दीड दमडीचा धुमड्या (Movie Review - Dhoom - 3)

Submitted by रसप on 23 December, 2013 - 00:21

"ट्रकच्या मागे लिहिलेली वचनं" हा तत्वज्ञानाचा एक अविरत स्त्रोत आहे. द व्हेरी फेमस 'बुरी नजरवाले, तेरा मूह काला' पासून अनेक उत्तमोत्तम शेरही मी तिथे वाचलेत. पण अगदी हल्लीच, काही दिवसांपूर्वीच एका ट्रकवर वाचलेलं वचन मात्र सगळ्यांवर कडी असावं -
"भाई हो तो ऐसा, ना मांगे हिसाब ना मांगे पैसा !!"
ह्याच उदात्त विचारसरणीचा एक जादूगार नव्वदच्या दशकात शिकागोमध्ये होऊन गेला, हे काल धूम-३ पाहिल्यावर समजलं. पण हा जादूगार तर ट्रकवाल्या पेक्षाही उदात्त विचारसरणीचा असतो. तो अशी अपेक्षा स्वत:च्या भावाकडून नव्हे, तर बँकेकडून ठेवतो आणि कर्ज घेतो. पण ती बँक म्हणजे महाराष्ट्र सरकार नसतं आणि कर्ज घेणारा कुणी शेतकरीही नसतो. त्यामुळे व्यवहारास चोख बँक, हफ्ते चुकवणाऱ्या जादूगाराला नोटिशीची जादू दाखवते आणि हबकलेला हताश जादूगार आत्महत्या करतो. त्याने आत्महत्या केल्यावरही बँकेच्या अधिकाऱ्याचं हृदय द्रवत नाही. बिच्चाऱ्याला ट्रकवाला व जादूगाराचे उदात्त विचार माहित नसतात. तो जादूगाराची तारण मालमत्ता जप्त करवतो आणि त्या जादूगाराचा लहान मुलगा, मोठा झाल्यावर बँकेच्या कायदेशीर कारवाईचा बेकायदेशीर बदला घेतो. मायला ! चोर तो चोर, वर शिरजोर ? असाच आहे धुमड्या, अर्थात धूम - ३.

धुमड्याची सुरुवात आश्वासक होते. आमिरची सनी लिओनीश पाठ दिसेपर्यंतची पहिली काही मिनिटं आपल्या अपेक्षा उंचावतात. नंतर कैच्याकै भंकस सुरु होते. बाईक चालवणारा चोर आमिर स्वत:चे तोंडही लपवत नाही आणि अमेरिकेचे पोलिस इतके दुधखुळे असतात की ते त्याला ओळखू शकत नाहीत. लगेच पुढच्या दृश्यात अभिषेक आणि उदय चोप्रा कृत गुंडांची पिटाई दाक्षिणव्रात्य सिनेमाला लाजवेल अशी आहे. पुढल्या चाकावर गोल गोल फिरणारी रिक्षा पाहिल्यावर तिचा स्टिअरिंग कॉलम बनवाणाऱ्या कंपनीच्या मालकाचा उर अभिमानाने भरून आला नसेल, तरच नवल !
केवळ दोन चोऱ्या करून अमेरिकन पोलिसदलास हवालदिल करणाऱ्या एक अज्ञात चोरास पकडण्यासाठी, दोन धुमड्यांतील सुपरफ्लॉप कामगिरीनंतरही आंतरराष्ट्रीय 'सुपरकॉप' ठरलेल्या 'जय दीक्षित'ला (अभिषेक बच्चन) खास भारतातून बोलावले जाते. कारण कदाचित हे असावं की, हा चोर (आमिर खान) चोरी केल्यावर हिंदीत निरोप सोडत असतो - "तुम्हारी ऐसी की तैसी." गाड्याबरोबर नळ्याची यात्रा होते, तसा जयबरोबर 'अली'ही (उदय चोप्रा) येतोच !
पुढे काही बाही होत राहतं आणि सगळ्याचा हिशोब थोडक्यात मांडायचा झाल्यास - सुमारे ३ तासाच्या धुमड्यात तासभर बाईक्स व्रुमव्रुमत राहतात. तासभर आमिरवरून कॅमेरा हलत नाही. अर्धा तास गाणी, नाच, सर्कशीत जातो. १५ मिनिटं अभिषेक बच्चनच्या नाकावरील माशी उडवण्याच्या असफल प्रयत्नात जातात आणि उर्वरित १५ मिनिटं उदय चोप्रा प्रेक्षकांना वात आणण्यासाठी वापरतो. कतरिना पानात कतरी सुपारी असते, तशी हरवते किंवा पोह्यांवर भुरभुरवलेल्या खोबऱ्यासारखी नुसतीच दिसते.

