एकटेपणा......
दमविणारा , भिवविणारा, रडविणारा.... दुर्धर रोगांशी साहसाने सामना करणार्यांचे कौतूक होते, त्यांच्या लढ्याची पुस्तके छापून येतात, ब्लॉग्स आवडीने वाचले आणि शेअर केले जातात. पण एकटेपणाशी
एकट्यानेच लढा देणार्याच्या पदरी फक्त आणि फक्त उपेक्षाच येते. कोरड्या वैराण वाळवंटात भटकणारा जीव जसे आपला मृत्यूच आता शक्य आहे हे माहीत असूनही रोज काही पावले पुढे टाकत जातो मृगजळाच्या मागे भगभगीत वाळूच आहे हे सत्य माहीत असूनही त्या हिरव्या-निळ्या मरीचिकेत रमून जातो तसे एकटेपण भोगणार्याचे होते. सर्वकाही असूनही हा एकटा जीव आपल्या वैयक्तिक
वाळवंटातून एकेक दिवसाची वैतागवाणी पावले टाकत पुढे जातो. दुकटे होण्या च्या काही शक्यता जरी निर्माण झाल्या तरी बावचळतो. घाबरतो. थोडी फार पावले पुढे टाकून परत मागे येतो आणि आपल्याच कोषात मग्न होतो.
कालच प्रदर्शित झालेल्या द लंच बॉक्स ह्या सिनेमात इला आणि साजन ह्या अश्या दोन जिवांची कथा
अतिशय संवेदनशील पद्धतीने मांडली आहे. बॉलिवूड नावाने उगीचच जगभर प्रसिद्ध झालेल्या गर्हणीय चित्रपटशैलीशी फारकत घेउन रितेश बत्रा ह्या दिग्दर्शकाने एक हळुवार कथा अतिशय नजाकतीने, पण सादरीकरणाची लय बिघडू न देता मांडली आहे. एडिटिंग इज जस्ट राइट.
मुंबईतील एका दिवशी ह्या कथेची सुरुवात होते. जीवनाची तीचती चेपलेली पुंगळी सरळ करून रोज नव्या उत्साहाने एका अतिरेकी दिवसाला सामोरे जाणारे मुंबईकर! त्या लोकल्स, स्टेशनवरील गर्दी आणि बॅगा घेऊन कार्यालयाच्या दिशेने चिंबलेली पावले टाकणारे चाकरमाने लोक. ह्यातलाच एक साजन. मध्यमवयीन विधूर. आपल्या नोकरीतून स्वेच्छा निवृत्ती घेऊन नाशीकला स्थायिक होण्याची वाट बघत असतो.
बायको वारल्यावर, कसलेच कौटुंबिक बंध न उरलेला, त्यातून एकल कोंडा , विक्षिप्त झालेला ,
कुठेच फिट होऊ न शकणारा साजन इर्फान खानने नुसता रंगवला नाहीतर जिवंत केला आहे. एकट्याने आवरून कार्यालयात येणे. रोजचे रूटिन काम पण बारकाईने, निगुतीने करणे. कारण काही डिस्ट्रॅक्षनच नाही! न बायकोचा फोन न मुलांच्या/ घरच्या कटकटी. जिवंत राह्ण्यासाठी आवश्यक म्हणूनच केवळ करायची ती नोकरी. लोकल मधून धक्के खात घरी आल्यावर कॉलनीतील मुलांवर व्यक्त होणारा वैताग. पार्सल एकट्याने उघडून वाढून घेणे आणि जेवणे. बाल्कनीत उभे राहून धुम्रपान करणे. असह्य झाले कि डोळे मि टून पडणे. हे जीवन असेच एक दि वस संपून जाणार आहे हे अधोरेखित करणारा
आजुबाजूचा न बदललेल अवकाश. जुनी सायकल, जुने पाने सामान, व्ही एच एस टेप्स त्याव र बायकोने रेकॉर्ड केलेले जुन्या मालिकांचे भाग. सगळे कसे साकळलेले. कुंद एखादा विनोद सुचला तर, हपिसात वादावादी झाली तर एखादे गाणे आवडले तर सांगायला, शेअर करायला कोणीच नाही असा
एकसंध एकटेपणा.
