एकटेपणा......
दमविणारा , भिवविणारा, रडविणारा.... दुर्धर रोगांशी साहसाने सामना करणार्यांचे कौतूक होते, त्यांच्या लढ्याची पुस्तके छापून येतात, ब्लॉग्स आवडीने वाचले आणि शेअर केले जातात. पण एकटेपणाशी
एकट्यानेच लढा देणार्याच्या पदरी फक्त आणि फक्त उपेक्षाच येते. कोरड्या वैराण वाळवंटात भटकणारा जीव जसे आपला मृत्यूच आता शक्य आहे हे माहीत असूनही रोज काही पावले पुढे टाकत जातो मृगजळाच्या मागे भगभगीत वाळूच आहे हे सत्य माहीत असूनही त्या हिरव्या-निळ्या मरीचिकेत रमून जातो तसे एकटेपण भोगणार्याचे होते. सर्वकाही असूनही हा एकटा जीव आपल्या वैयक्तिक
वाळवंटातून एकेक दिवसाची वैतागवाणी पावले टाकत पुढे जातो. दुकटे होण्या च्या काही शक्यता जरी निर्माण झाल्या तरी बावचळतो. घाबरतो. थोडी फार पावले पुढे टाकून परत मागे येतो आणि आपल्याच कोषात मग्न होतो.
कालच प्रदर्शित झालेल्या द लंच बॉक्स ह्या सिनेमात इला आणि साजन ह्या अश्या दोन जिवांची कथा
अतिशय संवेदनशील पद्धतीने मांडली आहे. बॉलिवूड नावाने उगीचच जगभर प्रसिद्ध झालेल्या गर्हणीय चित्रपटशैलीशी फारकत घेउन रितेश बत्रा ह्या दिग्दर्शकाने एक हळुवार कथा अतिशय नजाकतीने, पण सादरीकरणाची लय बिघडू न देता मांडली आहे. एडिटिंग इज जस्ट राइट.
मुंबईतील एका दिवशी ह्या कथेची सुरुवात होते. जीवनाची तीचती चेपलेली पुंगळी सरळ करून रोज नव्या उत्साहाने एका अतिरेकी दिवसाला सामोरे जाणारे मुंबईकर! त्या लोकल्स, स्टेशनवरील गर्दी आणि बॅगा घेऊन कार्यालयाच्या दिशेने चिंबलेली पावले टाकणारे चाकरमाने लोक. ह्यातलाच एक साजन. मध्यमवयीन विधूर. आपल्या नोकरीतून स्वेच्छा निवृत्ती घेऊन नाशीकला स्थायिक होण्याची वाट बघत असतो.
बायको वारल्यावर, कसलेच कौटुंबिक बंध न उरलेला, त्यातून एकल कोंडा , विक्षिप्त झालेला ,
कुठेच फिट होऊ न शकणारा साजन इर्फान खानने नुसता रंगवला नाहीतर जिवंत केला आहे. एकट्याने आवरून कार्यालयात येणे. रोजचे रूटिन काम पण बारकाईने, निगुतीने करणे. कारण काही डिस्ट्रॅक्षनच नाही! न बायकोचा फोन न मुलांच्या/ घरच्या कटकटी. जिवंत राह्ण्यासाठी आवश्यक म्हणूनच केवळ करायची ती नोकरी. लोकल मधून धक्के खात घरी आल्यावर कॉलनीतील मुलांवर व्यक्त होणारा वैताग. पार्सल एकट्याने उघडून वाढून घेणे आणि जेवणे. बाल्कनीत उभे राहून धुम्रपान करणे. असह्य झाले कि डोळे मि टून पडणे. हे जीवन असेच एक दि वस संपून जाणार आहे हे अधोरेखित करणारा
आजुबाजूचा न बदललेल अवकाश. जुनी सायकल, जुने पाने सामान, व्ही एच एस टेप्स त्याव र बायकोने रेकॉर्ड केलेले जुन्या मालिकांचे भाग. सगळे कसे साकळलेले. कुंद एखादा विनोद सुचला तर, हपिसात वादावादी झाली तर एखादे गाणे आवडले तर सांगायला, शेअर करायला कोणीच नाही असा
एकसंध एकटेपणा.
ह्यात एकदम बदल होतो म्हणजे एक दिवस त्याला इलाने बनवून दिलेला डबा चुकीने मिळतो. घरच्या जेवणाला तरसलेला ( हपापलेला नव्हे) साजन सुखावतो व सर्व फस्त करतो. आपली इलाशी ओळख आधीच झालेली असते. नवर्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी शुष्क संसारात परत जान आणण्यासाठी धडपड णारी इला उत्तम चविष्ट अन्न बनवून नवर्याला पाठवत असते पण कामाच्या रेट्यात, विवाहबाह्य संबंधात गुंतलेला तो तिला समजून घेणे सोडा, तिचा पारच अनुल्लेख करत असतो. त्यांच्या संसारातला साचलेपणा तिला असह्य होतो. पण उपाय सापडत नाही म्हणून ती तशीच गतानुगतिकतेने दिवस-रात्री मोजत जगत असते.
