टीनएज प्रेमाची गोष्ट : टाईमपास (टीपी)

Submitted by ज्ञानेश on 5 January, 2014 - 05:15

मराठी सिनेमाची सुधारलेली वितरण व्यवस्था आणि मल्टिप्लेक्स यांच्या कृपेने जळगावसारख्या छोट्या शहरांत मराठी चित्रपट प्रदर्शित होऊ लागले आहेत. त्यामुळे रवी जाधवांचा ’टाईमपास’ फर्स्ट डे ला पाहता आला. त्याचीच ही थोडक्यात ओळख-

चित्रपटाचे नाव- टाईमपास
निर्माते- नितीन केणी, निखिल साने, मेघना जाधव
कथा / दिग्दर्शक- रवी जाधव
प्रमुख भूमिका- प्रथमेश परब, केतकी माटेगावकर, वैभव मांगले, भाऊ कदम, मेघना एरण्डे इत्यादि
संगीत- चिनार-महेश

timepass-movie-dailogue.jpg

’पौगंडावस्थेतील प्रेमभावना’ हा अनुभव सार्वत्रिक असला, तरी त्याला आपल्या मराठी कलाविश्वात फारसे स्थान दिले गेलेले आढळत नाही. या विषयाला पहिल्यांदा न्याय दिला, तो मिलिंद बोकील यांच्या ’शाळा’ या कादंबरीने. याच कादंबरीवर पुढे या नावाचा सिनेमाही आला.
रवी जाधव या गुणी दिग्दर्शकाचा हा चौथा सिनेमा. या आधी नटरंग, बालगंधर्व आणि बालक-पालक या चित्रपटांतून त्याने आपले मेरीट सिद्ध केलेले असल्यामुळे ’टाईमपास’ सिनेमाकडून अपेक्षा वाढलेल्या होत्या. त्या अपेक्षांची काही प्रमाणात पूर्ती ’टाईमपास’ करतो.

ही कथा आहे दगडू शांताराम परब (प्रथमेश) आणि प्राजक्ता मनोहर लेले (केतकी) यांची. दगडू हा एक उडाणटप्पू , दहावीत वारंवार नापास होणारा आणि दिवसभर त्याच्या मित्रांसोबत टवाळक्या करणारा मुलगा आहे. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्याचे वडील रिक्षा चालवतात, आणि कर्ज काढून आपल्या मुलाला शिकवू पाहत असतात. दगडू पुन्हा नापास झाल्याने ते चिडून त्याला मारहाण करतात, आणि दगडू नाईलाजाने पेपर टाकण्याचे काम करायला सुरूवात करतो.
दगडूचे मित्रमंडळ- बालभारती, कोंबडा आणि मलेरिया अशी टोपणनावे असणारे टोळके पास होऊन कॉलेजात जाते. ते दगडूला फूस लावून प्राजक्ता नामक वर्गातल्या गुणी, सालस, हुशार मुलीला ’टाईमपास’ म्हणून पटवायची फूस लावतात. दगडू तसे करायचे ठरवतो.
दगडू आणि प्राजक्ता यांची ही ’टाईमपास’ म्हणून सुरू झालेली प्रेमकथा पुढे काय वळणे घेते, ते पडद्यावर पाहणेच योग्य ठरावे.