ह्यात एकदम बदल होतो म्हणजे एक दिवस त्याला इलाने बनवून दिलेला डबा चुकीने मिळतो. घरच्या जेवणाला तरसलेला ( हपापलेला नव्हे) साजन सुखावतो व सर्व फस्त करतो. आपली इलाशी ओळख आधीच झालेली असते. नवर्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी शुष्क संसारात परत जान आणण्यासाठी धडपड णारी इला उत्तम चविष्ट अन्न बनवून नवर्याला पाठवत असते पण कामाच्या रेट्यात, विवाहबाह्य संबंधात गुंतलेला तो तिला समजून घेणे सोडा, तिचा पारच अनुल्लेख करत असतो. त्यांच्या संसारातला साचलेपणा तिला असह्य होतो. पण उपाय सापडत नाही म्हणून ती तशीच गतानुगतिकतेने दिवस-रात्री मोजत जगत असते.
डबा चाटूनपुसून खाल्लेला पाहून इला आशावते. पण मग अदलाबदल झाल्याचे कळल्यावर निराश
होऊन एक चिठ्ठी डब्यात टाकते. अहो आश्चर्यम! त्या चिठ्ठीचे उत्तरही येते. आंतरजालावरही आता अभावानेच आढळणारी अॅनॉनिमिटी ह्या दोघांना अपघाताने नसीब होते. दोघे आपापले जीवन, विचार शेअर करतात. अनवधानाने मनाने जवळ येत जातात. भेट्णे अपरिहार्य होते त्या पॉइन्टलाच कथानक एक वळण घेते आणि एका अनपेक्षित, अनिश्चित क्षणी हा प्रवास संपतो. इन्सेप्शनच्या शेवटाप्रमाणेच हाही शेवट हुरहुर लावून जातो. डबेवाल्यांच्या ज्ञानोबा माउलीच्या जपात सूर आणि पावले मिळवून आपण बाहेर पडतो. आपल्या जीवनातल्या हुकलेल्या संधी, मैत्रीच्या शक्यता पडताळून पाहात,
पण कथानकाचे आणि दिग्दर्शनाचे कौशल्य हेच आहे कि कुठेही मनात कडवटपणा उरत नाही. मनाचे बंध कुणाशी, काही काळ का होईना जुळले तर! नाहीतर पुढे आहेच एकटेपणाशी झुंज! सारे माहितीचे
आणि असह्य! गॉड ऑफ स्मॉल थिंग्जमधील अम्मू -वेलुथा, मुराकामीच्या आय क्यू ८४ मधील तेंगू आणि आओमामी अश्या काही अपघाताने भेटलेल्या जोडप्यांचा संदर्भ घेतल्यास दिग्दर्शकाचे विषय हाताळणीतील कौशल्य अधिक नजरेत भरते आणि मनावर एक सुखद अस्तर पसरते. इला आणि साजन यां चे वैयक्तिक विश्व कधीच एकमेकांत मिसळत नाही. ती तिचे जीवन जगते आणि तो त्याचे. पण जगात
कुठे तरी तो आहे आणि ती आहे ह्या जाणिवेनेच त्यांच्या जीवनातला एकटेपणा मिटतो. आपल्या आईचे जीवन ज्या चाकोरीत घट्ट बांधले गेले होते ते आणि तसेच आपलेही जीवन जात आहे; जाणार आहे ह्याची जाणीव झाल्यावर ती हादरते. पण जीवन संपवत नाही' तर एका वेगळ्या दिशेने स्वतःचा प्रवास चालू करते. ह्यात तिला साजनची सोबत हवी असते, गरजही असते पण तो नाहीच आला तरीही तिचा
निर्णय झाला आहे. ती स्त्रीवादी नाही, फक्त एक माणूस म्ह्णून जगण्यातील घुसमट, तोचतोपणा नाकारून नवे काहीतरी अनुभवायचा आपला हक्क ती तपासून बघणार आहे.
