टीनएज प्रेमाची गोष्ट : टाईमपास (टीपी)

Submitted by ज्ञानेश on 5 January, 2014 - 05:15

मराठी सिनेमाची सुधारलेली वितरण व्यवस्था आणि मल्टिप्लेक्स यांच्या कृपेने जळगावसारख्या छोट्या शहरांत मराठी चित्रपट प्रदर्शित होऊ लागले आहेत. त्यामुळे रवी जाधवांचा ’टाईमपास’ फर्स्ट डे ला पाहता आला. त्याचीच ही थोडक्यात ओळख-

चित्रपटाचे नाव- टाईमपास
निर्माते- नितीन केणी, निखिल साने, मेघना जाधव
कथा / दिग्दर्शक- रवी जाधव
प्रमुख भूमिका- प्रथमेश परब, केतकी माटेगावकर, वैभव मांगले, भाऊ कदम, मेघना एरण्डे इत्यादि
संगीत- चिनार-महेश

timepass-movie-dailogue.jpg

’पौगंडावस्थेतील प्रेमभावना’ हा अनुभव सार्वत्रिक असला, तरी त्याला आपल्या मराठी कलाविश्वात फारसे स्थान दिले गेलेले आढळत नाही. या विषयाला पहिल्यांदा न्याय दिला, तो मिलिंद बोकील यांच्या ’शाळा’ या कादंबरीने. याच कादंबरीवर पुढे या नावाचा सिनेमाही आला.
रवी जाधव या गुणी दिग्दर्शकाचा हा चौथा सिनेमा. या आधी नटरंग, बालगंधर्व आणि बालक-पालक या चित्रपटांतून त्याने आपले मेरीट सिद्ध केलेले असल्यामुळे ’टाईमपास’ सिनेमाकडून अपेक्षा वाढलेल्या होत्या. त्या अपेक्षांची काही प्रमाणात पूर्ती ’टाईमपास’ करतो.

ही कथा आहे दगडू शांताराम परब (प्रथमेश) आणि प्राजक्ता मनोहर लेले (केतकी) यांची. दगडू हा एक उडाणटप्पू , दहावीत वारंवार नापास होणारा आणि दिवसभर त्याच्या मित्रांसोबत टवाळक्या करणारा मुलगा आहे. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्याचे वडील रिक्षा चालवतात, आणि कर्ज काढून आपल्या मुलाला शिकवू पाहत असतात. दगडू पुन्हा नापास झाल्याने ते चिडून त्याला मारहाण करतात, आणि दगडू नाईलाजाने पेपर टाकण्याचे काम करायला सुरूवात करतो.
दगडूचे मित्रमंडळ- बालभारती, कोंबडा आणि मलेरिया अशी टोपणनावे असणारे टोळके पास होऊन कॉलेजात जाते. ते दगडूला फूस लावून प्राजक्ता नामक वर्गातल्या गुणी, सालस, हुशार मुलीला ’टाईमपास’ म्हणून पटवायची फूस लावतात. दगडू तसे करायचे ठरवतो.
दगडू आणि प्राजक्ता यांची ही ’टाईमपास’ म्हणून सुरू झालेली प्रेमकथा पुढे काय वळणे घेते, ते पडद्यावर पाहणेच योग्य ठरावे.

