टीनएज प्रेमाची गोष्ट : टाईमपास (टीपी)

Submitted by ज्ञानेश on 5 January, 2014 - 05:15

मराठी सिनेमाची सुधारलेली वितरण व्यवस्था आणि मल्टिप्लेक्स यांच्या कृपेने जळगावसारख्या छोट्या शहरांत मराठी चित्रपट प्रदर्शित होऊ लागले आहेत. त्यामुळे रवी जाधवांचा ’टाईमपास’ फर्स्ट डे ला पाहता आला. त्याचीच ही थोडक्यात ओळख-

चित्रपटाचे नाव- टाईमपास
निर्माते- नितीन केणी, निखिल साने, मेघना जाधव
कथा / दिग्दर्शक- रवी जाधव
प्रमुख भूमिका- प्रथमेश परब, केतकी माटेगावकर, वैभव मांगले, भाऊ कदम, मेघना एरण्डे इत्यादि
संगीत- चिनार-महेश

timepass-movie-dailogue.jpg

’पौगंडावस्थेतील प्रेमभावना’ हा अनुभव सार्वत्रिक असला, तरी त्याला आपल्या मराठी कलाविश्वात फारसे स्थान दिले गेलेले आढळत नाही. या विषयाला पहिल्यांदा न्याय दिला, तो मिलिंद बोकील यांच्या ’शाळा’ या कादंबरीने. याच कादंबरीवर पुढे या नावाचा सिनेमाही आला.
रवी जाधव या गुणी दिग्दर्शकाचा हा चौथा सिनेमा. या आधी नटरंग, बालगंधर्व आणि बालक-पालक या चित्रपटांतून त्याने आपले मेरीट सिद्ध केलेले असल्यामुळे ’टाईमपास’ सिनेमाकडून अपेक्षा वाढलेल्या होत्या. त्या अपेक्षांची काही प्रमाणात पूर्ती ’टाईमपास’ करतो.

ही कथा आहे दगडू शांताराम परब (प्रथमेश) आणि प्राजक्ता मनोहर लेले (केतकी) यांची. दगडू हा एक उडाणटप्पू , दहावीत वारंवार नापास होणारा आणि दिवसभर त्याच्या मित्रांसोबत टवाळक्या करणारा मुलगा आहे. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्याचे वडील रिक्षा चालवतात, आणि कर्ज काढून आपल्या मुलाला शिकवू पाहत असतात. दगडू पुन्हा नापास झाल्याने ते चिडून त्याला मारहाण करतात, आणि दगडू नाईलाजाने पेपर टाकण्याचे काम करायला सुरूवात करतो.
दगडूचे मित्रमंडळ- बालभारती, कोंबडा आणि मलेरिया अशी टोपणनावे असणारे टोळके पास होऊन कॉलेजात जाते. ते दगडूला फूस लावून प्राजक्ता नामक वर्गातल्या गुणी, सालस, हुशार मुलीला ’टाईमपास’ म्हणून पटवायची फूस लावतात. दगडू तसे करायचे ठरवतो.
दगडू आणि प्राजक्ता यांची ही ’टाईमपास’ म्हणून सुरू झालेली प्रेमकथा पुढे काय वळणे घेते, ते पडद्यावर पाहणेच योग्य ठरावे.

दगडूची प्राजक्तापर्यंत पोहोचण्याची धडपड, त्याला आलेल्या अडचणी, त्यातून निर्माण होणारे विनोद, सुश्राव्य गाणी आणि मजेदार संवाद- यामुळे चित्रपट मध्यंतरापर्यंत आपल्याला गुंतवून ठेवण्यात यशस्वी होतो. मध्यंतरानंतर मात्र चित्रपटाचा वेग काहीसा मंदावतो. कथानक आपल्याला अपेक्षित असलेल्या वळणांनीच पुढे जात राहते, मात्र पुर्वार्धातल्या वेगाने नाही, तर काहीसे रेंगाळत. चांगले संकलन करून चित्रपटाची लांबी कमी केली असती, तर त्याचा एकंदर ’इफेक्ट’ वाढला असता असे वाटते.
सिनेमात दगडू आणि प्राजक्ता या भूमिका प्रथमेश आणि केतकीच्या अनुक्रमे ’बालक-पालक’ आणि ’शाळा’ या चित्रपटातल्या भूमिकांचेच extension आहे, असे मला वाटले. या दोन्ही कलाकारांनी चांगला अभिनय केला आहे, आणि आपापल्या भूमिकांना न्याय दिला आहे. विशेषत: मध्यमवर्गीय घरातली सज्जन, पापभीरू आईवडिलांना घाबरणारी मुलगी केतकी माटेगावकरने सुरेख रंगवली आहे. या अभिनेत्रीकडून भविष्यात भरपूर अपेक्षा आहेत ! प्राजक्ताच्या पालकांच्या भूमिकेत वैभव मांगले आणि मेघना एरण्डे यांनी चांगले काम केले आहे. विशेषत: वैभव मांगलेची भूमिका मुलीचा टकला बाप- अशी काहीशी कॅरीकेचर स्वरूपाची असली, तरी त्याला दिग्दर्शकाने खलनायकी छटा येऊ दिलेली नाही, हे मला विशेष आवडले. खरं तर या चित्रपटात खलनायक असा कोणी नाहीच. प्रत्येक जण- काहीसे तर्‍हेवाईकपणाने वागत असले, तरी आपापल्या जागी योग्य आहेत असेच वाटत राहते. प्राजक्ताला गायन शिकवणारी स्पृहा आणि प्राजक्ताचा भाऊ यांचे उपकथानक हे तसे अनावश्यक असले, तरी त्यामुळे एकंदर चित्रपटाच्या ’फ्लो’ मध्ये कोणताही व्यत्यय येत नाही.
चित्रपटाचे कथानक कोणत्या काळात घडते, ते स्पष्टपणे सांगीतलेले नसले, तरी जागोजागी काही क्लू दिलेले आहेत. दगडू आणि कंपनीने प्राकक्ताच्या वडिलांना ’शाकाल’ म्हणणे, एका दृष्यात ’दयावान’ सिनेमाची जाहिरात इ. वरून हे ऐंशीच्या दशकातले कथानक आहे, हे सहज लक्षात येते.
चित्रपटातली संगीताची बाजू भक्कम आहे. सर्व गाणी श्रवणीय आहेत. विशेषत: ’मला वेड लागले... प्रेमाचे’, काहीसे भडकरित्या चित्रित केलेले आगरी गाणे- ’ही प्पोरी साजुक तुपातली’ आणि ’फुलपाखरू’ ही गाणी चांगली आहेत.