रोजचे आंबट दही नको वाटले तरी खावे लागणार्या माण सा ला अनपेक्षित पणे एखाद दिवशी
तिरामिसू मिळाले तर काय वाटेल तशी साजन ची मनःस्थिती होते. इलाला भेटायच्या कल्पनेने तो फुलतो
पण आपल्या मध्यमवयीन सेन्सिबिलीटीज त्याला नाकारता येत नाहीत. तिला नुसते बघून तो मागे फिरतो. पण रिटायरमेंट व पुढे येणार्या वृद्धत्वाला निमूटपणे स्वीकारावे अशी स्वतः ची समजूत
घालणारा तो जगून बघण्याच्या एका आदिम योलो जाणिवेतून आयुष्याला परत सामोरा जातो.
मनाची घट्ट बंद केलेली दारे किलकिली करून बाहेरचा प्रकाश, प्रेमाची, सहअनुभवाच,, सहवेदनेची जाणीव अनुभवायचे धाडस करतो. पुढे काय तर ग्यानबा तुकाराम! इब्तदाए इश्क में हम सारी रात जागे अल्ला जाने क्या होगा आगे?
करण जोहरने सादर केली असली तरीही ही रूढ अर्थाने प्रेम कथा नाही. त्याला साचेबंद अंत नाही उत्तरायण सारखी कंपॅनिअन शिपची कथा पण नाही. या वयात को णीतरी पाहिजेच ना असा मध्यमवर्गी द्र् ष्टिकोण ह्यात नाही. तर जीवनाने तुम्हाला कसलाही डाव दिलेला असो तो खेळून बघितला पाहिजे, त्यातल्या सर्व शक्यता पडताळून पाहिल्या पाहिजेत असे ह्या चित्रपटातून व्यक्त होते. हा एक दृष्य अनुभव आहे दोन माणसांच्या जीवन रेखा एकमेकांत मिसळू बघतात त्याचा. चित्रपटाची नेपथ्य, कॅमेरा इत्यादी अंगे पण अतिशय पूरक आहेत. मुंबई अंगावर येत नाही. पात्रांची आर्थिक परिस्थिती, त्यांच्या जगण्यातूनच दिसत राहते. नवाजुद्दीन सिद्दीकीचे काम नेहमीप्रमाणेच उत्तम. त्याच्या परिस्थितीतील विसंगती, फाइल वर भाजी चिरणे, लोकल मध्ये बसून! सहज विनोद निर्माण करणारी संवाद फेक ...
हा कलाकार नेहमीच एक गोळीबंद पर्फॉरमन्स सादर करतो.
भारती आचरेकरांची आवाजी सोबत इला बरोबरच आपल्यालाही मिळत राहते. एक भुतानीज प्रेमगीत रात्री च्या अंधारात ह्वेत विरत जाते तो क्षण फार गोड वाटला मला! तेव्ढ्या पुरते इला आणि साजनचे प्रेम जिवंत होते. शक्यता अशक्यतेच्या धुक्यातून पुढे यायचा प्रयत्न करतात एकटेपणाला दुसरा एकटेपणा येऊन मिळतो आणि अंतर्धान पावतो.
डबेवाल्यांचे खास मराठी पण नीट पकडले आहे. ते कुठे तरी हलवून टाकते. त्यांचे मेहेनती प्रामाणिक चेहरे
जवळीक साधतात. कदाचित मी मराठी असल्याने असेल.
मुराकामीने लिहिल्या प्रमाणे,
" I'm tired of living unable to love anyone. I don't have a single friend - not one. And, worst of all, I can't even love myself. Why is that? Why can't i love myself? It's because I can't love anyone else. A person learns how to love himself through the simple acts of loving and being loved by someone else. Do you understand what i am saying? A person who is incapable of loving another cannot properly love himself.”