दगडूची प्राजक्तापर्यंत पोहोचण्याची धडपड, त्याला आलेल्या अडचणी, त्यातून निर्माण होणारे विनोद, सुश्राव्य गाणी आणि मजेदार संवाद- यामुळे चित्रपट मध्यंतरापर्यंत आपल्याला गुंतवून ठेवण्यात यशस्वी होतो. मध्यंतरानंतर मात्र चित्रपटाचा वेग काहीसा मंदावतो. कथानक आपल्याला अपेक्षित असलेल्या वळणांनीच पुढे जात राहते, मात्र पुर्वार्धातल्या वेगाने नाही, तर काहीसे रेंगाळत. चांगले संकलन करून चित्रपटाची लांबी कमी केली असती, तर त्याचा एकंदर ’इफेक्ट’ वाढला असता असे वाटते.
सिनेमात दगडू आणि प्राजक्ता या भूमिका प्रथमेश आणि केतकीच्या अनुक्रमे ’बालक-पालक’ आणि ’शाळा’ या चित्रपटातल्या भूमिकांचेच extension आहे, असे मला वाटले. या दोन्ही कलाकारांनी चांगला अभिनय केला आहे, आणि आपापल्या भूमिकांना न्याय दिला आहे. विशेषत: मध्यमवर्गीय घरातली सज्जन, पापभीरू आईवडिलांना घाबरणारी मुलगी केतकी माटेगावकरने सुरेख रंगवली आहे. या अभिनेत्रीकडून भविष्यात भरपूर अपेक्षा आहेत ! प्राजक्ताच्या पालकांच्या भूमिकेत वैभव मांगले आणि मेघना एरण्डे यांनी चांगले काम केले आहे. विशेषत: वैभव मांगलेची भूमिका मुलीचा टकला बाप- अशी काहीशी कॅरीकेचर स्वरूपाची असली, तरी त्याला दिग्दर्शकाने खलनायकी छटा येऊ दिलेली नाही, हे मला विशेष आवडले. खरं तर या चित्रपटात खलनायक असा कोणी नाहीच. प्रत्येक जण- काहीसे तर्‍हेवाईकपणाने वागत असले, तरी आपापल्या जागी योग्य आहेत असेच वाटत राहते. प्राजक्ताला गायन शिकवणारी स्पृहा आणि प्राजक्ताचा भाऊ यांचे उपकथानक हे तसे अनावश्यक असले, तरी त्यामुळे एकंदर चित्रपटाच्या ’फ्लो’ मध्ये कोणताही व्यत्यय येत नाही.
चित्रपटाचे कथानक कोणत्या काळात घडते, ते स्पष्टपणे सांगीतलेले नसले, तरी जागोजागी काही क्लू दिलेले आहेत. दगडू आणि कंपनीने प्राकक्ताच्या वडिलांना ’शाकाल’ म्हणणे, एका दृष्यात ’दयावान’ सिनेमाची जाहिरात इ. वरून हे ऐंशीच्या दशकातले कथानक आहे, हे सहज लक्षात येते.
चित्रपटातली संगीताची बाजू भक्कम आहे. सर्व गाणी श्रवणीय आहेत. विशेषत: ’मला वेड लागले... प्रेमाचे’, काहीसे भडकरित्या चित्रित केलेले आगरी गाणे- ’ही प्पोरी साजुक तुपातली’ आणि ’फुलपाखरू’ ही गाणी चांगली आहेत.

एकंदर चित्रपट सर्व आघाड्यांवर समाधानकारक असला, तरी खूप उत्कृष्ट, अद्वितीय असे त्यात काही नाही. एकदा पहायला हरकत नाही, पाहिला नाही तरी फारसे बिघडत नाही, असा.

माझ्याकडून (पाचपैकी) तीन स्टार्स.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>दगडूच्या केवळ डायलॉगबाजीवर प्राजक्ता त्याच्यावर भुलते हे पटण्यासारखे नाही. प्राजक्ताची घडवणूक ज्या वातावरणात झाली आहे त्या वातावरणातील मुलगी दगडूसारख्यालावर भाळेल असं अजिबात वाटत नाही<<

अशी उदाहरणे घडलेली पाहिलीत. अगदी हुशार(म्हणजे त्यावेळच्या हुशारी म्हणजे अभ्यासात हुशार नाही तर बाकी बाबतीत हुशार(गायन वगैरे)) मुली अश्या चुका करताना आढल्यात. त्यात वयाचा दोष ज्यास्त असतो घरच्यांपेक्षा.

