'आम्हाला मातृभूमी नाही'

Submitted by आशयगुणे on 4 May, 2014 - 14:49

मी आणि प्रसाद एकाच कॉलेज मधले. पहिल्या दिवशीच्या पहिल्या लेक्चरला एक शांत मुलगा चौथ्या -पाचव्या बाकावर येउन बसला आणि एक मितभाषी मुलगा अशी त्याची पहिली छाप माझ्यावर पडली. मी देखील फार बोलकी वगेरे नाही. पण ओळख आणि मैत्रीची खात्री पटली की मी अगदी मनापासून गप्पा मारते. हळू हळू कॉलेज मध्ये सर्वांशी ओळख होत होती आणि मित्र-मैत्रिणी ह्यांची संख्या वाढत होती. पण ह्याचे मितभाषी असणे अजूनही तसेच होते. जे काही शिकवले जायचे ते मात्र अगदी व्यवस्थित वहीत उतरवून घ्यायचा तो. आणि एके दिवशी 'फौंडेशन कोर्स' नावाचा विषय आम्हाला शिकवला जाणार हे कळले. एकंदर सामाजिक भान वाढविण्यासाठी हा विषय होता. लेक्चरच्या वेळेस प्रोफेसरांनी 'आरक्षण हवे का नको' ह्या विषयावर चर्चा करायचे ठरविले. हा फार संवेदनशील विषय आहे हे मला माहिती होते परंतु वर्गातील सारी मुलं एवढ्या तावातावाने विरोधात बोलतील हे मला अनपेक्षित होतं. त्यातल्या एकाने आरक्षणासाठी थेट डॉ. आंबेडकरांना जबाबदार धरले आणि त्यांच्यामुळे देशाचे वाटोळे झाले असे सांगितले. सारा वर्ग टाळ्या वाजवू लागला आणि एकदम एका मुलाने हात वर केला. त्याला बोलायची संधी दिली गेली आणि बाबासाहेबांबद्दल तो इतके सुंदर बोलला की बस्स - प्रोफेसर देखील त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागले. वर्गातील मुलांना देखील त्यापुढे काही बोलता आले नाही आणि बऱ्याच लोकांनी काहीतरी निरर्थक मुद्दे काढून उगीच विरोध करायचा प्रयत्न केला. परंतु ते फोल ठरले आणि चर्चा संपली! मी मुद्दाम वर्गाबाहेर जाउन त्याच्याशी बोलले. प्रसाद सारखा शांत मुलगा एवढे प्रभावी बोलू शकेल ह्यावर माझा विश्वास बसत नव्हता!

पुढे आमची ओळख वाढली. गप्पा वाढल्या. बरेच विषय बोलले जायचे परंतु वैचारिक चर्चा जास्त होत असे. कधी कधी लायब्ररी मध्ये नोट्स काढणे म्हणून बसले जायचे परंतु अभ्यास सोडून सामाजिक विषय जास्त बोलले जायचे. त्याला त्यावर बोलणे फार आवडायचे आणि त्याचे मुद्दे देखील खूप प्रभावी असायचे. खूप वाचन होते. आणि शिवाय विचार अगदी सर्वसमावेशक होते. माझ्या घरी भिंतीवर बाबासाहेबांचा फोटो होता परंतु माझ्याकडे त्या फोटोला नमस्कार करणे ह्यापलीकडे काहीच नव्हते. आणि त्याचे त्यांच्याबद्दल असलेले वाचन मला शरमेने मान खाली घालायला लावायचे. आमची मैत्री वाढत गेली तसा तो अधिक बोलका होऊ लागला. एकदा असाच एक विषय सुरु होता. प्रसाद भान सोडून बोलत होता. लायब्ररी मध्ये पुढे बसलेल्या लोकांनी एक-दोन वेळेस मागे वळून आमच्याकडे पाहिले देखील. "आणि मग आम्हाला मातृभूमी नाही असे बाबासाहेब म्हणाले त्यात चूक काय?" अंगावर शहारा आला होता आणि डोळे पाणावले होते त्याचे. तो लालबुंद चेहरा मला अजून लक्षात आहे.

एकमेकांचा नंबर तर होता आमच्याकडे! त्यामुळे मेसेज वगेरे सुरु झाले. तेव्हा व्हाटसअप वगेरे नव्हतं आणि फेसबुक पण नुकतंच सुरु झालेलं! त्यामुळे मेसेज फॉरवर्ड करणं सुरु असायचं. आणि मी त्याच्या विचारांच्या आणि नंतर त्याच्या प्रेमात केव्हा पडले हे कळले देखील नाही. पण विचारायचे कसे? शिवाय विचारायच्या आधी आमची भिन्न पार्श्वभूमी लक्षात आली आणि क्षणभर बिचकले! परंतु मन सांगत होते विचारून मोकळी हो! आणि मी एकेदिवशी आम्ही घरी येताना त्याला सांगून टाकले. क्षणभर तो माझ्याकडे बघत राहिला! नंतर म्हणाला, " मला देखील तुला हेच विचारायचे होते!"
मी जे ऐकले त्यावर माझा विश्वासच बसेना! काही न बोलता आम्ही नुसतेच चालत राहिलो. आणि अचानक मनात आलेल्या विचाराने मी पुन्हा घाबरले. आणि धैर्य गोळा करून म्हणाले, " आमच्या घरी बाबासाहेबांचा फोटो आहे तरी सुद्धा तुला चालेल?"
तो माझ्याकडे पाहून हसला. म्हणाला, " माझे विचार आणि माझी कृती ह्यात फरक नाही!"

