द लंचबॉक्स चित्रपट परीक्षण

Submitted by अश्विनीमामी on 21 September, 2013 - 09:28

एकटेपणा......

दमविणारा , भिवविणारा, रडविणारा.... दुर्धर रोगांशी साहसाने सामना करणार्‍यांचे कौतूक होते, त्यांच्या लढ्याची पुस्तके छापून येतात, ब्लॉग्स आवडीने वाचले आणि शेअर केले जातात. पण एकटेपणाशी
एकट्यानेच लढा देणार्‍याच्या पदरी फक्त आणि फक्त उपेक्षाच येते. कोरड्या वैराण वाळवंटात भटकणारा जीव जसे आपला मृत्यूच आता शक्य आहे हे माहीत असूनही रोज काही पावले पुढे टाकत जातो मृगजळाच्या मागे भगभगीत वाळूच आहे हे सत्य माहीत असूनही त्या हिरव्या-निळ्या मरीचिकेत रमून जातो तसे एकटेपण भोगणार्‍याचे होते. सर्वकाही असूनही हा एकटा जीव आपल्या वैयक्तिक
वाळवंटातून एकेक दिवसाची वैतागवाणी पावले टाकत पुढे जातो. दुकटे होण्या च्या काही शक्यता जरी निर्माण झाल्या तरी बावचळतो. घाबरतो. थोडी फार पावले पुढे टाकून परत मागे येतो आणि आपल्याच कोषात मग्न होतो.

कालच प्रदर्शित झालेल्या द लंच बॉक्स ह्या सिनेमात इला आणि साजन ह्या अश्या दोन जिवांची कथा
अतिशय संवेदनशील पद्धतीने मांडली आहे. बॉलिवूड नावाने उगीचच जगभर प्रसिद्ध झालेल्या गर्हणीय चित्रपटशैलीशी फारकत घेउन रितेश बत्रा ह्या दिग्दर्शकाने एक हळुवार कथा अतिशय नजाकतीने, पण सादरीकरणाची लय बिघडू न देता मांडली आहे. एडिटिंग इज जस्ट राइट.

मुंबईतील एका दिवशी ह्या कथेची सुरुवात होते. जीवनाची तीचती चेपलेली पुंगळी सरळ करून रोज नव्या उत्साहाने एका अतिरेकी दिवसाला सामोरे जाणारे मुंबईकर! त्या लोकल्स, स्टेशनवरील गर्दी आणि बॅगा घेऊन कार्यालयाच्या दिशेने चिंबलेली पावले टाकणारे चाकरमाने लोक. ह्यातलाच एक साजन. मध्यमवयीन विधूर. आपल्या नोकरीतून स्वेच्छा निवृत्ती घेऊन नाशीकला स्थायिक होण्याची वाट बघत असतो.

बायको वारल्यावर, कसलेच कौटुंबिक बंध न उरलेला, त्यातून एकल कोंडा , विक्षिप्त झालेला ,
कुठेच फिट होऊ न शकणारा साजन इर्फान खानने नुसता रंगवला नाहीतर जिवंत केला आहे. एकट्याने आवरून कार्यालयात येणे. रोजचे रूटिन काम पण बारकाईने, निगुतीने करणे. कारण काही डिस्ट्रॅक्षनच नाही! न बायकोचा फोन न मुलांच्या/ घरच्या कटकटी. जिवंत राह्ण्यासाठी आवश्यक म्हणूनच केवळ करायची ती नोकरी. लोकल मधून धक्के खात घरी आल्यावर कॉलनीतील मुलांवर व्यक्त होणारा वैताग. पार्सल एकट्याने उघडून वाढून घेणे आणि जेवणे. बाल्कनीत उभे राहून धुम्रपान करणे. असह्य झाले कि डोळे मि टून पडणे. हे जीवन असेच एक दि वस संपून जाणार आहे हे अधोरेखित करणारा
आजुबाजूचा न बदललेल अवकाश. जुनी सायकल, जुने पाने सामान, व्ही एच एस टेप्स त्याव र बायकोने रेकॉर्ड केलेले जुन्या मालिकांचे भाग. सगळे कसे साकळलेले. कुंद एखादा विनोद सुचला तर, हपिसात वादावादी झाली तर एखादे गाणे आवडले तर सांगायला, शेअर करायला कोणीच नाही असा
एकसंध एकटेपणा.

