अवघी विठाई माझी (११) - अरारुट

ar.jpg

या वरच्या फ़ोटोतल्या डिझायनर क्रिस्प्स दिसताहेत ना, त्या अगदी नैसर्गिक आहेत. यात कुठलाही रंग
टाकलेला नाही. तशी गरजही नसते, त्या आहेत अरारुटच्या आणि निसर्गात: अरारुट अशीच नक्षी लेउन येते.

अरारुट ची (खरे तर स्पेलिंगवरुन अ‍ॅरोरुट असा शब्द असायला पाहिजे, पण आपल्याकडे अरारुट हाच शब्द रुढ आहे, म्हणून तोच वापरतोय.) भारतात पण नक्कीच लागवड होत असणार, कारण आपल्याकडे अरारुट पावडर पूर्वीपासून वापरात आहे.

ar1.jpg

अरारूट हे असे दिसते. याची पावडर करण्यासाठी, त्याचे तूकडे करून, कुटून ते पाण्यात वारंवार धुतले जातात. हे पाणी परत परत गाळून घेतले जाते. मग याचे सत्व खाली बसते. (ते पाण्यात विरघळत नाही.) हे सत्व वाळवून त्याची पावडर करतात. हि प्रक्रिया साधारण गव्हाचे सत्व काढण्यासारखीच आहे, पण हे मिश्रण आंबवले जात नाही.

हलवायाकडे जो बदामी हलवा मिळतो, तो अरारुट पावडर वापरुनच केलेला असतो. (जरी मूळ कृतिमधे गव्हाचे सत्व असले तरी. ) अरारुट वापरल्यामूळे तो पारदर्शक दिसतो. (गव्हाचा तितका पारदर्शक होत नाही.) अरारुट मधे खुपदा भेसळ असते. कॉर्नस्टार्च किंवा बटाट्याचे तवकील त्यात मिसळलेले असते.

शुद्ध आरारुट चिमटीत घेतल्यास अत्यंत मूलायम लागते. ते कॉर्नस्टार्च च्या तूलनेतही जास्त मुलायम
असते. त्याचा रंग शुभ्र असून, त्याला कसलाच वास येत नाही. कॉर्नस्टार्च च्या तूलनेत तो शिजवल्यावरही जास्त पारदर्शक होतो. तसेच तो कमी तपमानाला घट्ट होतो. असे घट्ट झाल्यावर उष्णता देणे थांबवावे लागते, नाहीतर ते मिश्रण दुधाळ होऊ लागते.

मी थोड्या अरारुटच्या वरीलप्रमाणे क्रिस्प्स केल्या. त्यासाठी त्याचे पातळ काप करुन, ते थंड पाण्यात
धुवून घेतले, मग भर तेलात तळून त्यावर मीठ शिवरले. या क्रिस्प्स बटाट्याच्या वेफ़र्सपेक्षा थोड्या कडक होतात, पण खायला चवदार लागतात.

ar2.jpg

आपण सुरणाची उपवासाची भाजी करतो, तशी पण मी करुन बघितली. छान लागते. सुरणासारखी
याला खाज वगैरे नसल्याने, चिंच, अमसुलाची गरज नसते. आपल्याकडे उपासाला हिंग चालत नाही
(का ?) खरे तर सध्या जे पदार्थ उपवासाचे म्हणून खाल्ले जातात, त्यातला वातूळपणा कमी
करण्यासाठी, हिंग वापरला पाहिजे. मी अर्थातच वापरला आहे. शेंगदाणे पण या भाजीत आवश्यक
आहेत. (कारण या भाजीत अजिबात प्रथिने नसतात.)

पूर्व आफ़्रिकेत तसेच दक्षिण आफ़्रिकेत, वेस्ट ईंडिज, ऑस्ट्रेलिया, दक्षिणपूर्व आशिया मधे याचे उत्पादन घेतले जाते.तिथल्या लोकांच्या आहारात त्याला महत्वाचे स्थान आहे. आपल्याकडे पण हि भाजी मिळू लागली तर नक्कीच लोकप्रिय होईल.

याचे शास्त्रीय नाव Maranta arundinacea. ब्रिटिश लोकाना अरारुट फ़ार प्रिय होते.(नेपोलियन
असे म्हणाल्याचे सांगतात, कि हे प्रेम अरारुट वर नसून ते पिकवणाऱ्या त्यांच्या वसाहतीवर होते.)
अरारुटमधे ग्लुटेन अजिबात नसते. त्यामूळे ग्लुटेन न चालणारे, ते खाऊ शकतात. याचा वापर
करुन बिस्किटे, केक, जेली वगैरे करतात.

