शिक्षण आणि मूल्य - माझं मनोगत

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

रोज भरदुपारी ऑफिसच्या गाडीची वाट पाहताना एक बाई रोज दिसते. तिच्या हाताशी एक आणि पोटात एक अशी अवस्था. हाताशी असलेलं जेमतेम ३-४ वर्षांचं असेल. थोड्या दिवसात पोटातलं ही या जगात येईल.

मला एक प्रश्न रोजच पडतो तिला पाहून. कित्येक होऊ घातलेले आईवडील आपल्या येणार्‍या पाल्याच्या भविष्याचा किती आणि काय विचार करत असतील? स्पर्धा इतकी वाढली आहे. आजच व्हॉटसप वर कुणितरी मुंबईची कहाणी थोडक्यात मांडली होती. ते वाचून मनात आलं की ती कहाणी फक्त मुंबईची नसून भारतातल्या प्रत्येक वाढत असलेल्या शहराची आहे. जगण्यासाठी धडपड. मग एक मूल आधीच असताना दुसर्‍या मुलाचा विचार लोक का करत असतील?

आईवडील होणं ही प्रक्रिया फक्त शारिरिक आहे का? शारिरिक क्षमता आहे म्हणून मूलं जन्माला घालायची का? अर्थात सर्वच लग्न झालेले लोक असा विचार करतात असं नाही. पण जागरूक पालकत्व किती लोक करत असतील असा प्रश्न मला खरंच पडतो... रोजच.

आपणच खाऊनपिऊन सुखी राहण्यासाठी क्षणाक्षणाला मन मारून कसंबसं जगतोय, तिथे अजून एक मूल जन्माला घालून त्याला या जीवघेण्या स्पर्धेत आपण का ढकलतोय असा विचार त्यांच्या मनात एकदा तरी येत असेल का? आपणच आत्ता इतके भरडले जातोय, उद्या पुढे जाऊन ही स्पर्धा आणखी जीवघेणी होईल, त्यात आपल्या पाल्याचा निभाव लागेल का? किंवा त्या स्पर्धेत बळकटपणे उतरवण्यासाठी लागणारी सामुग्री ( शारिरिक्/आर्थिक्/मानसिक) आपण पुरवू शकू का? हा विचार होतो का?

रोज हात धुताना, नळ थोडावेळ जरी जास्ती सोडला गेला तरी डोक्यात येतं आपणच असा अपव्यय केला तर आपल्या पुढची पिढी काय वापरेल? तीच कथा पेट्रोलची. जागांचे भाव गगनाला भिडलेत, शिक्षण क्षेत्रात इतकी चुरस आहे. तिथे पुढची पिढी कसा टिकाव धरणार? नोकर्‍या नाहीत, उद्योग करायला पुरेसं आर्थिक पाठबळ आणि कुवत प्रत्येकाकडेच असेल असं नाही. आत्ता जरी दोन मुलं जन्माला घालण्याची (आर्थिक) (हो आर्थिकच, ९०% लोक आर्थिक कुवत पाहूनच मूलं जन्माला घालतात. एक जबाबदार व्यक्ती किंवा नागरिक बनवण्याची ईच्छा आणि ताकद असणारे खूप कमी आईबाप असतील.) कुवत असली तरी अजून दहा वर्षांनी बदलत्या जगात आपली कुवत तीच राहिल का याचा विचार किती आईवडील करत असतील? किंवा करतात?

