शिक्षण आणि मूल्य - माझं मनोगत

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

रोज भरदुपारी ऑफिसच्या गाडीची वाट पाहताना एक बाई रोज दिसते. तिच्या हाताशी एक आणि पोटात एक अशी अवस्था. हाताशी असलेलं जेमतेम ३-४ वर्षांचं असेल. थोड्या दिवसात पोटातलं ही या जगात येईल.

मला एक प्रश्न रोजच पडतो तिला पाहून. कित्येक होऊ घातलेले आईवडील आपल्या येणार्‍या पाल्याच्या भविष्याचा किती आणि काय विचार करत असतील? स्पर्धा इतकी वाढली आहे. आजच व्हॉटसप वर कुणितरी मुंबईची कहाणी थोडक्यात मांडली होती. ते वाचून मनात आलं की ती कहाणी फक्त मुंबईची नसून भारतातल्या प्रत्येक वाढत असलेल्या शहराची आहे. जगण्यासाठी धडपड. मग एक मूल आधीच असताना दुसर्‍या मुलाचा विचार लोक का करत असतील?

आईवडील होणं ही प्रक्रिया फक्त शारिरिक आहे का? शारिरिक क्षमता आहे म्हणून मूलं जन्माला घालायची का? अर्थात सर्वच लग्न झालेले लोक असा विचार करतात असं नाही. पण जागरूक पालकत्व किती लोक करत असतील असा प्रश्न मला खरंच पडतो... रोजच.

आपणच खाऊनपिऊन सुखी राहण्यासाठी क्षणाक्षणाला मन मारून कसंबसं जगतोय, तिथे अजून एक मूल जन्माला घालून त्याला या जीवघेण्या स्पर्धेत आपण का ढकलतोय असा विचार त्यांच्या मनात एकदा तरी येत असेल का? आपणच आत्ता इतके भरडले जातोय, उद्या पुढे जाऊन ही स्पर्धा आणखी जीवघेणी होईल, त्यात आपल्या पाल्याचा निभाव लागेल का? किंवा त्या स्पर्धेत बळकटपणे उतरवण्यासाठी लागणारी सामुग्री ( शारिरिक्/आर्थिक्/मानसिक) आपण पुरवू शकू का? हा विचार होतो का?

रोज हात धुताना, नळ थोडावेळ जरी जास्ती सोडला गेला तरी डोक्यात येतं आपणच असा अपव्यय केला तर आपल्या पुढची पिढी काय वापरेल? तीच कथा पेट्रोलची. जागांचे भाव गगनाला भिडलेत, शिक्षण क्षेत्रात इतकी चुरस आहे. तिथे पुढची पिढी कसा टिकाव धरणार? नोकर्‍या नाहीत, उद्योग करायला पुरेसं आर्थिक पाठबळ आणि कुवत प्रत्येकाकडेच असेल असं नाही. आत्ता जरी दोन मुलं जन्माला घालण्याची (आर्थिक) (हो आर्थिकच, ९०% लोक आर्थिक कुवत पाहूनच मूलं जन्माला घालतात. एक जबाबदार व्यक्ती किंवा नागरिक बनवण्याची ईच्छा आणि ताकद असणारे खूप कमी आईबाप असतील.) कुवत असली तरी अजून दहा वर्षांनी बदलत्या जगात आपली कुवत तीच राहिल का याचा विचार किती आईवडील करत असतील? किंवा करतात?

पालकत्व म्हणजे फक्त जन्माला घातलेल्या मुलाला चांगलं चुंगलं खाऊ घालण किंवा सर्व भौतिक सुखं देणं इतकंच आहे का? त्याला उच्च दर्जाची मूल्य शिकवणं हे ही काम पालकांचंच ना? त्यासाठी त्यांनी स्वत: एक व्यक्ती म्हणूनही विकसित व्हायला हवं, मग व्यक्ती म्हणून विकसित होण्याबरोबरच कुटूंब, समाज आणि ओघानं देशाचा ही प्रश्न आलाच. मग लोकसंख्या आधीच इतकी वाढली आहे त्यात आपणच अजून भर घालायची? खेड्यात एक वेळ हे चित्र दिसलं तर नवल वाटायला नको, धरून चालो तिथे शिक्षणाचा अभाव आहे, पण शहरातही? जिथे 'शिकलेले' लोक राहतात असं आपण धरून चालतो पण ते ही असं वागताना दिसले की मनात येतं शिक्षण हे फक्त पुस्तकी ज्ञान आणि पैसे मिळवण्याचं साधन झालंय.. मूल्यांशी त्याचं काही देणं घेणं राहिलं नाहिये आजकाल.

