स्पोकन इंग्लिश वर्ग : एका अभिनव उपक्रमाचा प्रवास व हृद्य समारोप

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 31 March, 2014 - 05:53

गेल्या वर्षी ध्यासपंथी पाऊले ग्रुपच्या अंतर्गत मी 'हसत खेळत स्पोकन इंग्लिश शिकवू शकणारे स्वयंसेवक हवे आहेत!' असा धागा काढला आणि अन्य उपक्रमांपेक्षा जराशा वेगळ्या अशा ह्या उपक्रमात सामील होऊ इच्छिणार्‍यांना आपली नावे द्यायला सांगितली. अट होती ती दर शनिवारी किमान एक तासाभराचा वेळ देऊन पुण्याच्या बुधवार पेठेतील रेड लाईट एरियात राहाणार्‍या व तेथील नूतन समर्थ विद्यालयात शिकणार्‍या मुलांना इंग्रजी भाषा शिकवायची, तिचा सराव करून द्यायचा! अशा प्रकारे मुलांना शिकवण्याची एका संपूर्ण शालेय वर्षाची कमिटमेन्ट घेणे ही खरोखर सोपी गोष्ट नाही. त्यातून सोशल नेटवर्किंगसारख्या माध्यमातून अशा उपक्रमासाठी कितपत प्रतिसाद मिळेल आणि तो कितपत टिकेल याबद्दलही काहीच कल्पना नव्हती. परंतु कळवायला आनंद होतो की आपल्या मायबोलीकर स्वयंसेवक शिक्षकांनी ही कमिटमेन्ट तर घेतलीच शिवाय ती उत्तम प्रकारे पूर्णही केली!

मायबोलीकर साजिरा, समीर देशपांडे, अनया, मुग्धमानसी, अश्विनी डोंगरे, शकुन, शैलजा, हर्षलसी या मंडळींबरोबरच आर्या, निकिता, सिद्धेश, मुक्ता आणि तेजस्विनी हेदेखील स्वयंसेवक शिक्षक चमूत सामील झाले. सुरुवातीस भेटीगाठी, चर्चा, इमेल्स इत्यादींमधून कल्पना, परस्पर विचारांची देवाणघेवाण झाली. शाळेला, तेथील मुलांना प्रत्यक्ष भेट देऊन झाली. नक्की काय शिकवायचे, कसे शिकवायचे, काय संकेत पाळायचे याबद्दल थोडेफार बोलणे झाले. परंतु प्रत्यक्षात तिथे वर्गात मुलांची काय तयारी आहे हे जोखून त्यानुसार त्यांच्या कलाने त्यांना शिकविणे ही फार वेगळी गोष्ट होती. प्रारंभीच्या काही तासांमध्येच सर्व शिक्षकांना हे लक्षात आले. रुढ पद्धतींनुसार शिकवून येथील मुलांना ते समजेलच ह्याची शाश्वती नव्हती. सुरुवातीला चौथी ते सातवीच्या वर्गांनाच शिकवायचे असे ठरले होते. परंतु शाळेच्या विनंतीवरून इयत्ता पहिली, दुसरी व तिसरीच्या वर्गांनाही इंग्रजी शिकवण्यास सुरुवात झाली. मुलांना अगदी प्राथमिक पातळीवर, मुळाक्षरांपासून इंग्रजी शिकवावे लागत होते. अनेक मुले मराठी जाणणारी असली तरी त्यांची मातृभाषा वेगळी. प्रत्येकाची बौद्धिक कुवत वेगवेगळी. काही मुले अतिशय दंगेखोर, हूड तर काहींचे अभ्यासात अजिबात लक्ष नाही. काहीजण विलक्षण बोलघेवडे तर काही मुले लाजरी, अबोल. काहीजण अचानक गायब होणारे तर काही अतिशय चुणचुणीत, सिन्सीयर! अशा सर्व मुलांना रुचेल, आवडेल अशा तर्‍हेने, त्यांच्याशी संवाद साधत त्यांना इंग्रजी भाषेची गोडी लावायची होती.