आमच्या घरी आणि नातेवाईकांना समजावणे हे एक आव्हानच होते. आपली मुलगी एका बामणाच्या घरी चालली आहे ह्या कल्पनेने काही नातेवाइक एकदम खूश होते तर काही एकदम नाराज! त्याच्या घरचे नातेवाइक तर अजिबात तयार होत नव्हते. परंतु प्रसाद माझ्याबरोबर उभा होता आणि मला ह्यात समाधान होते. दरम्यान मी त्याच्या घरी जाऊ लागले. त्याच्या घरच्यांशी ओळख होऊ लागली होती. त्याचा मोठा भाऊ प्रकाश हा रशियात
डॉक्टर होण्यासाठी गेला होता. आणि एके दिवशी घरी बातमी आली की प्रकाश दादाला रशियात एक रशियन मुलगी आवडली आहे आणि दोघे लग्न करणार आहेत! घरी अर्थात सगळे खुश झाले होते. तो घरी केव्हा येईल ह्याची वाट बघत होते. पोरांना ह्या गोऱ्या वाहिनीला बघण्याची ओढ लागली होती. 'स्काइप' वर आजीने होणाऱ्या सूनेला पाहिले होते आणि 'किती गोरी आहे माझी सून' असे आनंदाने म्हणून नात्याला पसंती दिली होती! प्रकाश दादाला देखील आपल्या होणाऱ्या बायकोची स्वीकृती झाल्यामुळे आनंद झाला होता. लग्नाचा दिवस उजाडला. मी देखील मदत म्हणून प्रसादच्या घरी असायचे. त्याचे इतर काही मित्र देखील होते. लग्न अगदी व्यवस्थित पार पडले आणि रशियन सूनेने अगदी उत्सुकतेने सारे विधी पार पाडले. तिला आपल्या 'कल्चर' बद्दल बरेच काही सांगितले गेले होते. ' आपल्या प्राचीन आणि महान संस्कृती बद्दल तिला सारे कळले पाहिजे' असे आदेश आजीने आणि त्यादिवशी घरी आलेल्या पुण्याच्या आजीने 'स्काइप' वर प्रकाश दादाला आधीच दिले होते. त्याचे पालन झाले होते बहुदा!

त्यादिवशी सारे नातेवाईक ह्या नव्या सूनेशी बोलायला उत्सुक होते. पुण्याच्या आजी तर प्रचंड! अगदी तोडक्या मोडक्या इंग्लिश मध्ये सारे काही सांगितले जात होते. अर्थात मुलगी रशियन असल्यामुळे तितक्याच तोडक्या मोडक्या इंग्लिश मध्ये उत्तरं मिळत होती आणि आजीची विशेष पंचाईत होत नव्हती! दोघे रशियाला परत जायचा दिवस उजाडला. सर्वजण अगदी भावूक झाले होते. मी देखील प्रसादच्या जवळ उभी होते. सारे काही समजू शकत होते.
"माझ्या सूनेची काळजी घे रे!" आजीने अगदी भावूक स्वरात सांगितले. आम्ही परत यायला निघालो. पुण्याच्या आजीने प्रसादकडे डोळे वटारून कोरड्या स्वरात सांगितले, " आता तुमचा नंबर असेल ना!" आम्ही परत घरी आलो.

प्रसादला आणि मला विधींचे विशेष आकर्षण नव्हते. शिवाय दोन वेगळ्या पार्श्वभूमी असल्यामुळे दोन्हीकडचे लोक आपापले विधी पुढे करतील ह्याची भीती होतीच. त्यामुळे आम्ही सर्वांचा रोष पत्करून कोर्टात लग्न करायचे ठरवले! हा आमचा निर्णय घरी तर अजिबात मान्य नव्हता पण त्या संदर्भात नाराजी ही नातेवाईक मंडळींमध्ये अगदी लगेच पसरली! प्रसाद खंबीर होता आणि सुदैवाने त्याचे वडील आमच्या बाजूने होते. सारे काही व्यवस्थित पार पडले असे जरी नसले तरी ऐन लग्नाच्या वेळेस मात्र कसलाही विघ्न आला नाही. लग्न करून आम्ही घरी आलो. सारे माझ्याकडे टक लावून पाहत होते. बोलत मात्र कुणीच नव्हतं. चिल्ली-पिल्ली मंडळी देखील आपल्या आईचा हात हातात धरून उभी होती. नाही, त्यांच्या आईंनीच त्यांचा हात हातात घेतला होता. मी वाकून सर्वांना नमस्कार करत होते. सारे ' हम्म' एवढे म्हणत होते.

मी आता घरची एक महत्वाची सदस्य झाले होते. आई-बाबा व्यवस्थित बोलायला लागले होते. मी देखील खुलले होते. गप्पांमध्ये सामील होत होते. आणि रविवारी पुण्याच्या त्या आजी आणि इतर एक दोन आजी येणार होत्या हे कळले. सकाळी लवकर उठून मी स्वयंपाक करण्यात आईला मदत केली. बेत तयार झाला. दुपारी जेवण देखील छान गप्पांमध्ये पार पडले. किचन आमच्या बेडरूमच्या अगदी जवळ आहे त्यामुळे तिथे बोलले जाणारे शब्द नीट ऐकू येतात. सगळं झाल्यावर मी झोपायचे म्हणून दिवाणावर पडले होते. प्रसाद बाहेर हॉल मध्ये फोनवर बोलत होता. आणि आत आजींचा संवाद सुरु झाला.
" मला वाटलं होतंच …. जेवण आपल्या सारखं नव्हतं! चव काहीतारी वेगळीच होती. कोण कुठली बायको केली आहे ह्या प्रसादने! तरी वहिनी, मी तुम्हाला सांगत होते ना … ह्या असल्या लग्नांना काहीही अर्थ नसतो! अहो, आपले पूर्वज काय वेडे होते काय नियम घालून द्यायला! लग्न करायचे तर ते आपल्या माणसाशीच! जाऊ दे... हल्लीची मुलं बघून घेतील आपण कोण सांगणार! झोपा तुम्ही!"