dhoom-3-3a.jpg

आमिरचे बचकांडेपण कधी नव्हे इतकं धुमड्यात जाणवतं. त्या बाईक्सचा धुडांवर बसल्यावर त्याचे पाय खाली कसे पोहोचत असतील, हा एक संशोधनाचा विषय आहे.
दोरावरून बाईक चालवून एका बिल्डिंगमधून दुसऱ्या बिल्डींगमध्ये जाणे असो की चालू-चालूमध्ये बाईक बोटमध्ये कन्व्हर्ट होणं असो की दोन बाईक्स एकमेकांना खटाखट जोडल्या जाऊन त्यांची एक चार चाकी बनून तिने उडी मारणं असो, सगळंच आजच्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीतील असामान्य बुद्धिमानांसाठी एक जबरदस्त 'फूड फॉर थॉट' ठरायला हरकत नाही.
एकंदरीतच सगळे पाठलाग, स्टण्ट्स बॉन्ड-फॉण्ड, स्पायडर-वायडर मॅनांनी शिकवणी लावावी असेच.

धुमड्या संपल्यावर जरा वेळाने शांतपणे विचार केल्यावर लक्षात आलेल्या चार गोष्टी -

१. आमिर आणि शाहरुखमध्ये काही फारसा फरक नाही. दोघेही स्वत:च्या प्रेमात आकंठ बुडलेले आहेत. 'जतहैंजा' मधला समर आणि धुमड्यातला समर दोघेही सारखेच पकवतात.
२. उदय चोप्रा हे यश चोप्रांना पडलेलं एक भयानक स्वप्न असावं, जे खरं झालंय.
३. प्रत्येक सिनेमागणिक अभिषेक बच्चन एक लांबलचक ठोकळा बनत चालला आहे.
४. रोहित शेट्टी, तू एकटा नाहीस.

साधारण साडे नऊला धुमड्या संपला. माझ्या सुदैवाने दहा वाजता कलर्सवर '24' चा शेवटचा भाग होता. आमिरने केलेल्या घोर अपेक्षाभंगावर अनिल कपूरने अप्रतिम साकारलेला 'जयसिंग राठोड' एक उत्कृष्ट उतारा होता. त्यामुळे पराकोटीचा निराश झालेलो असतानाही मी शांतपणे झोपी जाऊ शकलो आणि सुचलेल्या बऱ्याच शिव्या विसरू शकलो !
थँक यू, अनिलकाका !

रेटिंग = जतहैंजा
http://www.ranjeetparadkar.com/2013/12/movie-review-dhoom-3.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खानावळ.:फिदी: हो कुठल्याही सिनेमाविषयक बातमीत ( पेपर वा मासिके) या तिघान्चा उल्लेख खानावळ असाच होतो. मध्यन्तरी हृतीकचा कुठलासा हिट आल्यानन्तर लोकानी अशीच प्रतीक्रिया दिली होती.( म्हणजे खानावळीला टक्कर वगैरे)

बाळासाहेब ठाकरे यांनी शाहरूख, सलमानला उद्देशून ‘खानावळ’ हा शब्द पहिल्यांदा जाहिरपणे भाषणात वापरला होता, असे वाचनात आहे.

बर झाल
फर्स्ट डे फर्स्ट शोच्या मोहाला बळि पडले नाही

आमिरने तर साफ़च निराशा केलिली दिसतेय

फारच आणि अ गोष्टी आहेत .. त्याबाबतीत रिव्ह्यू आणि प्रतिसादांशी सहमत ..