दगडूची प्राजक्तापर्यंत पोहोचण्याची धडपड, त्याला आलेल्या अडचणी, त्यातून निर्माण होणारे विनोद, सुश्राव्य गाणी आणि मजेदार संवाद- यामुळे चित्रपट मध्यंतरापर्यंत आपल्याला गुंतवून ठेवण्यात यशस्वी होतो. मध्यंतरानंतर मात्र चित्रपटाचा वेग काहीसा मंदावतो. कथानक आपल्याला अपेक्षित असलेल्या वळणांनीच पुढे जात राहते, मात्र पुर्वार्धातल्या वेगाने नाही, तर काहीसे रेंगाळत. चांगले संकलन करून चित्रपटाची लांबी कमी केली असती, तर त्याचा एकंदर ’इफेक्ट’ वाढला असता असे वाटते.
सिनेमात दगडू आणि प्राजक्ता या भूमिका प्रथमेश आणि केतकीच्या अनुक्रमे ’बालक-पालक’ आणि ’शाळा’ या चित्रपटातल्या भूमिकांचेच extension आहे, असे मला वाटले. या दोन्ही कलाकारांनी चांगला अभिनय केला आहे, आणि आपापल्या भूमिकांना न्याय दिला आहे. विशेषत: मध्यमवर्गीय घरातली सज्जन, पापभीरू आईवडिलांना घाबरणारी मुलगी केतकी माटेगावकरने सुरेख रंगवली आहे. या अभिनेत्रीकडून भविष्यात भरपूर अपेक्षा आहेत ! प्राजक्ताच्या पालकांच्या भूमिकेत वैभव मांगले आणि मेघना एरण्डे यांनी चांगले काम केले आहे. विशेषत: वैभव मांगलेची भूमिका मुलीचा टकला बाप- अशी काहीशी कॅरीकेचर स्वरूपाची असली, तरी त्याला दिग्दर्शकाने खलनायकी छटा येऊ दिलेली नाही, हे मला विशेष आवडले. खरं तर या चित्रपटात खलनायक असा कोणी नाहीच. प्रत्येक जण- काहीसे तर्‍हेवाईकपणाने वागत असले, तरी आपापल्या जागी योग्य आहेत असेच वाटत राहते. प्राजक्ताला गायन शिकवणारी स्पृहा आणि प्राजक्ताचा भाऊ यांचे उपकथानक हे तसे अनावश्यक असले, तरी त्यामुळे एकंदर चित्रपटाच्या ’फ्लो’ मध्ये कोणताही व्यत्यय येत नाही.
चित्रपटाचे कथानक कोणत्या काळात घडते, ते स्पष्टपणे सांगीतलेले नसले, तरी जागोजागी काही क्लू दिलेले आहेत. दगडू आणि कंपनीने प्राकक्ताच्या वडिलांना ’शाकाल’ म्हणणे, एका दृष्यात ’दयावान’ सिनेमाची जाहिरात इ. वरून हे ऐंशीच्या दशकातले कथानक आहे, हे सहज लक्षात येते.
चित्रपटातली संगीताची बाजू भक्कम आहे. सर्व गाणी श्रवणीय आहेत. विशेषत: ’मला वेड लागले... प्रेमाचे’, काहीसे भडकरित्या चित्रित केलेले आगरी गाणे- ’ही प्पोरी साजुक तुपातली’ आणि ’फुलपाखरू’ ही गाणी चांगली आहेत.

एकंदर चित्रपट सर्व आघाड्यांवर समाधानकारक असला, तरी खूप उत्कृष्ट, अद्वितीय असे त्यात काही नाही. एकदा पहायला हरकत नाही, पाहिला नाही तरी फारसे बिघडत नाही, असा.

माझ्याकडून (पाचपैकी) तीन स्टार्स.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आबासाहेब, मी चांगले संस्कार व्हायला हवेत हे बघितले पाहिजे असे म्हणालो नसून त्यातून चुकीचे संस्कार झाले नाही पाहिजेत, वा चुकीचा संदेश गेला नाही पाहिजे असे म्हणालोय. या दोहोंत फरक आहे आणि मला वाटते हे सहजशक्य आहे. किंबहुना यात नफ्यातोट्याचा भाग नसून हे कथानक अन त्याच्या सादरीकरणाशी निगडीत आहे.

तसेच माझ्या आधीच्या पोस्ट पाहता मी टाईमपासमध्ये मला काही गैर वाटले नाही असेच लिहिले आहे. त्याचा एकंदरीत शेवट आणि चित्रपट संपताना मनावर सोडून जाणारा परीणाम पाहता अश्या प्रकारच्या प्रेमप्रकरणांचे समर्थन किंवा उदात्तीकरण त्यात केले गेले नाही असेच वाटते. - जे माझे वैयक्तिक मत आहे.

उदाहरण द्यायचे झाल्यास, गुन्हेगारी जगतावरच्या चित्रपटातही त्या जगातील काळी बाजूच उघड करून दाखवली जाते, जे खरे तर चांगलेच असते की, अन्यथा आज कितीतरी युवा बाह्य चमक धमक बघून त्यात शिरतात, अश्यांना उलट ते चित्रपट चांगलेच मार्गदर्शन करतात की इथे भले तुम्ही भुलून भरकटून आत शिराल पण आत मात्र फसाल.. मग अश्या चित्रपटाला गुन्हेगारी जगतावर चित्रपट बनवला म्हणून नाव ठेवणे योग्य आहे का?