ह्यात एकदम बदल होतो म्हणजे एक दिवस त्याला इलाने बनवून दिलेला डबा चुकीने मिळतो. घरच्या जेवणाला तरसलेला ( हपापलेला नव्हे) साजन सुखावतो व सर्व फस्त करतो. आपली इलाशी ओळख आधीच झालेली असते. नवर्‍याचे लक्ष वेधून घेण्यासाठी शुष्क संसारात परत जान आणण्यासाठी धडपड णारी इला उत्तम चविष्ट अन्न बनवून नवर्‍याला पाठवत असते पण कामाच्या रेट्यात, विवाहबाह्य संबंधात गुंतलेला तो तिला समजून घेणे सोडा, तिचा पारच अनुल्लेख करत असतो. त्यांच्या संसारातला साचलेपणा तिला असह्य होतो. पण उपाय सापडत नाही म्हणून ती तशीच गतानुगतिकतेने दिवस-रात्री मोजत जगत असते.

डबा चाटूनपुसून खाल्लेला पाहून इला आशावते. पण मग अदलाबदल झाल्याचे कळल्यावर निराश
होऊन एक चिठ्ठी डब्यात टाकते. अहो आश्चर्यम! त्या चिठ्ठीचे उत्तरही येते. आंतरजालावरही आता अभावानेच आढळणारी अ‍ॅनॉनिमिटी ह्या दोघांना अपघाताने नसीब होते. दोघे आपापले जीवन, विचार शेअर करतात. अनवधानाने मनाने जवळ येत जातात. भेट्णे अपरिहार्य होते त्या पॉइन्टलाच कथानक एक वळण घेते आणि एका अनपेक्षित, अनिश्चित क्षणी हा प्रवास संपतो. इन्सेप्शनच्या शेवटाप्रमाणेच हाही शेवट हुरहुर लावून जातो. डबेवाल्यांच्या ज्ञानोबा माउलीच्या जपात सूर आणि पावले मिळवून आपण बाहेर पडतो. आपल्या जीवनातल्या हुकलेल्या संधी, मैत्रीच्या शक्यता पडताळून पाहात,

पण कथानकाचे आणि दिग्दर्शनाचे कौशल्य हेच आहे कि कुठेही मनात कडवटपणा उरत नाही. मनाचे बंध कुणाशी, काही काळ का होईना जुळले तर! नाहीतर पुढे आहेच एकटेपणाशी झुंज! सारे माहितीचे
आणि असह्य! गॉड ऑफ स्मॉल थिंग्जमधील अम्मू -वेलुथा, मुराकामीच्या आय क्यू ८४ मधील तेंगू आणि आओमामी अश्या काही अपघाताने भेटलेल्या जोडप्यांचा संदर्भ घेतल्यास दिग्दर्शकाचे विषय हाताळणीतील कौशल्य अधिक नजरेत भरते आणि मनावर एक सुखद अस्तर पसरते. इला आणि साजन यां चे वैयक्तिक विश्व कधीच एकमेकांत मिसळत नाही. ती तिचे जीवन जगते आणि तो त्याचे. पण जगात
कुठे तरी तो आहे आणि ती आहे ह्या जाणिवेनेच त्यांच्या जीवनातला एकटेपणा मिटतो. आपल्या आईचे जीवन ज्या चाकोरीत घट्ट बांधले गेले होते ते आणि तसेच आपलेही जीवन जात आहे; जाणार आहे ह्याची जाणीव झाल्यावर ती हादरते. पण जीवन संपवत नाही' तर एका वेगळ्या दिशेने स्वतःचा प्रवास चालू करते. ह्यात तिला साजनची सोबत हवी असते, गरजही असते पण तो नाहीच आला तरीही तिचा
निर्णय झाला आहे. ती स्त्रीवादी नाही, फक्त एक माणूस म्ह्णून जगण्यातील घुसमट, तोचतोपणा नाकारून नवे काहीतरी अनुभवायचा आपला हक्क ती तपासून बघणार आहे.

