द लंचबॉक्स चित्रपट परीक्षण

Submitted by अश्विनीमामी on 21 September, 2013 - 09:28

एकटेपणा......

दमविणारा , भिवविणारा, रडविणारा.... दुर्धर रोगांशी साहसाने सामना करणार्‍यांचे कौतूक होते, त्यांच्या लढ्याची पुस्तके छापून येतात, ब्लॉग्स आवडीने वाचले आणि शेअर केले जातात. पण एकटेपणाशी
एकट्यानेच लढा देणार्‍याच्या पदरी फक्त आणि फक्त उपेक्षाच येते. कोरड्या वैराण वाळवंटात भटकणारा जीव जसे आपला मृत्यूच आता शक्य आहे हे माहीत असूनही रोज काही पावले पुढे टाकत जातो मृगजळाच्या मागे भगभगीत वाळूच आहे हे सत्य माहीत असूनही त्या हिरव्या-निळ्या मरीचिकेत रमून जातो तसे एकटेपण भोगणार्‍याचे होते. सर्वकाही असूनही हा एकटा जीव आपल्या वैयक्तिक
वाळवंटातून एकेक दिवसाची वैतागवाणी पावले टाकत पुढे जातो. दुकटे होण्या च्या काही शक्यता जरी निर्माण झाल्या तरी बावचळतो. घाबरतो. थोडी फार पावले पुढे टाकून परत मागे येतो आणि आपल्याच कोषात मग्न होतो.

कालच प्रदर्शित झालेल्या द लंच बॉक्स ह्या सिनेमात इला आणि साजन ह्या अश्या दोन जिवांची कथा
अतिशय संवेदनशील पद्धतीने मांडली आहे. बॉलिवूड नावाने उगीचच जगभर प्रसिद्ध झालेल्या गर्हणीय चित्रपटशैलीशी फारकत घेउन रितेश बत्रा ह्या दिग्दर्शकाने एक हळुवार कथा अतिशय नजाकतीने, पण सादरीकरणाची लय बिघडू न देता मांडली आहे. एडिटिंग इज जस्ट राइट.

मुंबईतील एका दिवशी ह्या कथेची सुरुवात होते. जीवनाची तीचती चेपलेली पुंगळी सरळ करून रोज नव्या उत्साहाने एका अतिरेकी दिवसाला सामोरे जाणारे मुंबईकर! त्या लोकल्स, स्टेशनवरील गर्दी आणि बॅगा घेऊन कार्यालयाच्या दिशेने चिंबलेली पावले टाकणारे चाकरमाने लोक. ह्यातलाच एक साजन. मध्यमवयीन विधूर. आपल्या नोकरीतून स्वेच्छा निवृत्ती घेऊन नाशीकला स्थायिक होण्याची वाट बघत असतो.

बायको वारल्यावर, कसलेच कौटुंबिक बंध न उरलेला, त्यातून एकल कोंडा , विक्षिप्त झालेला ,
कुठेच फिट होऊ न शकणारा साजन इर्फान खानने नुसता रंगवला नाहीतर जिवंत केला आहे. एकट्याने आवरून कार्यालयात येणे. रोजचे रूटिन काम पण बारकाईने, निगुतीने करणे. कारण काही डिस्ट्रॅक्षनच नाही! न बायकोचा फोन न मुलांच्या/ घरच्या कटकटी. जिवंत राह्ण्यासाठी आवश्यक म्हणूनच केवळ करायची ती नोकरी. लोकल मधून धक्के खात घरी आल्यावर कॉलनीतील मुलांवर व्यक्त होणारा वैताग. पार्सल एकट्याने उघडून वाढून घेणे आणि जेवणे. बाल्कनीत उभे राहून धुम्रपान करणे. असह्य झाले कि डोळे मि टून पडणे. हे जीवन असेच एक दि वस संपून जाणार आहे हे अधोरेखित करणारा
आजुबाजूचा न बदललेल अवकाश. जुनी सायकल, जुने पाने सामान, व्ही एच एस टेप्स त्याव र बायकोने रेकॉर्ड केलेले जुन्या मालिकांचे भाग. सगळे कसे साकळलेले. कुंद एखादा विनोद सुचला तर, हपिसात वादावादी झाली तर एखादे गाणे आवडले तर सांगायला, शेअर करायला कोणीच नाही असा
एकसंध एकटेपणा.