आइसक्रिमचे मिश्रण शिजवताना अरारुट पावडर वापरली, तर मिश्रण घट्ट होते, व गोठताना त्यात
बर्फ़ाचे कण तयार होत नाहित. याची लापशी पण करतात. डायरिया झाल्यावर किंवा
पोटात दुसरे काहिच ठरत नसल्यावर, हि लापशी देतात. ती पचायला अत्यंत हलकी असते.

फ़्रुट सॉस करताना पण अरारुट वारण्याचे अनेक फ़ायदे आहेत. ते कमी तपमानाला घट्ट
होत असल्याने, फ़ळांचा स्वाद टिकून राहतो. फ़ळांच्या आंबटपणाचा त्यावर काहि परिणाम होत नाही.
याला स्वत:चा स्वाद नसल्यानेही फ़ळांचा स्वाद टिकतो. (हे स्वाद नसणे फ़क्त पावडरच्या बाबतीत,
भाजीला किंचीत स्वाद असतो. ती अगदीच सपक लागत नाहि.)

करेबियन लोक, याला अरु अरु (म्हणजे जेवणात जेवण) म्हणत असल्याने, इंग्रजी भाषेत हा शब्द
आला असावा. तेच लोक विषारी बाणांमुळे झालेल्या जखमा बर्‍या करण्यासाठी पण याचा वापर करत
असल्याने देखील, हा शब्द निर्माण झाला असावा. (तसा विंचवाचा दंश, कोळ्याचा दंश, गॆगरीन यावर पण याचा वापर करत असत.)

याची पाने लंबगोल हिरवीगार असून त्यात अधूनमधून पांढरे पट्टे दिसतात. शोभेचे झाड म्हणूनही
याची लागवड होते. (मला या झाडाचा फ़ोटो मिळू शकला नाही. या मालिकेतील सर्व फ़ोटो, मी
काढलेलेच असावेत, असे बंधन घालून घेतले आहे. पण कुणाकडे असल्यास इथे जरुर टाकावा.)

Submit to kanokani.com

आरारुट कसं दिसतं हे पाहिलेलं नाही कधी पण त्याची ताकातली खीर... यम्मी..

ह्या आरारूट्च्या चिप्स असतात का? मला फार आवडतात. मी व्हेजी चिप्स समजून खायचे पण नक्की कशाच्या ते माहित नव्हत.

मस्त माहिती दिनेशदा! आमच्याकडे आजोबांना ह्या आरारुटची ताकातली खीर फार आवडायची. त्यामुळे पोटाचा दाह कमी होतो असे ते म्हणायचे. ते आरारुटला ''तवकील'' (की तवकीर?) म्हणायचे. आम्हा मुलांना कधी उन्हाळ्यात तोंड आले, जीभेला चरे गेले की त्यावर लावायला तवकील हजर असायचे. आरारुट पावडर लावली की जरा वेळ तो दाह शांत व्हायचा.

हाही लेख मस्त !
मी आत्तापर्यंत कधीच पाहिला नव्हता आरारुटचा कंद. कोनफळासारखा वाटला थोडा पण कोनफळावर अशी नक्षी नसते.
आरारुट म्हणजे तवकील असेल तर आयुर्वेदात तवकीलाची लापशी तोंड येणे ह्या विकारावर फार उपयुक्त आहे असे वाचले आहे.

Terra चिप्स मध्ये असतात याच्या चिप्स. Taro पण म्हणतात याला.

अगो, आरारुटची खीर खरंच खूप उपयोगी आहे तोंड येण्यावर. आता त्यालाच तवकील म्हणतात का काय ते माहित नाही.

छान माहिति.
आरारुट अस असत ते माहितीच नव्हत.

बटाटे पाण्यात किसून ठेवायचे, त्याचा गाळ(दुसरा शब्द सुचला नाही स्मित ) उरतो ते तवकील. अगो, वर दिनेशनी 'बटाट्याचे तवकील' असं लिहिलं आहे. अर्थात हे बटाट्याच्या जातीचेच आहे, तेव्हा याच्याही गाळाला तवकील म्हणत असतील.

तो गाळ म्हणजेच स्टार्च ना?

हो तो गाळ म्हणजेचं स्टार्च पण मी तो फेकून देतो. तसे करु नको का? कारण आमच्याकडे बटाटे चिरले की सरळ पाण्यात १० मिनिटे ठेवतात मग फक्त बटाटे घेतात पाणी टाकून देतात.

लालो, TARO बद्दल धन्यवाद. इथे मिळतो हा टारो स्मित

दिनेश, केवढी मोलाची माहिती सांगितली. शतशः धन्यवाद. माझे तोंड अधूनमधून येतचं रहाते त्यावर आता हा घरगुती उपाय करुन पाहिन.

