फँड्री नावाचा स्क्रू...

Submitted by सई. on 17 February, 2014 - 07:34

आयुष्यात एखादं तरी दाहक वास्तव असतं. प्रत्येकाच्या असेलच असं नाही, पण बहुतेकांच्या असतंच. हर प्रकारानं आणि निकरानं त्याला टाळण्याचा, नाकारण्याचा प्रयत्न करावा आणि कल्पनेपेक्षा कितीतरी अधिक तीव्रतेने आयुष्यानं ते वास्तव माणुस गाफील असताना कुणीतरी तोंडावर सणसणून दगड भिरकवावा तसं फेकुन मारावं... काय अवस्था होईल? हेच जर एखाद्या अडनिड्या वयातल्या मुलासोबत घडलं तर? तोही प्रथम भेलकांडून हतबल होईल आणि आवाक्याच्या बाहेर गेल्यावर त्वेषानं चवताळून परिस्थितीवर तुटून पडेल... जमेल त्या मार्गानं!!

पण फँड्री इतकाच नाही... मी माझ्यातला माणुस शोधत जाते, माझ्यातली संवेदनशीलता तपासत जाते, माझ्यामुळे आणि माझ्यापासून सुरू होणा-या समाजाचा एक हिस्सा म्हणुन माझ्या वाट्याला भिरभिरत आलेल्या ह्या दगडाचा मी थिएटरात नेम चुकवला तरी मनावर मात्र तो येऊन आदळतोच! मंजुळेंनी नेमच इतका अचुक धरलाय... तिथे वाल्याच्या बायकोसारखं मी पाप केलं नाही म्हणत बाजूला व्हायला वावच नाही. आजही चहूबाजूंना 'ड्रायव्हर', 'कामवाली बाई' (स्वतः घाण केलेली स्वच्छतागृहं तिच्याकडून साफ करून घेणं वगैरेही आलं त्यात!), 'वॉचमन' अशा प्रकारची असंख्य 'बिरुदं' आणि वर्णभेदही येतात कानांवर.. अर्थात हा फक्त एक दाखला, असे हजारो दाखले. त्यामागे दडलेल्या माणुस नावाच्या प्राण्याचं काय? मी अडवते का कुणाला असं संबोधताना? अशी वागणुक देणा-यांना परावृत्त करते का? म्हणजे काय काय करायला लागेल? मी स्वतः खरंच पूर्णपणे माणुसकीनं वागते का? प्रश्न. अनेक प्रकारचे. नागराज मंजुळे तुम्हाला टोचत रहातात. अनेक प्रसंगांमधून. - हा फॅण्ड्री आहे. पण पुन्हा, एवढाच नाही.

हे सगळं बेमालुमपणे अगदी जाता जाता करत मंजुळे तुमचं मनोरंजनही करतात. त्यांचा चंक्या ज्या सहज आणि लिलया जत्रेच्या जल्लोषात सामील होतो त्याच सहजतेनं. कोणतीच गोष्ट कशाचपासून वेगळी करता येत नाही.

एरवी अडम तडम तडतडबाजा असलेली माझी बहिण चित्रपट पहाताना वरचेवर डोळ्यांना रुमाल लावत होती. म्हणजेच चित्रपट भिडला असं नव्हे, माहिताय. पण नि:शब्द जडत्व घेऊन घरी पोचल्यावर आपोआपच 'माणसानं माणसाशी माणुसकीनं वागणं' यावर माझा आणि तिचा रंगलेला दीर्घ परिसंवाद पार प्रत्येक कुटुंबियाची पाळंमुळं खणत गेला, मागच्या आणि आमच्या पिढीतल्या प्रत्येकाबद्दल ते येणा-या पिढीला काय पोचवायचं इथंपर्यंत. दोघीच्या दोघीच निवांत असताना, वेळेचं बंधन नसताना एरवी स्वतःचीच सालं कशाला काढत बसलो असतो? त्यापेक्षा अनुपस्थित गोतावळ्याबद्दल ही अश्शीच आणि तिचं तस्संच हा मुखवास चघळत बसणं सोप्पं नव्हतं का? वर आणि तो मंजुळेंच्या डोईजड चित्रपटावर रामबाण उताराही तर झाला असता! पण...