मग आपल्या सर्व स्वयंसेवक शिक्षकांनी एकमेकांशी बोलून व इमेलद्वारे आपण दर तासाला कोणत्या प्रकारे काय गोष्टी शिकवल्या, त्यातल्या कोणत्या गोष्टींना मुलांचा सर्वाधिक प्रतिसाद मिळाला, कोणत्या गोष्टी फारशी दाद मिळवू शकल्या नाहीत, मुलांना कशा प्रकारे शिकवलेले आवडते आहे ह्या सर्व अनुभवांची व आपल्या नवकल्पनांची देवाणघेवाण सुरु केली. त्याचा एक अतिशय चांगला उपयोग असा झाला की दर आठवड्याच्या तासांना काय शिकवले, कसे शिकवले याचे उत्तम दस्ताऐवजीकरण तर झालेच; शिवाय एकमेकांकडून स्फूर्ती घेऊन शिक्षक नव्या नव्या क्लृप्त्यांद्वारे मुलांना इंग्रजी भाषेची गोडी लावण्यात यशस्वी होऊ लागले. शिक्षक मुलांमध्ये इतक्या आपुलकीने, आत्मीयतेने मिसळत होते की मुलेही दर शनिवारी मोठ्या उत्साहात आपल्या लाडक्या शिक्षकांची व इंग्रजीच्या तासाची वाट बघू लागली. कधी शिक्षकांनी तासाला घेतलेला खेळ रंगला तर तास उलटून गेल्यावरही मुलांची शाळेत थांबून पुढे शिकायची तयारी असायची. आपले शिक्षक मुलांना खेळ, गाणी, गोष्टी, गप्पा, कोडी, अ‍ॅक्टिविटीजच्या माध्यमांतून, त्यांच्याशी संवाद साधत त्यांना शिकवत होते. त्यांच्यातील इंग्रजी भाषेविषयीचे कुतूहल जागृत करत होते.

ह्या सर्व प्रवासात अडचणीही काही कमी आल्या नाहीत. अनेकदा शाळेचे सांस्कृतिक कार्यक्रमही नेमके शनिवारीच असायचे. कधी स्वयंसेवक शिक्षकांना आपल्या वैयक्तिक अडचणींमुळे शाळेत येणे अवघड ठरायचे. त्या वेळी बाकीची स्वयंसेवक मंडळी सरसावून पुढे यायची व त्या शिक्षकांच्या अनुपस्थितीत त्यांच्या वर्गावर शिकवायची. मुलांच्या अभ्यासातील अडचणी समजून त्यांना मार्गदर्शन करायची. आणि त्यांच्या वैयक्तिक जीवनातील अडचणी समजल्यावर तितकीच कळवळायची, हतबुद्ध व्हायची, त्याबद्दल काही करता येईल का याचा विचार करायची. आम्ही सर्वजणच ह्या बाबतीत एकमेकांना मानसिक धीर देत होतो. एकमेकांच्या संपर्कात राहात असल्यामुळे जणू सर्वच वर्गांमधील मुले ही 'आपली मुले' आहेत असे वाटू लागले होते. अर्थात तरीही प्रत्येक शिक्षकाचे ते शिकवत असलेल्या वर्गातील विद्यार्थ्यांशी एक खास असे वेगळे नाते निर्माण झाले होतेच!

मग अनया ताई बालमित्रच्या पुरवण्या घेऊन जायला लागली तशा मुलांच्या त्या पुरवण्यांवर उड्या पडू लागल्या. त्यातली कोडी, जोक्स वाचण्यासाठी मुलं धडपडू लागली. शकुनने मुलांसाठी वाचायला म्हणून रंगीबेरंगी चित्रांचे, मोठ्या अक्षरांतील छपाईचे गुळगुळीत असे गोष्टीचे पुस्तक नेले होते. ते पुस्तक पाहून मुले हरखूनच गेली. एका तासाला दीपकदादाने मुलांना एम एस पेन्टचे माध्यम वापरून मजेमजेच्या गोष्टी शिकविल्या. एक ना दोन, अशा तर्‍हेच्या वेगवेगळ्या युक्त्या योजून मुलांचा नवी भाषा शिकण्यातील व त्या भाषेचा सराव करण्यातील रस वाढवण्यासाठी आपले शिक्षक हर तर्‍हेने प्रयत्न करत होते.

बघता बघता मार्च २०१४ आला आणि आपल्या स्वयंसेवक शिक्षकांच्या मनांत उलघाल सुरु झाली. अरे! एकच महिना उरला. आता शाळा संपणार! प्रत्येक शनिवारची दुपार या मुलांसमवेत कशी जायची तेच कळायचे नाही. आता हे संपणार. इयत्ता सातवीची मुले वेगळ्या शाळेत प्रवेश घेतल्यानंतर परत भेटतील का? गावी किंवा सुट्टीला गेलेली मुलं मुली शाळेत परत येतील ना? त्यांना आतापर्यंत शिकवलेलं इंग्रजी त्यांच्या लक्षात राहील ना? एक ना दोन प्रश्न.