मला कधी नव्हे ते हे सारे ऐकून धक्का बसला! आपल्या माणसाशी? रशियातून आलेली सून आपली होती? ती आपल्या पद्धतीने स्वयंपाक करणार होती काय? आणि मग त्या लग्नाला खूप अर्थ होता काय? तेव्हा कुठे गेले तुमचे पूर्वज? ह्याच त्या आजी सूनेची काळजी घे म्हणून त्या दिवशी सांगत होत्या! आणि मी ह्या देशातली सून असून माझी पर्वा नाही कुणाला! रशियातली 'गोरी' वहिनी बघायला मात्र सारी पोरं मोकळी पण मी घरात प्रवेश करताना त्या साऱ्यांचे हात त्यांच्या आईच्या हातात! अगदी घट्ट! माझा नमस्कार कुणीही स्वीकारायला तयार नाही आणि तिकडे? आपली महान संस्कृती समजाव म्हणून बजावले गेले होते! तिच्याशी इंग्लिश बोलायची हौस आणि माझ्याशी मातृभाषेत देखील कुणी बोलायला तयार नाही. पण तेवढ्यात प्रसाद खोलीत येताना दिसला! मला एकदम त्याचा कॉलेज मधला तो लालबुंद चेहरा आठवला! "…आणि मग आम्हाला मातृभूमी नाही असे बाबासाहेब म्हणाले त्यात चूक काय?"

- आशय गुणे Happy

माझे इतर लेख: http://relatingtheunrelated.blogspot.in/

माझे फेसबुक पान: https://www.facebook.com/pages/Aashay-Gunes-Blog/180236325384645?ref=hl

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यामुळे मुलींनी स्वताच्या पायावर उभ्या नसतील तर लग्न च करु नये. - ह्याच्याशी सहमत होऊ शकत नाही कारण हीसुद्धा एक प्रकारे भाबडीच अपेक्षा वाटते मला तरी. >>

ही माझी अपेक्षा नाहीये. माझे स्पष्ट मत आहे की , जर स्वताच्या पायावर उभे नसाल आणि जर राहू शकण्याची पण शक्यता नसेल तर जे मिळेल ते भोगावे ( चांगले कींवा वाईट ) किंवा आत्महत्या करावी. नुस्ती कुरकुर करु नये.

टोचा - आत्महत्या करावी हे बोलणे खूप सोपे आहे हो. ज्यांच्या घरात असे झाले आहे त्यांना विचारा. आत्महत्या करा यापेक्षा मी तर म्हणेन हत्या करावी.पण तेवढी वेळ येण्यापूर्वीच मारहाणीला विरोध करावा. खायला प्यायला देत नसतील तर चोरून खावे. अन्न शिजवता शिजवता खावे. अंगावर धावून येणार्‍या नवर्‍याला सासूला झाडू, काठी, वरवंटा, सुरा ह्याने विरोध करावा.

कुरकुर करत राहू नये हे पूर्णपणे मान्य. काहीतरी सुटकेचा मार्ग शोधावा. वेळ पडल्यास मुलांना सासरी ठेवून सासर सोडावे. माहेरचे दरवाजे बंद असतील तर बापनु घर अशा संस्था ठिकठिकानी आहेत तिथे जावे. मैत्रिणी, नातेवाईक ह्यांचे दरवाजे ठोकवावे.

फायनॅन्शियल डिपेण्डन्सी आणि फायनॅन्शियल इंडिपेण्डन्सी ह्याच्या मध्ये अजून एक स्टेज आहे ती म्हणजे अर्निंग बट फायनॅन्शियली डिपेंडण्ट. कारण त्या बायका स्वतःच्या इच्छेने किंवा जबरदस्तीने स्वत;चा सगळा पगार नवर्‍याच्या / सासू सासर्‍यांच्या हातात देत असतात. का? त्यांना ठणकावून सांगता येत नाही का, सगळा पगार देणार नाही जा.

ह्याचं मूळ आपल्या संस्कृतीत आणि शिकवणीत आहे. मोठ्यांना का असं विचारू नये. ते सांगतील तसं वागावं, मोठ्यांना त्यांचं चुकलं तरी सांगू नये. ते मोठे आहेत ह्या कारणाकरता त्यांचा मान राखावा. मुलींनी सगळ्यांना वाकून नमस्कार करावा. (मुलगा किती वेळा करतो आई वडिलांना आणि सासू सासर्‍यांना नमस्कार? ) कोणी आपल्यावर अन्याय करत असेल तर जाऊ द्यावं, दुर्लक्ष करावं. मुलगी आहेस किती भांडतेस, किती मोठ्या आवाजात बोलतेस. कन्फ्रन्टेशन् करू नये. इत्यादी इत्यादी इत्यादी. मुळात काय श्श्श, गप्प राहा हे दिलेली शिकवण.