उत्खननालाच बसायचं तर अनेक गोष्टी निघतील. पण ते प्रत्येकानं आपापलं करावं. कारण मला जे सापडलं तेच बाकिच्यांना मिळेल असं नाही शिवाय असंही होऊ शकेल की मलाच शंभर गोष्टी मिळाल्या आणि कुणाला एकही नाही... तेव्हा तो शेवटी ज्याचा त्याचाच प्रश्न रहातो.

अलकनंदा दासगुप्तांचं संगीत आणि विक्रम अमलाडींचा कॅमेरा हे दोन महत्वाचे कलाकार आहेत चित्रपटात. शीर्षकापासूनच दोघंही मनाचा ठाव घेतात आणि ती पकड घट्ट घट्ट होत जाते... एकेक फ्रेम बघत रहावी अशी आणि एकेक तुकडा रिवाईंड करुन मुद्दाम ऐकण्यासारखा. किशोर कदम ह्या माणसाला मला एकदा सेटवर जाऊन निरखायचं आहे. ह्या माणसाला स्वतःला तरी कल्पना असेल का स्वतःच्या रेंजची?? स्विच ऑन्/ऑफ नावाची चीज हा करतो तरी कशी? ह्या माणसाबद्दलचं कुतूहल दिवसेंदिवस वाढतंच चाललंय. 'ल्हान हाये अजून', 'शेण घेऊ का?'तली लाचारी, गल्लीच्या वळणावरच्या त्या बेतशीर झोकांड्या, जिवाच्या आकांतानं केलेली शेवटची पळापळ.. सगळं अचंबीत करणारं.
त्याच्यासमोर त्याच ताकदीनं उभी राहिलेली जब्याची आई. यांचं नाव मला माहिती नाही पण भुमिकेचं सोनं म्हणजे काय याचा वस्तुपाठ आहे तिची भुमिका. मग जब्या आणि पि-या. तीन चतुर्थांश सिनेमा होईतोवर तर माझं ध्यान पि-याकडंच. 'आता खाली कसा उतरू'पासून ते ओशाळवाणं होऊन नवी कापडं कशी आहेत विचारणं असो... 'तुझा झगा गं झगा गं ' करत जिवलग दोस्ताला गाण्यात गुंफणारा लोभस पि-या. मी प्रेमात पडले त्याच्या. 'नायकाचे बेस्ट दोस्त' अशी काही कॅटेगरी केली तर सुरज पवारचा पि-या १००% पहिल्या पाचात!

पि-यापाठोपाठ चंक्या. अफलातून. मंजुळेंचा कलंदर चंक्या मोहवून टाकतो. 'तुझा विश्वास आहे ना, मग होईल' भिडलंच. त्याचं आणि जब्याचं नातं केवळ देखणं आहे. जब्या मात्र मला अधूनमधून आवडला आणि मग शेवटचा. त्याचं ते डोळ्यांच्या कोप-यातून शालूला निरखत रहाणं आणि ओघानंच ओठांवर उमटणारं अस्फुट स्मित लाजबाब. संवादफेक मात्र सोमनाथ अवघडेच्या मुळच्या हस-या जिवणीमुळं थोडीशी सदोष झालीये असं मला वाटलं. पण सायकलच्या आणि पेप्सीच्या प्रसंगात शिवाय जत्रेत बत्ती घेतल्यावरचा त्याचा प्रयत्न चांगला होता. राजेश्वरी खरातची शालू निरागस. ती तशीच अपेक्षितही होती. बामणीण चिमणीच्या गोष्टीसाठी ज्योती सुभाष नावाच्या देखण्या म्हातारीचं अनपेक्षित दर्शन सुखद. खरंतर अगदी एकच वाक्य बोलणा-या सुरखीपासून ते 'वढ पाच'ची म्हणणा-या न्हाव्यापर्यंत, जो तो ज्या त्या ठिकाणी एकदम फिट आहे, चपखल.

बाहेर धुमाकुळ घालणा-या आणि मलाही तेवढीच भुरळ घातलेल्या अजयच्या 'प्रितीच्या विंचू'ची अनुपस्थिती भावली. ते कुठेही आलं असतं तरी टेंपोच गेला असता. 'साजूक पोली अन म्हाव-या 'सारखं त्याचंही ठिगळच झालं असतं. त्या मोहाला बळी न पडण्याबद्दल मंजुळेंचं विशेष कौतुक.

