साक्षात्कारी मुगाचे डोसे

Submitted by मनिषा लिमये on 18 December, 2013 - 23:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पुढे सांगते ना

क्रमवार पाककृती: 

साक्षात्कार
हं तर इथल्या सगळ्या सुग्रणी आणि सुग्रण्यांनो,
ही कहाणी आहे मला झालेल्या साक्षात्काराची!!!
दिनांक १८ डिसेंबर २०१३ , रात्री ८ ते ८.३० आणि हाच तो दिवस \[ किंवा हीच ती रात्र म्हणुयात हवं तर] आणि हीच ती वेळ जेव्हा मला साक्षात्कार झाला.
तर झालं असं की मी ती उद्योजक गोखल्यांची मालिका "होणार सुन मी या घरची" बघत होते. तर त्यातली आई आज्जी म्हणजे फार फार कर्तृत्ववान बाई. तिच्यासारखे मुगाचे डोसे कुण्ण कुण्णाला जमत नाहीत.अगदी इतकी वर्ष तिच्या सहवासात काढलेल्या श्री च्या सुगरण आईलाही [ नर्मदा] नाही.
पण कालच्या भागात ते जान्हवीला मात्र जमले , अगदी आईआज्जीसारखेच छान. अग श्री तिला म्हणत होता तूही आईआज्जीसारखीच कर्तृत्ववान आहेस. आणि हीच ती वेळ मला अचानक साक्षात्कार झाला की अरेच्चा मलाही छान जमतात की हे मुगाचे डोसे म्हणजे आपणही अगदी आईआज्जीसारखेच कर्तृत्ववान आहोत की कसलं भारी वाटलं मला मग. ताबडतोब रात्री साडेआठ वाजता मुग भिजत घातले , मध्यरात्री बरोब्बर एक वाजता अलार्म लावला आणि उठुन ते उपसले. आणि आज सकाळी बेकफास्टला मुगाचे डोसे तयार.
तर आता साहीत्य आणि कृतीकडे वळुयात.
१] एक वाटी मोड आलेले मुग
२] ८\१० लसुण पाकळ्या
३] मुठभर कोथिंबीर बारीक चिरुन
४] २ हिरव्या मिरच्या
५] तव्यावर घालण्याइतके तेल
६] चवीप्रमाणे मीठ
७] १ चमचा भाजलेले जिरे
ही झाली तयारी . आता प्रत्यक्ष कृती:
प्रथम जिरे , मिरच्या आणि लसुण पाकळ्या मिक्सरवर [माझ्याकडे पाटा वरवम्टा नसल्याने मि मिक्सरच वापरते मात्र इच्छुकांनी शक्य असेल तर पाटा वापरायला हरकत नाही ]बारीक वाटा . आता त्यातच मोड आलेले मुग थोडेसे पाणी बारीक घालून वाटा. छान डोशाच्या पिठासारखे झाले की त्यात भरपुर कोथिंबीर व मीठ घाला.
तव्याला तेलाचा हात पुसुन घ्या आणि त्यावर या तयार मिश्रणाचे मस्त पातळ डोसे घाला. झाकण ठेवायला विसरू नका. आता छानपैकी वास दरवळायला लागेल. याचा अर्थ आता झाकण काढा आणि डोसा उलटा. आणि थोड्याच वेळात मस्त पैकी डोसा तयार.
घ्या खाऊन पोटभर आता.
करुन बघा आणि कर्तृत्ववान असल्याचा हा पुरावा सादर करा

वाढणी/प्रमाण: 
या प्रमाणात दोन डोसे होतात
अधिक टिपा: 

आईआज्जीच्या पानातला डोसा आणि माझा डोसा अगदी सारखेच दिसतायत.

माहितीचा स्रोत: 
चूकुन जास्त मुग भिजवले गेल्यामुळे ते संपवण्यासाठी केलेला यशस्वी प्रयोग
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्याकडे हे वरचेवर होत असतात. फक्त थोडे बेसन/रवा/तांदळाचे पिठ ह्यापैकी काहीतरी थोडे घातल्यास जो मुगाचा विशेष वास येतो तो येत नाही आणि खुसखुशीतही होतात.

मी तर थोडासा कागद तेलात बुडवते आणि तो तव्यावरुन फिरवते.
त्याने हाताला भाजत नाही.
पुर्वी कांद फिरवायचे पण आताशा ते परवडत नाही Proud

संयोजक माबो बघा हो.. पियु मला चिडवते

>> तुला अ‍ॅडमीन म्हणायचंय का? मला संयोजक माबो ऐकुन एकदम मायबोली गणेशोत्सव सुरु झाल्याचा फील आला Happy

नाही जळत कागद...
पटकन पटकन फिरवायचा Happy
भाकरी वर पाणी फिरवताना कसा आपण (म्हणजे मी नाही, ज्याला कोणाला भाकरी येतात ते) हात पतकन फिरवतो
नारळाची शेंडी बेस्ट!
पुढच्या वेळे पासुन मी जपुन ठेवेन नारळ्याच्या शेंड्या Happy