त्यातून चुकीचे संस्कार झाले नाही पाहिजेत

>> कोणते संस्कार चांगले आणि कोणते वाईट हेही व्यक्तीपरत्वे वेगवेगळे असते. तुम्हाला जे "चांगले संस्कार" वाटतात ते इतरांना वाटावेच असं नाही.

मात्र मनोरंजनात्मक चित्रपटातून चुकीचे संस्कार होऊ नयेत याची काळजी मात्र घ्यायला हवी.>>>> प्रचंड अनुमोदन

@महेश : +१११११११.......

खरंच यावर आपण डोकी फोडून उपयोग नाही. कारण असे सिनेमे बनणार आणि सगळे पाहणार, जे शिकायचं त्यातून ते शिकणार.......आणि कसय, मेजॉरिटी विन्स......मग ती चुकीची असली तरही!!!

दुसर्याने कसे चित्र्पट बनवावेत हे सांगायला आपल्याला काहीएक अधिकार नाही. (आपण जर त्या चित्रपटाचे फायनान्सर नसू तर)

चित्रपट हे माध्यम यायच्या आधीपासून समाजामध्ये दिसत असलेले तथाकथित "वाईट संस्कार" होतेच ते काय नव्याने उगवलेले नाहीत. गुन्हेगारी, हिंसा, प्रेमप्रकरणे ही सर्व आधी होतीच.

चित्रपट अथवा एकंदरीतच मास मीडीयाचा बेसिक रूलः जे कंटेंट आपल्याला समजत नाही, आवडत नाही, पटत नाही ते कंटेंट आपल्यासाठी बनलेले नाही.

नंदिनी,

"चित्रपट अथवा एकंदरीतच मास मीडीयाचा बेसिक रूलः जे कंटेंट आपल्याला समजत नाही, आवडत नाही, पटत नाही ते कंटेंट आपल्यासाठी बनलेले नाही." - मान्य!

"दुसर्याने कसे चित्र्पट बनवावेत हे सांगायला आपल्याला काहीएक अधिकार नाही. (आपण जर त्या चित्रपटाचे फायनान्सर नसू तर)" - फारसं नाही पटलं. अर्थात पहिला मुद्दा मान्य केल्यामुळे ह्या 'नाही पटलं' ला काही अर्थ नाही. Happy

जर चित्रपट निर्माते (सगळी टीम), स्वांतःसुखाय चित्रपट बनवणार असतील आणि बनवलेले चित्रपट 'प्रायव्हेट सर्क्युलेशन ओन्ली' ह्या न्यायाने बघणार असतील, तर त्यांनी काय बनवावे ह्या विषयावर मतप्रदर्शनाचा अधिकार कुणालाच नाही हे मान्य. पण जर चित्रपट निर्माण हे प्रेक्षकांसाठी होत असेल, तर त्या व्यवसायाचा एण्ड यूजर म्हणून (ग्राहक / कस्टमर काहिही म्हणा) काय अपेक्षित आहे हे सांगण्याचा अधिकार प्रेक्षकांना आहे / असावा असं मला वाटतं.

नंदिनी,

>> जे कंटेंट आपल्याला समजत नाही, आवडत नाही, पटत नाही ते कंटेंट आपल्यासाठी बनलेले नाही.

चित्रपट पाहून अपहरण व खून करणाऱ्यांबद्दल आपले काय मत आहे? अश्या चित्रपटाचा आशय मला समजत नाही, आवडत नाही, पटत नाही. तो माझ्यासाठी नाही. मग मी काय करावे?

आ.न.,
-गा.पै.

आणि कसय, मेजॉरिटी विन्स......मग ती चुकीची असली तरही!!!>>>>>>>>... मला १०० टक्के पटलय मधुरे....खरच....अगदी हल्लीच येउन गेलेल्या मराठी मुव्हीच ही असच....

पण जर चित्रपट निर्माण हे प्रेक्षकांसाठी होत असेल, तर त्या व्यवसायाचा एण्ड यूजर म्हणून (ग्राहक / कस्टमर काहिही म्हणा) काय अपेक्षित आहे हे सांगण्याचा अधिकार प्रेक्षकांना आहे / असावा असं मला वाटतं.>> पाहू नका असे चित्रपट. निर्माते काय तुम्हाला उचलून नेऊन थेटरात जबरदस्तीने बसवत नाहीत. रिमोट कंट्रोल तुमच्या हातात असतो. बघायचे की नाही हा निर्णय प्रेक्षकाचा आहे, काय बनवायचे आणि कसे बनवायचे हा निर्णय निर्माते दिग्दर्शकाचा.

