तवकीर वडी (फोटोसहीत)

Submitted by गायू on 30 April, 2014 - 03:08
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तवकीर- १ वाटी, दूध- १ वाटी, पाणी- दीड वाटी, साखर- अर्धी वाटी, तूप- २ टेबलस्पून, जायफळ पावडर- १ टीस्पून

क्रमवार पाककृती: 

प्रथम तवकीर चाळून घ्यावी. एका पातेल्यात तवकीर + दूध+पाणी+साखर + १ टेबलस्पून तूप शक्यतो हाताने एकत्र करावे. गुठळ्या नाहीत ह्याची खात्री करावी. कढईला अर्धा टेबलस्पून तूप सर्व बाजूंनी लावून घ्यावे, कढई गरम करायला ठेवावी आणि कोमट झाल्यावर वरील सरसरीत मिश्रण कढईत घालावे आणि गॅस एकदम मंद ठेवावा. उलतन्याने सतत ढवळत राहावे. साधारणपणे १५-२० मिनिटांनी मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होईल. अजून ५-७ मिनिटांनी गोळा तयार होऊन कढई पासून सुटून येईल. मग उलटणे काढून कढईवर ताट झाकून ठेवावे आणि ५ मिनिटे सणसणीत वाफ आणावी. ह्या सर्व प्रक्रीयेमध्ये गॅस एकदम मंद आचेवरच ठेवावा. नंतर ताटाला उर्वरित अर्धा टेबलस्पून तूप लावून घ्यावे आणि गोळा थापावा. गोळा थोडा कोमट झाल्यावर थापला तरी चालतो. तिळगुळाच्या वडीप्रमाणे घाई करावी लागत नाही. गोळा नीट थापून झाल्यावर लेव्हलिंग करावे आणि जायफळाची पूड भुरभुरावी! साधारण १० मिनिटात मिश्रण गार होऊन वड्या पाडता येऊ शकतात!
20140430_120609.jpg
ह्या अश्या दिसतात!

वाढणी/प्रमाण: 
थापलेल्या मिश्रणाच्या जाडीनुसार वरील प्रमाणात साधारण १५-२० वड्या होतात.
अधिक टिपा: 

जायफळाची पूड नसेल तर दालचिनीची' पूड वापरा. वेलदोड्याने चव तितकीशी छान लागत नाही.
तवकीर थंड असल्याने उन्हाळ्यात खायला उत्तम!
दूध असल्याने,वड्या डब्यात भरून फ्रीज मध्ये ठेवाव्यात आणि २-३ दिवसात संपवाव्यात.
दूध आणि पाण्याचे प्रमाण उलट केले तरी चालेल. संपूर्ण दुधाच्या चालतील पण फक्त पाणी वापरून करू नयेत.

माहितीचा स्रोत: 
सासूबाई नमोनमः!
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तवकीरीला आरारूट पण म्हणतात! इंग्लिश मध्ये arrow root पावडर म्हणतात बहुतेक! नक्की नाही माहित.दिसायला सेम मैद्या सारखं असतं

तवकीर म्हणजे आरारूटच.

छान दिसत आहेत वड्या.
गायू, तुमचा प्रतिसाद संपादित करा, तिथे फोटोची लिम्क येत असेल ती 'कट' करा, मग तुमची पाककृती संपादित करा, आणि तिथे तुम्हाला हवी तिकडे ती लिंक 'पेस्ट' करा. फोटो प्रतिसादात न राहता पाककृतीत येईल.

जीभ/तोंड आलं की आरारुट लावत्यात त्या जागी.

आरारुटाची खीर माहित होती. वड्या पण मस्त दिसत आहेत Happy

छान प्रकार आहे.

पण मला वाटतं तवकील म्हणजे बटाट्याचा स्टार्च. ( कच्चा बटाटा पाण्यात किसुन. किस वेगळा करून जो खाली साका राहतो तो. ) अरारुट हे वेगळे कंद आहे. पांढरा कंद व आत जांभळ्या रेषा असतात.

