किशोर, चांदोबा, चंपक, ठकठक, आनंद, गंमतजंमत - आपलं भावविश्व व्यापून टाकलेली मासिकं

Submitted by मामी on 12 August, 2014 - 02:43

शालेय जीवनात शत्रुपक्षातील पुस्तकांबरोबरच अत्यंत जिव्हाळ्यानं वाचली जाणारी मित्रपक्षातील मासिकं होती. किशोर, चांदोबा, चंपक, ठकठक, आनंद वगैरे अनेक मासिकांनी अपरीमित आनंद दिला आहे. आपल्या या लाडक्या मित्रांच्या आठवणी इथे जागवूयात.

विशेष सुचना : कृपया कोणत्याही मासिकातील उतारा इथे जसाच्या तसा लिहू नये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पण किशोरवाली Happy शिवाय चांदोबा, कुमार आणि आनंद. चंपक थोडंफार. ठकठक येईपर्यंत शा़ळकरी वयातून कधीच बाहेर पडले होते.
या सगळ्या अंकांची बाईण्डिंग केलेली वर्षांची बाडं घरी होती. किशोरमधल्या कॅप्टन नेमोची गोष्ट अगदी चित्रांसकट आठवते. शिवाय काही वर्षांतच राहुल ला ' ट्वेन्टी थाउजण्ड लीग्ज अन्डर द सी' आला होता तोही बघितला होता.
भा रा भागवतांची एक गोष्ट होती ना ट्रेजर हंटची सिंहगडच्या परिसरात? मस्त होती एकदम. शिवाय कृष्णाबाई मोटे यांची एक लेखमालिका होती पृथ्वीच्या इतिहासावर व आदिमानव, शेतीची क्रांती वगैरे. त्यातली चित्रंही अजून आठवतात. शिवाय आणखी एक मालिका होती. दोघं भावंडं समुद्रतळाची सफर करतात, स्टिंग रे बरोबर बहुदा... मग तिथल्या सर्व माशांची, वनस्पतींची, भूभागाची माहिती.
माझं चौदावं वर्षं ही लेखमालिका वाचल्याचं आठवतंय बहुदा. का मोठ्यांच्या लहानपणाच्या गोष्टींची आणखी एक वेगळी मालिका होती? दिलीप प्रभावळकरांचा किस्सा होता त्यात, लहानपणी तपश्चर्या केल्याचा..

मी चंपक आणि नंतर ठकठक ची चाहती होते. माझे अजोबा पैसे द्यायचे विकत घ्यायला. मी आणि माझा चुलत भाऊ मांडवली करून तु चंपक घे, मी ठकठक घेतो असं करून विकत घ्यायचो आणि नंबर लावून वाचायचो. मला तर जेवतानाही समोर पुस्तक लागायचं.
आमच्या घरासमोर एक पोस्टर्स चं दुकान होतं, तो माणूस अगदी छोटी छोटी गोष्टींची पुस्तकं विकायचा. (किंमत ७५ पैसे १ रूपया फार तर दिड रूपया) कधी कधी अजोबा एक एक रूपया देत असत मग आम्ही त्याच्याकडे जाऊन पुस्तक मागायचो. तो पुस्तकांचा समोर असा ढिग टाकायचा. आम्ही अवाक व्हायचो. मग मुख्यपृष्ठ पाहून २ निवडून आणायचो. कधी कधी जास्त पैसे मिळाले की ४ पुस्तकं. मग दिवस त्यातच जायचा. Happy रम्य आठवणी.

चांगला धागा आहे .माझे किस्से लिहिणार आहे .वेताळ (फैँटमचा अनुवाद) आणि माहीमचे फुलबाग आवडायचे .चांदोबातल्या परोपकारी गोपाळ आणि कंजुष लोकांच्या गोष्टी वाचून आश्चर्य वाटायचे (आता नाही वाटत) .शामची आई नाही वाचवले .जादूची काठी ,भोपळा ,अंगठी इत्यादींचा नंतर कंटाळा येऊन दक्षतामधल्या खुनाच्या कथा आवडू लागल्या .निम्माशिम्मा राक्षस ,अचाट गावची अफाट मावशीला टाटा करून मैकेन्नाझ गोल्डची तिकीटे निघू लागली .