पुर्वी शिकलेली व्यक्ती म्हणजे 'शहाणी' अर्थातच सर्वार्थाने विचारी किंवा भलंबुरं समजणारी अशी व्यक्ती म्हणून समजली जायची. पण आज तसं दिसत नाहिये. शिकलेली म्हणजे फक्त मागे ढिगभर डिग्र्या मोठाले पगार आणि भरपूर भौतिक सुखं इतकंच नातं आहे शिक्षणाचं आणि आयुष्याचं.

विषय: 
प्रकार: 

दक्षे, मनातलं लिहिलंस.
पण आपल्याला जी मूल्य वाटतात ती पुढच्या पिढीला तशी वाटतही नाहीत. काळ बदललाय.
पुर्वीच्या काळी, लग्न, संसार, मुलांची शिक्षणे, त्यांची लग्ने, जावई-सूना, नातवंडे, निवृत्ती.... असे नेमके टप्पे होते कारण आयुष्याची खात्री होती. आता कसलीच खात्री देता येत नाही. त्यामूळे आहे ते एंजॉय करायचे अशी वृत्ती आहे. आणि ते एका अर्थी खरेही आहे. त्यांचे जीवन आपल्याएवढे आरामाचे नक्कीच असणार नाही.

आपली मुल्ये कुणावरही लादू नयेत. प्रत्येकाला अनुभवाने शिकू द्यावे. गरज लागलीच आणि मागितलाच तर सल्ला द्यावा, असे मला वाटते.

समाजापुढे मांडलेला हा रोखठोक लेख असून लेखिकेने चितारलेली ती बाईची अवस्था कित्येक शहरात सापडेल. स्त्री अशाबाबतीत [अशिक्षित आणि सुशिक्षित असा भेद करण्याचीही गरज नाही] किती हतबल असते याचे ते एक विदारक चित्र आहे. दोन अपत्यांमध्ये किती अंतर असावे यावर हरेक प्रकारच्या माध्यमाद्वारे सरकार तसेच खाजगी पातळीवरून मुबलक प्रचार होत असूनही तसल्या अवस्थेत काही फरक पडत नाही हे पाहून मन विषण्ण होत जाते. आमीर खानच्या 'सत्यमेव जयते' चे कितीही कौतुक होऊ दे, पण आज या क्षणीदेखील दोन मुली झाल्यानंतरही तिसरा तरी मुलगा होईल म्हणून "चान्स" घेणारा आणि एम.एस्सी. झालेला, विद्यापीठात चांगल्या पदावर नोकरी करणारा एक तरुण माझ्या चांगल्याच ओळखीचा आहे. त्याला मी संतापूनच [तेवढा माझा अधिकार आहे] त्या तिसर्‍या संदर्भात विचारले तर अगदी निर्लज्जपणे त्याने उत्तर दिले..."मामा, अहो मग माझ्या मयताला कुणी नको का ?".....काय ही धारणा ! आज त्याच्या दोन्ही मुली अनुक्रमे ७ व ३ वर्षाच्या आहेत आणि त्यांच्या भावी आयुष्याकडे लक्ष देण्यापूर्वी हा गब्रू आपल्या चितेला अग्नी देण्यासाठी मुलगा हवा आहे ही भावना बोलून दाखवितो, ते ऐकून अक्षरशः शहारे आले माझ्या अंगावर. बरे, याला काय खात्री आहे की तिसरे अपत्य मुलगा होईल ? कसलीही नाही. खेळायचा याने जुगार....आणि शरीराने व मनाने मरायचे त्या बिचार्‍या बायकोने.....इट रीअली सक्स.

