड मध्ये २००० जमा करा असे लिहिले होते. त्यातील दोन बायका अनेकांच्या कानी लागल्या. एकीला मी समजावून सांगत होतो की बाई, तुझे पैसे कुठेही जाणार नाहीत, उरले तर तुला परत मिळतील , पण तिथे पैसे गोळा करत बसणे म्हणजे जास्त होईल, तर ती बाई मला म्हणाली, " बाबू ये पैसे तो तूम खा लोगे"

ती तळपायाची की काय आग असते ती मस्तकात वगैरे जाऊन सुद्धा मी न चिडता उतरलो की हे बघ बाई, मी जर माझ पाकीट उघडलं तर त्यातून दिड लाख सहज बाहेर पडतील, कृपया करून मला नीट बोल" आणि एवढे बोलून शांत झालो. मग त्या बाईला मी तिचे १००० परत देण्याच्या निर्णय घेतला आणि चैनाराम जो माझ्यासोबत कमिटीत होता, त्याला तिला परत द्यायला सांगीतले. त्याने ते दिले. माझ्या त्या वाक्याच्या खूप परिणाम झाला, कारण नंतर मला कोणीही, कधीही, पैंसोंका क्या किया? असे विचारले नाही. पुढे उरलेल्या पैशातून मी देणगी द्यायचा निर्णय घेतला, त्यालाही कोणी विरोध केला नाही आणि आम्ही २५००० + ५००० अशी देणगी ITBP ला दिली. पहिल्याच दिवशी असे झाल्यामुळे पुढे काय वाढून ठेवले आहे ह्याची कल्पना आली, पण मी अश्या सामाजिक भाकर्‍या खूप भाजलेल्या असल्यामुळे मला फारसे काही वाटले नाही. असे लोकं सगळीकडेच असतात. जिथे दिड लाखाच्यावर खर्च करून कोणी येत असेल त्याला कुणाच्या १००० रू मधून काय मिळणार? पण असे लोक ह्याच ट्रिप मध्ये होते,ह्याचा अनुभव काही दिवसातच आला.

लगेज कमिटीमध्ये फानी कुमार नावाचा प्राणी होता. हा माणूस कायम तिरसट बोलायचा. गनी बॅग देण्यावरून त्याचे आणि रानडेंची बाचाबाची झाली. रानडे लगेच माझ्याकडे आले आणि म्हणाले की तो फानी त्यांना बॅग देत नाहीये, काहीतरी कर. मी त्याजागी जाऊन फानीकडून ( ह्याला नंतर आम्ही फनीच म्हणू लागलो) बॅग घेतल्या आणि रानडेंना दिल्या.

होता होता हे सर्व सोपस्कार दिल्लीत पार पडले आणि आम्ही २८ जूनला दिल्ली बाहेर पडलो.

पुढील दोन दिवसांचा मॅप

Map_1.JPG

पहिलाच थांबा ५० किमीवर ब्रेफफास्टचा होता. इथे परत गळ्यात हार घालून स्वागत झाले. आणि इथेच "आदरनिय" असे नाव पडले.

मजल दर मजल करत आम्ही अल्मोडाला पोचलो. काठगोदाम पर्यंत दोन-तिनदा सत्कार झाले. तिथपर्यंत व्होल्वो होती. पुढे काठगोदाम ते अल्मोडा आणि अल्मोडा ते धारचुला मात्र छोटी बस होती.

काठगोदामला मस्त पैकी जेवण झाले. तिथून पुढे नैनीताल - भीमताल असे करत अल्मोराकडे कडे निघालो.

अल्मोराला रात्री ट्रीप मधील पहिले भांडण झाले ते रूम अलॉटमेंटवरून. काल रात्रीच्या बाचाबाचीचा बदला फनीने रूम अ‍ॅलॉटमेंट मध्ये घेऊन रानडेंनां त्रास देण्याचा प्रयत्न केला. ते प्रकरण निस्तरले. रोज रात्री हॉटेल वर पोचलो की रूम अ‍ॅलॉटमेंटचा प्रश्न असायचा कारण जे जे मित्र होते त्यांना एकत्र राहायचे होते, जे जे नवरा बायको होते त्यांनाही एकत्र राहायचे होते आणि फनी हे सगळे बिघडवत होता. अर्थात मी अन पराग रूम नेहमीच एकत्र मिळवायचो ते गोष्ट अलहिदा. पण फनी लोकांचा बदला घेत होता. आणि लोकं फनीवर चिडली होती. इतकी की त्याला चादरीत घेऊया असा प्रस्ताव आमच्या ग्रूपने एकमताने संमत केला होता. अर्थात एकदा फनीला आमची सहानुभूती मिळाली, पण तो प्रसंग नंतर.