रोजचे आंबट दही नको वाटले तरी खावे लागणार्‍या माण सा ला अनपेक्षित पणे एखाद दिवशी
तिरामिसू मिळाले तर काय वाटेल तशी साजन ची मनःस्थिती होते. इलाला भेटायच्या कल्पनेने तो फुलतो
पण आपल्या मध्यमवयीन सेन्सिबिलीटीज त्याला नाकारता येत नाहीत. तिला नुसते बघून तो मागे फिरतो. पण रिटायरमेंट व पुढे येणार्‍या वृद्धत्वाला निमूटपणे स्वीकारावे अशी स्वतः ची समजूत
घालणारा तो जगून बघण्याच्या एका आदिम योलो जाणिवेतून आयुष्याला परत सामोरा जातो.
मनाची घट्ट बंद केलेली दारे किलकिली करून बाहेरचा प्रकाश, प्रेमाची, सहअनुभवाच,, सहवेदनेची जाणीव अनुभवायचे धाडस करतो. पुढे काय तर ग्यानबा तुकाराम! इब्तदाए इश्क में हम सारी रात जागे अल्ला जाने क्या होगा आगे?

करण जोहरने सादर केली असली तरीही ही रूढ अर्थाने प्रेम कथा नाही. त्याला साचेबंद अंत नाही उत्तरायण सारखी कंपॅनिअन शिपची कथा पण नाही. या वयात को णीतरी पाहिजेच ना असा मध्यमवर्गी द्र् ष्टिकोण ह्यात नाही. तर जीवनाने तुम्हाला कसलाही डाव दिलेला असो तो खेळून बघितला पाहिजे, त्यातल्या सर्व शक्यता पडताळून पाहिल्या पाहिजेत असे ह्या चित्रपटातून व्यक्त होते. हा एक दृष्य अनुभव आहे दोन माणसांच्या जीवन रेखा एकमेकांत मिसळू बघतात त्याचा. चित्रपटाची नेपथ्य, कॅमेरा इत्यादी अंगे पण अतिशय पूरक आहेत. मुंबई अंगावर येत नाही. पात्रांची आर्थिक परिस्थिती, त्यांच्या जगण्यातूनच दिसत राहते. नवाजुद्दीन सिद्दीकीचे काम नेहमीप्रमाणेच उत्तम. त्याच्या परिस्थितीतील विसंगती, फाइल वर भाजी चिरणे, लोकल मध्ये बसून! सहज विनोद निर्माण करणारी संवाद फेक ...
हा कलाकार नेहमीच एक गोळीबंद पर्फॉरमन्स सादर करतो.

भारती आचरेकरांची आवाजी सोबत इला बरोबरच आपल्यालाही मिळत राहते. एक भुतानीज प्रेमगीत रात्री च्या अंधारात ह्वेत विरत जाते तो क्षण फार गोड वाटला मला! तेव्ढ्या पुरते इला आणि साजनचे प्रेम जिवंत होते. शक्यता अशक्यतेच्या धुक्यातून पुढे यायचा प्रयत्न करतात एकटेपणाला दुसरा एकटेपणा येऊन मिळतो आणि अंतर्धान पावतो.

डबेवाल्यांचे खास मराठी पण नीट पकडले आहे. ते कुठे तरी हलवून टाकते. त्यांचे मेहेनती प्रामाणिक चेहरे
जवळीक साधतात. कदाचित मी मराठी असल्याने असेल.

मुराकामीने लिहिल्या प्रमाणे,

" I'm tired of living unable to love anyone. I don't have a single friend - not one. And, worst of all, I can't even love myself. Why is that? Why can't i love myself? It's because I can't love anyone else. A person learns how to love himself through the simple acts of loving and being loved by someone else. Do you understand what i am saying? A person who is incapable of loving another cannot properly love himself.”
― Haruki Murakami, 1Q84

सोमवार पासून डबा लावावा म्हणते जेवायचा.