दक्षिणा विचारतात...."...जागरूक पालकत्व किती लोक करत असतील असा प्रश्न मला खरंच पडतो...." बिलीव्ह मी, दक्षिणा, मी फार फिरलो आहे आपल्या चारपाच जिल्ह्यात.....जवळपास शून्य पालक असला विचार करतात. प्रत्येक पालक "मुलगा" हवाच याच भावनेने आपल्या पत्नीकडे तसेच सूनेकडे पाहतात. फार थोडी कुटुंबे मी जवळून पाहिली आहेत की ज्यानी एक वा दोन मुलीनंतर ऑपरेशन करून घेतले आहे आणि मग ही घटना निश्चित्तच स्वागतार्ह आहे. आमच्या कोल्हापूरात अशा ३०-४० पालकांचा [ज्यानी एका मुलीनंतर ऑपरेशन करून घेतले आहे] आम्ही जाहीर सत्कार केला होता, ज्याला जिल्हाधिकारी आणि विद्यापीठाचे कुलगुरू हजर होते....पण अशा पालकांपासून स्फूर्ती घेणारे किती निघाले याची आकडेवारी मिळत नाही....मिळत राहतात ती तू पाहिलेले त्या बाईचे चित्र.

आजच्या प्रचंड धावपळीच्या जगात 'कसं जगावं ?" हा एक भला मोठा प्रश्न निर्माण झाला आहे खरा... त्यातच रोजच्यारोज आकाशाला भिडणारे बाजारभाव....चलनवाढ....शिक्षणक्षेत्रातील तीव्र स्पर्धा.... आज नोकरी इथे, तर उद्या तिथे...ही नको तर ती तरी मिळेल का ? असल्या कोड्याची उत्तरे शोधणारी तरूणाई.... आणि कधी एकदा आपल्या मुलाचे/मुलीचे लग्न करून देतो आणि कधी आपल्या घरी नातू [नात नव्हे] येते याची वाट पाहाणारी शेकडो नव्हे हजारो कुटुंबे....त्याना या जगात जीवघेणी नावाचा एक स्पर्धा चोवीस तास जिवंत आहे याची कल्पना तरी आहे का ? या पाल्यांना नैतिकतेचे आदर्श जरूर शिकविले पाहिजेत, पण आजची पिढी, नाईलाजाने का होईना, पण पालकांपासून दूर होत चालली आहे की काय अशीच शंका मनी दाटत राहाते.

बाकी शेवटी दक्षिणा म्हणतात त्याप्रमाणे शिक्षण म्हणजे दारावर तसेच लेटर पॅडवर लिहायच्या डीग्र्याच झाल्या असून त्याद्वारे किती लाखाचे पॅकेज आपल्याला मिळते यातच ही मंडळी मश्गुल झाली आहेत असे वाटण्यासारखी स्थिती निर्माण झाले आहे खरे.

एका चांगल्या लेखासाठी दक्षिणाचे अभिनंदन.

अशोक पाटील

पहिला मुलगा झाला तरी अनेकजण अजुन ३-४ अपत्ये जन्माला घालतात. माझ्या आजूबाजुला पाहिलेल्या अश्या केसेस आणि त्यांनी दिलेली कारणे:
१. अजुनही अनेक लोक कुटुंबनियोजनाची साधने वापरत नाहीत. त्यामुळे जर चुकुन दिवस गेले, तर "गर्भपात" करणे त्यांना पाप वाटते. (हेच लोक किंवा यांच्या कुटुंबातले लोक जेव्हा स्त्री-भ्रुण हत्या करतात तेव्हा त्यांना ते "पाप" नाही वाटत. असो हा धाग्याचा विषय नाही).

२. पुरुषांनी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केली तर ते "कमजोर" होतात, हा गैरसमज. स्त्रियांनी शस्त्रक्रिया केली तर त्या काहीही गैरकृत्य करण्यास मोकळ्या होतील असा समज. या तथाकथित कर्मठ लोकांचा तर्क.

३. जितकी मुले जन्माला घालू, तेवढे जास्त उत्पन्नाचे साधन असे जनरली मोलमजुरी करणार्‍यांचे मत असते. म्हणजे एका मुलाला नीट शिकवून किमान १०००० पगाराची नोकरी लावून सेटल करण्यापेक्षा ५ मुलांना काहीही न शिकवता २००० रु ची मजुरी करुन महिना १०००० (५ * २०००) कमावणे त्यांना फायद्याचे वाटते.