डबा चाटूनपुसून खाल्लेला पाहून इला आशावते. पण मग अदलाबदल झाल्याचे कळल्यावर निराश
होऊन एक चिठ्ठी डब्यात टाकते. अहो आश्चर्यम! त्या चिठ्ठीचे उत्तरही येते. आंतरजालावरही आता अभावानेच आढळणारी अॅनॉनिमिटी ह्या दोघांना अपघाताने नसीब होते. दोघे आपापले जीवन, विचार शेअर करतात. अनवधानाने मनाने जवळ येत जातात. भेट्णे अपरिहार्य होते त्या पॉइन्टलाच कथानक एक वळण घेते आणि एका अनपेक्षित, अनिश्चित क्षणी हा प्रवास संपतो. इन्सेप्शनच्या शेवटाप्रमाणेच हाही शेवट हुरहुर लावून जातो. डबेवाल्यांच्या ज्ञानोबा माउलीच्या जपात सूर आणि पावले मिळवून आपण बाहेर पडतो. आपल्या जीवनातल्या हुकलेल्या संधी, मैत्रीच्या शक्यता पडताळून पाहात,
पण कथानकाचे आणि दिग्दर्शनाचे कौशल्य हेच आहे कि कुठेही मनात कडवटपणा उरत नाही. मनाचे बंध कुणाशी, काही काळ का होईना जुळले तर! नाहीतर पुढे आहेच एकटेपणाशी झुंज! सारे माहितीचे
आणि असह्य! गॉड ऑफ स्मॉल थिंग्जमधील अम्मू -वेलुथा, मुराकामीच्या आय क्यू ८४ मधील तेंगू आणि आओमामी अश्या काही अपघाताने भेटलेल्या जोडप्यांचा संदर्भ घेतल्यास दिग्दर्शकाचे विषय हाताळणीतील कौशल्य अधिक नजरेत भरते आणि मनावर एक सुखद अस्तर पसरते. इला आणि साजन यां चे वैयक्तिक विश्व कधीच एकमेकांत मिसळत नाही. ती तिचे जीवन जगते आणि तो त्याचे. पण जगात
कुठे तरी तो आहे आणि ती आहे ह्या जाणिवेनेच त्यांच्या जीवनातला एकटेपणा मिटतो. आपल्या आईचे जीवन ज्या चाकोरीत घट्ट बांधले गेले होते ते आणि तसेच आपलेही जीवन जात आहे; जाणार आहे ह्याची जाणीव झाल्यावर ती हादरते. पण जीवन संपवत नाही' तर एका वेगळ्या दिशेने स्वतःचा प्रवास चालू करते. ह्यात तिला साजनची सोबत हवी असते, गरजही असते पण तो नाहीच आला तरीही तिचा
निर्णय झाला आहे. ती स्त्रीवादी नाही, फक्त एक माणूस म्ह्णून जगण्यातील घुसमट, तोचतोपणा नाकारून नवे काहीतरी अनुभवायचा आपला हक्क ती तपासून बघणार आहे.
रोजचे आंबट दही नको वाटले तरी खावे लागणार्या माण सा ला अनपेक्षित पणे एखाद दिवशी
तिरामिसू मिळाले तर काय वाटेल तशी साजन ची मनःस्थिती होते. इलाला भेटायच्या कल्पनेने तो फुलतो
पण आपल्या मध्यमवयीन सेन्सिबिलीटीज त्याला नाकारता येत नाहीत. तिला नुसते बघून तो मागे फिरतो. पण रिटायरमेंट व पुढे येणार्या वृद्धत्वाला निमूटपणे स्वीकारावे अशी स्वतः ची समजूत
घालणारा तो जगून बघण्याच्या एका आदिम योलो जाणिवेतून आयुष्याला परत सामोरा जातो.
मनाची घट्ट बंद केलेली दारे किलकिली करून बाहेरचा प्रकाश, प्रेमाची, सहअनुभवाच,, सहवेदनेची जाणीव अनुभवायचे धाडस करतो. पुढे काय तर ग्यानबा तुकाराम! इब्तदाए इश्क में हम सारी रात जागे अल्ला जाने क्या होगा आगे?
करण जोहरने सादर केली असली तरीही ही रूढ अर्थाने प्रेम कथा नाही. त्याला साचेबंद अंत नाही उत्तरायण सारखी कंपॅनिअन शिपची कथा पण नाही. या वयात को णीतरी पाहिजेच ना असा मध्यमवर्गी द्र् ष्टिकोण ह्यात नाही. तर जीवनाने तुम्हाला कसलाही डाव दिलेला असो तो खेळून बघितला पाहिजे, त्यातल्या सर्व शक्यता पडताळून पाहिल्या पाहिजेत असे ह्या चित्रपटातून व्यक्त होते. हा एक दृष्य अनुभव आहे दोन माणसांच्या जीवन रेखा एकमेकांत मिसळू बघतात त्याचा. चित्रपटाची नेपथ्य, कॅमेरा इत्यादी अंगे पण अतिशय पूरक आहेत. मुंबई अंगावर येत नाही. पात्रांची आर्थिक परिस्थिती, त्यांच्या जगण्यातूनच दिसत राहते. नवाजुद्दीन सिद्दीकीचे काम नेहमीप्रमाणेच उत्तम. त्याच्या परिस्थितीतील विसंगती, फाइल वर भाजी चिरणे, लोकल मध्ये बसून! सहज विनोद निर्माण करणारी संवाद फेक ...
हा कलाकार नेहमीच एक गोळीबंद पर्फॉरमन्स सादर करतो.