― Haruki Murakami, 1Q84
सोमवार पासून डबा लावावा म्हणते जेवायचा.
मुराकामी यांचे कोट जालाव रून साभार. पण पुस्तक पैसे देऊन विकत घेतले आहे तरीही आक्षेप असल्यास
काढून टाकते.
इतर कुठल्याही अर्थार्जनाची,
इतर कुठल्याही अर्थार्जनाची, स्वतःला स्वतंत्रपणे शोधण्याची अदरवाईज काहीच खटपट करत नाही हे मला पचलं नाहीच >> !!
का? तशी कथाच नाहीये.
आणि पात्र असं असू शकत नाही का? मला तर ते असं पात्र असणंच जास्त आवडलं. (आता वास्तववादाचाही डोस जादा होईल- तेव्हाचं माहिती नाही. पण तेव्हाचं तेव्हा बघू.)
सुरेख परीक्षण, सिनेमा नक्की
सुरेख परीक्षण, सिनेमा नक्की बघणार. इरफानसाठी बघितला असताच. आता तर बिनधास्त जाईन.
'लंचबॉक्स'ची कथा मी नक्की
'लंचबॉक्स'ची कथा मी नक्की कुठेतरी पूर्वी वाचली आहे, असं सारखं वाटतंय.
'बॉम्बे टॉकिज' बघितल्यावर दोन कथा खूप आवडल्या होत्या. नंतर विचार केल्यावर त्या अतिशय फोपशा आहेत, असं वाटलं.
बॉम्बे टॉकिज सगळाच खूप फोपसा
बॉम्बे टॉकिज सगळाच खूप फोपसा होता..
साजिरा, वरदा मस्त पोस्ट्स.
साजिरा, वरदा मस्त पोस्ट्स.

अर्थार्जनाचा मुद्दा नाही पटला पण. माझ्या स्वप्नात मी कित्येकदा हाऊसवाईफ असते.
या सिनेमाच्या सादरीकरणाइतकंच लेखनही प्रभावी आहे. त्याशिवाय आंटी चं पात्र, निम्रतच्या आईचं पात्र झटपट खाडकन डोळ्यापुढे उभं राहणं अशक्य आहे. पंख्याची कथा, चालता पंखा साफ करायती धडपड माणसातला शहाणा वेडेपणाच दाखवते. कोणत्या दिव्याची अँब्युलन्स आली होती हा प्रश्न पण. मला अशा आरसेमहाली सिनेमांचा ओव्हरडोस चालेलच.
मस्त लिहीलय आता पहाणारच !
मस्त लिहीलय
आता पहाणारच !
मी हा चित्रपट आता सिडीवर
मी हा चित्रपट आता सिडीवर बघितला.. एवढे गुंतायला झाले कि तिचे पुढे काय झाले असेल, असा विचार करत बसलो. भूतानला जाऊन आनंदी झाली असेल. नाहितरी अंगात उत्तम जेवण करायची हुनर आहेच.
त्याने तिला भेटायला जाऊन, केवळ आपल्या वयाचा विचार करून माघार घेणे, हे कथेतले वळण मला फार आवडले.
तिचा घरातला वावर, बोलणे इतके नैसर्गिक आहे ना, कि कुणी अभिनेत्री ती भुमिका करत आहे असे वाटलेच नाही.
khup sunder
khup sunder parikshan.....atishay avadale.....
साधारण वर्षभर होऊन गेलं तुमचं
साधारण वर्षभर होऊन गेलं तुमचं परीक्षण वाचून आणि आज फयनली हा पिक्चर बघितला ..
काय सुंदर आहे पिक्चर .. नुसतं परीक्षण वाचून आवडलंच होतं पण आज पिक्चर बघून परत वाचल्यावर अजूनच आवडलं .. पिक्चर बघून जो एक्स्पिरीअन्स् घेतला तोच परीक्षण परत वाचून मिळाला ..