पालकत्व म्हणजे फक्त जन्माला घातलेल्या मुलाला चांगलं चुंगलं खाऊ घालण किंवा सर्व भौतिक सुखं देणं इतकंच आहे का? त्याला उच्च दर्जाची मूल्य शिकवणं हे ही काम पालकांचंच ना? त्यासाठी त्यांनी स्वत: एक व्यक्ती म्हणूनही विकसित व्हायला हवं, मग व्यक्ती म्हणून विकसित होण्याबरोबरच कुटूंब, समाज आणि ओघानं देशाचा ही प्रश्न आलाच. मग लोकसंख्या आधीच इतकी वाढली आहे त्यात आपणच अजून भर घालायची? खेड्यात एक वेळ हे चित्र दिसलं तर नवल वाटायला नको, धरून चालो तिथे शिक्षणाचा अभाव आहे, पण शहरातही? जिथे 'शिकलेले' लोक राहतात असं आपण धरून चालतो पण ते ही असं वागताना दिसले की मनात येतं शिक्षण हे फक्त पुस्तकी ज्ञान आणि पैसे मिळवण्याचं साधन झालंय.. मूल्यांशी त्याचं काही देणं घेणं राहिलं नाहिये आजकाल.

पुर्वी शिकलेली व्यक्ती म्हणजे 'शहाणी' अर्थातच सर्वार्थाने विचारी किंवा भलंबुरं समजणारी अशी व्यक्ती म्हणून समजली जायची. पण आज तसं दिसत नाहिये. शिकलेली म्हणजे फक्त मागे ढिगभर डिग्र्या मोठाले पगार आणि भरपूर भौतिक सुखं इतकंच नातं आहे शिक्षणाचं आणि आयुष्याचं.

विषय: 
प्रकार: 

sarvaaMshee sahamat. khoop mudde ardhe ardhe ithe aalet. mhaNoonach mi manogat asa lihilay. karaN ekatoon ek anek wichar yet gele jitake maaMDataa aale titake maaMDale ithe. ulaT sarva baajuMnee vichaaraaMchaa ogh aalaa tar malaa hee kaLel kuThe kaay missing aahe te.
pratisaadaaMsaaThee dhanyavaad.

devanaagaree lihoo na shakanyaabaddal dilagir aahe Sad

सर्वांशी सहमत. खूप मुद्दे अरधे अरधे इथे आलेट. म्हणूनच मी मनोगत असा लिहिलाय. कारण एकतूं एक अनेक विचार एट गेले जीटके माम्दता आले टीतके माम्दले इथे. उलट सर्वा बाजूँणी विचारामचा ओघ आला तर माला ही कालेल कुठे काय मिस्सिंग आहे ते.
प्रातिसादांसाठी धन्यवाद.
देवनागरी लिहू ना शकण्याबद्दल दिलगीर आहे

सौजन्य : http://transliteration.yahoo.com/

दक्षिणाने सुशिक्षितपणा आणि सुसंस्कृतपणा (मुल्य) यांचा संबंध लावला आहे हे चुकले.

पण ह्या अनुषंगाने ह्या विषयाचे इतर पैलुही समोर आले त्यावरही लिहा की लोकहो..

छोटासा का होईना.. पण समाज/ गट म्हणुन तुमचे प्रत्येकाचे विचार महत्वाचे आहेत आपल्या सगळ्यांसाठी !!!

प्रयत्न चांगला आहे पण, काहीजण म्हणताहेत त्यानुसार लेखात विस्कळितपणा जाणवतोय.
त्याहीपेक्षा माझ्या मते, लेख फारच त्रोटक झाल्याने जे मांडायचंय ते मुद्देसूदपणे विषद होऊ शकलेलं नाही. अर्थात, लांबी अती वाढता कामा नये हे भानही ठेवणे आवश्यक.

दक्षिणा, पुण्यात असाही एक मोठा समाज आहे ज्यांना शिक्षण - लोकसंख्या नियंत्रण - मूल्यशिक्षण इत्यादींशी काहीएक देणंघेणं नाही. आणि दिवसेंदिवस या समाजात भर पडत चालली आहे. खास करून उपनगरांमध्ये किंवा शहराच्या सीमेलगतच्या भागांमध्ये.