एक उदाहरण शेजारी घडलेले, डॉक्टरची मुलगी(शिकलेली सर्व घरातली) रोजच्या वाण्याच्या मुलाच्या प्रेमात. कशी तर. घरी वाण्याचा मुलगा सामान घेवून यायचा दुपारी वगैरे. घरात कोणी नाही. मग गप्पा, मैत्री. पळून जाण्याच्या आत आई वडीलांनी गचांडी उचलून मामाकडे ठेवली मुंबईला. दहावी नापास झाली त्या वर्षाला.

तो ४ दिवस सायकल चालवतो आणि ५ हजार जमवतो. हे फारच बळच वाटले. उगाच काहीही!
अवांतर : मी सलग ५ दिवस हापिसात येतो आणि दगडू सारख्या लोकांना झेलतो. माझे कोणीच कौतुक नाही करत. Sad

मुळात खर्‍या आयुष्यात वा समाजात हे असे घडतच नाही, किंवा शक्यतो असे नाही तर तसे घडते, किंबहुना यापेक्षा अमुकतमुक घडायची टक्केवारी जास्त असते...

अरे काय आहे हे.. वर्षाला ३०० हिंदी चित्रपट निघतात पण कधी आपण हे निष्कर्श लाऊन चर्चा केलेल्याचे आठवत नाही.. मराठी चित्रपटांवरचे प्रेम आणि वाटणारा एक आपलेपणा म्हणावा का याला.. Happy

ब्राह्मणांची उगाच टवाळी करण्याची फॅशनच आहे.>>> का..ही...ही.... कुठे दिसली हो टवाळी? ऊगाच साप साप म्ह्णून भूई धोपटत बसायचे....

मुळात खर्‍या आयुष्यात वा समाजात हे असे घडतच नाही, किंवा शक्यतो असे नाही तर तसे घडते, किंबहुना यापेक्षा अमुकतमुक घडायची टक्केवारी जास्त असते...

अरे काय आहे हे.. वर्षाला ३०० हिंदी चित्रपट निघतात पण कधी आपण हे निष्कर्श लाऊन चर्चा केलेल्याचे आठवत नाही.. मराठी चित्रपटांवरचे प्रेम आणि वाटणारा एक आपलेपणा म्हणावा का याला.. स्मित
>> +१ अनुमोदन . चित्रपट म्हणून सोडून देणे उत्तम Happy
त्याना जे दाखवायचे आहे ते नीट दाखवता आले आहे की नाही हे महत्त्वाचे . नाहीतर क्रिकेट खेळून लगान माफ केला असता का कधी इंग्रजानी Happy
यापे़क्षा कितीतरी डेंजर "तेरे संग" आला होता हिंदीत .

>>मुळात खर्‍या आयुष्यात वा समाजात हे असे घडतच नाही, किंवा शक्यतो असे नाही तर तसे घडते, किंबहुना यापेक्षा अमुकतमुक घडायची टक्केवारी जास्त असते...
ह्म्म्म कटू आहे पण सत्य आहे, अशा अनेक घटना घडतात समाजात. माझ्या ओळखीत बि घडलेल्या आहेत.

दगडू चे घर जे या चित्रपटात दाखवल आहे, ते त्याचे स्वताचे घर आहे अंधेरि ला मालपाडोंगरि या भागात तो रहातो.
घरचि परिस्तिति जेम तेम असुनहि त्याने खुप छान काम केल आहे.

