फटाकेमुक्त दिवाळी

Submitted by प्रकाश घाटपांडे on 26 October, 2013 - 08:12

दिवाळी हा खरा तर दिपोत्सव. त्यात हे फटाके कुठून घुसले काय समजत नाही.पुर्वी दुष्ट शक्तींना जवळपास फिरकू न देण्यासाठी ढोला सारखी वाद्ये वाजवली जायची.कदाचित दिवाळी सारख्या मंगल सणामधे दुष्ट शक्ती चा वावर नको म्हणुन फटाके वाजवण्याची प्रथा आली असावी.

फटाकेनिर्मितीत वापरले जाणा-या रसायनांमुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात. फटाक्यांमुळे हवा आणि वातावरण दूषित होते.त्यामुळे श्वसानाचे आजार वाढतात. ध्वनीप्रदूषणाची पातळीही वाढते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवण क्षमता कमी होते.फटाके फोडल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारी वायू वातावरणात पसरतात. ओझोनचा थर पातळ होतो.एकदा मराठी विज्ञान परिषदेचा फटाक्यामागील विज्ञान या कार्यक्रमात फटाक्यात वापरल्या गेलेल्या रसायनांबदद्ल स्लाईड शो कार्यक्रम दाखवला होता.
कॉपर मुळे श्वसननलिकेत त्रास कॅडमियम मुळे किडनीला धोका आणि अ‍ॅनेमिया.शिशाचा मज्जासंस्थेवर परिणाम अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.तपशीलात थोडाफार फरक असू शकतो. अशा प्रदुषण करणार्‍या फटाक्यांपासून मुक्त राहून दिवाळी साजरी करता येणार नाही का? नक्कीच येईल. फटाक्या शिवाय दिवाळी ही कल्पनाच काहींना करवत नाही. कारण दिवाळी आणी फटाके यांची संलग्नता मेंदुमधे ठामपणे कोरली गेली आहे.पिढ्यान पिढ्या ती संक्रमित होत गेली आहे.कालसुसंगत नसलेल्या अनेक प्रथा परंपरा आज पाळल्या जातात.खर तर कालबाह्य रुढी परंपरा या एक प्रकारच्या अंधश्रद्धाच आहेत.मनाला वाटणार्‍या असुरक्षिततेमुळे ते मोडण्याचे धाडस आज बर्‍याच लोकांना होत नाही.अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ ही एक व्यापक समाज परिवर्तनाची चळवळ आहे.त्यामुळे अंनिस फटाकेमुक्त दिवाळीचे अभियान नेहमी राबवते. विद्यार्थ्यांमधे ही पर्यावरण जागृतीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे त्यांना फटाके मुक्त दिवाळीचे महत्व पटू लागले आहे.काही सुसंस्कृत पालक ही आपल्या मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम पटवून त्यापासून परावृत्त करु लागले आहेत. डॊ नरेंद्र दाभोलकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काही युवकांनी व विद्यार्थ्यांनी स्वत:हून फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे ठरवले आहे.पाहू या काय होते ते!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिवाळीच्या दिवसांत भारतात आलो तर मुलांना नक्की फटाके आणीन मी. कॅनडात त्यांना फटाके माहीतच नाहीत त्यामुळे मुद्दाम सिटीचे नियम बघून चालणार आहेत का वगैरे अजिबात बघणार नाही. जी प्रथा नाही ती मुद्दाम पाडायची नाही.
बाकी थेंबे थेंबे तळे वगैरे निबंधात ठीक आहे. दुसऱ्यांना कमीतकमी त्रास होऊन जिथे फोडणे शक्य असेल तिथे मुलांची फोडायची इच्छा असेल तर त्यांना नाही म्हणणार नाही. मी प्रदूषण वाढवणाऱ्या इतक्या गोष्टी करतो त्यात मुलांनी एक केली तर... अर्थात हे त्यांना सांगणार नाही. त्यांना प्रदूषण इ. माझ्यापेक्षा जास्त समजते, ती जास्त सजग आहेत. त्यांनाही हे नको हे समजेलच.