४. जगण्याचा अगदी निकृष्ट असल्याने बालमृत्यूचे प्रमाण अधिक. अगदी वाईट वाटते पण अजुनही आपल्या देशात अगदी डायरियाने देखील मुले दगावतात. Sad तेव्हा अजुन मुले जन्माला घालतात.

दक्षिणा
अगदी माझ्या मनातलं लिहिलं आहे असं वाटलं! आजुबाजूला फिरताना सतत असे विचार मनात येतात.
तु आणि अशोक. ह्यांनी लिहिलेले प्रॉब्लेमतर आहेतच शिवाय सगळीकडे वाढणारी कट्टरता, लोकांचे हरवलेले मानसिक संतुलन, एवढ्या-तेवढ्या कारणावरून जीव घेणे इ. पाहून घाबरायला होते. चांगल्या शिक्षणाची इथे काहीच मदत होत नाही का असे प्रश्न पडतो.
जगभर, देशात होणारे दहशतवादी हल्ले, मध्य-पूर्वेतील परिस्थिती, आताच झालेले सिरिया प्रकरण पाहून असे वाटते की आपण फक्त सुपात आहोत की काय. आपल्यावरही अशी वेळ येईल? मधे वाचले की इजिप्तमधे दरवर्षी ४ लाख ग्रॅज्युएट्स होतात पण त्यांच्याकडे एवढ्या लोकांना रोजगार मिळू शकेल अशा संधीच नाहीत. आपल्याकडे तर हा आकडा जास्त असेल, सध्या तरी नोकर्‍यांची परिस्थिती ठिक आहे म्हणायचे. पण पुढच्या पिढीसमोर शिकूनही जर चांगल्या संधी नसतील तर काय होईल असे वाटते. प्रत्येकातच वाईट परिस्थितीतून झगडून पुढे जाण्याचे बळ असेल असे नाही. मग दुसरा कुठला सोपा, वाईट मार्ग निवडला तर? असे सगळे विचार मनात येतात. हे सगळे पाहून वाटते का मुलं जन्माला घालायची Sad (थोडेसे अवांतर झाले असेल कदाचित.)

>> खाऊनपिऊन सुखी राहण्यासाठी क्षणाक्षणाला मन मारून
म्हणजे नक्की काय?

लेखाचा पॉइंट नीटसा कळला नाही मला.
>> एक मूल आधीच असताना दुसर्‍या मुलाचा विचार लोक का करत असतील?
>> लोकसंख्या आधीच इतकी वाढली आहे त्यात आपणच अजून भर घालायची?
म्हणजे मुलं जन्माला घालू नयेत, घातलं तर एकच घालावं - कारण दहा वर्षांनी आपली आर्थिक स्थिती कशी असेल हे आत्ता सांगता येत नाही - हा आहे का?

>> ९०% लोक आर्थिक कुवत पाहूनच मूलं जन्माला घालतात.
>> पालकत्व म्हणजे फक्त जन्माला घातलेल्या मुलाला चांगलं चुंगलं खाऊ घालण किंवा सर्व भौतिक सुखं देणं इतकंच आहे का? त्याला उच्च दर्जाची मूल्य शिकवणं हे ही काम पालकांचंच ना?
म्हणजे भौतिक सुखं देणं हे दुय्यमच आहे ना? मग दहा वर्षांनंतरच्या आर्थिक स्थितीचा काय संबंध?
उच्च दर्जाची मूल्यं म्हणजे कुठली? भौतिक सुखं देणारे पालक ती देत नाहीतच हे कसं ठरलं?
पालक होऊ देण्याआधी सरकारने एखादी नागरिकशास्त्राची परीक्षा घेणं अनिवार्य करावं का?

>> पुर्वी शिकलेली व्यक्ती म्हणजे 'शहाणी' अर्थातच सर्वार्थाने विचारी किंवा भलंबुरं समजणारी अशी व्यक्ती म्हणून समजली जायची. पण आज तसं दिसत नाहिये.
'पूर्वी'च्या शिकल्यासवरलेल्या माणसांनी 'आज'ची वेळ येऊ कशी दिली म्हणते मी!