वरील बरेचसे आक्षेप, होय अगदी ब्राह्मणटवाळीचाही धरुन, पण एक वास्तव दर्शन म्हणुन चित्रपट कलाकारांचे अभिनय चान्गलेच वाटले. Happy चित्रपटाचा शेवट तसा केला नसता तर मात्र विचार करावा लागला असता.
दिग्दर्शकाने, ना प्रेमाची एकतर्फी भलामण केलिये, ना शिस्तीची, ना प्राप्त परिस्थितीची, अन म्हणुनच चित्रपट आवडतो म्हणण्यापेक्षा "पटतो" हे विशेष. मात्र वल्लभच्या उपकथानकाची जोड देऊन वल्लभ व वडील यांचेतील जिन्यातील संवादात चित्रपट आता पुढे कुठे झुकणार अशी भिती पडते..... पण प्रत्यक्षात तसे होत नाही.
वर बरेच जण म्हणतात की केतकीला अभिनय येत /कळत नाही. तर तुम्ही असे जे म्हणताहात ना, तेच तिच्या त्या भुमिकेतल्या "बाळबोध, सातच्या आत घरात" असे दाखविण्याचे यश आहे. तुम्ही फार फार तर असे म्हणू शकता की या भुमिकेत तिला "बरेच काही करुन दाखविण्यास स्कोप नव्हता" किन्वा दिग्दर्शकालाच, मुख्य झोत दगडूच्या पात्रावर ठेवायचा होता. पण केतकीला अभिनय येत नाही वा केवळ लाजणे जमते हे म्हणणे मला तरी धाडसी वाटते. Happy
असो.

>>>> मराठी चित्रपटांवरचे प्रेम आणि वाटणारा एक आपलेपणा म्हणावा का याला <<<< hoy, shivaay hii charchaa maaybolivariil aahe, tevhaa chikitsaa hoNaarach. hindi madhe te kaay aacharaT dhuDagus ghaalataat, kaaya deNegheNe aahe malaa?

उत्तम चित्रपट माझ्या मते ५ पैकी ४.५ गुण द्यायला हरकत नाही.

०.५ गुण कमी करायला प्रथमेश परब चा अभिनय हे एक कारण वाटते. मुलाखतीत चांगला दिसणारा प्रथमेश जिथे क्लोज अप येतो तिथे विनाकारण अगतिकता चेहर्‍यावर घेऊन येतो. पण पर्याय म्हणुन दुसरे नाव येत नाही.

बाकी वैभव मांगले, भाऊ यांचा अभिनय सरसच आहे.

कथा अजुन चांगली मांडता आली असती का असा प्रश्न पडतो. नेहमी प्रमाणे ५ वर्षांनंतर चांगले संकल्प करुन त्यांचे लग्न होते असाही शेवट मांडता आला असता जो जाणिवपुर्वक टाळलेला दिसतो.

जी कथा मध्यंतरापर्यंत वेगवान असते ती मध्यंतरानंतर कंटाळवाणी झाली नसली तरी कथेचा शेवट मात्र काहिसा अपेक्षा भंग करतो. किमान प्राजक्ताचा (केतकीचा) भाऊ आणि त्याची प्रेयसी यांच अयशस्वी प्रेम यशस्वी झाल असा काहिसा शेवट प्रेक्षकांना दगडु आणि प्राजक्ता यांच्या प्रेमाचा शेवट असा होईल अशी आशा लाऊन गेला असता.

शेवटी कथेच्या मेसेज प्रमाण पहिल प्रेम जर टाईमपास नसेल तर त्याचा शेवट चांगला किंवा तो चांगला होण्याची शक्यता असा दाखवला असता तर अधिक परिणामकारक झाला असता असे वाटते.

केदार जाधवच्या पोस्टला अनुमोदन.

किमान प्राजक्ताचा (केतकीचा) भाऊ आणि त्याची प्रेयसी यांच अयशस्वी प्रेम यशस्वी झाल असा काहिसा शेवट प्रेक्षकांना दगडु आणि प्राजक्ता यांच्या प्रेमाचा शेवट असा होईल अशी आशा लाऊन गेला असता.