ह्यात एकदम बदल होतो म्हणजे एक दिवस त्याला इलाने बनवून दिलेला डबा चुकीने मिळतो. घरच्या जेवणाला तरसलेला ( हपापलेला नव्हे) साजन सुखावतो व सर्व फस्त करतो. आपली इलाशी ओळख आधीच झालेली असते. नवर्‍याचे लक्ष वेधून घेण्यासाठी शुष्क संसारात परत जान आणण्यासाठी धडपड णारी इला उत्तम चविष्ट अन्न बनवून नवर्‍याला पाठवत असते पण कामाच्या रेट्यात, विवाहबाह्य संबंधात गुंतलेला तो तिला समजून घेणे सोडा, तिचा पारच अनुल्लेख करत असतो. त्यांच्या संसारातला साचलेपणा तिला असह्य होतो. पण उपाय सापडत नाही म्हणून ती तशीच गतानुगतिकतेने दिवस-रात्री मोजत जगत असते.

डबा चाटूनपुसून खाल्लेला पाहून इला आशावते. पण मग अदलाबदल झाल्याचे कळल्यावर निराश
होऊन एक चिठ्ठी डब्यात टाकते. अहो आश्चर्यम! त्या चिठ्ठीचे उत्तरही येते. आंतरजालावरही आता अभावानेच आढळणारी अ‍ॅनॉनिमिटी ह्या दोघांना अपघाताने नसीब होते. दोघे आपापले जीवन, विचार शेअर करतात. अनवधानाने मनाने जवळ येत जातात. भेट्णे अपरिहार्य होते त्या पॉइन्टलाच कथानक एक वळण घेते आणि एका अनपेक्षित, अनिश्चित क्षणी हा प्रवास संपतो. इन्सेप्शनच्या शेवटाप्रमाणेच हाही शेवट हुरहुर लावून जातो. डबेवाल्यांच्या ज्ञानोबा माउलीच्या जपात सूर आणि पावले मिळवून आपण बाहेर पडतो. आपल्या जीवनातल्या हुकलेल्या संधी, मैत्रीच्या शक्यता पडताळून पाहात,

पण कथानकाचे आणि दिग्दर्शनाचे कौशल्य हेच आहे कि कुठेही मनात कडवटपणा उरत नाही. मनाचे बंध कुणाशी, काही काळ का होईना जुळले तर! नाहीतर पुढे आहेच एकटेपणाशी झुंज! सारे माहितीचे
आणि असह्य! गॉड ऑफ स्मॉल थिंग्जमधील अम्मू -वेलुथा, मुराकामीच्या आय क्यू ८४ मधील तेंगू आणि आओमामी अश्या काही अपघाताने भेटलेल्या जोडप्यांचा संदर्भ घेतल्यास दिग्दर्शकाचे विषय हाताळणीतील कौशल्य अधिक नजरेत भरते आणि मनावर एक सुखद अस्तर पसरते. इला आणि साजन यां चे वैयक्तिक विश्व कधीच एकमेकांत मिसळत नाही. ती तिचे जीवन जगते आणि तो त्याचे. पण जगात
कुठे तरी तो आहे आणि ती आहे ह्या जाणिवेनेच त्यांच्या जीवनातला एकटेपणा मिटतो. आपल्या आईचे जीवन ज्या चाकोरीत घट्ट बांधले गेले होते ते आणि तसेच आपलेही जीवन जात आहे; जाणार आहे ह्याची जाणीव झाल्यावर ती हादरते. पण जीवन संपवत नाही' तर एका वेगळ्या दिशेने स्वतःचा प्रवास चालू करते. ह्यात तिला साजनची सोबत हवी असते, गरजही असते पण तो नाहीच आला तरीही तिचा
निर्णय झाला आहे. ती स्त्रीवादी नाही, फक्त एक माणूस म्ह्णून जगण्यातील घुसमट, तोचतोपणा नाकारून नवे काहीतरी अनुभवायचा आपला हक्क ती तपासून बघणार आहे.