ज्यांना दुसर्या किंवा त्यानंतरच्या मुलाला मूल्यशिक्शण देता येत नसेल ते पहिल्या मुलाला तरी ते कसे देऊ शकतील?
मुलांची गरज, हौस जे काय असेल ते म्हणून प्रत्येक जोडप्याला एकच मूल असेल तर त्यांची मूल्य काय पातळीची असतील?
एक किंवा अधिक मूल यांचा विचार जितके सोकॉल्ड जबाबदार लोक करतात तितकाच झोपडपट्टीत राहणारे, अशिक्शित, खेड्यातले लोक करत नाहीत. मग तशाच लोकांची संख्या वाढली तर या शेल्टर्ड एकुलत्या एकांना कशा प्रकारच्या मूल्यांना स्पर्धेला सामोरे जावे लागेल?
संपादक मंडळ, पेपर फुटला. Proud

लेखाचा पॉइंट नीटसा कळला नाही मला. >> +१

पुर्वी शिकलेली व्यक्ती म्हणजे 'शहाणी' अर्थातच सर्वार्थाने विचारी किंवा भलंबुरं समजणारी अशी व्यक्ती म्हणून समजली जायची. >> तेंव्हाही तोच गैर समज होता नि आजही तोच आहे. फक्त शिकले म्हणजे सर्वार्थाने विचार करता येतो किंवा भलबुरं समजायला लागते हा मोठा गैर समज आहे. ह्याचा अर्थ शिक्षण निरुपयोगी आहे असा नाही पण तेव्हढेच सर्व आहे असा नाही.

मी पण..
ही अशी सामाजिक स्पर्धा एकच पैलू झाला, अजून बरेच पैलू आहेत असं म्हणायचं आहे Happy

विषय चांगला आहे. फक्त मांडणी करताना बय्रापैकी भरकटला आहे. आज इतकी जीवघेणी स्पर्धा आहे. जगण्याकरिता /प्रत्येक गोष्टीत /जिकडे तिकडे. अशा परिस्थितीत लोक दुसर मुल कस काय जन्माला घालत असावेत असा लेखिकेला प्रश्न पडलाय.
त्यामुळेच माधवीच मत १००% पटतय
<< पुढच्या पिढीसमोर शिकूनही जर चांगल्या संधी नसतील तर काय होईल असे वाटते. प्रत्येकातच वाईट परिस्थितीतून झगडून पुढे जाण्याचे बळ असेल असे नाही. मग दुसरा कुठला सोपा, वाईट मार्ग निवडला तर? >>
याच्या पुढे हीच परिस्थिती येणार आहे कितीही शिकलं/ कितीही शिकलं तरी तुमच्या शिक्षणानुरूप नोकर्या तुम्हाला मिळतातच अस नाही .तिथे सुद्धा अव्वल मार्क वाल्यांनाच विचारलं जात.तुम्ही बेताचे मार्क मिळवून /एटीकेटी लागत लागत अगदी उचाशिक्षणाची डिग्री जरी घेतलीत तरी तुम्हाला विचरतो कोण? मग करा कोल सेंटर मधल्या नोकर्या . मग फ्रस्टेशन . पदरात पडलेल्या परिस्थितीशी जमवून घेण प्रत्येकाला जमतच अस नाही . मग मानस उपचार तज्ञाची भेट. किव्वा वाईट मार्ग . पैशाकरता सायबर गुन्हे किव्वा तेही नाही जमल तर अतिरिक्त दारू सेवन असे अनेक पैलू .अशा भयावह परिस्थितीत इतके शिकलेलं लोक दुसर्या मुलाचा विचार कसा काय करतात? असा प्रश्न लेखिकेने विचारला आहे
उच्च दर्जाची मूल्यं म्हणजे कुठली? हे मात्र खरच नीट समजलेल नाही ::)

एक शंका.
शिकून फक्त नोकरीच करायची असते का?
दुसरे काहीच करायची क्षमता शिकल्याने नष्ट होते की काय?

लेख विस्कळीत झालाय नक्कीच ..