>> +१००००

जर प्राजक्ताचे बाबा जातपात/ गरीबश्रीमंत इ. मानत नसतील (त्यांनीच दगडुच्या बाबांना सांगितलेले असते हे एका प्रसंगात), तर वल्लभ आणि स्पृहा आता मोठे/ जाणते झाले आहेत तर त्यांचं प्रेम यशस्वी झालंय असं दाखवायला काही हरकत नव्हती.

>>>>तर वल्लभ आणि स्पृहा आता मोठे/ जाणते झाले आहेत तर त्यांचं प्रेम यशस्वी झालंय असं दाखवायला काही हरकत नव्हती <<<<
प्रेमाचे यशापयश कशात कोणत्या निकषांवर मोजायचे?
लग्न झाले/मुलेबाळेहोऊन संसार झाला म्हणजेच यश असू शकते का? की आजही तीस पस्तीस वर्शांपूर्वीचे पहिले प्रेम(?) अजुनही तितक्याच तीव्रतेने व हळवेपणे लक्षात आहे यात यश मानायचे?

हो लिंबुटिंबु.. माझ्याही मनात कमेंट देण्याआधी हा प्रश्न आला होता.
माझ्यामते "प्रेमाचे यश प्रेम करणार्‍या व्यक्तींना जे वाटते त्यातच आहे".
म्हणजे एखाद्या खुप मॅच्युअर प्रेमी युगुलाला वाटत असेल की लग्न नाही झाले तरी हरकत नाही पण आजनंतर अनेक वर्षे हे प्रेम आपल्या लक्षात राहिले तर त्यातच आपल्या प्रेमाचे यश आहे तर त्यांच्या दृष्टीने ते त्यांच्या प्रेमाचे यश.

पण एखाद्या जोडप्याला जर असं वाटत असेल कि आपल्या प्रेमाचे यश हे आपलं लग्न होण्यात आहे, तर आपण त्यांच्यावर "आजही तीस पस्तीस वर्शांपूर्वीचे पहिले प्रेम(?) अजुनही तितक्याच तीव्रतेने व हळवेपणे तुमच्या लक्षात आहे. मग झालं कि तुमचं प्रेम यशस्वी.." अशी जबरदस्ती नाही करु शकत.

त्याच अनुषंगाने 'चित्रपटातली स्पृहा व वल्लभ हि पात्रे कसा विचार करतील' असा विचार केल्यास मला ती (निदान स्पृहातरी नक्कीच) दुसर्‍या कॅटेगरीतील वाटते. म्हणजे वल्लभशी लग्नाची/ त्याच्या आयुष्यभराच्या सहवासाची इच्छा असलेली. तिचे वल्लभवरचे प्रेम तिच्या कायम लक्षात राहिल म्हणजे आता तिचे प्रेम यशस्वी झाले असा विचार करणारी नाही वाटत. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने त्यांचे प्रेम अयशस्वीच झाले आहे. शिवाय चित्रपटात दाखवलेला काळ बघता त्या काळच्या संकेतांनुसार त्यांचे प्रेम अयशस्वीच म्हणावे लागेल.

सविस्तर उत्तराबद्दल धन्यवाद पियू
माझा काही प्रेमाचा वगैरे फारसा अनुभव नाही, त्यामुळे यावर "अधिकाराने" अधिक भाष्य नाही करत.
पण यानिमित्ताने मनात बरेच विचार/आठवणी येत आहेत, पुन्हा कधीतरी.

पाहिला, आवडला. सर्व +/- सकट सुद्धा गाणी आणि चित्रपट देखणा आहे.
गल्ला चांगला जमवला आहे पण नुसताच गल्लाभरू नाही, हे विशेष. व्यावसायिक गणितं स्पष्टपणे डोळ्यासमोर ठेऊन बनवलेला चित्रपट वाटला, उगीच आशावाद आणि सुखांताच्या गप्पा मारलेल्या नाहीत.
अभिनेत्री म्हणुन केतकी मुळीच आवडत नाही, पण गायिका म्हणुन उत्तमच. 'वेड लागले' खरंच वेड लावण्यासारखं झालंय. शिबानी दांडेकरचं आयटम साँग पण मस्त. दगडू बरा आहे, काही काही ठिकाणी दगडूपेक्षा मित्रच भाव खाऊन गेलेत Happy
एकंदरीत मजा आली, ब्रेक मिळाला.