जर तुमची आवड शिप ऑफ थीसीयस बघायची आहे, तर तुम्ही तो चित्रपट पहा, पण दुसर्‍या निर्मात्याने "जंगली जवानी" वगैरे पिक्चर बनवूच नये हे सांगणारे तुम्ही कोण? हेच उदाहरण उलटं देखील करून घ्या.

चित्रपट पाहून अपहरण व खून करणाऱ्यांबद्दल आपले काय मत आहे? अश्या चित्रपटाचा आशय मला समजत नाही, आवडत नाही, पटत नाही. तो माझ्यासाठी नाही. मग मी काय करावे?>>> चित्रपट पाहू नका. कित्येक खून आणि अपहरणे अनेक गुन्हे चित्रपट न पाहताही होतात.

अर्जुनाने सुभद्रेला पळवले ते काय डीडीएलजे बघून??

अरे चित्रपटात लेलेंवर टिका कुठे दिसली?
उलट मलाच मि लेले त्या दगडुचा विनाकारण अपमान करत असतात हे पटत नव्हतं.
(म्हणजे ते कॅरेक्तर उगाच असे करेल असं पटत नव्हतं.)

अरे चित्रपटात लेलेंवर टिका कुठे दिसली?
>>>>> झकास, यावर अगोदरच वाद झालेत आणि बहुतेक दोन्ही बाजुंनी तलवारी म्यान पण केल्यात. आधीच्या पोस्ट वाचल्या असतील तर कळेल. Happy

नंदिनीच्या संपुर्ण पोस्टला प्रचंड अनुमोदन >>>>
पण जर चित्रपट निर्माण हे प्रेक्षकांसाठी होत असेल, तर त्या व्यवसायाचा एण्ड यूजर म्हणून (ग्राहक / कस्टमर काहिही म्हणा) काय अपेक्षित आहे हे सांगण्याचा अधिकार प्रेक्षकांना आहे / असावा असं मला वाटतं.>> पाहू नका असे चित्रपट. निर्माते काय तुम्हाला उचलून नेऊन थेटरात जबरदस्तीने बसवत नाहीत. रिमोट कंट्रोल तुमच्या हातात असतो. बघायचे की नाही हा निर्णय प्रेक्षकाचा आहे, काय बनवायचे आणि कसे बनवायचे हा निर्णय निर्माते दिग्दर्शकाचा.

जर तुमची आवड शिप ऑफ थीसीयस बघायची आहे, तर तुम्ही तो चित्रपट पहा, पण दुसर्‍या निर्मात्याने "जंगली जवानी" वगैरे पिक्चर बनवूच नये हे सांगणारे तुम्ही कोण? हेच उदाहरण उलटं देखील करून घ्या.

चित्रपट पाहून अपहरण व खून करणाऱ्यांबद्दल आपले काय मत आहे? अश्या चित्रपटाचा आशय मला समजत नाही, आवडत नाही, पटत नाही. तो माझ्यासाठी नाही. मग मी काय करावे?>>> चित्रपट पाहू नका. कित्येक खून आणि अपहरणे अनेक गुन्हे चित्रपट न पाहताही होतात.

अर्जुनाने सुभद्रेला पळवले ते काय डीडीएलजे बघून??

नंदिनी,

>> चित्रपट पाहू नका. कित्येक खून आणि अपहरणे अनेक गुन्हे चित्रपट न पाहताही होतात.

हे तर आपण अगोदरही सांगितलं होतं.

एकंदरीत या समस्या घरात येण्याच्या अगोदर मला प्रतिबंधक उपाय करायला हवेत. माझ्या घरच्यांचं अपहरण होईपर्यंत मला वाट बघायची नाहीये. मी वेगळा विचार करून बघेन. तुमच्या उत्तराबद्दल धन्यवाद.

आ.न.,
-गा.पै.

विनाकारण?>>> चाळीत राहणारा माणुस आमच्या दाराची कडी तुझ्याकडुन वाजली म्हणुन इतका अपमान करेल हे पटत नाही. ते कॅरेक्टर गन्डलय.