रोजचे आंबट दही नको वाटले तरी खावे लागणार्‍या माण सा ला अनपेक्षित पणे एखाद दिवशी
तिरामिसू मिळाले तर काय वाटेल तशी साजन ची मनःस्थिती होते. इलाला भेटायच्या कल्पनेने तो फुलतो
पण आपल्या मध्यमवयीन सेन्सिबिलीटीज त्याला नाकारता येत नाहीत. तिला नुसते बघून तो मागे फिरतो. पण रिटायरमेंट व पुढे येणार्‍या वृद्धत्वाला निमूटपणे स्वीकारावे अशी स्वतः ची समजूत
घालणारा तो जगून बघण्याच्या एका आदिम योलो जाणिवेतून आयुष्याला परत सामोरा जातो.
मनाची घट्ट बंद केलेली दारे किलकिली करून बाहेरचा प्रकाश, प्रेमाची, सहअनुभवाच,, सहवेदनेची जाणीव अनुभवायचे धाडस करतो. पुढे काय तर ग्यानबा तुकाराम! इब्तदाए इश्क में हम सारी रात जागे अल्ला जाने क्या होगा आगे?

करण जोहरने सादर केली असली तरीही ही रूढ अर्थाने प्रेम कथा नाही. त्याला साचेबंद अंत नाही उत्तरायण सारखी कंपॅनिअन शिपची कथा पण नाही. या वयात को णीतरी पाहिजेच ना असा मध्यमवर्गी द्र् ष्टिकोण ह्यात नाही. तर जीवनाने तुम्हाला कसलाही डाव दिलेला असो तो खेळून बघितला पाहिजे, त्यातल्या सर्व शक्यता पडताळून पाहिल्या पाहिजेत असे ह्या चित्रपटातून व्यक्त होते. हा एक दृष्य अनुभव आहे दोन माणसांच्या जीवन रेखा एकमेकांत मिसळू बघतात त्याचा. चित्रपटाची नेपथ्य, कॅमेरा इत्यादी अंगे पण अतिशय पूरक आहेत. मुंबई अंगावर येत नाही. पात्रांची आर्थिक परिस्थिती, त्यांच्या जगण्यातूनच दिसत राहते. नवाजुद्दीन सिद्दीकीचे काम नेहमीप्रमाणेच उत्तम. त्याच्या परिस्थितीतील विसंगती, फाइल वर भाजी चिरणे, लोकल मध्ये बसून! सहज विनोद निर्माण करणारी संवाद फेक ...
हा कलाकार नेहमीच एक गोळीबंद पर्फॉरमन्स सादर करतो.

भारती आचरेकरांची आवाजी सोबत इला बरोबरच आपल्यालाही मिळत राहते. एक भुतानीज प्रेमगीत रात्री च्या अंधारात ह्वेत विरत जाते तो क्षण फार गोड वाटला मला! तेव्ढ्या पुरते इला आणि साजनचे प्रेम जिवंत होते. शक्यता अशक्यतेच्या धुक्यातून पुढे यायचा प्रयत्न करतात एकटेपणाला दुसरा एकटेपणा येऊन मिळतो आणि अंतर्धान पावतो.

डबेवाल्यांचे खास मराठी पण नीट पकडले आहे. ते कुठे तरी हलवून टाकते. त्यांचे मेहेनती प्रामाणिक चेहरे
जवळीक साधतात. कदाचित मी मराठी असल्याने असेल.

मुराकामीने लिहिल्या प्रमाणे,

" I'm tired of living unable to love anyone. I don't have a single friend - not one. And, worst of all, I can't even love myself. Why is that? Why can't i love myself? It's because I can't love anyone else. A person learns how to love himself through the simple acts of loving and being loved by someone else. Do you understand what i am saying? A person who is incapable of loving another cannot properly love himself.”
― Haruki Murakami, 1Q84

सोमवार पासून डबा लावावा म्हणते जेवायचा.

मुराकामी यांचे कोट जालाव रून साभार. पण पुस्तक पैसे देऊन विकत घेतले आहे तरीही आक्षेप असल्यास
काढून टाकते.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमा.. फार तरल परीक्षण!! पाहणार आहेच हा चित्रपट!! पण परीक्षण वाचून इच्छा अधिक बळावली.