फार सुंदर लिहीलं आहे तुम्ही ..
धन्यवाद सशल. हा ऑस्करला
धन्यवाद सशल. हा ऑस्करला जायला हवा होता. बक्ष्हिस मिळालेच असते असे नाही पन एक फेअर चान्स नक्की होता.
अमा, परिक्षण छान लिहिले पण
अमा, परिक्षण छान लिहिले पण अर्धवट लिहिल्यासारखे वाटले. सिनेमाचा उरलेला अर्धा भाग हा तिचे वडील जातात तिथून सुरुवात होते. असे नाही की साजन माघार घेतो उलट तो नव्यानी विचार करुन परत मागे वळून नाशिकला न जाता परत येतो. शेवटची चार पाच मिनिटे आणि तिच्या आईचे संवाद जर मन लावून नाही बघितलेतर नक्कीच शेवट कळणार नाही ह्या सिनेमाचा.
मी फक्त ह्या सिनेमाच्या शेवटावर एक स्फुट लिहिणार आहे.
पण अर्धवट लिहिल्यासारखे
पण अर्धवट लिहिल्यासारखे वाटले.>>इलाला भेटायच्या कल्पनेने तो फुलतो
पण आपल्या मध्यमवयीन सेन्सिबिलीटीज त्याला नाकारता येत नाहीत. तिला नुसते बघून तो मागे फिरतो. पण रिटायरमेंट व पुढे येणार्या वृद्धत्वाला निमूटपणे स्वीकारावे अशी स्वतः ची समजूत
घालणारा तो जगून बघण्याच्या एका आदिम योलो जाणिवेतून आयुष्याला परत सामोरा जातो.
मनाची घट्ट बंद केलेली दारे किलकिली करून बाहेरचा प्रकाश, प्रेमाची, सहअनुभवाच,, सहवेदनेची जाणीव अनुभवायचे धाडस करतो. पुढे काय तर ग्यानबा तुकाराम! इब्तदाए इश्क में हम सारी रात जागे अल्ला जाने क्या होगा आगे? हे वाचा की.
मी ही मध्यंतरी कधीतरी पाहिला.
मी ही मध्यंतरी कधीतरी पाहिला. अफलातून आहे एकदम. इरफानचं काम जबरदस्तच. त्या वरून ओरडून बोलणार्या आंटींचं कॅरेक्टर बघताना बिग बँगच्या हावर्डच्या आईची आठवण आली. जसं तिचं कॅरेक्टर नुसतं आवाजावरून उभं केलं आहे तसंच हे ही वाटलं.
या चित्रपटाला बेस्ट फॉरेन
या चित्रपटाला बेस्ट फॉरेन फिल्मसाठी ब्रिटिश अकॅडमीचं नॉमिनेशन मिळालं होतं.
अॅमेझॉन इन्स्टंटवर चित्रपट आला आहे. विकत घ्यावा लागतोय पण 'बघायचाच' यादीत असल्याने घेणार आहे.
लंच बॉक्स कॅनडा नेटफिल्क्स वर
लंच बॉक्स कॅनडा नेटफिल्क्स वर स्ट्रीमिंगला येऊन बरेच दिवस झालेत. तिकडे ही आलाय का बघा.
हे वाचा की.> ते सर्व मी वाचल
हे वाचा की.> ते सर्व मी वाचल पण तरीही मला त्यात पुर्तता जाणवली नाही. मी नक्की लिहिणार आहे ह्यावर. थोडे वाट बघा.
अमा, परीक्षण खूप आवडलं.