<भा रा भागवतांची एक गोष्ट होती ना ट्रेजर हंटची सिंहगडच्या परिसरात?> ही मलाही आठवतेय.
तेव्हा लेखकांची नावं वाचायची सवय नव्हती. किशोरचे संपादक वसंत शिरवाडकर ना?
विज्ञानविषयक, निसर्गविषयक लेखही छान असायचे त्यात.
कीटक खाणार्‍या वनस्पतीबद्दलचा लेख चित्रांसकट आठवतोय.

@मी_आर्या – मी ही अगदी हेच लिहिण्यासाठी आलो होतो. त्यावेळी त्या अव्याहत फिरणाऱ्या चक्राची भीती वाटली होती, मला आठवतंय त्याच चित्रपण शेजारी होतं, काटेरी आऱ्या आणि रक्तबंबाळ डोकं... स्वप्नातही एकदा दोनदा आलं होतं. Proud Proud Proud

चुलत भावाने त्याच्याकडचे जुने चांदोबाचे अंक दिले होते, त्यात क्रमश: रामायण सुरु होतं.

किशोर मासिकात शब्द कोड्या ऐवजी चित्र कोडे असायचे.. कपीश नावाच्या माकडाची चित्र कथा देखिल असायची असे आठवतेय.. टॉनिक नावाचे एक वार्षिक देखिल असायचे..

@गा पै - तुम्हाला चांदोबातल्या मायासरोवर आणि भल्लूक मांत्रिक मालिका आठवतात का?

हो तर.... वाचून नॉस्टॅल्जिक व्हायला झालं.:) Happy Happy

चांदोबा व किशोर हे आद्यबालसोबती होते माझे. सोबत कुमार, आनंद, फुलबाग व चंपक असायचेच. ठकठक बराच नंतर वाचू लागले. अमरचित्रकथा. विचित्र विश्वचे अंक काकांकडे यायचे. तेही अधाशासारखे वाचायचे. नंतर रीडर्स डायजेस्ट. आमच्याकडे इस्रायलचे एक मासिक काँप्लिमेंटरी यायचे. बहुतेक फ्रेंड्स ऑफ इस्रायल असे नाव होते. तेव्हा मला इंग्रजीतले फार काही कळायचे नाही. पण त्या मासिकातील कृष्ण धवल चित्रे पाहायला मजा यायची. शेतकरी मासिकही मी हौसेने वाचून काढायचे. बाबा तेव्हा नवल, मेनका, पैंजण इत्यादी दिवाळी अंकांमध्ये नियमित कथा द्यायचे, त्यामुळे ते अंकही घरी यायचे. पण ते वाचायला तेव्हा परवानगी नव्हती. प्रवासाला गेलो की चांदोबा आणि जत्रा मासिक (कोड्यासाठी - त्याला खास बक्षीस असायचे) विकत घेतले जायचे.

फुलबागेचा अंक मला खूप आवडायचा. कारण त्यातील रेखाटने व विशिष्ट प्रकारातील छापलेला मजकूर. चांदोबातील चित्रांचा माझ्या चित्रकलेवर खूप प्रभाव होता. शाळेच्या वाचनालयात किशोरचे सर्व अंक बाईंडिंग करून ठेवलेले असत. मग दिवाळी व मे महिन्याच्या सुट्टीत त्यांवर डल्ला.