हो ना. क्रिकेटपटू कुठं पॅड, हेल्मेट, ग्लोव्ह्ज वगैरे घालतात?
तसेच तर खेळतात. हलक्याशा लहान मुलांच्या चेंडून खेळणे काय आणि मोठ्यांनी लेदर बॉल वगैरेचे खेळणे काय दोन्हीही सारखेच. चालताना आणि घसरगुंडीवरून पडणे काय आणि रॅपेलिंग करताना पडणे काय सारखेच. कोणी पडू नये म्हणुन सेफ्टी गिअर्स वावरतात का रॅपेलिंग करताना?

तसेच टिकल्या फोडणे काय किंवा मोठे बॉम्ब फोडणे, रॉकेट उडवणे काय दोन्ही सारखेच. फार तर डोळा फुटेल, भाजेल काही दिवस दुखेल. त्यात काय एवढे?

इलॉन मस्क आपल्या सगळ्यांना मंगळवार नेणार आहे त्यामुळे कोणीही प्रदूषणाची चिंता करू नये.मंगळवार प्रदूषण झालं की युरोपा. त्यामुळे फक्त ईजा होणार नाही याची काळजी घेतली तरी पुरे. मध्यंतरी इलॉन मस्क चा इंटरव्ह्यू ऐकत होतो तेव्हा तो बोलत होता की मंगळवार एक न्यूक्लिअर स्फोट करायला लागेल तरच तिथलं वातावरण मनुष्य वस्तीसाठी पोषक होईल. स्फोट केल्याने मनुष्याला पोषक वातावरण तयार होतं हे आपल्या पूर्वजांना माहीत होतं त्यामूळे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे फटाके फोडायला सुरवात केली असावी. नन्तर मस्क असा पण बोलला की सगळयात आधी तो फटाके फोडणाऱ्या भारतीय लोकांना मंगळवार नेणार आहे. जेणेकरून ते फटाके फोडतील आणि मंगळावरील वतातरण समतोल राहण्यास मदत होईल.

मानव - संरक्षक गोष्टी घालण्याबद्दलचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. कमीतकमी लहान मुलांना तसेच करायला लावले पाहिजे. सुरूवातीला त्याची टिंगल होईल पण हळुहळू वापर वाढत जाईल. हेल्मेट आणि सीट बेल्ट बद्दल झाले तसे.

उदय - दोन्ही लिन्क्स बद्दल धन्यवाद. प्रदूषण या दिवसांत वाढते हे नक्की. त्याबद्दल उपाय करता येतील. फटाक्यांमधे काय वापरू शकता याबद्दलचे नियम - हळुहळू त्यातील अपायकारक गोष्टी बाद करत जायचे ४-५ वर्षांचे टार्गेट देउन कोणाच्याही पोटावर पाय न देता हे बदलता येइल., उडवायच्या वेळा वेगवेगळ्या असणे वगैरे. याबाबतीत विकसित देशांत काय निर्बंध आहेत ते बघून तेथून सुरूवात केली तरी बराच फरक पडेल.

सिडनी मधले शहरातर्फे केले जाणारे नवीन वर्षाचे फायरवर्क्स म्हणे १००% कार्बन फुटप्रिंटफ्री आहेत!

>> फटाक्यातून आनन्द मिळतो हा आपला mindset च बदलायची गरज आहे. जसे काही पदार्थ आपल्याला त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या आठवणींमुळे आवडतात तसंच फटाक्यांच आहे. पण फटाके जीवावर बेतू शकतात एवढे ते धोकादायक आहेत. मुलांना आपण गॅस जवळ जाऊ देत नाही आणि बिनधास फटाके हातात देतो. आम्ही लहानपणी फटाक्यातून जी मजा उपभोगली ती मुलांना ही मिळायला हवी हा विचार बदलणे गरजेचे आहे. त्यांना शाळेत एक शिकवतायत घरी एक शिकवतायत ह्यातून त्यांचा गोंधळ वाढेल.