आणि गरीब अशिक्षित घरातच नव्हे तर सुशिक्षित घरातही मुलींना हेच शिकवतात. स्वतःला सासरी मिळणारी मारहाण मुली माहेरी का सांगत नाहीत. सांगितली तरी आईवडिल त्यांना का पाठिम्बा देत नाहीत? समाजाला घाबरून? मुलीने आत्महत्या केली किम्वा तिला जीवे जाळले तर हा समाज येणार असतो का तिचा जीव परत आणायला.

प्लीज बदला आई बापांनो. आदर करणं म्हणजे समोरच्याच्या चुकीच्या बोलण्याला वागण्याला समर्थन देणं नव्हे. मुलीच्या सासरच्यांच्या फाल्तु वागण्यापुढं झुकण्ं नव्हे.

बापरे टोच्या, 'आत्महत्या करावी' चक्क!

आणि आर्थिकदृष्ट्या पायावर उभी असलेली मुलगी सासरी त्रास भोगत नाही?
अहो, पोलिस काँस्टेबल मुलीने हूंड्याच्या जाचापायी आत्महत्येचा प्रयत्न केलेला मी पाहिला आहे.
मूळात दोष पैसे कमावण्याचा नसून परावलंबी/ हतबल मानसिकतेचा आहे.

ही माझी अपेक्षा नाहीये. माझे स्पष्ट मत आहे की , जर स्वताच्या पायावर उभे नसाल आणि जर राहू शकण्याची पण शक्यता नसेल तर जे मिळेल ते भोगावे ( चांगले कींवा वाईट ) किंवा आत्महत्या करावी. नुस्ती कुरकुर करु नये.<<<

आत्महत्या??

लग्न मोडता येणे जमू शकेल की. इतरही अनेक आधार देणारे घटक असू शकतात. माहेरचे / आजूबाजूचे / पोलिस / संस्था वगैरे.

तुमचे मत टोकाचे आहे असे मला वाटते. तसेच, तुमचे आणि वरदा ह्यांचे ह्या मुद्यावर समान मत आहे असे जाणवते की 'बदल घडवून आणणे शक्य नसेल तर आलीया भोगासी सादर असावे व सहन करावे'.

बरेच प्रतिसाद वाचल्यावर एक गोष्ट जाणवते ती म्हणजे बर्‍याच लोकांना आजुबाजुला काय चाल्लेय याची जाणिव नाही आहे किंवा ते पाहुनही न पाहिल्यासारखे करताहेत. आणि 'आमच्या' बाबतीत असे काही होतच नाही ते सांगण्याची अहमहिका आणि दुसरे कसे काय सहन करु शकतात (?) याचे महद आश्चर्य आणि त्यासाठी त्यांनी काय केले पाहिजे याचे "टोटल" पुस्तकी सल्ले. (हे सल्ले देणारे लोक जर तशी परीस्थीती आली असती तर त्यांनी आमलात आणले असते काय असा प्रश्न पडतो).

आणि प्लिज ते आत्महत्या वगैरे जरा जास्तच होतय. एवढ सगळ सहन करुन शेवट कधीतरी चांगला होइल अशा आशेवर लढा देणार्‍या हजारो स्त्रियांचा त्याने अपमान होतोय असे वाटते.

जावे त्याच्या वंशा एवढेच ल्क्षात घेतले तर बरे होइल.

माझा प्रतिसाद कदाचित नीट लिहिला नसावा, मला काय म्हणायचे ते नीट समोर आले नाही.

मी अश्या बायकांबद्दल बोलत होतो की ज्यांना ह्या त्रासातुन बाहेर पडायचे आहे पण स्वताच्या पायावर उभे नसल्यामुळे काही करता येत नाही. ( माहेर चा support म्हणजे त्या स्वताच्या पायावर उभ्या असल्या सारख्याच आहे ). त्यांना काही फारसा ऑप्शन नसतो.

वेल म्हणतात तसे नवर्‍याला किंवा सासु ला मारणे इतके सोपे नाहीये. एखाद वेळेला जमले तरी नंतर काय हाल होतील त्याची कल्पना करता येणार नाही.

@ साती << मूळात दोष पैसे कमावण्याचा नसून परावलंबी/ हतबल मानसिकतेचा आहे.>> तुम्ही म्हणता ते एकदम मान्य आहे. पण तो त्या बाईचा चॉइस आहे, तिने कुरकुर करु नये.

@ वेल <<फायनॅन्शियल डिपेण्डन्सी आणि फायनॅन्शियल इंडिपेण्डन्सी ह्याच्या मध्ये अजून एक स्टेज आहे ती म्हणजे अर्निंग बट फायनॅन्शियली डिपेंडण्ट. कारण त्या बायका स्वतःच्या इच्छेने किंवा जबरदस्तीने स्वत;चा सगळा पगार नवर्‍याच्या / सासू सासर्‍यांच्या हातात देत असतात. का? त्यांना ठणकावून सांगता येत नाही का, सगळा पगार देणार नाही जा. >> हा पण जाणुन बुजुन केलेला चॉइस आहे. त्याला काही सोल्युशन नाही.

@ बेफी <<तुमचे मत टोकाचे आहे असे मला वाटते. तसेच, तुमचे आणि वरदा ह्यांचे ह्या मुद्यावर समान मत आहे असे जाणवते की 'बदल घडवून आणणे शक्य नसेल तर आलीया भोगासी सादर असावे व सहन करावे<<>>
बदल घडवुन आणणे शक्य नसेल ह्या वाक्या पेक्षा बदल घडवुन आणायची मानसिकता नसेल आणि तसे आर्थिक पाठबळ नसेल तर एकतर सहन करा किंवा ...

