मेथीची पातळ भाजी

Submitted by अल्पना on 8 October, 2013 - 00:37
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक मेथीची जुडी, एक- दीड मुठ भाजलेले शेंगदाणे किंवा अर्धी वाटी दाण्याचं कुट, ८-१० लसूण पाकळ्या, २ हिरव्या मिरच्या, जीरे, मीठ, हळद, फोडणीपुरतं तेल.

क्रमवार पाककृती: 

मेथीची जुडी निवडून, धूवून, चिरून घ्यावी. शेंगदाणे, मिरच्या, लसूण, जीरे आणि मीठ पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. हे सगळे पदार्थ जितके मिळून येतिल तितकं चांगलं.

कढईत तेल-जीरे, हळदीची फोडणी करून त्यात मेथी परतून घ्यावी. १-२ मिनीट झाकण ठेवून शिजवावी. नंतर यात शेंगदाण्याचं पातळ वाटण घालून १०-१२ मिनीट उकळू द्या. भाजी तयार.

ही भाजी चपाती /भाकरी चुरून खाण्याइतपत पातळ असते.

औरंगाबादच्या आजूबाजूच्या भागात करतात बहूतेक अशी भाजी. आमच्या घरी, शेजारी कधी खाल्ली नव्हती. पण जावेच्या आईकडे त्यांच्या स्वैपाकाच्या बाईने करुन खाऊ घातली. तेंव्हापासून ही माझी आवडती भाजी झाली आहे.

वाढणी/प्रमाण: 
२-३ जण
अधिक टिपा: 

पातळ असल्याने ही भाजी नेहेमीच्या मेथीसारखी चोरटी होत नाही. घरात एखादीच मेथीची जुडी असेल तर करायला सोयीची.
चिन्नु आणि इतरांनी दिलेल्या टिपा -
१.या भाजीत उकडलेला कांदाही घालतात. कांदा सालपटं काढून उकडायचा आणि चिरा देऊन ग्रेव्हीत सोडा. तेव्हढा वेळ नसेल तर कांदा सालासकट गॅसवर भाजायचा व गरम ग्रेव्हामध्ये चिरा देऊन घालायचा.
कांद्याची पातही मस्त लागते.
२. यातच थोडीशी शिजवलेली तुरीची डाळ पण मॅश करून घालता येते.
३. कच्ची हिरवी मिरची घेण्यापेक्षा भाजलेली हिरवी मिरची, मिरे पण वाटणात घालतात.
४. या पद्धतीने सगळ्या पालेभाज्या करता येतिल.
५. अशाच प्रकारच्या ग्रेव्हीमध्ये इतर भाज्या - घोसाळी, दोडकी, दुधी पण करतात.

माहितीचा स्रोत: 
अंतिका मावशी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त! ही जळगावी पद्धत आहे. Happy

तिथे आम्हाला होस्टेलच्या मेसमधे सगळ्या पालेभाज्या अशाच पद्धतीने मिळायच्या.

सही!!
मस्त आहे ही भाजी. शेंगदाण्याच्या कुटाची कधी केली नाहीये. आता मेथी आणली की हीच अशीच भाजी करणार.

मस्त वाटतेय.
फक्त चार तास उशीरा पाहीली रेस्पी. नाहीतर आजच केली असती. आता परत मेथी आणली की करुन पहाणार

हो चनस! 'त्या' मुली गरमागरम पोळींचा बारीक चुरमा इतक्या फटाफट करायच्या की बघतच रहावं. मग त्याचं आळं करुन त्यात अशी भाजी किंवा वरण टाकायचं. आणि कालवुन खायचं. अप्रतिम चव!! Happy

शेंगदाण्याचे वाटप हे खास धुळे / जळगाव / नाशिक / औरंगाबाद भागातले. छानच लागते.
इथे अंगोलात पण शेंगदाण्याचे वाटप लावून कोबीची भाजी करतात. दाणे भाजून त्याचे केलेले कोरडे रवाळ पिठ, इथे तयार मिळते.

मस्त Happy

मी मूगडाळीबरोबर मेथी शिजवते आणि मग अशाच पद्धतीने दाण्याचं कूट, लसूण, मिरची घालून करते. एका जुडीत बरीच भाजी होते मग.

मला वाटतच होतं जळगाव भागात पण करत असणार या पद्धतीनं. औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड, फुलंब्री भागात करतात.