हा मनिमोहोर यांचा प्रतिसाद आवडला. आपण सारे लहानपणी फटाके आणताना बजेट बघून जपून आणायचो. आपल्याला हवा असलेला आयटेम बजेट बाहेर असल्याने आणू शकत नव्हतो. या अठवणींचा नकळत परिणाम होतो व आपण नाही निदान मुलांना तरी एन्जॉय करू द्या या भवनेतून फटाके आणतो. पण मुलांना मुळातच फार आवड नसेल तर न आणलेलेच उत्तम.

इथे सर्व घरे लाकडाची आहेत, फटाके अजिबात उडवू नयेत, आग लागली तर सोसायटीतील सर्वांचाच इन्शुरन्स प्रिमियम वर जाईल, असे पत्र दर वर्षी येते तरीही काही लोक उडवतातच.

भारतात सुप्रीम कोर्ट चा बॅन आहे फटाक्यांवर व ग्रीन - इकोफ्रेंड ली फटाके वाजवयलाच परवानगी आहे. पण लोक आदेश धुडकावून फटाके वाजवत आहेत.

गेले दोन दिवस आमच्या सोसायटीतला एक बाप मोठे फटाके लावतो. त्यावेळी त्याचा सहासात वर्षांचा मुलगा कानात बोटे घालून उभा असतो. याच्या अधेमधे मुलगा अनार, भुईचक्र लावातो. एक चांगलं की हा कार्यक्रम अर्धा तासभरच चालतो.

काल समोरच्या सोसायटीच्या आवारात राहणारा stray dog सोसायटीतील असलेल्या दवाखान्यात शिरला.डॉक्टरने ओरडून, घाबरवून पाहिलं. शेवटी त्याला झाडूने मारलं तरीही ते कोकलत तिथेच थांबून पाहत होतं.

लहानांनी फटाके वाजवल्यास होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा मोठ्यांना गाडी एसी पीसीचा वापर कमी करा सांगताच फटाक्यांपासून होणाऱ्या अपघातांवर आला आहे

प्रगती आहे Happy

काहीही वाद चालू आहेत... फटाके आपण उडवले ना लहानपणी... मजा केली ना?मग नव्या पिढीला का उपदेश कि नका उडवू फटाके... आता हे म्हणू नका फटाके उडवण्यात काय मजा... हे म्हणजे पॉ पेट्रोल, पीजे मास्क आपल्याला बोरिंग वाटते म्हणून मुलांनी बघू नये प्रकार झाला...

जगाची लोकसंख्या वाढतेय म्हणून आपण मुलच जन्माला घालायचे नाही असा प्रकार आहे हा...

एका फुफ्फुसाचा कर्करोग झालेल्या रुग्णाला औषधोपचार परवडत नसतात. डॉक्टर त्याला सल्ला देतात की बाबारे तू दर आठवड्याला आपल्या मित्रांना भेटायला बारमध्ये जातोस तिथे खूप सिगारेटचा धूर असतो आणि त्यामुळे तुझे पॅसिव्ह स्मोकिंग होत आहे. तर तू मित्रांना इतर कुठेतरी भेट. किमान एवढं तरी तू करूच शकतोस. त्यावर रुग्ण म्हणतो नाही तो वास आला की मला माझ्या मित्रांना भेटल्यासारखे वाटते. त्या वासाशिवाय आमची भेट पूर्ण झाल्यासारखी वाटत नाही. तसे काहीसे ही वरची arguments वाचून वाटले. झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे करणे अवघड असते. तेव्हा चालू देत.

जग हे भयंकर हिपोक्रीसीने भरले आहे.
स्वतः अणुबॉम्ब टाकतात आणि मग पुढच्या पिढीने तो वापरु नये एवढेच काय बनवूच नये म्हणु दबाव आणतात.