मलाहि खुप आवडला टाईमपास... गाणी छान.. दगडु बिलकुल नाही आवडला.. अन केतकी तर कुपोषित वाटते.. मध्यानंतर खसखस कमी झाली हास्याची...

>>माझ्यामते "प्रेमाचे यश प्रेम करणार्‍या व्यक्तींना जे वाटते त्यातच आहे".
म्हणजे एखाद्या खुप मॅच्युअर प्रेमी युगुलाला वाटत असेल की लग्न नाही झाले तरी हरकत नाही पण आजनंतर अनेक वर्षे हे प्रेम आपल्या लक्षात राहिले तर त्यातच आपल्या प्रेमाचे यश आहे तर त्यांच्या दृष्टीने ते त्यांच्या प्रेमाचे यश.

वाह छान (ताज लिहिणार होतो चुकून), अगदी फार मोठे मौलिक ज्ञान सामावले आहे या वाक्यात.
जीव तुझा लोभला माझ्यावरी रे शोभना,
या ऋणाची विस्मृती ती ना कधी होवो मना

http://www.aathavanitli-gani.com/Song/Jeev_Tula_Lobhala

पाहिला, आवडला. सर्व +/- सकट सुद्धा गाणी आणि चित्रपट देखणा आहे.>>>मलाही

फक्त एक शंका वाटते आहे...दगडूला आभारी आहे चा अर्थ कळत नाही तो म्हणतो हा भारी आहे. आणि नंतर वाचनालयात पटापट, समर्पक अर्थ असणारी पुस्तके प्राजक्ताला दाखवतो, ते एकमेकांना दाखवतात हे त्याला कसे जमले असेल Uhoh
दगडूला बांदोडकर यांचा 'साजूक तुपातला' आवाज नाही शोभला... Sad

फक्त एक शंका वाटते आहे...दगडूला आभारी आहे चा अर्थ कळत नाही तो म्हणतो हा भारी आहे. आणि नंतर वाचनालयात पटापट, समर्पक अर्थ असणारी पुस्तके प्राजक्ताला दाखवतो, ते एकमेकांना दाखवतात हे त्याला कसे जमले असेल

>> +१. मलाही हि शंका आली होती.

अगदी फार मोठे मौलिक ज्ञान सामावले आहे या वाक्यात.

>> उपहासाने म्हणताय का?

दगडू आणि प्राजूची मुलाखत...परमेश्वराने रंग ,रूप,गुण आणि गळा सगळ एकाच ठिकाणी दिले आहे असे मला तरी वाटते...दगडूचे म्हणणे हि ऐका.

http://www.youtube.com/watch?v=GsSvBgNAQzA

अहो चित्रपट तो..थोडस कमी जास्त असणारच. reel life जर real life सारख व्हायला लागल तर ते पाहणार कोण ? तीन तास आपल मनोरंजन करायच आणि सोडून द्यायच...
बाकी हा चित्रपट मला तरी आवडला, अगदीच थर्ड क्लास वगैरे आजिबात नाहीये. अर्धनग्न आणि MC BC ची भाषा असणार्‍या काही हिंदी चित्रपटान्पेक्शा तरी नक्कीच उजवा आहे.

अजिबात आवडला नाही चित्रपट. दगडुमध्ये आवडण्यासारखे काहीही दिसले नाही. प्रेमकहाणीला काही आधारच नाही. ब्राह्मणांची उगाच टवाळी करण्याची फॅशनच आहे.
चित्रपट नक्की कुठल्या काळातला आहे हे समजत नाही. ना आताच्या काळातला वाटत ना जुन्या.>>>> +११११११११११११११......................