पण मला आवडला धूम ३ .. चांगली करमणूक होती .. मुव्ही स्पेक्टॅक्युलर होता .. आणि आमिर एके आमिरच असला तरी आमिरचं काम प्रचंड आवडलं मला .. अर्थात मला आमिर अनकंडिशनली आवडतो त्यामुळे मी बायस्ड् , जास्त फरगिव्हिंग असू शकते ..

पण एकूण धमाल होती सिनेमा म्हणजे .. Happy

Proud
तरीपण स्पॉयलर अलर्ट टाकलेला बरा.. तुमचा परि़क्षणाचा धागा बिना वादाने सुरळित चालला आहे.. कशाला पायावर(धाग्यावर) धोंडा.. Happy

काल पाहिला. एकदा पाहायला हरकत नाही. माझे मत ५०-५०.

आता हे मी लिहीलेले वाचून बरीच फायरिंग होउ शकेल या पोस्टवर. तेव्हा दोन्ही हात डोक्यावर उलटे धरून "ओ मी नाही, ओ मी नाई" पोज मधे हे लिहीत आहे Happy

१. यात आमिर अगदी जबरी, परफेक्शनिस्ट इ असला, तरी अभिषेकही त्याला जेवढा रोल आहे त्यात कोठेच कमी पडत नाही. तिन्ही धूम मधे ९०% चित्रपटभर व्हिलनकडून मात खाणारा व फक्त शेवटी जिंकणारा पोलिस - म्हणजे ऑथर-बॅक्ड रोल अजिबात नाही, पब्लिक चा इमोशनल सपोर्ट जॉन, हृतिक व आमिरच्या कॅरेक्टरला. चित्रपटाचा 'बझ' ही आमिरमुळे, एवढे सगळे असून त्याने बर्‍यापैकी चांगले काम केले आहे. उलट (खाली लिहीलेल्या) काही कारणांमुळे त्याचाच स्क्रीन प्रेझेन्स इतर सर्वांपेक्षा भारी आहे या चित्रपटात. त्याच्या बद्दलचा पूर्वग्रह बाजूला ठेवून पाहिलात तर जाणवेल (आता फॅन म्हंटल्यावर एवढे लिहायलाच हवे Proud )
२. मी आमिरचाही फॅन आहेच. पण यात त्याचा पार पोपट करून टाकला आहे. त्याचे काम जबरी आहे हे निर्विवाद. पण त्याचे बहुतांश शॉट्स त्याला सूट होणार्‍या स्टाइलमधे दाखवत नाहीत. त्याचे स्टेज वरचे डान्सेस (तो बूट वाजवत केलेलाही), अभिषेक समोरचे त्याचे शॉट्स (काही कत्रिनासमोरचेही) ई मधे त्याचा स्क्रीन प्रेझेन्स अजिबात जाणवत नाही. बहुतांश 'खान' लोकांत कोणीच खरे भरदार उंच ई नाही (इव्हन 'सिंघम' देवगण). पण त्यांना दाखवताना ते तसे वाटतील याची काळजी घेतली जाते. यात तसे केलेले नाही.
३. ती पिळदार बॉडी, सिक्स पॅक इ मुळे उलट तो अजूनच ठेंगणा वाटतो. पिळदार बॉडी सुद्धा सूट न होणारे लोक असतात तसा वाटतो तो.
४. आणि म्हाताराही दिसतो. त्यामुळे क्लोज अप शॉट्स मधे बघवत नाही. कदाचित नकारात्मक रोल मुळे मुद्दाम चेहरा तसा करायचा प्रयत्न केला असेल पण वय लपत नाही. आणि ते कान अचानक एवढे त्या जुन्या ओनिडाच्या जाहिरातीतील प्राण्याप्रमाणे बाहेर कसे आले? की यात काहीतरी डीप मिनींग आहे - व्हिलनिश रोल मुळे तसे केले वगैरे? पूर्वीचा तो चिकना आमिर हाच का असा प्रश्न पडतो. आणि तो यात एवढा 'गे' का दिसतो माहीत नाही. त्याचे कॅरेक्टर गे असते तर काहीच हरकत नव्हती. पण गजनीतही असेच वाटले होते.