मंजुळेंनी डोक्याला खुराक दिलाय, साखरेत घोळवलेल्या कडू गोळीच्या डोससारखा. हा स्क्रू नवं काही आदळेपर्यंत डोकं पोखरत रहाणार. भविष्यातही जेव्हा जेव्हा फॅण्ड्री बघेन तेव्हा तेव्हा तो स्क्रू पुन्हा लोहचुंबकासारखा येऊन मेंदूला चिकटेल आणि आपलं काम करत राहील हेही आत्ताच माहितीये..

पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनय.. पहिलाच प्रयत्न (प्रयत्न म्हणायचं का??) इतका खणखणीत... बस्स लगे रहो!! मंजुळेंच्या पुढच्या सगळ्या दमदार वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा..

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर लिहिलेय.. जेवढे या सिनेमबद्दल गेल्या दोनेक दिवसात वाचतोय, ऐकतोय... येत्या रविवारची वाट बघण्याशिवाय पर्याय नाही पण.. प्रोमोजनी चुकीची लाट पसरवली नसती, टाईमपासच्या पठडीतलाच सिनेमा आहे तर कदाचित याच रविवारी बघणे झाले असते.. इतर लोक बघून आलेत, व्यक्त होताहेत आणि आपण नुसते वाचतोय.. जो विषय वाचूनच भिडतोय तो पडद्यावर .. बघूया, लवकरच

फँड्री म्हणजे काय? बाकी आंतरजालावर अथवा DVD प्रदर्शित होण्याची वाट बघण्याशिवाय गत्यंतर नाही.

सुरेख लिहिलयं.
पण प्रोमोज का बरं असे होते? अगदीच वेगळं इंप्रेशन देत होते प्रोमोज.
हा लेख वाचला नसता तर कदाचित नसता पाहिला गेला सिनेमा.

धन्यवाद लोकहो.

प्रोमोज चुकले असतीलही कदाचित, पण गणितं बरोबर आहेत त्यांची.

ज्यांना सिनेमा बघायचा आहे, त्यांनी फँड्रीचा अर्थ आधी जाणून घेउ नका. रसभंग होईल.
चित्रपटाच्या शेवटच्या भागात तो अर्थ अक्षरशः 'अंगावर येऊन' कळतो- तो अनुभव स्वतःच घ्यायला हवा.
--

आता कचरू आणी जब्या यांचा पुन्हा विचार केल्यावर 'द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज' मधले वेल्लय्या आणि वेलुथा आठवले. कचरू आणि वेल्लय्या- दोघांची तीच अगतिकता, आपण 'कमी' असल्याची भावना आपल्याच अवयवासारखी सतत मिरवणं, उपकाराच्या ओझ्याखाली सतत दबून राहणं, दारूच्या धुंदीत असं उसणं जगणं बुडवून कसनुसं हसणं.
आणि वेलुथा आणि जब्याची सारखीच धडपड- दुसर्‍यांनी ठरवून दिलेल्या व्यवस्थेतून आणि स्वतःतच वसतीला आलेल्या गंडातून मार्ग काढण्याची. बंडाचे मार्ग धुंडाळण्याचा सोस सारखाच. असं केल्यामुळे बापाकडून शिव्या खाणंही दोघांचं सारखंच.

फारच भारी लिहिलेस सई तू...... आपल्या मनात जे जे येतं ते नेमकं कागदावर उतरवणं हे फार मोठं कसब आहे .... कारण या लेखातून ते वाचकाच्या मनाचा अचूक वेध घेतंय .....

बाकी प्रतिसादही अतिशय उच्च .....

फारच जबरी मांडणी दिस्तीये या चित्रपटाची .... नुसत्या या लेखाच्या वाचनानेच तो स्क्रू पोखरणे सुरु झालंय ......

अरे, 'फँड्री'चा अर्थ आधी जाणून न घेता सिनेमा बघा - असं सिनेमा बघितलेले सगळे घसा खरवडून सांगतायत... मग इथे लिहू नका ना तो अर्थ... Sad Sad

या सिनेमाबद्दल परवाच्या म.टा.च्या पुरवणीत नागराज मंजुळे यांनी लिहिलेलं स्फुट वाचतानाच काळजात लक्ककन काहीतरी हललं होतं... सिनेमा तर पाहणार आहेच...

