दीड दमडीचा धुमड्या (Movie Review - Dhoom - 3)

Submitted by रसप on 23 December, 2013 - 00:21

"ट्रकच्या मागे लिहिलेली वचनं" हा तत्वज्ञानाचा एक अविरत स्त्रोत आहे. द व्हेरी फेमस 'बुरी नजरवाले, तेरा मूह काला' पासून अनेक उत्तमोत्तम शेरही मी तिथे वाचलेत. पण अगदी हल्लीच, काही दिवसांपूर्वीच एका ट्रकवर वाचलेलं वचन मात्र सगळ्यांवर कडी असावं -
"भाई हो तो ऐसा, ना मांगे हिसाब ना मांगे पैसा !!"
ह्याच उदात्त विचारसरणीचा एक जादूगार नव्वदच्या दशकात शिकागोमध्ये होऊन गेला, हे काल धूम-३ पाहिल्यावर समजलं. पण हा जादूगार तर ट्रकवाल्या पेक्षाही उदात्त विचारसरणीचा असतो. तो अशी अपेक्षा स्वत:च्या भावाकडून नव्हे, तर बँकेकडून ठेवतो आणि कर्ज घेतो. पण ती बँक म्हणजे महाराष्ट्र सरकार नसतं आणि कर्ज घेणारा कुणी शेतकरीही नसतो. त्यामुळे व्यवहारास चोख बँक, हफ्ते चुकवणाऱ्या जादूगाराला नोटिशीची जादू दाखवते आणि हबकलेला हताश जादूगार आत्महत्या करतो. त्याने आत्महत्या केल्यावरही बँकेच्या अधिकाऱ्याचं हृदय द्रवत नाही. बिच्चाऱ्याला ट्रकवाला व जादूगाराचे उदात्त विचार माहित नसतात. तो जादूगाराची तारण मालमत्ता जप्त करवतो आणि त्या जादूगाराचा लहान मुलगा, मोठा झाल्यावर बँकेच्या कायदेशीर कारवाईचा बेकायदेशीर बदला घेतो. मायला ! चोर तो चोर, वर शिरजोर ? असाच आहे धुमड्या, अर्थात धूम - ३.

धुमड्याची सुरुवात आश्वासक होते. आमिरची सनी लिओनीश पाठ दिसेपर्यंतची पहिली काही मिनिटं आपल्या अपेक्षा उंचावतात. नंतर कैच्याकै भंकस सुरु होते. बाईक चालवणारा चोर आमिर स्वत:चे तोंडही लपवत नाही आणि अमेरिकेचे पोलिस इतके दुधखुळे असतात की ते त्याला ओळखू शकत नाहीत. लगेच पुढच्या दृश्यात अभिषेक आणि उदय चोप्रा कृत गुंडांची पिटाई दाक्षिणव्रात्य सिनेमाला लाजवेल अशी आहे. पुढल्या चाकावर गोल गोल फिरणारी रिक्षा पाहिल्यावर तिचा स्टिअरिंग कॉलम बनवाणाऱ्या कंपनीच्या मालकाचा उर अभिमानाने भरून आला नसेल, तरच नवल !
केवळ दोन चोऱ्या करून अमेरिकन पोलिसदलास हवालदिल करणाऱ्या एक अज्ञात चोरास पकडण्यासाठी, दोन धुमड्यांतील सुपरफ्लॉप कामगिरीनंतरही आंतरराष्ट्रीय 'सुपरकॉप' ठरलेल्या 'जय दीक्षित'ला (अभिषेक बच्चन) खास भारतातून बोलावले जाते. कारण कदाचित हे असावं की, हा चोर (आमिर खान) चोरी केल्यावर हिंदीत निरोप सोडत असतो - "तुम्हारी ऐसी की तैसी." गाड्याबरोबर नळ्याची यात्रा होते, तसा जयबरोबर 'अली'ही (उदय चोप्रा) येतोच !
पुढे काही बाही होत राहतं आणि सगळ्याचा हिशोब थोडक्यात मांडायचा झाल्यास - सुमारे ३ तासाच्या धुमड्यात तासभर बाईक्स व्रुमव्रुमत राहतात. तासभर आमिरवरून कॅमेरा हलत नाही. अर्धा तास गाणी, नाच, सर्कशीत जातो. १५ मिनिटं अभिषेक बच्चनच्या नाकावरील माशी उडवण्याच्या असफल प्रयत्नात जातात आणि उर्वरित १५ मिनिटं उदय चोप्रा प्रेक्षकांना वात आणण्यासाठी वापरतो. कतरिना पानात कतरी सुपारी असते, तशी हरवते किंवा पोह्यांवर भुरभुरवलेल्या खोबऱ्यासारखी नुसतीच दिसते.