तिथे घरटी ४-५ मुले हे सर्वसामान्य चित्र आहे. त्यातल्या १-२ मुलांना लहानपणापासून खास शरीर कमावण्याचे किंवा पहिलवानगिरीचे प्रशिक्षण दिले जाते. बाकीची मुले अन्य रोजीरोटीचे व्यवसाय करतात, पण एक तरी मूल खास पैलवान बरं का! एकीकडे शरीर कमावायचे, दुसरीकडे आपल्या राहत्या परिसरात आपल्या ताकदीच्या आणि अरेरावीच्या जोरावर धाक निर्माण करायचा, हळूहळू शस्त्रांच्या वापरात कौशल्य मिळवायचे, खंडणीवीर व्हायचे, गुंडगिरी करायची, फ्लेक्सच्या जोरावर आणि अशा खंडणीतून मिळालेल्या पैशांच्या जोरावर प्रसिद्धी मिळवायची, जिथे जिथे 'पैसा कमवायला' वाव आहे अशा पदांसाठी वर्णी लावायची, राजकीय नेत्यांचा वरदहस्त प्राप्त करायचा, खंडण्या गोळा करायच्या, स्थानिक निवडणुकांमध्ये स्वतः तरी उभे राहायचे किंवा आपल्या सोम्यागोम्याच्या पाठीशी उभे राहून त्याला निवडून आणायचे, चाकू-सुरे-गुप्त्या-चेन-सोटे-गावठी पिस्तुले ही लीलया बाळगायची व वापरायची, अधून मधून फारच नाईलाज झाला तर लॉक-अपची किंवा तुरुंगाची हवा खाऊन यायची, तिथेही जमल्यास मांडवली करायची, मग कोणत्या तरी पॅनेलमधून कोठेतरी निवडून यायचे, जिथे 'चरायला' वाव आहे अशा संस्था निवडायच्या, निवडून येण्यासाठी धाकधपटशाही, पैसा आणि प्रलोभने यांचा सढळ वापर करायचा, पेप्रात अधून मधून फोटू छापून आणायचे... हे सर्व करताना काही लोकांशी वैर होणे हे अटळ असते... मग त्या शत्रूंचा नायनाट किंवा पाडाव करण्यासाठी योजना राबवायच्या इ. इ.

कधी कधी हे करताना अचानक किंवा 'चुकी'ने काही 'अपघात' होतात आणि संबंधित खंडणीवीर ''वीरगती'' प्राप्त करतात. त्यांची जागा घ्यायला त्याच घरचा आणखी एखादा सुपुत्र असतोच!

त्यामुळे लोकसंख्या-नियंत्रण या शब्दाशी या समाजातल्या लोकांना घेणे-देणे नाही. चांदी और बढने दो! घरात जेवढे जास्त 'सुपुत्र' असतील तेवढे ह्यांचे बळ जास्त, समाजात पत-प्रतिष्ठा(?) जास्त. आपल्या घरातल्या व्यक्ती किती वेळा लॉक-अप मध्ये जाऊन किंवा तुरुंगाची हवा खाऊन आल्या आहेत याबद्दल प्रौढी बाळगणारा समाज असेल तर त्यांना शिक्षण - मूल्ये इत्यादींशी आपला काय संबंध, असेच वाटणार! फार फार तर उद्या एखादी शाळा किंवा कॉलेज विकत घेतील आणि आपली मुले तिथून पास झाली असे दाखवतील.

>>>>> तरी सुद्धा "दुसर काही" म्हणजे नक्की काय हे पालकांनाच समजत नसते . ते स्वतः संभ्रमात असतात तर ते मुलांना काय सांगणार ? ............. . त्यामुळे नोकरीचा आधार वाटतो.<<<<<<

आशा आहे की मुले स्वतःची अक्कल स्वतःची आवडनिवड, स्वतःचे वेगळे कर्तुत्व दाखवतील. आयुष्यात येणार्‍या संकटांना तोंड द्यायला ही मुले लायक आहेत. ते नक्की मार्ग काढतील, काढतातच आहेत, उद्योगधंदे वाढताहेत, प्रगति होते आहे.