सुरेख लिहिलं आहेस सई.

शेवटी हा गंड भिरकावून फेकून देण्ञाचं बळ जेव्हा येतं, त्यानंतर मग पुढं काय होईल- ती कथा दिग्दर्शकाला सांगायची गरज वाटत नाही.>> +१! अतिशय समर्पक शेवट करतो चित्रपट. कारण त्यानंतर काय होईल असं वाटतं?- असं चित्रपटगृहाबाहेर पडणार्‍या प्रेत्येक प्रेक्षकाला विचारलं, तर प्रत्येकाचं उत्तर निरनिराळं येईल- त्याच्या अनुभवानुसार, बुद्धीनुसार. हेच तर चित्रपटाचं यश आहे असं मला वाटतं.

पण प्रोमोज का बरं असे होते? अगदीच वेगळं इंप्रेशन देत होते प्रोमोज.
हा लेख वाचला नसता तर कदाचित नसता पाहिला गेला सिनेमा.>>+१

मी माझ्यातला माणुस शोधत जाते, माझ्यातली संवेदनशीलता तपासत जाते, माझ्यामुळे आणि माझ्यापासून सुरू होणा-या समाजाचा एक हिस्सा म्हणुन माझ्या वाट्याला भिरभिरत आलेल्या ह्या दगडाचा मी थिएटरात नेम चुकवला तरी मनावर मात्र तो येऊन आदळतोच! >>>>> वा क्या बात है, अप्रतिम मनाला भेदणार लिहिलयस animated-gifs-flowers-180.gif

सई, खरच खूप छान लिहिलयस. चित्रपटाचा अजिबात अंदाज न देता ( कथेचा) चित्रपटाचा अचूक अंदाज ( लेखक, दिग्दर्शकाच्या भूमिकेचा) फार सुरेख दिलास ग. चित्रपट परिक्षणात असा प्रयत्न फार कमी जणं करतात; अन फार कमी जाणांना असा प्रयत्न यशस्वी करता येतो, तुला ते साध्य झालय इथे Happy खूप कौतुक तुझे ! हा चित्रपट बघायचा हे ठरवले होते पण तुझ्या परिक्षणाने अजून नक्की झाले.
मयी, साजिरा, अशोकमामा छान पोस्ट.
एका कार्यक्रमात मंजूळेंची मुलाखत ऐकली तेव्हाच हा चित्रपट त्यांच्यासाठी तरी बघायचाच असे ठरवून झाले. जातीव्यवस्थेवर इतके स्पष्ट आणि तरीही निर्लेप फार कमी लोकं बोलतात. मंजूळेंच्या शब्दा शब्दात ते पाझरत होते. प्रत्यक्ष जगलेला, विचार केलेला अन त्याहूनही काही स्पष्ट, स्वच्छ भूमिका असलेला प्रांजळ माणूस म्हणुन भावले होते.

सई, फार फार सुरेख लिहिलं आहे तुम्ही...
चित्रपट पाहिल्यावर कसं वाटेल माहित नाही, पण हे लिखाण फार आवडलं... साजिराची पोस्टही मस्त आहे.. Happy

खूपच छान लिहिलं आहेस सई. जे लिहिलयस ते मनाला अगदी खोलवर कुठेतरी भिडलय कारण तितक्याच ताकदीने तू हे समीक्षण मांडलं आहेस.
मयी, साजिरा आणि अशोकमामा तुमचे प्रतिसादही अप्रतिम!
फँड्री बघण्याचा मुहूर्त शोधतेय अजून कारण ऑफिस आणि चित्रपटाच्या वेळा यांचं गणित जमत नव्हतं पण तुझा लेख वाचल्यावर आतातर बघायलाच हवा त्यामुळे येत्या रविवारी नक्की.
मंजुळेंनी डोक्याला खुराक दिलाय, साखरेत घोळवलेल्या कडू गोळीच्या डोससारखा. हा स्क्रू नवं काही आदळेपर्यंत डोकं पोखरत रहाणार. - +१११११११
नागराज मंजुळे यांचे खास अभिनंदन.