भारती आचरेकरांची आवाजी सोबत इला बरोबरच आपल्यालाही मिळत राहते. एक भुतानीज प्रेमगीत रात्री च्या अंधारात ह्वेत विरत जाते तो क्षण फार गोड वाटला मला! तेव्ढ्या पुरते इला आणि साजनचे प्रेम जिवंत होते. शक्यता अशक्यतेच्या धुक्यातून पुढे यायचा प्रयत्न करतात एकटेपणाला दुसरा एकटेपणा येऊन मिळतो आणि अंतर्धान पावतो.
डबेवाल्यांचे खास मराठी पण नीट पकडले आहे. ते कुठे तरी हलवून टाकते. त्यांचे मेहेनती प्रामाणिक चेहरे
जवळीक साधतात. कदाचित मी मराठी असल्याने असेल.
मुराकामीने लिहिल्या प्रमाणे,
" I'm tired of living unable to love anyone. I don't have a single friend - not one. And, worst of all, I can't even love myself. Why is that? Why can't i love myself? It's because I can't love anyone else. A person learns how to love himself through the simple acts of loving and being loved by someone else. Do you understand what i am saying? A person who is incapable of loving another cannot properly love himself.”
― Haruki Murakami, 1Q84
सोमवार पासून डबा लावावा म्हणते जेवायचा.
मुराकामी यांचे कोट जालाव रून साभार. पण पुस्तक पैसे देऊन विकत घेतले आहे तरीही आक्षेप असल्यास
काढून टाकते.
शाहरुखने आजवर कधी सिनेमात
शाहरुखने आजवर कधी सिनेमात दुसर्याचा नवरा पळवलेला नाही. हल्ली पाहिलेल्या तो बॉम्बे टॉकीज सिनेमात एक यंगस्टर मुलगा राणी मुखर्जीचा नवरा पळवतो. पब्लिकने शिव्या नाही घातल्या त्याला (निदान माझ्या समोर तरी) . के.जो म्हणाला त्यात तथ्य असावे.
अमा, किती बारकाइने विचार करता
अमा,
किती बारकाइने विचार करता तुम्ही लोक... तुमच्या प्रतिक्रिया वाचून मला सिनेमा जास्तच कळला असे वाटायला लागल आहे... आणि नकळत तुम्हा लोकंशी एक धागा जुळत आहे ......
<<<< तुमच्या कडे टनाने आत्मभान असेल पण शेव्टी जीवन अर्थपूर्ण बनवायला एक सोबत, एक साथ लागते. पण ती मिळवायला एक हिंमतही लागते. ही हिंमत हारतो माणूस. प्रेम उपलब्ध असते पण ते घ्यायला आपण कमी पड्तो. आणि एकटेपणाशी हातमिळवणी करतो.>>>> याला तर स्टंडींग ओव्हेशन आहे....
पण ती मिळवायला एक हिंमतही
पण ती मिळवायला एक हिंमतही लागते. ही हिंमत हारतो माणूस. प्रेम उपलब्ध असते पण ते घ्यायला आपण कमी पड्तो. आणि एकटेपणाशी हातमिळवणी करतो.>>>> याला तर स्टंडींग ओव्हेशन आहे....
>>>
+१
दुनियादारी आठवला..
कोणी आपला गळा आवळत असेल तर आपण प्राणाच्या आकांताने हातपाय झाडतो..
पण ते हातपाय आपण आपले प्रेम मिळवायला झाडत नाही .. चुकतो इथेच.. आणि मग आयुष्य निरर्थक बनून राहते.. निष्प्राण नसते इतकेच
सामाजिक प्रेशरचे काय करणार??
सामाजिक प्रेशरचे काय करणार?? मनातल्या मनात प्राणांतिक धडपड चालुच असते पण त्याला मुर्त रुप दिले आणि आपल्या नातेवाईकांनी ते स्विकारले नाही तर काय ही भावना पाय मागे खेचते. कित्येकदा असेही होते की धाडस करुन मन घरच्यांसमोर मांडल्यावर ते स्विकारलेही जाते पण तरीही जर..तर च्या हिंदोळ्यावर मन हिंदकळत राहते आणि तोंड कधीही उघडले जात नाही.
भारतीय समाजात कुटूंबव्यवस्थेचे खुप स्तोम आहे पण स्त्री-पुरूषांना मुले-बाळे, भाऊ-बहिण यांसोबत एक जोडीदारही हवा असतो याकडे दुर्लक्ष केले जाते. एक विशिष्ट वय उलटले की मग स्त्री-पुरूषांनी जोडीदाराचा विचार सोडुन मुला-बाळांमध्ये, नातलगांमध्ये मन रमवावे ही अपेक्षा, मग त्या मुला-बाळांनी आणि नातलगांनी कितीही उपेक्षा केली तरी चालते.
आणि उपेक्षा जरी केली नाही तरी आयुष्यात प्रत्येकाची एक जागा ठरलेली असते. दुसरी व्यक्ती तिथे फिट होऊ शकत नाही. जिथे जोडीदार हवा तिथे तोच हवा, ती जागा भाऊ-बहिण घेऊ शकत नाही. पण आपल्याइथे हे लक्षात घेतले जात नाही.
आणि इथे स्टँप खुप लवकर मारले जातात. एकदा का एकटा म्हणुन स्टँप बसला की मग त्या एकट्याने कितीही दुकटे व्हायचा प्रयत्न केला तरी त्याला साथ मिळत नाही.