ही जुनी पिढी एकदाची मरायला पाहिजे, निदान त्यांनी मुलांना काहीहि सांगणे बंद केले पाहिजे - काहीहि चांगले केले नाही त्यांनी. नुसती लोकसंख्या वाढवून अडचणी निर्माण केल्या!

अरुंधती,

तुम्ही जे वर्णन केले आहे ते राजकारणात करीयर करणार्‍या लोकांचे वर्णन आहे. सगळ्यांनाच राजकारणात रस नसतो. बर्‍याच जणांना ते जमणारहि नाही. जसे क्रिकेट्पटू, नट वगैरे होऊन पैसे कमावता येत असले तरी तेहि जमण्यासारखे असेलच असे नाही. पण असे बरेच लोक आहेत ज्यांनी यापैकी काही न करता बक्कळ पैसा कमवला, किंवा काही इतर उद्योग करून बर्‍यापैकी पैसे कमावून आपली परिस्थिती पूर्वीपेक्षा जास्त सुधारली.
हे मी भारतातच पाहिले आहे. अमेरिकेत तर दररोज होत असते. जागतिकीकरण, खाजगीकरण यांचा फायदा घेऊन हे आता भारतातहि शक्य होईल. नि तसे होईल अशी मला आशा आहे.

जरा धीर धरा. अजून तीस वर्षे. चर्चिल ने एकदा म्हंटले होते - अमेरिकन लोक नेहेमी बरोबर मार्ग काढतात, मात्र तत्पूर्वी ते सगळे चुकीचे मार्ग हाताळून पहातात. भारतात सध्या असे निरनिराळे चुकीचे मार्ग हाताळणे चालले आहे असे समजा.

लेखाचा विषय आणि विचार विसंगत आहेत .लेखिकेला असं सांगायचं आहे की समाजातले गरीब आणि श्रीमंतदेखील आदर्श वागत नाहीत .

९०% लोक आर्थिक कुवत पाहूनच मूलं जन्माला घालतात. >>>
छे! काहीतरीच. असे व्हायला हवे हे खरे आहे. मात्र तसे होतांना दिसत नाही!!

शहाण्यासुरत्यांनी ज्या गुणांना प्रतिष्ठा दिली/देत आहेत, त्यांना मूल्ये म्हणतात.
जनसामान्यांत ती रुजवणे ह्याकरता, निरंतर प्रबोधनाची असलेली गरज हल्ली दुर्लक्षित झालेली आहे.

दक्षिणा,
मनोगत तर आवडले. पण ते सर्वजनांप्रत पोहोचावे कसे ह्याचीच भ्रांत आहे.

९०% लोक आर्थिक कुवत पाहूनच मूलं जन्माला घालतात. >>>
छे! काहीतरीच. असे व्हायला हवे हे खरे आहे. मात्र तसे होतांना दिसत नाही!!
<<
असे का व्हायला हवे?
शहाणपण हे संदर्भावर ठरते. कमी नोकर्‍या म्हणून कमी मुले. घरचा बिझिनेस साम्भाळायला जास्त लोकांची गरज असेल तर?

घरचा बिझिनेस साम्भाळायला जास्त लोकांची गरज असेल तर? >> असा कोणता बिझनेस असू शकतो ज्यात सांभाळणारे घरचेच लागतात? योग्य व्यक्तीला नोकरीवर ठेउ शकतो की.