>> हो आर्थिकच, ९०% लोक आर्थिक कुवत पाहूनच मूलं जन्माला घालतात

ही टक्केवारीही बहुदा बरोबर नसावी ..

हे असले लेख सरसकट समाजाला लागू पडत नाहीत. विशेषतः भारतात, एक अत्यंत श्रीमंत वर्ग, एक फार मोठा सुशिक्षित, सुसंस्कृत मध्यमवर्गीय समाज, व एक तितकाच मोठा अत्यंत गरीब व अशिक्षित समाज आहे.

जगणे शक्य, सुसह्य व अधिक सुखाचे व्हावे या साठी बहुधा सर्वच समा़जातले लोक धडपड करत असतात. मा़झ्या पिढीतल्या लोकांपेक्षा आजची पिढी माझ्या मते जास्त सुखवस्तू असून बर्‍यापैकी सुखकारक आयुष्य जगतात, निदान पहिल्या दोन वर्गात तरी.

माझ्या मते काळाच्या गरजेनुसार आयुष्य सुखकर व्हावे म्हणून काय करावे हे सर्व पिढ्यांना समजते. वाढती लोकसंख्या, प्रदूषण, गरजेच्या वस्तूंची वाढती टंचाइ या गोष्टींची मला काळजी वाटते कारण मला त्यातून मार्ग कसा काढावा हे समजत नाही. पण पुढल्या पिढीत कुणाला तरी ते जमेलच अशी आशा आहे.

फक्त धर्म, संस्कृति, चालीरीती यात आमूलाग्र बदल होतील. भारतात ते मुख्यतः ब्रिटिश आक्रमणामुळे झाले असले तरी स्वातंत्र्यानंतरहि भारतात अनेक बदल झाले आहेत व बरीच प्रगति झाली आहे.

का माहित नाही पण मी बराच आशावादी आहे. आणि भारताबद्दल जास्तच. भारतातले आमच्या पिढीतले लाचखाउ भ्रष्टाचारी नाकर्ते लोक एकदाचे मेले तर नवीन पिढी नक्कीच उद्योगी व जास्त ह्षार आहे. अमेरिकेत मात्र येत्या एक दोन पिढ्यात फारच वाईट परिस्थिती आहे - जोपर्यंत मूर्ख, हटवादी, २१ व्या शतकात सतराव्या शतकातले रा़जकारण करणारे लोक मरून जात नाहीत तोपर्यंत.

कुवत असली तरी अजून दहा वर्षांनी बदलत्या जगात आपली कुवत तीच राहिल का याचा विचार किती आईवडील करत असतील? किंवा करतात? >>> Shahrukh khan la aaikav ga he!!

सारूकच्या बाबतीत हा प्रश्ण मला पडला( आता हा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे, आमाल काय त्येचं पण तरीबी) ह्या वयात तिसरं मूल हा बरं हवे असेल?
अपघाताने होतात कधी कधी.. असे एकलेले.. Wink म्हणजे दहा वर्षाचे पहिले मूल .. किंवा मग अचानक जाग आल्यासारखे दुसरे मूल दहा वर्षांनी... पाहिलेय असे.

तसे मूल काय कोणाला वाटेल तितकी वा वाटेल त्या वयात होण्याबद्दल काय सांगायचे... पण इतका खोल विचार करून लेख पाडलाय कौतूक आहे. पण लेखात जरा सरमिसळ आहे.

दक्षिणा, हे सर्व मनोगत म्हणजे माझेच विचार. पण '९०% लोक आर्थिक कुवत पाहूनच मूलं जन्माला घालतात.' याच्याशी मात्र असहमत.

झक्की +१.

मुल्य म्हणजे नेमके कोणते, ते लेखातुन कळलच नाही. १-२ पेक्षा जास्त मुलं जन्माला घालणे हे पुर्वी सर्रास होतेच की. डझनावारी पोरं व्हायची, आणि त्याकाळी आजच्यासारखी आर्थिक सुबत्ताही नव्हती, तरी मुल्य होती (?). आज पैसा हाती येतोय तर मुल्य नाहीत म्हणता?

कुठेतरी लेखातच गडबड झाली की काय? की मला समजलं नाही.