मला एक बेसिक गोष्ट लक्षात आली नाही. आत्महत्या ह्या विषयाबद्दल एकदम टची का व्हावे. आयुष्यभर मारहाण सहन करण्यापेक्षा आत्महत्या काय वाईट. आता कृपा करुन आत्महत्या म्हणजे पळुन जाणे आहे, भेकडपणा आहे असले तर्कट नको

>>आत्महत्या ह्या विषयाबद्दल एकदम टची का व्हावे. आयुष्यभर मारहाण सहन करण्यापेक्षा आत्महत्या काय वाईट>> Uhoh
एखाद्या व्यक्तीचा छळ करुन त्या व्यक्तीला आत्महत्या करायला भाग पाडणे हा गुन्हा आहे. एखाद्या व्यक्तीचा शारीरिक किंवा मानसिक छळ होत असेल तर त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्या व्यक्तीला समाजाकडून मदत मिळणे आणि कायद्याचा आधार असणे हे आवश्यक आहे. समुपदेशनापासून कायद्याच्या बडग्यापर्यंत विविध प्रकारची मदत करुन पिडीत व्यक्तीचे आयुष्य सावरता येते. व्यक्ती पिडित आहे, दुबळी आहे म्हणून तिला सुरक्षित आयुष्य जगायचा अधिकार नाही तिने सोसावे नाहितर मरावे असे म्हणणे ही मानसिकता असेल तर मग तुम्ही अप्रत्यक्षपणे अत्याचार करणार्‍या लोकांना साथ देत आहात असे खेदपूर्वक म्हणते.

टोचा | 6 May, 2014 - 15:32 <<<

टोचा, पुनःश्च माफ करा, पण ह्या प्रतिसादात शब्दबंबाळ प्रतिसादपटूत्वच काय ते आढळले.

बदल घडवुन आणणे शक्य नसेल ह्या वाक्या पेक्षा बदल घडवुन आणायची मानसिकता नसेल आणि तसे आर्थिक पाठबळ नसेल तर एकतर सहन करा किंवा ...<<<

लग्न झालेल्या कित्येक स्त्रियांवर कोणकोणत्या प्रकारचे प्रसंग ओढवतात आणि कोणकोणते दबाव येतात हे वास्तव जर तुम्हाला माहीत झाले तर हे 'मानसिकता' वगैरे 'खास - मायबोली' व पुस्तकी शब्द तुम्ही वापरायचा नाहीत.

उदाहरणार्थः एक सत्तावीस वर्षाची, पदरात दोन मुले असलेली मुलगी, जर सातत्याने मारहाण सहन करत असेल, सासर / माहेर / आजूबाजूचे ह्यापैकी कोणाचाही आधार नसेल तर 'बदल घडवून वगैरे आणण्याची' तिची मानसिकता व्हायला हवी हे म्हणणे अज्ञानप्रदर्शक विधान आहे.

'पण म्हणून (पुन्हा लिहितो), पण म्हणून, अश्या व्यक्तीने आत्महत्या करावी' असे म्हणणे हा क्रौर्याचा कळस आहे'.

>>>मला एक बेसिक गोष्ट लक्षात आली नाही. आत्महत्या ह्या विषयाबद्दल एकदम टची का व्हावे. आयुष्यभर मारहाण सहन करण्यापेक्षा आत्महत्या काय वाईट. आता कृपा करुन आत्महत्या म्हणजे पळुन जाणे आहे, भेकडपणा आहे असले तर्कट नको<<<

तुम्हाला जे लिहायचे आहे ते तुम्ही लिहीतच आहात, वर बाकीच्यांनी त्यावर काय उत्तर द्यावे, देऊ नये हेही ठामपणे नोंदवत आहात. हे बरोबर आहे का? समजा उद्या तुम्ही म्हणालात की बलात्कार टाळता येत नसेल तर तो सहन करावा व त्यातून आनंदही मिळवावा, तर ते योग्य होईल का?

आत्महत्या ह्या विषयाबद्दल 'एकदम टची' होण्याचे कारण हे आहे की तुम्ही 'इतरांनी आत्महत्या करावी' असे म्हणत आहात. तुम्हाला स्वतःला तसे काही वाटत असते तर लोकांनी तुम्हाला थेट फोन केले असते, परावृत्त केले असते, धीर दिला असता, निषेध नोंदवला असता, भेकड म्हणून संभावना केली असती. पण ज्या व्यक्तींच्या आयुष्यात काही भयानक प्रसंगांच्या मालिका येतात त्यांनी इतर पर्याय नसला तर आत्महत्या करावी, कुरकूर करू नये हे विधान वाचून लोक आश्चर्याने व तुमचे विचार पाहून 'एकदम टची' झालेले आहेत. विश्वास बसत नाही आहे की आपल्यासारखाच एक माबो सदस्य असे काही सुचवू पाहात आहे. त्यामुळे हे 'एकदम टची' होणे आहे.

आईवडिलांनी निवडलेल्या स्थळाच्या गळ्यात मान खाली घालून माळ घालणार्‍या मुलींच्या अकला जिथे असतात, तिथेच अशा प्रेमविवाह करणार्‍या मुलींच्या अकला असतात. प्रेमविवाह करणार्‍या मुलींना परतीच्या वाटा बंद असतात, तर ठरवून केलेल्या लग्नाच्या किती मुलींना त्या वाटा खुल्या असतात?>>>>.

मयेकर फरक इथेच आहे की ठरवुन लग्न जेव्हा होते, तेव्हा त्या स्त्री/ मुलीभोवती बराचसा समाज एकवटलेला असतो. अशा मुलीला सासरी छ्ळ सोसल्यानन्तर माहेरी आल्यावर सहानुभूती मिळते. निदान भाऊ/ वडिल/ काका तिच्या बाजूने, आणी वेळ प्रसन्गी आई सुद्धा ( हे मी प्रत्यक्ष पाहिले आहे) उभे रहातात. समाज थोडा फार बाजूने असतो.