अनेक मुद्द्यांची सरमिसळ आणि गल्लत झाली आहे.
* आपल्याला किती अपत्ये असावीत हे ठरवण्याचा अधिकार स्वतंत्र देशातल्या प्रत्येक कुटुंबाला आहे. जोडप्यापैकी दोघांच्या किंवा दोघांपैकी एकाच्या इच्छेविरुद्ध गर्भधारणा होऊ नये, यासाठी संततीनियमनाच्या साधनांचा प्रचार व प्रसार होणे आवश्यक आहे, जे काम शासन करते आहे. तरीही अशी गर्भधारणा झाल्यास 'फेल्युअर ऑफ काँट्रासेप्शन' या कारणाखाली गर्भपात करण्याचा पर्याय उपलब्ध आहे, आणि तो कायदेशीर आहे.
*लेकरांचे लेंढार बाळगण्यामागे फायद्यापेक्षा तोटे जास्त आहेत, याची जाणीव अनेकांना असली तरी त्या दिशेने प्रबोधनाला अजून वाव आहे. तसे प्रयत्न सुरू आहेत, सुरू ठेवले पाहिजेत.
याउप्पर कुणाला किती मुले असावीत यावर आपण नियंत्रण अगर टिप्पणी करणे चूक आहे, असे मला वाटते.

'मूल्य' (मुल्य नाही) आणि अपत्यसंख्या यांचा काय संबंध आहे ते समजले नाही. बाकी स्वाती आंबोळेंना पडलेले प्रश्न मलाही पडले आहेत.

शिवाय परिस्थिती अगदीच काही वाईट नाही. पुढच्या पिढीचे प्रश्न वेगळे आणि कदाचित अधिक गंभीर असतील, तसेच त्यांची त्या प्रश्नांना भिडण्याची क्षमताही अधिक वाढलेली असेल, असा आशावाद बाळगायला काय हरकत आहे? (राम कृष्णही आले गेले, त्याविण जग का ओसचि पडले?)

असो.

Every child comes with the message that God is not yet discouraged of man.

~Rabindranath Tagore

योग्य व्यक्तीला नोकरीवर ठेउ शकतो की.
<<
अस्मिता,
अल्पभूधारक शेती नावाचा एक पारंपारिक उद्योग आहे.
Wink

मुद्दा संदर्भाचा/ कॉण्टेक्स्ट चा आहे. पाश्चात्य देशांत मनुष्यबळ वाढविण्यासाठी इन्सेन्टिव्ह्स देऊन जास्त मुले जन्माला घाला असा प्रयत्न सुरू आहे. ते लोकही योग्य भारतीय/चिनी व्यक्तीला नोकरीवर ठेऊ शकतात की Wink

अल्पभूधारक शेती नावाचा एक पारंपारिक उद्योग आहे. >> याबद्दल मला काही माहिती नाही. त्यामुळे मुद्दा पटला नाही तरीही अजुन चर्चा करण्यास असमर्थ.

पाश्चात्य देशांत मनुष्यबळ
वाढविण्यासाठी इन्सेन्टिव्ह्स देऊन जास्त मुले जन्माला घाला असा प्रयत्न सुरू आहे. ते लोकही योग्य भारतीय/ चिनी व्यक्तीला नोकरीवर ठेऊ शकतात की >> हो पण पाश्चात्य, भारतीय, चिनी वेगवेगळ्या रेस/जीन्स आहेत.

अस्मिता,
गम्मत तीच आहे. माझ्या घरचा/फॅमिली बिझिनेस मी नोकर ठेवून चालवत असलो, तरी १० शहरांतल्या शाखांवर लक्ष ठेवायला एकेक घरचा माणूस असला, तर बरे पडते. अनेक खासगी व्यवसायांत असे जवळच्या नातेवाईकांना शाखाप्रमुख केलेले दिसते. यांत बहुदा सख्खी/चुलत भावंडे दिसतात.

जसे भल्या मोठ्या प्रायव्हेट लिमिटेड्स मधे वरील चित्र बर्‍यांचदा दिसते, तसेच हे खूप छोट्या व्यवसायांतही दिसते. बाहेरचा नोकर ठेवण्यापेक्षा घरच्या मेम्बरने केलेले काम जास्त परवडते, नफा घरातल्या घरात रहातो.

शेतीतही घरचे जितके जास्त हात, तितके जास्त चांगले चालते. गडी माणसांवर अवलंबून नीट धकत नाही.

परत मुद्दा तोच, काँटेक्स्ट.