विनिता, अगं थोडासा घेते मी कागद..... उलट आनंदी होतील ते ... रिसायकलिंग करतेय मी म्हणून...:फिदी:

मला पडलेला प्रश्न.. आपण कागत तेल टीपायला वापरतो.. मग कागदात एत्श शोशले जाउन वाया नाही का जाणार? त्यापेक्षा कांदा वापरला तर तो पुन्हा भाजुन भाजीत वापरता येतो Uhoh

काय मन लावून पाहाता तो "होसूमीत्याघ"
पण बरं झालं त्या निमित्ताने मूगाच्या डोशाची रेसिपी मिळाली. पण मी करते तेव्हा नाही होत डोसे, तुटतात ते. कोणता तवा वापरायचा किती गरम करायचा, हे पन जान्हवीने साम्गायला हवं. ती नसेल तर बाकीच्या कर्तृत्त्ववान मैत्रिणींनो तुम्ही सांगा बरं.

अगं थोडासा घेते मी कागद.....+१
हो आणि काय परवडते हे आताशा खरंच कनफुजिंग झाले आहे.

पियु अॅडमिनच बरे का...

अरे नारळाची शेंडी बेस्ट. नंतर भांडी घासायला वापरा >>> मग सगळी भांडी तेलकट झाली की चकचकीत करायला प्रिल लिक्विड वापरा. ते संपल्यावर रिकामी बाटली चांगली धुवून त्यात पुन्हा तेल भरा Lol Light 1

ता.क. : असले काही करु नये. तेलकट शेंड्या (नारळाच्या) फेकून द्याव्यात. प्रिल वापरुन झालं की बाटली प्लॅस्टिकवाल्याला देऊन टाकावी.

सार्‍या कर्तृत्ववान सुगरणींना म्या पामराचा शिरसाष्टांग दंडवत!

तुमचा आदर्श समोर ठेऊन 'कर्तृत्ववान' बनण्याचा निश्चय करणारी नम्र-

मी आताच सकाळी मु चे डो केले.... आता हा धागा वाचून खरच मी पण कर्तृत्ववान झाल्यासारखे वाटतेय.

अरेच्चा मलाही छान जमतात की हे मुगाचे डोसे म्हणजे आपणही अगदी आईआज्जीसारखेच कर्तृत्ववान आहोत की कसलं भारी वाटलं मला मग. ताबडतोब रात्री साडेआठ वाजता मुग भिजत घातले , मध्यरात्री बरोब्बर एक वाजता अलार्म लावला आणि उठुन ते उपसले. आणि आज सकाळी बेकफास्टला मुगाचे डोसे तयार.>>>

चूकुन जास्त मुग भिजवले गेल्यामुळे ते संपवण्यासाठी केलेला यशस्वी प्रयोग>>>> टिंबा/टिंबे...डोसे बनवण्यासाठीच मुग भिजवले ना....मग ते संपवण्यासाठी केलेला प्रयोग असे का लिहिले आहेस

अरे काय टिपी लोक आहात तुम्ही. Lol
>> ता.क. : असले काही करु नये. तेलकट शेंड्या (नारळाच्या) फेकून द्याव्यात. प्रिल वापरुन झालं की बाटली प्लॅस्टिकवाल्याला देऊन टाकावी.

claps Rofl

आणि हां रेसिपी मस्त. Happy

मी तर असं काही करुच शकत नाही.....आमच्या इथे बिनशेंडीचेच नारळ मिळतात Sad

दसर्याच्या वेळेस माहवाच्या मंदिरात घटा बसवण्यासाठी वापरलेले सगळे नारळ बिनशेंडीचे होते.

अरे काय मजा चाललीय!
मी मुगाचे पोळे करताना भिजवलेली डाळ वाटून त्यात ओली मिरची+आले(बारीक चिरून्)+कांदा+कोथिंबीर घालते.
पण .चे मु डोसे रेसिपी मस्त +सोपी आहे.पुढच्यावेळी तसे करून पाहीन.

@sonalisl
डोसे बनवण्यासाठीच मुग भिजवले ना....मग ते संपवण्यासाठी केलेला प्रयोग असे का लिहिले आहेस<<<<<<< कोणे एके काळी मुग जास्त झाल्याने केलेला प्रयोग यशस्वी झाला होता आणि त्यानंतर मी ते बरेचदा केले
पण काल मालिका पाहताना मलाही हे येतात म्हणजे मीही कर्तृत्ववान हा साक्षात्कार झाला आणि मी उत्साहाने मुग भिजत घातले, असो
सगळ्यांचे आभार.

अरे...मी करते हे डोसे फक्त कोथिंबीरी ऐवजी किंवा शिवाय पालक/ग्रीन लीफे लेट्युस असं पण काय काय घालते मिक्सर मधून काढतानाच आणि शिवाय तांदळाचं पीठ थोडे क्रिस्पी व्हायला.
भारी लागतात हे डोसे/पेसरट्टू जे काये ते.

Pages