फँड्री नावाचा स्क्रू...

Submitted by सई. on 17 February, 2014 - 07:34

आयुष्यात एखादं तरी दाहक वास्तव असतं. प्रत्येकाच्या असेलच असं नाही, पण बहुतेकांच्या असतंच. हर प्रकारानं आणि निकरानं त्याला टाळण्याचा, नाकारण्याचा प्रयत्न करावा आणि कल्पनेपेक्षा कितीतरी अधिक तीव्रतेने आयुष्यानं ते वास्तव माणुस गाफील असताना कुणीतरी तोंडावर सणसणून दगड भिरकवावा तसं फेकुन मारावं... काय अवस्था होईल? हेच जर एखाद्या अडनिड्या वयातल्या मुलासोबत घडलं तर? तोही प्रथम भेलकांडून हतबल होईल आणि आवाक्याच्या बाहेर गेल्यावर त्वेषानं चवताळून परिस्थितीवर तुटून पडेल... जमेल त्या मार्गानं!!

पण फँड्री इतकाच नाही... मी माझ्यातला माणुस शोधत जाते, माझ्यातली संवेदनशीलता तपासत जाते, माझ्यामुळे आणि माझ्यापासून सुरू होणा-या समाजाचा एक हिस्सा म्हणुन माझ्या वाट्याला भिरभिरत आलेल्या ह्या दगडाचा मी थिएटरात नेम चुकवला तरी मनावर मात्र तो येऊन आदळतोच! मंजुळेंनी नेमच इतका अचुक धरलाय... तिथे वाल्याच्या बायकोसारखं मी पाप केलं नाही म्हणत बाजूला व्हायला वावच नाही. आजही चहूबाजूंना 'ड्रायव्हर', 'कामवाली बाई' (स्वतः घाण केलेली स्वच्छतागृहं तिच्याकडून साफ करून घेणं वगैरेही आलं त्यात!), 'वॉचमन' अशा प्रकारची असंख्य 'बिरुदं' आणि वर्णभेदही येतात कानांवर.. अर्थात हा फक्त एक दाखला, असे हजारो दाखले. त्यामागे दडलेल्या माणुस नावाच्या प्राण्याचं काय? मी अडवते का कुणाला असं संबोधताना? अशी वागणुक देणा-यांना परावृत्त करते का? म्हणजे काय काय करायला लागेल? मी स्वतः खरंच पूर्णपणे माणुसकीनं वागते का? प्रश्न. अनेक प्रकारचे. नागराज मंजुळे तुम्हाला टोचत रहातात. अनेक प्रसंगांमधून. - हा फॅण्ड्री आहे. पण पुन्हा, एवढाच नाही.

हे सगळं बेमालुमपणे अगदी जाता जाता करत मंजुळे तुमचं मनोरंजनही करतात. त्यांचा चंक्या ज्या सहज आणि लिलया जत्रेच्या जल्लोषात सामील होतो त्याच सहजतेनं. कोणतीच गोष्ट कशाचपासून वेगळी करता येत नाही.

एरवी अडम तडम तडतडबाजा असलेली माझी बहिण चित्रपट पहाताना वरचेवर डोळ्यांना रुमाल लावत होती. म्हणजेच चित्रपट भिडला असं नव्हे, माहिताय. पण नि:शब्द जडत्व घेऊन घरी पोचल्यावर आपोआपच 'माणसानं माणसाशी माणुसकीनं वागणं' यावर माझा आणि तिचा रंगलेला दीर्घ परिसंवाद पार प्रत्येक कुटुंबियाची पाळंमुळं खणत गेला, मागच्या आणि आमच्या पिढीतल्या प्रत्येकाबद्दल ते येणा-या पिढीला काय पोचवायचं इथंपर्यंत. दोघीच्या दोघीच निवांत असताना, वेळेचं बंधन नसताना एरवी स्वतःचीच सालं कशाला काढत बसलो असतो? त्यापेक्षा अनुपस्थित गोतावळ्याबद्दल ही अश्शीच आणि तिचं तस्संच हा मुखवास चघळत बसणं सोप्पं नव्हतं का? वर आणि तो मंजुळेंच्या डोईजड चित्रपटावर रामबाण उताराही तर झाला असता! पण...

उत्खननालाच बसायचं तर अनेक गोष्टी निघतील. पण ते प्रत्येकानं आपापलं करावं. कारण मला जे सापडलं तेच बाकिच्यांना मिळेल असं नाही शिवाय असंही होऊ शकेल की मलाच शंभर गोष्टी मिळाल्या आणि कुणाला एकही नाही... तेव्हा तो शेवटी ज्याचा त्याचाच प्रश्न रहातो.