मुराकामी यांचे कोट जालाव रून साभार. पण पुस्तक पैसे देऊन विकत घेतले आहे तरीही आक्षेप असल्यास
काढून टाकते.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'हवे ते देतो आहे' म्हणजे नक्की काय? लौकिकार्थाने चांगला असणं, 'चांगला' या व्याख्येत बसणारं आपल्या बायकोला 'देणं' हे असूनसुद्धा तिचा आनंद दुसर्‍या कशाततरी असणं, यात मला गैर वाटत नाही.>>

चिन्मय, अशा नात्यामधे आपल्याला हव ते सगळच मिळत नसत. जगभरात सगळे नवरा बायको हे कुठेतरी तडजोड करत असतात. एक नवरा वा बायको म्हणून विवाहबाह्य संबंध नसणे, एकमेकांची काळजी आणि एकमेकांवर प्रेम करणॅ, मुल जन्माला घालणे, एकमेकांचा आदर करणे.. माझ्यामते हे सगळ 'चांगल' आहे. जर तुम्ही नवर्‍याशी वा बायकोशी प्रतारणा करत असाल तर नवीन वाट शोधा. नाहीतर तुम्ही जर हे चांगल सोडून दुसरी वाट निवडली तर त्यात आदर्श असे काय!!

बी....

महेन्द्रकुमार नित्यनेमाने स्त्रियांच्या गराड्यात असणे साहजिकच मानले गेले पाहिजे कारण हिंदी चित्रपटसृष्टीतील तो आघाडीचा नायक आहे....ही बाब कल्पनाला अर्थातच माहीत असते. त्याबद्दल तिची कुठे तक्रार असते हे दाखविले गेलेले नाही....तिच्या एकटेपणाला घालविणारा तसेच चित्रकलेची आवड असणारा अगदी तिच्याच कॉलेजमधील युवकासारखा मित्र जेव्हा तिला सापडतो त्यावेळेपासून दोघांतील तुलना प्रकरणाला सुरुवात होते.

महेन्द्रकुमार नित्यनेमाने स्त्रियांच्या गराड्यात असणे साहजिकच मानले गेले पाहिजे कारण हिंदी चित्रपटसृष्टीतील तो आघाडीचा नायक आहे....ही बाब कल्पनाला अर्थातच माहीत असते. त्याबद्दल तिची कुठे तक्रार असते हे दाखविले गेलेले नाही....तिच्या एकटेपणाला घालविणारा तसेच चित्रकलेची आवड असणारा अगदी तिच्याच कॉलेजमधील युवकासारखा मित्र जेव्हा तिला सापडतो त्यावेळेपासून दोघांतील तुलना प्रकरणाला सुरुवात होते.>>

अशोकजी, अगदी सुरवातीलाच हे दाखवले आहे दिप्तीच्या चेहर्‍यावर दुखावले गेल्याचे भाव. ती एकटी पडते ह्याला कारण त्याची नोकरी, तिचे स्वरुप हे नसून तो तिचा नसतो हे आहे. .. निदान मला तरी तसे वाटते.

'अनुराधा' मधलं बलराज सहानी आणि लीला नायडू हे जोडपं. लीला नायडूला लौकिकार्थाने काहीच कमी नसतं तिच्या संसारात. बलराज सहानी अत्यंत सभ्य, हुशार, बायकोवर खूप प्रेम करणारं व्यक्तिमत्व. फक्त त्यांना प्रेम व्यक्त करता येत नसतं. लीला नायडूंची कुचंबणा होत राहते..... "हाए रे वो दिन क्यू ना आए", "कैसे दिन बीते कैसी बीती रतियाँ, पिया जाने ना".

बी....अरे बाबा त्याची कसली आली आहे नोकरी ? तो तर सिनेसृष्टीला आपल्या तालावर नाचवणारा. पैशाची मस्ती आली आहे त्याला. बायकोचे दागिने विकून महेन्द्रकुमारच्या कराराची रक्कम रडतरडत आणून त्याचे पाय धरायला खाली वाकलेला निर्माता...ते दृष्य पाहून कल्पनाला नवर्‍यामधील धंदेवाईकपणाची चीड येते. आपल्यापेक्षा सईद जाफ्री यांचे संवाद रुबाबदार होताहेत हे पाहून खुबीने दिग्दर्शक व संवादलेखकाला ते आपल्या बाजूने वळवून घेण्याचे कसब आहे....कला, कला म्हणत असली कृत्ये करणारा नवरा तिच्या मनातून उतरत असतो...केवळ स्त्रियां हेच एकमेव कारण नसते त्या पत्नीकडे.

