टीनएज प्रेमाची गोष्ट : टाईमपास (टीपी)

Submitted by ज्ञानेश on 5 January, 2014 - 05:15

मराठी सिनेमाची सुधारलेली वितरण व्यवस्था आणि मल्टिप्लेक्स यांच्या कृपेने जळगावसारख्या छोट्या शहरांत मराठी चित्रपट प्रदर्शित होऊ लागले आहेत. त्यामुळे रवी जाधवांचा ’टाईमपास’ फर्स्ट डे ला पाहता आला. त्याचीच ही थोडक्यात ओळख-

चित्रपटाचे नाव- टाईमपास
निर्माते- नितीन केणी, निखिल साने, मेघना जाधव
कथा / दिग्दर्शक- रवी जाधव
प्रमुख भूमिका- प्रथमेश परब, केतकी माटेगावकर, वैभव मांगले, भाऊ कदम, मेघना एरण्डे इत्यादि
संगीत- चिनार-महेश

timepass-movie-dailogue.jpg

’पौगंडावस्थेतील प्रेमभावना’ हा अनुभव सार्वत्रिक असला, तरी त्याला आपल्या मराठी कलाविश्वात फारसे स्थान दिले गेलेले आढळत नाही. या विषयाला पहिल्यांदा न्याय दिला, तो मिलिंद बोकील यांच्या ’शाळा’ या कादंबरीने. याच कादंबरीवर पुढे या नावाचा सिनेमाही आला.
रवी जाधव या गुणी दिग्दर्शकाचा हा चौथा सिनेमा. या आधी नटरंग, बालगंधर्व आणि बालक-पालक या चित्रपटांतून त्याने आपले मेरीट सिद्ध केलेले असल्यामुळे ’टाईमपास’ सिनेमाकडून अपेक्षा वाढलेल्या होत्या. त्या अपेक्षांची काही प्रमाणात पूर्ती ’टाईमपास’ करतो.

ही कथा आहे दगडू शांताराम परब (प्रथमेश) आणि प्राजक्ता मनोहर लेले (केतकी) यांची. दगडू हा एक उडाणटप्पू , दहावीत वारंवार नापास होणारा आणि दिवसभर त्याच्या मित्रांसोबत टवाळक्या करणारा मुलगा आहे. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्याचे वडील रिक्षा चालवतात, आणि कर्ज काढून आपल्या मुलाला शिकवू पाहत असतात. दगडू पुन्हा नापास झाल्याने ते चिडून त्याला मारहाण करतात, आणि दगडू नाईलाजाने पेपर टाकण्याचे काम करायला सुरूवात करतो.
दगडूचे मित्रमंडळ- बालभारती, कोंबडा आणि मलेरिया अशी टोपणनावे असणारे टोळके पास होऊन कॉलेजात जाते. ते दगडूला फूस लावून प्राजक्ता नामक वर्गातल्या गुणी, सालस, हुशार मुलीला ’टाईमपास’ म्हणून पटवायची फूस लावतात. दगडू तसे करायचे ठरवतो.
दगडू आणि प्राजक्ता यांची ही ’टाईमपास’ म्हणून सुरू झालेली प्रेमकथा पुढे काय वळणे घेते, ते पडद्यावर पाहणेच योग्य ठरावे.