इम्रानच्या अभिनयाबद्दल काय बोलावे? मिळालेल्या संधीचं अक्षरशः सोनं करतो हा अभिनेता.. पाण्यासारखा आहे तरल... ज्या भुमिकेच्या साच्यात ओतावा त्यात फिट्ट बसावा...

निम्रीत ही सुद्धा गुणी अभिनेत्री!! डेरी मिल्क च्या किस मी लेटेस्ट अ‍ॅडमधली हसरी Happy
चांगल्या चित्रपटांच्या डिव्हीडीज चे कलेक्शन करणारेय. हाही चित्रपट घेइनच. पण त्याआधी थिएटर ला पाहणारच!

चित्रपट कधी पाहायला मिळेल माहीत नाही, पण परिक्षण एक नंबर झालंय. अमा, तुम्ही मस्त लिहीता हो! अजुन जास्त लिहीत जा..

अप्रतिम परीक्षण! खुप छान लिहीले आहेस. या तुझ्या सुंदर परीक्षणामुळेच हा चित्रपट पाहायला सर्व मायबोलिकरांची गर्दी उसळणार हे नक्की!

मला खूप भावला हा चित्रपट. इरफान किती जबरदस्त ताकदीचा अभिनेता आहे हे पुन्हा एकदा सिद्ध तर होतेच पण ती नवी मुलगी निम्रत कौरने देखील अतिशय संयत भूमिकेने कथानकाला न्याय दिला आहे. किती साधे सरळ आणि रोजच्या मुंबईकराच्या जीवनातील कथानक....नोकरवर्ग जीवनातील....लंच बॉक्सची रोजची घटना; पण या एका ओळीच्या कथानकावर असा दर्जेदार चित्रपट काढणार्‍या रितेश बत्रा या दिग्दर्शकाचे अभिनंदन केले पाहिजे.

अ.मा. ह्या स्वतः या चित्रपटाने किती भारावून गेल्या आहेत त्याची प्रचिती लेखातील भाषेवरून येतेच. केवळ अपरिहार्यतेमुळ ईला व साजन ही जोडी संधी मिळूनही एकमेकाला समोरासमोर भेटत नाहीत त्याचे ना दु:ख ना आनंद ही स्थिती दिग्दर्शकाने छान रंगविली आहे.

बाकी देशपांडेबाई यांचा आवाज म्हणजे भारती आचरेकरांचा आहे हे लेखावरूनच समजले....टायटलमध्येही उल्लेख असेल, पण लक्ष गेले नाही.

अश्विनीमामी तुमचं परिक्षण हि चित्रपटा सारखंच फर्मास जमलंय... चित्रपट आणि ईर्फान दोघांकडुन खुपचं अपेक्ष असल्याने परिक्षण वाचण्या आगोदरच सिनेमा पाहिला.. पण आता वाचल्यानंतर पुन्हा पहावासा वटतो आहे..

तुमचं निरिक्षण खरंच खुप छान आहे..

चित्रपटाबद्द्ल आवडलेल्या गोष्टि म्हणजे..
१. टिपिकल बॉलिवुड पटाचा असतो तसा 'they lived happliy everafter' शेवट टाळलेला आहे. यात निर्देशकाची या माध्यमा बद्द्ल ची समज, आणि प्रयोगशिलता जाणवते, नाहितर तो एक नेहमीचा मसाला पट झाला असता.
येथे प्रेक्षकाला आपल्या समजुतीप्रमाणे अर्थ लावण्याची मुभा आहे.
२. वरच्या फ्लेटमधे राहणार्या 'देशपांडे आंटि', ज्यांची व्यक्तिरेखा फक्त वॉईसऑव्हर नेच उभी केली आहे. मर्यादित पात्र वापरुन अनावश्यक गोंधळ टाळला आहे.
३. लाउड असे पार्श्व संगीत वापरुन उगाचच मेलोड्रामेटिक वातावरण निर्माण करण्याचा मोह टाळला आहे.

ऑस्कर मिळो ना मिळो, सुजाण प्रेक्षकांच्या मनाचा ऑस्कर रितेश बत्राने कधीच पटकावलाय...