मात्र, त्याने अभिनय नक्कीच चांगला केलेला आहे. माझ्या मते त्याचे सीन्स इम्पॅक्ट करत नाहीत यात हे सांगायची कोणी डेअरिंग केली नसावी. ते Emperor's new clothes ई.ई. Happy

बाकी:
५. अचाट व अतर्क्य भाग तर आहेतच. आख्ख्या शिकागोत चेस करायला लौकर एक हेलिकॉप्टर नसणे (बर्‍याच नंतर एक येते, कॅनडातून मागून घेतल्यासारखे), आमिरचा फोटो कोठेही नसणे, त्याला समोर पाहिलेल्या पोलिसांनीही न ओळखणे. सर्कस संचालकाची स्वतःची प्राईम रिअल इस्टेट असणे (जिची किंमत बहुधा दुसर्‍या स्टेज वर सर्कस चालवणे सहज शक्य होईल एवढी असेल), सर्कस बंद पडल्यावर अनेक वर्षे ती इमारत मोकळीच राहणे, तीन चार वेळा लुटल्यावर आख्खी बँक (जी "पब्लिक" कंपनी असते शेअर मार्केट मधे) डायरेक्ट बंदच पडणे. इन्शुरन्स, फेडरल रिझर्व ई प्रकार लिटरली "नॉट इन द पिक्चर" Happy
६. उदय चोप्राचे संवाद आधीच्या किमान पहिल्या धूम मधे कधीकधी मजेदार होते. येथे जमलेले नाहीत.
७. ते एक मलंग मलंग सोडले तर कोणतेही गाणे लक्षात राहात नाही. कत्रिनाचे ऑडिशन गाणे तेव्हा ऐकायला चांगले वाटले.
८. कत्रिनाही यात सुंदर दिसत नाही.

शेवटचा अर्धा तास मी झोपलो, ते त्या धरणाच्या शॉटलाच उठलो. त्यामुळे सध्या एवढेच Happy

@फारएण्ड...

ओनिडा........ Rofl

गे....... Uhoh (आता मलाही वाटतंय तो तसाच दिसलाय !!)

पोस्टीला अनुमोदन..

रच्याकने, मला अभिषेक बरा वाटतो.. तो नावडला कधीच नाही. मध्यंतरी आवडतही होता... पण अचानक त्याला 'अंडरअ‍ॅक्टिंग' (ओव्हरअ‍ॅक्टिंगच्या विरुद्ध!) करायची सवय कुठून आणि कशी लागली.. कळत नाही!
त्याचा स्क्रीन प्रेझेन्स चांगला असतोच कारण पर्सनालिटी चांगली आहे आणि धुमड्यात आमिर त्याच्यासमोर पिचकवणी 'दिसतो', हेही मान्य आहे.
Happy

आमिरचे कान पहिल्यापासुन तसेच होते, फक्त तो ते केसांखाली लपवायचा. आता अचानक केस बारीक कापल्यावर कान दिसायला लागले. Happy

काल पाहिला. एकदा पाहायला हरकत नाही. माझे मत ५०-५०.

आता हे मी लिहीलेले वाचून बरीच फायरिंग होउ शकेल या पोस्टवर. तेव्हा दोन्ही हात डोक्यावर उलटे धरून "ओ मी नाही, ओ मी नाई" पोज मधे हे लिहीत आहे स्मित

१. यात आमिर अगदी जबरी, परफेक्शनिस्ट इ असला, तरी अभिषेकही त्याला जेवढा रोल आहे त्यात कोठेच कमी पडत नाही. तिन्ही धूम मधे ९०% चित्रपटभर व्हिलनकडून मात खाणारा व फक्त शेवटी जिंकणारा पोलिस - म्हणजे ऑथर-बॅक्ड रोल अजिबात नाही, पब्लिक चा इमोशनल सपोर्ट जॉन, हृतिक व आमिरच्या कॅरेक्टरला. चित्रपटाचा 'बझ' ही आमिरमुळे, एवढे सगळे असून त्याने बर्‍यापैकी चांगले काम केले आहे. उलट (खाली लिहीलेल्या) काही कारणांमुळे त्याचाच स्क्रीन प्रेझेन्स इतर सर्वांपेक्षा भारी आहे या चित्रपटात. त्याच्या बद्दलचा पूर्वग्रह बाजूला ठेवून पाहिलात तर जाणवेल (आता फॅन म्हंटल्यावर एवढे लिहायलाच हवे फिदीफिदी )>>>> + १

+ बाजु
आमिरचा अभिनय.(जबरी)
पाठलागाचे सीन्स (मला वाटलं त्यापेक्षा कमी वेळ चालले त्यामुळे)
कटरिना तिच्य इवलुशा रोल मधे आवडली. ती गोड दिसलीय आणि कामही छान झालय तिचं.