दगडूची प्राजक्तापर्यंत पोहोचण्याची धडपड, त्याला आलेल्या अडचणी, त्यातून निर्माण होणारे विनोद, सुश्राव्य गाणी आणि मजेदार संवाद- यामुळे चित्रपट मध्यंतरापर्यंत आपल्याला गुंतवून ठेवण्यात यशस्वी होतो. मध्यंतरानंतर मात्र चित्रपटाचा वेग काहीसा मंदावतो. कथानक आपल्याला अपेक्षित असलेल्या वळणांनीच पुढे जात राहते, मात्र पुर्वार्धातल्या वेगाने नाही, तर काहीसे रेंगाळत. चांगले संकलन करून चित्रपटाची लांबी कमी केली असती, तर त्याचा एकंदर ’इफेक्ट’ वाढला असता असे वाटते.
सिनेमात दगडू आणि प्राजक्ता या भूमिका प्रथमेश आणि केतकीच्या अनुक्रमे ’बालक-पालक’ आणि ’शाळा’ या चित्रपटातल्या भूमिकांचेच extension आहे, असे मला वाटले. या दोन्ही कलाकारांनी चांगला अभिनय केला आहे, आणि आपापल्या भूमिकांना न्याय दिला आहे. विशेषत: मध्यमवर्गीय घरातली सज्जन, पापभीरू आईवडिलांना घाबरणारी मुलगी केतकी माटेगावकरने सुरेख रंगवली आहे. या अभिनेत्रीकडून भविष्यात भरपूर अपेक्षा आहेत ! प्राजक्ताच्या पालकांच्या भूमिकेत वैभव मांगले आणि मेघना एरण्डे यांनी चांगले काम केले आहे. विशेषत: वैभव मांगलेची भूमिका मुलीचा टकला बाप- अशी काहीशी कॅरीकेचर स्वरूपाची असली, तरी त्याला दिग्दर्शकाने खलनायकी छटा येऊ दिलेली नाही, हे मला विशेष आवडले. खरं तर या चित्रपटात खलनायक असा कोणी नाहीच. प्रत्येक जण- काहीसे तर्‍हेवाईकपणाने वागत असले, तरी आपापल्या जागी योग्य आहेत असेच वाटत राहते. प्राजक्ताला गायन शिकवणारी स्पृहा आणि प्राजक्ताचा भाऊ यांचे उपकथानक हे तसे अनावश्यक असले, तरी त्यामुळे एकंदर चित्रपटाच्या ’फ्लो’ मध्ये कोणताही व्यत्यय येत नाही.
चित्रपटाचे कथानक कोणत्या काळात घडते, ते स्पष्टपणे सांगीतलेले नसले, तरी जागोजागी काही क्लू दिलेले आहेत. दगडू आणि कंपनीने प्राकक्ताच्या वडिलांना ’शाकाल’ म्हणणे, एका दृष्यात ’दयावान’ सिनेमाची जाहिरात इ. वरून हे ऐंशीच्या दशकातले कथानक आहे, हे सहज लक्षात येते.
चित्रपटातली संगीताची बाजू भक्कम आहे. सर्व गाणी श्रवणीय आहेत. विशेषत: ’मला वेड लागले... प्रेमाचे’, काहीसे भडकरित्या चित्रित केलेले आगरी गाणे- ’ही प्पोरी साजुक तुपातली’ आणि ’फुलपाखरू’ ही गाणी चांगली आहेत.

एकंदर चित्रपट सर्व आघाड्यांवर समाधानकारक असला, तरी खूप उत्कृष्ट, अद्वितीय असे त्यात काही नाही. एकदा पहायला हरकत नाही, पाहिला नाही तरी फारसे बिघडत नाही, असा.

माझ्याकडून (पाचपैकी) तीन स्टार्स.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बहुतेक कोकणातले अब्राह्मण लोक ळ ला ल म्हणतात >> हो. आगरी, कोळी, भंडारी या समाजात शिवाय काही मुस्लिमांच्यात देखील ळ ऐवजी ल म्हणतात.

आगरी समाजामध्ये तर ड चा पण र होतो. मी रडूआलागलो ऐवजी ते "मी लरू लागलो" म्हणतात

प्रत्येक बोलीभाषेची एक खासियत असते, तसंच हेपण.

(मराठी भाषा दिवसाचा असा एक मराठी बोलीभाषांचा उपक्रम केला होता. त्यामध्ये असे अनेक वेगवेगळे भास्।एचे प्रयोग बघायला मिळाले होते.

प्रत्येक बोलीभाषेची एक खासियत असते>>>>>>>>> ओह. बोलीभाषा आणि तिची खासियत असं काही असतं??? सरळ सरळ अशुद्ध आणि चुकीचं मराठी आहे हे असं म्हणावं झालं.

>>बोलीभाषा आणि तिची खासियत असं काही असतं??? सरळ सरळ अशुद्ध आणि चुकीचं मराठी आहे हे असं म्हणावं झालं

छे याला अशुद्ध आणि चुकीचे असे नाही म्हणता येणार.

अब्राह्मण अशासाठी म्हणले की कोकणस्थ ब्राह्मणांकडून कधी असा उच्चार ऐकल्याचे आठवत नाही म्हणुन, पण याचा अर्थ हे शुद्ध किंवा ते अशुद्ध असे नाही.

असो यावर खुप मोठा वाद चालू होण्याचे टाळावे हि (किंवा ही ?) विनंती.