स्वतः वाट्टेल तिथे, वाट्टेल तेव्हा, वाट्टेल तेवढे धूम्रपान करतात आणि पुढच्या पिढींना धूम्रपान हानिकारक आहे करू नका असे आव्हान करतात आणि सार्वजनीक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी घालतात.

स्वतः वाटेल तेवढ्या धूर ओकणाऱ्या गाड्या वापरल्या आणि पुढच्या पिढीवर प्रदूषण मर्यादित ठेवणारे इंजिनच वापरण्याचे, दर सहा महिन्यांनी प्रदूषण तपासून पाहण्याचे कायदे करतात.

आपण वाट्टेल तसे प्लास्टिक वापरतात आणि पुढल्या पिढीला वापरू नका करत इथे तिथे बंदी आणतात.

आपण स्वस्त: स्वस्तातले CFC युक्त रेफ्रिजरंट असणारे फ्रीज, एसी वापरतात आणि पुढच्या पिढीला त्यावर बंदी घालून ।महागडे CFC फ्री रेफ्रिजरंट वापरण्याचे कायदे करतात.

या सगळ्याचा धिक्कार करुन वर उल्लेखलेल्या व उल्लेख राहून गेलेल्या सर्व गोष्टी कसल्याही बंधना शिवाय मुक्त वापरण्यास परवानगी द्यावी अशी मी मागणी करतो.

लहान मुलांच्या हातात फटाके रुपी आग म्हणजे तू पहिल्या मजल्यावरून उडी टाक , आम्ही पण सर्रास मारत होतो लहानपणी . आम्हाला कुठे काय झालंय ? आमच्या आई बापानी आम्हाला प्रोत्साहन दिलं तसं आम्ही ही देतोय तुला टाक उडी बिनधास अस म्हणण्यासारखं आहे.

बाकी प्रदूषण त्रास वैगेरे राहू दे बाजूला फक्त तुमच्या लाडक्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी तरी फटाक्यांच समर्थन कधी ही होऊ शकत नाही.

दिवाळीत.आनन्द मिळवण्याचे दुसरे खूप मार्ग आहेत हे पालकांनी मुलांना समजवायला हवं. मुलाला कावीळ झालीय आणि तो मागतोय म्हणून द्याल त्याला बटाटेवडे की समजावालं त्याला नको खाऊ म्हणून? तुम्ही ड्रिंक घेताय मुलाने मागितलं तर द्याल घे मी पितोय तू पण पी म्हणून की परावृत्त कराल ? ह्याचा विचार करा आणि मग समर्थन करा फटाक्यांचं.
बाकी वादासाठी वाद असेल तर मग चालू दे असच

मानव तुम्ही ऍपल आणि ऑरेंज कंपेयर करताय...
दिवाळीचे फटाके आणि अणुबॉम्ब काय संबंध आहे का..खरेच वादासाठी वाद चालू आहे...

त्यात अणुबॉम्ब मुद्दाम टाकला आहे, वादासाठी वाद घालणारे फिल्टर आउट करायला. तुम्ही त्यातील फक्त तेव्हढेच उचलुन ते सिद्ध केले.

आम्ही इकडेही उडवले फटाके दिवाळीत.. आणि 4th जुलै ला प्रचण्ड प्रमाणात उडवतो.... मुले वाट बघत असतात फायरवर्क ची... या धाग्यावरचे मेसेज वाचले तर फटाके उडवणारे भरपूर आहेत आणि त्यात चुकीचे मला तरी काही वाटत नाही...

मानव, दांभिकपणा पोस्टला अनेक मम!
ममो, वादासाठी वादच दिसतो सगळीकडे. श्रीराम लागूंचा मुलगा दगड लागून गेला तर ते ही असं म्हणल्याचं आठवतंय की दगड भिरकावून त्या मुलाला काय आनंद मिळाला असेल किंवा इतर अनेक अनअपायकार गोष्टीतून आनंद मिळू शकतो त्याचा शोध घ्यायला हवा.