dhoom-3-3a.jpg

आमिरचे बचकांडेपण कधी नव्हे इतकं धुमड्यात जाणवतं. त्या बाईक्सचा धुडांवर बसल्यावर त्याचे पाय खाली कसे पोहोचत असतील, हा एक संशोधनाचा विषय आहे.
दोरावरून बाईक चालवून एका बिल्डिंगमधून दुसऱ्या बिल्डींगमध्ये जाणे असो की चालू-चालूमध्ये बाईक बोटमध्ये कन्व्हर्ट होणं असो की दोन बाईक्स एकमेकांना खटाखट जोडल्या जाऊन त्यांची एक चार चाकी बनून तिने उडी मारणं असो, सगळंच आजच्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीतील असामान्य बुद्धिमानांसाठी एक जबरदस्त 'फूड फॉर थॉट' ठरायला हरकत नाही.
एकंदरीतच सगळे पाठलाग, स्टण्ट्स बॉन्ड-फॉण्ड, स्पायडर-वायडर मॅनांनी शिकवणी लावावी असेच.

धुमड्या संपल्यावर जरा वेळाने शांतपणे विचार केल्यावर लक्षात आलेल्या चार गोष्टी -

१. आमिर आणि शाहरुखमध्ये काही फारसा फरक नाही. दोघेही स्वत:च्या प्रेमात आकंठ बुडलेले आहेत. 'जतहैंजा' मधला समर आणि धुमड्यातला समर दोघेही सारखेच पकवतात.
२. उदय चोप्रा हे यश चोप्रांना पडलेलं एक भयानक स्वप्न असावं, जे खरं झालंय.
३. प्रत्येक सिनेमागणिक अभिषेक बच्चन एक लांबलचक ठोकळा बनत चालला आहे.
४. रोहित शेट्टी, तू एकटा नाहीस.

साधारण साडे नऊला धुमड्या संपला. माझ्या सुदैवाने दहा वाजता कलर्सवर '24' चा शेवटचा भाग होता. आमिरने केलेल्या घोर अपेक्षाभंगावर अनिल कपूरने अप्रतिम साकारलेला 'जयसिंग राठोड' एक उत्कृष्ट उतारा होता. त्यामुळे पराकोटीचा निराश झालेलो असतानाही मी शांतपणे झोपी जाऊ शकलो आणि सुचलेल्या बऱ्याच शिव्या विसरू शकलो !
थँक यू, अनिलकाका !

रेटिंग = जतहैंजा
http://www.ranjeetparadkar.com/2013/12/movie-review-dhoom-3.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तरीनाबाईना पैसे कमी पडले वाट्टे पड्यान्साठी. कातरुन कातरुन घातलेत.:फिदी: गाणे पण वरुनच आहे.मली मली.....

अंडरअ‍ॅक्टिंग' करायची सवय >>> सरकारराज पासून.

फारेंडाला अनुमोदन. यावेळी अभिषेकने चांगलं काम केलं आहे. मख्ख चेहरा म्हणजे अ‍ॅक्टिंग नव्हे, हे त्याला बाबांनी सांगितलं असावं एकदाचं. किंवा मग समोर आमिर चेहर्‍यावरच्या इतक्या रेषा इतक्या पद्धतीने हलवुन दाखवतो आहे, तर आपणही थोड्याफार हलवाव्यात असं काहीतरी त्यानं मनावर घेतलं असावं. वर कुणी म्हणल्याप्रमाणे आमिर-अभिषेक एकत्र असलेल्या काही फ्रेम्समधला त्याचा स्क्रीनप्रेझेन्स आमिर पेक्षा जास्त भावतो.

'खानावळ'- हे मी काही वर्षांपुर्वी नाना पाटेकरच्या तोंडून ऐकलं होतं. ते त्यानं बाळ ठाकर्‍यांकडून घेतलं असल्यास माहित नाही.

मध्यंतरानंतरच्या इमोशनल स्टोरीचं मला तरी काही वावगं वाटलं नाही. नुसताच चोरीपट, पाठलागपट किंवा धूमपट आमिरला करायचा नव्हता- असं वाटलं.

मात्र धूम सिरीज बंद पाडली, हे जरा वाईटच झालं. अक्षय कुमार, रणवीरसिंग, अजय देवगण इत्यादी अनेक ऑप्शन अजून बाकी होते. सगळ्यात शेवटी शाहरूख आल्यावर आपोआप बंद पडलीच असती.