पण जेव्हा प्रेम विवाह असफल होतो तेव्हा समाज च काय, घरचे ( माहेरचे) सुद्धा टोचण्या द्यायला तयार असतात, यात प्रेम विवाह केलेले स्त्री पुरुष दोन्ही होरपळतात. वरतुन केले न तुम्ही आम्हाला न विचारता,? मग भोगा आपल्या कर्माची फळे असेही ऐकवले जाते. ( हे ही ऐकले आहे)

त्यातुन हे प्रेम वीर ( असे प्रेम वीर वय वर्षे १६ ते ३० वयोगटातील असतात, आणी त्यात २० च्या आतले जास्तच) मैने प्यारकिया,/ प्यार किया तो डरना क्या/ कयामतसे कयामत तक असलेव पिक्चर पाहुन झपाटलेले असतात आणी मग हम बने तुम बने करुन सफल असफल प्रेम करतात.

वडिलधारी मन्डळी पाठिशी असतील तर ठीकच नाहीतर यान्ची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशीच होते.

१) नॉन मराठी हिन्दु मुलगी आणी मुस्लिम मुलगा यान्चा प्रेम विवाह. मुलगी १० वी पास, मुलगा वेटर. आता ३ मुले, आर्थिक बेतास बेत. श्रीमन्तीत वाढलेली पण आता पत्र्याच्या घरात रहाते.

२) बहिणीने प्रेम विवाह केला, मी का नको असे स्पष्ट विचारुन धाकटीने लग्न केले. पण दोघेही स्वतच्या पायावर अजूनही नीट उभे नाहीत.

३) आई वडिलानी समन्जसपणे मुलीचा प्रेम विवाह परजातीतील मुलाशी करुन दिला, मुलगी ब्राम्हण. सासरी माहेरी दोन्ही उत्तम, सासरचे पण चान्गले आहेत.

४) मुलगी व मुलगा दोघे ब्राम्हण. पण मुलगा आधी नोकरी करत नव्हता. मुलाच्या घरच्यानी दोघाना साम्भाळले, स्वत च्या पायावर उभे रहाण्याकरता शिकवले. दोघेही उत्तम आर्थिक स्थितीत.

मयेकर बाकी सारे तुम्हालाच वैयक्तीक उद्देशुन नाही. कृपया गैरसमज नसावा.:स्मित: तुमची एकच वरील पोस्ट खुलाशाकरता वापरली.

हे पण खरे आहे की दुनिया गयी जहन्नुममे हे सिनेमातच शोभते, वास्तवात नाही. दुनिया तिथे आपल्या अवती भवती असते. आणी तिच्यातच नाईलाजाने इलाजाने जगावे लागते.

स्त्रियानी स्वतःच्या पायावर उभे रहावे हे उत्तम कारण वेळ कुणालाच सान्गुन येत नाही मग ठरवुन लग्न करा, नाहीतर प्रेम करुन करा.

>>>ठरवुन लग्न जेव्हा होते, तेव्हा त्या स्त्री/ मुलीभोवती बराचसा समाज एकवटलेला असतो. अशा मुलीला सासरी छ्ळ सोसल्यानन्तर माहेरी आल्यावर सहानुभूती मिळते. निदान भाऊ/ वडिल/ काका तिच्या बाजूने, आणी वेळ प्रसन्गी आई सुद्धा ( हे मी प्रत्यक्ष पाहिले आहे) उभे रहातात. समाज थोडा फार बाजूने असतो.<<<

चांगला मुद्दा रश्मी, पटलाही.

>>>पण जेव्हा प्रेम विवाह असफल होतो तेव्हा समाज च काय, घरचे ( माहेरचे) सुद्धा टोचण्या द्यायला तयार असतात<<<

ह्याबाबत माझे एक मत लिहू इच्छितो. 'दोन्हीकडच्यांना किंवा एकाच्या घरी नामंजूर असलेला प्रेमविवाह फसला' तर तुम्ही म्हणता तसे होऊ शकते. काही वेळा प्रेमविवाह दोन्हीबाजूंना सहज मान्यही होतात. त्यांच्याबाबतीत प्रेमविवाह असफल झालाच तर मुलीला / मुलाला सपोर्ट मिळू शकतो.

स्त्रियानी स्वतःच्या पायावर उभे रहावे हे उत्तम कारण वेळ कुणालाच सान्गुन येत नाही मग ठरवुन लग्न करा, नाहीतर प्रेम करुन करा.>>> रश्मी यांच्याशी सहमत.

मुळात प्रेमविवाह असो किंवा ठरवुन केलेले लग्न स्त्री आणि पुरूष दोघांची एकमेकांना समजुन घेण्याची, आपल्या घरातील परिस्थितीची जाणीव महत्वाची आहे. अत्याचार सहन करणे म्हणजेच आपण अत्याचारी व्यक्तिला अजुन बळ देत असतो. त्यामुळे अत्याचाराचा प्रतिकार करणे नेहमीच महत्वाचे. आत्महत्या करणे म्हणजे मुर्खपणा आहे.