किशोर बद्दल एक आठवण - मधल्या पानावर श्याम जोशीं चं एक कार्टून असायचं ('चिंटू' सारखं), लहान मुलां साठी खास... Happy

माझ्याहून बर्‍याच मोठ्या असलेल्या एका भावाच्या कृपेने आमच्याकडे ऐंशी ते ब्याएंशी सालचे बरेच किशोरचे अंक आले होते. त्यातल्या गोष्टी वाचल्या की आमच्या काळातल्या अंकांचा दर्जा किती घसरलाय असं वाटायचं Wink त्यातल्या बर्‍याच गोष्टी तुकड्यातुकड्यांत आठवत आहेत पण इथे किती लिहिणार ...? Happy आज ते अंक कुठे मिळत असतील तर मी आनंदाने विकत घ्यायला तयार आहे. आमच्याकडचे आईने एका आश्रमाला देऊन टाकले !

त्यात भा.रा. भागवतांच्या काही फार सुरेख गोष्टी होत्या. एक 'गड आला आणि सिंहही आला' अशी होती. मुलांच्या वाढदिवसाला त्यांचे वडील नाना त्यांना ट्रेझर हंटला पाठवतात आणि मग बर्थडे गिफ्टच्या शोधात मुलं सिंहगडावर पोचतात, तिथे त्यांना पुस्तकांचा खजिना गवसतो अशी गोष्ट. त्यांचीच एक पोस्टमन आणि मुलाचीही गोष्ट होती. एक छोटा मुलगा पोस्टमनकाकांना सोपे जाईल अशी अनेक सोयींनी युक्त सायकलचे रेखाचित्र तयार करतो अशी खूप ह्रद्य कल्पना होती.
समस्यापूर्तीबद्दलच्या गोष्टी खूप मस्त असायच्या.
एक आर्मीच्या कॉलनीत राहणार्‍या मुलांची गोष्ट होती. त्यातल्या एका मुलाला दुपारी मेसचं जेवण जेवावं लागायचं. त्याला ते अजिबात आवडायचं नाही. तिथे काम करणारा त्याच्याच वयाचा मुलगा त्याला आपली बहीण कशी छान छान पदार्थ बनवते त्याचं रसभरीत वर्णन सांगायचा. ते ऐकता ऐकता हा मुलगा मेसचं जेवण गिळायचा. नंतर एक दिवस त्याला आणि त्यांच्या मित्रांना शोध लागला की ह्यांच्या ताटातलंच उरलेलं हा मुलगा गोळा करायचा आणि लपूनछपून खायचा. फार सुंदर फुलवली होती ती गोष्ट !

बाकीच्या मासिकांत चांदोबा, ठकठक आणि चंपक ह्या क्रमाने मासिकं आवडायची. चंपक मुळात हिंदी मासिक होतं त्यामुळे त्यातलं मराठी मजेशीर असायचं. 'वो हैरान हो गया' चं 'तो हैराण झाला' हे भाषांतर चागलं लक्षात आहे.

आमच्या शाळेत एका वर्षी 'अबब हत्ती' नावाच्या एका मासिकाची जाहिरात केली होती. बहुतेकांनी घेतलं होतं ते मासिक. त्यात एका 'परतोनि' आलेल्या सातवी-आठवीतल्या मुलीची गोष्ट होती. आधी ती मुलगी कशी इथे रुळत नाही, तिच्या उच्चारांची थट्टा होते आणि मग एकदा तिला गुलमोहराचं झाड दिसतं. आधी एकाकी आणि मग उन्हाळ्यात एकटंच फुललेलं. परदेशातून इथे येऊन रुजलेल्या त्या झाडासारखीच मग तीही इथे रुजते, तिच्या आईची काळजी कमी होते. तेव्हा खूप नवलाईची वाटायची ती गोष्ट Happy त्यात जिब्राल्टर खाडी पोहलेल्या ठाण्याच्या मुलीनेही लेख लिहिला होता.

छात्र प्रबोधनची मासिकंही सुंदर असायची. त्यातल्या गोष्टींपेक्षा गाणीच आठवतात. स्वीकारुन ही नमनेसुमने आशीर्वच द्यावा, नमोस्तुते गुरुदेवा किंवा विकसता विकसता विकसावे किंवा क्षितीज नवे मज सतत बोलवी ... अजूनही मला ह्या गाण्यांची चाल पूर्ण लक्षात आहे !