अशोकजी, तुम्ही जे म्हणालात ती अजून कारणे आहेत पण मुख्य कारण माझ्यमते तो/ती माझी नाही इतर कुणाचा/कुणाची आहे हे आहे.

बी,
'आदर्श' म्हणजे काय, याच्या संकल्पना वेगळ्या असू शकतील. नातं 'आदर्श' असणं महत्त्वाचं की त्या नात्यात आनंदी असणं महत्त्वाचं?

अर्थात हा माझा विचार झाला. कुठलीही कलाकृती बघताना आपण आपल्या मतांशी, अनुभवांशी ती ताडून बघतो. तुझी मतं वेगळी असल्यानं या चित्रपटाबद्दलचा तुझा विचारही वेगळा आहे, असायला हवा. Happy

नात्यात खरेपणा असणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं. तोच जर नसेल तर वरवर नातं आदर्श आणि आनंदी दिसून काय उपयोग?

लंचबॉक्स पुरतं माझं मतही हेच आहे की तिच्या नवर्‍याचं अफेअर दाखवणं गरजेचं नव्हतं. मुळात नवरा तिच्या सगळ्या गरजा पूर्ण करतोय तरी ती असं का वागेल या प्रश्नाचं काही उत्तर नाही. कारण तिच्या त्याच्याकडून काय अपेक्षा, काय गरजा आहेत हे दुसर्‍यांनी ठरवणं चुकीचं आहे.

चांगला असणं पुरेसं नाही या चिनूक्सच्या मताला अनुमोदन.

सिनेमा आहे, चालायला हवा. सामाजिक भानासाठी इलाच्या नवर्याचं अफेअर तर दाखवावं लागलंच पण साजनच्याही बायकोला मारावं लागलं. याच प्लॉट साठी कितीतरी कॉम्बिनेशन्स करता येतील -
१. इला एकटी, साजन कुटूंबकबिल्यात - अनवट तरी पण सर्रास आढळणारी गोष्ट
२. इला चा नवरा चांगला, साजन एकटा - इलाच्या वागण्याला आजही जस्टिफिकेशन मागणारा समाज
३. इला एकटी साजन एकटा -बोर, सरळसोट कथा
४. इला एकटी,साजनच्या बायकोचे अफेअर - मग साजनला व इलाला चोरीछुपे चिठ्ठ्यांची गरजच काय! पुन्हा पुरूषस्वातंत्र्य देणारा समाज
५. इलाचा नवरा चांगला, साजनची बायको चांगली - इलाच्या,.साजनच्या वागण्याचे जस्टिफिकेशन मागणारा समाज.
थोडक्यात, त्यातल्या त्यात सेफ व कमजोर कडी कौन तर इलाच्या नवर्याचे अफेअर. भरल्या ताटावरून उठायचं म्हणजे आजही तो अन्नाचा अपमान मानणारी संस्कृती आपली, जेवणार्याला भूक आहे का नाही, ते पदार्थ रूचतात का,.पचतात का याच्याशी देणंघेणं नाही. Happy

फोनवरुन जास्त लिहिता येणार नाही. हा चित्रपट हल्लीच पाहिला.
नवरा इलाच्या सगळ्या गरजा पूर्ण करतोय असे मला तरी वाटले नाही. त्यांच्यातले नाते यांत्रिक आहे. तिच्या भावनिक गरजा तर भागत नाहीच आहेत पण शारीरिक गरजाही भागत नाहीयेत असे दर्शवणारा प्रसंग आहे चित्रपटात.
संसारात सुखी असूनही कुणाला आनंद शोधावासा वाटला तर ते चूक की बरोबर हा वेगळा भाग.

त्यातही, शारूख व राणी लगेच एकत्र येताना दाखवले नाहीत. आधी त्यांच्यामुळे दु:खी झालेल्या जोडीदारांचं मार्गी लागलं तेव्हा कुठे हे मोकळा श्वास घ्यायला मोकळे झाले! खरा सिनेमा दहा मिनीटं आधीच संपायला हवा होता. पुढचं लमाण लोकलाजेस्तव!