अमा, परीक्षण खूप आवडलं. सिनेमा जेवढा तरल सुंदर आहे तेवढं तुम्ही लिहिलेलं परीक्षण. गेल्या काही वर्षांत चित्रपट बघितल्याशिवाय परीक्षण वाचायचं नाही हा नियम करून घेतल्यानं इतके दिवस वाचलं नव्हतं
सिनेमा अर्थात आवडलाच. इरफान खान के क्या कहने! सगळीच पात्र एकदम खरीखुरी, आपल्या बघण्यातली असावी अशी वाटतात. चिठ्ठी पाठवणार्या व्यक्तीचं नाव समजल्यावर आवाज शक्य तेवढा न्युट्रल ठेवत, आंटी बघत नाहीये याची खात्री असून सुद्धा चेहरा कोरा ठेवण्याचा प्रयत्न करत इला 'साजन' चित्रपटाची गाणी लावायची फर्माइश करते तो प्रसंग फार आवडला.
इलाच्या नवर्याचं अफेयर दाखवायला नको होतं. लौकिकार्थानं सगळं तसं ठीकच असताना ते नाकारून आनंदी प्रदेशाच्या शोधात गेलेली इला बघायला जास्त आवडलं असतं.
इलाच्या नवर्याचं अफेयर
इलाच्या नवर्याचं अफेयर दाखवायला नको होतं. लौकिकार्थानं सगळं तसं ठीकच असताना ते नाकारून आनंदी प्रदेशाच्या शोधात गेलेली इला बघायला जास्त आवडलं असतं. >>> पर्फेक्ट! मलाही असंच वाटलं.!!
काहीतरीच अपेक्षा! नवरा चांगला
काहीतरीच अपेक्षा! नवरा चांगला असताना जर तिने आपला देश सोडला असता तर तिला प्रेक्षकांनी वेड्यात काढले असते. घरदार सोडायला काहीतरी कारण हवे ना!!!
बी, एखादी व्यक्ती 'चांगली'
बी,
एखादी व्यक्ती 'चांगली' असणं हे पुरेसं नसतं.
ते कारण बाहेरच्या जगातच हवे
ते कारण बाहेरच्या जगातच हवे का? जगाबद्द्ल कुतूहल किंवा आनंदाचा शोध घ्यायची उर्मी असे मानसिक कारण नाही चालणार का??
इलाच्या नवर्याचं अफेयर
इलाच्या नवर्याचं अफेयर दाखवायला नको होतं. लौकिकार्थानं सगळं तसं ठीकच असताना ते नाकारून आनंदी प्रदेशाच्या शोधात गेलेली इला बघायला जास्त आवडलं असतं. >>> ह्म्म्म. मलाही तसं एकदा वाटून गेलं. पण एक सिनेमा म्हणून ते ठिक आहे. पण वास्तवात असा थोड्या दिवसांत जाणवलेला आनंद पुढेही थोड्या दिवसांचाच ठरु शकतो. त्या आनंदाची खरी परिक्षा तो आनंद पदरात पडल्यावरच होऊ शकते. इला आणि साजन फक्त एकाच दुव्याने जवळ आले आहेत. एकत्र आनंदाने जगायला तेवढे पुरेसे नसते. आणि मागे फिरणेही सोपे राहिले नसते. कारण काहीही दोष नसताना दुखावला गेलेला नवरा तिला परत स्वीकारेल्/न स्वीकारेल. किंवा मग घेतलेल्या निर्णयाची स्वतःवरच जबाबदारी असल्याने पुढे जे होईल ते बघत राहणे. पुन्हा नव्या आनंदाचा नकळत शोध घेणे. नेव्हर एण्डिंग...
आत्ता तिच्याकडे तिच्या आनंद शोधण्याला तिनेच जाब विचारलाच कधी तर तिच्याकडे ठोस जस्टिफिकेशन आहे. जे सोडलं ते नकोच होतं हा ठाम विचार आहे.
एखादी व्यक्ती 'चांगली' असणं
एखादी व्यक्ती 'चांगली' असणं हे पुरेसं नसतं.>>>> हे पटलं. अजून काही हवं असू शकतं ज्याची जाणीव ती दुसरी व्यक्ती (इथे साजन) आयुष्यात यायच्या आधी झालेली नसते. पण आयुष्यात सगळंच काही मिळत नसतं हे ही मान्य असायला हवं. आणि हेच विचार समोरच्या बाजूनेही असू शकतात.