बघायचा होता. पण कुणीतरी फँड्रीवर लिहीतय का म्हणुन वाट बघत होते.
अप्रतिम लिहिलय सई. खुप छान. ह्या वीकांताला बघणे आलेच. धन्यवाद.

पण प्रोमोज का बरं असे होते? अगदीच वेगळं इंप्रेशन देत होते प्रोमोज.>>>>>+१

पहाणारच हा सिनेमा.
गेल्या रविवारी मंजुळेंची , डॉ आनंद नाडकर्णींनी घेतलेली मुलाखत अनुभवली. त्यातही त्यांनी अचूक नेम धरत दगड मारलेच. निखळ , खोल आतून बोचलेल ,अनुभवलेल सिनेमा करून पुढे ठेवलय म्हणाले. फॅन्ड्री म्हणजे काय ह्या वर उत्तर देताना म्हणाले, ह्या प्रश्नाचा राग येतो. तुमच्या अजूबाजूला जगणारी माणस ही भाषा बोलतात, जरा बाहेर पडा आणि शोधा आपला आपण काय अर्थ फॅन्ड्रीचा. खळ्ळळ.
माझ्या समोरच्या खुर्चीवर बसले होते पिस्तुल्या अन जब्या. सिनेमात काय घडत अजून पाहिल नाही पण हलगी-जब्या- हिरो प्रवासात पोराचा गंड गायब केलाय मंजूलेंनी. एकदम मस्त फिलिंग आल मला, त्या टाळ्या झेलत, अभिमानानी उभ्या पोराना बघून.
साजिरा पोस्ट छान.

fandry हा कैकाडी भाषेतला शब्द आहे असे नागराज मंजुळे यांनी टीव्हीवर सांगितले, अर्थ सांगितला आत्ता अजिबात आठवत नाहीये.

सुरेख लिहीलंय!
प्रोमोज का बरं असे होते? अगदीच वेगळं इंप्रेशन देत होते प्रोमोज.
हा लेख वाचला नसता तर कदाचित नसता पाहिला गेला सिनेमा.>>+१

अप्रतिम लिहिलं आहे. हे परीक्षण नाही. पण चित्रपट ज्या समरसतेने पाहीला आहे त्या समरसतेला दाद द्यावीशी वाटते.

<<आयुष्यात एखादं तरी दाहक वास्तव असतं. प्रत्येकाच्या असेलच असं नाही, पण बहुतेकांच्या असतंच. हर प्रकारानं आणि निकरानं त्याला टाळण्याचा, नाकारण्याचा प्रयत्न करावा आणि कल्पनेपेक्षा कितीतरी अधिक तीव्रतेने आयुष्यानं ते वास्तव माणुस गाफील असताना कुणीतरी तोंडावर सणसणून दगड भिरकवावा तसं फेकुन मारावं... काय अवस्था होईल? हेच जर एखाद्या अडनिड्या वयातल्या मुलासोबत घडलं तर? तोही प्रथम भेलकांडून हतबल होईल आणि आवाक्याच्या बाहेर गेल्यावर त्वेषानं चवताळून परिस्थितीवर तुटून पडेल... जमेल त्या मार्गानं!!

पण फँड्री इतकाच नाही... मी माझ्यातला माणुस शोधत जाते, माझ्यातली संवेदनशीलता तपासत जाते, माझ्यामुळे आणि माझ्यापासून सुरू होणा-या समाजाचा एक हिस्सा म्हणुन माझ्या वाट्याला भिरभिरत आलेल्या ह्या दगडाचा मी थिएटरात नेम चुकवला तरी मनावर मात्र तो येऊन आदळतोच! मंजुळेंनी नेमच इतका अचुक धरलाय... तिथे वाल्याच्या बायकोसारखं मी पाप केलं नाही म्हणत बाजूला व्हायला वावच नाही. >>

हे असं इतकं नेमकं,आणि अचूक त्या समरसतेशिवाय शक्य नाही. एकूणच सुरेख लेखन.. चित्रपटाला must watchच्या कॅटेगरीत टाकायला लावणारं..

मला वाटतं शेवटचा तो खडा जेव्हा भिरभिरतच 'आपल्या' दिशेने येतो ना..... तेव्हाच फँड्रीचा अर्थ खर्‍या अर्थाने कळतो.

Pages