सावली, मी काल रात्री केली आणि रात्री इथे रेसेपी टाकायचा प्रयत्न पण केला. सगळी रेसेपी टाइप केल्यावर नेट बंद पडलं, म्हणून काल नाही पोस्ट करता आली. नाहीतर तुल आज करता आली असती. Happy

येस्स्स.. जळगावची आठवण आली.
यात मी थोडीशी तूरडाळ शिजवून मॅश करून घालते. भाजी छान मिळून येते.
ही भाजी मेथीची छान लागते पण याच ग्रेव्हीत कांदे उकडून घालता येतात. श्रा.घे. किंवा बीन्सपण मस्त लागतात.
कांदा अक्खा उकडून ऐन ग्रेव्हीत सोडायच्या वेळी पाकळ्या येतील अश्या हलक्याने चिरा द्यायच्या. ग्रेव्हीत सुंदर कमळे दिसतील कांद्याची Happy पार्टीचा हिट्ट आयटेम आहे ही भाजी. वरून कच्च तेल आणि ज्वारीची भाकरी- आईच्या हातची - अहाहा!
यात चिकनपण भारी लागतं म्हणे.

यस्स, ही भाजी आमच्याकडचीच! आठवद्यातून एकदा होतेच.
पण एक बदल आहे, हि. मिरच्या पण भाजून घ्यायच्या वाटणात.

चिन्नू, एका पोस्टीत किती रेसिप्या दिल्यास?

याच ग्रेव्हीत तुरीची डाळ म्हणजे काय? तुरीची डाळ शिजवून ती दाणे, लसूण, मिरच्यांच्या वाटणात मिसळायची का?
याच ग्रेव्हीत कांदा उकडून म्हणजे काय? कांदा उकडून दाणे, लसूण, मिरच्यांबरोबर वाटायचा का?

याच ग्रेव्हीत तुरीची डाळ म्हणजे काय? तुरीची डाळ शिजवून ती दाणे, लसूण, मिरच्यांच्या वाटणात मिसळायची का? >>> हो बहूतेक तसंच असावं. डाळ-मेथी विथ शेंगदाणा कुट वाटण. Happy

याच ग्रेव्हीत कांदा उकडून म्हणजे काय? कांदा उकडून दाणे, लसूण, मिरच्यांबरोबर वाटायचा का? >>> नाही. मला वाटत दाणे-लसूण मिरच्यांच्या वाटणाच्या ग्रेव्हीमध्ये उकडलेला कांदा सोडायचा. चिन्नू ---- स्पष्टिकरण दे.

दाण्याच्या कुटावालं चिकन >>> हे कधीच ऐकलं नाहीये.

आशु, मी आत्तापर्यंत नेहेमी कच्चीच मिरची घातली आहे वाटणात. पुढच्या वेळी भाजलेली घालून बघेन.

दक्षिणा, शेपुची पण छान लागेल अशी पातळ भाजी. मी पालकाची पण करून बघणार आहे. वर लिहिलंय ना आर्याने की सगळ्या पालेभाज्या अश्या करता येतात.

आले आले.

कांदा सालपटं काढून उकडायचा आणि चिरा देऊन ग्रेव्हीत सोडा. तेव्हढा वेळ नसेल तर कांदा सालासकट गॅसवर भाजायचा व गरम ग्रेव्हामध्ये चिरा देऊन घालायचा. असे मुरलेले कांदे मस्त लागतात भाकरीबरोबर. घरीतर ही भाजी उरतच नाही, पण राहीलीच तर त्यात कांदे शोधावे लागतात Proud लहान लहान कांदे घालून ही भाजी करायची.
कांद्याची पातही मस्त लागते.

हो, तुरीची डाळ शिजवून-मॅश करून घालयची भाजी मिळून यायला (वाटणात नव्हे :अओ:) . पण अगदी थोडीशीच. नाहीतर चव बदलते भाजीऐवजी वरण होतं मग ते. जर डाळ नसेल तर थोडे बेसन पाण्यात भिजवून ग्रेव्ही घट्ट करायची. पण हा अगदी शेवटचा ऑप्शन-यानेही चव बदलते.

मी चिकन खात नाही त्यामुळे त्याबद्दल काही सांगू शकत नाही. एकदा पार्टीला हा प्रकार केला तेव्हा एका मैत्रिणीकडून कळाले चिकनबद्दल. हौशी लोकांनी प्रयोग करून पहावा-आपल्या जबाबदारीवर! Happy

मी मिरच्या भाजून घालते. तसेच वाटणात एखादी मिरीपण घालते. आईने दिलेला गरम मसालापण थोडासा. आणि लसणीची पातपण एक काडी वगेरे. वरून भरपूर कोथींबीर घालायची.

फोडणी देतांना तेल सढळ हाताने वापरावे. वाटण तेलात मस्त तेल सुटेपर्यंत परतावे. भाजी झाल्यावर अस्सा तवंग दिसला पायजेल तेलाचा Proud

मी बर्‍याचदा वरण केले की या भाजीकरता थोडी डाळ काढून फ्रीज करते. मेथी नायतर कांदे असले की लग्गेच भाजी करायची. पोळ्या-भाकर्‍या करणारीचे हाल होतात मग Happy