इथे या टप्प्यावर ह्या धाग्या
इथे या टप्प्यावर ह्या धाग्या शी गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज चा धागा आणून जोडला पाहिजे. त्यातही अप्रतिम दाखवले आहे. मी त्या धाग्याव्रही याबद्दल लिहिले होते. अम्मू वेलुथा असेच दोन समाजस्तरातले लोक जर एकत्र आले असते तर त्यांचे सह जीवन सुखाचेच झाले असते, मुलांना एक प्रेमळ पिता स दृश्य व्यक्तिमत्व मिळाले असते पण त्यांची वाइट ताटातूट होते. एक मरतो व दुसरे पिचत जगत मोठे होतात. अम्मो पण एकटीच मरते कुठेतरी कधीतरी.
समाज वगैरे बंधनात नेहमी गोड, रेशमी सुखवणारे तेच कसे अड्कून फाट्ते आणि वाइट रूढींना मात्र पुष्टी मिळ्त राहते हे मला समजत नाही. हे कोण दुष्ट समाज धूरिण असतत त्यांना घाबरून मुलांचे /मोठ्याचे एक्मेकाशी प्रेम निद्र्यय पणे चुरडले जाते. साधनाच्या पोस्टला संपूर्ण अनुमोदन.
ही मनाची तडफड मला आपल्या
ही मनाची तडफड मला आपल्या एशिअन समाजात फार आढळलेली दिसली.
मधे की वर्जिनिया बीचला गेलो होतो. तिथे मला एक टॅक्सी ड्रायवर भेटली. ५५ वर्षाची होती. ३ वाजले होते. म्हणली ५ ला माझी आज हॉट डेट आहे. २ तास तिने मला खूप फिरवले. मी तिला थोडे संकोचित होऊन विचारले. अगदी ह्या वयात हॉट डेट वगैरे इथे शक्य आहे!!?. तर मी म्हणाली इथे अमेरिकेत हे खूप खूप कॉमन आहे. जोडीदार नाही आवडला तर त्याला सोडून दुसरा निवडणे, किंवा लग्न न करता आयुष्य फक्त चार दिवस कुणाच्या सहवासात घालवणे हे फार रुळलेल आहे. मला तिचा फार हेवा वाटला. अशा वाटा आपल्या समाजात अजून तयार झालेल्या नाहीत.
थोडे अवांतले: तिचे ईंग्रजी इतके छान होते ना.. ती फक्त डोन्ट यू एवजी डोन्च यू..असे अनेक शब्दांमधे न्ट एवजी न्च लावायची. तो च चा उच्चार मस्त वाटायचा.
अशा वाटा आपल्या समाजात अजून
अशा वाटा आपल्या समाजात अजून तयार झालेल्या नाहीत. >> वाटा नाहीत पण चोरवाटा पहिल्यापासून आहेत. ज्युरासिक पार्क सिनेमात एक मस्त वाक्य आहे लाइफ फाइंड्स अ वे. नैसर्गिक उर्मींना तुम्ही फार काळ रोखू शकत नाही. पण ही माझी गरज आहे, ती मी पुरी करणार. त्यात समाजाचा संबंध नाही आणि जोपर्यंत काहीही बेकायदेशीर करत नाही तोपर्यंत उगीच कश्याला घाबरायचे असा विचार फार लोक्स करत नाहीत. मन मारणे ही घातक पद्धत आपल्या एशिअन कल्चर मध्ये उगीचच रुजली आहे.
पण चोरवाटांचा जास्त त्रास
पण चोरवाटांचा जास्त त्रास होतो.
मुळात आपल्या किंवा एशिअन समाजात आयुष्याची एक आखणी केली गेलीय. अमुक वयात अमुक, तमुक वयात तमुक. त्यामुळे शिक्षण घ्यायचे तर ते विशीपर्यंतच. पन्नाशीत कोणी शिक्षण घेत असेल तर ती पेपरात येण्याइतपत मोठी बातमी होते. तद्वत, जोडीदार पहायचा तो एकदाच आणि तोही तिशीतच. साठीत जोडीदार हवासा झाला तर त्याचे हसे होते.
या आखणीमय आयुष्याचा कंटाळा येतो पण त्यातुन बाहेरही पडता येत नाही. कारण परत तेच. पाश्चिमात्य जगात ही आखणी नाहीय त्यामुळे त्यांना पन्नाशीतही परत कॉलेजात जाता येते आणि सत्तरीत डेटींग करता येते. तिथे कोणालाही त्याचे आश्चर्य वाटत नाही तर ती त्याची गरजच आहे असे मानले जाते.
समाज वगैरे बंधनात नेहमी गोड, रेशमी सुखवणारे तेच कसे अड्कून फाट्ते आणि वाइट रूढींना मात्र पुष्टी मिळ्त राहते हे मला समजत नाही.
खरेच.... तरी आता निदान साहित्यात तरी हे रेशमी सुखावणारे काहीतरी काहीजण मिळवतात असे दाखवतात. आजपासुन २५ वर्षांपर्यंतच्या कथा कादंब-या, चित्रपट पाहिले तर ह्या रेशमी सुखावणा-या काहीतरीच्या अगदी जवळ जाऊन् मग शेवटच्या क्षणी ते हातुन निसटुन गेलेलेच दाखवायचे. ज्यांच्या हातुन असे निसटुन गेले ते लोक नीतीवान होते म्हणुन त्यांनी निसटू दिले हे वर ठिगळ असायचे.