आमच्या ओळखीत पण एक आहेत ते फटाके उडवू नका म्हणत असतात नेहमी....नंतर कळले कि त्यांची मुले मोठी आहेत आणि लहानपणी मस्तपैकी फटाके उडवून झालेली आहेत...

लहान मुलांना आवर्जून फटाके आणून दिले पाहिजेत आणि मोठया माणसांच्या देखरेखेखाली योग्य ती काळजी घेऊन त्यांनी ते वाजवले पाहिजेत. विनाकारण प्रदूषण होतंय म्हणून लहान मुलांना त्या आनंदापासून दूर ठेवणे बरोबर नाही. जवळपास सगळ्याच मुलांना फटाके उडवावेसे वाटत असतात. आता थोड्या वर्षांनी दिवाळीत चकल्या खाऊ नका त्याचा आकार भुई चक्रासारखा असतो, लाडू खाऊ नका त्याचा आकार सुतळी बॉम्बसारखा असतो असंही काहीजण म्हणतील.

च्रप्स, आनंद आणि सुरक्षितता हा मुद्दा मुख्य आणि उप वाटू शकतो पण तो ही मुख्यच *पर्यावरण*
टू व्हीलर, फोर व्हीलर वापरून झाल्या ( आता वाहन नाही )तेव्हाची गरज होती पण आता सिटी बस. हा स्वतः पुरता केलेला बदल कुणाला वापरू नका सांगत नाही.

च्रप्स, तुमच्या आजूबाजूची हवेच्या प्रदूषणाची पातळी जर वर्षभर धोकादायक ते अतिधोकादायक अशी असती तर तुमच्या तिथल्या स्थानिक प्रशासनाने फटाके उडवण्यावर रीतसर बंदी घातली असती आणि तुम्ही ती मुकाटपणे पाळली असती. फटाक्यांनी प्रदूषण (हवा, पाणी, ध्वनी) होते आणि त्यात धोकाही असतो हे सत्य आहे. तुम्ही जिथे राहता तिथे तुमच्या सारखे लोक कमी आहेत आणि एकूण प्रदूषण पाहता ते परवडत आहे म्हणून तुम्हाला प्रदूषण करण्याची सूट मिळाली आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही जे करत आहात ते योग्य आहे.

च्रप्स तुम्ही अगदी योग्य करताय. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे लहान मुलांना फटाक्यांचा पाहिजे तो आनंद तुम्ही लुटू देताय. मी पण लहानपणी खूप फटाके उडवलेत. त्यावेळी २००-३०० रुपयांत भरपूर फटाके यायचे. माझ्या सगळ्यात बेस्ट आठवणींच्या यादीत फटाक्यांची आठवण आहे.

आमच्या ओळखीत पण एक आहेत ते फटाके उडवू नका म्हणत असतात नेहमी....नंतर कळले कि त्यांची मुले मोठी आहेत आणि लहानपणी मस्तपैकी फटाके उडवून झालेली आहेत... >> मला तरी ह्यात गैर काही दिसत नाही. आपण मुलांना फटाके लावायला दिले हे आपलं चुकलंच नशिबाने मुलांना काही झालं नाही असं त्याना आता वाटत असेल. आणि ते नो फटाक्यांच समर्थन करत असतील.
आत्ता जे समर्थन करतायत त्याना ही भविष्यात त्यांची चूक समजून येईल आणि ते ही नो फटाक्यांचे समर्थक होतील अशी मी आशा बाळगते.