अलकनंदा दासगुप्तांचं संगीत आणि विक्रम अमलाडींचा कॅमेरा हे दोन महत्वाचे कलाकार आहेत चित्रपटात. शीर्षकापासूनच दोघंही मनाचा ठाव घेतात आणि ती पकड घट्ट घट्ट होत जाते... एकेक फ्रेम बघत रहावी अशी आणि एकेक तुकडा रिवाईंड करुन मुद्दाम ऐकण्यासारखा. किशोर कदम ह्या माणसाला मला एकदा सेटवर जाऊन निरखायचं आहे. ह्या माणसाला स्वतःला तरी कल्पना असेल का स्वतःच्या रेंजची?? स्विच ऑन्/ऑफ नावाची चीज हा करतो तरी कशी? ह्या माणसाबद्दलचं कुतूहल दिवसेंदिवस वाढतंच चाललंय. 'ल्हान हाये अजून', 'शेण घेऊ का?'तली लाचारी, गल्लीच्या वळणावरच्या त्या बेतशीर झोकांड्या, जिवाच्या आकांतानं केलेली शेवटची पळापळ.. सगळं अचंबीत करणारं.
त्याच्यासमोर त्याच ताकदीनं उभी राहिलेली जब्याची आई. यांचं नाव मला माहिती नाही पण भुमिकेचं सोनं म्हणजे काय याचा वस्तुपाठ आहे तिची भुमिका. मग जब्या आणि पि-या. तीन चतुर्थांश सिनेमा होईतोवर तर माझं ध्यान पि-याकडंच. 'आता खाली कसा उतरू'पासून ते ओशाळवाणं होऊन नवी कापडं कशी आहेत विचारणं असो... 'तुझा झगा गं झगा गं ' करत जिवलग दोस्ताला गाण्यात गुंफणारा लोभस पि-या. मी प्रेमात पडले त्याच्या. 'नायकाचे बेस्ट दोस्त' अशी काही कॅटेगरी केली तर सुरज पवारचा पि-या १००% पहिल्या पाचात!

पि-यापाठोपाठ चंक्या. अफलातून. मंजुळेंचा कलंदर चंक्या मोहवून टाकतो. 'तुझा विश्वास आहे ना, मग होईल' भिडलंच. त्याचं आणि जब्याचं नातं केवळ देखणं आहे. जब्या मात्र मला अधूनमधून आवडला आणि मग शेवटचा. त्याचं ते डोळ्यांच्या कोप-यातून शालूला निरखत रहाणं आणि ओघानंच ओठांवर उमटणारं अस्फुट स्मित लाजबाब. संवादफेक मात्र सोमनाथ अवघडेच्या मुळच्या हस-या जिवणीमुळं थोडीशी सदोष झालीये असं मला वाटलं. पण सायकलच्या आणि पेप्सीच्या प्रसंगात शिवाय जत्रेत बत्ती घेतल्यावरचा त्याचा प्रयत्न चांगला होता. राजेश्वरी खरातची शालू निरागस. ती तशीच अपेक्षितही होती. बामणीण चिमणीच्या गोष्टीसाठी ज्योती सुभाष नावाच्या देखण्या म्हातारीचं अनपेक्षित दर्शन सुखद. खरंतर अगदी एकच वाक्य बोलणा-या सुरखीपासून ते 'वढ पाच'ची म्हणणा-या न्हाव्यापर्यंत, जो तो ज्या त्या ठिकाणी एकदम फिट आहे, चपखल.

बाहेर धुमाकुळ घालणा-या आणि मलाही तेवढीच भुरळ घातलेल्या अजयच्या 'प्रितीच्या विंचू'ची अनुपस्थिती भावली. ते कुठेही आलं असतं तरी टेंपोच गेला असता. 'साजूक पोली अन म्हाव-या 'सारखं त्याचंही ठिगळच झालं असतं. त्या मोहाला बळी न पडण्याबद्दल मंजुळेंचं विशेष कौतुक.

मंजुळेंनी डोक्याला खुराक दिलाय, साखरेत घोळवलेल्या कडू गोळीच्या डोससारखा. हा स्क्रू नवं काही आदळेपर्यंत डोकं पोखरत रहाणार. भविष्यातही जेव्हा जेव्हा फॅण्ड्री बघेन तेव्हा तेव्हा तो स्क्रू पुन्हा लोहचुंबकासारखा येऊन मेंदूला चिकटेल आणि आपलं काम करत राहील हेही आत्ताच माहितीये..

पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनय.. पहिलाच प्रयत्न (प्रयत्न म्हणायचं का??) इतका खणखणीत... बस्स लगे रहो!! मंजुळेंच्या पुढच्या सगळ्या दमदार वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा..

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर लिहिलंय सई…. भावना पोचल्या

जे दिसतंय तेवढंच नाहीये त्यापलीकडे आहे तो खरा सिनेमा 'read between the line' असतं तसं काहीसं
संवाद सुद्धा कमी, फार भेदकपणे दाखवलेलं दुख-दारिद्र्य नाही, कसलंच अतिरंजन नाही. मुद्दाम कॅमेरात यावी म्हणून साधी आवर सावर सुद्धा नाही मग ओढून ताणून आणून दाखवलेले निसर्ग सौंदर्य किंवा इतर कृत्रिमता तर नाहीच नाही.
रोजचंच साधं जगण, साधंच नेहेमीचं वागणं … पण ते आपलं नाही 'त्यांच'.....
आपण न पाहिलेलं न अनुभवलेलं. थोडं आपल्या कल्पने पलीकडचंच ….
काहीतरी होतंय मनात अस्पष्टसं जे स्पष्ट कळतंय …. हेच हेच अगदी ते फिलिंग आहे जे पाहतांना जाणवत असतं पण कळत नसतं.

एका नव्या निर्मात्याला एकदम अश्या सिनेमाला हाथ घालावा का वाटला असेल बुवा. वाटला तर वाटला सार्थकी करू घातला …. त्यांच्या हिमतीची दाद तर द्यायलाच हवी …. नाही ?

'फॅन्ड्री' वेगळीच भावना देऊन गेला … __/\__

खतरा लिहलंय, पिक्चर बघायची फारच उत्सुकता लागून राहीली आहे.
किशोर कदम बद्दल वाक्यनवाक्य पटलं. तो 'जोगवा' तला सिन आठवतो का 'बाईपण मुरलंय' म्हणतानाचा? आता लिहतानाही सरसरून काटा आला अंगावर.

धन्यवाद हा लेख लिहल्याबद्दल. पिक्चर बघणारच.

वर्तमानपत्रातील समीक्षालेखनातला अलिप्तपणा एखाद्या चांगल्या चित्रपटाची नीटशी ओळख करून देऊ शकत नाही.. ती तुझ्यामूळे झाली. सुंदर लिहिले आहेस.

तुझा शब्द न शब्द अगदी आतून आलाय. चित्रपट खोलवर भिडल्याशिवाय असं लिहिणं शक्य नाही. आवडलंच परीक्षण ! Happy
चित्रपट पाहायलाच हवा.

मयी तुझी पोस्ट खूपच आवडली. Happy
दिनेश अगदी सहमत तुमच्याशी.
चित्रपटाबद्दल थिएटर बाहेर राहून केलेली टिपण्णी म्हणून आवडलं हे लेखन. आणि प्रत्येकाने आवर्जून पहावा असा सिनेमा असल्याने चित्रपटाची कथा इथे लिहिणं योग्य ठरणार नाही. कारण तो प्रत्येकाला वेगवेगळा उलगडणार आहे.

सुरेख लेख. अभिनंदन..
<अलकनंदा दासगुप्तांचं संगीत आणि विक्रम अमलाडींचा कॅमेरा हे दोन महत्वाचे कलाकार आहेत चित्रपटात>
तुझं हे निरीक्षण विशेष भावलं..

चित्रपट आवडला आहे.
त्याबद्दलचं तुमचं लेखनही आवडलंय.

छान लिहिलंय सई. Happy

आपल्या विषयावर ठाम राहण्याचा असो, की रस्त्यावरची साधी-फाटकी वाटणारी पोरं उचलून उच्च दर्जाचा अभिनय करायला लावण्याचं काम असो- किरकोळ आणि साध्या दिसणार्‍या पण अतिबुद्धीमान लेखक-कवी आणि दिग्दर्शक असणार्‍या या मंजूळे नावाच्या माणसामध्ये जबरदस्त आत्मविश्वास आहे. फिल्म फेस्टिव्हलमध्ये / प्रिमियरमध्ये आपण आणि आपला सिनेमा याबद्दल किती बोलू असं निर्माता-दिग्दर्शकाला होऊन जातं. नागराज मात्र 'मला जास्त बोलता येत नाही, माझा सिनेमा काय बोलतो तेच पाहा' एवढं एकच वाक्य बोलला. 'फँड्री'ची कथा ही त्याने स्वतः अनुभवलेली / बघितलेली- असंही एका मुलाखतीत वाचलं.