चांदोबा, ठकठक, चंपक आणि इंद्रजाल. मँड्रेक, चीकू, चाचा चौधरी आठवतायत स्पष्ट. बाकी फारसं काहीच आठवत नाही.
श्यामची आई शाळेत असताना वाचलं तेव्हा आवडलेलं, अजूनही वाचते अधूनमधून, पण स्वतःसाठीच. लेकासाठी एकदा वाचायला घेतलं पण खुप गोष्टी त्याला समजून सांगता येत नाहीत, काही आता स्वतःलाही पटत नाहीत म्हणुन सोडून दिलं. डोक्यात नुसता गोंधळ माजतो.

किशोर मी खुप नंतर, शाळेतून बाहेर पडल्यावर वाचला. मस्त असायचा.
आता लेकासाठी किशोर नियमीत येतो. आणि तो वाट बघतो त्याची हे महत्वाचं.

हे सगळेच प्रतिसाद अन लेखविषय मस्तच.
जादू अशी होती किशोर-कुमारच्या अंकांची विशेषत: की अजूनही विस्मरणात काहीकाही गोष्टी गेल्या नाहीयेत. एक 'तिबेटी मुलांची नावे छोटी का असतात ' अशी काहीतरी गोष्ट होती. त्यातल्या मुलाचं नाव ' रिकी टिकी तांबो नो सी रांबो हारी बारी बशकी पारी पिम पो ' असं लांबलचक होतं Happy आणि त्याच्यावर संकट कोसळलं होतं , त्यात या नावाच्या लांबीमुळे भर पडल्याने मग त्या लोकांनी मुलांची नावं छोटी ठेवायला सुरुवात केली अशी गंमत होती.
तिरसिंगराव नावाच्या एका पेहलवानाचीही एक मालिका होती..इटकू पिटकू ही उंदीर पिल्लं होतीच. दिवाळी तर या दिवाळी अंकांशिवाय अशक्य होती.

किशोर यायचा नियमीत. कुमारचा दिवाळी अंक यायचा घरी. चंपक बहूतेकवेळा बसस्टँडवर गेलं की घेतला जायचा. चांदोबा पण प्रवासात. पण चांदोबा तितकासा वाचला नाही.
ठकठकचे अंक मुंबईत आज्जीच्या लायब्ररीमध्ये दिसायचे. आनंद पण मुंबईअच्या लायब्रईमध्येच बघितला. आमच्या अंबाजोगाईच्या लायब्ररीत नसायचे बाकी कोणतेच अंक.
दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीनंतर बाई दिवाळीचं चित्र काढयला लावायच्या. मी हमखास किशोरच्या मुखपृष्टावरचंच चित्र काढायचे. Happy
३-४ वर्षांपूर्वी किशोरचा दिवाळीअंक मुद्दाम घेवून बघितला होता. अज्जिबातच आवडल नाही.

इटकू पिटकूची पुस्तकंही मिळायची बाजारात. मी पुस्तकंच वाचली आहेत. शैलजा राजेंची. त्यांचंच डाकूंची टोळी आणि बालवीर हे माझं अगदी आवडतं पुस्तक.
अगो, गोष्टीच्या नावाबद्दल धन्यवाद

मामी - इंद्रजाल कॉमिक्स अ‍ॅड कर बरं वरती शीर्षकात. वेताळ, मॅन्ड्रेक, बहादूर-बेला, फ्लॅश गॉर्डन, रिप कर्बी, सगळ्यांचीच मी फ्यान...