<मयेकर फरक इथेच आहे की ठरवुन लग्न जेव्हा होते, तेव्हा त्या स्त्री/ मुलीभोवती बराचसा समाज एकवटलेला असतो. अशा मुलीला सासरी छ्ळ सोसल्यानन्तर माहेरी आल्यावर सहानुभूती मिळते. निदान भाऊ/ वडिल/ काका तिच्या बाजूने, आणी वेळ प्रसन्गी आई सुद्धा ( हे मी प्रत्यक्ष पाहिले आहे) उभे रहातात. समाज थोडा फार बाजूने असतो.

पण जेव्हा प्रेम विवाह असफल होतो तेव्हा समाज च काय, घरचे ( माहेरचे) सुद्धा टोचण्या द्यायला तयार असतात, यात प्रेम विवाह केलेले स्त्री पुरुष दोन्ही होरपळतात. वरतुन केले न तुम्ही आम्हाला न विचारता,? मग भोगा आपल्या कर्माची फळे असेही ऐकवले जाते. ( हे ही ऐकले आहे)>

समाज एकवटलेला असतो? नक्की? आईवडिलांची, भावाची इ. सहानुभूती मिळत असेल. पण तिला माहेराची दारे सताड उघडी असतात का? अशा मुली स्वतःच माहेरी परतण्याचा विचार करतात का? आईवडिलांना त्यामुळे समाजात कमीपणा येईल, धाकट्या बहीण -भावाच्या लग्नात अडथळे येतील, आपल्या मुलांचे आयुष्य कसे जाईल, इ. विचार करून अ‍ॅरेन्ज्ड मॅरेजमधला छळ सहन करणार्‍या सुशिक्षित, कमावत्या मुली माझ्या पाहण्यात आहेत.
ज्या घरांतून मुलगी प्रेमविवाह/आंतर्जातीय विवाह करते या कारणासाठी विरोध असतो, त्या घरांची मानसिकता मुलगी कायमची परतून येतेय म्हटल्यावर स्वागताची असते का?

..

मयेकर तुमचे पटते आहे, पण नेमकी मी पाहिलेली उदाहरणे अशीच होती, जिच्यात मुलीला त्रास झाल्यावर आई व बाप दोघेही, तसेच आई एकटी देखील खम्बीर पण मुलीच्या पाठिशी होती. आज त्यामुळे दोन्ही सन्सार सुखात आहेत.

का कोण जाणे पण आजकाल नवरा बायको काय, सासु सून काय, एकमेकाशी मनमोकळे बोलतच नाहीत. सन्वादाचा पूर्ण अभाव. त्यामुळे गैरसमज जास्त, वाद जास्त. प्रेमा बरोबर विश्वास पण हवा ना.

सासरी त्रास झालेली मुलगी बोलणार कुणाशी? आई की नवर्‍याशी? आतापर्यन्त पाहिलेले लोक का माहीत नाही, पण जाम इगो ठेवुन असतात. माझ्या २ नातेवाईकान्मध्ये जाम इगो प्रॉब्लेम झालाय, आम्ही समजाऊन आता हरलोत.

मला नक्की मान्डता येत नाहीये, पण स्त्रिया बर्‍याच बाजूने कोन्डल्या जातात हे खरे. ( कदाचीत तुमच्या या आताच्या पोस्ट्मध्ये त्यातल्या काही बाबी आहेतच ).

रिया धन्यवाद.:स्मित:

येथील चर्चा वाचून असे वाटू लागलेय जेवढा दोष आपल्या जातीव्यवस्थेत आहे तेवढाच दोष आपल्या विवाहसंस्थेत देखील आहे. गंमतीचा भाग म्हणजे आपल्या भारतीय समाजाला आपल्या विवाहसंस्थेचा अभिमानही आहे. त्यामुळे तिचा फेरविचार करायचा पर्याय मांडला तरी बरेच जण त्याला असहमतीच दर्शवतील. तरी हल्ली बरेच कायदे स्त्रियांना संरक्षण द्यायला बनत आहेत, पण त्याच बरोबर स्त्रिया कायद्यांचा गैरफायदा उचलत आहेत आणि पुरुष बिचारे हकनाक फसत आहेत असा ओरडा करणारा देखील एक गट तयार होत आहे. जातीभेद पुढेमागे जाऊन मिटेलही, (भले भाबडा आशावाद का असेना) मात्र स्त्री-पुरुष हा भेद निसर्गनिर्मित असल्याने कायम राहणार आहे. त्यामुळे उद्भवणारे प्रश्न आणि समस्या देखील कायम राहणारच. बदल जर कुठे घडवायचाच असेल तर तो मानसिकतेत.

रिया चर्चा भरकटली असेल तर माफ कर. पण प्रेम विवाह आणी ठरवुन केलेले विवाह या मध्ये देखील स्त्रीच कशी सोसते हेच मला म्हणायचे आहे. पुरुषाना सोसावे लागत असेलही, पण मुलान्मध्ये अडकलेली स्त्री या दुटप्पी समाजातुन बाहेर पडु शकत नाही.

ag mala kashala maf kar mhanateyes Happy
mi apal sahaj mhanal Happy

tasahi maza interest gela charchetala ata Wink

abhishek dada + 11111

हात्तिच्या ! गोरी आणि काळी सून हा सर्वसमावेशक विषय आहे त्याचा रशियन गोरीशी आणि आंबेडकरी जनतेशी उगीचच बादरायण संबंध लावलाय.

" मला वाटलं होतंच …. जेवण आपल्या सारखं नव्हतं! चव काहीतारी वेगळीच होती." >>>> हा डायलॉग पण प्रत्येक लग्न झालेल्या मुलीने / बाईने आयुष्यांत कधी ना कधि नक्कीच ऐकला असणार. नेहमीच्या कौटुंबिक विषयाला आंतरजातीय विवाहाच कोंदण कशाला?