एकंदरित काय तर..जरुर पहावा असा एक अंतराष्ट्रिय दर्जाचा चित्रपट...

वा....सुरेख लिहिलंय. सिनेमा कधी बघायला मिळणार माहित नाही पण आता उत्सुकता वाटायला लागलीये Happy

बघितला चित्रपट.. खुप आवड्ला..
अगदी व्यवस्थित्,तरल भाव सगळ्याचे .. डायलॉग्ज पण.. बघताना हळुच स्माईल येत होत Happy
मनिष +१

चित्रपट बघितला .
अश्विनीमामी, धन्यवाद . तुमचे परिक्षण वाचल्यामुळे सिनेमा बघितला.
खूप सुंदर अनुभव.
ईरफान, नम्रत कौर दोघांनीही सुंदर काम केले आहे.
दोघेही भूमिका अक्षरशः जगले आहेत. नंतर नंतर ईरफान ज्या पध्दतीने टिफीन कडे बघतो , तेवढयानेही त्याची उलाघाल सहज लक्षात येते. मुंबईतली गर्दी, सरकारी ऑफिस ,लोकल मधले शॉट्स ,डबेवाल्यांचे रुटीन या सगळ्याचे अगदी सहज सुंदर दर्शन होते.सगळ्या गोष्टी सहज घडत असल्याचा फील येतो .कुठेही ओढून ताणून काही चाललंय असं वाटत नाही.
ईलाचे शुष्क जीवन दाखवताना ती घरी आय ब्रो ही न करता , घरगुती कपडे घालून यंत्रवत कामे करताना दाखवली आहे.टिपीकल बॉलीवूडी नायिका नसल्याने ती अगदी आपली वाटते त्यामुळे.
शेवट मात्र हुरहुर लावतो.

रितेश बात्रा ने लेखन व दिग्दर्शनाची जबाबदारी छान पेलली आहे.अधले मधले नर्मविनोदी संवाद (ओरिएंट फॅन वगैरे) ही चेह-यावर हसू आणतात.
हा सिनेमा बघितल्यावर मला बासू चटर्जींच्या बातों बातों में ची आठवण आली. त्याच जातकुळीतला वाटला हा.

खुपच सुं द र सिनेमा..

छान परिक्षण ...

इरफान खान ... काय बोलावे या माणसाबद्दल... फक्त हावभावातुन तो व्यक्त होतो.शब्द पण त्याच्या पुढे थिटे पडतील.

अमा, रसग्रहण फार सुरेख लिहिलं आहे तुम्ही. सिनेमा बघायचा म्हणून इतके दिवस वाचलं नव्हतं

आज सिनेमा पाहिला. पण अमांना जसा भावला तसा माझ्यापर्यंत पोचलाच नाही. साठोत्तरी दशकांमधल्या आधुनिक्/मॉडर्निस्ट छाप महानगरीय मराठी नवकथेसारखाच तंतोतंत वाटला. अशा कथांचा जनरल ओव्हरडोस झालेला असल्याने असेल बहुदा, पण मनाला भिडला नाही. अभिनय सगळ्यांचेच उत्तम (अपेक्षेप्रमाणेच) आणी तांत्रिकदृष्ट्याही सफाईदार. पण तेवढंच

varada+1

पाहिला. अतिशय आवडला. परीक्षण आधी वाचलं होतं शिवाय अनेक पेपरांतलंही वाचलं होतं. पण त्यामुळे काही फरक पडला नाही. जेवढा आवडला असता तेवढाच - म्हणजे खूप - आवडला.

छान परिक्षण. चित्रपट देखिल आवडला. एक कळत नाही, चित्रपटाच्या सुरुवातीला धुम्रपान हानी कारक वगैरे दाखवतात आणि चित्रपटात देखिल कलाकार सिगरेटी ओढत असतात. त्यातून नक्की काय संदेश द्यायचा (घ्यायचा) असतो.

काल पाहिला. आणि आज हे मुद्दाम वाचलं. हा लेख फार सुरेख लिहिला आहे तुम्ही...