चिनूक्स, जर इलाचा नवरा
चिनूक्स,
जर इलाचा नवरा चांगला दाखवला असता अफेअर वगैरे नसते दाखवले आणि तो इलाला हवे तो देत आहे असे दाखवले असते तर तिचे त्याला सोडून देणे तू स्विकारले असते का? आणि का?
लग्न करणं हे एक कमीटमेन्ट असतं. नवरा/बायको एक व्यक्ती म्हणून चांगली असताना तिला सोडणे म्हणजे आपण त्या व्यक्तिच्या आयुष्याला हानी पोहचवतो. मी असे किस्से प्रत्यक्ष आयुष्यात पाहिले नाही. आणि कुणी उघडापणे आपल्या फारकतीचे कारणे सांगत नाहीत. बस .. झाली फारकत .. वेगळे झालो इतकेच आपल्याला माहिती असते.
अजून काही तरी हवं आहे
अजून काही तरी हवं आहे ह्यापेक्षा इला मध्ये आलेलं आत्मभान महत्त्वाचे - आपल्या आनंदाची जबाबदारी ही नवरा किंवा साजन यांची नसून आपली स्वतःची आहे. त्यासाठी आनंदी प्रदेश एकट्याने गाठावा लागेल ती जाणीव महत्त्वाची.
ती भूतानला जाते, जात नाही, नवरा सोडते, राहते इ इ गोष्टी गौण आहेत.
सिंडरेला यांच्या प्रतिसादात
सिंडरेला यांच्या प्रतिसादात एक वाक्य आले आहे, ज्याचा उल्लेख ललिता-प्रीति यानीही आपल्या मतात केला आहे.
"...लौकिकार्थानं सगळं तसं ठीकच असताना ते नाकारून आनंदी प्रदेशाच्या शोधात गेलेली इला बघायला जास्त आवडलं असतं...."
~ अशी नायिका...कल्पना... रंगविले आहे दीप्ती नवल यानी "एक बार फिर" या १९८० च्या चित्रपटात. लौकिकार्थाने जीवनात अत्यंत यशस्वी असलेला चित्रपट नट महेन्द्रकुमार, ज्याच्या नावाची चलती हिंदी चित्रपटसृष्टीत आहे. त्याची ही पत्नी. सुखाच्या व्याख्येनुसार सारे काही तिच्या घरात पाणी भरत आहे. तीही सुखीच आहे. नवरा सतत कामात व्यस्त असला तरी पत्नीवर त्याचे प्रेम आहे. लंडनला शूटिंगला तिला तो आपल्यासोबत घेऊन गेला आहे. त्यात हिला स्वारस्य नसल्याने तेथील मुक्कामात (मूळची चित्रकार असल्याने) ती चित्रप्रदर्शने बघत वेळ घालविते आणि त्यात तिला भेटतो एक सर्वसाधारण युवक विमल...जो एक चित्रकारही असतो. दोघांची ओळख होते. ती त्याला आपण कोण हे सांगूनही टाकते. पण जसजसे दिवस जाऊ लागतात तसतसे कल्पनाला जाणवू लागते की लौकिकार्थाने आपलं सारं ठीकठाक असलं तरी काहीतरी कमतरता भासत आहे, आपल्यातील कलेलाही कुठेतरी जागा मिळायला हवी....त्याचा शोध घेताना विमल आपल्यासोबत हवा.....आयुष्यभरासाठी.
...कथा पुढे जाते....आणि एक वेळ अशी येते की श्रीमंत यशस्वी पती किंवा हा नवा चित्रकार, बेकार युवक यापैकी कुणा एकाची निवड करावी लागेल, ती करते चित्रकाराची.....तेही लपूनछपून नव्हे तर पतीला सारे काही सांगून. १९८० मध्ये हा विषय तसा धाडसाचाच होता.