कमी मुले की जास्त, हे कशावर ठरवावे? पैशांची मुबलकता आहे म्हणून भरपूर मुले जन्माला घालायला हरकत नाही, असे लॉजिक आहे का?

म्हणून मी गोळे काकांना विचारले होते, की आर्थिक कुवत पाहूनच मुले जन्माला घालावी हा 'शहाणेसुरतेपणा' होतो का?? आजची कुवत १० वर्षांनी टिकेलच कशावरून? किंवा २० वर्षांनी केवळ जास्त मुले हाताशी आहेत, म्हणून कुटुंबाची परिस्थीती सुधरणार नाही कशावरून??

एकदा हा ऐपत व मुलांची संख्या मुद्दा सॉर्ट आऊट झाला, की पुढचा प्रश्न येतो,

हायर सोशिओइकॉनॉमिक क्लास (गोळेकाका/गापै, भाषांतर प्लीज) मधे भरपूर कुवत असली तरी मुले कमी जन्माला घालण्याचा कल आढळतो.
याउलट, गरीब घरांत, सामान्यतः ज्यांची आर्थिक कुवत नाही असे म्हणता येईल, अशा घरांत जास्त मुले झालेली आढळतात.

हे कसे व का होते?

लेख पुर्ण गडबडला आहे. नक्की काय म्हणायचेय ते मुद्दे लेखाच्या शेवटी एकेका वाक्यात टाका म्हणजे मुद्द्याला धरून प्रतिसाद देता येईल .

बाकी पैसा, मुलांची संख्या, आई वडील मुलांना देऊ शकत असलेला वेळ या सगळ्याचा मुलांच्या जडण घडणीवर परीणाम होऊ शकत असला तरी सरधोपटपणे जास्त मुले , गरीबांची मुले == कुमार्गाला लागणारी तरूण पीढी असा निष्कर्श काढणे योग्य नाही.
तसेच २ मुले जन्माला घालणे हा गुन्हा / अपराध / मुर्खपणा / स्वार्थीपणा ई. नाही.

(हो आर्थिकच, ९०% लोक आर्थिक कुवत पाहूनच मूलं जन्माला घालतात. >> Biggrin
जर भारतातील लोकं आर्थिक कुवत पाहून मूलं जन्माला घालत असती तर ७०% जोडप्यांना मुलेच नसती Happy

मुले जन्माला घालण्यात फक्त आर्थिक क्षमता हाच प्रधान घटक असतो का? आईवडिलांना स्वत:ची संतती असावी असं वाटणं हे भावनिक कारण बहुतेक वेळा (निदान ज्यांना १/२ मुलं असतात त्यांना तरी) त्यामागे असतंच. फक्त समाजाचं दडपण आणि कंडिशनिंगच असतं असंही नाही..
आर्थिक कुवत फारशी नसलेल्या वर्गातही फक्त अविचारच असतो असं नाही. संततीनियमनाचा अभाव - त्यात प्रबोधनाचा अभाव, वैद्यकीय सुविधांचा लाभ करून घ्यायच्या संधीचा अभाव, पुरुषी दृष्टीकोनाचं वर्चस्व, स्त्रीला स्वतःच्या शरीरावर या दृष्टीने फारसा ताबा नसणं हेहे घटक अंतर्भूत आहेत - शिवाय पारंपरिक मानसिकतेतून एक किंवा एकाधिक मुलगे हवेत आणि असेच इतरही घटक या मागे असतात

इब्लिस म्हणतात तसं - पारंपरिक समाजाच्या उपजीविकेत (विशेषतः शेती आणि पशुपालन, पण व्यवसाय, धंदा आलंच यातही) जितकं घरचं मनुष्यबळ जास्त तितका जास्त उत्पादनाला हातभार असं गणित असे. एकेकाळी जेव्हा संसाधनांची टंचाई फारशी नव्हती तेव्हा ते चालण्यासारखं होतं. आजच्या युगात हे कालबाह्य झालंय पण भारतीय मानसिकता इतक्या चटकन पारंपरिकतेतून बाहेर आली असती तर आणखी काय पाहिजे होतं?