सिनेमाही खूप आवडला. मला तरी संथ खूप वाटला, पण त्या संथ गतीमध्येच खूप मजा आहे, सगळं काही व्यवस्थित जमून येत येत मग सिनेमा संपतो...

अ. मामी, सुंदर लिहीलंय. बरेच दिवसांनी परीक्षण वाचून सिनेमा बघावासा वाटला.
>>
लोलाला अनेकानेक अनुमोदन.. कित्येक दिवसांनी मस्त परिक्षण वाचायला मिळाले

वरदा >> आज सिनेमा पाहिला. पण अमांना जसा भावला तसा माझ्यापर्यंत पोचलाच नाही. साठोत्तरी दशकांमधल्या आधुनिक्/मॉडर्निस्ट छाप महानगरीय मराठी नवकथेसारखाच तंतोतंत वाटला >>

मलाही अरुण साधुंची साधारण त्याच काळात लिहिलेल्या एका मुंबईतल्या कोर्टातल्या कारकुनाची कथा आठवली हे परिक्षण वाचताना. ती कथा पूर्णच वेगळी होती ज्यात कोर्टात कारकुनी करत आयुष्य घालवलेल्याचा शेवटचा दिवस असतो व तो कसा तो दिवस सारतो वगैरे.

एकूणच महानगरीय मध्यमवर्गीय जीवन, त्यातली यांत्रिकता, त्यातून येणारा एक स्वतःशी- स्वतःच्या अवकाशाशी- इतरांशी तुटलेपणा, वरवर नॉर्मल दिसणार्‍या नातेसंबंधांत असणारी 'डिसफंक्शनॅलिटी'/विसंवाद, या सगळ्यासगळ्यावर महानगरीय रूटीनचा रोजचा फिरणारा रोडरोलर आणि त्यात धकत आयुष्य काढणारी पात्रं. त्यातल्या मुख्य पात्रांच्या आणि उपपात्रांच्या आयुष्यातली ब्राउनियन मोशन आणि त्यातून उद्भवणार्‍या काही सिच्युएशन्स - काही विरून जाणार्‍या - काही स्वतःच्या चौकटीच्या सेन्सिबिलीटीजमुळे विरून जाउ दिलेल्या - मग कधीतरी एखाद्या बिंदूला त्यातलं कुणीतरी स्वतःच्या अस्तित्वाचे ऑप्शन्स तपासून बघणं - जमलं तर त्यादिशेने काही पावलं उचल्णं - परत शेवट म्हणला तर अधांतरी, म्हणला तर २/३ शक्यतांच्या बाहेर नाहीच.

हे सगळं आधुनिक्/मॉडर्न साहित्यातल्या अनेक कलाकृतींमधून येऊन गेलं आहे. मराठीत, पाश्चात्य साहित्यात, वगैरे. परदेशी सिनेमांमधे पण अशी दळणं झाली आहेत. कदाचित यामुळे माझ्यासाठी त्यात नावीन्य नव्हतं. आणि किती वेळा एकच दळण बघणार, कितीही उत्तम अभिनय असला तरी?

आधुनिक्/मॉडर्निस्ट छाप महानगरीय मराठी नवकथेचा ओव्हरडोस झालाय हे मान्य. (पण खरं तर हा ओव्हरडोस झाला तो सामान्य वाचकाला, की खूप वाचणार्‍याला, की अभ्यासकाला, की समीक्षकाला, की सिनेमे बघणार्‍याला? शिवाय, सिनेमे बघणारा (किंवा फारतर 'असे' सिनेमे बघणारा) आणि मॉडर्निस्ट महानगरीय मराठी नवकथा वाचणारा वर्ग एकच आहे का?- असे प्रश्न थोडा वेळ बाजूला ठेऊन देऊ.)