नीती-अनितीच्या वेडगळ कल्पनांनी किती मनांच्या चिंध्या केल्या असतील देवासही माहित नसेल. देवाजवळही आपल्या मनातले बोलायला घाबरणारे आपले लोक 
अमा लिहितात...."...म्हणून तर
अमा लिहितात...."...म्हणून तर अन कंडिशनल प्रेम जिथून मिळेल तिथे ते घ्यायला जीव धड्पड्तो...." ~ अगदी खरं. जीव तर धडपडतो पण समोरील व्यक्तीकडून टक्केवारीच्या भाषेत लिहायचे झाल्यास एक टक्काही प्रतिसाद नाही दिला त्या धडपडीला तर अदृश्यरित्या तिच्या हृदयात दु:खाचे जे तरंग उमटतात त्यावर तर कुणी भाष्यही करू शकत नाही.
जी.ए.कुलकर्णींची ती १९५५ मधील कथा...."सूड"....ती तात्पुरत्या करारावर घेतलेली आणि एम.ए. झालेली शिक्षिका शाळेच्या वर्षाचा शेवटचा दिवस आणि त्या वेळी समोर आलेला विशेष अस्तराचा चहा घेऊन निमूटपणे पर्स वही घेते आणि स्टाफरूममधून बाहेर पडते....अन्य शिक्षक सहकार्यांच्या बोलण्याच्या तबकडीवर ती एखाद्या माशीप्रमाणे शांत राहिलेली असते. शाळेबाहेर लाल एस.टी. येते....धुरळा उडतो आणि ती नाहीशी होते...कायमची...कुठे गेली असेल, कुणीतरी असेल का तिच्यावर प्रेम करणारे, आठवणीचे काटे राहतात....पण ती समोर असताना तिच्याशी कुणी दोन शब्दही बोलत नव्हते हा सल मात्र आता लेखकाच्या उरी कायमचा वस्तीला आला....
....म्हणून संवादाचे....तो अर्थपूर्ण असो वा नसो....हे महत्त्व....नात्यासाठी.
चोरवाटांचा त्रास होतोच. पण
चोरवाटांचा त्रास होतोच. पण त्याही पेक्षा, गरजा सहज आणि सन्मानाने पुर्या होत नाहीत तेव्हा त्या पुर्या करण्या साठी जेव्हा एखादा/ एखादी, हे खरे तर लिंग निरपेक्ष सुद्धा आहे. चोरवाटेने जाते तेव्हा जी जमीर की शरमिंदगी उगीचच महसूस करायला लागते ती खरे तर लागू नये पण एक प्रकारचे ते शारीरिक व मानसिक डिग्रेडेशन आहे असे त्या व्यक्तीलाही वाट्ते. इतर तर टोचायला बसलेलेच असतात. हे असे व्हायची गरज नाही. आपण दुसर्याच्या बाबतीत असे काही घडल्यास त्याच्च्या प्रायव्हसीचा सन्मान ठेवुन पुढे जाऊ शकतो. बट फॉर दिस क्रुएल समाजाची कुजकी मानसिकता!!! पतिव्रता ते कुलटा स्केल वर मिडल ग्राउंड नाहीच. बाप रे माझ्या मनाची अस्तरे पार फाटून चालली आहेत. पण आता ते मॅटर करत नाही. रिटायर्ड हर्ट.
जमीर की शरमिंदगी हा शब्द प्रयोग मला अल्ताफ राजा( ऑफ तुम तो ठहरे परदेसी फेम) ह्याची त्याच क्यासेट वर एक सॅड गझल/ कव्वाली आहे त्यात मिळाला होता. अगदी फिट बसतो.
very sad. स्थितप्रज्ञता येईतो
स्थितप्रज्ञता येईतो कशाकशातुन जावे लागते ..
शेवटी एकदा तिथे पोचले की मग कोई खुशी खुश नही करती और कोइ गम आंखे नम नही करता...
खुप छान वाचायला मिळतयं. अजुन
खुप छान वाचायला मिळतयं.
अजुन एकदा पहावा लागणार लंचबॉक्स
अमा, साधना, मनाचा तळ शोधणारं
अमा, साधना, मनाचा तळ शोधणारं लिहीताय.
बंडखोरीलाही साथ लागते. वर लिहील्याप्रमाणे प्रवाहाविरूध्द जायची तयारी दाखवायला दुसरी व्यक्ती तितकीच धाडसी असावी लागते. ती मिळाली तर लॉटरीच. मग खरंच, तेव्हा अशी समाजाची, रूढींची कोणतीही बंधनं तुम्हाला अडवू शकत नाहीत. जोपर्यंत दोन व्यक्ती या पातळीपर्यंत एकमेकांपर्यंत पोचत नाहीत तोवरच समाज त्यांना पकडू शकतो, एकदा का त्या पार गेलं की ज्यासाठी एवढं झगडलो ते किती क्षुद्र होऊन बसते. आयुष्य क्षणाक्षणाने संपत आहे, मनातल्या इच्छा - त्यांच्याशी प्रामाणिक राहणंच अवघड होऊन बसलंय.