गल्लीच्या वळणावरच्या त्या बेतशीर झोकांड्या >>> इथं लिहिण्यासाठी परफेक्ट क्षण निवडलास. आपण 'कमी' असल्याचं युगानुयुगाचं जोखड- कळायला लागल्यापासून आपल्या जाणीवे-नेणीवेत रक्तासारखी वागवणारी, आणि मग ती शुद्धीवर असताना सतत ठसठसणारी बोच-दु:ख हलकं करण्यासाठी दारू रिचवून खोटंच निर्लज्ज, सुखी, खुशालचेंडू आणि बेफाम झाल्याचं दाखवून हसणारी, पण त्या तशा हसण्यातूनही बेदम अगतिकता दाखवणारी अशी माणसं मी खेड्यापाड्यांत बघितली आहेत. हा दोरा सौमित्रने इतका नेमका पकडला आहे, की त्यानेही ते कुठेतरी कधीतरी बघितलेलं आहे- ही खात्री तर पटतेच. पण त्याच्या अभिनयाचं आणि त्याच्याकडून असं करवून घेण्यार्‍या दिग्दर्शकाचं कौतुक वाटल्यावाचून राहत नाही.

'तुझा झगा गं झगा गं..' मधली निरागसता, नवेकोरेपण आणि बेरकीपण या सार्‍याचं मिश्रण अचाट आहे. त्या पोरांनी आता केलं आहे, त्याच्या रेसभरही इकडेतिकडे झालं असतं, तरी त्याचा एकत्रित परिणाम गंडला असता. हे फक्त उदाहरणार्थ. अशा 'नेमक्या' जागा अनेक आहेत. त्या सार्‍या ठिकाणी दोरीवरचा बॅलन्स साधण्याचं अवघड काम दिग्दर्शकाने केलं आहे, करवून घेतलं आहे.

स्पॉयलर वॉर्निंग

'तुझा विश्वास आहे ना, मग होईल' >>
हाच सारा सिनेमा आहे. सारी कथा याचीच आहे, असं मला तरी वाटलं. बाकी समाजव्यवस्था अणि जातीपातींचं वास्तव- हे फक्त पटकथेला आधारासाठी घेतलं आहे. दारिद्र्य, जातीच्या भिंती, नीच दर्जाचं काम करायला लागणं- या सार्‍यापेक्षा तुमच्यातला 'न्युनगंड' हाच तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे. कारण तो 'तुमच्यात' घर करून आहे. हे गंडाचं जोखड भिरकावता आलं, की पुढलं सारं सोपं. जब्या प्रत्येक वेळेला छोट्यामोठ्या प्रसंगात हरत राहतो, मागे सरतो, हरल्याचं कबुल करतो- ते फक्त या 'काँप्लेक्स' पायी. शेवटी हा गंड भिरकावून फेकून देण्ञाचं बळ जेव्हा येतं, त्यानंतर मग पुढं काय होईल- ती कथा दिग्दर्शकाला सांगायची गरज वाटत नाही. या भिरकावून देण्याचा थ्रेशहोल्ड पुरवणारी, बळ देणारी चंक्यासारखं पात्रं आणि प्रसंग आपल्याच आजूबाजूला असतात, घडतात. आपण कधी ती ओळखतो, कधी ओळखू शकत नाही, इतकंच.

ज्याला कुणाला आयुष्यात कधीही, कुठच्याही गोष्टीसाठी, एका क्षणासाठी जरी न्युनगंड वाटला असेल- त्याने हा सिनेमा पाहा. थोडक्यात सार्‍यांनी पाहा.

साजिरा, काय सुंदर पोस्ट आहे तुझी Happy वाह! लेखापेक्षा आवडली असं म्हणलंस तरी चालेल.

स्पॉयलर वॉर्निंगच्या हेडरखाली लिहिलेलं प्रत्येक वाक्य मला पुन्हा थिएटरमध्ये घेऊन गेलं आणि पटापटा सर्व फ्रेम्स पुढे सरकल्या. तुला उमगलेला एक पैलूच आहे तो. तू लिहिलेला प्रत्येक न प्रत्येक शब्द आवडलाच.

सुट्टीच्या दिवशी एक मुलगी एक चित्रपट पाहून येते ही समाजात फार मोठी चर्चेची वा उलथापालथ करणारी घटना नव्हे. हे तर नित्याची सर्वत्र घडणारी बाब. ३ ते ६ चा चित्रपट पाहिला....चहा घेताघेता एकदोनदा एकादोघांशी त्या अनुषंगाने चर्चा केली, संपला विषय. दुसर्‍या दिवसापासून रुटीन झाले सुरू. हा थोडक्यात मनोरंजनाचा लेखाजोखा.