स्पर्धा पुर्वी होती, आताही आहे आणि पुढेही राहणारच. बदल झालाय तो आकड्यात. पुर्वी संधी कमी होत्या, उमेदवारही कमीच होते, आता दोन्हींमध्ये वाढ झालीय, इतकच. कधी नव्हे ते लोकं परंपरागत क्षेत्र सोडुन इतरही क्षेत्रातल्या संधी हस्तगत करु लागले आहेत. असो.

शिक्षणाने मुल्य कधीच येत नाही, कारण मुल्य शिकवल्याने नव्हे तर अनुभवातुन, भोवतालच्या परिस्थितीतुन, आर्थिक व सामाजिक प्रश्नांवर विचार करुन शिकण्याने,वगैरे अनेक मार्गाने बनतात. नविन पिढिला दोष देणे अगदिच सोपे आहे, कारण आपल्या डोळ्यांवर "आमच्या काळी असे नव्हते" असा चष्मा असतोच. पण मला खात्री आहे, की इथल्या प्रत्येकाने हाच डायलॉग त्यांच्या तरूणपणी ऐकला असेलच. तसच स्पर्धेचही... कर्ण-अर्जुन, राम-रावण, भीम-सुयोधन ही स्पर्धा होतीच की. पाटिल-देशमुख-देशपांडे ही एक स्पर्धाच....

जग फारसं बदललच नाही, ते तसच आहे, फक्त आपण म्हातारे होतोय. थोडं तरुण व्हा, मग बघा, नविन दृष्टिने...

जाऊ दे, नविन एक लेख लिहितोच यावर वेगळा Lol

इब्लिस यांचा प्रश्न बरोबर आहे
<< शिकून फक्त नोकरीच करायची असते का?
दुसरे काहीच करायची क्षमता शिकल्याने नष्ट होते की काय?>>
क्षमता नक्कीच नष्ट होत नाही. तरी सुद्धा "दुसर काही" म्हणजे नक्की काय हे पालकांनाच समजत नसते . ते स्वतः संभ्रमात असतात तर ते मुलांना काय सांगणार ? पालकांना स्वताच्या मुलाबद्दल ही शंका असतात. तो करू शकेल कि नाही? त्याचा हा असा घुमा स्वभाव/ ना त्याचा अंगात दुसर्यांना समजावून देण्याची कुवत/ ना पुरेसा चटपटीत पणा/ना व्यावहारिक ज्ञान / ना लोकांना ओळखण्याची दृष्टी ( चांगले लोक-मदत करणारे लोक -निरुपयोगी लोक इत्यादी इत्यादी )अशा परिस्थितीत नोकरी व्यतिरिक्त तो दुसर काहीतरी म्हणजे काय करणार अस पालकांनाच वाटत असाव . त्यामुळे नोकरीचा आधार वाटतो. Happy

कर्ण-अर्जुन, राम-रावण, भीम-सुयोधन ही स्पर्धा होतीच की. पाटिल-देशमुख-देशपांडे ही एक स्पर्धाच....
<<
देशमुख, काहीतरी गंडलंय का याच्यात?

विचार चांगल्या पद्धतीने व्यक्त केले आहेत. असेच विचार मनात यायचे आणि निराश वाटायचं. मग उंटांची कहाणी वाचली आणि ताळ्यावर आलो.

इब्लिस, त्यावेळी कर्ण आणि अर्जुन यांच्यात एक प्रकारची स्पर्धाच होती ना, बेस्ट धनुर्धर कोण याची. कर्णाला (राधेय की कौंतेय पुस्तकात) शब्दवेध कला अर्जुनापेक्षा अधिक चांगली येत होती, पण इतर शब्दवेधी (भीष्म, व इतर आठवत नाही) लोकांना तो नाद ऐकु येउनही त्यांनी अर्जुनालाच सर्वश्रेष्ठ धनुर्धर घोषित केले होते.

राम-रावण हे सीतेच्या स्वयंवराच्या संदर्भात लिहिलय.

देशमुख, पाटिल, देशपांडे यांचं मानाचा संदर्भात. उदा. मानाची पुजा (गावातील दैवत) किंवा जत्रेतील पुजा, वगैरे.

मुद्दा इतकाच की स्पर्धा त्यावेळी होती आणि आजही आहेच.