@रिया : दादा ? दादागिरी केली म्हणुन का ? Lol

अब्राह्मण अशासाठी म्हणले की कोकणस्थ ब्राह्मणांकडून कधी असा उच्चार ऐकल्याचे आठवत नाही म्हणुन, पण याचा अर्थ हे शुद्ध किंवा ते अशुद्ध असे नाही.<<< त्या वाक्यामधे अब्राह्मण शब्दाऐवजी ब्राह्मणेतर असा शब्द वापरायला हवा होता.

कोकणस्थांची एक खास चित्पावनी अशी बोली असते, ती ऐकली तरी बरेच शुद्धवाले बेशुद्ध होतील.

बहुतेक कोकणातले अब्राह्मण लोक ळ ला ल म्हणतात >> हो. आगरी, कोळी, भंडारी या समाजात शिवाय काही मुस्लिमांच्यात देखील ळ ऐवजी ल म्हणतात.

>>>>>>>>

हो म्हणतात खरे, तसेच हे शुद्ध अशुद्ध या वादातही पडायचे नाही, पण असे बोलणार्‍यांना सरसकट अब्राह्मण हा शब्द वापरल्याने कोकणात ब्राह्मण किती, ळ ला ल बोलणारे किती, अन जे ब्राह्मणही नाहीत आणि ळ ला ल हि बोलत नाहीत असे किती याची टक्केवारी जाणून घ्यायची उत्सुकता लागलीय.

अवांतर - जे लोक ळ ला ल बोलतात ते ल ला काय बोलतात?

हो नंदिनी कोकणस्थांची चित्पावनी बोली आहे हे हल्ली काही वर्षेच मला माहिती झालेय, गोव्याकडच्या बऱ्याच चित्पावनांना ती येते, ती खूप वेगळीच आहे, बऱ्याच पिढ्यांपूर्वी ती बोलत असावेत बहुतेक, पण बहुतेकांना ती नाही माहिती, साधारण गोवा किंवा कारवर कोकणीशी जवळ जाणारी मला वाटली.

जे लोक ळ ला ल बोलतात ते ल ला काय बोलतात?>>>>

"ल" म्हणतात.

रच्याकने, ती मराठी भाषा दिवसाच्या उपक्रमाची लिंक मिळत नाहीये.

हा सिनेमा न आवडण्याची कारण म्हणजे पाहिलं तर त्यात ब्राम्हणांची उडवलेली थट्टा आणि लहान वयात अभ्यास सोडून प्रेम-बिम करत बसण. दोन्ही चुकीचंय....!!!

अश्या सिनेमांनी लहानपणीच मनावर बिंबवल जातंय कि जीवनात अभ्यास, चरित्र, विवेक, करियर, घरच्या मोठ्यांचा आदर हे महत्वाचं नाही, तर प्रेम करण (गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड असण) महत्वाच आहे आणि असच वागायचं असत. आणि हे संपूर्ण समाजाला घातक आहे.

मधुरा अगदी अचुक वर्णन !
दृकश्राव्य हे फार मोठे प्रभावी माध्यम आहे, त्यामधे दाखवल्या जाणार्‍या गोष्टींचे अनुकरण फार मोठ्या प्रमाणावर केले जाते (उदा. एक दुजे के लिये चित्रपटानंतर झालेल्या आत्महत्या, इ.)
गेले अनेक वर्षांपासुन चित्रपटांमधे चांगल्या गोष्टींना कमी महत्व आणि वाईट गोष्टींना जास्त महत्व आलेले आहे. Sad

अश्या सिनेमांनी लहानपणीच मनावर बिंबवल जातंय कि जीवनात अभ्यास, चरित्र, विवेक, करियर, घरच्या मोठ्यांचा आदर हे महत्वाचं नाही, तर प्रेम करण (गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड असण) महत्वाच आहे आणि असच वागायचं असत. आणि हे संपूर्ण समाजाला घातक आहे.<<<< दुनियादारीमध्य असं अज्जिइब्ब्बाअत दाखवलं नव्हतं की नाही, मधुरा???? Proud

मधुराताई,

तुमची वरची पोस्ट वाचुन Rofl

दुनियादारीमध्ये कसे लोक कोलेजात जाऊन हाणामारी करतात, मित्राला "टाईमपास" म्हणून मुलीला पटवायला लावतात, दारु-शिग्रेट पितात, मुलगीदेखील सिग्रेट ओढते, कॉलेजमध्ये गुरुजनांचा आदर करतात, लग्नातून मुलीला पळवतात अशी अनेक सामाजिक मुल्ये दाखवणारी दृश्ये आहेत, तशी या चित्रपटातदेखील असायला हवी होती ना!