अरुंधती, छान माहिती!

मला अरारुट हे फळ वाटलेले. अर्थात रुट शब्दावरुन कंद आहे लक्षात यायला हवे होते स्मित

आमच्याकडे बटाटे चिरले की सरळ पाण्यात १० मिनिटे ठेवतात मग फक्त बटाटे घेतात पाणी टाकून देतात.

आमच्याकडेही. असे करणे अशास्त्रिय आहे का??

सायो, लालू धन्यवाद सांगितल्याबद्दल. बटाट्याचा गाळ म्हणजे 'साका' म्हणता येईल का ?

बटाटे रताळे यांच्यापासून पण सत्व मिळते ते तवकील, म्हणजेच स्टार्च. त्याची खीर लापशी वगैरे करतात. त्यात प्रथिने नसल्याने तो पचायला सोपा असतो.
बटाटे तळायचे असतील तर असे पाण्यात ठेवतात. भाजी वगैरे करताना असे करायची गरज नाही. उलट या स्टार्च मूळे भाजी दाटसर होते. हल्ली तयार सॉस मिक्स मधे बटाट्याचाच स्टार्च वापरतात.
या सगळ्या स्टार्च मधे अरारुटचा स्टार्च, चांगल्या गुणधर्माचा.
हो लालू, टॅरो हा पण शब्द वापरतात.

छान माहिती दिनेशदा आणि सर्व.
दिनेशदा विठाई सिरीज खूप interesting आहे!

ओह! हेच का ते आरारूट!
छान माहिती दिनेशदा आणि सर्व.
दिनेशदा विठाई सिरीज खूप interesting आहे!

चिन्नूला मोदक.

दिनेशदा,
मी तर नुसत नाव ऐकल होतं.......काय ते आताच कळाल !.....(राग)
तुमच्या ज्ञान-अनुभव भांडारातुन अशा एकामागुन एक बाहेर पडणारया भाज्या,फळे आम्हांला खुप गोड वाटु लागले आहेत .....
स्मित

छान लेख...
>>>>आरारुट असं असत ते माहितीच नव्हतं.
मलाही....

दिनेशदा मस्तच.
आमच्या घरात आरारुटची पावडर नेहमि असते ती औषधासाठी. जेंव्हा उष्णता होउन तोंडात फोड येतात तेंव्हा हे पिठ तोंडातील फोडिवर लावतात व ह्याची पेज करुन पितात.

Maranta_arundinacea.jpg

आमच्या पण घरी तोंड आल्यावर आरारूटच्या वड्या बनवून खाल्या जातात. खूप फरक पडतो.
बाकी दिनेशदा खूप इंटरेस्टिंग सिरीज.

ही सगळी विठाई लेखमालाच खूप छान आहे. आवडली.

ए टारो म्हणजे अळुचा कंद ना? मी इतके दिवस तेच समजत होते. अ ओ, आता काय करायचं

सीमा, हे बघ - http://www.terrachips.com/products/detail.php?prod_id=749
मला या टेरा चिप्समुळे कळले.

बटाट्याचं तवकील (मी तवकीर म्हणते) मी पाणी काढून कोरडे करून पावडर स्वरूपात ठेवते. हवी तेंव्हा खीर करता येते. तोंड आले असल्यास थंडाव्यासाठी पण चांगली असते. तसेच ह्या पावडरींत थोडं लिंबू पिळून ते रापलेल्या त्वचेवर लावले तर राप निघतो असं आईनं वाचलं होतं. कॉलेजला असताना तसाही वापर करायचे त्याचा! मला ईतके दिवस आरारुट म्हणजेच तवकीर वाटत होतं.

दिनेशदा खूपच छान सिरीज !

~साक्षी.

साक्षी अग मला ही तवकीर म्हणजे आरारूट वाटत होत. पण घरातले सांगातात की आरारुट वेगळ. आमच्याकडे तवकीरच लावतात तोंड आल्यावर. पण हल्ली मिळत नाही म्हणुन आरारूट आणाव लागत.

आरारुट असं असत ते माहितीच नव्हतं. खुप छान माहीती.

खुपच छान माहिती. बरेचसे गैरसमजपण दूर होतात.

दिनेशदा,आरारुट बद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद्.कारण मी तर आरारुट पावडरच पाहिली आहे. त्याचे काप किती सुंदर दिसतात. आरारुट पावडर कटलेट्मध्ये कॉर्नस्टार्च ऐवजी वापरता येते. क्रिस्पी ,चांगले होतात्.बाइंडिंग साठी पण वापरता येते.

व्वा, दिनेश
मस्त माहिती, मला वाटलं होतं अरारुट ही दळून मिळालेली पावडर आहे.

सुधीर