१०-१२ वर्षापासून हळूहळू
१०-१२ वर्षापासून हळूहळू परिस्थिती बदलत आहे. पतिव्रता ते कुलटा च्या स्केलवर लिव्ह-ईन पार्टनर कायद्याने आलेली आहे. अनेक ज्ये. ना. स्त्रिया अशा पध्दतीने राहतात. गुजरातेत सिनीयर स्त्री-पुरुषांसाठी मेळावे होतात. हे चांगले बदल आहेत. मुले, भाऊ-बहिण, आई-बाप विरोधात असतील तरी जर व्यक्ती आर्थिक दृष्ट्या सक्षम असेल तर (आणि तशी मानसिक गरज असेल) तर जोडीदार जरूर शोधावा. प्रौढ वयात साथीदाराचा शोध ही अवघड प्रक्रिया असते अनेक वेळा त्या प्रोसेसला घाबरून ज्ये. ना. एकाकीपण पसंत करतात. आत्मभान असेल तर अशी व्यक्ती समाजापेक्षा स्वतःच्या मानसिक गरजांशी फाईन ट्यून्ड असते.
लंच बॉक्स चांगला सिनेमा असला तरी आउटडेटेड आहे - दिपा मेहता च्या वॉटर सारखा.
लास्ट १०-१२ पोस्टस खूप छान
लास्ट १०-१२ पोस्टस खूप छान आहेत. छान लिहीताय.
लंच बॉक्स चांगला सिनेमा असला
लंच बॉक्स चांगला सिनेमा असला तरी आउटडेटेड आहे
चित्रपटातल्या इलाचाही संसार बाहेरुन चांगलाच आहे. अशा संसारातुन बाहेर पडुन इला स्वत्:च्या आनंदाचा शोध घेतेय असे दाखवले तर लोकांना ते आवडणार नाही म्हणुन बहुतेक नव-याच्या अफेअरचे अतिशय धुसर असे चित्र उभे केलेय. इलाला संवादाची जी ओढ आहे ती तशी असावी ही कल्पना इथल्या समाजातल्या बहुसंख्य लोकांच्या गावीही नाहीय.
आणि हा चित्रपट उतारवयातल्या जोडिदाराच्या गरजेवर भाष्य करत नाहीय तर ज्याच्याशी संवाद साधता येईल, मनातले बोलता येईल अशा प्रकारच्या जोडीदाराची गरज माणसाला कधी पडते का? जो आहे त्याच्याशी प्रयत्न करुनही संवाद होत नसेल तर आपण आपल्या मनातच कुढत राहुन आयुष्य कधी संपतेय याची वाट पाहात बसावी का? की यातुन बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा? या प्रश्नांवर चित्रपट भाष्य करतो.
ही गरज केवळ उतारवयातली नाहीय तर मनुष्यप्राणी जोडीदार असण्याक्षम झाला की ही गरज प्रत्येक वळणावर आहे. वयाची रेंज १६-९० कुठेही असु शकते. चित्रपटात इला तिशीतली आहे तर साजन पन्नाशीतला आहे. एकटेपणा दोघांच्याही वाट्याला आहे. इला संसारात आहे तरी एकटी आहे, साजनचा संसार संपलाय म्हणुन तो एकटा आहे. संसारात असताना तो कितपत दुकटा होता यावर चित्रपटात काहीच भाष्य नाही. कदाचित दुकटा असावा.
लोकानुनयासाठी चित्रपटात जरी नव-याचे अफेअर असावे असे सुचीत केलेय, तरी इलाच्या बाहेर पडण्याचे ते कारण नाही हे दिग्दर्शक ठामपणे मांडतो. आजुबाजुला संसार ओढत बसलेल्या लोकांना ती पाहतेय, स्वतःचा संसार तसा नको व्हायला यासाठी ती तिला शक्य तसे प्रयत्नही करते. पण तिथे पुर्ण अपयश आल्यावर मात्र ती आयुष्य असेच ओढत न्यायचे नाकारते. आणि हा निर्णय तिचा आहे. इला बाहेर पडतेय ते साजनच्या जीवावर नाही तर तीने स्वतःच्या हिमतीवर हा निर्णय घेतलाय. चांगल्या नात्यासाठी माणसांमध्ये संवाद हवा हे तिला असंवादी नात्यामध्ये राहुन कळालेय. साजनबरोबर आपल्या मनाची तार जुळतेय हे तिच्या लक्षात येते म्हणुन ती त्याला स्वतःबरोबर येणार का हे विचारते. तो आला नाही तरी तिचा निर्णय बदलत नाही.
त्याचवेळी साजनला एकटेपणाची सवय झालीय. भोवतालच्या समाजाशी आपले काहीच नाते राहिले नाही हेही माहित नाही इतका तो एकटा पडलाय. पण इलाशी संवाद सुरू झाल्यावर त्याला आपल्या एकटेपणाची जाणिव होते. आपण एकटे आहोत हे कळल्यावर तो एकटेपणा त्याला नाकारावासा वाटतो. नवाजुद्दीनच्या बायकोच्या तोंडावर हा एकटा आहे हे कळल्यावर आलेले थोडेसे कणवेचे भावही त्याला असह्य होतात आणि तो चटकन "पण मला गर्लफ्रेंड आहे" हे सांगुन मोकळा होतो. तोवर त्यालाही कदाचित माहित नसेल की तो इलाला आपली गर्लफ्रेंड समजतोय ते.