हे कसे व का होते?>>> याच कारण

ते म्हणजे जितकी मूल जास्त तितक ऊत्पन्न जास्त असा हिशेब असतो

दुसरे म्हणजे आमच्या समाज शास्त्राच्या प्रोफेसरान्नी सांगितलेल
ऐकायला विचित्र वाटेल ते
ते म्हणजे शारीरीक संबंध हां निम्न ऊत्पन्न गटातील लोकंच्या दृष्टीने विरंगुळा असतो

रच्याकने, अनाथालयात देखिल मुले वाढतात. त्यातले खूपजण चांगले शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहून चांगला संसारही करतात.

'९०% लोक आर्थिक कुवत पाहूनच मूलं जन्माला घालतात.' याच्याशी मात्र असहमत.
........ एकदा लग्न झालं की दोघांनाही मुलाची आशा लागते.... यात त्यांची आर्थीक कुवत किती आहे याचा प्रश्नच येत नाही. संसाराच्या वेळीवर फुल हे लागतेच.... नाहीतर या संसारात नव्या जोडप्यांना रस कसा असणार..... कारण काही वर्षानंतर नवरा-बायको यांचे बिनसले तरी ते मुलांमुळे ऐकत्र राहतात.... अशीच काही तरी परीस्थीती आहे.
तसेच....
@ जाई यांच्याशी सहमत...
समाजातल्या खालच्या थरातले लोक एक विरुंगुळा म्हणुन मुलं जन्माला घालतात.

@ जाई यांच्याशी सहमत...
समाजातल्या खालच्या थरातले लोक एक विरुंगुळा म्हणुन मुलं जन्माला घालतात.<<<

तांत्रिक गफलत आहे या विधानात!

ते विरंगुळा म्हणून जे करतात त्यामुळे मुले जन्माला येतात.

इब्लिस आत्ता तुमचा मुद्दा थोडा कळायला लागला Happy

पैशांची मुबलकता आहे म्हणून भरपूर मुले जन्माला घालायला हरकत नाही, असे लॉजिक आहे का? >> माझं वैयक्तिक मत असे आहे की सुपररीच क्लासने किँवा शारुक, अमिर वगैरे, कोणत्याही वयात, कितीही मुलं जन्माला घातली तर मी त्यावर आक्षेप घेणार नाही. एकदम गरीब लोकांची हालत तर आक्षेप घेण्यासारखी नसतेच. पण जो गेल्या पिढीतला किँवा आताचा मध्यमवर्ग आहे, त्यांनी १/२ मुलांवर जाउ नये. १९५० ते ७० मधे जन्मलेल्या, शिक्षीत, ज्यांची २+ मुले आहेत बर्याचदा त्यात पहिल्या २ मुली असतात. ७० नंतर जन्मलेले आयटीने नवश्रीमंतमध्यमवर्गीय झालेले किँवा इतरही २मुलं जन्माला घालतायतच. मला आश्चर्य वाटतं त्यांच. भारतात लोकसंख्येच्या ४०% माणसं <२५ वयाचे आहेत. हे सगळे रिप्रोडक्टीव एजला आले की काय भयानक गर्दी होईल विचार करुन भ्या वाटतं.