संसारात सुखी असूनही कुणाला आनंद >> सुखाची व आनंदाची व्याख्याच जिथे बदलते तिथे हे प्रश्न उभे राहतात. सुख = आनंद. जगापुढे जे सुख दिसते त्याला 'सुखवस्तू' म्हणूनच म्हणत असावेत, त्यात भावना नसतात.

अगदी अगदी. इतकंच नव्हे तर त्यांना ३ वर्षं जुदाईची शिक्षा पण ठोठावली. असो. उगाच चर्चा लंचबॉक्सवरून भरकटायला नको Happy

आशूडीने लिहिलेल्या ५व्या केसचं अजून एक उदाहरण - सिलसिला.

अगो, ह्या सिनेमात नवर्‍याचं अफेअर दाखवलंच आहे. हे पुढचं डिस्कशन आहे ते त्याचं अफेअर नसतं तरी तिने तिचा आनंद वेगळ्या ठिकाणी असेल तर तो मिळवण्यास काय हरकत आहे, ह्या बद्दल आहे.

लंचबॉक्समधे जेंव्हा ईलाचे वडील वारतात तेंव्हा ती त्यांच्या घरी जाते. आजूबाजूला लोक असतात त्याही वातावरणात ईलाची आई ईलाच्या वडीलांबद्दल बोलते. म्हणते सुरवातीला आमचे नीट पटायचे. नंतर ते प्रेम उरले नाही. नंतर त्यांचे आजारपण आले. तर मी त्यांच्यासाठी करत राहिले. सकाळी उठायचे आलू पराठे बनवायचे. हे करायचे ते करायचे. हे ती ईलाला सांगताना मधेच हरवून जाते आणि म्हणते मला फार भुक लागली. मला गरमगरम आलू पराठे खायचे आहे. ईला थोडी संभ्रमात पडते. चकीत होते. विचार करते. तिला वाटते एक प्रेम नसलेल नात आईने निभावलेल आहे ज्यात काहीच अर्थ नव्ह्ता. ती अजूनही भुकेली आहे. तिच्यासारखेच आपणही जीवन जगायचे का? ...

मला हा आईचा आणि मुलीचा प्रसंग फार सवेंदनशील वाटला. सुरवातीला वाटले होते की हे काय मधेच दाखवत आहे पण त्या प्रसांगाला एक वजन आहे.

म्हणते मला फार भुक लागली. मला गरमगरम आलू पराठे खायचे आहे.>>>> हे रुपकात्मक आहे. मनाची उपासमार, मनाच्या उपासमारीचे कारण संपल्यावर उफाळून आलेली दाखवली आहे. तिथेच इलाला आपल्याही आयुष्यात तेच चालू आहे ह्याची जाणीव होते. त्याच वेळी तिच्या आयुष्यात तिच्या मनाची भूक लांबूनच थोडीफार भागवणारा साजन आलेला असतो.

इलाच्या नवर्‍याने त्याचा आनंद इलाची पर्वा न करता दुसरीकडे ऑलरेडी शोधलाच आहे. त्याचा त्याने आनंद शोधण्यापायीच इलाच्या आयुष्यात आनंद उरला नाहिये, तिचा त्यात दोष नसताना. इलाच्या नवर्‍याचं अफेअर नसतं आणि इलाने तिचा आनंद वेगळीकडे शोधला असता तर हीच स्टोरी उलट होऊ शकली असती. म्हणूनच प्रत्येकाला सगळं मिळतंच असं नाही. पण जे कमी असेल ते अट्टाहासाने मिळवण्याच्या नादात दुसर्‍याचा आनंद हिरावला जातोय हे उमगलं पाहिजे.

केश्विनी, अफेअर नसते तरी त्यांच्यातले नाते मुळात यांत्रिकच आहे असे मला म्हणायचे आहे.
मग तो तिच्यासाठी चांगला नवरा कसा ह्या अर्थाने.

अमा , तुम्ही परीक्षण फार सुंदर लिहिले आहे. आधी प्रतिक्रिया दिली होती की नाही आठवत नाही.

Oh OK, affair asalyane tyanchyatale nate jase aahe tase aahe ase tum hi mhantaay ka ?
Mala vatale ki kadhi kadhi ase kahi nasunahi navara bayakot disinterested asu shakato ...career chya mage dhavnaara vagaire.