आणि असे म्हणतच २९ मार्च उजाडला. आजचा शाळेतला इंग्रजीचा तास हा ह्या शैक्षणिक वर्षातला शेवटचा तास. काय शिकवायचं आज? पण हा प्रश्न शाळेनेच सोडवून टाकला. २९ मार्चला शाळेने खास सरस्वती पूजन व पाटी पूजनाचा कार्यक्रम ठेवला होता. नेहमीपेक्षा लवकरच, म्हणजे सकाळी १० वाजता सर्व स्वयंसेवक शिक्षक, विद्यार्थी, शाळाप्रमुख आणि शाळेतील शिक्षक सजून, नटून शाळेत उपस्थित होते. आपले मायबोलीकर श्री. दीपक ठाकरे उर्फ साजिरा यांना अध्यक्षस्थानी बसवून कार्यक्रमास प्रारंभ झाला. सरस्वतीपूजा व पाटीपूजा पार पडल्यावर शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. इंग्रजीच्या तासांचा आपल्याला कसा फायदा झाला आहे किंवा होतो आहे, या तासांमधून आपल्याला नेमके काय मिळाले याबद्दल मुलांचे विचार ऐकण्यासारखे होते. अध्यक्षांनीही आपला अनुभव सांगितला. थोडा अल्पोपाहार झाल्यावर आपल्या शिक्षकांमधील समीर व सिद्धेश यांनी मुलांना एक 'सरप्राईझ' दिले! मुलांसाठी त्यांनी खास 'जंगलबुक' चित्रपटाची सीडी शाळेतील मोठ्या टीव्हीवर दाखविण्याचे आयोजन केले होते. मग काय! मुलांच्या आनंदाचे काय वर्णन करावे!! अशा तर्‍हेने जुलै २०१३ मध्ये सुरु केलेल्या 'स्पोकन इंग्लिश' शिकवण्याच्या ह्या उपक्रमाची ह्या वर्षीची सांगता आनंदात, जल्लोषाच्या वातावरणात झाली.

पुढील वर्षीही हा उपक्रम चालू ठेवावा अशी विनंती शाळेने तर केली आहेच, शिवाय मुलेही मोठ्या आतुरतेने पुढच्या वर्षीही हे शिक्षक ताई-दादा येऊन आपल्याला नव्या काय काय गोष्टी सांगतील - शिकवतील याची वाट बघत आहेत. मुलांसाठी आपला अमूल्य 'वेळ' देणारे हे ताई-दादा ज्याप्रमाणे मुलांना दर भेटीत आतापर्यंत काही वेगवेगळे शिकवत आहेत तसेच ह्या मुलांकडूनही ते बरेच काही शिकतही आहेत - शिकले आहेत. त्यांचे अनुभव, त्यांचा हा प्रवास आणि त्यांचे मनोगत त्यांनी आपल्या स्वतःच्या शब्दांमध्ये मांडावे अशी मी त्यांना विनंती करते!

सिध्देशने टिपलेली सरस्वती पूजा व समारोप कार्यक्रमाची ही काही छायाचित्रे :

१.

collage1.jpg

२.

collage2.jpg

मायबोलीने हा उपक्रम सुरु करण्यासाठी व तो चालू ठेवण्यासाठी जो प्लॅट्फॉर्म उपलब्ध करून दिला त्यासाठी मायबोलीचे मनःपूर्वक आभार! तसेच अनेकांना ह्या उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी होता आले नाही तरी त्यांनी वेळोवेळी उत्तम मार्गदर्शन केले, सूचना दिल्या, माहिती पुरविली व पाठीवर कौतुकाची थाप दिली - सर्वांचा उत्साह वाढवला... तुमचे प्रेमाचे हे सहकार्य असेच सातत्याने लाभत राहो! Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वांना धन्यवाद!

आमच्या ह्या वर्षभराच्या प्रवासात आमच्या शिकण्या-शिकवण्यासोबत आम्ही सर्वांनी एंजॉयही खूप केले. छान टीम तयार झाली होती व आहे. एकमेकांना मदत करत, कधी कौतुकाचे शब्द तर कधी थोडे हास्य-विनोद... असे करत हा प्रवास ह्या वळणावर येऊन पोचला आहे. Happy

काय लिहू ह्या अनुभवाबद्दल.. खूप मजा, मुलांचं खूप प्रेम आणि खूप समाधान.