मध्यंतरानंतरच्या इमोशनल स्टोरीचं मला तरी काही वावगं वाटलं नाही. >> Wink अशाने तर मराठी 'धूम धडाका' पण धूम सिरीज साठी चालसे होईल न!!! धूम म्हणल्यावर नो इमोशन नो कॉमेडी ओन्ली थ्रील.

मला आवडला धूम ३ .. इतका सगळा निगेटिव्ह रिव्हू वाचल्यावर फार काही अपेक्षा ठेवली नव्हती. पण कदाचित त्यामुळे आणि डोके बाजूला ठेवून पाहिल्याने चांगली करमणूक झाली.. Happy

मस्त लिहिलाय रिव्ह्यू...

खरे तर उद्या टाईमपासला जातोय म्हणून त्याचे काही मिळतेय का बघायला आलेलो.. पण येणे फुकट नाही गेले.. हे वाचायला मिळाले.. Happy

हुश्श.. अखेर मी धूम पाहिला... काही काही अतिशयोक्तीयुक्त प्रसंग सोडल्यास ( दोरीवरून एका बिल्डींगमधून दुसरीकडे जाणे, आमिरच्या बाईकचे वेगवेगळ्या प्रकारांत रुपांतरण होणे, [दिग्दर्शकाने हॅरी पॉटरची पारायणे केलेली दिसतायत Lol ] ) मला चित्रपट आवडला. आमिरला ब-याच काळाने पाहिले असेल म्हणूनही.. overall काय तर एकदा पाहण्यासारखा आहे चित्रपट ( फक्त पाहण्यासारखाच, लॉजिक वगैरे शोधाला तर मेंदूचा भुगा होईल, सो विचार करू नका, फक्त पहा) असा माझा सल्ला... Happy

btw रसप रिव्ह्यू मस्त आहे तुमचा, तोपण आवडला Happy

आमीरखानला परफेक्शनिस्ट बोलत आणि शाहरुखशी तुलना करत त्याच्या अभिनयाला ओवरहाईप केले असले तरी तो तसा चांगलाच अभिनेता आहे.
त्याचा सौथेंडियन स्टार कमल हसन होऊ नये हिच इच्छा, जो कालांतराने रंगरंगोटी आणि गेटअप लूक्स बदलणे यालाच अभिनय समजू लागला..

अवांतरः
जो कालांतराने रंगरंगोटी आणि गेटअप लूक्स बदलणे यालाच अभिनय समजू लागला..>>>>> काही अंशी खरंय पण दशावतारम मधले बरेचसे अवतार त्यानं सहीच सादर केले आहेत. म्हातारी, सरकारी बाबु, दलितांचा नेता मला फार आवडले होते.

दशावतारम बघताना जाम कन्फुझ झाले होते. नंतर नंतर मला असिन सुद्धा "मेकप केलेला कमल हासन" वाटायला लागली होती.

धूम ३ च्या नवीन प्रोमो पाह्यले का? आता काय डोम्बलाचं स्पॉयलर अ‍ॅलर्ट!!!! Proud

जो कालांतराने रंगरंगोटी आणि गेटअप लूक्स बदलणे यालाच अभिनय समजू लागला..>>> Lol हे खत्रा होते अभिषेक Happy

असिन सुद्धा "मेकप केलेला कमल हासन">>> Lol जबरी

After 250+ cr. Collection. There is no need of spoiler. Saw The Prestige yesterday. Nice movie. D3 la ugich paise ghatle. Happy

५०० कोटी कमाई केली म्हणे धुम ३ ने?
फेबुवर वाचले की भारताच्या मंगलयान प्रकल्पाला ४५० कोटी खर्च आला. जर धुम३ सारख्या प्रो़जेक्ट ला एवढा आर्थिक फायदा होत असेल तर लोकांना विचारायला हवे की ते सगळे मिळून एखादे स्पेस वेंचर फंड करतील का?
मुव्ही आणि स्पेस वेंचर ह्या फार वेगळ्या गोष्टी असल्या तरी इंटरेस्टींग विचार आहे Happy

धुम सिरिज म्हणे यशराजची उदय चोप्रा आणि अभिषेक बच्चन साठी रोजगार हमी योजना आहे. आता बंद पडली तर कसे व्हायचे दोघांचे? असाही मजेशीर स्टेटस वाचला फेबुवर.

धुम सिरिज म्हणे यशराजची उदय चोप्रा आणि अभिषेक बच्चन साठी रोजगार हमी योजना आहे. आता बंद पडली तर कसे व्हायचे दोघांचे? असाही मजेशीर स्टेटस वाचला फेबुवर. >>> Lol

Pages