पण नाही...."फॅन्ड्री" च्या टीमने तुम्हाला आणि तुमच्या बहिणीला जे काही दिले ते व्यावहारिक जगातील किंमतीच्या भाषेत अचाट आहे. "...नि:शब्द जडत्व घेऊन घरी पोचल्यावर आपोआपच 'माणसानं माणसाशी माणुसकीनं वागणं' यावर माझा आणि तिचा रंगलेला दीर्घ परिसंवाद..." असे वर एका ठिकाणी तुम्ही लिहिले आहे. हे वाक्य तुमच्या लेखनाची योग्य आणि आवश्यक ती हालचाल दर्शवितात. दुर्दैवाने प्रोमोजनी या चित्रपटाचे जे चित्र रंगविले होते [टीन एजर्सचे...वर्णभेदामुळे अशक्य वाटणारे...प्रेम] त्यामुळे माझ्यासारख्या मुंबईपुण्यापासून दूर राहिलेल्या प्रेक्षकाने चित्रपटाच्या बांधणीबाबत जो एक परंपरेतील ठोकताळा बांधला होता, त्याचा इतका परिणाम चित्रपटाच्या मुख्य धारेत नाही हे तुमच्या प्रतिसाद वाचनानंतर जाणवले....आणि नागराज मंजुळे याना काहीतरी वेगळेही सांगायचे आहे ही बाब अधोरेखीत झाली....हा तुमच्या लेखनाचा अस्सल परिणाम.

ग्रामीण भागात जात उतरंडीवर असलेल्या घडामोडी आजही किती तीव्र आहेत त्याबद्दल इथे लिहिणे योग्य नाही. कारण मग त्याचा विस्तार खूप मोठा होईल; पण दिग्दर्शकाने सर्वस्वी नव्या समजल्या जाणार्‍या लहानमोठ्या पात्रांकडून तो प्रथेचा प्रश्न अत्यंत समर्थपणे पडद्यावर....तोही संयतपणे...मांडला आहे, तो तुम्हाला भावला, या तुमच्या शब्दरुपी झार्‍यातून समोर आलेली मते वाचताना झालेला आनंद शब्दातीत आहे.

"मंजुळेंनी डोक्याला खुराक दिलाय...." असे तुम्ही कबूल केले आहे....हा खुराक सर्वांनाच लाभदायक ठरेल. एका सुंदर चित्रपटाविषयी तितक्याच सुंदरतेने लिहिलेले तुमचे हे लिखाण इथल्या सर्वच सदस्यांना मनस्वी पसंद पडलेले आहे हे वरील प्रतिसादांतील भाषा सांगत आहे....मीही त्यात एक आहे, सई.

सई, किती सुन्दर लिहिलस दगड झेलायला नक्कीच जायला हव.
पण फँड्री इतकाच नाही... मी माझ्यातला माणुस शोधत जाते, माझ्यातली संवेदनशीलता तपासत जाते, माझ्यामुळे आणि माझ्यापासून सुरू होणा-या समाजाचा एक हिस्सा म्हणुन माझ्या वाट्याला भिरभिरत आलेल्या ह्या दगडाचा मी थिएटरात नेम चुकवला तरी मनावर मात्र तो येऊन आदळतोच! मंजुळेंनी नेमच इतका अचुक धरलाय >>>>>>>>
मिळालेल्या पारितोषकापेक्षा हेच चित्रपटाच यश आहे.

सर्वांचे मनापासून आभार. मयी आणि साजिरा, खुप खुप सुरेख लिहिलंत. खरंच लेखापेक्षा प्रतिसाद सरस. तुमच्यामुळे आणखी नवे पैलू अधोरेखित झाले.

मला खरंतर काय काय लिहू आणि काय गाळू असं झालं होतं पण विस्तारभयास्तव आवरावा लागला पसारा. ते बरंच झालं.

मामा, कित्येक चित्रपट आवडत असतात आपल्याला, सगळे काही मनावर घेतले जात नाहीत पण काही मानगुटीवरच बसतात, हा त्यातलाच एक. साजि-याने कमीत कमी शब्दात माझ्यापेक्षा जास्त नेमकं लिहिलंय. वर लिहायचं राहून गेलं, हा माझ्या मराठीतला सिनेमा आहे याचाही कडक अभिमान वाटला.

असं काही वाचलं की भारतात नसल्याची खंत वाटते! कधी योग येतो हा चित्रपट पाहण्याचा काय माहीत!

Pages