A, B, C, D सुद्धा ओळखता न येणारी मुलं ४-५ महिन्यात छोटी छोटी वाक्यं बोलायला लागली. शाळेच्या कविता नीट म्हणू शकणारी मुलं चालीत इंन्ग्लिश गाणी म्हणू लागलीयत. इंन्ग्लिश मधे नाटुकली बसवून घेतली ती धडाधडा पाठ म्हणू लागली. हिंदी च्या पुस्तकातल्या छोट्या धड्याचं इंन्ग्लिश भाषांतर करायचा प्रयत्न करू लागलीयत. केलेल्या कामाचं चीज झाल्याचं इतक्या लगेच क्वचितच कुठे कळत असेल.

५ महिने अभ्यास केला. नवीन शब्दं, क्रियापदं शिकलो. अंताक्षरी, नाव गाव फळ फूल पासून शिवाजी म्हणतो पर्यंत भरपूर खेळ खेळलो. गोष्टीची पुस्तकं वाचली. गाणी म्हणली. २ शनिवार जायला जमलं नाही तर तिसर्‍या शनिवारी सगळी मुलं हक्कानी विचारू लागली "ताई मागच्या शनिवारी कुठे गेला होतात" Happy

शाळेतल्या शिक्षकांच्या मते आम्ही मुलांसोबत मैत्री करू शकलो हे मोठं यश आहे. बरीचशी मुलं मुळात चुणचुणीत आणि उत्साही आहेतच. पण समोरच्या (शिक्षका) वर पटकन विश्वास ठेवतील असं नाही. ते अवघड काम आपल्या टीम ला जमलं आणि पहिला टप्पा सर झाला.

५ महिने मज्जा आली आणि 'हसत खेळत स्पोकन इंग्लिश' कसं शिकवता येईल, कुठल्या topic पासून सुरुवात करावी, कुठल्या topic ची उजळणी करायला कुठला खेळ उपयोगी पडतोय, कोणत्या इयत्तेच्या मुलांना कितपत एंग्लिश येतय हे समजलय आता बर्यापैकी. पुढच्या वर्षाची आमची तरी प्राथमिक तयारी झाली आहे. वाट पहातोय उन्हाळ्याची सुट्टी संपून पाऊस आणि शाळा कधी सुरु होणार त्याची !

hats off to 'हसत खेळत स्पोकन इंग्लिश' टीम ! Happy

सिद्धेशने आपल्या कॅमेर्‍यात बंदिस्त केलेली सरस्वती पूजन व समारोप कार्यक्रमाची ही काही क्षणचित्रे :

१]
collage1.jpg

२]

collage2.jpg

मस्त फोटोज आहेत अरुंधती. पण त्यात मी नाहीये... Sad :'(
असो... नेमकी शाळेच्या शेवटच्या दिवशी मी माझ्या मुलांना भेटायला येऊ शकले नाही हा सल असा सहज जाणार नाही.
या काही महिन्यांतल्या माझ्या अनुभवांबद्दल काय सांगू? मी मुलांना किती आणि काय शिकवू शकले माहीत नाही... पण या मुलांनी मला खूप काही शिकवलं. माझं जगणं आणखीन समृद्ध केलं. माझ्या असण्याचे मलाच ठावूक नसलेले अनेक आयाम मला या निमित्ताने कळले. आणि त्या मुलांच्या रोजच्या जगण्यातल्या नित्यनुतन संघर्षांची नुसती कल्पनाच करून मला माझ्या जगण्यातल्या सुरक्षिततेची, आनंदाची आणि सौंदर्याची किंमत कळली. या मुलांनी मला 'मी आई म्हणून कशी असायला हवे' हेही शिकवलं. हे या लहानग्यांचं माझ्यावर चढलेलं ऋणच म्हणायला हवं.

आता शाळा पुन्हा सुरू होण्याची आतुरतेने वाट पहाते आहे. शनिवार आला की चुकल्यासारखं वाटतंय काहितरी. Happy