आम्ही दोघे (पराग आणि मी) कायम सोबतच असायचो ह्याचे इतरांना नवल वाटत होते. सौम्या तर मला, तुम्ही इनसेपरेबल आहात असे म्हणाला. मग मी त्याला म्हणालो की बाबारे आम्ही दोघे गेल्या ७-८ वर्षांपासून मित्र आहोत. त्याची माझी पहिली भेट शिकागोत झाली होती आणि त्याला मी नेट मुळे ओळखतो. हे ऐकुन ग्रूप मध्ये सर्वांना नवल वाटले होते. ग्रूप मध्ये सर्वांना वाटले की आम्हा दोघांची पहिली भेट गुजराथी समाजात, दिल्लीला झाली असेल

आमचा ग्रूप बसमध्येही एकत्रच आजूबाजूला बसायचा. त्यामुळे दोन दिवस धमाल आली. शाळेच्या ट्रीपसारखीच ! मध्ये मध्ये लोक भजन गात होती आणि आमचा आणखी एक मित्र (उत्कल पटेल) सारखी, " ॐ नम: पार्वती पते, हर हर महादेव" ची घोषणा देत होता. त्यातील महादेव हे तो ओरडून इतका वेळ म्हणायचा की बास ! म्हणून त्याचे नाव मी पार्वते असे पाडून टाकले. नॉर्थ मध्ये हर हर महादेव च्या वेळी हात वर करतात हे पण आम्हाला नवीन होते. पण एकंदरीत खूप मजा आली.

आमच्या ट्रीपची रोजची आखणी इथे मिळेल. इथे जे मिटर्स दिले आहेत ते कॅम्पसाईटचे आहेत. त्यामुळे Zunzhui Pu ला येताना डोल्माचे ५६०० किंवा लिपूलेख पासचे खरे मिटर्स इथे दिलेले नाहीत. शिवाय ट्रेक आम्ही जीपीएस द्वारे मोजला. तर काही दिवशी आम्ही इथे लिहिलेल्या पेक्षा २ ते ३ किमी जास्त चाललो आहोत.

अल्मोरा हून पुढे जाताना एक गोलू बाबाचे मंदीर लागते. हे मंदीरही नवसकरणार्‍यांसाठी प्रसिद्ध ! तुमची कैफियत / फिर्याद तुम्ही इथे लिहून बांधायची. आणि जर गोलू बाबाने ऐकले तर तुम्हाला ते सगळे मिळेल / तुमचा त्रास दुरू होईल वगैरे आणि त्या बदल्यात तुम्ही मग गोलू बाबाच्या देवळात अशी घंटा बांधायची !

दर्शन घेऊन पुढे आणखी एका मंदिरात थांबलो.

तिथून पुढे ITPB च्या कॅम्पवर जेवण केले आणि ब्रिफिंग नंतर धारचुलाला पोचलो.

धारचुलाला परत एकदा हॉटेल अलॉटमेंट मध्ये गोंधळ झाला आणि फनी कुमारने लोकांचे अगणित पुण्य कमावले.

तर ह्या भागाचा शेवट करताना मी पण म्हणून घेतो.

ॐ नमः पार्वतीपते, हर हर महादेव !!!

लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग १
लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ३
लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ४
लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ५
लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ६
लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ७

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा, कैलास मानसरोवर यात्रेसंबंधी अनयाताईंनी मायबोलीवर त्यांच्या यात्रेचे प्रवासवर्णन केले होते ते मला खुप आवडले होते.

तुमचे अनुभवसुध्दा वाचायला मिळत आहेत ही तर खुपच चांगली गोष्ट आहे. पुढील भागाच्या प्रतिक्षेत................

वा! वा! छान, ऐसपैस वर्णन Happy समोर बसून ऐकल्यासारखं वाटतंय.

नेटवरची ओळख (आणि मैत्री) याचं आजही अनेकांना भयंकर आश्चर्य वाटतं हा अनुभव मलाही अनेक ठिकाणी येतो.

त्याच्याशी/तिच्याशी माझी चांगली नेट-मैत्री आहे, पण आम्ही अजून प्रत्यक्ष भेटलेलो नाही - हे अजून एक. Lol

छान चाललेय.. वाचायला मजा येतेय.

हे फनीकुमार वगैरे मंडळी नेमकी अशी कशी असतात याचा पत्ता लागत नाही....

केदार, आधी सगळे लेख वाचले होतेच. पण परत वाचताना पुन्हा यात्रेचे दिवस आठवून छान वाटल!
आता पुढच्या मेंबरच्या लेखांची वाट बघुया.