त्या सो-कॉल्ड आधुनिक नवकथाकारांनी अनेक पात्रे, प्रसंग आणि कथा-घटना एका ठराविक साच्यातून, एकाच ठराविक विचारपद्धतीतून, एकाच ठराविक नैतिकतेतून रंगवल्याचंही अनेक वेळा बघण्यात आलं आहे. यातून गाडगीळांसारखे 'थोर' मानले गेलेले 'नवकथाकार' देखील सुटले नाहीत. आपल्या स्वभावाविरूद्ध स्वभाव असलेली पात्रं रंगवणं हा प्रत्येक लेखकाचा सोस असावा. पण आपली मतं, आपले स्व्बभावविशेष, विचारपद्धती छुप्या पद्धतीने पात्रांवर लादणं - हे देखील प्रत्येक लेखकाकडून होतच असावं असं वाटतं. आता तसं म्हटलं, तर लेखक त्या मानाने 'स्वतंत्र' आहे- असं म्हणायला हरकत नाही. चित्रपट (किंवा त्याचा पटकथालेखक) इतका स्वतंत्र नसतो. त्याला खर्च वसूल करायचे असतात, व्यवहार पूर्ण करायचा असतोच असतो, पण एकंदर दृकश्राव्य माध्यमामुळे सारंच प्रकरण बहुमितीय झाल्याने तोल सांभाळायचं मोठंच काम होऊन बसतं. (गंमत म्हणजे अनेक वेळी चित्रपटाला पुस्तकापेक्षा दृकश्राव्य माध्यमाचा बेनिफिट जास्त मिळतो असं म्हटलं जातं.)

या इतक्या कारणास्तव सिनेमा मनाला भिडला नसेल, तर बरोबरच आहे.

फक्त माझ्याबद्दलच बोलायचं झालं, तर एकवेळ कथा दमदार नसली तरी चालेल; पण पात्रं मुळातून, संपूर्णपणे, स्पष्टपणे, ताकदीने आणि कथेतल्या इतर पात्रांची भीडभाड न बाळगता उभी राहिलेली दिसली पाहिजेत- असं मला वाटतं. अनेक सुप्रसिद्ध लेखकांच्या कथा क्वचित भिडल्या नसतील- त्या एक्झॅक्टली याच कारणामुळे. इतक्या चांगल्या कथाबीजांना, इतक्या समर्थ शैलीचं देणं लाभलेलं असताना, सशक्त पात्रांनी आणखी चांगला न्याय मिळवून दिला असता- असं या न भिडलेल्या कथांबद्दल वाटत राहिलं.

मला मात्र हा सिनेमा बघताना वेगळा अनुभव आला. इरफान अणि नवाजुद्दीनची पात्रं अत्यंत समर्थपणे, स्वतंत्रपणे उभी ठाकली. निम्रतचं पात्र हा सुखद धक्का होता, बोनस होता. अत्यंत कमी संवादातून उभं राहिलेलं इरफानचं पात्र हा खरोखर एक 'नमुना' होता. इलाला लिहिलेल्या पत्रांतली कधी कॅज्युअल, कधी पुस्तकी होणारी भाषा- हे त्याचं वय बघता - फारच भावून गेली. तरूणपणीचं- कुठंतरी हरवून गेलेलं चैतन्य इलामध्ये आणि स्वतःमध्ये दूर उभं राहून बघणं- या खेळातून ती भाषा अशी दोरीवर चालण्याचा खेळ करत असावी. दिवंगत बायकोच्या टीव्ही बघण्याबद्दलचं लिहिणं, समोरच्या इमारतीतल्या एका कुटुंबाकडे बघत स्मोक करणे- अशासारखे काही प्रसंग हे पात्र किती अस्सलतेनं उभं राहिलं आहे, त्याचा पुरावा देतात. बाकी 'बिल्ली नही, वो एक आदमी था', केळे खाण्याबद्दलचं वर्णन, इमारतीवरून एका आईने मुलीसकट जीव दिल्याचा प्रसंग- या सार्‍यांनी 'सिनेमा'तल्या पात्राला थोडीफार बळकटी दिली आहे, इतकंच. (दुसर्‍या- नवाजुद्दीनच्या- पात्राबद्दल बोलायचं तर ट्रेनमध्ये भाज्या कापण्याचा प्रसंग, घरी एकत्र जेवण्याचा प्रसंग, शेवटचा निरोप घेणारा, आणि इलाला साजनचा पत्ता दाखवणारा.. इ.). ऑदरवाईज हे सारं नसतं तरी या पात्राला फारसा काही फरक पडला नसता..