मुठभर तुरीची डाळ कुकर मध्ये शिजवून घ्यायची. शेंगदाणे, मिरच्या भाजून घ्यायच्या. आले, लसूण, शेंगदाणे,मिरच्या थोडे पाणी घालून मिक्सर मधून वाटून घ्यायचा. गरम तेलामध्ये जीरे, मोहरी ची फोडणी करून त्यात हि वाटलेली चटणी थोडीशी परतावायची . शिजवलेली डाळ घालून नीट मिक्स करून घ्यायचे. चिरलेली भाजी टाकून आवडीप्रमाणे पाणी घालून उकळी आणायची. चवीप्रमाणे मीठ घालायचे. पोळ्यांचा चुरा करायचा, भाजी टाकायची. आणि कला मस्त हाणायचा. लोणच्याचे सार न कांद्या बरोबर अगदी अप्रतिम.
ही आमची जळगाव/ भुसावल ची लेवा पाटील लोकांची पद्धत. अशी कुठलीही पालेभाजी करता येते. गिलकी, दोडकी, दुधी भोपळा पण.

कांदा सालपटं काढून उकडायचा आणि चिरा देऊन ग्रेव्हीत सोडा.> या ग्रेव्हीत मेथी असणार की नाही? की फक्त दाणे+लसूण+मिरच्या+जिर्‍याची ग्रेव्ही?

मंजुतै, मेथी+कांदाभाजीपण करता येते, नुसती मेथी, फक्त कांदापण घालता येतो. वर मनुने लिहीलय तसं गिलकी-दोडकी-दुधीपण (वेगवेगळी) घालता येतात. पण ही भाजी मेथीची किंवा कांद्याचीच छान लागते असं माझं मत.

>>चवीप्रमाणे मीठ घालायचे. पोळ्यांचा चुरा करायचा, भाजी टाकायची. आणि कला मस्त हाणायचा. लोणच्याचे सार न कांद्या बरोबर अगदी अप्रतिम.
मनुबेन मिलाओ हात! Happy
कलाचं फक्त काला कर. वरून कच्चं तेल मस्ट आहे काल्यावर.
मी या भाजीत आलं नाही घालत.

अल्पना, क्या याद दिला दी! आता करावीच लागेल ही भाजी. Happy

<<शिजवलेली डाळ घालून नीट मिक्स करून घ्यायचे. चिरलेली भाजी टाकून आवडीप्रमाणे पाणी घालून उकळी आणायची. चवीप्रमाणे मीठ घालायचे. पोळ्यांचा चुरा करायचा, भाजी टाकायची. आणि कला मस्त हाणायचा. लोणच्याचे सार न कांद्या बरोबर अगदी अप्रतिम.<<

व्वा!काय आठवण करुन दिलीस!! Happy
मी अजुनही गिलक्याची, दुधीची भाजी अशी करते. पण या फळभाज्यांबरोबर पोळीच पाहिजे.
पालेभाज्या असतील तर भाकरी.

चिन्नु नि मन्नु .. धन्स इतक्या व्हरायटीबद्द्ल..
कालच मेथी संपवली पुलाव करुन.. आता परत आणावं लागेल

खानदेशातली पद्धत आहे बहुतेक हि, मी आमच्या डोंबिवलीला 'खानदेशी ठेचा' म्हणून पोळी-भाजी केंद्र आहे, त्यांच्याकडून आणली होती. बऱ्याच भाज्या ह्याप्रकाराने करतात त्यांच्याकडे, गवारपण ह्या पद्धतीने केलेली मिळते तिथे.

मी मेथीची डाळ-दाणे घालून थोडे डाळीचे पीठ लाऊन पातळ भाजी करते किंवा कढी करते ताक घालून.

माझी झटपट पद्धत : मेथी बारीक चिरून तेल आणि चिमूटभरच हळत घालून झाकण न लावता परतून मऊ करायची. मग त्या एकजीव झालेल्या गोळ्याला चमचाभर डाळीचं पीठ लावून आणि थोडं पाणी घालून पुन्हा घोटून घ्यायची. मग तुरीचं साधं वरण त्यात घालून ती पातळ करायची. उकळी आली आणि हवी तेवढी घट्ट/ पातळ असली की तिखट, मीठ आणि आवडत असेल तर ध-जि-पूड घालयची. गूळ घालायचा. अगदी शेवटी मोहरी-जिरे-हिंग-हळद आणि ठेचलेल्या/ बारीक चिरलेल्या लसणीची चळचळीत फोडणी. फोडणी दिल्यावर खमंगपणा कमी व्हायला नको म्हणून लगेच गॅस बंद.

आता अशीपण करून बघेन.

मेथी+कांदाभाजीपण करता येते, नुसती मेथी, फक्त कांदापण घालता येतो. वर मनुने लिहीलय तसं गिलकी-दोडकी-दुधीपण (वेगवेगळी) घालता येतात. पण ही भाजी मेथीची किंवा कांद्याचीच छान लागते असं माझं मत.
<<
काकू, मेथीच्या भाजीच्या बाफवर मेथी वगळून करायच्या भाजीची चर्चा करताय .. किमान वेगळा बाफ काढून तरी लिहा की Proud

Pages