जग हे भयंकर हिपोक्रीसीने भरले आहे.
>>>>>
+७८६ मानव पृथ्वीकर

आज प्रदूषणाचा प्रॉब्लेम ईतका आहे, तरी लोकांची गाड्या घेण्याची आणि ती मिरवण्याची हौस काही फिटत नाही. ऑफिसला जायला वा नेहमीचे फिरायला पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरू शकतो, पण मग आमच्या स्टेटसचे काय, आम्ही आमची चारचाकीच वापरणार. त्यात मग ट्राफिकच्या गर्दीत गरम होतेय तर एसीही लावणार. स्वतः भकाभका गाडीतून धूर ओकणार पण काय ट्राफिक वाढलेय, किती प्रदूषण होतेय म्हणून स्टेअरींगवर हात आदळत शिव्या घालणार.
लोकं फेसबूकवर गाडी घेतल्यावर कॅप्शन काय देतात ठाऊक आहे का? न्यू मेंबर ईन फॅमिली. अरे एका धूर ओकणार्‍या यंत्राला तुम्ही वेलकम टू फॅमिली करता? दसर्‍याला त्याच्यासोबत नटूनथटून फोटो काढता? मला तर हसावे की रडावे कळत नाही..

या लोकांमुळे खरे तर मुलांना समजावूनही सांगता येत नाही की दिवाळीचे दोन दिवस फटाके वाजवू नकोस रे, प्रदूषण होते. कारण मुले घराबाहेर पडली की यांनी वाढवलेल्या ट्राफिकचे प्रदूषण बघतच असतात. मग माझ्याच फटाक्यांच्या मौजेला का बाबा तुम्ही अडवत आहात याचे उत्तर देता येत नाही.

बरे फटाके फक्त मौजमजेसाठी असतात म्हणून ते टाळू शकतो, आणि गाडी/एसी ही एक महत्वाची गरज आहे म्हणून ती टाळता येत नाही असेही सांगता येत नाही. कारण मी स्वतः गाडी न घेता पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरतोय, ईम्युनिटीची वाट लागू नये म्हणून एसीच्या कमीतकमी वापराबद्दल आग्रही असतो. त्यामुळे या गोष्टी टाळता येतात हे मुलांना कळते. पण तरीही ते कोणी टाळत नाही हे त्यांना दिसते. मग आमच्याच दोन दिवस तुरळक फटाके वाजवण्याने काय होणार आहे हे त्यांना समजावणे अवघड जाते. (ईथे तुरळक म्हटलेय कारण लहान मुले थोडेसे फटाके वाजवून खुश असतात).

असो, सांगायचा मुद्दा हा की मोठ्यांनी स्वतः मात्र बदलायचे नाही आणि सगळी अपेक्षा सॉफ्ट टारगेट आहेत म्हणून लहान मुलांकडून धरायची हे काही पटत नाही. आपण आपल्या दैनंदीन लाईफस्टाईलने प्रदूषणाला हातभार लावतोय म्हणून कोणीही आपली लाइफस्टाईल चेंज करून गावाला जायला तयार नाही होणार हे फॅक्ट आहे. आजूबाजूला जीवघेणी स्पर्धा चालूय, सारे नुसते धावताहेत, आणि आपल्यालाही त्यातच धावायचे आहे. फक्त सोशलसाईटवर मुलांनी फटाके वाजवू नये अश्या पोस्ट टाकल्या की आपण आपले कर्तव्य बजावले. जग हे भयंकर हिपोक्रीसीने भरले आहे. +७८६ मानव पृथ्वीकर

मी फटाके साधारण शालेय वयातच वाजवायचे सोडून दिले जेव्हा त्यातून केवळ धूरच निघतो हे जाणवले. पण हेच प्रदूषणाचा मुद्दा घेऊन माझ्या सात वर्षाच्या मुलीला फटाके नको वाजवूस असे सांगू शकत नाही कारण त्याला कुठेतरी जबाबदार आजूबाजूला वावरणारी हिच हिपोक्राईट लोकं आहेत जी या ना त्या कारणाने भरमसाठ प्रदूषण करत आहेत जे मुलांनाही दिसतेय. आणि उद्या हिच लोकं मला सुनावू लागली की काय रे मुलांना फटाके वाजवायला कसा देतोस, प्रदूषण वगैरे काही कळते की नाही तुला, तर मी त्यांना कोपरापासून नमस्कारच करू शकतो.