केश्विनी, अफेअर नसते तरी त्यांच्यातले नाते मुळात यांत्रिकच आहे असे मला म्हणायचे आहे.>>> हे कुठल्या प्रसंगावरुन ते कळलं नाही. मी सिनेमा बघताना मधेच आत बाहेर करत होते त्यामुळे मिस झालं असेल.

असंही एखाद्या नात्यात खरंच जराही आनंद उरला नसेल, नुसतं खेचणं चालू असेल तर जगाची पर्वा न करता मोकळं व्हावं. मग ते २५व्या वर्षी असो वा ७०व्या वर्षी.

सिनेमा पाहून स्वतहाचा असा काही ठोकताळा केला होताच. पण तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रिया वाचून सिनेमा अधिक कळला, भावला असे म्हणावेसे वाटते..
मला एक शंका नेहमी मनात येत असते की खरच का आपले एखाद्या माणसाशी जी नाळ जुळत असते त्याला नेमके काय करण असावे... की गत जन्माच्या गाठी असतात.. हे कदाचित अवांतर असेल...

गंध, मलाही खूपदा असेच वाटते की आपल्या आजूबाजूला आपली अनेक लोकांशी तशी मैत्री असते पण खास असे काही नाते नसते. अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच आपले जवळचे असे मित्र असतात. कधी वाटते मागिल जन्मी आपले ते कुणीतरी असावे.

केश्वी, तू माझ्या प्रतिसादानंतर लिहिलेल्या सगळ्यात पहिल्या पोस्टीसंदर्भानं- साजन निघून गेला आहे हे समजल्यावर सुद्धा ती भूतानला जायचं ठरवते. त्यामुळे एका पुरुषासाठी नवर्‍याला सोडलं, मग परत आली तर तो नवरा स्वीकारेल की नाही या सगळ्या गोष्टी होतीलच असं नाही किंवा होणारच नाहीत. निघून जायचा निर्णय स्वतः घेतल्यानं त्याच्या परिणामांची जबाबदारी अर्थात तिचीच असणार. अगो म्हणते तसं अफेअर नसतं तरी त्यांच्यातलं नातं मुळात यांत्रिक आहे. त्यामुळे साजन नावाच्या कुणा पुरुषाचं तिच्या आयुष्यात येणं निमित्तमात्र आहे. परिस्थितीचा विचार करून त्यातून बाहेर पडायच्या निर्णयापर्यंत येण्यासाठी तिला फक्त एक ट्रिगर हवा होता जो साजनच्या निमित्तानं मिळाला.

अशोक, तुम्ही सांगितलेला 'एक बार फिर' बघितला नाहीये चित्रपट. खरं तर पहिल्यांदाच नाव ऐकलं चित्रपटाचं.

सिंडरेला....

मग तर मी आग्रह करीन की तुम्ही "एक बार फिर" आवर्जून पाहा.....केवळ दीप्तीसाठी का होईना, पण पाहाच. बाकी कथानकाबद्दल मतेदुमते होऊ शकतील पण विषय नावीन्यपूर्ण होता....आजही वाटतोच.

हो, दिप्ती नवल आवडते त्यामुळे नक्की बघेन.

थोडं अवांतर, दिप्ती नवल आणि फारुख शेख यांचा 'लिसन अमाया' चित्रपट बघितला नसल्यास जरूर बघा. तो असाच नातेसंबंधावर आहे पण थोड्या वेगळ्या अँगलने आहे.

ग्रेट आणि थॅन्क्स....मी नाही पाहिलेला 'लिसन अमाया', पण आता जरूर पाहतो. दिप्तीचाच "पंचवटी" नामक एक चित्रपट आला होता, बासू भट्टाचार्य यांचा....हे नाव खुद्द दिप्तीच्या चित्रपट यादीतदेखील कदाचित दिसणार नाही...इतका बाजूला गेला. पण मला पाह्यला मिळाला होता. तुम्ही तो पाहावा अशी मी शिफारस करत आहे.