धन्यवाद शुभांगी, अश्विनी आणि दिनेशदा.
दिनेशदा तवकील आणि आरारूट बद्दल मी माबो वरच वाचलंय पण माझी आज्जी,आई ,सासूबाई सगळ्याजणी ह्यालाच तवकीर म्हणतात आणि पुण्यात दुकानदार पण तवकीर/आरारूट म्हणल्यावर हीच पांढरी पावडर देतो Happy

हायला मी पटकन आधी तपकीर वड्या वाचलं ना! Proud

मस्त दिसताहेत वड्या. हेच तवकीर वापरून हलवाई बदामी हलवा (टर्किश डिलाईट) आणि माहिम हलवा करतात का?

तवकीर आमच्या घरी औषध म्हणून असते. तोंडात फोडी आल्यावर ती लावतात. तिची पेजही करतात.

वड्या छान आहेत.

हो मामी, हा प्यूअर स्टार्च असतो. नावालाही प्रथिने नसतात त्यामूळे पचायला अगदी सोप्पा.
याचा बदामी हलवा करतात. ( पण तामिळ लोक गव्हाचा चीक काढून करतात. तो जास्त चांगला लागतो पण तितकासा फर्म होत नाही. )

वडीची कृती बरोबर आहे .तवकीर म्हणजे अॅरोरुट पाउडर .याची झाडे (थोडीशी लिलिसारखी पाने)महाबळेश्वरात रानात आहेत .बाणाच्या टोकांसारखी मुळे ,पांढरी पुले येतात ऑगस्टमध्ये बटाट्याचा साका आणि हे दोन्ही स्टार्च आहेत .

धन्यवाद मामी. येस बदामी हलवा येतो करता. आणि दिनेशदा म्हणाले त्या प्रमाणे गव्हाच्या चिकाचा देखील येतो करता.
जागू- आता वड्या करून पहा.

धन्यवाद तन्मयी. नारळाचा चव घालण्याची आयडिया छान आहे. मी आज साबांना म्हणाले कि ह्यात कुठला इसेन्स पण चालेल का तर हो म्हणल्या! करून बघा Wink

( कच्चा बटाटा पाण्यात किसुन. किस वेगळा करून जो खाली साका राहतो तो. )पण मला वाटतं तवकील म्हणजे बटाट्याचा स्टार्च >>>>>> हो .मीही तसेच वाचले होते.

गायू,
सुंदर पाककृती! साखरऐवजी गूळ घातला तर चालेल का? दूध असल्यामुळे कदचित नाही चालणार.

आरारूट आम्ही गावाला लावतो. साधारण हळदीच्या पिका सारखच दिसत वर हिरवी पानं असतात आणि खाली कंद वाढ्त जातात. ६-७ महिन्यात तयार होतात कंद. ही आरारुटाची लागवड

From mayboli
आपण बटाट्याच जसं सत्व काढतो तसचं सेम ह्याच ही काढतो. कंद किसून पाण्यात टाकायचे, तो कीस पाण्यातच चांगला चोळायचा म्हणजे सत्व मोकळं होतं . मग ते पाणी संथावायला ठेऊन द्यायचं. चागलं संथावल की मग वरच पाणी हलकेच काढून टाकायच आणि खालती बसलेलं सत्व उन्हांत खडखडीत वाळवायचं. हे घरगुती केलेलं असल्यामुळे विकतच्या एवढ बारिक होत नाही. अगदी छोटे छोटे ग्रॅन्युअल्स रहातात थोडेसे. आणि दुकानातल्या एवढं पांढरशुभ्र ही दिसत नाही. पण चवीला मस्त असत. मैद्यापेक्षा केव्हाही जास्त चांगलं.
सूप मध्ये घालण्यासाठी व्हाईट सॉस बनवायला, गुलाबजाम करताना खव्यात मिसळायला, पोट बिघडलं असल्यास ताकातली लापशी करायला, किंवा उपासाच्या दिवशी खीर करायला उपयोगी पडत. मी आजपर्यंत कधीही विकतचं सत्व वापरलेलं नाहीये घरचचं होत असल्यामुळे.

छान आहेत वड्या. मलापण तवकीर हा शब्द माहिती नव्हता, आरारूट माहितेय.

हेमाताई मस्त माहिती आणि फोटो, मी पहिल्यांदाच बघतेय आरारूटची रोपे.