जर उद्धार, समाजसुधारणा असे उद्दात्त हेतू असतील तर सासू-सून ड्राम्यातून बाहेर पडा, ते लय बघतो आम्ही समस्त उपग्रहवाहिन्यांवर.

+१

आंबेडकरांचे वेगळ्या काळातले व वेगळ्या context मधलं वाक्य इथे उगाचच टाकलंय. हा अनुभव कोणालाही येऊ शकतो. जातीचा काय संबंध?

ही माझी अपेक्षा नाहीये. माझे स्पष्ट मत आहे की , जर स्वताच्या पायावर उभे नसाल आणि जर राहू शकण्याची पण शक्यता नसेल तर जे मिळेल ते भोगावे ( चांगले कींवा वाईट ) किंवा आत्महत्या करावी. नुस्ती कुरकुर करु नये.

तुम्ही म्हणता ते एकदम मान्य आहे. पण तो त्या बाईचा चॉइस आहे, तिने कुरकुर करु नये
.>>>>>>>>>> थोडक्यात एखाद्या स्त्रीकडे तुम्ही म्हणताय तसं अल्याड किंवा पल्याड असं ठोस सोल्युशन नसेल तर तिनी आत्महत्या करावी पण कुरकुर करु नये.
मला तर वाटतं त्यांची कुरकुर हाच तुमचा प्रॉबलेम आहे. मी गमतीनी नाही सिरियली म्हणत आहे. खरं तर आपण लांब बसून ह्या विषयी नुसतं बोलतोय त्यामुळे खरं तर काहीच फरक पडत नाही पण तरी एंपथी असणं गरजेचे आहे. उद्या तुमच्या जवळ पास अशी उदाहरणं जर तुम्हाला दिसली आणि कधी मध्यस्थी करायची किंवा कोणाला मदत करायची वेळ आली तर तुमच्याकडे काहीच नसेल.
इतर लोकांना येडे समजून त्यांच्यावर आगपाखड करणे किंवा "डिल वित इट" रडताय काय बळच? भोगा आता कर्माची फळं, हा तुमचाच चॉईस आहे हे असले सांगून त्यात समोरच्याला तर काहीच फायदा नाही पण सायकॉलॉजिकली विचार करायला गेलं तर ती आपण त्या परिस्थितीत नाही किंवा सरळच बोलायचं तर आपण त्यापेक्षा चांगल्या परिस्थितीत आहोत (आपण निवडलेल्या काही चॉईसेसमुळे) ह्या भावनेनी स्वतःच्या पाठीवर दिलेली थापच असते.
आपण आज आहोत त्या परिस्थितीत आपण का आहोत ह्यामागे सुद्धा काही ठोस आणि आपल्या हातात नसलेली कारणं आहेत. मी एका दुसर्‍या बाफं वर लिहिलं होतं की खुप सुरवातीपासूनच जर तुम्हाला लिमिटेड ऑप्शन दिलेले असतील तर तुम्ही सहसा त्यातलाच एक निवडता. थोडक्यात ज्या स्त्रिया ह्या प्रॉबलेम मधून जात असतील त्या सगळ्यांनी कॉन्शियसली चुकीचे चॉईसेस निवडले म्हणून किंवा त्या आळशी किंवा बिन्डोक आहेत असं नाही.

लेखातील विषयाला धरुनः

असे अनुभव इतर जातीतही/ स्वजातीय विवाहातही येतात याच्याशी सहमत.
पण असे लोक्स आसपास असतातच. आंतरजातीय विवाहात तर खत्रुड नातेवाईक लोक टपुन बसलेले असतात कुजकट बोलण्यासाठी. त्याची तयारी ठेवुन वेळ पाहुन त्यांना इग्नोर करणे किंवा सडेतोड बोलुन त्यांचे तोंड बंद करणे किंवा अजुन काही उपाय करावेत.

अवांतरः

स्त्रीयांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेच पाहिजे याच्याशी सहमत.

'आम्हाला मातृभूमी नाही' हे बर्‍याचश्या स्त्रीयांना (१८-१९वे शतक कश्याला? अगदी आत्ता माझ्या साबांनाही) (मग त्या कोणत्या का जातीच्या असेना) लागु आहे याच्याशी सहमत.
(कारण सासरी सगळे घर साबा आपल्या बिझनेसच्या उत्पन्नावर चालवतात. संपूर्ण घरही त्यांच्या पैश्यातुन बांधले आहे पण घर फक्त साबुंच्या नावावर आहे. जॉईंट नावावर सुद्धा नाही. Sad
जुनी मानसिकता.. दुसरं काय? )

आजकाल टिव्ही बघणार्‍या कोणत्याही मुलीला सासरचे लोक वेळप्रसंगी कोणत्याही थराला जाऊ शकतात व अमुकअमुक झाले तर त्या प्रसंगी आपला स्टँड काय असेल/ आपण काय काय करु शकु हा विचार करुन ठेवणे मस्ट आहे. कितीही आदर्श वाटले तरी स्वप्नवत नक्कीच नाही. क्राईम पॅट्रोल किंवा तत्सम मालिकांमध्ये सासरच्या छळाविरुद्ध तुम्ही कोणते उपाय करु शकता हे सांगतात. फक्त ते उपाय वापरण्यासाठी जे धाडस लागते ते बहुतेक वेळा आर्थिक स्वावलंबनातुन येते हे. मा. वै. म.

त्यामुळे पुन्हा एकदा स्त्रीयांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेच पाहिजे असे म्हणते.

Pages