ब्राह्मणांची उगाच टवाळी करण्याची फॅशनच आहे.>>>>>या वाक्याला जास्त सहमत.

अविकुमार, राहुल,

या टी.पी. चित्रपटात तुम्हाला ब्राम्हणांची टवाळी दिसलीच नाही???? विनोद करताय काय? चित्रपट पाहिलायत न नक्की???

आजकाल नुसत्या प्रमोशन वर सिनेमे चालतात आणि नुसते चालत नाहीत, तर हिट पण होतात, हे नव्याने कळले.

>>

हो "दुनियादारी" पण प्रमोशन वरच तरला म्हणायचा.

हो "दुनियादारी" पण प्रमोशन वरच तरला म्हणायचा.>>>>> हो...हे तर खरच आहे.
आणि विशेष म्हणजे दुनियादारी आणि टी.पी. दोन्हीच प्रमोशन जोरदार झालं होत तरी, दुनियादारीन जास्त नफा कमावला. दुनियादारी त्या टीपी इतका भंगार नव्हता, म्हणून तो अनेकांनी परत परत पाहिला, हेच त्या मागचं कारण असाव.

मराठी सिनेमे प्रमोशनवर तरतात????

उलट मराठी सिनेमा चांगला असेल, लोकांना आवडला तरच तो तरतो.
हिंदी सिनेमांसारखे भलीमोठी स्टारकास्ट आणि झगमगीत प्रोमोज बनवून पहिल्याच आठवड्यात देशभरात शेकडो चित्रपटगृहांत झळकवून लोकांना सिनेमा भंगार आहे हे समजायच्या आधीच १०० करोडचा गल्ला कमावला जाणे हि धंद्याची ट्रिक मराठी सिनेमांना लागूच होऊ शकत नाही.

इथे धंदा करण्यासाठी सिनेमा काही आठवडे चालावा लागतो. थोडक्यात चांगला आहे की वाईट हे या काळात समजल्यानंतरच त्याचा धंद्याचा काळ चालू होतो आणि जर बहुतांश लोकांना आवडला तरच तो तरतो आणि हे मराठी चित्रपटांसाठी चांगलेच आहे.

(इथे तुर्तास बहुतांश लोकांना आवडणे म्हणजे दर्जेदार कलाकृती नव्हे हा वाद बाजूला ठेऊया, कारण मग पुन्हा पुन्हा मराठी माणसाला धंदा जमत नाही हे बोलायला देखील आपणच मोकळे, मराठी चित्रपटसृष्टीत पैसा खेळला तरच वेगवेगळे प्रयोग होणार.)

दुनियादारी सुद्धा कित्येकांना आवडला म्हणूनच तरला. किंबहुना दुनियादारी कित्येकांनी पुन्हा पाहिला. इथे ज्यांना आवडला नाही त्यांनाही हे मान्य करण्यास हरकत नसावी.

टाईमपास आणि दुनियादारी या चित्रपटांचा आणखी एक अनुभवलेला प्लस पॉईंट म्हणजे अमराठी भाषिकांनी देखील हा आपल्या मराठी मित्रांबरोबर जाऊन पाहिला, फेसबूकवर या सिनेमांचे पोस्टस अमराठी मित्र सुद्धा लाईक करतात, वॉस्सअपवर शेअर सुद्धा करतात. किंबहुना एकंदरीतच हल्ली या पॉप्युलर सिनेमांमुळे मराठी चित्रपटांबद्दल अभिमान वाटावा आणि चारचौघांत अभिमानाने चर्चा करावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कित्येक लोकांच्या मोबाईलवर मराठी गाण्यांच्या रिंगटोन वाजू लागल्या आहेत.... वगैरे वगैरे.. वगैरे वगैरे...

Pages