मी एक उदाहरण म्हणून सांगू, मी खूप लहान होते, तेव्हा शक्तिमान नावाची एक मालिका खूप प्रसिद्ध होती....त्या शक्तिमान पात्राला पाहून अनेक मुल हात वर करून स्वतः भोवती गोलगोल फिरायचे, उंचावरून उडी मारून त्याच्यासारखं उडण्याचा प्रयत्न करायचे. त्यात ती मुल गंभीर जखमी झाली. मग मालिकेत शक्तिमान(च पात्र निभावणारा मुकेश खन्ना) मालिकेच्या शेवटी संदेश द्यायचा कि मी करतो, ते तुम्ही करू नका....

मग आता विचार करा, कि शक्तिमान मालिकेचा काय दाखवण्याचा उद्देश होता, आणि काय बघितलं गेलं...

शक्तिमान मालिकेचा काय दाखवण्याचा उद्देश होता, आणि काय बघितलं गेलं...>>> ह्यावरुन आठवलं.
लोकसत्ता मध्ये सई परांजपे लेखमाला लिहित आहेत.
दुरदर्शनच्या बालविभागाच्या प्रमुख असताना दोन नाटकं सुरु केले होते.
त्याविषयीची गमंत मुळ लेख वाचा. रविवारच्या पुरवणीत.

नंदिनी,
"पाहू नका असे चित्रपट. निर्माते काय तुम्हाला उचलून नेऊन थेटरात जबरदस्तीने बसवत नाहीत. रिमोट कंट्रोल तुमच्या हातात असतो. बघायचे की नाही हा निर्णय प्रेक्षकाचा आहे, काय बनवायचे आणि कसे बनवायचे हा निर्णय निर्माते दिग्दर्शकाचा."

हे सगळं मान्य केलेलंच आहे. मुद्दा ईतकाच आहे, की प्रेक्षकांसाठी बनलेल्या ह्या 'प्रॉडक्ट' वर प्रेक्षकांनी अभिप्राय दिला, तर त्यात गैर काय काय? चित्रपट बनवणार्यांना देखिल ह्यात काही आक्षेप नसावा. एकदा दुकान उघडल्यावर आतल्या मालावर चांगले / वाईट, असे दोन्ही अभिप्राय येणारच. चांगले तेव्हढे ठीक, वाईट अभिप्राय देणार्यांना मात्र तो अधिकार नाही, असं कसं म्हणता येईल? ह्यात जसं चित्रपट बनवणार्यांना जे हवं ते बनवायचा अधिकार आहे, सेन्सॉर बोर्डाला काय पास करायचं / काय नाही ह्याचा अधिकार आहे, तसाच प्रेक्षकांना काय आवडलं / पटलं आणि काय नाही हे सांगायचा पण अधिकार आहे. बघणारे बरेच असतात. काही प्रेक्षक त्याच्याशी कनेक्ट होऊ शकतात, काही नाही. कनेक्ट होणारे प्रेक्षक सुद्धा किती, कुठल्या पातळीवर, कसे कनेक्ट होतील हे सांगता येत नाही आणि टीका करणारा कदाचित कनेक्ट झाल्यामुळेच (एका वेगळ्या अँगल ने असेल कदाचित) टीका करत असेल. प्रेक्षकांचा अभिप्राय / प्रतिक्रीया देण्याच्या अधिकाराला नाकारून कसं चालेल? बरं, चित्रपट बघितल्याशिवाय आवडला / नाही आवडला हे कसं ठरवणार?

फ़ेरफ़टका,

मी (चांगला वाईट कसाही) अभिप्राय द्या अथवा देऊ नका वर बोललेलेच नाही. ज्या वाक्यावर मी कमेंट लिहिली ते मूळ वाक्य "असे चित्रपट बनवत जाऊ नका" असे होते.

दुसर्याने कसे चित्र्पट बनवावेत हे सांगायला आपल्याला काहीएक अधिकार नाही. >>> का नाही? 'कसे चित्रपट बनवावेत हे मत' ही मत असणार्‍याची अभिव्यक्ती आहे. ते ह्या फोरमच्या चौकटीत राहून प्रदर्शित करणे हा त्याचा अधिकार आहे, जसा चित्रपट बनवणे हा बनवणार्‍याचा. कसे चित्रपट बनवावेत हे मत असणार्‍याने त्याप्रमाणे नसलेले चित्रपट बंद पाडणे हे चुकीचे, तसेच दुसर्‍याने कसे चित्रपट बनवावेत हे सांगायचा अधिकार नाही हे म्हणणे चुकीचे.

Pages