तरी यावेळी ओवरऑलच फटाक्यांचे प्रमाण आमच्याईथे कमी दिसले. परीणामी आमच्याकडेही एकच दिवस फटाके वाजवले गेले. उरलेले पुढच्या वर्षीसाठी ठेवले. ते मुद्दाम संपवूयाच असा हट्ट मुलीनेही केला नाही. यातून मी मागच्या एका पोस्टमध्ये मांडलेला मुद्दाच पुन्हा अधोरेखित झाला की जर आजूबाजूलाच फटाके कमी वाजवले जाताहेत हे दिसले तर मुलांना समजावणे सोपे जाते. ते हट्ट नाही करत, त्यांचा हिरमोड नाही होत.

अरे हो, वरच्या माझ्या पोस्टमधील उल्लेखावरून एक सहज आठवले. मी फटाके सोडले त्यामागे एक वेगळेही कारण होते. तेव्हा आम्ही चाळीत राहत होतो. अर्थात चाळ कल्चर असले तरी लाकडी चाळ नव्हती, आरसीसी स्ट्रक्चर होते. पण एके वर्षी रिपेअरींगचे काम चालू होते. बिल्डींगची रचना फार ऐसपैस असल्याने आमच्याकडे बिल्डींगमध्येच फटाके वाजवले जायचे. पहिल्या दिवशी नेहमीप्रमाणे पहिली आंघोळ करून फटाके वाजवायला सुरु होताच आम्हा थोडे अक्कल येऊ लागलेल्या मुलांना जाणवले की बिल्डींगला हादरे बसत आहेत जे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे दुपारीच आमच्या टीमने तातडीची मिटींग घेऊन ठरवले की यंदा बिल्डीगमध्ये तरी धडामधुडूम फटाके नको वाजवूया. वाटल्यास बाहेर कुठेतरी जाऊन मोकळ्या मैदानात वाजवूया. वा गच्चीवरून रॉकेट तेवढे सोडूया. संध्याकाळी फिरून हे सर्वांना सांगितलेही. ते सर्वांनी ऐकलेही. त्यानंतरच्या वर्षीपासून आमच्या येथील पोरांचे बिल्डींगमध्ये फटाके वाजवणे बंद झाले. आणि माझे सगळेच बंद झाले.

लहान असतांना अनेकांनी फटाके फोडले होते. मी पण फोडले होते. त्या कर्णामधुर आवाजातून, विविध रंगांचे प्रकाश आणि भुरळ पाडणारा धुर... मी पण आनंद घेतला आहे. त्या वेळी मला फटाके उडविण्यातला / फोडण्यातला केवळ आनंद दिसायचा. त्यापासून होणारे तोटे, आवाजाचे भयंकर प्रदूषण, त्यामधून निघणारे आणि श्वसनाला त्रासदायक ठरणारे वायू / particulate matter याबद्दल मला काडीचेही ज्ञान नव्हते. तेव्हा कुणी मोठ्यांनी सांगितले नाही.... आणि प्रदूषणाबद्दल समाजाचे ज्ञान, पर्यावरणाबद्दलची जागृकता/ सजगता आजच्या एव्हढी नव्हतीच.

माझ्या लहान पणी , सुतळी किंवा लक्ष्मी बाँब दिवाळी, तसेच अनेक कार्यात सर्रास फोडले जायचे. सुतळी बाँब चा आवाज १४५ dB पर्यंत असतो.
https://web.archive.org/web/20131203052156/http://articles.timesofindia....

मी चुकलो , १०० % चुकलो पण म्हणून मी आजच्या पिढीला "तुम्ही फटाके उडवू नका" असे सांगायचेच नाही हे मला पटत नाही. अज्ञानामुळे आम्ही चूक केली पण तुम्ही तशी चूक करु नका असे सांगणे जास्त योग्य ठरेल.