लहान वयात अभ्यास सोडून प्रेम-बिम करत बसण>>
हे ही बरोबरच! दुनियादारीत सगले कॉलेजवयीन आहेत(जरी त्यातील एकही तसा वाटत नाही Happy ), तरीही करियर, रोजगार, उच्च शिक्षण आदि भानगडींमध्ये न पडता कस्से मस्तपणे पोरगी पटवणे, राडेबाजी इत्यादी दुनियादारीचे धडे गिरवत असतात.

मला अजुन एकदा हा पिक्चर बघायला हवा, श्रेयनामावलीत कुठे बिग्रेड वगैरेचा उल्लेख तर केला नाही ना? :खिखि:

रच्याकने, टीपी पण झी चीच निर्मिती आहे ना?

राहुल, सुन्तुन्या , नंदिन,

दुनियादारीतहि हे होतंच....मी कुठे नाही म्हणतीये? पण कमीतकमी ते कॉलेज मध्ये तरी होते न....आणि त्यात मिनुला झालेला त्या प्रेम प्रकरणाचा त्रासही त्यात दाखवलेला आहे.

टाईमपास मधल्या दगडू आणि प्राजक्ताच वय पाहिलंत का??? ते दोघे १८+ पण नव्हते. आणि दुनियादारीत प्रकर्षाने दोस्ती दाखवली होती आणि टाईमपास मध्ये लहानवयातलं प्रेम.

खरय महेश दादा.....

गेले अनेक वर्षांपासुन चित्रपटांमधे चांगल्या गोष्टींना कमी महत्व आणि वाईट गोष्टींना जास्त महत्व आलेले आहे.>>>>>+११११११११

अश्या सिनेमांनी लहानपणीच मनावर बिंबवल जातंय कि जीवनात अभ्यास, चरित्र, विवेक, करियर, घरच्या मोठ्यांचा आदर हे महत्वाचं नाही, तर प्रेम करण (गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड असण) महत्वाच आहे आणि असच वागायचं असत. आणि हे संपूर्ण समाजाला घातक आहे. >>
वरवर पाहता , तुमच लॉजिक बरोबर आहे . पण हाच न्याय लावायचा झाला तर आधी सगळ्या मराठी/हिंदी सिरीयल बंद करायला लागतील . आणी बाजीगर , डर , अंजाम यांनाही टीव्ही वर दाखवायला बंदी केली पाहिजे.

टापा आणि दुदा दोन्ही वास्तववादी चित्रपट आहेत, जे समाजात घडतेय तेच दाखवलेय. फरक कुठे पडतो तर ज्याच्यात्याच्यासाठी समाज म्हणजे जे त्यांच्या आजूबाजुला घडते, कानावर पडते, नजरेस दिसते. म्हणून प्रत्येकाने अनुभवलेला समाज वेगळा असू शकतो.

तळटीप - वरील मुद्दा फक्त प्रेमबिम यारीदोस्ती अन भाईगिरी संदर्भात आहे.

पण हाच न्याय लावायचा झाला तर आधी सगळ्या मराठी/हिंदी सिरीयल बंद करायला लागतील . आणी बाजीगर , डर , अंजाम यांनाही टीव्ही वर दाखवायला बंदी केली पाहिजे.
==> अगदी बरोबर

>>जे समाजात घडतेय तेच दाखवलेय
==> काही गरज नाहीये प्रत्येक घडणारी गोष्ट दाखवायची. आधीच घडते तर आहे, मग असे दाखवून अजुन घडायला पाहिजे का ? फक्त या चित्रपटाबद्दल नाही तर जनरल म्हणत आहे.

>जे समाजात घडतेय तेच दाखवलेय>>>

शिनमा वाल म्हणत्यात जे समाजात घडत ते दाखिवतो आणि समाज म्हणतो तरुण पिढी सिनेमा/ शिरेली पाहून बिघडते. हे दुष्टचक्र आहे. Sad
बाकी पिक्चर आवडला पण काही गोष्टी खटकल्या.

अभिषेक,

>> जे समाजात घडतेय तेच दाखवलेय

समाजात इतर चांगल्या गोष्टी बऱ्याच असतात. त्या कधी पडद्यावर प्रकर्षाने येत नाहीत.

आ.न.,
-गा.पै.

Pages