अजुनही गडबड वाटत असेल तर चिरफाड करा Happy
शिक्षण/ स्पर्धा आवडता विषय असल्याने मलाही माझे विचार तपासुन घेता येतील आणि माझ्या प्रोजेक्टसाठी कामातही येतील.

थोडक्यात स्पर्धा प्रचंड वाढली आहे, हे पालकांचं मत (भ्रम) आहे. ती पुर्वी होतीच आणि पुढेही राहणारच, हा माझा मुद्दा आहे.

ह्या ले़खातील विचारांप्रमाणे माझ्याही मनात नेहमी चलबिचल होतच असते....
अजूनही एक पैलू........
घरटी एकच मूल एका नव्या समस्येला तोंड देईल... त्याला नाती नसणार आहेत.... त्यांच्या पुढील पिढीला तर अजून कमी... ज्या मूल्य शिक्षणाच्या समस्येवर उत्तर म्हणून एकच मूल आहे.... मूलाला फक्त पालकच मूल्य शिक्षण तेही ठरवून देऊ शकतात का?...... मूळात मूल्य शिक्षण असं ठरवून (बसा समोर मी शिकवतो) असं काही होतं का?

काही उदाहरणा दा़खल..
मूलगा असेल... जर त्याला बहिण ही आहे... तीला कोणी त्रास दिला तर त्यातून त्याला येणारा राग होणारी भांडणे... आपण असेच दुसर्‍या कोणासोबत करु नये ही येणारी भावना....
काका ... मामा... नातेवाईक.... (अरे काका... मोठा भाऊ/बहिण... यांच्या चुकून नजरेस पडलो तर.. म्हणून धडकपणे कोठेही सिगारेट ओढता कामा नये.. एव्हंढ भान रा़खलं जायचं!)
एक खूप महत्वांच....
(अनिल अवचटांच्या मुला़खतीतला भाग)
"आम्हांला घरादारातच एव्हंढ बोलून/मारुन अपमानित व्हायची वेळ इतके वेळा आली की....
मोठं झाल्यावर छोट्या-छोट्या कारणांवरुन कधी "ईगो" दुखावला असं झालचं नाही"
.......
घरटी एकच मूल... शारिरिक्/आर्थिक्/मानसिक सर्व परिपूर्ण... ज्याला नाही ऐकायची सवय नाही... त्यांच काय?

वरील सर्व उदाहरणांना प्रतिवाद होऊ शकतो.. ती जर्नलाईल्ज्ड नाहीत... एक मत आहे... एक अनुत्तरित प्रश्न आहे...
अजूनही एक पैलू म्हणूनच त्याकडे पाहवे.

एक मनोगत मांडलेय दक्षिणाने, एकूण उपलब्ध साधनसामग्रीचा - व्यक्तिगत अन सामाजिकही -विचार अपत्य जन्माला घालण्याआधी व्हायला हवा हा आदर्शवाद, तसे होता नाही ही वस्तुस्थिती. त्यातूनच तर लोकसंख्येचा प्रश्न निर्माण होतो. मुलाची हौस, भावंड असण्याचीही भावनिक सामाजिक गरज, धार्मिक मूलतत्ववाद ,आर्थिक विषमता ,गरिबीतील अनिश्चितता ..अनेक कारणे पुढे येतात.धोरणांची सक्ती करता येत नाही.

कित्येक वेळा वाचलेय इथे, शिक्षणाचा आणि संस्कार/ मुल्य वगैरेशी का सबंध लावला जात दर वेळेला?

त्या दोन्ही गोष्टींचा काहीही सबंध नाही/न्हवता. पुर्वीची काय आताची काय अशिक्षित माणसं ह्यांना मुल्य न्हवती? की त्यांनी दिली नाही?

पुन्हा हेच वाटले, लेखिकेचा गोंधळ झालाय.

अनेक मुद्दे एकत्र आलेत. पॅरेण्टिंग, लोकसंख्यावाढ, स्पर्धा, सामाजिक - नैतिक मूल्ये. यांचा परस्परसंबंध लावण्याचा प्रयत्न करत आहे. लेखिकेने मदत करावी ही विनंती.

Pages