माझा अनुभव अगदी ३-४ महिन्यांपुरताच आहे. मी दिवाळीनंतर शाळेत जाणे सुरु केले. आधीही ह्या कामाबद्दल वाचले होते, पण खरं काम सुरु करायला दिवाळी उजाडली Happy
सुरुवातीलाच अकुनी फोन करुन शाळा कशी आहे वगेरे समजावून दिले होते ( सांस्कृतिक धक्का बसू नये या भितीने), त्यामुळे खरच मला फार वेळ लागला नाही ही शाळा आणि मुले समजून घ्यायला. पहिला तास १ ली ते ३ री असा मदतनीस म्हणुन केल्यावर, एकदम माझे ७ वी च्या वर्गावर प्रमोशन झाले Happy ( समीर सर नव्हते म्हणुन मी ७ वी घ्यायला सुरुवात केली). त्याच वेळी मुलाना ४ रेघी नवीन वह्या मिळाल्या होत्या, त्यामुळे अगदी ४ ओळींमधे Capital-small अक्षरे कशी लिहायची, इथपासून सुरुवात झाली. आधी काय शिकवलय, या मुलाना काय येतय ह्याचा काहीच अंदाज नव्हता, कारण मुलं मागच्या वेळची लिहीलेली वही पुढच्या वेळी आणायचीच नाही. पण ह्या नवीन वह्या शाळेतच ठेवत होते, त्यामुळे तेवढे एक बरे झाले. ही शाळा ७ वी पर्यंतच असल्यामुळे मुले आता दुसर्‍या शाळेत जातील. त्याना थोडाफार जरी फायदा झाला, तरी आनंद आहे. पण बाकी वर्गातल्या मुलाना पुढच्या वर्षी जरा सोपे जाईल अशी आशा आहे.
कोणतीही गोष्ट दुसर्‍याला शिकवणे सोपे नसते, एवढे नक्कीच कळलेय यातून. आपण जीव तोडून सांगतोय कर्ता, कर्म, क्रियापद, एकवचन-अनेकवचन.....शेवटी y आला की ies लावायचा, ....आणि मुल बिचारी ही काय बाई सांगतेय असे चेहरे करुन..... Biggrin
एका मुलीने तर स्पष्टपणे सांगितले, "मी पुढच्या वर्षी गावाला जाणार आहे...८ वी नको...आणि ९ वी नको " आणि ती इतकी ठाम होती, की तिला समजावणे अशक्य होते.
एकंदरीत छान अनुभव होता. मुलानी आम्हाला पुढ्च्या वर्षी नवीन शाळेतपण भेटायला या असे आमंत्रण दिले आहे, यातच भरुन पावले.

मुग्धमानसी, अश्विनी, एकदम मनापासून लिहिलंत.... भावना पोचल्या! Happy

आपल्या इमेलवरच्या चर्चा आठवल्या. वर्गातला कोणी मुलगा / मुलगी अनुपस्थित असेल तर त्याचा हा तास हुकला म्हणून अस्वस्थ होणारे आपले स्वयंसेवक शिक्षक, कोणा विद्यार्थ्याला बरे नसेल तर त्याच्याबद्दल आस्थेने चौकशी, मुलांच्या लहान-सहान आनंदात सहभागी होणारे, त्यांच्या प्रगतीने कॉलर ताठ होणारे आपले सर्व शिक्षक डोळ्यांसमोर उभे राहिले. Happy

या आधी सर्वांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेतच. थोडा माझा प्रयत्न.

मी सुरुवातीला इयत्ता सातवी चा वर्ग घेत होतो. बरोबर सिद्धेश होताच. नोवेम्बरपासून मात्र खंड पडला. शेवटचा महिना मी पाचवी चा वर्ग घेत होतो, ते शकुनचा मदतनीस म्हणून.

समारोपाच्या कार्य्क्रमात शाळेच्या सर्व शिक्षकानी आपला हा उपक्रम त्यांना केवढा आधाराचा वाटत होता हे सान्गितले. या उपक्रमातून मुलान्च्या शालेय इंग्रजी भाषेच्या गुणवत्तेत कशी सुधारणा झाली हे देखील त्यानी सान्गितले.

या सर्व उपक्र्मात तसं म्ह्ट्ल तर मीच सर्वात ढ विद्यार्थी. मुलान्च्यापेक्षा मलाच भरपूर शिकायला मिळाले. सांघिक भावनेचा अनुभव मिळाला. समारोपाच्या दिवशी जेव्हा मुले अगदी आग्रहाने म्हणत होती की पुढच्या वर्षी पण आमच्या वर्गावर तुम्ही या, तेव्हा जरा ३५% मिळाल्याचे समाधान वाटले.

तुम्हा सगळ्या मंडळींचं किती कौतुक करावं हेच समजत नाहीये.
एक उपक्रम सुरू करून तो वर्षभर चालवणं हे फार कष्टाचं काम आहे. तुम्ही मोठच काम करत आहात. खुपच छान वाटलं हे सर्व वाचून.

chan

दिनांक २३ जुलै ते २५ जुलै या कालावधीत बालगंधर्व कलादालनात या आपल्या स्पोकन इंग्लिश वर्गात शिकणार्‍या नूतन समर्थ प्राथमिक विद्यालयाच्या मुलांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन आहे.
वेळ : सकाळी ९ ते रात्री ९.
शाळेच्या मुख्याध्यापकांनी काल खास फोन करून सर्व मायबोलीकरांना आमंत्रण दिले आहे.
सर्वांनी अवश्य भेट द्या!! Happy

Pages