एकंदर चित्रपट सर्व आघाड्यांवर समाधानकारक असला, तरी खूप उत्कृष्ट, अद्वितीय असे त्यात काही नाही. एकदा पहायला हरकत नाही, पाहिला नाही तरी फारसे बिघडत नाही, असा.

माझ्याकडून (पाचपैकी) तीन स्टार्स.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विनाकारण?>>> चाळीत राहणारा माणुस आमच्या दाराची कडी तुझ्याकडुन वाजली म्हणुन इतका अपमान करेल हे पटत नाही. ते कॅरेक्टर गन्डलय.
+++१

मलाही हे खटकत होते. लेले साधा कारकून असतो- आमदार/नगरसेवक/गुंड/दोन नंबर पैसेवाला नाही. मग तो इतका मस्तवालपणे कसा काय वागेल? आणि कोण त्याचं ऐकून घेईल?

लेलेचं कॅरेक्टर विनोदी करण्याच्या नादात गंडून गेलंय पार!

रच्याकने-
माझ्या पाहाण्यात एका रिअल लाईफ दगडू-प्राजक्ताच्या बाबतीत प्राजक्ताचे आईवडील दगडूला घाबरुन त्याच्या दहशतीत होते..प्राजक्ताला अफेअर केल्याचा पश्चात्ताप होत होता, पण हात 'दगडा'खाली अडकलेला! ॲसिड टाकण्याची धमकी पण दिली त्याने. पुढे कसंतरी सॉर्ट झालं ते सगळं आणि प्राजक्ताच्या ’गोरा रंग-लांब केस-घारे डोळे’ या क्वालिफिकेशनच्या जोरावर एका परगावातल्या पैसेवाल्या इंजिनिअरशी लग्न पार पडलं!

असतात असे लोकं .
काल बसमध्ये स्टॉप येणार होता म्हणून मे पुढे जाऊन थांबले दारापाशी तर मागुन एक आज्जी आल्या आणि मला धक्का मारुन पुढे निघुन गेल्या. मला ढकलून माझ्या पुढे जाऊन उभ्या राहील्या! मी म्हणाले, 'आज्जी मला पण उतरायचच आहे" तर म्हणे, "बरं मग?मी काय करू?" Uhoh

लेलेचं कॅरेक्टर विनोदी करण्याच्या नादात गंडून गेलंय पार!
>>>>>>>>
एका अर्थी खरेय हे, पण त्या सीनमुळे आज मार्केटमध्ये "नया है वह" ची फुल्ल हवा झाली आहे.

बाकी लोकांना काय आवडते ते लोकंच तर ठरवतात.
जो चित्रपट तूफान चालतो, जास्तीत जास्तीत लोकं बघतात, तो लोकांना आवडलेला असतो.
एका अर्थी हि आम्हाला असेच चित्रपट हवेत अशी लोकांचीच मागणी असते.
त्यामुळे ग्राहक म्हणून काय हवे हे बहुसंख्य ग्राहकांनीच ठरवलेले असते.

रिया.....:हहगलो:

अरे.. चांगलाच चाललाय की हा धागा.
मायबोलीवरसुद्धा हा 'टाईमपास' दुनियादारीचे विक्रम मोडेल असं वाटतंय. Wink

मायबोलीवरसुद्धा हा 'टाईमपास' दुनियादारीचे विक्रम मोडेल असं वाटतंय >>>> असं कसं असं कसं.. या धाग्यावर काही पोस्ट दुनियादारीच्याही आहेत मग त्या दुनियादारीच्या अकाऊंटमध्ये नको का मोजायला.. Wink

Pages