- बाजु
लॉजिकची 'ऐशी ची तैशी' !
सगळीकडे आमिरच आमिर! त्याचा हळुहळु एसार्के होतोय (अभिनय सोडुन)
धूम सेरीज मधे चोर चोरीकडे कला म्हणुन बघतो आणि त्याच्या चोरीचा त्याला अभिमान असतो. That's it!
कारणं वगैरे नो भानगड! इथे सगळं उगाच अति भावनिक करून ठेवलय.
अभिषेकबद्दल फारेंडाला पूर्ण अनुमोदन.
आमिर नाचाबाबत हृत्विकच्या कुठेही जवळपास जात नाही.

ते सर्कस असं म्हणतात पण खरं तर तो एक डान्स + साँन्ग + थोडी जादू असा शो आहे.

मीसुद्धा काल पाहिला.
'लॉजिककी ऐसी की तैसी' केली आहे, हे आधी अनेक रिव्यू वाचून समजले होतेच. त्यामुळे अपेक्षा मुळातच कमी ठेवल्या होत्या. आपण सामान्यतः गोविंदाचे सिनेमे ज्या मनःस्थितीत पाहतो, तसा पाहिला आणि चक्क एंजॉय केला धूम ३ ! Happy
बाईक्स आवडल्या. 'फक्त बीएमडब्ल्यु' ही मार्केटिंगची मागणी असावी.
माऊंटन ड्यू ची बरीच जाहिरात केली आहे.

धूम सेरीज मधे चोर चोरीकडे कला म्हणुन बघतो आणि त्याच्या चोरीचा त्याला अभिमान असतो. That's it!
कारणं वगैरे नो भानगड! इथे सगळं उगाच अति भावनिक करून ठेवलय. >>. +१००० ह्या सिनेमात एकच चुकल ते म्हणजे त्याच टायटल. धूम ऐवजी "तुम्हारी ऐसी कि तैसी" अस नाव असत तर माझा कश्शाला कश्शाला म्हणून आक्षेप नव्हता.... "नाव धूम आणि हाती ऐसी तैसी" अशी नवी म्हण मराठीत रूढ होईल लवकरच.

काल बघितला. अगदी पळवुन पळवुन बघितला... कंटाळा आला. आमिर, बेटर लक नेक्स्ट टाईम. तू विचार केला असशील, तसा नाही झालाय हा चित्रपट.

सोबत now you see me बघितला. जबरी वाटला. सस्पेन्स शेवटपर्यंत टिकतो. जादू/ हातचलाखी, कशी करतात/ केली असेल याची उत्कंठा टिकुन राहते. असो. तितक्या लॉजिकली लिहिणारा लेखक शोधणे अभिषेकलाही शक्य दिसत नाही. Sad

आमिरचे कान बघायचे असतील तर यादों की बारात बघायचा. सशाचे कान छोटे दिसतील.

काहितरीच कान आहेत स्टारट्रेक मधले कॅरॅक्टर कोन त्याच्यासारखे.

स्पॉयलर अ‍ॅलर्ट!!! स्पॉयलर अ‍ॅलर्ट!!! स्पॉयलर अ‍ॅलर्ट!!! स्पॉयलर अ‍ॅलर्ट!!!

मला एक गोष्ट कळलेली नाही म्हणून विचारतोय. कटरिना कैफ पोलिस असते का? मला त्या शेवटच्या सीनमधे असं वाटलं, पण नेमकं कळलं नाही.

क्लायमॅक्स सीनमधे जे धरण दाखवले आहे, बहुधा त्याच धरणावर एका बाँडपटाचा सुरूवातीचा सीन शूट केला आहे. मला त्या सिनेमाचे नाव आठवत नाही, पण जेम्स बॉन्ड (पिअर्स ब्रॉस्नन) उडी घेतो तो सीन जबरदस्त शूट केला आहे असे आठवते.

Pages