पण तरीही त्याची इलाला भेटायची हिंमत होत नाही. हे अगदी इथल्या आजच्या समाजासारखेच. गाडीत भेटलेला म्हाताराही कोणालातरी भेटायला चाललाय, म्हणजे त्याचे कोणतरी आहे हे पाहुन मात्र त्याला राहवत नाही. आपल्यासाठीही कोणीतरी आहे, पण आपण मात्र हल्लीहल्ली नावडणारा एकटेपणा परत आपल्यावर लादुन घेतोय हे लक्षात आल्यावर तो एकटेपणा संपवायला निघतो.
प्रश्न हा आहे की आपल्याला हे कळलेय तरी इला आणि साजनसारखी हिंमत आपण दाखवु शकु का? त्यांच्यासारखे कोणी जोडीदार आपल्याला भेटले तर आपण हात पकडण्याची हिंमत दाखवु शकु का? कोणी हात पुढे केला तर आपण तो हात पकडायची हिंमत दाखवु शकु का? या चित्रपटाने तरी तशी हिंमत दाखवुन बदल घडवा हा संदेश दिलाय. पुढे काय होईल ते पुढचे पुढे. पण निदान असा हात पुढे आला तर तो हातात तरी घ्या. दुर्दैवाने चुकीच्या ट्रेनमध्ये चढलात तर उतरताना तरी काळजी घ्या, चुकीची ट्रेनही कधीकधी हवे ते स्टेशन गाठून देते.
मला तरी हा चित्रपट अजिबात आऊटडेटेड वाटला नाही.
वा साधना! सुंदर लिहिलेत. मी
वा साधना! सुंदर लिहिलेत.
मी हा सिनेमा & वाहिनीवर पाहिला. चित्रपटाच्या दरम्यान दिग्दर्शक रितेश बात्रा आणि निम्रत कौर बोलत होते. रितेशला डब्बेवाल्यांवर डॉक्युमेंटरी करताना हा चित्रपट सुचला. निम्रतचा डबा पोचवणाराही अभिनेता नसून डबेवालाच आहे. "नवाजुद्दीनच्या बायकोच्या तोंडावर हा एकटा आहे हे कळल्यावर आलेले थोडेसे कणवेचे भावही त्याला असह्य होतात आणि तो चटकन "पण मला गर्लफ्रेंड आहे" हे सांगुन मोकळा होतो." इथे तो चटकन नाही सांगत. त्याआधी बरीच शांतता आहे. कोणत्याही शाब्दिक संवादांशिवाय इर्फानच्या चेहर्यावर वीसेक सेकंद कॅमेरा रोखलेला आहे आणि तो शॉट व अभिनय खूप आव्हानात्मक आहे हे निम्रतने याबद्दल सांगितल्यानंतर लगेच तो शॉट पाहताना पटले.
चित्रपट आउटडेटेड नाहही पण डेटेड आहे. मोबाइल फोन्सचा वापर नाही ना? बालदीत/बादलीत धुवायचा एकेक कपडा तपासत खाली बसलेली ईला.
साधना, सुंदर पोस्ट!
साधना, सुंदर पोस्ट!
परत पाहायला पाहिजे चित्रपट.
परत पाहायला पाहिजे चित्रपट.
मी रात्री पाहिला, अर्धवट झोपेत काहीतरी निसटुनही गेले असेल. 
पण हा सिन पाहताना तिच्या संवादानंतर थोडासा ताण जाणवतो. नंतर तो गर्लफ्रेंडबद्दल बोलतो तेव्हा तो ताण मोकळा होतो.
इन द मेकिंग यु टुबवर असेल तर पाहायला हवे.
हॉटेलात भेटायचे ठरते तेव्हा फोन का करत नाहीत हा प्रश्न मलाही पडलेला. बाकी कपड्यांच्या बाबतीत - मीही असेच कपडे घेऊन बसते, एकेक कपडा नीट बघुन रंग जाणारे वेगळे, रंगीत वेगळे, पांढरे वेगळे असे वर्गीकरण करत
नाही. निम्रतने ते तसे आधी
नाही. निम्रतने ते तसे आधी सांगितले नसते तर कदाचित माझ्याही लक्षात आले नसते. घरी बसून दुसरे उद्योग करत पाहण्यासारखा तो सिनेमा नाही. मी रेकॉर्ड करून मग पाहिला होता. पण दुर्दैवाने चित्रपट पाहिल्यावरच हा धागा नीट वाचला व त्यातली आताची चर्चाही मी चित्रपट पाहिल्यानंतरच झालीय. त्यामुळे अनेक तरल,सूक्ष्म जागा निरखण्यासाठी चित्रपट पुन्हा पहावासा वाटतोय. पण मी पाहून झाल्या झाल्या डिलिट केला.
यु टुबवर पुर्ण चित्रपट आहे.
यु टुबवर पुर्ण चित्रपट आहे. मी तिथेच पाहिला.
या चित्रपटाने तरी तशी हिंमत
या चित्रपटाने तरी तशी हिंमत दाखवुन बदल घडवा हा संदेश दिलाय. >> कधी? हे माझ्या लक्षात आले नाही.