इरफान आणि नवाजुद्दीन- या दोघांच्या अभिनयाची जातकुळी जरा वेगळीच आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेते वगैरे मला नसले तरी चालतात. 'सोबत घेऊन जाणारी' देहबोली, पात्रांमधली 'कथा' सांगण्याचा विश्वास देणारा आवाज आणि आयुष्य-जगणं अ‍ॅक्च्युअली आहे तसं समजावून सांगणारा एकंदरच 'फाटकेपणा' मला टेम्प्ट करतो.

मॉडर्निस्ट नवकथाकारांनी कथा अपुर्ण ठेवण्याचेही (त्याआधी 'शिव शिव!' असलेले) प्रयोगही क्वचित केले. इथंही तो आहेच. पण त्यामुळे फारसा फरक पडला नाही. ते एक तंत्र आहे, आणि एकत्रित परिणाम साधण्यामध्ये त्याची बरीच मदत होते, इतकंच. इथंही बरीच मदत झाली. 'लक्षात राहणार्‍या' सिनेम्यांमध्ये 'लंचबॉक्स' जमा झाला.
---

वरदा (आणि अश्विनीमामीही), 'बाँबे टॉकीज' बघितला का? त्याबद्दल लिहिलेलं वाचायला आवडेल.

एखादी कलाकृती आपल्या मनात कशी घडत जाते यावर तिचं मूल्यमापन अवलंबून असतं . अमांनी खूप समरसून हे सुरेख परीक्षण लिहिलं आहे.

वरदा, मी पोस्ट टाकेपर्यंत तुझी वरची पोस्ट आली. तुला काय म्हणायचंय ते आधीच्या पोस्टवरून कळलंच होतं. वेळ मिळाला की आणखी लिहिन

इतरत्र एका ठिकाणी वाचल्याप्रमाणे 'नायिकेने 'सो-कॉल्ड अनैतिक' वागलेलं दाखवण्यासाठी/ दाखवण्याआधी तिचा नवरा- म्हणजे पुरूष पात्रंही बाहेरख्याली दाखवलंच पाहिजे- हा कसला भुक्कड आणि जुनाट हट्ट?' याचाही विचार करून बघितला. माझा मित्र म्हणाला, 'भारतातला सिनेमा आहे बाबा, लोकांना पटायला नको?'. पुन्हा एकदा मी एका 'पात्र समर्थपणे उभं राहण्याबद्दल' विचार करून बघितला. इन धिस ऑर दॅट काँटेक्स्ट.

साजिरा, तो ओव्हरडोस 'मला' झालाय. पात्ररचना, वातावरण अस्सलतेनं, सखोलपणे उभं करणं - अतिशय छोट्या प्रसंगातून कथेतले बारकावे टिपत पुढे नेणं (उदा: ती नवर्‍याच्या शर्टचा वास घेते तो प्रसंग) यावर टिप्पणी करतच नाहीये. मला एकूण कथाबीजाबद्दल - 'डन टू डेथ' असं फीलिंग आलं.
मी इथे कुणाचंच प्रतिनिधित्व करत नाहीये. मला जे वाटलं तेवढंच लिहिलं आहे - ते सिनेमाचं परीक्षण/रसग्रहण आहे असा दावा नाहीच करत...

बॉम्बे टॉकीज पाहिलेला नाही.

आणि ती आजच्या काळातली हाउसवाईफ - मुंबईत रहाणारी - इतर कुठल्याही अर्थार्जनाची, स्वतःला स्वतंत्रपणे शोधण्याची अदरवाईज काहीच खटपट करत नाही हे मला पचलं नाहीच.
शिवाय त्याच्या आणि तिच्या चिठ्ठ्या बर्‍याच वेळा अगदी एकसारख्या कागदांवर दाखवल्यात तेही खटकलं.

हो की. ते कळलं, असं वरच लिहिलं. मीही माझ्याबद्दलच लिहिलं आहे. शिवाय पात्रांबद्दल.

कथाबीजांचं म्हणशील, तर अवाक् करणार्‍या कथा क्वचितच असतात. सरसकट सगळ्याच तशा सापडल्या तर त्यांचं तरी काय अप्रूप राहील. आपण आपला आनंद शोधावा झालं. Happy

Pages