साजन निघून गेला आहे हे समजल्यावर सुद्धा ती भूतानला जायचं ठरवते. त्यामुळे एका पुरुषासाठी नवर्‍याला सोडलं, मग परत आली तर तो नवरा स्वीकारेल की नाही या सगळ्या गोष्टी होतीलच असं नाही किंवा होणारच नाहीत. >>>> मान्य:-)

परिस्थितीचा विचार करून त्यातून बाहेर पडायच्या निर्णयापर्यंत येण्यासाठी तिला फक्त एक ट्रिगर हवा होता जो साजनच्या निमित्तानं मिळाला. >> सिंडी +१.

अजून काही तरी हवं आहे ह्यापेक्षा इला मध्ये आलेलं आत्मभान महत्त्वाचे - आपल्या आनंदाची जबाबदारी ही नवरा किंवा साजन यांची नसून आपली स्वतःची आहे. त्यासाठी आनंदी प्रदेश एकट्याने गाठावा लागेल ती जाणीव महत्त्वाची.
>>> हे सगळ्यात महत्वाचं आहे. साजन हा फक्त कॅटलिस्ट आहे तिला ते आत्मभान येण्यासाठी.
शिवाय तो तिच्या वडलांच्या मृत्यूनंतरचा ती आणि तिच्या आईचा सीनही फार महत्वाचा...

लिसन अमाया 'einthusan.com' वर आहे. फारूख शेख आणि दिप्ती नवल आवडते असल्याने सिनेमा अधिक आवडला. स्वरा भास्कर काही ठिकाणी इरीटेटींग वाटली. दिप्ती नवलच बुककॅफे हेही सिनेमातलं एक पात्र वाटतं. आयुष्यातल्या महत्वाच्या जबाबदार्‍या पार पाडल्यावर असा कॅफे आपलाही असावा असं वाटायला लावणारं :).

मी 'लंचबॉक्स' अजून पाहिला नाही. पण इथली चर्चा वाचून काही गोष्टी जाणवल्या. स्वतःचे सुख शोधताना कुठल्या गोष्टीला महत्व द्यायचं? स्वत:च्या इच्छेला, समाजाला का आपल्या निर्णयामुळं कुठलेली कसलेही परीमाण होऊ शकणार्‍या जवळच्या व्यक्तीला/नां? नवर्‍याचे किंवा बायकोचे अफेअर आहे म्हणून, नवराबायकोचं नातं यांत्रिक आहे म्हणून किंवा दोघांपैकी एका जोडीदाराला दुसर्‍याच्या गरजा कळत नाहीत किंवा तो/ती ते पूर्ण करू शकत नाही म्हणून त्या नात्यातून बाहेर पडणे हे दाखवणे हे समाजमान्य असल्याने अशी कारणं दाखवणं हे 'easy way out' झालं. सर्व काही छान छान सुरळीत चालू असताना, "लौकिक अर्थाने" सर्व सुखं पायाशी असताना दुसरीकडे सुख शोधायला लागण्याची गरज पडावी हे अजूनही बर्‍याच लोकांच्या अर्थात समाजाच्या पचनी पडत नाही. यात नीतीमत्ता, योग्य अयोग्य या वेगळ्या आणि पुढच्या गोष्टी आहेत. पण मुळात अशी गरज वाटू शकते हे त्या व्यक्तीलाही पचायला जड जातं आणि मग द्वंद सुरू होतं. 'एक बार फिर' मध्येही तिच्या नवर्‍याचं पात्र थोड्या खलनायकी शेडचं दाखवलं आहे. तिचं त्या चित्रकाराकडे ओढलं जाण्यामागे या गोष्टीचं कारण कळत नकळत दाखवलं गेलंय.
माझ्यामते हा विषय करण जोहरला न झेपणाराच आहे. एका सुरेख कथासूत्र होतं पण एखाद्या पदार्थात जसं वेगवेगळे उग्र चवीचे मसाले घातल्याने पदार्थाची मूळ चवच हरवून जाते आणि पदार्थ नुसताच दिसायला छान होतो, तसं काहीसं "कभी अलविदा ना होना" चं झालं.
'लंचबॉक्स' जेव्हा बघेन तेव्हा इथे झालेल्या चर्चेमुळे जास्त समजून घेऊन, आस्वाद घेत बघेन हे नक्की.

Pages