मी इंद्र्जाल कॉमिक्स्ची कट्टर चहाती!! चंपक, कीशोर पण खुप वाचले, कीशोर मधले चित्र रंगवुन पाठवंणे हा दर महीन्याचा धंदा होता. एकदा सलग सहा वेळा पहीले बक्षीस मिळवले होते.. त्यामुळे जरा जास्तच प्रेमाने कीशोर वाचला जायचा पण वेडं हे वेताळ आणि मैड्रेकचे !! ह्या इंद्र्जाल कॉमिक्स्चे ३/४ बाडं होती..
नंतर अ‍ॅस्ट्रीक्स आणि ऑबेलीक्सचे वेड लागले, मग त्यात टीनटीनची भर पड्ली..
मुलामुळे मधे आर्चिज वाचले गेले

इटकू पिटकूची पुस्तकंही मिळायची बाजारात. मी पुस्तकंच वाचली आहेत. शैलजा राजेंची. त्यांचंच डाकूंची टोळी आणि बालवीर हे माझं अगदी आवडतं पुस्तक.>>हो गं हो मी पण वाचली आहेत

हे ठकठक प्रकरण बरंच अलिकडचं असावं. कधी वाचलं नाही.

किशोर, कुमार, चांदोबा, लोटपोट आणि इंद्रजाल कॉमिक्स स्टेपल होते.

ज्ञानदा नाईक संपादिका झाल्यावर किशोर मासिक भंकस झालं.

किशोर मासिकातलं चित्रबोध शब्दशोध, खमंग वासाची गोष्ट, छोटुचा रुसला टॉवेल, विझर्ड ऑफ ऑझचा अनुवाद ठळकपणे आठवतं.

मी चांदोबा आणि किशोर वाली. <<चांदोबा तली विक्रम वेताळची क्रमशः कथा..>> अगदी अगदी आणि एक गरीब ब्राह्मण असतो Happy

वरचं सगळ वाचताना अगदी अगदी होतय Happy

इंद्रजाल कॉमिक्स खुपच आवडायची.
आम्ही दोघं अक्षरशः खाउचे पैसे साठवून ही पुस्तक आणायचो.
एकाने आणलेले पुस्तक दुसर्‍याने अर्धे पैसे दिल्याशिवाय वाचायला मिळायचे नाही Happy

कुणी मधुमुस्कान वाचले नाही का? जम्मूच्या स्टेशनावर ४-५ तास ट्रेनसाठी वाट बघताना ह्याचा शोध लागला होता. मजेशीर होते. डॅडीजी,हेडएक , राजू अशी पात्र होती.

मामे, मस्त उजाळा दिलास जुन्या आठवणीना
आमच्या कडे रीडर्स डायजेस्ट्,किर्लोस्कर्,स्त्री,माहेर,नवनीत यांबरोबर पराग्,नंदन्,चंदामामा,किशोर्, रिप्ले चे ,' ऐकावे ते नवलंच,इंद्रजाल कॉमिक्स ची मासिके दर महिन्याला यायची.
फँटम ची मराठी आवृत्ती त फँटम ला ,' वेताळ' नाव असे.. आम्हालाही वाटे कि काही अडचण आली कि सरळ जंगलात जाऊन ,'वेता>>>ळ' अशी हाक मारली कि वॉकर कुठून ही येऊन आपली मदत करेल याची खात्रीच वाटायची.. Proud
इतरही पुस्तकांचा भला मोठा साठा असे. तो इतका मोठा झाला कि जेंव्हा प्रायमरी तून सेकंडरीत आलो तो अक्खा साठा शाळेच्या लायब्रेरी ला बहाल करून टाकला..

मला चांदोबाच्या संपादकांची चक्रपाणी आणि नागीरेड्डी ही नावं आठवतात. तसेच चांदोबा बहुभाषिक होतं. त्याच्या मुख्यालयाचा पत्ता (तत्कालीन) मद्रासमधला होता.

-गा.पै.

पुण्यात मंडई पोलिस चौकीजवळ एक दुकान होतं. तिथे २ रुपये डिपॉझिट ठेवलं की २० पैसे देउन चंपक वाचयला मिळायचं. काय मस्त दिवस होते.

Pages