एकदा लग्न झालं
की दोघांनाही मुलाची आशा लागते.... यात त्यांची आर्थीक कुवत किती आहे
याचा प्रश्नच येत नाही.
संसाराच्या वेळीवर फुल हे लागतेच.... नाहीतर या संसारात नव्या जोडप्यांना रस कसा असणार..... कारण काही वर्षानंतर नवरा-
बायको यांचे बिनसले तरी ते मुलांमुळे ऐकत्र राहतात.... अशीच काही तरी परीस्थीती आहे. >>हाहा कुटुंबसंस्थाच माजलीय साली Wink

खडकसिंग आणि बेफी ते माझे विधान नाही
आमच्या प्रोफेसरान्नी ते विधान केले आहे जे मला पूर्णत पटलेले नाही

गोंधळासकट प्रामाणिक विचार.
एक खराखुरा प्रसंग
एक स्न्हेही (२ मुले असलेला,महीना ८५००० पगार post tax): महागाई खुप वाढत आहे,परवडत नाही ,महागडे शिक्षण ,भविष्याची काळजी इत्यादी इत्यादी
मी: महागाई तर emergency च्या वेळेसच २ digits मधे होती
तो: नाही सरकारची धोरणे चुकिची आहेत, ह्यानंतर मनमोहन सिंग,सोनिया गाम्धी,शरद पवार ह्यांना नावे ठेवणे etc.
मी (माझे सकाळपासुनच काहीतरी बिनसलेले असते त्यामुळे चिडलेली):शरद पवार किंवा सोनिया गांधी यापैकी नक्की कोणी तुम्हाला फोन केल होता second chance घेण्यासाठी?
तो: चिडुन निघुन जातो.
प्रसंग २
माझी सहकारी(during lunch hour, back after second child maternity leave):काश ही सुट्टी चालुच राहीली असती
मी : बर
ती: पण यावे लागले ना
मी: बर
ती: आता दोन मुलांचे खर्च म्हणजे एकाच्या पगारात भाग्ते का?
मी : हो खरय
ती : मग सासु ,कमावल्या बायकाना नावे ठेवने इत्यादी इत्यदी.
मी : होना होना
हाच प्रसंग थोड्या फार फरकाने २ दा repeat होतो. मी माझी जेवणाची वेळ बदलते.

(२ मुले असलेला,महीना ८५००० पगार post tax):
<<
या पगारात धकत नाही अशी तक्रार करत असेल तर त्याला लाडावलेली लाईफस्टाईल कारणीभूत आहे. दुसरे काहीच नाही.

मुल्य म्हणजे नेमके कोणते, ते लेखातुन कळलच नाही +१

तसेच सामाजिक, नैतिक, कौटुंबिक, राष्ट्रीय अशी वेगवेगळी मूल्ये असतात का? मूल्य कशाला म्हणायचे?

ती absolute असतात की relative? absolute नसतील तर किती बदलली, वगैरे चर्चा मला फारशी महत्वाची वाटत नाही.
समजा एके काळी भारतात काही मूल्ये होती, मग ती टिकली का नाहीत? म्हणजे मूल्ये काळावर, इतर लोकांवर अवलंबून असतात का?

प्रामाणिकपणा, औदार्य, सहानुभूति, शौर्य, स्वाभिमान, सामर्थ्य, कर्तुत्व इ. गोष्टीं यांना मी मूल्ये मानतो. ही व्यक्तिगत मूल्ये आहेत, इतर गोष्टींचा त्यावर परिणाम होत असेल तर

या खेरीज इतर लोक इतर कशाला मूल्ये मानतील.

उदा. समजा, काय वाट्टेल ते करून श्रीमंत व्हायचे यालाच कुणि मूल्य म्हणत असतील (अतिशयोक्तीपूर्ण विधान आहे, पण उदाहरणार्थ) तर या मूल्याचा इतर मूल्यांशी संघर्ष होईलच. नि कुणाला तरी पराभव मानावा लागेल.

बाकी, लोकसंख्या जास्त झाली की सगळेच प्रश्न अवघड होतात. मूल्यहीन लोकांची टक्केवारी कमी असली तरी संख्या जास्त, नि त्यांच्याशी संघर्ष होण्याची शक्यता वाढते.

मी या लेखावरून घेतलेला बोधः
मुलांची संख्या ही तुमची आर्थिक परिस्थिती आणि मूल्ये यांच्या समप्रमाणात असावी.

बरोबर ना?

Pages