मला ह्या सिनेमात एक गोष्ट
मला ह्या सिनेमात एक गोष्ट कळली नाही. ते म्हणजे साजन तिला फक्त दोन दोन ओळीचे पत्र पाठवत असतो. मान्य आहे कधी तो तिच्या जेवणाची स्तुती करतो. कधी तो तिचे आभार मानतो. कधी पत्रातून थोडे विनोद करतो. पण, तो असे काय करतो ज्यामुळे तिला तो आवडतो? कुणासोबत भरला संसार सोडून जायला इतकी पारख पुरेशी झाली का? ह्यापेक्षा मला महेश भट ह्यांच्या 'अर्थ' सारखे सिनेमे जास्त अपीलींग वाटतत स्त्रि पुरुष नाते संबंध ह्यावर बोलायला.
बी, <जर इलाचा नवरा चांगला
बी,
<जर इलाचा नवरा चांगला दाखवला असता अफेअर वगैरे नसते दाखवले आणि तो इलाला हवे तो देत आहे असे दाखवले असते तर तिचे त्याला सोडून देणे तू स्विकारले असते का? आणि का?>
'हवे ते देतो आहे' म्हणजे नक्की काय? लौकिकार्थाने चांगला असणं, 'चांगला' या व्याख्येत बसणारं आपल्या बायकोला 'देणं' हे असूनसुद्धा तिचा आनंद दुसर्या कशाततरी असणं, यात मला गैर वाटत नाही.
अजून काही तरी हवं आहे
अजून काही तरी हवं आहे ह्यापेक्षा इला मध्ये आलेलं आत्मभान महत्त्वाचे >>>> प्रत्येकालाच कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही स्टेटसमध्ये आत्मभान असणं एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून आवश्यकच.
अशी नायिका...कल्पना...
अशी नायिका...कल्पना... रंगविले आहे दीप्ती नवल यानी "एक बार फिर" या १९८० च्या चित्रपटात. लौकिकार्थाने जीवनात अत्यंत यशस्वी असलेला चित्रपट नट महेन्द्रकुमार, ज्याच्या नावाची चलती हिंदी चित्रपटसृष्टीत आहे. त्याची ही पत्नी. सुखाच्या व्याख्येनुसार सारे काही तिच्या घरात पाणी भरत आहे. तीही सुखीच आहे. नवरा सतत कामात व्यस्त असला तरी पत्नीवर त्याचे प्रेम आहे. लंडनला शूटिंगला तिला तो आपल्यासोबत घेऊन गेला आहे. त्यात हिला स्वारस्य नसल्याने तेथील मुक्कामात (मूळची चित्रकार असल्याने) ती चित्रप्रदर्शने बघत वेळ घालविते आणि त्यात तिला भेटतो एक सर्वसाधारण युवक विमल...जो एक चित्रकारही असतो. दोघांची ओळख होते. ती त्याला आपण कोण हे सांगूनही टाकते. पण जसजसे दिवस जाऊ लागतात तसतसे कल्पनाला जाणवू लागते की लौकिकार्थाने आपलं सारं ठीकठाक असलं तरी काहीतरी कमतरता भासत आहे, आपल्यातील कलेलाही कुठेतरी जागा मिळायला हवी....त्याचा शोध घेताना विमल आपल्यासोबत हवा.....आयुष्यभरासाठी.>>
वेल.. हा सिनेमा मी दोन वेळा पाहिला आहे आणि ह्याही सिनेमात सुरेश ओबेरॉय हा वुमनायझर दाखवला आहे. हे कारण दिप्ती नवलाला पुरेसे आहे विमलची निवड करायला.
मला 'अर्थ' हा सिनेमा सरात जास्त आवडला. ह्या सिनेमाचा शेवट खूप खोलवर स्पर्शून जातो.
Pages