एखाद्या व्यक्तीला तंबाखू / बिडी चे वाईट्ट व्यसन आहे. तरुणपणांत त्याने आनंद घेतला, अनेक वर्षे आनंद घेतला. कालांतराने त्याला घशाचा /फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. आता त्या व्यक्तीने त्याच्या आसपासच्या तरुण पिढीला तंबाखू पासून होणार्‍या शारिरीक हानीची तसेच दुष्परिणामां बद्दल सांगायचे नाही का? जरुर सांगायचे, मी चुकलो पण तुम्ही चुका करु नका असे सांगितले तर त्यांनाही ते पटेल.

आज प्रदूषणाशी संबधित जि वैज्ञानिक माहिती समोर येत आहे त्या माहिती कडे डोळेझाक करणे आत्मघात ठरेल.

समजा ( केवळ समजायचे... Happy ) वस्तुस्थितीवर आधारित माहिती आहे. विविध प्रकारच्या फटाक्यांपासून निर्माण होणारे प्रदूषण आणि हवेतले PM2.5, PM10 चे वाढलेले प्रमाण यांचा दाट संबंध आहे. आज दिल्ली तसेच उ. भारतातले अस्वच्छ चित्र स्वच्छ प्रकारे दिसत आहे. निव्वळ फटाके हेच कारण आहे असे मी समजत नाही, इतरही ( शेतातला पेंढा जाळणे, वाहतूक) कारणे आहेत, पण फटाक्यांमुळे भिषणता वाढत आहे हे स्पष्ट दिसत आहे. सर्वच पातळ्यांवर प्रयत्न होणे गरजेचे आहे.

समोर येत असलेल्या नव्या माहितीच्या आधाराने मी पुढच्या पिढीला सतर्क करणे हे मला जबाबदार नागरिकाचे कर्तव्य वाटते. धोक्याची पुर्ण कल्पना असतांनाही मी पुढच्या पिढीला सतर्क / सावध केले नाही तर ते उद्या काय म्हणतील?

मी आनंद घेतला मग आता मुलांनी घेतला तर बिघडले कुठे असे तर्कशास्त्र हास्यास्पद आहे.

<< आमच्या ओळखीत पण एक आहेत ते फटाके उडवू नका म्हणत असतात नेहमी....नंतर कळले कि त्यांची मुले मोठी आहेत आणि लहानपणी मस्तपैकी फटाके उडवून झालेली आहेत... >>

------ यात मला काही गैर दिसत नाही. कालानुरुप मनुष्याचे विचार बदलतात, समोर एखादी नवी माहिती आल्यावर मी माझी भुमिका तपासतो, आणि प्रसंगी बदलतो. क्वचित प्रसंगी , माझी आजची भुमिका काल घेतलेल्या भुमिकेच्या अगदी विरुद्धही असेल...

तुम्हाला जे काही चांगले करायचे आहे ते तुम्ही लहानपणीच केलेले असावे. त्यावेळी जर मोठ्यांनी तुम्हाला काही करायला सांगितले तर लहानपणीच तुम्ही हे कसे चुकीचे आहे हे मी करणार नाही असे बाणेदार उत्तर दिलेले असावे.

अन्यथा एकदा वय १८ च्या वर गेल्यावर तुम्हाला कुणालाही काहीही शिकवायचा, निदर्शनास आणून द्यायचा अधिकार नाही.

तुम्ही लहानपणी माती खाल्ली ना? जे दिसेल ते तोंडात घातले ना ? मग आता तुमच्या लहान मुलांना बिलकुल अडवायचे नाही तसे करण्यापासून. ते नको घालूस तोंडात हे घाल असे अजिबात करायचे नाही. करत असाल तर तुम्ही दुटप्पी आहात.

Pages