मला तरी ईला स्वतः बदल घडवायचा प्रयत्न करते (आनंदी प्रदेश इ.) आणि साजन त्याच्या रिटायर्ड आयुष्यात जातो. त्यात ते समाधानी एवढच दिसले. म्हणूनच मला आउटडेटेड वाटला.
शेवटची पाच मिनिटे पाहिली
शेवटची पाच मिनिटे पाहिली नाहीत काय?
तो घरी परततो, मुलांशी बोलतो, बॉलही परत देतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे तो डब्बेवाल्यांना गाठुन इलाच्या डब्याचे वर्णन करुन तिचा पत्ता शोधायचा प्रयत्न करतो.
तो जेवणाचा डब्बा हाच तर त्यांच्यामधला दुवा असतो. आधी इला ड्ब्बेवाल्याकडुन त्याच्या ऑफिसचा पत्ता घेताना दाखवलीय. साजनही डबेवाल्यालाच गाठतो. शेवटी तो डब्बेवाल्याबरोबरच ग्यानबा तुकाराम करत इलाच्या घरी निघतो.
ईलाही डबेवाल्यामागोमाग
ईलाही डबेवाल्यामागोमाग साजनच्य ऑफिसात पोचतेच की. तिथे तिला शेख भेटतो.
मग ती स्वतःचे दागिने विकून भूतानला(! - एकटीच) जायची तयारी करते. शेवटी वरच्या पोस्टप्रमाणे साजन इलाच्या घरी पोचायच्या आधीच तिने घर सोडले असेल का अशी चुटपुट लागून राहते.
ती एकेक दागिना उतरवत असते तेव्हा आधी दाखवलेल्या एका बातमीप्रमाणे आत्महत्या करायला जातेय का असे वाटते. मग तिने लिहिलेली चिठ्ठी वाचून कळते.
शेवटी वरच्या पोस्टप्रमाणे
शेवटी वरच्या पोस्टप्रमाणे साजन इलाच्या घरी पोचायच्या आधीच तिने घर सोडले असेल का अशी चुटपुट लागून राहते.
हो, चित्रपट पाहताना मलाही अशी भिती वाटायला लागली. टिपिकल हिंदी मुवि
पण भुतान काही खुप मोठा प्रदेश नाहीय, तो डब्बेवाल्याकडुन पत्ता काढू शकतो तर भुतानलाही पोचू शकतो.
हो, पाहिली की. मयेकर म्हणतात
हो, पाहिली की. मयेकर म्हणतात तस त्यांची भेट झाली की नाही हे माहित नाही. त्यामुळे "अपूर्णतेतील गोडी" इ इ वाटले पण संदेश वगैरे जाणवला नाही. (माझे वै.म म्हणून सोडून द्या. लोकांना मिळाला असेल संदेश तर बरच आहे.)
लोकांना मिळाला असेल संदेश तर
लोकांना मिळाला असेल संदेश तर बरच आहे.>> वी आर ऑल अॅडल्ट्स. आपली सोल्युशन स्वत: शोधू शकतो. संदेश वाचून मते बनवण्याचे वय गेले:
मुले, भाऊ-बहिण, आई-बाप विरोधात असतील तरी जर व्यक्ती आर्थिक दृष्ट्या सक्षम असेल तर (आणि तशी मानसिक गरज असेल) तर जोडीदार जरूर शोधावा.>> This is also in a condescending in a way. spoken from a comfort zone.
साधना: विनर पोस्ट.
अमा, not intended to be
अमा, not intended to be condescending. I can edit it if it comes across that way. But it was said in a specific context.
Often a woman's financial situation and/or dependency becomes a hurdle for partnership in adulthood. Some NGOs do ask couples to make a financial agreement before partnering. They emphasize on making woman financially independent by creating some assets for her, sometimes from her partner. I think I was addressing an important issue.
Often a woman's financial
Often a woman's financial situation and/or dependency becomes a hurdle for partnership in adulthood. Some NGOs do ask couples to make a financial agreement before partnering. They emphasize on making woman financially independent by creating some assets for her, sometimes from her partner. >> स्वतःचे निर्णय स्वतः न घेउ शकणार्या स्त्रिया व पुरुषांचा एक गट आहे. त्यांना हे असे एनजीओ च्या थ्रू वगिअरे पार्टनरींग करावे लागते. त्यात राहु द्या हो त्यांना एकत्र नाहीतरी एकटे पणाच्या आगीत बिचारे होरपळत आहेत असा दयेचा दृष्टिकोण आहे. रँडम जोड्या काही फॅक्टर्स चेक करून रकाने
भरून जुळवायच्या व त्यातून एक पुण्य केल्याचे समाधान मिळवायचे ह्या एन जी ओ माइंड सेटपलिकडे जाउनही काही व्यक्ती असतात ज्यांनी जीवनात आर्थिक स्वातंत्र्य मिळविले आहे. व ज्यांना जीवनाकडून खूप काही हवे आहे पण त्यासाठी गरज नसलेले काँप्रमाइज करायची आवश्यकता नाही. सोशल सँक्षन शिवाय आपल्या सुखाचा शोध ते स्वतः घेउ शकतात.
हा अमांचा मूळ लेख आणि इथल्या
हा अमांचा मूळ लेख आणि इथल्या पोस्ट्स यामुळे हा धागा अतिशय तरल आणि मननीय झाला आहे! It is very very enriching to read all posts!
साधना, फार सुरेख पोस्ट्स!
Pages